आमची पहिली परदेशवारी....६
भाग-१ http://www.misalpav.com/node/13410
भाग-२ http://www.misalpav.com/node/13436
भाग-३ http://www.misalpav.com/node/13450
भाग-४ http://www.misalpav.com/node/13473
भाग-५ http://www.misalpav.com/node/13495
नमस्कार मंडळी,
आज सकाळी लवकरच जागआली. सहा वाजले असतील,खिडकीतून खाली नजर टाकली, रस्त्यावर मोठमोठे ट्रक्स,बसेस ,कार धावत होत्या. आमचे हॉटेल बस आगाराजवळच असल्यानेही असेल, लोकांची वर्दळहि सुरु झालेली होती. याच हमरस्त्यावर मोठासा उड्डाणपूल, रस्त्याच्या आणि पुलाच्या मध्यावर पादचार्यांसाठी मार्ग बनवण्यात आलेला होता. त्यावरून काही माणसे, मुले आणि स्रिया लगबगीने निघालेल्या दिसत होत्या.उड्डाणपुलाच्या पलीकडे अजस्र अशा क्रेन नजरेस पडल्या आणि त्यापलीकडे काही जहाजे नांगर टाकून विश्राती घेत होते. ते तेथील बंदर असावे.आज आमचा रीओमधील प्रसिद्ध अशा शुगर-लोफ ला भेट देण्याचा बेत होता. पण तेथिल रोप-वे ११-१२ च्या सुमारास सुरु होत असल्याने मी तेथील सत्य साईबाबांच्या आश्रमाला भेट द्यायचे ठरवले,पत्ता ठावूक नव्हता तरीही मला तेथे जाने गरजेचे वाटत होते. एक कारण असे कि कोणीतरी भारतीय भेटण्याची शक्यता आणि महत्वाचे म्हणजे तेथे काही स्वस्तात राहण्याची सोय होईल असा माझा कयास होता.तसे झाले तर आणखी दोन दिवस रिओ पाहता येईल असाही एक हिशोब मनात होता. बस आगारात येऊन तेथे काही माहिती मिळते का बघितले पण सर्वत्र नकारघंटाच कारण आमच्याकडे कुठलाही पत्ता नव्हता. मला फक्त तेथे आश्रम/मंदिर आहे अशी अधुरी माहिती होती. मी फक्त एडीला एकदा सत्य साईबाबांचा फोटो दाखवलेला होता तोही वितोरीयाच्या रस्त्यावर अगरबत्तीच्या कव्हरवर. नाग चंपा , केवडा , जस्मिन अशा भारतीय अगरबत्ती तेथील लोकांमध्ये फारच लोकप्रिय होत्या. त्यावर पत्ता आपल्या बेंगलोर शहराचा होता. त्या माणसाकडे हा माल कुठून खरेदी करत अशी चौकशी केल्यावर त्याने रिओ ला आश्रम असल्याचे सांगितले होते. तो प्रत्यक्ष एकदाच गेलेला असल्याने त्याला लिखित पत्ता माहित नव्हता. आमच्याकडे त्याच फोने नंबर असल्याने एडीने त्याला फोन केला त्याने काही अधुरी माहिती दिली, त्याआधारे आम्ही तेथील टॅक्सी स्टॅण्डवर चौकशी गेली. एडीला हा सर्व मूर्खपणा वाटत होता पण माझा निग्रह पाहून तिने चौकशी चालू ठेवली आणि आमच्या प्रयत्नांना यश आले. एक टॅक्सी ड्रायवरने आम्हाला तेथे सोडण्याची तयारी दाखवली.मी खुश झालो आणि १५ मिनिटामध्ये त्याने आम्हाला एके ठिकाणी सोडले आणि तेथून वरच्या दिशेने जाणारया रस्त्याने ५ मिनिटे लागतील असे सांगून निघून गेला. वरती पोहोचलो तर ते एक प्रशस्त असे चारच होते. आमचा पूर्ण पोपट झालेला होता. ते चर्च पाहून झाल्यावर मी एडीला तेथील कर्मचार्याकडे चौकशी करण्यास भाग पाडले. तिने काहीशा नाखुशीनेच विचारले आणि चक्क आम्हाला त्याने फोन नंबर आणून दिला. बाहेरून एडीने फोन लावला पण रविवार असल्याने ते बंद होते. राहण्याची काही सोय