को जागृति ? को जागृति ? @@@@@@ मी ! मी !

स्पंदना's picture
स्पंदना in जनातलं, मनातलं
21 Oct 2010 - 9:36 am

(सदर लेख लिहिताना आम्ही परकाया प्रवेश केला आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी)

सीटटया न अगदी दोन दिवस डोकं खाल्ल होत ! तो, मी अन आमच्याच ऑफिसातली आणि दोघं असं मिळून 'पार्टी ' करायची असा त्याच्या मनातला बेत तो माझ्या गळी उतरवायला बघत होता. आता या २०१० साली तुम्ही म्हणाल 'मग काय ? जायचं ! त्यात काय असं नव ?' पण मंडळी ही गोष्ट; हे आत्ता जे सार पार्टी, पिण, अन धमाल करत फिरणं सुरु असतंय त्ये सार करणं फकस्त पिक्चर मध्ये असायचं, त्या काळची !!
आमची त्या काळची अवस्था निम्म मन मुमताज राजेश खन्नात अन निम्म चरणाऱ्या म्हशी वर अशी व्हती राव ! रस्त्यान काही काही पोर कानाला ट्रान्झीस्टर लावून फिरायची तर आमची आय त्यानला 'भिक्कार लक्षण' म्हणायची ! तिच्या ममतेन भरलेल्या मनाला मी अगदी खरोखरचा ' शाम ' होतो. आमच अप्पा, हा त्येच , माझी पोर मला ' पप्पा ' अन आज काल त्याची पोर त्याला 'डॅड' म्हणत्यात , तेच आमच अप्पा , प्राथमिक शाळत शिक्षक होते. सायकल घेऊन सकाळी उजाडायला दारांत गवताचा भारा आणून टाकत. त्याच्या आधी त्यांनी आमच्या एकर भर शेतातल काय बाय काम उरकल्याल असायचं. मी आय टी आय झालो तरी त्यांची अजून धा वर्स नोकरी शिल्लक व्हती. मला शाळत शिकवून मोठ्ठा करायचं त्याचं स्वप्न त्यांनी वेळेला मला दणके देऊन पूर केल होत. आता माझी त्या बद्दल काय बी तक्रार न्हाय ! आव आय बाप ते आमच ! जशी पोटाला भाकरी तसा पाठीला दणका देण हे त्याचं कर्तव्यच न्हवं का? तर वेळो वेळी ' भिकार लक्षण' म्हणजे काय हे मला अगदी उदाहरणा सकट दाखवून त्यांनी माझी गाडी व्यवस्थित रुळावर ठेवलेली. असा शिकून सवरून मी शाना झालो न झालो तोवर त्यांनी माझ्या मामाची पोरगी बक्कळ म्हणजे दहाव्वी शिकलेली करून बी आणली! तिचा पायगुण म्हणून मला आमच्या टेक्निकल कॉलेजात शुगर टेक्नोलॉजि डिपार्टमेंट मध्ये लॅब असीस्टंट म्हणून नोकरी बी लागली !!
आता नोकरी करणारा, लगीन झालेला, असा मी माझ सगळ निर्णय माझा मी घेऊ शकत होतो असं जर तुम्ही समजत असाल तर साफ चूक हाय. आव काल परवा पर्यंत ' दिन्या ' म्हणून हाक मारली तर नाक वढून 'हा?' म्हणणार पोर उगीच मामाची पोर नात जोडायचं म्हणून करून आणली म्हणून लगेच कळत झालं व्हय ? असं माझ्या आय न मांडवातच जाहीर केल होत. अन तिचा तो समज खरा असल्याच मी बी लग्नाच्या दुसऱ्याच दिशी सिद्ध पण केल होत. झालं काय, तर अप्पा सकाळी उठून शेताला गेल ,की आय त्यांच्या बरोबर चा पिऊन धारला बसायची. आन पाहिला एक मोठ्ठा पितळी पेला भरून दुध काढून झालं की 'दिनकरा, ए दिनकरा' अशी हाक घालायची. ती ऐकली, की मी झोपेतन उठून चुळा भरून त्यो पेला तोंडाला लावायचो अन मग तिथलाच खराटा घेऊन गोठा साफ करायचो. तर लग्नाच्या दुसऱ्या दिवशी जवळ आमची कारभारीण झोपलेली असताना ही नेहमीची हाक ऐकून मी नेहमी प्रमाण खाली येऊन निरश्या दुधाचा पेला रिकामा केला अन खराटा हाती घेतला ! आता हळकुंडाच्या हातान तिन मला झाडू दिल न्हाय ! पण ती सक्काळी सक्काळी मारायची हाक बी कवा थांबली न्हाय ! तर अश्या घरातला मी, अन ह्यो सीटट्या मला कोजागिरी साजरी करायला 'पार्टी' करुवा म्हणून माग लागलेला. आव आमच्या आई ला जर ह्ये कळल तर त्या गोठ्यातल्या खराट्यान मला झोडपून काढलं न्हव ?

