मराठी लाईट इनफंट्री... भाग १ , भाग २ , भाग ३ , भाग ४ , भाग ५
***
मराठा लाईट इन्फंट्री - मराठा समाजाची शौर्यगाथा.
भाग -१
कामा निमीत्त, माझ्या इंग्लंडच्या एका सफरीत वेळ असल्यामुळे सेंट पॉल कॅथेड्रलला भेट दिली होती. त्या विस्तिर्ण सभागृहाच्या खांबावर नजर टाकली तर त्या देशाच्या सेवेत ज्या ज्या पलटणी लढल्या होत्या त्या सर्वांची नावे त्यावर कोरलेली आढळली. त्यातच महार रेजिमेंटचेही नाव वाचल्याचे स्मरते. मन क्षणभर खिन्न झाले. भारतात इतकी देवळे आहेत, पण एकाही देवळात ज्यांच्यामुळे ती आज उभी आहेत त्यांची म्हणजे आपल्या सैनिकांची स्मृती जागवली जात नाही. भारतात सैन्याची एवढी थोर परंपरा असूनही आपला समाज सैनिकांना पुरेसा मान देत नाही ही गोष्ट मला मान खाली घालायला लावते. आपल्या सैन्याची शौर्यगाथा कदाचित आपल्याला माहीत नसावी. त्या शौर्याच्या आठवणी जागवाव्यात व जेव्हा जेव्हा एखादा सैनिक आपल्याला भेटतो तेव्हा तो युध्दात आपल्या प्राणाची, कुटूंबाची तमा न बाळगता शौर्याच्या कुठल्या टोकाला जाऊ शकतो हे परत एकदा समजावे/लक्षात यावे म्हणून हा लेख लिहीत आहे. परदेशात, विशेषत: युरोपमधे व अमेरिकेत साध्या सैनिकाला किती मान असतो हे आपल्यापैकी जे तेथे अनेक वर्षे आहेत त्यांना माहीत असेल. हा लेख जे वाचतील त्यांच्या कडून माझी हीच अपेक्षा आहे.
हा लेख सैनिकांबद्दल व त्यांच्या पराक्रमाबद्दल आहे. ते कोणाकडून व कोणा विरुध्द लढले व का लढले हा या लेखाचा विषय नाही. तो एक स्वतंत्र राजकारणाचा विषय आहे. सामान्य सैनिक हा कधीच देशद्रोही वगैरे नसतो. तो फक्त एक सैनिक असतो.
आपल्या सैन्यदलातील सगळ्यात जूनी रेजिमेंट “मराठा लाईट इन्फंट्री” यातील सैनिकांबद्दल मी आज आपल्याला सांगणार आहे. या सैनिकांविषयीच का ? त्याची कारणे खालिलप्रमाणे
१ ते मराठी आहेत म्हणून
२ त्यांच्यात लढवैय्येपणा आहे म्हणून
३ जगभरात भल्याभल्यांना त्यानी रणांगणात पाणी पाजले आहे म्हणून
४ सहन करण्याची त्यांची ताकद इतर कुठल्याही जमातीपेक्षा जास्त आहे हे अनेक वेळा इतिहासात सिध्द झाले आहे म्हणून.
५ सध्याच्या मराठा समाजातील मुलांना, तरूणांना त्यांच्यातील या गुणाची आठवण द्यावी म्हणून.
असो.
दुसरे महत्वाचे कारण म्हणजे, सध्याच्या या काळात ब्राम्हण – मराठा समाजात फूट पाडायची जी कारस्थाने समाजकंटक करत आहेत त्यांनाही कळावे, ब्राम्हणांनाही मराठ्यांचे हे गूण माहीत आहेत आणि ते त्यांच्या या गुणाचे चाहते आहेत.