नाही हेही समजले. त्याला हिंदी येते का असे विचारल्यावर नाही असे उत्तर आले. फोन ठेवताना मात्र तो ओम साई राम असे म्हणाला हे एडीने मला सांगितले. एव्हाना ११ वाजून गेलेले, माझी कोणी भारतीय भेटेल हि आशा मी सोडून दिली आणि बस पकडून आम्ही शुगर-लोफ्च्या दिशेने निघालो. आतापर्यंत ज्या भागातून आम्ही प्रवास केला होता तो भाग काहीसा जुना भासत होता, काही माल गोदामे , जुनाट इमारती आणि काहीसा मागास असा हा भाग मला वाटला. पण थोड्याच वेळात आम्ही एका प्रशस्त रस्त्यावर आलो. आता मात्र इथे सर्वत्र चकचकाट, रस्त्याच्या दुतर्फा मोठमोठ्या इमारती, रंगीबेरंगी शो रूम्स आणि माणसांची अलोट गर्दी इतकेच काय ट्राफिकहि जाम झालेले होते. काही वेळातच बस उजवीकडे वळली आणि इतके वेळ हळूहळू जाणारी बस सुसाट वेगाने धाऊ लागली. रस्त्याच्या एका बाजूला मोठासा फुटपाथ मध्ये चौपदरी रस्ता बाजूला पार्किंग त्यापलीकडे बराचसा मोठा असा हरित पट्टा ज्यामध्ये हिरवळ आणि मोठमोठी झाडे मागे-मागे धावताना दिसत होती. त्यापलीकडे असाच चौपदरी रस्ता, पार्किंग आणि मोठासा फुटपाथ आणि त्या बाजूला निळाशार असा समुद्र . खिडकीतून येणारी ती मोकळी हवा मनाला सुखावत होती आणि इतक्यात मला महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे दर्शन झाले. मी काहीशा ओरडूनच एडीचे लक्ष तिकडे वेधले.मला खूप आश्चर्य वाटत होते तरीही मला भारत देशाच्या या सुपुत्राचा अभिमान वाटला आणि मीही भारतीय असल्याचा सुद्धा. मी एडीला गांधीजींविषयी माहिती देण्यास सुरवात केली आणि मला पुन्हा एकदा आश्चर्याचा सुखद धक्का बसला. एडीला गांधीजींविषयी बरीच माहिती होती.आता आम्ही बसमधून उतरून चालतच शुगर-लोफ्च्या पायथ्याशी आलो. तिकीट घेऊन रांगेत दाखल झालो.इथेही पर्यटकांची बरीच गर्दी आणि काहीसा गोंगाट चालू होता. आमचा नंबर आला आणि आम्ही रोपवेच्या ट्रोलिमध्ये प्रवेश केला. ५६०-७० लोक आरामात उभे राहू शकतील एवढी जागा होती.पण सर्वांनाच बाजूला उभे राहण्यात स्वारस्य होते कारण तेथून दिसणारे मनोहारी दृश्य क्लिक करता येण्यासाठी. मशीन सुरु झाले तसा काहीसा आवाज झाला आणि आम्ही वरवर उचलले गेलो. आणि ३-४ मिनिटातच आम्ही पहिला टप्पा पार करून पर्वताच्या शिखरावर आलो. तिथे मध्यभागी असलेल्या थियेटरमध्ये दाखल झालो. सर्व पर्यटक आल्यावर तिथे त्या स्थळाबद्दलचां माहितीपट दाखवण्यात आला. हे दोन पर्वत बाजूबाजूला आहेत एक छोटा आणि दुसरा त्यापेक्षा कितीतरी उंच. माझ्या माहितीप्रमाणे १८००-२००० मीटर. प्रथम टप्प्यात छोट्या पर्वतावर आणि दुसर्या टप्प्यात उंच अशा सुगर-लोफ वर जाता येते. हा रोपवे जगातील पहिला असा आहे. बर्याच हॉलीवूड पटामध्ये या रोपवेवर चित्रीकरण करण्यात आलेले आहे. आणि मला आश्चर्य वाटले ते या गोष्टीचे कि कोणीतरी एका माणसाने हातात लांबच लांब काठी घेऊन या रोपवेचा दुसरा टप्पा तारेवरून चालत पार केला आणि हा जागतिक विक्रम आहे अशी. काहीशी माहिती त्या फिल्म मध्ये देण्यात आली. असो.