तस आम्ही काय खेड्यात रहात नाही, शाहू महाराजांच्या कोल्हापुरात रहातो आम्ही ! कसबा बावडा! घरापासून एक दोन किलोमीटर वर आमच शेत हाय. सकाळच जेवण खाण अन घरातली काम आटपून माझी आई शेतात काम करून येते. माझी बायको पण तिच्या बरोबर असते. मी नोकरीला बाहेर पडलो की तस काय काम असत घरात तरी म्हणा? पण कधी मधी ' दिनकरा आर कसला काश्मीर की कली लागलाय म्हन शाहू टाकीला . जा जरा पोरीला दावून आन ' असं बी म्हणते माझी आय !! कामाला वाघ असाव आन मग वाटटल तेव्हढी मजा करावी असा तिचा खाक्या !!

आता ऑफिसात मला सारे डि. पी. सावंत म्हणून ओळखतात. तर माझ्या वारगीची सारी जण , म्हणजे तसे आम्ही चौघेच म्हणा, मला डि श्या म्हणतात. आता ह्यो शीटट्या म्हणजे, सीताराम तावदारे !! मुळचा गोव्याचा ! तर त्याला हे पार्टी बिर्टी प्रकरण जरा करून, बघून माहिती. उरलेल्या दोघांना म्हणजे उ प्या -उत्तम पाटील, आन श म्या - शंकरराव मोहिते साधारण सैल लगाम असावा ! पण ह्ये दोघं बी काय इशेष मुरल्याल दिसत न्हवत. तशी साधी सरळ पुढ बघून चालणारी असावीत असं वाटायचं. पण ह्यो शीटट्या मात्र एस टी स्टॅंड वरन कसली बसली मासिक आणायचा !! ही काय 'मादक' दिसते , ती काय 'एटम बॉम्ब ' सारखी आहे असं काय बाय बोलायचा !! तर असा ह्या शीट्टया न कोजागिरीचा धोशा लावलेला !!
'आर पार्टी म्हणजे कस भरपूर मटण करायचं आन ते शिजत असताना बाजूला अश्या एकावर एक बाटल्या फोडायच्या, गाणी म्हणायची , गप्पा मारायच्या अगदी जीवाला जे बर वाटल ते सार करायचं.'
'आं ? दारू? आर कोजागिरी न्हव? ' मी न्हाय म्हंटल, तरी माझी अक्कल पाजळलीच ! ' आन दूधा बरोबर मटण खाऊ नये म्हणत्यात .'
शीटटया अगदी खो खो हसला. चांगला ठसका लागू पर्यंत हसला! ' आर ती झाली बायका मुलांची कोजागिरी ! आपण मर्द आहोत मर्द ! काय समजलास? आन मर्द काय दुध पितेत ?'
आता त्याच्या या वाक्या नंतर मी रोज सकाळी उठून पाहिला दुध पितो आन ते ही निरस हे मला अगदीच लाजीरवाण वाटू लागल.
'अरे जिंदगी जीने का नाम है दोस्त ! इसे जी लो !' आयला पिक्चर बघून झालं की घराला येई पर्यंत मला त्यातलं एक बी वाक्य आठवत न्हाय पण ह्या शीटट्याला मात्र बरोबर येळेला पाहिजेत ते डायलॉग आठवत्यात . मग हे बेण धाव्विला नापास कस झालं? असा प्रश्न मला पडला.
शेवटी हो ना करता करता माझ्यातला मर्द जागा झाला ! आन मी पार्टीला जायचं कबुल केल. मग कुणी काय आणायचं? कुठ जायचं? या साऱ्या ची चर्चा सुरु झाली. उ प्या म्हणाला ' आर डि श्या च शेत आहे. आपण तिथच जाऊन बसू. ' पहिल्या वाक्यालाच मी उडालो ! ' माझ्या शेतात करणार असाल तर तुमचं तुम्ही करा. आपण येणार न्हाय.' मी साफ सांगितलं.

