फसवणूक-प्रकरण १७: मोहीम फत्ते!

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in जनातलं, मनातलं
9 Jul 2010 - 8:31 am

फसवणूक-प्रकरण १७: मोहीम फत्ते!
© एड्रियन लेव्ही आणि कॅथरीन स्कॉट-क्लार्क (मूळ लेखक)
© सुधीर काळे, जकार्ता (मराठी रूपांतरासाठी मूळ लेखकांच्या वतीने)
मराठी रूपांतर: सुधीर काळे, जकार्ता
(या लेखातील सर्व मते मूळ लेखकद्वयींची आहेत)
(४७६३ मराठी शब्द, ८०३६ आंग्ल शब्द. संक्षिप्तीकरण: ५९%)

जून २००३च्या अखेरीस मुशर्रफ तीन दिवसांच्या लंडन भेटीसाठी बाहेर पडले. सरकारमधील मंत्री त्यांच्या सन्मानार्थ दिलेल्या जेवणांत उपस्थित होते. लॉर्ड चॅन्सलर, लॉर्ड फाल्कनर यांनी त्यांचा सत्कार केला. मुशर्रफ यांची प्रिन्स (राजपुत्र) चार्ल्स यांच्याशीही ओळख करून देण्यात आली. अमेरिकन आणि ब्रिटिश सरकारांनी आपापसात ठरविले होते कीं दौर्‍याच्या पुढच्या टप्प्यावर जाईपर्यंत मुशर्रफ यांच्यावर इंग्लंडमध्ये भरपूर स्तुतिसुमने वर्षायची आणि नंतर जेंव्हां ते बुश-४३ यांना भेटायला 'कँप डेव्हिड'ला जातील तेंव्हां त्यांना अण्वस्त्रविक्रीवरून व अण्वस्त्रविक्रीबद्दलच्या अमेरिकन प्रतिनिधीगृहापासून तसेच ब्रिटिश संसदेपासूनही लपवून ठेवण्यात आलेल्या पण हळू-हळू बाहेर येणार्‍या प्रचंड पुराव्यावरून "A/B प्रकल्पा"त केवळ उत्तर कोरिया व इराणच नव्हे तर लिबिया आणि इतर कांहीं राष्ट्रें आणि कांहीं व्यक्तीही सामील होत्या त्याबद्दल मुशर्रफना चांगले खडसवायचे असा बेत ठरला होता. लंडनमधील उच्चभ्रू मंडळींना कनिष्ठ प्रतीच्या लोकांचे वरवरचे कौतुक मुद्दाम करायला आवडते. असे केलेले कौतुक स्वीकारत मुशर्रफ 'जिवाचे लंडन' करून घेत होते. मुशर्रफनी आनंदी मनस्थितीत थाटामाटाच्या सर्व सत्कारांना प्रतिसाद दिला. प्रत्येक दिवसागणिक त्यांचे लंडनमधील वक्तव्य एकाद्या प्रबुद्ध हुकुमशहासारखे वाटू लागले होते. लँकेस्टर हाऊसमध्ये निमंत्रित श्रोत्यांपुढे बोलताना ते म्हणाले, "आम्ही एक आधुनिक, सहिष्णु आणि प्रगतीशील मुस्लिम राष्ट्र उभे करत आहोत." त्यांचे प्रत्येक वाक्य, प्रत्येक हालचाल ब्रिटिश मुरब्बी सनदी नोकरांकडून निरिक्षिली जात होती. मुशर्रफ एक घरच्या सुन्नी जमावड्याला भडकवणारे, सरकारी आशिर्वादाने एकाद्या संप्रदायाविरुद्ध जमावाकडून दंगे घडवून आणणारे, शिया मुसलमानाच्या कत्तली करविणारे, काश्मीरमध्ये हिंसाचार घडविणारे, तालीबान आणि अल कायदाचे जन्मदाते असे गृहस्थ आहेत. पण २० जूनला वॉशिंग्टनला गेल्यावर 'व्हाईट हाऊस'कडून डाउनिंग स्ट्रीटला निरोप आला कीं अण्वस्त्रविक्रीवरून खरडपट्टी करण्याचा मुद्दा कार्यक्रमपत्रिकेवरून काढून टाकण्यात आला होता!