बाहेर येऊन आम्ही तेथील दुकानामध्ये भटकंती केली. कुठेही काहीही अवांतर खरेदी करायची नाही हा आमचा अलिखित नियम होता आणि आम्ही तो येथेही पाळला हे वेगळे सांगायला नको. वेग वेगळे गिफ्ट आर्टिकल्स, शोभेच्या वस्तू , पेंटींग्ज आणि बरेच काही.मी आपला बर्याच वस्तू हातात घेऊन न्याहाळून पाहत असे, त्याची किंमतही विचारत असे(घ्यायची नसतानाही ) याचे एडीला नेहमीच कुतूहल वाटत आलेले आहे. किंमत एकदा कळली कि त्याला २७ ने गुणायचे आणि हीच वस्तू भारतात किती स्वस्त मिळते ते एडीला सांगायचे हा मला एक छंदच लागला होता होता. तेथील हॉटेलमध्ये पोटपूजा उरकून आम्ही आजूबाजूच्या निसर्गाचा आनंद घेतला.अचानक येणारे ढग आणि मध्येच रिमझिम येणारा पाऊस. समुद्रावरून येणारी स्वच्छ शुद्ध मोकळी हवा, ते भारलेले वातावरण आणि एडीचा सहवास मला तर तो दिवस संपूच नये असे वाटत होते. एडीची अखंड बडबड चालू होती मला आताशा तिच्या उच्चाराची सवय झालेली होती. तरीही आमचा बराचसा संवाद हातवारे करूनच होत असे. तिला असलेली माहिती मला देण्याचा ती सतत न कंटाळता प्रयत्न करीत असे. इथे बराच वेळ घालून आम्ही पुढील टप्पा पार केला आणि तेथील वातावरणाचे मी शब्दात वर्णन करू शकत नाही . केवळ स्वर्गीय अशा त्या वातावरणाने मला भरून टाकले.जिकडे पहावे तिकडे निळाशार समुद्र पसरलेला, मधेच काही पर्वत हिरव्यागार रंगाने नटलेले. माथ्यावरती सूर्य देव तळपत होता पण आज तो काहीसा निस्तेज भासत होता. पायथ्याजवळ गरम हवा असताना इथे चक्क थंडी वाजत होती . एका क्षणि उन तर दुसर्याच क्षणी रिमझिम पाऊस असा उनपावसाचा खेळ चालू होता. एवढ्या उंचीवरून रस्त्यावरच्या त्या उत्तुंग इमारती खूपच लहान दिसत होत्या आणि दूरवर असलेला तो जगप्रसिद्ध कोपाकाबाना बीच त्याचे वैभव मिरवत दिमाखात खुणावत असल्याचा मला भास झाला. प्रचंड असा हवेचा झोत आणि त्याबरोबर एक काळाकुट्ट असा ढग अचानक प्रगटुन अंधारमय वातावरण तयार झाले आणि तो जसा अकस्मात आला तसा क्षणार्धात निघूनही गेला.खालच्या पर्वतासारखी मुबलक जागा येथे नसल्याने पर्यटकांची फोटो काढण्यासाठी धांदल चालू होती. आपण कुठेतरी स्वर्गात आणि खोल दूरवरून छोटे छोटे ढग वरवर येताना आपल्याबरोबर स्वच्छ आणि शुद्ध मोकळी हवा घेऊन येत आणि त्या स्पर्शाने मला तर आपले अस्तित्व नाहीसे झाल्यासारखे वाटले,. मन आकाशात उंचउंच भरारी घेत होते. मग आम्हीही थोडे फोटोज घेतले आणि पर्वत शिखराच्या उतारावर असलेल्या जंगल वजा बागेमध्ये चक्कर मारली. एवड्या छोट्याशा जागेचा नियोजनबद्ध वापर मला भावून गेला. बांबूची आणि अनेक प्रकारची झाडे मधेच सिमेंटची पायवाट. काही ठिकाणी बसण्याची सोय होती. आम्हीही येथे विसावलो. अशा त्या वातावरणात एडीला अचानक भरून आले . तिला अचानक तिच्या आई-वडिलांची आठवण झाली.ते तिला एकटीला या जगात तेरा वर्षाची असताना देवाघरी निघून गेले. तिला कसेबसे शांत केल्यावर तिने मला त्यानंतर केलेल्या खडतर प्रवासाची कहाणी सांगितली ती इथेच. हे वातावरण आणि एडीचा जीवनप्रवास ऐकत वेळ कसा भुरकन उडून गेला. एव्हाना पाच वाजले होते मग पाय निघत नसतानाही परत फिरावं लागले पुन्हा एकदा त्या स्वर्गीय वातावरणाचा डोळे मिटून आस्वाद घेतला.