आमची पहिली परदेशवारी.....10
भाग-१ http://www.misalpav.com/node/13410
भाग-२ http://www.misalpav.com/node/13436
भाग-३ http://www.misalpav.com/node/13450
भाग-४ http://www.misalpav.com/node/13473
भाग-५ http://www.misalpav.com/node/13495
भाग-६ http://www.misalpav.com/node/13529
भाग-७ http://www.misalpav.com/node/13578
भाग-८ http://www.misalpav.com/node/13617
भाग-९ http://www.misalpav.com/node/13655
नमस्कार मंडळी,
मला परत निघायला आता आठ दिवस बाकी राहिले होते. बरीच भटकंती झालेली होती आणि एवढे दिवस अखंड बडबड करणारी एडी काहीशी अबोल राहू लागली, आपल्याच विचारात हरवल्यासारखी. मी कारण विचारले तर ती 'काही नाही' असेच उत्तर देई .माझीही अवस्था काही वेगळी नव्हती.दोन तीन दिवस राहिल्यावर तर तिची झोपच उडाली होती. खाण्या पिण्यात लक्ष नव्हते. शेवटी निघायचा दिवस उजाडला, दुपारी चारची बस होती. मी माझे सामान भरेपर्यंत एडी मार्केटला जाऊन आली. तिने माझी आई, बहिण , माझे जवळचे मित्र, मुंबईत माझ्या शेजारी राहणारा छोटा समीर, आदेश असे सर्वांसाठी कॉफी ,गिफ्ट आणि चोकलेट आणले होते. घरी आल्यावर आपल्या हाताने तिने वेगवेगळ्या कागदी पिशव्या भरून त्यावर ज्याचे गिफ्ट आहे त्याचे नाव लिहिले. आदेशसाठी तर टि-शर्ट, सेंट अशी विशेष भेट आणली होती. माझ्यासाठी व्हाईट रम जी मला विशेष आवडत असे .३:३० वाजता घर सोडले, अबुल ला पेटहाउस मध्ये सोडले. एरवी आम्ही बाहेर निघाल्यावर दंगा करणारा अबुल आज शांत होता.एडी मला नेहमी सांगायची ती जास्त दिवस बाहेर जाणार आहे हे अबुलला बरोबर समजते. आज खरोखर त्याने जराही हट्ट केला नाही. फक्त एकदम केविलवाण्या नजरेने तो एडीकडे पहात राहिला. त्याला बाय करून बस आगारात आलो. परतीच्या प्रवासाला सुरवात झाली. मी आपला उगाच खिडकीच्या बाहेर बघत राहिलो, विटोरिया मागे जाईपर्यंत. मी परत कधी येथे येईल कि नाही असा विचार माझ्या मनात आला. कदाचित हो...... कदाचित नाहीही......... एडी काहीही बोलत नव्हती मी काही विचारले तर हो किंवा नाही असे उत्तर येई. अकरा वाजता बस थांबली, मी जेवण केले एडीने फक्त केक आणि कॉफी घेतली तीही माझ्या आग्रहाखातर. सकाळी १० वाजता साओ ला पोहोचलो. ट्राफिक लागल्याने बराच उशीर झाला होता. मी तरी जमेल तशी झोप काढली पण एडी रात्रभर झोपली नाही ( तशीही तिला प्रवासात झोप येत नाही ). माझे विमान सायंकाळी ६ चे होते त्यामुळे बराच वेळ होता. आदेशला फोन केला आणि मी साओला पोहोचल्याचे सांगून वेळेत मुंबई विमानतळावर येण्यास सांगितले. फ्रेश झालो आणि असेच गप्पा मारत बसलो. आतापर्यंत शांत असलेली एडी आता मला सूचना देत होती. आम्ही पुढे कसं आणि काय करायचं यावर बराच खल केला. आणाभाका घेतल्या आणि एका तासामध्ये विमानतळावर पोहोचलो तेव्हा १ वाजला होता. कॉफी घेतली, विमान वेळेवर आहे याची खात्री करून घेतली. बस आगारातून येताना एकदा बस बदलावी लागली होती. एडीला बस आगारातून ४ वाजताची बस होती. मी माझ्याकडे १०० डॉलर वेगळे ठेवलेले होते. त्यातले ५० डॉलर बदलून मी रियाल घेतले ,काहीतरी ७२-७३ रियाल मिळाले. त्यातले ३० रियाल चे मी एडीला विमान तळावरून बस आगाराला जाणाऱ्या स्पेशल बसचे तिकीट काढून दिले, बहुतेक टूरिस्ट हि सेवा घेतात.एक ठिकाणी बस बदलून ९ रियाल मध्ये आम्ही आलो होतो. पण मला एडीची काळजी वाटत होती आणि हि बस विनाथांबा असल्याने लवकरही पोहोचणार होती. २ रियालची नोट मी आदेशला दाखवण्यासाठी म्हणून जवळ ठेवली आणि बाकीचे रियाल मी तिला खाऊसाठी देऊन टाकले. एडी आता परत शांत होती. आम्ही पुन्हा-पुन्हा एकमेकांना सूचना देत राहिलो.एडीची बस आली, १० मिनिटे वेळ होता आता मात्र ती काहीही न बोलता माझ्याकडे पहात राहिली.तिचे डोळे भरून आले होते माझे हात हातात घेऊन ती फक्त मुसमुसत होती. बसमधील मुलाने आवाज दिला एडीने मला घट्ट मिठी मारली, मला किस करून ती बसमध्ये जाऊन बसली. मी खिडकीबाहेर उभा होतो , तिच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते मी तिचे डोळे पुसले, तिने माझ्या हाताचे चुंबन घेतले. बस निघाली मी तिला काळजी घे, मला तुझी गरज आहे असे निक्षून सांगितले, बस दिसेनाशी होईपर्यंत हात हलवून आम्ही एकमेकांना निरोप देत राहिलो. बस निघाली आणि एवढ्या वेळ अनावर होत असूनही रोखून धरलेल्या अश्रूंना मी वाट करुन दिली. सुन्न मनाने मी तेथे बराच वेळ बसून राहिलो. दुसर्यांना रडताना पाहून टर उडवणारा मी आज स्वत:ला रोखू शकलो नाही.