मुशर्रफ वॉशिंग्टनला आले तेंव्हां त्यांच्याकडे भरपूर वेळ होता. ते बोस्टनला एक उच्च तांत्रिकी कंपनी चालविणार्‍या आपल्या 'बिलाल' नावाच्या मुलाला भेटले आणि जेंव्हां बुश-४३ यांनी त्यांचे २४ जूनला 'कँप डेव्हिड'च्या हिरवळीवर चार दिवसांनी स्वागत केले तेंव्हां त्यांनी त्यांची तोंड भरून प्रशंसा केली, "मुशर्रफ हे एक धीट नेते आहेत आणि अमेरिकेचे मित्र आहेत. अमेरिका आणि पाकिस्तान आज जागतिक दहशतवादाने ग्रस्त देश असून हे दोन्ही देश या जागतिक दहशतवादाला नेस्तनाबूत करण्यासाठी कंकणबद्ध आहेत". त्याकाळात बुश-४३ जरा जोरात होते कारण नुकतीच त्यांनी इराकमधील युद्ध संपल्याची "मोहीम फत्ते जाहली" अशी घोषणा सान डिएगो या बंदराबाहेर-इराणच्या आखातात नाहीं-उभ्या असलेल्या "अब्राहम लिंकन" या विमानवाहू जहाजावरून मोठ्या तोर्‍यात केली होती. आता बुश-४३ यांनी इंग्लंडची अण्वस्त्रप्रसाराविरुद्धची मोहीम दोन्ही देशांनी (अमेरिका व इंग्लंड) मिळून करायची विनंती कचर्‍याच्या टोपलीत टाकली. त्यांनी जाहीर केले कीं ९/११ नंतर पाकिस्तानने अलकायदाच्या व तालीबानच्या ५००हून जास्त दहशतवाद्यांना पकडले होते. त्या सेवेसाठी अमेरिकेने पाकिस्तानचे १०० कोटी कर्ज माफ केले व ३०० कोटींचा नवा लष्करी व आर्थिक मदतीचा प्रस्ताव पुढे केला. पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मितीसंबंधीचा उल्लेख आला तो एका पाकिस्तानी पत्रकाराने विचारलेल्या अण्वस्त्रांबद्दलच्या प्रश्नामुळे. त्याला मुशर्रफनी उत्तर दिले कीं पाकिस्तान केवळ प्रतिबंध म्हणूनच अण्वस्त्रनिर्मिती करतो. पाकिस्तानला कुठल्याही शस्त्रास्त्रस्पर्धेत उतरायचे नाहीं तर फक्त प्रतिबंधात्मक पवित्र्यात उपयोग करायचा आहे.

ब्रिटिश हेरखात्याने मात्र अण्वस्त्रप्रसारविरोधाचा मुद्दा सोडला नव्हता. लिबियन्सचे मन वळविण्याचे प्रयत्न त्यांच्या एका गटाकडून सुरूच होते. त्यात त्यांना क्वाला लुंपूरहून एक महत्वाचा इशारा मिळाला. ताहीर यांच्या कारखान्यात तयार झालेले अल्युमिनियमचे घटकभाग दुबईच्या खुल्या-बाजाराच्या विभागात पोचले होते व तिथून ते त्रिपोलीला निघालेल्या "BBC China" या जर्मन जहाजावर चढविले गेले होते. हे घटकभाग पी-१ किंवा पी-२ या टाईपच्या सेंट्रीफ्यूजेसमध्ये फिरणारे 'रोटर्स' होते व पाकिस्तानमध्ये बनणार्‍या 'रोटर्स'ची प्रतिकृतीच होते. रंगे हाथ पकडले अस्ते तर त्या पुराव्यांचा गद्दाफी यांच्याबरोबरच्या वाटाघाटीत खूपच फायदा होणार होता.

पण ही एक वेळेबरोबरची शर्यतच होती कारण ही माहिती MI6 ला खूप उशीरा कळली होती. दुबईतील कस्ट्म्सच्या अधिकार्‍यांच्या लक्षात आले कीं "बीबीसी चायना" आधीच समुद्रात परत गेले होते व सुवेझच्या कालव्यातून जात होते. लिबियन सरकारला संशय न येता जहाजाला थांबविणे त्यावर चढणे व त्याची झडती घेणे जरूरीचे होते. त्यासाठी एक मित्रत्वाचे नाते असलेले बंदर हवे होते. जर्मन मालकीचे हे जहाज इटालीच्या तारांतो नावाच्या दक्षिण इटलीच्या गजबजलेल्या बंदराजवळून जाणार होते म्हणून इटालीची मदत मागण्यात आली. जर्मनीहून जहाजाच्या कॅप्टनला निरोप गेला व त्यानुसार तारांतो बंदरात तीन आठवड्यानी जहाज घेऊन यायचे ठरले.