मी ब्राम्हणांवर असा लेख लिहू शकतो का ? का नाही ? लिहीणारच आहे. थोरल्या बाजीरावांनी त्यांच्या मित्रांबरोबर जे भारताच्या राजकारणाला त्या काळात जे वळण लावले त्या बद्दल मी लिहीणारच आहे. त्याच्या या मित्रांची नावे काय होती – होळकर, शिंदे, पवार, गायकवाड, इ.इ. तसेच हेही या समाजकंटकांनी लक्षात ठेवले पाहिजे की महाराजांनी त्यांच्या मंत्रीमंडळात ब्राम्हणांचे गूण ओळखून त्यांना जागा दिल्या होत्या. तसेच शाहू महाराज यांनी आपले राज्याचे पेशवे पद हे एका ब्राम्हणाला दिले ते त्याच्यातले गूण ओळखूनच. पुढचा इतिहास आहे.....
थोडक्यात काय, आपण सगळ्यांनी गुणग्राहक असायला पाहिजे.
या लेखात ब्रिटीशांच्या काळातल्या मराठ्यांच्या पराक्रमाबद्दल मी आपल्याला सांगणार आहे. कारण त्या अगोदरच्या त्यांच्या शौर्याच्या हकीकती आपल्या सर्वांना माहिती आहेतच. नसल्यास त्यावरही लिहिनच.
युध्द्स्य कथ: रम्या असे म्हणायला ठीक आहे. पण युध्दात जयापेक्षा पराजय पचवणे फार अवघड असते. अनेक युध्दे मराठा लाईट्ने लढली. काही ते जिंकले तर काही ते हरले पण या सर्व युध्दात एक गोष्ट समान होती आणि ती म्हणजे या जवानांचे त्यांच्या शत्रूंनीही नावाजलेले त्यांचे शौर्य, चिवटपणा आणि त्यांची अंगकाठीच्या बरोबर विरूध्द असणारा त्यांचा पराक्रम. मी जे हे लिहीणार आहे ती या शुरांची पूर्ण कहाणी नाही. ती यापेक्षाही महान आहे. त्यांनी लढलेली युध्दे, त्यांनी मिळवलेली शौर्यपदके, ती का मिळाली याची वर्णने वाचताना तुमच्या अंगावर कदाचित रोमांच उभे राहतील. हे सगळे वाचल्यावर सर्व वाचकांकडून फक्त एकच माफक अपेक्षा आहे ती म्हणजे सैनिकांना त्यांनी योग्य तो मान द्यावा.
आता आपण आपल्या मराठा लाईट इन्फंट्री कडे वळू.
पूर्वी लाईट इंन्फंट्री म्हणजे निवडलेल्या मोजक्या सैनिकांची पलटण जे सैनिक चपळपणे हालचाली करू शकत, किंवा संधीचा फायदा उठवून शत्रूवर अचानक हल्ला करून त्यांना नामोहरम करू शकत. याच सैनिकांच्या पुढे वेगाने आक्रमणे करणार्या पलटणी झाल्या आणि त्यानंतर त्यांच्या वेगाने हालचाली करण्याच्या क्षमतेमुळे त्यांना “लाईट इन्फंट्री” असे बहुमानाने ओळखले जाऊ लागले. ब्रिटीश सैन्याच्या त्या वेळेच्या जनरल्सना मराठ्यांचा काटकपणा व गनिमीकाव्याने लढण्याच्या गुणांचा त्यांच्याबरोबर झालेल्या लढायांमुळे भरपूर अनुभव होताच. ते गुण हेरून त्यांनी आपल्या सैन्यात मराठा रेजिमेंट चालू केली.
एकूण सहा अशा बटॅलियन्सची लाईट इनफंट्रीमधे रुपांतर झाले.
१८४१ मधे तात्कालीन ब्रिटीश राजवटीत अफगाणीस्थानमधे काहून नावाच्या शहराच्या वेढ्यात व बलुचीस्थानमधील दादर नावाच्या शहराच्या संरक्षणात मराठ्यांनी जे शौर्य गाजवले ते भल्याभल्यांना तोंडात बोटे घालायला लावणारे होते. त्यानंतर लगेचच त्यातून मराठा लाईट इन्फंट्रीची निर्मीती करण्यात आली. तीस वर्षानंतर अबेसिनीयामधील लढायांमधे गाजवलेल्या पराक्रमामुळे व त्यांनी केलेल्या वेगवान हालचालीमुळे त्यांनी शत्रूला हैराण केले होते. त्या हालचालींचा बहुमान म्हणून अजून दोन बटॅलियन्सना “लाईट इनफंट्री” चा मान देण्यात आला.