त्याही अवस्थेत मी स्वतः:वरच हसलो. नेहमी मी कसा कठोर आहे, कुठल्याही प्रसंगी मला कसे रडायला येत नाही अशा फुशारक्या मारणारा , आणि रडले म्हणजेच दुख: व्यक्त होते का? असे प्रश्न विचारणारा मी आज स्वत:ला रोखू शकलो नाही हे कबूल करावेच लागेल. तिच्याच विचारात बराच वेळ बसून राहिलो, फ्रेश होऊन ज्या टेबलवर आम्ही पहिली कॉफी घेतली होती तेथेच कॉफी घेतली. तीन वाजता समान जमा केले, आणि दहाच मिनिटात मी जेथून विमान सुटणार तेथे पोहोचलो. येथे मला कुठलाही त्रास झाला नाही.विमान वेळेवर उडाले, न पिण्याचे ठरवूनही पुन्हा बियर प्यायलो पण आता ते औषध म्हणून (दुख: विसरण्यासाठी). सकाळी PARIS ला उतरलो तर हि थंडी. माझ्याकडे स्वेटर नव्हते मला तर हूडहुडी भरल्यासारखे झाले होते. विमानतळात प्रवेश केल्यावर बरे वाटले. इथे काही नुतनीकरण होत असल्याने मला बस पकडून दुसरया टरमीनल ला जावे लागले .काही वेळेला तर काही भागात मी एकटाच असायचो ,विचारायलाही कोणी नसायचे. जागोजागी फलक असल्याने अडचण आली नाही. विमानाला दोन तास अवकाश होता. मी तेथील दुकानामध्ये फेरफटका मारला.५० डॉलर चे ३१ युरो, कमिशन जाऊन २७ हातात आले . तेथील मुलीला मी २५ युरो मध्ये दोन व्हिस्कीच्या बाटल्या येतील का असे विचारले. ती नाही म्हणाली. मग तिनेच एक रेड लेबल व्हिस्कीची एक आणि एक ब्रान्डी येईल असे सांगितले.मी ते घेतले काही पर्याय नव्हता. त्या मुलीने त्यातूनही काही सेंट परत दिले. माझ्याकडे २ युरो आणि हे सेंट उरले होते. मी तिला परत एवढ्या पैशामध्ये काही मिळेल का असे विचारले तिने हसत-हसत नकार दिला. बाहेर खूप धुके होते. आम्हाला येथून बसमधून विमानाजवळ नेण्यात आले. काहीतरी अडचण असल्याने विमान आतमध्ये उभे करण्यात आलेले होते. बरेचसे प्रवासी मराठी बोलत होते पण मी कुणाशीही बोललो नाही. शिडीने विमानात चढलो.फारसे प्रवासी नव्हते. माझ्यासेजारी तर कोणी नव्हतेच . तसाच आडवा झालो . मला जाग आली तेव्हा मला दरदरून घाम आलेला होता आणि मला उलटी होईल असे वाटत होते. उठायचा प्रयत्न केला तर तेही जमेना. माझा तोल जात होता. मी तसाच बसून राहिलो. थोड्या वेळाने जरा बरे वाटले मग तोंड धुवून आलो. मला खूप थकवा जाणवत होता. या प्रवासात मी फक्त ज्यूस घेतला आणि रात्री १ वाजता मुंबई विमानतळाबाहेर आलो तेव्हा माझ्या खिशात फक्त ब्राझिलचे दोन रियाल, फ्रान्सचे दोन युरो आणि दोन्हीकडचे काही सेंट होते . आदेश बरोबर माझे पाच मित्र आले होते.माझा मित्र सरकारात कार्यकारी अभियंता आहे त्याने माझ्यासाठी पुष्पगुच्छ आणला होता, मी नकार दिला पण तो एवढा मला घ्यायला खास सोलापूरवरून आला असल्याने मी शेवटी तो स्वीकारला. रस्त्यामध्ये मित्रांच्या प्रश्नांना उत्तरे देत २:३० ला घरी आलो. मला प्रवासाचा थकवा जाणवत होता पण माझे हे सर्व मित्र मुंबईबाहेरून आले होते आणि सकाळी ते परत जाणार होते म्हणून पहाटे ३ वाजताच पार्टी केली. सकाळी त्त्याना निरोप दिला . असो. फारच विषयांतर झाले आहे. पण मला ते गरजेचे वाटले.असो.
आता बरयाच मिपाकरांना मी ९८००० (३६३० रियाल) रुपयात ६८ दिवस कसे काढले याबद्दल उत्सुकता आहे. तसे प्रतिसादही आलेत. एवढ्या पैशात हे केवळ अशक्य आहे पण मला ते शक्य झाले कारण मी एडीच्या घरी पोहोचल्यावर फक्त १०० रियाल माझ्याकडे ठेवले आणि बाकी सर्व एडीच्या हवाली केले होते. बाकीचा सर्व खर्च एडीने आनंदाने केला. एडी पुढच्या वर्षी भारतात येणार आहे आणि तिची माझ्याबरोबर भारतात राहण्याची तयारी आहे. पुढे अनंत अडचणी आहेत पण आम्ही त्यावर मत करू असे मला वाटते, एडीला तर खात्री आहे. म्हणूनच तर आपला देश, आपले सर्वस्व सोडून कधीही न पाहिलेल्या अशा अनोळखी देशात आणि माझ्यासारख्या अनोळखी (७० दिवस बरोबर राहिलोय फक्त ) माणसा बरोबर राहण्याची तिची तयारी आहे. मी तुला फसवले तर काय करशील ? या प्रश्नावर तिचे उत्तर असते ' Jesus knows everything ,he only send you to me, and i believe in Jesus'.माझी आई गावी राहते. मी आणि माझा चुलत भाऊ आदेश मुंबईत असतो.मला कित्येकदा एडीने बोलून दाखवले आहे कि तुला आईची किंमत नाही म्हणून तू आईला गावाला राहू देतोस. माझी आई असती तर मी हे कधीच केले नसते. एडी जेव्हा भारतात येईल तेव्हा तिला सर्वात पहिल्यांदा माझ्या आईला भेटायचं आहे आणि तिला मुंबईला घेऊनच परतायचं आहे. आणि हि तिची भारतात येण्यासाठीची एकमेव अट आहे. तुम्ही कंटाळून जाल पण एवढे सगळे ९ भाग लिहिल्यावर मला आता या काही गोष्टी सांगितल्याच पाहिजेत असे मला वाटते.