इतके पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रसाराबद्दलचे पुरावे सुवेझच्या कालव्यातून लिबियाकडे जात असल्याने व नंतर इटलीच्या एका खुल्या बंदरात येत असल्याने बुश-४३ यांना मुशर्रफ यांच्याबरोबर अण्वस्त्रप्रसाराबद्दल समोरासमोर चर्चा करण्याची इंग्लंडची विनंती मान्य करण्याखेरीज गत्यंतरच नव्हते. मुशर्रफ न्यूयॉर्कला संयुक्त राष्ट्र संघाच्या शिखरपरिषदेसाठी येणार होते. त्यावेळी बुश-४३ त्यांना बाजूला घेऊन वाल्डॉर्फ-अ‍ॅस्टोरिया या हॉटेलमध्ये याबद्दल विचारतील असे त्यांच्यातर्फे सांगण्यात आले. सार्‍या मीडियाला त्यांच्यात दहशतवादाविरुद्धचे युद्ध, इराक, काश्मीर व भारताबरोबरचा (सु)संवाद या विषयांवर चर्चा झाली असे सांगण्यात यायचे होते.

मुशर्रफबरोबरच्या २३ सप्टेंबरच्या बैठकीत बुश-४३नी सांगितले कीं अण्वस्त्रप्रसार थांबलाच पाहिजे. पाकिस्तानच्या दृष्टीनेही ही बाब फारच गंभीर आहे आणि महत्वाची आहे. टेनेटही मुशर्रफना त्यांच्या हॉटेलमधील खोलीत दुसर्‍या दिवशी भेटले व त्यांनी मुशर्रफना पुराव्याच्या रूपात कागदांची एक चळतच दिली. मुशर्रफ यांच्या अधिकार्‍यांनी आढ्यतेने सांगितले कीं तो क्षण मुशर्रफ यांच्या आयुष्यातला सगळ्यात जास्त अडचणीत टाकणारा क्षण होता. त्यांना आश्चर्य वाटले ते अण्वस्त्रप्रसाराचे नाही पण अमेरिका त्यांना असा जाब विचारेल असे त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते. त्यांनी लगेच आपला मोहरा बदलला व जणू त्या गांवचेच अनाहीं अशी कल्पना करून दिली व अमेरिकेला कितपत माहीती आहे व आता कुणाचा बकरा बनवायचा या विचारात ते पडले.

टेनेट यांनी टेबलावर पाकिस्तानच्या P-l सेंट्रीफ्यूजची सगळी ड्रॉइंग्ज ठेवली-अगदी घटकभाग-क्रमांक (part numbers), तारखा व सह्यांसह! मुशर्रफ नंतर म्हणाले कीं त्यांनी ताबडतोब ती पूर्वी खानसाहेबांच्या काळात वापरात असलेली पण सध्या उपयोगात नसलेल्या (कालबाह्य) सेंट्रीफ्यूजेसची ड्रॉइंग्ज ओळखली. खानसाहेबांच्या जगभरच्या प्रवासांचेही तपशीलही त्यात होते, बँकेची स्टेटमेंट्स, KRL ने कुठल्या देशांना कधी व काय (साधने/यंत्रसामुग्री/तंत्रज्ञान) देऊ केले होते त्यांचा तपशील वगैरे सारे त्यांच्या समोर मांडलेले होते. मुशर्रफनी त्यांना कांहींच माहीत नसल्याचे ढोंग केले. वर मखलाशी अशी कीं त्यांच्यासमोर पाकिस्तानचे हितच फक्त दिसत होते व पाकिस्तानला कसे वाचवायचे याचाच विचार डोक्यात होता. तसेच देशाला अडचणीत आणल्याबद्दल खानसाहेबांची चीड आली होती व संतापही[१]!

मुशर्रफ खोटे बोलत आहेत हे अमेरिकन्सना माहीत होते, पण याबाबत दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यापेक्षा पाकिस्तानच्या कचाट्यात सापडलेल्या पण सध्या उपयुक्त असलेल्या मुशर्रफना वाचवणे हे अमेरिकेला जास्त महत्वाचे होते. मुशर्रफनी नंतर जाहीर केले कीं त्यांना दाखविलेल्या पुराव्यात जरी खानसाहेबांचे नांव नसले तरी हे फेरीवाल्याप्रमाणे अणूबाँब देशोदेशी विकून अण्वस्त्रप्रसार करण्याचे कुकर्म त्यांनीच केले होते. हा सर्व प्रकार एका दृष्टीने इतिहासाच्या पुरर्लेखनातलाच प्रकार होता व मुशर्रफनी पाकिस्तान करत असलेल्या अण्वस्त्रप्रसाराला "लष्कराचे कृत्य" असे म्हणण्याऐवजी एका तत्वशून्य शास्त्रज्ञांच्या छोट्या गटाने केलेले गैरकृत्य असे जगाला सांगितले.