त्यावेळे पासून हिरवी बेरेट, त्यावर लाल हिरव्य़ा पिसांचा तुरा, हिरवी लॅनयार्ड. ( यांची लॅनयार्ड ही तुम्ही बघितलेत तर ती इतरांसारखी खांद्यावर नसते तर ती गळ्याभोवती असते आणि पुढे त्यांचे दोन भाग होऊन ते दोन्ही खिशात जातात.) हा मान फक्त यांनाच आहे. त्यांचा बिल्ला म्हणजे शिकारीच्या वेळेस वाजवण्यात येणार बिगूल हा आहे. जणू तो शत्रूला त्यांची आता शिकार होणार आहे हा इशारा देत असतो. आपल्या नावाला जागत या रेजिमेंटचे जवान मार्चींग मधे मिनीटाला १२० पावले टाकतात.
काटक, लहानसा बांधा, आपण कसे दिसतो या कडे विशेष लक्ष न देणारा यांचा हा जवान युध्दज्वर चढला की सर्वांना भारी पडतो. पहिल्या अफगाण युध्दात त्यांनी त्यांनी उत्तरेच्या शीख, राजपूत पलटणींपेक्षा कैकपटीनी युध्दाची धग सहन केली. याच सैनिकांनी अबेसिनीया, मेसोपोटॅमीया या देशात जनरल एलनबी यांच्या अधिपत्याखाली वाळवंटातून पॅलेस्टईन मधे जी दुरदुरची अंतरे ज्या वेगाने कापली आणि ते करताना होण्यार्या हालआपेष्टांना ज्या तडफेने तोंड दिले ती करामत जगातल्या कुठल्याही सैन्याला या बाबतीत मागे टाकेल अशीच होती. अलिकडच्या काळातसुध्दा इट्लीमधील केरेन व आसाम, बर्मामधील जंगलात त्यांनी निसर्गावर मात करून जपान्यांना पाणी पाजले तेही न विसरता येण्यासारखेच आहे. या सगळ्या युध्दातून त्यांनी शौर्याच्या बाबतीत जगाच्या सगळ्या फौजांना मागे टाकले आहे असे समजायला हरकत नाही.
या रेजिमेंटच्या बर्याच बटॅलियन्स आहेत. त्यातल्या काहींचीच शौर्यगाथा आपण वाचणार आहोत कारण सगळं लिहीले तर त्याचे एक पुस्तकच होईल.
१८६७ मधे १ बटॅलियनने पहिल्यांदाच हिंदूस्तानचा किनारा सोडला आणि त्यांनी अबेसिनीयाच्या थिओडर राजाविरुध्द्च्या कारवाईत भाग घेतला. त्या युध्दात त्यांनी गाजवलेल्या पराक्रमासाठी त्यांना मान म्हणून चांदीचा ड्रम प्रदान करण्यात आला. वीस वर्षाने त्यांना आफ्रिकेत सोमालीआ येथे पाठवण्यात आले. त्या देशात पहिल्या महायुध्दापर्यंत त्यांचा मुक्काम होता.
१९१४ साली त्यांना एका भयंकर युध्दाला सामोरे जावे लागले. ते होते पर्शियन गल्फ मधे “कूट”च्या वेढ्यात. हे एक टिग्रीस नदीच्या किनार्यावरचे शहर आहे. बगदाद्पासून सुमारे १०० मैलावर, अल् कुट नावाच्या प्रांताची ही राजधानी. या नदीच्या वळणामधे वसलेले हे शहर मुख्य जमिनीला एका चिंचोळ्या जमिनीच्या पट्याने जोडले गेले आहे. मेसोपोटॅमियाच्या गालिचाच्या व्यापाराचे हे केंद्र होते. या युध्दात त्यांना या शहराचे रक्षण करायचे होते आणि शत्रूच्या सैन्याने त्यांना वेढले होते.