शेवटी कात्यायनीच्या माळावर कोजागिरी ठरली. उ प्या मटण आन भरपूर कांदा कापून आणणार, शीटट्या लय शाना म्हणून दारू आन चखणा ( चा बरुबर खाल्ला तर शेव चिवडा म्हणत्यात याला, पण दारू बरोबर खाताना याच नाव बदलत!) ( माझं जनरल नॉलेज भलतच वाढत होत.) शम्या त्याच्या खानावळ वाली कडन चपात्या करून आणणार. तिथनच रश्श्या साठी मोठ भांड आन चार ताट वाट्या आणायचं ठरलं. माझ्या गळ्यात पडल मसाला भाजून वाटून आणण !!

मी माझ्या बायकोला अगदी कुंकवाची शप्पथ घालून हा सारा प्रकार सांगितला ! तर कामावरून आल्यावर आमच्या ऑफिसातल्या एकाची आई लय जॅम सिरीयस आहे असं सांगून मी घराबाहेर पडायचं आन दुपारी पोटात दुखतंय सांगून हिन घरी राहून मला मटण मसाला तयार करून बांधून ठेवायचा असा आम्ही दोघांनी घाट घातला . आजवर तसा मी बायकोशी कधी हितगुज केलेला मला आठवत नाही. आता बोलून बोलून असं काय विशेष बोलणार आम्ही ? पण या प्रसंगान आम्हाला, फक्त आम्हा दोघांना माहीत असलेलं असं एक 'गुपित' तयार झालं. मी फक्त तिला सांगितलेली अशी ही एकच गोष्ट होती. अन तिला त्याच फार महत्व वाटत होत. आमचं तरी बर म्हणायचं 'भावाची मुलगी 'म्हणून आई तिला प्रेमान वागवायची, नाहीतर आमच्या गल्लीत सासवा सुनांची भांडण तशी काय कमी नव्हती. अन आपला नवरा काहीतरी नवीन करतोय, पार्टीला जातोय याची सुद्धा नवलाई असावी तिला.

तर असं एकूण पार्टी प्रकरण भलतच तापल!! अगदी उठता बसता पार्टीला असं करू अन तस करू ! या पार्टीला असं झाला होत, त्या पार्टीला तस झालं या गप्पा संपता संपेनात ! त्यात भर म्हणून शीटट्या फिल्मी पार्ट्या अश्या असतात , तश्या असतात अश्या 'वाचीव ' माहित्या आम्हाला पुरवत होता!

होता होता आली एकदाची 'कोजागिरी'. सक्काळी सक्काळी मला हाक मारताना आईन ' ए भाग्यश्री ' म्हणून हिला हि हाक दिली. ' अग आज कोजागिरी पुनव! आज पासून अंगण सारवायचं, अन चार रेघा ओढ रांगोळीच्या दारांत, आज पासून लक्ष्मि फिरते दारा दारा वरून अन 'को जागृती' ? असं विचारते बाय. तर तिच्या साठण घर दार लख्ख करायचं. तशी दिवाळी आलीच पंधरा दिवसावर !' अशी तिच्या तोंडाची गिरण सुरु झाली. मी अन भाग्यश्री उठून बसलो. पण आमच्या नजरेत 'हाच तो दिवस' अशी एकच बोली होती.