४ ऑक्टोबरला BBC China ने तारांतो बंदरात नांगर टाकला. तिथे MI6 and CIA ची शोधपथके तयारच होती. जहाजावर असलेल्या २०० चाळीस-फुटी कंटेनर्सपैकी पाच कंटेनर्समध्ये असलेला माल ओळखायला व कोपरान् कोपरा ढुंढाळायला त्यांना फक्त दोन तासांचाच अवधी होता. मलेशियातील त्यांच्या हस्तकाने दिलेल्या माहितीनुसार कंटेनर्सचे नंबर वापरून त्यांनी ते कंटेनर्स ओळखले आणि आतमध्ये त्यांना "SCOPE" हे ताहीर यांच्या मलेशियातल्या कंपनीचा लोगो असलेले शेकडो खोके दिसले. खोके उघडल्यावर त्यांना त्यात सेंट्रीफ्यूजेस उभी करण्यासाठी लागणारी साधनसामुग्री सापडली. ती जप्त करून ते जहाज पाकिस्तानला संशय येऊ नये म्हणून त्रिपोलीकडे रवाना करण्यात आले.

पण ही माहिती खानसाहेबांना लगेच कळली कारण MI6 बरोबर संपर्क न साधता ब्रिटिश परराष्ट्रमंत्रालयाने लिबियाशी संपर्क साधून "आपल्या वाटाघाटी चालू असतांना अण्वस्त्रनिर्मितीत लागणारे १००० सेंट्रीफ्यूजेसना पुरणारे साहित्य त्यांनी पाकिस्तानातून कां मागविले" असे कुसामुसांना विचारले! झाले! लगेच चक्रे फिरू लागली. मुसाकुसांनी ताहीरला व ताहीरने इस्लामाबादला फोन लावले. पण अख्खे आयुष्य अशा अडचणींना तोंड देण्यात गेलेल्या लिबियाचा गुप्तहेरप्रमुख शांत राहिला. त्यांनी सांगितले कीं लिबियाच्या चांगल्या नियतीचा पुरावा म्हणून तो माल अमेरिकन व ब्रिटिश हेरखात्याला सुपूर्द करण्यासाठीच तो माल लिबियाने मागविला होता. मुसाकुसांनी लिबियातील अत्यंत गोपनीय अशा जागांवर पाश्चात्यांना नेण्याबाबत जरूर ती व्यवस्था करण्याचे मान्य केले.

दोन दिवसांनंतर आर्मिटेज व दक्षिण आशियाविभागाच्या उपपरराष्ट्रमंत्री ख्रिस्तीना रोका "मुशर्रफ बचाव" योजनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी "आर्मी हाऊस" येथे योजलेल्या बैठकीसाठी इस्लामाबादला आले. आर्मिटेजनी लिबियामधील चाललेल्या कारवायांचा व घटनांचा तपशील आर्मिटेज देऊ शकत नव्हते पण "अण्वस्त्रप्रसार थांबलाच पाहिजे" हा निरोप द्यायला ते आले होते. मुशर्रफना जास्त नारज न करता पाकिस्तानच्या "A/B प्रकल्पा"चा गाशा गुंडाळण्याचे 'नाजुक' काम करायला ते आले होते. आणि अनेक बाजूंनी विचार केल्यावर जर मुशर्रफना वाचवायचे असेल तर पाकिस्तानच्या एका 'राष्ट्रीय वीरा'ला बळी देण्याशिवाय गत्यंतरच नव्हते या निर्णयाप्रत आर्मिटेज येऊन पोचले! मुशर्रफ यांची नाजुक स्थिती त्यांना आणि त्यांच्या निकटवर्तीय सहाय्यकांना नीट कळली आहे याची खात्री करण्यासाठी मुशर्रफ यांच्याशी त्यांचे बोलणे चालले असताना समांतरपणे अमेरिकेचे सेंट्रल कमांडचे प्रमुख ज.अबीझैद यांनी तालीबानबद्दल सहानुभूती बाळगणारे दोन नंबरचे हुकुमशहा ज.मोहम्मद युसुफ यांच्याशीही तेच बोलणे केले.

आर्मिटेज व रोका यांनी मुशर्रफ यांना आणखी जास्त तपशीलवार पुरावे सादर केले. ते दोघे गेल्यावर मुशर्रफनी आपल्या सर्वात जास्त जवळच्या मित्रांना बोलावले. त्यात मुशर्रफ सत्तेवर आल्यानंतर प्रकाशित होऊ लागलेल्या व आर्थिक, व्यावसायिक व पाश्चात्य धर्तीवरील उमद्या नव्या अशा "Blue Chip" या धंदा-व्यवसायाबद्दलच्या उच्चभ्रू नियतकालिकाचे संपादक हुमायून गौहरही[२] होते. त्यांची त्यांच्या वडीलांप्रमाणे पाकिस्तानचे अमेरिकेतील राजदूत म्हणून नेमणूक होणार असे बोलले जात होते.