त्याचे असे झाले –
पहिल्या महायुध्दामधे सप्टेंबर १९१५ मधे जनरल टाऊनशेंडने त्याच्या सैन्यासह बसरा शहरातून उत्तरेकडे कूच केले. या सैन्याचा मुख्य भाग हा मराठा लाईट इनफंट्रीचा होता. तीन दिवसांच्या लढाईनंतर त्यांनी तुर्की सैन्याला शहरातून बाहेर काढले आणि त्यांनी त्या शहराचा ताब घेतला. टिग्रीसच्या काठाने वर जाऊन त्याने मग टेसीफॉन नावाच्या शहरावर हल्ला केला. त्या युध्दात पराभवाची चिन्हे दिसायला लागल्यावर त्याने परत आपली सेना कूट शहरात आणली. ७ डिसेंबर १९१५ रोजी तुर्की सैन्याने जर्मन फिल्ड मार्शल बॅरन गोल्ट्झ याच्या अधिपत्याखाली कूट शहराला वेढा घातला. ब्रिटीश सैन्याचा एक भाग या वेढ्यातून निसटून जाण्यात यशस्वी ठरला पण सैन्याचा बराच भाग आणि जनरल टाऊनशेंड हे त्या वेढ्यातून निसटू शकले नाहीत. या सैन्याला सोडवण्यासाठी बरेच हल्ले करण्यात आले पण त्यात ब्रिटीश सैन्याचीच हानी होत गेली. जवळ जवळ या वेढ्यात २३००० मराठा सैनिक व ब्रिटीश सैनिक मृत्यूमुखी पडले. १०० दिवस जनरल टाऊनशेंड याने त्याच्या सैनिकांबरोबर या वेढ्यात शत्रूच्या मोठ्या सैन्याबरोबर लढून काढले पण अखेरीस त्याने त्याच्या उरलेल्या ८००० सैनिकांसमवेत कुट तुर्कांच्या हवाली केले. १०० दिवस उपासमारीत शत्रूशी लढणे हे फक्त मराठेच करू शकतात.
या शरणागती नंतर मराठा लाईट इनफंट्रीच्या सैनिकांची काय अवस्था झाली होती हे खालील चित्रात आपल्याला दिसून येईल. किती कडवेपणाने त्यांनी ही लढाई लढली असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. कुठून मिळते त्यांना ही शक्ती ?
दुसरी मराठा बटॅलियननी बलूचीस्थानमधे असाच पराक्रम गाजवला आणि त्या बटॅलियनचे रुपांतर लाईट इनफन्ट्री मधे करण्यात आले. जागा होती बलुचीस्तान, आणि शत्रू होता तेथील टोळ्या. मे १८४१ ते ऑगस्ट १८४१ म्हणजे जवळ जवळ ४ महिने त्यांनी “काहून” चे ठाणे संभाळले होते. टोकाची गरमी आणि उपासमारीला तोंड देत त्यानी त्या संख्येने प्रचंड व कृर असलेल्या टोळ्यांना रोखून धरले होते. सामना १४० सैनिक आणि त्या टोळ्यांचा होता. अखेरीस या १४० सैनिकांशी त्यांना तह करायला लागला आणि त्यांना ते ठाणे सोडून जायची परवानगी देण्यात आली, ती या लढाईसाठी “बॅटल ऑनर” घेण्यासाठीच. त्यांच्या या शौर्यासाठी त्यांना त्यांच्या रेजिमेंटच्या झेंड्यावर “काहून” असे लिहीण्यास सांगण्यात आले. तो मान आजवर कुठल्याही बटॅलियनला मिळालेला नाही.
पुण्यामधे कॅंटोनमेंट्मधे काहून नावाचा जो रस्ता आहे तो याच युध्दामूळे. हा रस्ता रेसकोर्सच्या रस्त्यावर जो फिल्ड्मार्शल मानेक शॉ यांचा पुतळा आहे तेथे आहे.
१८६० मधे त्यांची रवानगी चीनमधे करण्यात आली ज्यात पेकींग शहराची शरणागती आणि शांघाईची लढाई ही दोन युध्दे सामील होती.