तिला खाणाखुणा करत मी कसा बसा ऑफिसला निघालो. पण सारा जीव मागे! हि चोरी पकडली तर नाही जाणारा ना? तिला जमेला ना आईला चकवा द्यायला ? अश्या विचारांनी ओढत होता. ऑफिस मध्ये पण आम्ही कसा बसा दिवस रेटला ! अन पाच वाजताच सारे जण आपापल्या कामगिरीवर निघालो. साधारण आठ वाजता कात्यायनीला पोहोचायचं असं आमचा ' प्लान '(शीटट्या उवाच! ) होता.

मी घरी आलो , अन आईला धडधडत्या काळजान ठरवलेलं खोट सांगितलं . रात्री त्याच्या सोबतीला मी जाणार असल्याच हीं सांगितलं. ' जा बाबा ' अश्या वखताला तर माणसाची पारख' असं बोलून तिन मला सातच्या सुमारास गडबडीन गरम गरम जेवायला घालून पाठवून दिल. मी कपडे करायला माळ्यावर गेल्यावर हीन हळूच येऊन माझ्या हातात गुंडाळलेला पेपर दिला. मसाला वाटून तिन द्रोणात भरला होता. अन असे द्रोणा वर द्रोण घालून त्यावर तिने पेपर गुंडाळला होता. भलतीच हुशार निघाली माझी बायको !
आम्ही सारे एकत्र भेटलो अन कात्यायनीला जायला निघालो!

माळावर पोहोचेतो पर्यंत चंद्र साधारण वर आला होता. पौर्णिमेचा पूर्ण चंद्र तो. त्या प्रकाशात तो कात्यायनीचा माळ काही वेगळाच भासत होता !

आम्ही बसायला जागा शोधू लागलो. आता कोल्हापूर सारख्या ठिकाणी , माळ हे म्हैशी चरण्या साठीच असतात ! दुपार भर त्या माळावर म्हैशी मनसोक्त चरून गेलेल्या ! अन तिथे आता आम्ही उगवलेलो ! अगदी नि:शब्द शांतता पसरली होती. वरून चंद्राच चांदण अक्षरश: बरसत होत! जणू एक झीर झीरीत पांढरट पडदा पसरला होता त्या माळावर! माणस कोजागिरीला का बाहेर पडतात ते मला कळल!! न कळत मन माग ओढल. कधी नाही ते पहिल्यांदाच 'ती' बरोबर असती तर? असं वाटून गेल.

तोवर शीटट्या न जवळचा ट्रान्झीस्ट र सुरु केला अन विविध भारती लावली. जयमाला संपून सैनिकांच्या पत्रांना उत्तर सुरु झाली होती. मग ते बदलून आणि दुसर स्टेशन अशी त्याची या स्टेशन वरन त्या स्टेशन वर अशी बदला बदली सुरु झाली. मला समजेना इतक्या शांत वातावरणात असं गोंधळ घालायचं काय कारण असाव ? मी म्हंटल पण तस . पण पार्टीला कसा 'जीव आला ' पाहिजे असं त्याच म्हणन पडल. आता जेंव्हा जेंव्हा शेतात खळ्यावर धान्य असत तेंव्हा एखादी रात्र आम्ही सारीजन तिथ रात्री वस्तीला असायचो. शेकोटी भोवती बसून आई अन अप्पा कुजबुजत्या सुरात बोलत राहायचे. का ? तर रात्र आहे . अन इथ शीटट्या सारा माळ उठवायला निघाला होता !
तोवर उप्या अन शम्या न दोन चार दगड गोळा करून चूल मांडली. ती पेटवून भांड चढवल , अन तेल कांदा घालून मटण फोडणी टाकल. मी जरा जवळच बसलो. बाजूला शेणाचा वास येत होता . आता चरायला येणाऱ्या म्हशी काय तशाच परत घरला जातील का? जरा शान घान असणारच की वो ! अन मला त्याच काईबी वाटत नव्हत बघा. सक्काळी सक्काळी निरस दुध प्याल्या बरोबर गोठा झाडणारा मी, मला काय त्या वासाच ? मी माझ्या बरोबर आणलेला मसाला चुली च्या जरा जवळ दोन दगड होते त्यातल्या एका वर उघडून ठेवला. मसाला उघडताच त्याचा खमंग वास भोवताली पसरला. तिघांनी पण ' लय भारी ' असा अभिप्राय अगदी झटक्यात देवून टाकला.