केवळ "ऑफिसर्स मेस"मध्ये काय चालते याची माहिती असणार्‍या मुशर्रफना लंडन-वॉशिंग्टनमध्ये काय सांगितलेले विश्वासार्ह वाटेल हे सांगणार्‍या गौहर यांच्यासारख्या वेगवेगळ्या खंडांत राहिलेल्या एका तज्ञाची गरज होती. गौहर यांच्या मते खानसाहेबांचा मामला फारच चांगल्या पद्धतीने हाताळला गेला होता. ९/११नंतर सूडाच्या भावनेने पेटलेल्या अमेरिकेला अनुमोदन देणे जरूरच होते नाहीं तर अमेरिकेने पाकिस्तानच्या पेकाटात लाथ घातली असती! पाकिस्तान करत असलेल्या अण्वस्त्रप्रसाराची अमेरिकेला आधीपासूनच माहिती होती. त्यामुळे मुशर्रफना खानसाहेबांना खाली खेचण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता!

मुशर्रफ़नी गौहरना विचारविनिमयासाठी २००३ च्या शेवटी बोलावले होते. ती बैठक मुशर्रफ यांच्या पाश्चात्य राष्ट्रांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी बोलाविली होती व आधीच सेवानिवृत्त झालेल्या पण पाकिस्तानच्या सर्वात थोर अशा पाकिस्तान्याच्या, खानसाहेबांच्या, माथ्यावर अण्वस्त्रप्रसाराचा संपूर्ण दोष मारून त्यांना 'बळीचा बकरा' बनविण्याचा घाट घालण्यासाठी (व ते जनतेने स्वीकारावे) म्हणून होती. गौहरना सगळे पुरावे दाखविण्यात आले. त्यात 'नो-डाँग' प्रक्षेपणास्त्रांच्या व्यवहारांत लष्कराच्या सहभागाचा पुरावा असला तरी 'A/B प्रकल्पा'त लष्कराचा सहभाग असल्याचा कांहीही पुरावा नव्हता, पण पाकिस्तानला सगळी प्रक्षेपणास्त्रें चीनकडून मिळाली होती व त्यामुळे 'नो-डाँग' प्रक्षेपणास्त्रांची पाकिस्तानला गरजच नव्हती असे दाखविता येण्यासारखे होते व अण्वस्त्रप्रसाराचा सारा बनाव खानसाहेबांच्या गटाने केला असे दाखविता येण्यासारखे होते. हे सारे पाहिल्यावर गौहर यांची खात्री पटली. पण इतर लोकांना ही माहिती दिल्यावर एका खरोखर अद्वितीय पाकिस्तान्यावर असे आरोप लादले जात आहेत हे कळल्यावर ते पूर्णपणे भयभीत झाले. त्यातल्या बर्‍याच जणांना खानसाहेबांना सक्तीने सेवानिवृत्त केल्याचेही आवडले नव्हते. खानसाहेबांची लायकी १०० मुशर्रफांच्यापेक्षा जास्त आहे असेही एकजण पुटपुटला.

पण गौहर यांचा वज्रनिश्चय झाला होता. मुशर्रफ यांचे म्हणणे पटण्यासारखे होते. शिवाय इतरत्रही वेगाने घडामोडी घडत होत्या. १६ ऑक्टोबर २००३ ला IAEA चे प्रमुख एलबारादेई यांना इराणच्या अण्वस्त्रप्रकल्पाबद्दल तातडीने चर्चा करण्यासाठी इराणला येण्याचे निमंत्रण आले होते. आधी इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख डॉ. रोहानींनी IAEA ला पूर्वीच्या व आताच्या सर्व परमाणूविषयक घडामोडींबद्दल सर्व गोष्टी उघड करण्याचे मान्य केले होते. आगाजादे या इराणच्या उपराष्ट्राध्यक्षांनीही व्हिएन्नाला जाऊन एक निवेदन जारी केले होते.