******************
आदेश हा माझा चुलत भाऊ. वय तेवीस.आठवी पास. मी नोकरी सोडून गावी गेलो, पुढे व्यवसाय चालू करायचा माझा विचार चालू होता. नऊ वर्षे नोकरी केली, आता सुटल्यासारखे वाटले म्हणून दोन महिने गावी फिरून परत मुंबईला आलो तर हाही बरोबर आलेला. त्याने शाळा सोडलीच होती आणि मीही नोकरी. फक्त कार्ड छापले आणि व्यवसाय चालू केला. fax machine आणि intercom system विकणे आणि दुरुस्ती करणे.यथावकाश काम मिळत गेले आणि व्यवसाय वाढला. तर हा आदेश माझ्याबरोबर काम शिकून तीनच वर्षात तो संपूर्णपणे माझ्या मदतीविना सर्व कामे पार पडू लागला. विक्री आणि दुरुस्तीही. दोन माणसे त्याच्या हाताखाली दिली आणि मी भटकंती चालू केली.मला भटकंतीची आवड होतीच आणि आता दोन पैसेही गाठीला होते मग मी चार वर्षात भारतभर फिरलो. कधी पंधरा दिवस कधी महिनोन महिने. बरेचसे आश्रम पालथे घातले. मंदिरांना भेटी दिल्या .ओशो ,विवेकानंद ,रामकृष्ण परमहंस यांचे मिळतील ती सर्व पुस्तके वाचून टाकली ,काही पुस्तकांची परत परत पारायणे केली.इतरही अनेक विषयाचे अवांतर वाचन केले.खरंतर हातात आलेला भेळीचा कागद सुद्धा वाचायचा सोडला नाही .पण निसर्ग माझा सगळ्यात मोठा विक पोइंट .लग्न तर केले नव्हतेच करायचा विचारही नव्हता. मुंबईत असताना थोडीफार मदत आदेशला करत असे पण ती नगण्यच. आता तर आदेशने xerox machine,cctv,time attendance,fingreprint,security systems यातील ज्ञानही आत्मसात करून विक्री आणि दुरुस्ती दोन्ही आघाड्या तो सांभाळत आहे. मिळालेल्या संधीच याने सोन केल आहे ,मला हे सर्व सांगताना अभिमान वाटतोय पण हे सर्व श्रेय त्याचे स्वत:चे आहे.मला एवढेच सांगायचे आहे कि हा माझा मनेजर (होय मी त्याला आता मेनेजरच म्हणतो ) आदेश जर माझ्याबरोबर नसता तर हि कामधंदा सोडून केलेली भारतभ्रमंती आणि हि ब्राझीलवारी मी स्वप्नातही करू शकलो नसतो. व्यवसायाचे product details फक्त एवढ्याच साठी दिलेत कि एक अशिक्षित ( आठवी पास) लहानशा खेड्यातून आलेला मुलगा इच्छा असेल तर बरेच काही करून दाखवू शकतो हे मला सांगायचं आहे. येथील कुटुंब म्हणजे आई, मी आणि अर्थातच आदेश.असो.
आदेश :
***************************
सद्या ब्राझीलमध्ये असलेले सदस्य म्हणजे एडी, बेन्जामिन अबुल आणि आता Baxte. अबुल हा अतिशय लोभस असा एडीचा कुत्रा आहे (ती त्याला कधीच कुत्रा संबोधत नाही). वेगळ्याच कुठल्याशा रेसचा या अबूलला घेऊन जेव्हा फिरायला बाहेर जात असू , एडीच्या हातावर बसून इकडे तिकडे टकामका पाहणारा हा अबुल लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत असे. इकडे सर्रास लोकांकडे पेट आहेत तरीही अनेक अनोळखी लोक अबुलची चौकशी करत असत. त्याला खेळण्यासाठी अगणित अशी खेळणी एडीने आणलेली आहे. डॉल पासून अगदी फुटबाल पर्यंत. त्याला आंघोळ घालणे, ड्रायरणे त्याचे केस सुकवणे, त्याचे केस विंचरणे आणि हे सर्व करत असताना त्याच्याशी गप्पा मारताना, आणि तोही कसा तिच्या गप्पांना आपल्या कृतीतून उत्तरे देतो हे मी स्वत: अनुभवले आहे. एखाद्या खोडकर लहान मुलासारखा वागणारा हा अबू एडीचा जीव कि प्राण.खुशीत असेल तर जागेवर अतिशय वेगाणे गोल-गोल फिरणे, त्याचे ख़ुशी आणि दुख व्यक्त करणारे डोळ्यातील भाव अगदी सहज लक्षात येतात. शेजारची अबुची मैत्रीण करोलिना , तिचं नुसते एडीने नाव घेतले तरी सैरावैरा इकडेतिकडे धावणारा आणि खिडकीतून तिला पाहण्य्यासाठी धडपडणारा अबुल खरोखर विलक्षण व्यक्तिमत्व आहे. एडीचा घर तिसर्या मजल्यावर आहे. कितीही आवाज न करता आम्ही पहिल्या मजल्यावर पोहोचलो कि अबुचा आवाज सुरु होई ते दार उघडून त्याला जवळ घेईपर्यंत. एडी आलेली त्याला चाहूल लागत असे त्यात कधीही चूक झालेली मला आठवत नाही. फोनची बेल वाजली कि एडीकडे येऊन जोरात भुंकत असे ते अगदी फोन उचलेपर्यंत. एडी किचनमध्ये असेल किचनमध्ये हा लुडबुड करणार, कपडे धूत असेल तर बाजूच्याच खिडकीत बसून तिच्या काम संपण्याची तो वाट पाहत राही. एडी बाहेर गेली तर परत घरी येईपर्यंत कशालाही तोंड न लावणारा अबुल आम्ही घरी आल्यावर हावरटा सारखा खाताना मी पाहीला आहे. त्याला आवडते म्हणून कधीकधी एडी त्याला बाथ साठी बाहेर पाठवत असे. तिकडून हे साहेब आंघोळ करून पायात मोजे,गळ्यात टाय अशा रुबाबात घरी परत येतात. असा हा अबुल. एडी बाहेर गेल्यावर त्याला खूप एकटे वाटते म्हणून एडीने आता अलीकडेच baxte हा अबुच्याच रेसचा नवीन सदस्य आणलेला आहे. आता त्या दोघांचे खेळणे, त्यांची भांडणे, baxte कसा अबुल पेक्षा वेगळा आहे हे एडी मला सांगत असते. एखादा प्राणी माणसाचे जगणे कसे सुकर करू शकतो, त्याला वाटणारा एकटेपणा कसा नाहीसा करू शकतो हे मी स्वत: अनुभवले आहे. एकदा मी एडी घरात नसताना त्याला उशीने चांगलेच बदडले कारण एडी घरात असताना त्याला हात जरी उगारला तरी तो माझ्यावर भुंकत असे, मला जरा त्याचा रागच होता. एडी घरी येईपर्यंत तो कपाटाखाली लपून बसला होता, एडीने दार उघडले आणि त्याने तिच्याकडे धाव घेतली. त्याला घेऊन एडी तडक माझ्याकडे आली आणि अबुल का रडला आणि तू त्याला का मारले असा तिने मला प्रश्न केला. यात थोडीशीही अतिशयोक्ती नाही याची नोंद घ्यावी. म्हणून तर त्याला आम्ही आमच्या कुटुंबाचा सदस्य समजतो. एडी भारतात येणार ते बेन्जामिन अबुल ला बरोबर घेऊनच. असो.