इकड शीटट्या न ट्रान्झीस्टर वर आता कुठल तरी गाण लावलं होत शेवटी, अन त्यो आता बाटल्यांच्या माग लागला. काय काय प्रकार करत होता तो!! बाटली काढून घेऊन ती डोक्या वर ठेवून नाचून झालं!! मग ' पिने वालोंको पिने का बहाणा चाहिये ' हे गाण म्हणून झालं. तोवर हीं दोघं इकड जाळ आहे तिथ बसू म्हणजे डास चावणार नाहीत असं म्हणून त्याला बोलावू लागली.

मग त्यान एक बाटली फोडली आणि प्रत्येकाच्या ग्लासात थोडी थोडी ओतून 'चिअर्स' असं म्हणून एका दमात संपवून हीं टाकली. या दोघांनी पण नाही म्हंटल तरी घोट घोट घेतलीच . मी मात्र त्या वासान जरा हबकलोच. नाही म्हणजे गावठी दारू घान वासाची असते मला ठाव होत. पण हीं एव्हढी महागाची अन एव्हढ्या चांगल्या बाटलीतली पण अशी वाईट वासाची असते हे मला ठाव न्हव्हत !! मला चलबिचल होताना पाहून मग आमचे गुरु देव सुरु झाले, त्यांनी मला 'मर्द पणाची' दिक्षा द्यायला सुरु केली. ' अरे मर्दान असं कमकुवत राहायचं नसत.' असं अन तस! हातात धरलेला ग्लास रिकामा म्हणून रहात नव्हता. उप्या अन शम्या पण नाही म्हंटल तरी चांगली पीत होती. मी कसा बसा अर्धा ग्लास संपवला पण तेव्ह्ध्यान मला गरगरू लागल. गुरु महाराजांनी भरलेला ग्लास, तसाच धरून, मटण हलवायचं काम मी माझ्या कड घेतलं. तेव्हढीच सुटका !! आता ह्या तिघांनी दुसरी बाटली फोडली अन मग चखणा खात खात सारया जगाचा उद्धार सुरु झाला . मधून मधून मला , ' अजून तू बच्चू आहेस...जगायला शिक जगायला ! ' असा उपदेश सुरु होता . नाही म्हंटल तरी जवळ जवळ अकरा वाजायला आले होते, विविध भारती वर ' बेला के फुल' सुरु झालं होते. काय एक गाण लागल अन शीटट्या ढसा ढसा रडायला लागला . आता तो का रडतोय अन काय बोलतोय हे मला काय समजत न्हवत . पोटातल्या ढवळण्यान समजून घ्यायची इच्छा पण नव्हती. तोवर शम्या हेलपटत चुली कड आला. 'मटन शिजल असलं , आता मसाला घातला की झालं....असं म्हणून त्यो मसाल्या कड वळला. मी नुसता बघत होतो. त्यान मसाल्या जवळचा दगड अलगद उचलला, मला मी काय बघतोय तेच उमजेना ! 'आत्ता च्या मारी ? ह्यां एव्हढा जमिनीत रुतलेला दगड कसा काय उचलला ?' तोवर ती दगड धरलेली ओंजळ त्यान भांड्या कड आणली अन माझ्या सराईत नाकाला झटक्यात उलगडा झाला !! ' आर... आर ..ह्यो मसाला न्हव्ह......' म्हणेतोवर ओंजळ रिकामी !! मी सुन्न झालो. माझ्या बायकोन एव्हढा आईची नजर चुकवून केलेला मसाला सोडून या मंडळीनी मटणात नक्को ते मिसळल होत. त्या दारूच्या धुंदीत , आता ती दारूची किती अन यांच्या डोक्यातली किती ते एक देव...न्हाय न्हाय देव कशाला ओ मदी आणायचा? ...ती दारूच जाणे.