IAEAच्या पडद्यामागील हालचालींमुळे म्हणा किंवा आंतरराष्ट्रीय दबावामुळे म्हणा पण १९७९ नंतर प्रथमच इराणने अधिकृतरीत्या त्यांनी १९८५ साली अण्वस्त्रनिर्मितीसाठी युरेनियमच्या अतिशुद्धीकरणाचा कार्यक्रम राबवायला सुरुवात केली होती व दोन वर्षांनंतर त्यांना एका परदेशी राष्ट्राकडून (ज्याचे नांव सांगण्यास इराणच्या अधिकार्‍यांनी नकार दिला होता) सर्व ड्रॉइंग्ज मिळाली होती. या कार्यक्रमाचे तीन टप्पे होते: १९८५ ते १९९७ दरम्यान सारे काम तेहेरान परमाणू अनुसंधान समितीमधील प्लाझमा फिजिक्स लॅबोरॅटरीमध्ये केले जायचे होते, १९९७ ते २००१ दरम्यान या प्रकल्पाचे काम तेहरान येथील कालाये इलेक्ट्रिक कंपनीत करायचे होते व त्यानंतरचे काम इराण्च्या मध्यभागी असलेल्या वाळवंटातील नातांझ येथील सुविधेमध्ये. इराणने पेट्या भरभरून त्यांना मिळालेली कागदपत्रेंही दिली. त्यांचा अनुवाद करणे, वाचून काढणे, नीट फायलीला लावणे व त्यांचा अभ्यास करणे हे आवश्यक होते. पण एलबारादेई सांगितले कीं कागदपत्रें चाळत असतांना त्यांच्या अभ्यासकांना ज्यांनी या प्रकल्पात मदत केली होती, महत्वाची ड्रॉइंग्ज पुरवली होती, P-l सेंट्रीफ्यूजेसची संरचना पुरविली होती अशा पाच 'मध्यस्थां'चा उल्लेख आढळला. ड्रॉइंग्ज जरी उघडपणे खानसाहेबांनी १९७५ साली हॉलंडमधून चोरलेल्या संरचनेवर आधारित असली तरी त्यात सर्व माहिती, सूचना डच किंवा जर्मन भाषेत नव्हत्या तर इंग्लिश भाषेत होत्या. यावरून ती ड्रॉइंग्ज मूळ ड्रॉइंग्जवरून बदलली होती हे दिसत होते. इराणी लोकांनुसार त्या पाचांपैकी तीन जर्मनांनी आलन येथील लायफेल्ड कंपनीने बनविलेल्या 'फ्लो-फॉर्मिंग लेथ'सारख्या महत्वाच्या सामुग्रीच्या पुरवठ्यात भाग घेतला होता. या लेथमुळे फक्त अ‍ॅल्युमिनियमचे पाईप मागविले तरी पुरे असायचे, इतर ठिकाणीही लागणार्‍या घटकभागांच्या नावावर तयार घटकभाग मागवावे लागत नव्हते.

इराण्यांनी या पाच मध्यस्थांचे नाव सांगायला मात्र नकार दिला. पण खूप प्रयत्न केल्यावर १९८७ सालचे एक हस्तलिखित पान त्यांनी दाखविले. त्यात पाकिस्तान व एका परदेशी सरकारातील व्यवहाराचा तपशील होता व 'काय विकत मिळेल' याची यादी असलेला खानसाहेबांचा 'मेन्यू' होता. त्यातून ब्रि.ज.एस्लामी यांनी दुबईमधील हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत अतोनात चिक्कूपणा करून निवडक वस्तूच उचलल्या होत्या. इराणी लोकांच्या मते त्यांनी P-l सेंट्रीफ्यूजेसची ड्रॉइंग्ज व त्याला लागणारे घटकभागच घेतले होते व ते पूर्ण अतिशुद्धीकरण करणारी सेंट्रीफ्यूजेस स्वत:च बनविणार होते. त्यावर खानसाहेब संतापले होते व कारण इराणी लोक अशा पद्धतीने सेंट्रीफ्यूजेस बनवू शकणार नाहींत आणि म्हणून थोडे जास्त पैसे खर्चून त्यांनी तयार सेंट्रीफ्यूजेस घ्यावीत असे त्यांचे मत होते. झालेही तसेच. १९९४ साली पाकिस्तानकडून ५०० तयार P-l सेंट्रीफ्यूजेस विकत घेण्याचा दुसरा करार झाला. पण हाही सौदा यशस्वी झाला नाहीं. १९९७ साली जेंव्हा त्यांनी सर्व साधनसामुग्री कालायेला हलविली तेंव्हां त्यांनी सेंट्रीफ्यूजेसचा नाद जवळ-जवळ सोडून दिला होता. AEOI[३] ला फक्त १० ते २० सेंट्रीफ्यूजेसची मालिका चालविण्यातच यश आले होते कारण घटकभागांच्या उत्पादनाचे कसब अपुरे असल्याने सेंट्रीफ्यूजेसची मोडतोड होत असे. असे झाल्याने इराणी लोक अजून अधिक अद्ययावत् साधनसामुग्रीसाठी पुन्हा पाकिस्तानकडे आले, आपल्या मशीनांची चांचणी करण्यासाठी पाकिस्तानकडून त्यांनी UF6 वायूही विकत घेतला. यामुळेच त्यांना IAEA च्या अन्वेषकांना आपल्या यंत्रशाळा दाखवायच्य नव्हत्या. स्वतःची सेंट्रीफ्यूजेस चालू करण्याच्याआधी एक पुढचे पाऊल टाकता यावे म्हणून पाकिस्तानने त्यांना कांहीं ड्रम अतिशुद्धीकृत युरेनियमही दिले होते.