अबुल आणि BAXTE :
************************************
सर्वांची उत्सुकता खूपच ताणली त्याबद्दल माफी असावी. आता हा सगळा लेखनप्रपंच जिच्यामुळे घडला त्या एडीबद्दल थोडेसे. आईवडील एडी १३ वर्षाची असतानाच वारले. त्यानंतर अनाथासारखी एकटी राहिलेली हि एडी. कोणीही नातेवाईक नाही भाऊ बहीन नाही.नोकरी करून स्वत:चे समृद्ध जीवन जगत असताना आमची ओळख झाली आणि पुढचा इतिहास तर तुम्ही वाचलाच आहे. माझ्या संपूर्ण वास्तव्यात माझे कपडे घुवून स्वत:च्या हाताने इस्त्री करणारी, माझ्यावर कधीही कुठलाही अविश्वास व्यक्त न करणारी, शिकून घेऊन माझ्यासाठी चपात्या लाटणारी, फिरण्याची फारशी आवड नसतानाही माझ्याबरोबर भटकणारी, अबुलला जीवापाड जपणारी, केवळ मला घ्यायला/सोडायला साओला आल्यामुळे अबुलला एकटे सोडावे लागले म्हणून पेट हाउसला फोन करून चौकशी करणारी, कुणाच्याही दुख्खाची कणव वाटणारी, जमेल तेवढी दुसर्याला मदत करणारी, जगत फक्त एकाच देव आहे आणि तो फक्त जिझस असे मानणारी, जे काय चांगले वाईट प्रसंग जीवनात घडतात ते जीझसच्या इच्छेनुसारच होतेय याबद्दल अढळ विश्वास असणारी, आईला मुंबईत आणले तरच माझ्याबरोबर मुंबईत राहणार अशी अट घालणारी, आदेशसाठी स्वत: भारतीय मुलगी पसंद करणार असे सांगणारी, मी भारतात जर तुला मारले तर? ....नेव्हर डू इट, आय विल फाईट विथ यु ,यस आय एम अ ब्रज़िलिअन असे बिनदिक्कत सांगणारी, माझ्या रशियामध्ये मेडिकलचे शिक्षण घेणारया मेघाशी (माझी लाडकी भाची) वेळोवेळी संवाद साधून तिला अभ्यासाठी शुभेच्छा देणारी , ब्राझील मधील फुटबॉल विश्वचषक स्पर्धा पाहायला परत ब्राझील ला जायचं असं आवर्जून सांगणारी अशी हि एडीबाई. मंडळी हि कथा नसल्याने काही भावनिक आणि अनावश्यक असे काहीसे लिहिले असल्याची भावना वाटत असेल तर मला माफ करा. पण हा माझा अनुभव मी जसा घडला तसाच आपल्याला सांगितला आहे . कुठलीही फुशारकी मला मारायची नाहीय. उलट पुढे काय होणार आहे हे आज मलाही माहित नाही. तसेही माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यात मी ठरवले तसे काहीही घडलेले नाही. मला चांगली नोकरी मिळाली नाही.मला आयटी मध्ये करीयर करायचे होते आणि अमेरिका गाठायची होती तेही करता आलेले नाही. अनपेक्षीतपणे मी व्यवसायात आलो ज्यावर मी कधीही विचार केला नव्हता, आदेश सारखा मेनेजर मला मिळाला या सर्व गोष्टी कडे मागे वळून पहाताना मला फक्त एकच दिसते ते म्हणजे हा जो प्रवास आहे ते माझे विधिलिखित होते. कुणाला पटो न पटो पण मनुष्य आपला प्रवास आपल्या बरोबर घेऊन येतो तो फक्त आपल्याला आधी समजत नाही. असे माझे व्यक्तिगत मत आहे. कुठलाही दावा मला करायचा नाहीय.
*******************
मी मिपावर चुकून आलो आणि इथलाच होऊन राहिलो. अतिशय रम्य असे हे मराठी संकेतस्थळ आहे. सगळीकडे असतात तसे इथेही काही दंगा करणारे लोक आहेत आणि ती मिपाची शानच आहे असे मी समजतो. अतिशय वाचनीय लेख, कविता, विडंबन करणारे लेखक इथे आहेत. मी फक्त काहीसे प्रवासाचे फोटो टाकून कल्टी मारणार होतो. पण जे काही प्रतिसाद आले त्यामुळे माझा हुरूप वाढला आणि हे माझ्यासाठी अवघड असलेले असे काम मी सहज पार पडले ते प्रतिसादांच्या जोरावरच.मी अनेकदा आलेले प्रतिसाद परत परत वाचलेत हे मी विशेष नमूद करू इच्छितो. प्रतिसाद दिलेल्या न दिलेल्या. माझे लेख वाचलेल्या आणि न वाचलेल्या सर्वांचा मी आभारी आहे. आता मी येथे केवळ वाचक आणि प्रतिसाद देणारा म्हणून वावरणार आहे कारण मी काही लेखक नाही, हा माझा पिंड आणि प्रांतहि नाही. धन्यवाद.जयरामजीकी.
****************************
प्रतिक्रिया
8 Aug 2010 - 4:53 pm | अर्धवट
उत्तम इलासराव,
8 Aug 2010 - 5:02 pm | बिपिन कार्यकर्ते
नीलकांता.... एखादी स्टँडिंग ओव्हेशनची स्मायली दे रे बाबा!!! त्याशिवाय दुसरे काहीही योग्य नाही या लेखमालेला.
अप्रतिम! अप्रतिम!! अप्रतिम!!!
8 Aug 2010 - 5:17 pm | केशवसुमार
विलासराव,
केवळ अप्रतिम!! सर्व भाग..फोटो..गोष्ट सांगण्याची पद्धत.. केवळ अप्रतिम!!
(आस्वादक)केशवसुमार
प्रोजेक्टचे वेळापत्रक आणि कंपनीचे वैयक्तीक सुरक्षा धोरण यामुळे रिओ आणि पेद्रोपोलीस ही दोन शहरे सोडून ब्राझीलमध्ये कुठेच फिरता आले नाही.. पण तुमच्या या लेख मालिके मुळे ब्राजीलच्या इतर भागांची सफर झाली.. धन्यवाद!
(आभारी)केशवसुमार.
10 Aug 2010 - 5:07 am | बेसनलाडू
तुम्हांला आणि एडीला अनेकोत्तम शुभेच्छा!!
8 Aug 2010 - 5:04 pm | पुष्करिणी
उत्तम लेखन. पूर्ण लेखमालाच अतिशय सुंदर. एडीताइ आणि तुम्हांला मनःपूर्वक शुभेच्छा.
लेखन सोडू नका, भारतभ्रमंतीही खूप केलीय असं म्हट्लय तुम्ही. त्यावरही एखादी लेखमाला येउदे.