मला गरगरत होत, अन हीं मंडळी मला जेव जेव म्हणून माग लागल्याली. मी शाप न्हाय म्हंटल...ताट पुढ धरल की उलट्या यायला लागल्या मला, ' अजून बच्चू आहे, होशील होशील तुम भी मर्द बनेगा , अगले टाईम देखना ' असं काहीस हिंदीत बडबडत गुरु महाराज जेवत राहिले. उप्या अन शम्या पण माना गुडू गुडू हलवीत तोंडात घास घालायचा प्रयत्न करत होते. कस बस जेवून मंडळी अक्षरश: तिथच आडवी झाली. मी कपाळाला हात लावून त्यांचा मर्द पणा बघत राहिलो.
आता सार शांत होत. रेडिओ पण बंद झाला होता . उरली होती मला मघापासून हवी असणारी निरव शांतता, अन आभाळातून ढगा मधून शर्यत लावल्या सारखा धावणारा चंद्र ! मी आडवा झालो. येता येता अप्पांनी हॉस्पिटल मध्ये पांघरायला म्हणून दिलेली शाल मी लपेटून घेतली , जरा मन शरमिंध झालं ! किती वेळ गेला कुणास ठाऊक, पण असं वाटल बाजूला हीन कूस बदलली. एव्हढी सवय होते आपल्याला बाजूला कोणी असायची की जेंव्हा कुणी नसत तेंव्हा सुद्धा त्यांचीच चाहूल लागत राहते ! हळू हळू चंद्राच धावून संपत आल . शेवटी एकदाची पश्चिम गाठली गड्यान ! दमला असलं रात्रभर धावून धावून त्यो बी गडी ! मला पण आता घरी जावस वाटत होत. माझी मर्द दोस्त मंडळी अजून घार घुर करत पडली होती. हळू हळू पूर्वेला छटांचा खेळ सुरु झाला. आधी जरासा उजळ निळसर , मग हलका तांबडा अन मग बघता बघता भडक तांबडा रंग निम्म्या आकाश भर पसरला. त्या पाठोपाठ जणू सुवर्णाचा सडा घातल्या सारखी सोनेरी छटा पसरली अन मग सारा आसमंत जागा झाला . पक्षि उडू लागले. त्या आवाजान त्रासिक चेहरा करत मग आमची दोस्त मंडळी उठून बसली. चला ! उरलेली झोप घरी जावून घेऊ. असं ठरवून आवर आवरी सुरु झाली, अन शम्या चुलीजवळ दगड झाल्या सारखा उभा राहिला.
'का रे काय झालं? ' उप्या न विचारलं.
' अरे मसाला तर इथच हाय'.
' मग बिन मसाल्याच मटण खाल्ल का काय ?' असं म्हणून शीटट्या खिदळू लागला.
' न्हाय न्हाय मी मसाला म्हणून दारूच्या धुंदीत जवळच पडलेलं म्हशीच......
'काय?' उप्या अन शीटट्या किंचाळली, सगळं टाकून चुली कड धावली. खरच तिथे शेण खरवडल्याच स्पष्ट दिसत होत. तिघांनी पण माझ्या कड पाहिलं,
' मी सांगायचा प्रयत्न केला पण ....' मी सुरुवात केली
...'गप्प ! आता हे कुठे बोलू नको ,' शीटट्या करवादला.
मी गप्प बसलो .काय बोलणार? मी बच्चू पडलो, अन ती शेण खाल्लेली मर्द माणस !
परतीच्या वाटेला त्यांची तोंड आता काय खाल्ल्या सारखी झाली होती, ते काय मी सांगायलाच पाहिजे का?

