सारे प्रवासी गाडीचे

भोचक's picture
भोचक in जनातलं, मनातलं
21 Apr 2008 - 7:21 pm

परशुरामची झोप मोडू नये म्हणून भुंग्याने पार मांडी फोडली तरी कर्णाने हु की चू केले नव्हते, असे म्हणतात. तद्वतच मध्य प्रदेश नामे राज्यात सार्वजनिक प्रवास करण्यासाठी कमीतकमी एवढी तरी सहनशीलता हवीच. सहनशीलतेची परीक्षा वा कसोटी पाहणारे प्रसंग आपल्या आयुष्यात अधून मधून येत असतील, पण या बाबतीत आपल्या लोकांना अधिक मजबूत करणेसाठी मध्य प्रदेश सरकारने कायमस्वरूपी सोय केली आहे, ती वाहतुकीच्या खासगीकरणाच्या रूपाने.

आपल्याकडे 'यष्टी'च्या खासगीकरणाची आरोळी आली की सगळे कर्मचारी एकत्र येऊन शड्डू ठोकून उभे रहातात. आणि त्यांच्या मुजोरीला कंटाळलेले सामान्यजन 'खाजगीकरण व्हायलाच पाहिजे, च्या मायला जरा ताळ्यावर तरी येतील' अशी मताची पिंक टाकून मोकळे होतात. पण हे खाजगीकरण काय प्रकरण आहे, हे मध्य प्रदेशात अनुभवले तर 'गड्या आपुली यष्टी बरी' असं म्हणायची वेळ नक्की येईल.

तर या प्रदेशात फिरायचे झाल्यास आधी 'स्टॅंडावर' जावे लागते. हे स्टॅंड हे आधी समजून घेऊ. आडव्या तिडव्या लावलेल्या 'ट्रेवल्स' कंपनीच्या बस दिसल्या आणि बेंबीच्या देठापासून गावांची नावे घेत ओरडणारी मंडळी दिसली की समजायचं स्टॅंड आलं. स्टॅंडावर आल्यानंतर तिथे उभे राहण्याची इच्छा तुमच्या मनात राहू नये यासाठीची जाणीव तुमच्या नाकाला व्हायला सुरवात होते. तुम्हाला कुठे जायचंय यासाठी चौकशी कक्षात जायची गरज नाही. वेगवेगळ्या गावाची नावे घेत दिसेल त्याला 'येता का जाऊ?' विचारणारे एजंट-कम-कंडक्टर- कम-क्लिनर ही माहिती साद्यंत देतात. हे पाहिल्यावर स्टॅंडावरच्या 'सर्कारी' व्यक्तीला इथे काडीचीही किंमत नसते, ते कळून चुकते. आणि 'खाजगीकरणाची' डबल बेल आपल्याही मनात वाजू लागते.

आता ट्रेवल्सची गाडी नावाचं प्रकरण आधी समजून घ्यायला हवं. सरकारने अवघ्या काही ठिकाणी आपल्या गाड्या पाठविण्याची सोय केली आहे. बाकीचे सगळे मार्ग 'ट्रेवल्स' कंपन्यांना विकले आहेत. त्यामुळे त्या मार्गावर तुम्ही किती प्रवासी न्या, आणा कशाला काही घरबंध नाही. गाडी चेकींग वगैरे 'सिस्टिम' नाही. 'टिक्टं' मिळाली तर मिळतात नाही तर नाही. त्यांना तिकिटांपेक्षा चिटोरी हा शब्द जास्त योग्य आहे. त्यावर काही तरी अगम्य खरडून कंडक्टर ते आपल्याला देतो.