8 Aug 2010 - 5:06 pm | सुनील
हेच म्हणतो. लेखन सोडू नका.
8 Aug 2010 - 5:22 pm | आनंद
अगदी स्टँडिंग ओव्हेशनच.
8 Aug 2010 - 5:38 pm | नंदन
आजच सगळे भाग वाचून काढले. कुठलीही पोझ न घेता, आव न आणता लिहिलेलं प्रामाणिक अनुभवकथन मस्तच. अजूनही वाचायला आवडेल - खासकरून भारतभ्रमंती, आश्रमांना दिलेल्या भेटी, व्यवसाय नवीन असताना आलेले अनुभव याबद्दल.
8 Aug 2010 - 7:02 pm | चित्रा
कुठलीही पोझ न घेता, आव न आणता लिहिलेलं प्रामाणिक अनुभवकथन मस्तच.
असेच म्हणते. स्टँडींग ओव्हेशनसाठी बिकाशी सहमत आहे.
तुम्हाला आणि एडीला शुभेच्छा.
10 Aug 2010 - 4:40 pm | मेघवेडा
असेच म्हणतो.
विलासराव. खरंच तुमच्या भारतभ्रमणाबद्दलही येऊ द्या आता. :)
8 Aug 2010 - 5:52 pm | मृत्युन्जय
खुपच छान लेखमालिका. इतर गोष्टींपेक्षा तुमची धाडसी वृत्ती जास्त आवडली. एडीला आणि तुम्हाला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा
8 Aug 2010 - 6:15 pm | भारतीय
हेच मलाही वाटलं.. स्टॅडींग ओव्हेशन हवच तुम्हाला.. विलासराव मानलं तुम्हाला (अगदी मनापासून).. तुमचा लिहिण्यातला प्रामाणिकपणा वाखाणण्याजोगाच.. तुमच्या व एडीच्या पुढील वाटचालीस अगदी मनापासून शुभेच्छा!
आणि तुम्ही फारच छान लिहित आहात, मी (माझ्यासहीत ) सर्व मिपाकरांना आवाहन करतो कि, तुमच्या लेखनाचा आदर्श सर्वांनी बाळगावा.. हा शेवटचा भाग तर तुम्ही काहीच नाट्यमय शब्द न वापरताही अत्यंत सुरेख व भावनांनी ओतप्रोत असा झाला आहे, त्याबद्दल तुमचे अभिनंदन! व एक विनंती आहे कि कृपा करून लिहिण्याचं थांबवू नका..
8 Aug 2010 - 6:19 pm | प्रसन्न केसकर
सुंदर लेखन. सगळीच लेखमाला अप्रतिम. त्यातला हा भाग म्हणजे तर कळसच. सगळ्या भावना पोहोचल्या. तुम्ही स्वतः, आदेश, एडी सगळ्या व्यक्ती एकदम सशक्त - मनात कायम घर करुन रहाल.
एडीची आणि तुमची परतभेट लवकर होऊ दे अन तीन्ही लोक आनंदानं पुन्हा भरुन जाऊ दे या शुभेच्छा!
दमदार लिखाण करता तुम्ही. एकदम जबरदस्त! लिहित रहा.
8 Aug 2010 - 6:32 pm | श्रावण मोडक
दंडवत किंवा उभं राहून सलामी!!!
बाकी काही लिहिण्याइतकं मन मोकळं नाहीये आत्ता.
नीलकांता, या दोन्ही स्मायली तयार करच!
8 Aug 2010 - 6:44 pm | गणपा
वरील सर्वांशी सहमत.
8 Aug 2010 - 6:56 pm | शाहरुख
विलासराव, आम्ही तुमचे फॅन झालो आहोत..मजा आली सगळे लेख वाचून !
8 Aug 2010 - 7:14 pm | स्वाती दिनेश
सगळे भाग झाले की प्रतिक्रिया द्यायची असे ठरवले होते.
कोणताही अभिनिवेश नसलेली,अगदी साधेपणाने लिहिलेली तुमची ब्राझिल सफर फारच आवडली. वरील सर्वांप्रमाणेच स्टँडिग ओव्हेशनचे तुम्ही हकदार आहात असे मलाही वाटते विलासराव,
स्वाती
9 Aug 2010 - 9:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
.
-दिलीप बिरुटे
8 Aug 2010 - 7:15 pm | मीनल
लेखनात कुठे ही अतिरेकी नाही. केवळ सच्चेपणा. साधे शब्द आणि ख-या भावना!
म्हणून वाचनिय !
एडी तर मस्तच .
कसा लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसतोय गं बाई!
तूम्हाला दोघांना मनापासून शुभेच्छा.
8 Aug 2010 - 7:25 pm | नावातकायआहे
+१००१
झकास मालिकेचा झकास शेवट!
पन लिहिन सोडु नका राव! !
8 Aug 2010 - 8:17 pm | रेवती
लेखन अगदी प्रामाणिकपणे केलं आहे हे जाणवत राहतं.
सगळे फोटो आवडले. एडीही आवडली.
तुम्हाला उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!
आपण या मालिकेनंतर लेखन थांबवू नये असे वाटते.
8 Aug 2010 - 8:22 pm | मस्त कलंदर
पहिली परदेशवारी तुम्हाला बरेच अनुभव देऊन गेलीय आणि तुम्ही त्यात आता आम्हालाही सामिल करून घेतलंत. तुम्हाला आणि एडीला अनोकोत्तम शुभेच्छा!!!!
9 Aug 2010 - 10:17 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
विलासराव, हॅट्स ऑफ!
तुमच्या या वेगळ्याच अनुभवात आम्हालाही सामील करून घेतलंत याबद्दल आभार. यापुढे लेखणीला विश्रांती देऊ नका.
एडी आणि तुम्हाला अनेकोत्तम शुभेच्छा.
16 Aug 2014 - 8:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
या धाग्यातले फोटो नीट दिसत नाहीयेत. सवडीनुसार कोणी संपादक HTML code बदलू शकता का?
17 Aug 2014 - 12:23 pm | उपाशी बोका
बहुदा विलासरावांनीच अल्बममधून फोटो काढले आहेत. src= च्या नंतर ची URL कॉपी-पेस्ट करून बघितले तरी फोटो दिसत नाहीत.
8 Aug 2010 - 8:34 pm | चतुरंग
आत्ताच एका बैठकीत सगळेच्या सगळे भाग वाचून काढले!
इतक्या मनमोकळेपणाने लिहिलेले, अभिनिवेशरहित लिखाण फारच कमी वेळा वाचले आहे. तुमच्या अनुभवातला प्रामाणिकपणा, जगण्यातला सच्चेपणा आणि एडीवरचे तुमचे प्रेम हे तुमच्या लेखातून जागोजागी जाणवते.