गपचूप सारेजण घरी निघालो. गल्लीत शिरलो तर घरच्या माळ्यावरून दोन डोळे अगतिकतेन माझी वाट बघत असलेले जाणवले. घरात शिरलो तर आई धार काढत होती, तिच्या पुढ्यातल्या म्हशी कड बघून मला खुदकन हसू फुटलं ! पण आई मात्र गंभीर होती. माझ्या कड बघत म्हणाली, 'जा वर जावून गप झोप आता . पोर रातभर झोपली न्हाय ' माळ्यावर चढताना त्या कोमेजलेल्या डोळ्यात हसू आणायला मला रात्रीचा 'येपिशोड' (गुरुकृपा!) पुरेसा होता. अन हे एक नवीन 'गुपित' आमच्यात कायम खुस खुसुत राहणार होत.
आत्ता मला खरा मर्द असल्या सारखा वाटल बघा !

__/\__
अपर्णा

संस्कृतीनाट्यकथाविनोदसमाजप्रकटनशुभेच्छा

प्रतिक्रिया

सुक्या's picture

21 Oct 2010 - 9:51 am | सुक्या

लय भारी !!
एकदा लाइट गेली होति तेव्हा मिठा ऐवजी निरमा पावडर घातली होति मटनात ते अठवले :-)

अनामिक's picture

21 Oct 2010 - 8:41 pm | अनामिक

कै च्या कै... तुम्ही निरमा आणि मिठाचा डबा आजुबाजूला ठेवता की काय?

स्पंदना's picture

22 Oct 2010 - 7:14 am | स्पंदना

मी हा प्रकार निवडणुकिच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत घडलेला पेपर मध्ये वाचलाय. पण तो निरमा ताटाला लावला होता.
एक्चुअली चालल असत 'दुध सि सफाइ निरमा से आये...रन्गिन कोठा भी खिल खिल जाये । सबकि पसन्द निरमा...

सुक्या's picture

24 Oct 2010 - 8:18 am | सुक्या

डबा ?? डबा नाय हो, पिशवी पिशवी. चार आळशी सडेफटिंग एका रुम मधे रहात असतील तर काय जागेवर राहील हो. घासलेट च्या डब्यापासुन तर बाजारातुन आणलेल्या मिरच्यांपर्यंत सगळं काही एका कोपर्‍यात असायचं. कश्याशेजारी काय ठेवलं पाहीजे याचा काय उपेग?

छोटा डॉन's picture

21 Oct 2010 - 10:10 am | छोटा डॉन

मस्त कथा आहे.
आवडली !!!

- ( प्यार्टीप्रिय ) छोटा डॉन

विसोबा खेचर's picture

24 Oct 2010 - 9:34 am | विसोबा खेचर

छोट्याशी सहमत..

अपर्णा, अजूनही लिहा..छान लिहिता..

तात्या.

नगरीनिरंजन's picture

21 Oct 2010 - 10:38 am | नगरीनिरंजन

हा हा हा!
लै आवडली कथा.

चिगो's picture

21 Oct 2010 - 10:38 am | चिगो

(योग्य मसाला टाकलेल्या) मटणासारखी... छान कथा. जमलीय !!

पैसा's picture

21 Oct 2010 - 10:51 am | पैसा

मस्त कथा!

रन्गराव's picture

21 Oct 2010 - 10:52 am | रन्गराव

गावाच नाव राखलस की गड्या :)

मृत्युन्जय's picture

21 Oct 2010 - 11:19 am | मृत्युन्जय

झ्याक जमलंय. तेवढी ग्रामीण भाषा अजुन नीट जमली पाहिजे. बाकी मस्तच

स्पंदना's picture

22 Oct 2010 - 7:11 am | स्पंदना

अहो ही शहरातली ग्रामिण आहे . साधारण असच बोलतात बावड्या कड. येवुवा जावुवा हे शब्द तर मी फक्त बावड्यातच ऐकले.