खोल श्वास घेऊन ती स्वत्च्छ हवा आणि तेथील वातावरण मनात साठवून घेतले. आणि आम्ही कॉपाकाबाना बीचवर जाण्यासाठी सज्ज झालो. ३-४ कि मी लांब पसरलेला हा बीच. तेथील जगप्रसिद्ध कॉपाकाबाना पैलेस होटल पाहून मला मुंबईच्या ताज हॉटेलची आठवण झाली.येथील व्हीआयपी लोकांच वावर येथे असतो अशी माहिती मला एडीने पुरवली. आणखीही मोठमोठी हॉटेल या शहरात आहेत पण याच महत्व काही वेगळेच . या बीचचे वैशिस्ठ्ता म्हणजे येथील सफेद माती. बीचवरून फिरतफिरत आम्ही चालत असताना एक शेगदाणे विकणार्या माणसाने मला अडवले. एडी थोडीशी मागे असल्याने त्याला वाटले मी एकटाच आहे. त्याने मला एक पुडी देऊ केली. मी ती नाकारली. तरीही तो माझ्या मागेच लागला. मी नकार दिला तरीही त्याने जबरदस्ती ती माझ्या हातात दिली. इतक्यात एडी आली. तिने त्याला समजावले तो काही ऐकेना. प्रश्न ४-५ रीयालचा होता पण मला त्याचा रागच आला होता मी त्याच्यावर जोरात ओरडलो तेंव्हा तो निघून गेला.आम्ही पुढे चालत आलो आणि नारळपाणी पिण्यासाठी थांबलो. आणि अचानक तो मनुष्य परत आला त्याच्याबरोबर आणखी एक मनुष्य होता. त्याने आमच्या टेबलावर जोरात हात आपटला आणि एदिकडे पाहून जोरजोरात भांडू लागला. एडी घाबरली आणि मीही मनातून थोडासा घाबरलो होतो.मी त्याला त्याची पुडी परत केली. त्याने ती सरळ फेकून दिली आणि पैसे मागू लागला.समोरून एक पोलीस येताना मी पहिला होता. आणि तो माणूस हट्टाला पेटला होता. आणि मीही. एडी त्याला पैसे द्यायला लागली ते मी घेतले खिशात ठेवले. आता त्याने माझा हात पकडला. मी जोरात हिसका दिला मागे सरून ती प्लास्टिकची खुर्ची उचलली आणि युद्धाच्या पवित्र्यात उभा राहिलो.मी एडीला त्या पोलिसाला बोलवायला सांगितले. तो आला . एडीने त्याला हकीकत सांगितली.नारलपानिवाल्या दुकानदारानेही आमची चूक नसल्याचे पोलिसाला सांगितले. त्याने त्या लोकांना दम भरला ते निघून गेले.पण मी जो पवित्र घेतला होता त्याबद्दल त्याने एडीला मला समाज द्यायला सांगितली आणि आता इथे थांबू नका ते लोक चांगले नाहीत तेंव्हा इथून निघून जा असे सांगितले.तसेही ६:३० झाले होते आणि मीही मनातून जाम घाबरलो. एडीही घाबरलेली होती तरीही मी तिला धीर देत होतो.बस पकडली आणि हॉटेलवर आलो. एडीने मला पूर्ण रस्ताभर बरीच समज दिली आणि मीही ती ऐकून घेतली कारण माझी चूक मला कळली होती. हॉटेलवर आलो आणि रात्री जेवणही रुममध्ये घेतले. दुसर्या दिवशी सकाळी रिओ सोडले आणि वितोरीयाला सुखरूप परत आलो.हा माझा ब्राझीलमधील एकमेव वाईट अनुभव. अर्थात आम्ही वितोरीया सोडून इतर ठिकाणी कधीच रात्री बाहेर फिरलो नाही. ते केवळ एडीच्या कडक नियमामुळे. तिथे गुन्हेगारी बर्याच मोठ्या प्रमाणावर आहे. आणि drugs घेणारे लोक असल्याने दिवसा ढवळ्या लुटमारही होते. मला तरी नशिबाने अशा प्रसंगाला सामोरे जावे लागले नाही. आज इतकेच.चुकभुल माफी असावी.
क्रमश:
हे कही फोटो:-
प्रतिक्रिया
2 Aug 2010 - 7:01 pm | रेवती
छान फोटो!
आपल्या लेखनात चांगल्या अर्थी खूप फरक पडलाय.