साधारण तासा दोन तास- ते पाच एक तासापर्यंतच्या प्रवासासाठी इथं छोट्या गाड्या आहेत. छोट्या म्हणजे साधारणपणे गाडीच्या दोन्ही 'शीटां'दरम्यान उभं राहून दोन्ही हाताची 'वाव' गाडीत फैलावली की दोन्ही बाजूचा हाताचा पत्रा हाताला लागलाच पायजे. गाडीच्या दोन बाजूला प्रत्येकी दोन 'शीटां'ची रचना असते. (आणि या शीटांच्या बाजूलाच विविध रंगद्रव्याची शिटं बिल्कुल फ्री.) हे सीट म्हणजे साधारणपणे 'बूड' टेकवण्याची जागा अशी त्याची व्याख्या करता येईल. कारण या सीटांवर बसणे जगातील दोन अत्यंत सडपातळ माणसे आली तरी शक्य नाही. अशा साधारणपणे तीस-बत्तीस जागा असतात. डायवरच्या मागे आणि बाजूलाही सीटं बसतात. ही संख्या बहुतेकदा गर्दीवर अवलंबून असते. ती साधारणपणे वीस-पंचवीस जणांपर्यंतही जाऊ शकते. याशिवाय गाडीत दोन सीटांच्या मधल्या भागात उभे राहून प्रवास करण्याची 'मेहरबानी'ही प्रवाशांवर केली जाते. ही संख्याही अर्थात आत किती जास्तीत जास्त येऊ शकतील आणि त्याहीपेक्षा गाडीचा कंडक्टर- ड्रायव्हर- क्लिनर अशा 'कम' लोकांवर अवलंबून असते. त्यामुळे बसलेल्या लोकांना आपल्याला जागा मिळाल्याचा आनंद लोकांचे पार्श्वभाग चेहर्‍याच्या आजूबाजूला लागतात त्यावेळी उडून गेलेला असतो.

या गाडीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हाफ तिकीट असलेल्यांना इथे स्वतंत्र सीट दिली जात नाही. म्हणजे दहा वर्षाचा मुलगा असला तरी त्याने आपल्या आई-वडिलांच्या मांडीवरच बसायचे. त्याच्यासाठी स्वतंत्र सीट नाही. इथल्या गाड्यांमधली दोन व्यक्तींसाठीचे सीट प्रत्यक्ष पाहिल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा व्हायचा नाही.

तर आता या व्यवस्थेसाठी लागणार्‍या पदांचा आणि त्यांच्या पात्रतेचा विचार करू.

एजंट- साधारणपणे 'पोर्‍या' वगैरे असणारी मंडळी या पदासाठी आवश्यक असतात. त्याला 'ते कू-मेकू' , जा रीया, आ रिया वगैरे बोलता यायला हवे. गाडी लावली असेल त्याच्या जवळपास फर्लांगभर पुढे जाऊन नेमकी कोणती 'सवारी' आपण ज्या गाडीसाठी काम करतो, त्या गाडीत जाण्यासाठी आली आहे, हे ओळखता आले पाहिजे. मग या 'सवारी भीय्याला गाडीपर्यंत दुसर्‍या स्पर्धक कंपनीच्या हाती जाऊ न देता सुखरूपपणे आपल्या गाडीपर्यंत पोहचविता आले पाहिजे. ही याची मुख्य 'जवाबदारी'.

कंडक्टर-कम- ड्रायव्हर-कम- क्लिनर- यासाठी कोणत्याही शिक्षणाची 'अजाबात' गरज नाही. हिशेब जमतो एवढ्या पात्रतेवरूनही हे पद मिळवता येते. मुख्यतः हा माणूस सडपातळ हवा. म्हणजे गाडीत कितीही गर्दी असली तरी इकडे तिकडे हलायला अडचण नको. 'टिक्टं' फाडायला गर्दी भेदून शेवटपर्यंत आणि तिथून सहिसलामत 'दरूजा'पर्यंत येता यायला हवे. याबरोबरच चेहर्‍यावर एक विशिष्ट प्रकारची छानपैकी मग्रुरी वगैरे हवी. पण त्याचवेळी दयाभाव, कनवाळूपण हेही दाखवता यायला हवे. गाडी फुल्ल भरलेली असतानाही गाडीत जागा कशी आहे आणि मी तुम्हीला उभे नव्हे तर बसायला कशी जागा देतो हे खालच्या प्रवाशाला पटवून त्याला गाडीत घेऊन आणण्याची 'कॅपॅसिटी' याच्यात पाहिजे. आधीच्या बसलेल्या प्रवाशाला उठवून दुसर्‍याला जागा देणे, नंतर त्याला उठवून तिसर्‍याला जागा देणे असा जागांचा 'खो' त्याला खेळता यायला हवा. त्याचबरोर या सगळ्यांचे शिव्याशाप निर्मम भावाने खाता यायला पाहिजे. त्याचवेळी एखादा प्रवासी डोक्यात जायला लागला की त्याला 'आई-भन' यांच्यावरून शिव्याही त्याला देता यायला पाहिजे. पण त्याहीपेक्षा प्रवासी भरण्यावरून, गाडी सोडण्यावरून स्पर्धक गाडीच्या कंडक्टर-कम- ड्रायव्हर-कम- क्लिनर या आपल्या समपदस्थ व्यक्तीशी खच्चून भांडता यायला हवे. आणि हो महत्त्वाचे म्हणजे गुटखा वगैरे खाता यायला पाहिजे. अन्यथा त्याला या पदावर ठेवले जात नाही.