या बराचश्या युध्दात ज्यांच्या खांद्याला खांदा लाऊन मराठे लढले त्या 2nd Royal Norfoiks and the 2nd Dorsets, या दोन रेजिमेंटसचे ऑफिसर्स मराठा लाईट इनफंट्रीच्या मुख्यालयात जे बेळगावात आहे तेथे आले आणि त्यांनी या रेजिमेंटला एक रेशमी झेंडा भेट म्हणून दिला. त्यावर “NORSETS” असे लिहीलेले आहे आणि तो अजूनही बेळगावमधे ऑफिसर्स मेस मधे बघायला मिळेल.
२९ ऑक्टोबर १९१८ रोजी जो तुर्की सैन्यावर हल्ला केला गेला त्यात तुर्कस्तानची बगदाद वरची सत्ता नष्ट झाली. या वेळी जे शरकात येथे घनघोर युध्द झाले त्यात तुर्की सैन्याने शीख रेजीमेंटचा पराभव केला पण त्या नंतर त्यांची गाठ मराठा लाईट इनफंट्रीशी पडली. मराठा लाईट इनफंट्री आपले पाय घट्ट रोवून उभी होती आणि जे घनघोर युध्द झाले त्यात या सेनेला जी पदके मिळाली तेवढी अजून एकाही रेजिमेंटला एकाच युध्दात मिळालेली नाहीत.
बघा त्याची यादी –
दोन -D.S.Os., चार- M.Cs., सहा- I.O.Ms., सोळा- I.D.S.Ms., आणि आठ- Mentions in Despatches.
या युध्दाच्या स्मरणार्थ दरवर्षी शरकत दिवस पाळला जातो आणि त्या दिवशी एक खास परेडचे आयोजन केले जाते.
या युध्दानंतर अरेबीया मधे जो तेथल्या टोळ्यांनी उठाव केला तेथे त्यांना धाडण्यात आले.
दुसर्या महायुध्दातला त्यांचा पराक्रम आपण पुढच्या भागात पहाणार आहोत.....
जयंत कुलकर्णी.
पुढे चालू.......
प्रतिक्रिया
19 Jul 2010 - 11:24 pm | पुष्करिणी
मस्त, माहितीपूर्ण लेख. आवडला.
पुढील भागांच्या प्रतिक्षेत
पुष्करिणी
19 Jul 2010 - 11:26 pm | प्रभो
लेख आवडला....
19 Jul 2010 - 11:34 pm | मस्त कलंदर
लेख आवडला.. पुढच्या भागाची वाट पाहात आहे...
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
19 Jul 2010 - 11:41 pm | Pain
अतिशय सुंदर लेख! तो फोटो बघवत नाही :(
इतर सैनिकांची मिनीटाला १०० पावले पडतात तर यांची १२० म्हणुन यांना "लाइट" असे गौरवले जाते !
20 Jul 2010 - 12:12 am | स्वप्निल..
मस्त लेख!! नविन माहिती. अजुन वाचायला आवडेल!
20 Jul 2010 - 12:38 am | यशोधरा
मस्त लेख! पुढचे भाग वाचायची उत्सुकता आहे. पहिला फोटो पाहताना अतिशय अभिमान वाटला, पण दुसरा फोटो पाहवला नाही... :( हे जवान पुन्हा आपापल्या घरी पोहोचू शकले असतील?
20 Jul 2010 - 2:13 am | वाचक
वाचायला झकास झालाय लेख जयंतराव.
"युद्ध कुणाचेही असले तरी मरतो गरीब माणूसच" ह्या उक्तीची उगीचच आठवण झाली. इंग्रज सैन्यात मोठ्या संख्येने भारतीय लढले ते गरिबीमुळेच. एकदा का चाकरी स्वीकारली की लढून पराक्रमाची शर्थ करायची हा तर भारतीय बाणा.
20 Jul 2010 - 2:14 am | स्वाती२
लेख आवडला. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
20 Jul 2010 - 4:11 am | पाषाणभेद
मराठा लाईट च्या सैनिकांना सलाम.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
20 Jul 2010 - 8:01 am | सुनील
जातीच्या आधारावर लष्करी तुकड्या पाडण्याची प्रथा ब्रिटिशांनी सुरू केली. स्वतंत्र भारताने ही प्रथा केव्हाच मोडीत काढली आहे. आता मराठा रेजिमेंट्मध्ये शीख आणि शीख रेजीमेंटम्ध्ये राजपूत आढळणे, ही नवलाई राहिलेली नाही. त्यातून, सैन्यातील मराठा टक्का केव्हाच घसरणीला लागलेला आहे. हल्ली मराठा रेजीमेंट म्हणा वा मराठा लाईट इंफंट्री म्हणा, मराठी माणूस (केवळ "मराठा" नव्हे) फारसा दिसत नाही.