वर्णन चांगले झाले आहे.
2 Aug 2010 - 7:11 pm | योगी९००
काही typo error आहेत पण वाचायला मजा येत आहे..
बाकी तुमचा खर्च कोण करत होते ते नाही लिहीले...एडी करत होती का?
एक कारण असे कि कोणीतरी भारतीय भेटण्याची शक्यता आणि महत्वाचे म्हणजे तेथे काही स्वस्तात राहण्याची सोय होईल असा माझा कयास होता.
??? पटले नाही...
2 Aug 2010 - 8:02 pm | विलासराव
एक कारण असे कि कोणीतरी भारतीय भेटण्याची शक्यता आणि महत्वाचे म्हणजे तेथे काही स्वस्तात राहण्याची सोय होईल असा माझा कयास होता.
१)एक कारण असे कि कोणीतरी भारतीय भेटण्याची शक्यता:-
कारण मला ब्राझीलला येउन महीना झाला एकही भारतीय भेट्ला नाही. आपली भाशा बोलणारे कोणीतरी भेटावे अनि भर्पुर गप्पा माराव्यात असे झाले होते.
२)महत्वाचे म्हणजे तेथे काही स्वस्तात राहण्याची सोय होईल असा माझा कयास होता:-
भारतामध्ये बहुतेक आश्रमात हि सोय उपलब्ध आहे.कमी खर्चात. श्री सत्य साई हे भारतिय आहेत. त्यांचा बराच शिश्यवर्ग तिकडे आहे.तेव्हा असे मला असे वाट्ले.
१) आणी २) या दोन भिन्न गोश्टी आहेत.
2 Aug 2010 - 7:21 pm | मीनल
आम्ही सर्व एडीला पहायला आतूर आहोत.
लेखनात तीचा एकही फोटो न टाकता आतूरता ताणून ठेवली आहे.
हे खरे तर चांगल्या लेखनाचे वैशिष्ट्यच आहे.
असो, चालू द्या!
2 Aug 2010 - 7:39 pm | गणपा
क्रमश: आहे पाहुन बर वाटलं :)
रेवतीतैंशी सहमत.
2 Aug 2010 - 8:06 pm | सहज
ह्याला म्हणतात परदेशवारी!
गुरु विलासराव आम्ही तुमचे फॅन झालो आहोत!
अजुन कोणीही महत्वाचा प्रश्न विचारला नाही आहे, असो इतर सिंगल मिपाकरांच्या सोयीसाठी विचारत आहे, एडी मॅडमची कोणी लहान बहीण नाहीतर मैत्रीण? अरे हो स्त्रीपुरुष समानतेच्या जमान्यात आहोत म्हणून महीला सिंगल मिपाकरांकरता एडीचा भाउ, मित्रही असल्यास कळवा!
गुरु मान गये ब्राझील-ए-आझम!
3 Aug 2010 - 12:48 am | पक्या
सुंदर , झकास वर्णन. ही लेख मालिका मस्त जमली आहे.
एकट्याने अशी परदेश वारी करण्याच्या आपल्या धाडसाचे कौतुक आहे.
8 Jul 2015 - 2:30 pm | सिरुसेरि
छान लेख व मालिका . मग सध्या तुम्हि कुठे असता ? वरिल फोटोतील तो पुतळा कोणाचा आहे ? तो अगदी 'हिंदुस्तानी' मधल्या सेनापती कमलहसन सारखा दिसतो आहे .
8 Jul 2015 - 9:34 pm | विलासराव
काम वगैरे सध्या काहीच नाही. फक्त विपश्यना.
तो पुतळा वर जो रोपवे आहे ना त्याचा इंजीनीयर.
हा जगातील पहिला रोपवे आहे.
बऱ्याच इंग्लिश फिल्म्स मधे येथे शूटिंग केलय.
8 Jul 2015 - 9:56 pm | पद्मावति
वाह मस्त लेखमालीका. खूप आवडलि. ब्राझील सारख्या अगदी वेगळ्याच देशाची सफर तुमच्यामुळे घडली. तुम्ही केवळ काही दिवसांचे पर्यटक म्हणून न जाता तिथे बराच वेळ घालाविला त्यामुळे हे फक्त प्रवास वर्णन न राहता एक अतिशय छान अनुभववर्णन बनले आहे.
11 Jul 2024 - 5:44 am | चित्रगुप्त
आता एकही फोटो दिसत नाहीये. यावर काही उपाय आहे का ?