ड्रायव्हर- या व्यक्तीचा गाडीतल्या प्रवाशांशी त्यांच्यात असूनही संबंध नसतो. ही व्यक्ती गुटखा खाणारी असली पाहिजे आणि गाडी हाणणे हा एकमेव उद्देश त्याच्यासमोर असतो. त्यात स्पर्धक 'ट्रेवल्स' कंपनीची गाडी दिसली की त्याच्याशी 'रेस' खेळ. त्याला मागे टाकून वाकुल्या दाखव. (यासाठी कंडक्टर-कम- ड्रायव्हर-कम- क्लिनर या आपल्या सहकार्‍याची मदत घे.) ही उपकामे त्याच्याकडे असतात. या व्यक्तीसाठी आणखी एक गोष्ट 'मस्ट' आहे, ती म्हणजे गाडीत चढणे आणि उतरणे याचा एक खास 'अंदाज' त्याच्याकडे हवा. साडेनऊला सुटणारी गाडी जवळपास आठ वाजता भरायला घेतली जाते. तब्बल दीड तास गाडीत 'शिजल्यानंतर' ती खिडकी उघडून आत रूबाबत शिरणारा तो 'ड्रायव्हर' हा त्राता, देवदूत वगैरे वाटू लागतो. त्यात त्याचा रूबाब या अवस्थेशी आणखी जवळीक साधून देतो. आणखी एक. खच्चून भरलेली बस असली तरी ती लगेचच सुटते आहे, याचा आभास करून देण्यासाठी गाडी चालू करून देऊन, लोकांच्या बोलण्याकडे कान न देता तोच कान एफएमवरची गाणी ऐकण्याकडे वळविण्याची विलक्षण हातोटी हवी अशा व्यक्तीलाच ड्रायव्हर म्हणण्याची इथे पद्धत आहे.

सवारी- सवारी म्हणजे प्रवासी. गाडीत शिरल्यानंतर सगळेच सवारी होतात. त्याच्यासाठीही काही पात्रता आहे. जागा नसतानाही उभे रहाण्याचे कौशल्य तुमच्यात हवे. आपल्याबरोबरच दुसर्‍यांच्या पायावर बिनदिक्कत पाय ठेवता यायला हवा. आपला पार्श्वभाग दुसर्‍याच्या तोंडासमोर आला तरी तो तिथेच ठेवण्याचा नाईलाजात्मक निर्लज्जपणाही हवाच. त्याचबरोबर जागेवरून उठवले तरी
पर्याय नसल्याने गाडीत राहून प्रवास करण्याचा निलाजरेपणाही हवा.

सवारीचा एक अर्थ मिरवणूक असाही आहे. देवदेवता, राजे यांची सवारी काढली जाते. एवढे वाचल्यानंतर हा प्रवास त्या 'मिरवणुकी'पेक्षा काही वेगळा नसतो, याची कल्पनाही एव्हाना तुम्हाला नक्कीच आली असेलच. नाही का?