केवळ नेटवरल्या ओळखीवर हजारो मैल दूरच्या सर्वस्वी अपरिचित अशा देशात जाणे आणि तब्बल ७० दिवस राहणे हे अजिबात सोपे नाही. माणुसकीवर विश्वास असलेली व्यक्तीच हे करु जाणे. तुमच्या ह्या धाडसाला मनोमन सलाम!
तुमचा चुलतभाऊ आदेशची ओळखही आवडली. त्याच्याही जिद्दीचे कौतुक वाटते.
तुमची आणि एडीची भेट पुढल्यावर्षी होऊदे आणि एक सुखी-संपन्न आयुष्य तुम्हा दोघांना लाभूदे अशा शुभेच्छा! :)
(आनंदी)चतुरंग
पहिल्या लेखाला आलेल्या बर्याचशा उडाणटप्पू प्रतिक्रियांनंतरही तुम्ही नाउमेद न होता चिवटपणाने तुमचे लिखाण चालू ठेवलेत आणि वाचकांना बघता बघता आपलेसे करुन घेतलेत ह्याबद्दल आपले कौतुक करावे तितके थोडे आहे. तुमच्या लिखाणाने मिसळपावला एक प्रामाणिक लेखक मिळाला ह्याबद्दल समाधान वाटते.
(समाधानी)चतुरंग
आता वाचनमात्र राहणार आहोत असे तुम्ही इथे म्हणता आहात. परंतु तुम्ही इथे लिहीत रहावे असे वाटते. तुमच्या अनुभवांनी आम्हालाही समृद्ध करत राहा.
(आशावादी)चतुरंग
(खरं सांगतो तुमच्या पहिल्या भागानंतर मला वाटले होते की हा माणूस काहीतरी कल्पनेतून लिहितो आहे ह्यात काही तथ्य नाही - असे वाटल्याबद्दल मी मनापासून तुमची माफी मागतो.)
(खजील)चतुरंग
8 Aug 2010 - 8:35 pm | विंजिनेर
प्रामाणिक आणि सच्चं लेखन.
विलासरावः असेच लिहीत राहा.
8 Aug 2010 - 8:55 pm | बहुगुणी
[ ...हा खरा reality show असं म्हणावसं वाटलं!]
आता या पुढे तीन गोष्टींपासून कधीही दुरावा होऊ देऊ नका हा प्रेमाचा सल्ला:
एडी, आदेश आणि (जमेल तेंव्हा) लेखन!
इतकं केलंत तर तुम्हाला तुमच्या समृद्ध आयुष्यात 'त्या' सर्व मद्यांची उणीव नक्कीच भासणार नाही.
(आणि हो, 'जोडा' शोभतोय, तेंव्हा 'बार' ऊडवाल तेंव्हा मिपावर जाहीर आमंत्रण द्यायला विसरू नका, तेही फोटो पहायला आवडतील.)
8 Aug 2010 - 8:59 pm | भाग्यश्री
अतिशयच अप्रतिम!!
हा भाग फार सुंदर जमलाय..
लिहीणे सोडू नका.. भारतातील भ्रमंती नक्कीच आवडेल वाचायला..
8 Aug 2010 - 9:13 pm | उदय
विलासराव,
मनापासून अभिनंदन. तुम्ही मनमोकळेपणाने लिहिलेले अतिशय आवडले.
मिपावर यापुढेही असेचं लिहित रहा.
तुम्हाला आणि एडीला शुभेच्छा.
8 Aug 2010 - 10:03 pm | शिल्पा ब
विलासराव,
तुमची लेखमाला खूप आवडली....एडीचे फोटो दाखवल्याबद्दल आभारी...तुमचे अन एडीचे (अबुल आणि baxter बरोबर) जीवन सुखाचे जाओ हि शुभेच्छा...
कृपया तुमच्यावर इतका विश्वास ठेवून परदेशात येऊन तुमच्या कुटुंबाला आपले कुटुंब मानणाऱ्या एडीचा कधीही अपमान करू नका (अन काहीही झाले तरी हात तर अजिबात उचलू नका.).
तुम्ही खूप ठिकाणी भारतात फिरले असल्याचे म्हंटले आहे तरी ते अनुभवसुद्धा लिहून काढा जमेल तसे.
8 Aug 2010 - 10:09 pm | संजय अभ्यंकर
विलासराव, हाडचे लेखक नसले तरी लेखन उस्फुर्त पणे केले आहे.
त्यामुळेच ते चांगले व उत्कठावर्धक झाले.
8 Aug 2010 - 11:47 pm | माझीही शॅम्पेन
विलासराव तुम्ही खरोखर अवलिया आहात !
ह्या लेखमालेचा प्रत्येक भाग श्वास रोखून वाचला ,
आता आणखीन प्रतिक्रिया द्यायला शब्द नाहीत.
ह्या वर एखाद छान ई-बुक प्रकाशित करा , पुढील लेखनासाठी शुभेच्छा !!!
आणि हो सांगायाच राहील एडीला मि.पा. बद्दल ही सांगा :)
8 Aug 2010 - 11:59 pm | कानडाऊ योगेशु
लेखमालेचा शेवट(epilogue) अतिशय सुरेख केला आहे.
तुमच्या लेखनशैलीमुळे वाचताना अजिबात कंटाळा आला नाही.
वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे तुमच्या धाडसाचेही कौतुक.
लेखन खरेच थांबवु नका.
9 Aug 2010 - 12:04 am | प्रियाली
वर सर्वांनी सर्व म्हटले आहेच. आणखी वेगळे काय लिहिणार म्हणून सर्वांशी सहमत.
तुमच्याकडून अधिक प्रवासवर्णन वाचायला हवेच. तेव्हा लिहित रहा.
9 Aug 2010 - 5:34 am | सहज
अगदी हेच म्हणतो.
9 Aug 2010 - 7:21 am | प्रभो
आजपासून तुम्ही मिपाचे बाब्ये..जास्त काही लिहित बसत नाही... :)
9 Aug 2010 - 8:54 am | माया
विलासराव, आप महान हो!
एडी खुप छान आहे. तिची काळजी घ्या.
आपणा दोघांना शुभेच्छा!
लेखन खरेच थांबवु नका.
9 Aug 2010 - 10:24 am | समंजस
विलासराव वरील सर्वांच्या प्रतिसादांशी सहमत :)
जास्त काही बोलायला शब्दच नाहीत :(
[अवांतरः बर्याच दिवसानंतर एक प्रामाणीक आणि मनातुन आलेलं लिखाण वाचून खुप समाधान मिळालं. आणखी लेखन येउ द्या ]
9 Aug 2010 - 10:41 am | sneharani
सगळे भाग वाचले, अप्रतिम झालय लिखाण!