म्हणूनच, जातीय्/प्रांतीय अभिनिवेश टाळला तर, लेख उत्तम आहे.
अवांतर - मराठा रेजिमेंटचे मुख्यालय बेळगावात आहे!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
20 Jul 2010 - 8:52 am | अप्पा जोगळेकर
म्हणूनच, जातीय्/प्रांतीय अभिनिवेश टाळला तर, लेख उत्तम आहे.
सुनील ++.
विशिष्ट गुण विशिष्ट जातीतच असतात असे नाही. बाकी लेख झक्कास. नविन भागाच्या प्रतीक्षेत.
28 Jul 2010 - 3:05 pm | अप्पा जोगळेकर
हा यतिन नामजोशीचा प्रतिसाद. त्याचा लॉग्-इन होत नाहीये म्हणून त्याच्या वतीने.
// विशिष्ट गुण विशिष्ट जातीतच असतात असे नाही. बाकी लेख झक्कास. नविन भागाच्या प्रतीक्षेत.//
असे लेखकाला म्हानाय्चेच नाहीये. मराठा लाइट इन्फंट्री बद्दल NIM चे तत्कालीन प्रमुख ले.जन.अहलुवालिया साहेब एकदा बोलल्याचा आठवतय, की जेव्हा ऊँचावरील युद्ध होत, तेव्हा तगड़े गणले जाणारे शिख अणि हरियाणवी जाट यांची पण दमछाक झालेली आपण स्वतः(ले.जन.अहलुवालिया साहेब) पाहिली आहे, तेव्हा एम् एल आई मधले भाऊबंद, सामान वाहून सुद्धा लढाई गाजवत असत.. ते पाहून इतरांना जोर चढात असे.
(तेव्हा मराठा लाइट इन्फंट्री ही महाराष्ट्रातुन आलेल्या सैनिकांची पलटन असे.)
विशिष्ट गुण विशिष्ट जातीतच असतात....हे काही अंशी खरा आहे. उदा. पंजाब्यांची लढाऊ वृत्ति त्यांना लश्कर कड़े आकर्षित करते, तेच दाक्षिनात्य मैनेजमेंट मधे जास्त दिसतात.. तसे ते लष्करात पण आहेतच, आणि पंजाबी पण आईएस, IPS झालेत (इथे निरर्थक वाद सुरु करायचा नसून कही सत्य गोष्टीन कड़े लक्ष वेधायचा होता)
वंशवाद वगरे कही असण्याचा प्रश्नच नाहीये. "मेरा भारत महान" आहे शेवटी....
यतिन नामजोशी.
20 Jul 2010 - 9:07 am | जयंत कुलकर्णी
नमस्कार !
आपल्याला भारतीय फोजेची कितपत माहिती आहे ? आपण फौजेत काही काळ काढला आहे का ?
मराठा रेजिमेंटचे सेंटर बेळगावात आहे कारण तेव्हा बेळगाव महाराष्ट्रत होते. (मुंबई प्रांतात)
जातीच्या आधारावर लष्करी तुकड्या ही कल्पना ब्रिटीशांच्याही अगोदर कितीतरी वर्षांपासून आहे.
\\हल्ली मराठा रेजीमेंट म्हणा वा मराठा लाईट इंफंट्री म्हणा, मराठी माणूस (केवळ "मराठा" नव्हे) फारसा दिसत नाही.\\
चूक आहे. हा प्रश्न फक्त आधिकार्यांच्या बाबतीत आहे.