हे ठिकाणप्रवाससमाजजीवनमानविचारअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

वरदा's picture

22 Apr 2008 - 12:08 am | वरदा

कसे काय सहन करत असतील बिचारे लोक...

धमाल मुलगा's picture

22 Apr 2008 - 10:25 am | धमाल मुलगा

जगदंब.............जगदंब!!!
अरे काय हे?
एव्हढे छळ? अरेरे....कसं जगत..आपलं...'प्रवास'त असतील तिथले लोक?
आम्ही साला महाराष्ट्रात इतका माज करतो, एका बसमध्ये बसायला जागा मिळाली तरी शेजारचा माणूस डोक्यात जातोय म्हणून सरळ ती बस सोडून दुसर्‍या बसमध्ये चढतो. 'यष्टी'चे चालक-वाहक अरेरावी करतात पण इतका अमानवी छळ तरी नाहीत मांडत बुवा.

भोचकराव,
आपल्या तर अंगावर काटाच आला..म.प्र.मध्ये प्रवासालाच जाऊ नये असं वाटायला लागलंय :-(

नीलकांत's picture

22 Apr 2008 - 10:45 am | नीलकांत

भोचक राव,

तुमचा अनुभव आवडला. माझ्या अंदाजाने हा अनुभव इंदौरच्या सरवटे वरचा असावा. नाकाला होणार्‍या जाणीवे बद्दल बोलतोय मी !

कमी अधीक फरकाने मध्यप्रदेशात ही अशीच परिस्थीती आहे. इंदौर , उज्जैन, खंडवा, धार आदी भागांत फिरून मी हा अनुभव घेतलेला आहे.

अवांतर : जारीया, आरीया, भीया, खसको ही खास मालवी भाषेतील शब्द आहेत. आणि आताशा इंदौरी भाषेला 'यार' नावाचं नवं क्रियापद लाभल्याचं जास्तच कानावर आलंय. :-)

(इंदौरी) नीलकांत.

श्रावण मोडक's picture

22 Apr 2008 - 5:46 pm | श्रावण मोडक

आहेत हे अनुभव मी. असेच काहीसे अनुभव गुजरातमध्येही घेतले आहेत. तिथं तर बसमध्ये किंवा जे असेल त्या वाहनात संगीत या नावाखाली कानठळवणारे आवाज असतात.

मनस्वी's picture

22 Apr 2008 - 5:48 pm | मनस्वी

आपल्या तर अंगावर काटाच आला..म.प्र.मध्ये प्रवासालाच जाऊ नये असं वाटायला लागलंय

हेच म्हणते.

विसोबा खेचर's picture

23 Apr 2008 - 6:36 am | विसोबा खेचर

भोचकगुरुजी,

आपण अगदी योग्य वर्णन केले आहे. मध्यप्रदेशात मीही असे अनुभव घेतले आहेत. त्यापेक्षा आपली मराठमोळी यष्टी कितीतरी उजवी!

तात्या.

अन्जलि's picture

23 Apr 2008 - 5:21 pm | अन्जलि

horrible donot feel like visiting MP compared to that our ST is thousand times better. If we observe Maharashtra is much much better compared to other states in almost all aspects. however your observation is vey nice and milute you draw the correct picture good one.

अजय's picture

23 Apr 2008 - 8:03 pm | अजय

भोचक महाराज इंदूरकर,
झक्कास टिपलंय. फक्त आणखी दोन गोष्टींचा (कधी काळी मला दिसलेल्या) उल्लेख त्यात सुचवासा वाटतो.... तो म्हणजे "डिरेवर आणि किलनर' यांची संवाद भाषा.
गाडीत कोंबायला "सवारी' सापडली की दारातील शेवटच्या पायरीवरचा "किलनर' बोंबलतो
- रोक्‍ये.
आणि एकदा का ती "सवारी' गिळली की, चक्रधारी डिरेवरला कॉल दिला जातो तो
- बढाव.

आताही तेच शब्द आहेत का, माहित नाही. असावेत.
चु. भू. दे. घे.

तुमचाच मित्र
अजय