लिहीत रहा.
9 Aug 2010 - 11:31 am | विजुभाऊ
सर्वांशी सहमत. वेगळे काय बोलु? :)
9 Aug 2010 - 11:37 am | प्रमोद्_पुणे
अप्रतिम लेखमाला. एडी आणि तुमच्या सहजीवनास अनेकोत्तम शुभेच्छा! लेखमाला संपल्याने मनाला फार चुटपुट लागली..तुमच्या भारतभ्रमंती बद्द्ल वाचायला नक्की आवडेल. तुम्हाला कदाचित खरे वाटणार नाही पण तुमच्या या धाडसाचे आम्ही काही मिपाकर इथे पुण्यात फार कौतुक करत असतो. खरच तुमच्यासाठी अवलिया हा एकच शद्ब सुचत आहे.
तुम्हा दोघाना पुनःश्च शुभेच्छा!!
9 Aug 2010 - 3:50 pm | गोगोल
मला हॅपी एंडिंग असलेल्या फेअरी टेल्स नेहमीच आवडतात. दे मेक मे क्राय :)
9 Aug 2010 - 9:17 pm | टिउ
सगळे भाग आवडले. हा सगळ्यात जास्त आवडला.
विलासराव, तुम्हाला आणि एडीला पुढील आयुष्यासाठी अनेकोत्तम शुभेच्छा! :)
नांदा सौख्यभरे...
9 Aug 2010 - 10:54 pm | वारा
मजा अली वाचुन.....
विलासराव तुम्हला आणि एडीला शुभेच्छा.....
9 Aug 2010 - 11:23 pm | piu
विलासराव तुम्ही अजुन लिहित रहा!!
भारतात केलेल्या भटकती विशयी लिहा!
9 Aug 2010 - 11:23 pm | भिरभिरा
शेवटचा भाग सगळ्यात जबरा जमुन आलेला..
वाघ्या, तिच्या भारतभेटीनंतरचं लिखाण , इतर ,आता तर तुमचं आयुष्यच वाचनिय झालेय..त्यामुळं लिखाण थांबण ..?
नो चान्स.
10 Aug 2010 - 12:26 am | आमोद शिंदे
विलासराव शब्द संपले. शिरसाष्टांग नमस्कार!
10 Aug 2010 - 3:00 pm | नगरीनिरंजन
सलाम सलाम त्रिवार सलाम!
10 Aug 2010 - 3:08 pm | फुस्स
सगळ्यांचे प्रतिसाद आलेच आहेत, तेंव्हा विषेश काही उरलंच नाहीये. विलासराव , तुमची स्वानुभाची कथा आवडली बरंका.
किप इट अप. ऑर्कुट किंवा चॅट वर असे किस्से होतात असं बर्याचदा आपण ऐकलेलं असतं , पण आज एका लेखातुन हे जवळुन आणि संक्षिप्तपणे पाहायला मिळाले.
-(आवाज आला क्का ?) फुस्स
10 Aug 2010 - 3:23 pm | आळश्यांचा राजा
खरोखर स्टँडिंग ओव्हेशन देण्याच्या योग्यतेचे लेखन!
इतक्या मनमोकळेपणाने स्वत:विषयी सांगायला जबरदस्त आत्मविश्वास असावा लागतो. तो दिसतोय.
पहिल्या भागापासून शेवटपर्यंत लेखनामध्ये जी कमालीची सुधारणा झालेली आहे, ते बघून तुमच्या व्यक्तिमत्त्वातील परिपक्वता दिसून येते. सतत शिकण्याची तुमची तयारी दिसते. आणि अर्थातच तशी क्षमतादेखील. ग्रेट!
11 Aug 2010 - 12:12 pm | दिपक
वरील सगळ्यांशी सहमत. लागोपाठ सगळे धागे वाचले. लिहित रहा.
11 Aug 2010 - 12:16 pm | यशोधरा
मस्त.
11 Aug 2010 - 12:36 pm | निनाद
नमस्कार विलासराव,
मी फारसे प्रतिसाद देत नाही.
पण तुमच्या आयुष्यातला आणि लेखनातलाही प्रामाणिकपणा भावला.
लेखन फार आवडले. तुमच्या भारत भ्रमंती विषयी वाचायला आवडेल. माझ्या आधीही अनेकांनी विनंती केली आहेच, तेव्हा लिखाणाचे मनावर घ्या.
माझ्या सारखे प्रतिसाद न देणारेही अनेक वाचक तुमचे चाहते असतील.
6 Sep 2013 - 9:20 am | संजय क्षीरसागर
फोटो का दिसत नाहीत इथले?
आणि या लेखमालेला तीन वर्ष झाली, पुढे काय झालं?
6 Sep 2013 - 3:17 pm | जे.पी.मॉर्गन
संजय.... ३ वर्षांनी हा धागा वर काढल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. शुक्रवार दुपारच्या रिकाम्या वेळेचं सार्थक झालं. सगळे भाग एकदम वाचून काढले. ब्येष्टच ! लिखाणातला प्रामाणिकपणा भावला. कुठलाही आव न आणता केलेलं लेखन भिडलं मनाला.
इलासरावांचं बाकीचं पण लेखन बघायला हवं!
जे.पी.
6 Sep 2013 - 3:29 pm | संजय क्षीरसागर
त्यानं लिंक दिली होती. मला देखिल सर्व लेखमाला ज्याम भावलीये. फोटो मात्र दिसायला हवेत!
10 Sep 2013 - 1:53 am | श्रीरंग_जोशी
ही अद्वितीय लेखमालिका पुन्हा वर येण्यास मूळ कारण मनिम्याऊ यांच्या पतिदेवांच्या कंपनीने निर्माण केले आहे - संदर्भ.
या माणसाने मिपावर केवळ एकदाच एकाच विषयावर लिहिले आहे, जे लिहिले आहे ते असे काही लिहिले आहे की.... असो, यासाठी विलासरावांना दंडवत!!
6 Sep 2013 - 5:43 pm | प्यारे१
तंतोतंत.
विलासराव हा माणूस खरंच अवलिया म्हणून ओळखला जावा.
मनात एक गोष्ट आली की करुन मोकळं होतानाच त्यात वाहवत न जाण्याचं त्यांचं कौशल्य शिकायलाच हवं.
नर्मदा परिक्रमेबद्दल पण ऐकून आहे.
आणखी लिहा हो विलासराव!
(काहींना कधी बंद करताय असं विचारावंसं वाटतं.)
8 Sep 2013 - 10:03 pm | अत्रन्गि पाउस
मना ...
अतिशय ...सुंदर...
12 Sep 2013 - 10:07 pm | पन्कज्ज
मस्तच !!!!