कुठल्याही सैन्यातल्या दोन जमातींच्या पलटणींमधे शौर्याच्या बाबतीत एक प्रकारची निकोप स्पर्धा असते. त्या स्पर्धेतूनच अनेक कल्पना येणार नाही अशी कामे केली जातात. यातील कल्पना अशी असते - माझ्या मातृभुमीसाठी आमचे रक्त आम्ही सांडले आहे, सांडत आहोत आणि पुढेही सांडत राहू. इतरांपेक्षाही जास्त! आपल्याला हल्लीच्या काळात ही कल्पना समजणे आवघड आहे कारण आपण फक्त प्रांतीय संकुचित विचार करू शकता. उदा.
\\म्हणूनच, जातीय्/प्रांतीय अभिनिवेश टाळला तर, लेख उत्तम आह\\
असा उलटा विचार म्हणजे प्रांतीय वगैरे साधा सैनिक का करत नाही ? कारण त्याला तसेच ट्रेनींग दिलेले असते.
असो.
लेख वाचल्याबद्दल धन्यवाद !
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
20 Jul 2010 - 10:11 am | सुनील
असा उलटा विचार म्हणजे प्रांतीय वगैरे साधा सैनिक का करत नाही ? कारण त्याला तसेच ट्रेनींग दिलेले असते
हेच म्हणतो. तुम्ही "तसा" विचार का करता आहात?
मराठा रेजिमेंटचे सेंटर बेळगावात आहे कारण तेव्हा बेळगाव महाराष्ट्रत होते. (मुंबई प्रांतात)
=))
जातीच्या आधारावर लष्करी तुकड्या ही कल्पना ब्रिटीशांच्याही अगोदर कितीतरी वर्षांपासून आहे.
थोडक्यात, स्वातंत्र्यानंतर ही (जातीविरहीत लष्करी तुकड्या) संकल्पना आली हे तर मान्य ना?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
20 Jul 2010 - 11:52 am | जयंत कुलकर्णी
आपल्याला
\\कुठल्याही सैन्यातल्या दोन जमातींच्या पलटणींमधे शौर्याच्या बाबतीत एक प्रकारची निकोप स्पर्धा असते. त्या स्पर्धेतूनच अनेक कल्पना येणार नाही अशी कामे केली जातात. यातील कल्पना अशी असते - माझ्या मातृभुमीसाठी आमचे रक्त आम्ही सांडले आहे, सांडत आहोत आणि पुढेही सांडत राहू. इतरांपेक्षाही जास्त! \\
हे कळले नाही का ?
\\जातीच्या आधारावर लष्करी तुकड्या ही कल्पना ब्रिटीशांच्याही अगोदर कितीतरी वर्षांपासून आहे.
थोडक्यात, स्वातंत्र्यानंतर ही (जातीविरहीत लष्करी तुकड्या) संकल्पना आली हे तर मान्य ना?\\
मध्यंतरी आपल्या राजकारण्यांनी ही कल्पना मांडली होती पण मला वाटते लष्कराने ती साफ फेटाळली. यावर अधिक चौकशी करून येथे लिहीन. पण हा मुद्दा या लेखाचा नाही.
आत्ताच एका आपल्या सैन्यातल्या जनरलशी याच्यावर बोललो, जो माझा वर्गमित्र आहे, हे असे न करण्यामागची भुमिका ही Regimantal Spirit वरच्या पातळीवर ठेवण्यासाठी हे करण्यात आले होते.
\\मराठा रेजिमेंटचे सेंटर बेळगावात आहे कारण तेव्हा बेळगाव महाराष्ट्रात होते. (मुंबई प्रांतात)\\
माझ्या अल्पबुध्दीला यावर आपण जमिनीवर का लोळताय हे कळले नाही. कृपया प्रकाश टाकावा.
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
20 Jul 2010 - 8:10 am | अर्धवट
एक गणपत लेख वाचतोय स्सर.
पुढच्या लेखाची वाट बघतोय स्सर
20 Jul 2010 - 8:16 am | सहज
छान!
20 Jul 2010 - 8:53 am | अप्पा जोगळेकर
सही. नविन भागाच्या प्रतीक्षेत.
20 Jul 2010 - 9:57 am | Dipankar
+१
20 Jul 2010 - 3:20 pm | llपुण्याचे पेशवेll
उत्तम लेख आहे.. आवडला.