इराण्यांनी IAEA ला सांगितल्यानुसार २००१ साली दहशतवादाविरुद्धच्या युद्धामुळे परदेशातून येणारी सामुग्री मिळण्यात अडचणी निर्माण झाल्यामुळे इराण पुन्हा स्वतःची सेंट्रीफ्यूजेस स्वतःच्या यंत्रशाळांत बनविण्याच्या निर्णयाकडे परतला होता. त्याचबरोबर त्यांनी १००० सेंट्रीफ्यूजेस मावतील असा एक नवा प्रयोगवजा प्रकल्प उभा करायला सुरुवात केली. त्याची प्रगती इतकी झपाट्याने झाली होती कीं २००२मध्ये त्यांनी नातांझ येथे जमीनीखालचा उत्पादनाच्या स्तरावरचा ५०,००० सेंट्रीफ्यूजेस मावतील असा प्रकल्प उभा करायला सुरुवात केली. उत्पादनाला लागणारी बहुतेक सगळी यंत्रसामुग्री मिळविलेली असल्यामुळे या सेंट्रीफ्यूजेसची मालिका उभी करण्याचे कामही सुरू केले गेले.

इराणचा कबूलीजबाब[४] ही उत्तेजनपूर्वक सुरुवात होती. एलबारादेईसुद्धा उत्साहात होते व कांहीं आठवड्यांतच या आंतरराष्ट्रीय ज्वलंत प्रश्नाची तोड काढण्याच्या उमेदीत होते. विशेषतः जिथे अमेरिकेचे बोल्टन अयशस्वी झाले होते तेथे त्यांना यश मिळत असल्याने ते जास्तच खुषीत होते.

एक आठवड्यानंतर IAEAचे अन्वेषक नातांझला परतले. इथे कमी स्तरावर शुद्धीकरण केले जात होते. पण IAEAला वाटत होते कीं इराण्यांचा आणखी एक प्रकल्प कुठेतरी उभारला जात असावा कारण पाकिस्तानने P-2 दर्जाची सेंट्रीफ्यूजेस इराणला विकली होती याची IAEAला खात्री होती पण इराणने याची अद्याप कबूली दिली नव्हती. अमेरिकेने IAEAच्या डोक्यात एक विचार पेरला होता कीं इराण जे IAEAला दाखवत होता तो त्यांच्या एकूण प्रकल्पाचा अगदी छोटा हिस्सा होता ज्यामुळे त्यांच्या खर्‍याखुर्‍या दुसर्‍या अतिगुप्त P-2 दर्जाची सेंट्रीफ्यूजेस असलेल्या प्रकल्पाकडे IAEAचे लक्ष जाणार नाहीं.

१९ ऑक्टोबर रोजी एका बाजूला IAEAची इराणबरोबर बोलणी चालू झाली त्याच वेळी एक CIA आणि M16चा चमू लिबियाला त्यांच्या लिबियाचा अण्वस्त्र प्रकल्प चालविणार्‍या शस्त्रास्त्रांबरोबरच्या पहिल्या 'अतिशय गुप्त' बैठकीसाठी रवाना झाला. वॉशिंग्टनमध्ये फक्त राष्ट्राध्यक्ष, पॉवेल, आर्मिटेज व उपपरराष्ट्रमंत्री विल्यम बर्न्स एवढ्याच लोकांना या बैठकीची माहिती होती. बोल्टन व एलबारादेई यांनाही सांगण्यात आले नव्हते.

CIA/M16च्या चमूत एक परमाणू तज्ञ, एक प्रक्षेपणास्त्रातील तज्ञ आणि एक रासायनिक/जैविक अन्वेषक असे लोक होते. मुसाकुसांनी तात्काळ त्यांची ओळख त्यांच्या चमूशी करून दिली. त्यातले सभासदही लिबियाच्या प्रलयंकारी प्रकल्पाच्या प्रत्येक अंगाचे प्रमुख होते. मुसाकुसांनी पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. पण ब्रिटिश परमाणू तज्ञाची सुरुवात चांगली झाली नाहीं कारण लिबियाच्या परमाणूप्रकल्पाचा प्रमुख "Triple M" या उपनावाने ओळखला जाणारा मातुग मोहम्मद मातुगने ब्रिटिश परमाणू तज्ञाची भेट घेण्यास नकार देऊन अनुभव व अधिकार दोन्ही नसलेल्या आपल्या एका कनिष्ठ शास्त्रज्ञाला त्या कामासाठी पाठविले.