14 Sep 2013 - 8:47 pm | चतुर नार
सगळे भाग एका दमात वाचून काढले. मस्त अनुभव आणि प्रांजळपणे लिहीलाय.
Hats off!
14 Sep 2013 - 10:07 pm | लक्ष्या
घरात एकताच खुप बोर झालो होतो, सगळे भाग एकाच दमात वाचून काढले. तुमचे लेख खुप आवडले. लिहित रहा.
14 Sep 2013 - 10:29 pm | सोत्रि
दोन महिन्यांपूर्वी चेन्नैत विलासरावांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला आणि ही लेखमाला प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाली. ६-७ तासांत अनेक विषयांवर चर्चा झाली तीही अवर्णणिय. नर्मदा परिक्रमेचा अनुभवही त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाला. एकंरदीत अवलिया व्यक्तिमत्व!
- (विलासरावांनी आणखिन लिहावे असे प्रामाणिक मत असलेला) सोकाजी
19 Sep 2013 - 12:07 am | अत्रुप्त आत्मा
@नर्मदा परिक्रमेचा अनुभवही त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाला. एकंरदीत अवलिया व्यक्तिमत्व!>>> +१ हमने भी ऐसाच अनुभव लिया है...आमच्या कोल्हापुर ट्रिपच्या वेळी! :)
16 Sep 2013 - 1:57 pm | नाखु
खरच हि लेखमाला नजरेतून सुटली होति, ज्याने उत्खनन केले त्याचे आभार आणि विलासरावांना दंडवत.
16 Sep 2013 - 2:19 pm | योगिता_ताई
मला फोटो नाही दिसत...
20 Sep 2013 - 11:19 am | मनिम्याऊ
18 Aug 2014 - 3:35 pm | सुजल
आधी दहावा भागच पहिल्यांदी वाचला पण एडीचे फोटो आहेत कुठे.? दिसत नाहीयेत.
अतिशय सुरेख ओघवत लेखन :)
21 Aug 2014 - 3:14 pm | समिक्शा
मलाहि फोटो नाही दिसत...
9 Jul 2015 - 6:35 pm | ट्रेड मार्क
स्वप्नातील वाटावी अशी कथा!
बरेच फोटो दिसत नाहीयेत, विशेषतः तुमचा स्वतःचा, एडी, अबुल आणि baxte यांचे फोटो बघितल्याशिवाय कथेला परिपूर्णता येणार नाही.
आम्हाला फोटो दाखवावे ही कळकळीची विनंती.
9 Jul 2015 - 9:53 pm | अभिजीत अवलिया
कृपया विलासराव तुमचा आणी एडीचा एक फोटो टाका.
28 Oct 2016 - 9:07 pm | Rahul D
मस्तच
24 Aug 2021 - 4:44 pm | सुखी
फोटू दिसत नाहीत
24 Aug 2021 - 10:24 pm | गॉडजिला
फोटू दिसत नाहीत :(
29 Aug 2021 - 2:21 am | diggi12
पुढे काय झालं?
29 Aug 2021 - 2:09 pm | कंजूस
फोटो १
फोटो २
फोटो ३
30 Aug 2021 - 9:56 pm | गॉडजिला
विलासराव फार प्रसन्नचित् दिसत आहेत फोटोत. विषेशत: तिसरा फोटो अतिशय उमदा आहे...
30 Jun 2024 - 2:32 am | चित्रगुप्त
मी ही लेखमाला वाचलेली नाही. धागा आत्ता वरपर्यंत जाऊन बघितला, त्यात आता हे तीन फोटोच दिसत असून ते 'आदेश' या विलासरावांच्या चुलत भावाचे आहेत असे समजले.
आता पहिल्यापासून लेखमाला वाचायला हवी.
सध्या विलासरावांचे काय चालले आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
30 Jun 2024 - 2:07 am | रामचंद्र
विलासरावांची कहाणी आता २०२४ सालात पुढं कुठवर पोहोचली आहे याची उत्सुकता आहे.
3 Jul 2024 - 8:01 am | सोत्रि
ह्या धाग्यावर तुम्हाला त्यांचे लेटेस्ट स्टेटस कळेल.
https://www.misalpav.com/node/51979
- (वाटाड्या) सोकाजी
3 Jul 2024 - 1:13 pm | रामचंद्र
अरे वा, हे मोठेच कार्य त्यांनी हाती घेतलेले दिसते. म्हणजे आधीच्या कहाणीतून ते सुखी संसाराकडे वाटचाल करण्याऐवजी विरक्त होऊन या मार्गाला लागले की काय? आयुष्य हे खरंच अतर्क्य म्हणायचं.
12 Jul 2024 - 12:36 am | चित्रगुप्त
हा शेवटला भाग वाचताना डोळे पाणावले आहेत. माझे गेले तीनचार दिवस फार विचित्र गेले. पैकी पहिल्या रात्री छातीत असह्य कळा, मग जन्मात प्रथमच इस्पितळात भरती (इथे अमेरिकेत) तिथला इलाज, बरे वाटणे पण आता आलेला अशक्तपणा... घरी आल्यावर या मालिकेचे सगळे भाग वाचले.
-- अफाट अविश्वसनीय असे अनुभव अत्यंत प्रांजळपणे कथन केलेले आहेत. विलासरावांनी त्यांच्या चार वर्षांच्या भारत भ्रमंतीबद्दल विविध लेख लिहावेत, आणि पुढे एडीचे काय झाले ? ती भारतात आली का? आता ती कुठे असते ? याविषयीपण जरूर लिहावे.
या लेखमालेतील दहा भागात दिलेल्या फोटोंपैकी काहीही आता दिसत नाहियेत. ते प्रशांतला कळवून पुन्हा एकदा अपलोडवावेत, ही विनंती. विलासराव आता पूर्ण वेळ विपश्यनेत रमलेले आहेत असे दिसते. त्यांच्या सर्व कार्याला अनेक शुभेच्छा.
12 Jul 2024 - 12:53 am | रामचंद्र
कृपया
https://www.misalpav.com/node/10372
ही लेखमाला वाचायला घ्या, नक्की बरे वाटेल. लेखक एकदा दहावी झाल्यानंतरच्या वर्णनानंतर कहाणीने जबरदस्त पकड घेतली आहे. मदायत्तं तु पौरुषम् एवढं म्हटलं तरी पुरेसं आहे. अतिशय प्रेरक आणि अद्भुत जीवनकहाणी आहे.
31 Jul 2024 - 11:26 am | संदिप एस
विलासराव आणी एडि चे नंतर काय झाले कोणी सागू सांगू शकेलका; जबरदस्त ले़ख मालिका - त्यांचा बद्द्ल चा ज्ञानोबांचा विपाश्शना केंद्र सुरू केले तो पण लेख वाचला ऑलरेडी.