अॅग्रेसिव्ह इलेव्हन म्हणजे काय? पुण्यात औंधजवळ (?) अशी पाटी पाहील्याचे स्मरते आहे.
अवांतरः सैन्यातही मराठी टक्का घसरला आहे काय?
पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.
20 Jul 2010 - 7:21 pm | डॉ.प्रसाद दाढे
उत्तम लेख! अजुन येऊ द्या !!
छत्रपती शिवाजी महाराज की जय !!
20 Jul 2010 - 8:57 pm | आळश्यांचा राजा
कुलकर्णीसाहेब,
आपण सैन्यात अधिकारी होतात/ आहात असे दिसते. आपल्या / आपल्या मित्रांचे काही अनुभव टाकून लेख अजून रंजक करता आला तर पहावे ही विनंती.
आळश्यांचा राजा
28 Jul 2010 - 3:44 pm | मितभाषी
कुलकर्णीसाहेब, स्फुर्तीदायक लेखमाला आहे. चालु राहुद्या.
अवांतार : इथे काही 'इतिहासाचार्य राजवाड्यांचे' वंशज आहेत. त्यांना मराठा समाजाचे गुण गौरव म्हटले कि "मोडशी" झालीच म्हणुन समजा. त्यांच्यासाठी'मोठे व्हा' एवढेच.
__________________________________________
28 Jul 2010 - 4:59 pm | जयंत कुलकर्णी
श्री. भावश्या,
राजवाड्यांनी जेवढे मराठ्यांवर लेखन केले आह व त्यांचे गुणगान गायले आहे तेवेढे मला नाही वाटत कोणी केले असेल.
उदा. राधामाधवविलासचंपू वाचा. सध्या काय आहे, जुने काहितरी काढून त्याला नवीन अर्थ चिकटवायची फॅशनच झाली आहे. तुम्ही कुठले पुस्तक व लेख वाचून हा विचार मांडलाय याची मला कल्पना आहे, पण तो लेख मला वाटते, ओढून ताणून लिहीला आहे. असो त्या वादात शहाण्या माणसाने पडू नये हे खरे.
इतिहासातल्या चुकांपासुन शिकायचे असते नाहीतर History is a dangerous past असेच म्हणावे लागेल.
असो. आपल्याला ही लेखमालिका आवडली हे कळवल्याबद्दल धन्यवाद.
28 Jul 2010 - 5:06 pm | मितभाषी
इतिहासातल्या चुकांपासुन शिकायचे असते नाहीतर History is a dangerous past असेच म्हणावे लागेल.
OK साहेब, पटले मला. धन्यवाद! लेखमाला चालु ठेवा हि विनंती.
भावश्या.
20 Jul 2010 - 11:07 pm | विनायक प्रभू
=D>
21 Jul 2010 - 11:49 am | नगरीनिरंजन
मराठ्यांचे शौर्य वादातीत असेच आहे. आणि या बाबतीत त्यांचा हात धरणारे कोणीही नाही.
आज मरगळीने आणि मराठी माणसाला व्यापार जमत नाही इत्यादी अपप्रचाराने आलेल्या न्यूनगंडाने विस्कळीत झालेल्या मराठी लोकांना आपला उज्ज्वल इतिहास पुन्हा एकदा आठवून प्रेरित होण्याची गरज आहे.
या लेखमालेतून हा इतिहास पुन्हा एकदा उजळून निघो आणि सर्वत्र त्याचा प्रचार होवो ही सदिच्छा!
धन्यवाद!
*****************************
अळवावरचे पाणी
21 Jul 2010 - 11:52 am | नगरीनिरंजन
मराठा = मरके भी नही हटा.
अशी एक कोणीतरी केलेली छान व्याख्या आठवली.
*****************************
अळवावरचे पाणी
28 Jul 2010 - 5:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माहितीपूर्ण लेख आहे.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
-दिलीप बिरुटे
27 Apr 2012 - 4:18 pm | रघुपती.राज
नमस्कार,
वरिल ले़ख वाचला. फारच छान.
पण फोटो दिसत नाहीत. क्रुपया परत टाकाल का?
28 Oct 2016 - 12:29 pm | नया है वह
+११११