मृत्युन्जय's picture

22 Oct 2010 - 10:14 am | मृत्युन्जय

ओके. आय माय सॉरी. मला उगाच वाटले तसे. कथा जमली मात्र आहे मस्त.

मितान's picture

21 Oct 2010 - 11:56 am | मितान

कथा आवडली अपर्णा :)

sneharani's picture

21 Oct 2010 - 12:03 pm | sneharani

छान कथा लिहली आहे.
:)

नेत्रेश's picture

21 Oct 2010 - 12:42 pm | नेत्रेश

खुप आवडली.
एका 'येपिशोड' मध्ये संपविल्यापद्दल धन्यवाद.

गणेशा's picture

21 Oct 2010 - 1:59 pm | गणेशा

अतिशय सुंदर कथा .. शब्द .. आणि प्रसंग

खुप खुप आवडली कथा ..

धमाल मुलगा's picture

21 Oct 2010 - 4:22 pm | धमाल मुलगा

क्या बात है अपर्णा!

मजा आली :)

अवांतरः ह्या दिन्याला मिळाली तशी गुणाची बायकु सगळ्यास्नी मिळाली तर कशाला वो कोन दुक्कात र्‍हाईल? ;)

परकाया प्रवेश आवडला !!

मस्त , अजुन असाच प्रवेश व्हावा आणी अजुन वाचायला मिळावं !!

यशोधरा's picture

21 Oct 2010 - 4:37 pm | यशोधरा

मस्त लिहिलं आहे! आवडलं. :)

स्वप्निल..'s picture

21 Oct 2010 - 8:32 pm | स्वप्निल..

मस्त!!

प्रभो's picture

21 Oct 2010 - 8:38 pm | प्रभो

क ड क!!!

अनिल हटेला's picture

21 Oct 2010 - 8:39 pm | अनिल हटेला

परकाया प्रवेश आवडला!!
सुहास प्रमाणेच म्हणतो !!

:-)

अनामिक's picture

21 Oct 2010 - 8:40 pm | अनामिक

छान रंगवली आहे कथा! अवडेश.

अडगळ's picture

22 Oct 2010 - 6:49 am | अडगळ

मजा आली.
अगदी चव्हाणांच्या मिसळीचा ठसका आहे कथेला.
बाकी रान , म्हशी , बावडा , शुगर मिल अगदी तपशीलवार आलेलं आहे .
जरा खोड काढायची म्हटलीच तर :
मध्येच "म्हैशी" वगैरे शब्द आला की मिसळीत मँगो बर्फी चा तुकडा आल्यासारखा वाटतोय.( म्हशी , म्हसरं , म्हसाडं )

स्पंदना's picture

22 Oct 2010 - 7:09 am | स्पंदना

मी कायम 'म्हैस' हाच शब्द वापरलाय हो म्हणुन. बाकि प्रतिसादा बद्दल आभार!

शुचि's picture

22 Oct 2010 - 6:47 am | शुचि

छानच

स्पंदना's picture

22 Oct 2010 - 7:19 am | स्पंदना

अनामिक ,अडगळ, सुक्या, नगरी, यशोधरा, डॉन दा(मला इथे डोळा मारायचा आहे पण तुम्ही माझ खात ....) सुहास , प्रभो ,स्वप्निल ,गणेशा, अन शुची आभार.

@ धमु-दिन्यान गळ्यत पडल ते पवित्र मानल !

सुंदर रंगवली आहेस कथा. खूप आवडली.

स्वाती२'s picture

24 Oct 2010 - 4:59 am | स्वाती२

कथा आवडली.

लीलाधर's picture

30 Oct 2012 - 9:52 am | लीलाधर

येक नंबरी लैच भारी ब्वा :)

टवाळ कार्टा's picture

30 Oct 2012 - 12:03 pm | टवाळ कार्टा

:D

aparna akshay जी, मस्त एकदम मस्त कथा आहे.

सुखी's picture

30 Oct 2012 - 4:19 pm | सुखी

जबराट..... :)