प्राप्त गुप्तहेर अहवालानुसार लिबियाच्या एक डझनभर गुप्त संशोधनक्षेत्रे होती. पण त्या कनिष्ठ शास्त्रज्ञाने सांगितले कीं त्यांचे रशियाने बांधून दिलेली १० मेगावॉट क्षमतेची अणुभट्टी असलेले ताजूरा परमाणू संशोधन केंद्र हे फक्त एकच केंद्र आहे. अतिशुद्धीकृत युरेनियमवर चालणार्‍या या केंद्राचे अन्वेषण IAEAच्या अन्वेषकांकडून नेहमीच होत असे व ती अणुभट्टीही जेमतेम चालत असे. ही सुरुवात अशुभ होती आणि त्या कनिष्ठ शास्त्रज्ञाने लिबिया यलोकेक, युरेनियम परिवर्तनाचा प्रकल्प किंवा सेंट्रीफ्यूजेस असल्याचा वारंवार इन्कार केला होता. त्याने तर असे सोंग आणले होते कीं त्याला BBC Chinaवर घातलेल्या धाडीचीही कल्पना नव्हती. सगळीकडे अडथळे असलेले हे अन्वेषण कूर्मगतीने चालले होते पण शेवटी सत्य अचानक बाहेर पडले. अधिकार्‍यांनी मान्य केले कीं जर्मन मध्यस्थांनी १९८०च्या दशकात लिबियाला सेंट्रीफ्यूज-आधारित युरेनियम अतिशुद्धीकरणातील संशोधनकार्यात मदत केली होती. हे संशोधन जर्मन तज्ञाने आणलेल्या सेंट्रीफ्यूजच्या संरचनेवर ताजूरा येथेच करण्यात आले होते. एका निनावी कंपनीकडून UF6 वायूचा प्रकल्पही मिळविला होता. हे सर्व IAEA अन्वेषकांपासून किंवा लष्करी हल्ल्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी सहज हलविता येतील अशा घटकात बनविले होते व कधीही सुटे करून दुसर्‍या ठिकाणी सुरू करण्यासारखे होते. या सर्व प्रकल्पावर पाकिस्तानचा शिक्का दिसत होता, पण तसे कुणी कबूल करेना व जर्मन मध्यस्थाचे नावही बाहेर येईना. एवढेच नक्की कळले कीं १९९२मध्ये हा करार संपुष्टात आला तोवर एकही सेंट्रीफ्यूज लिबियन लोकांना चालविता आलेले नव्हते व परमाणू द्रव्य वापरून एकही प्रयोग केला नव्हता.

२९ ऑक्टोबरला इंग्लंड-अमेरिकेचा चमू परत गेला. गद्दाफींनी कुठलासा युरेनियम अतिशुद्धीकरणाचा प्रकल्प परदेशी सहभागाने कार्यान्वित केल्याचा ठोस पुरावा असला तरी या चमूतील तज्ञांनी लिबियाने कुठल्याही नरसंहारक्षम शस्त्रास्त्रांबाबत कांहीं प्रगती केल्याचे पाहिले नव्हते. लिबियातील ठिकठिकाणच्या गुदामांत पाहिलेले सुटे घटकभाग नक्कीच आफ्रिकेबाहेरील देशांतून आले होते. त्यांच्या पेट्यांवर छापांवरून ते दुबईला एका जहाजातून आले होते व तिथून दुसर्‍या जहाजावर चढविण्यात आले होते. त्यावरून हा माल तेंव्हां मलेशियाला रहाणार्‍या व खानसाहेबांना माल पुरविणार्‍या ताहीर यांच्या कक्षेत आला होता. या चमूने मग लिबियाच्या हालचालींचा उलटा मागोवा घ्यायचे ठरविले व स्टीफन काप व त्यांचे MI6मध्ये तशाच स्थानावर असलेले अधिकारी मलेशियाला गेले. त्यांच्या तपासाच्या केंद्रस्थानी होते अण्वस्त्रतंत्रज्ञानाचा प्रसार करण्याबाबत संशय असलेले आंतरराष्ट्रीय जाळे!

काप व त्यांच्या सहकार्‍यांनी मलेशियाचे इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस महंमद बाक्री ओमार यांना खान, लिबिया आणि ताहीर यांच्याबद्दल त्यांनाहोती तेवढी माहिती दिली. पण एक अडचण होती कारण ताहीरच्या कंपनीत मलेशियाचे पंतप्रधान अब्दुल्ला बडावी यांचे सुपुत्र कमाल अब्दुल्ला हे भागीदार होते. पंतप्रधानांना सांगितल्यानंतर दोन दिवसांच्या अवधीनंतर या चमूला त्या कारखान्याला जायची अनुमती मिळाली, पण तोवर तिथली सर्व अद्ययावत मशीनरी काढून नेण्यात आली होती. ताहीर क्वाला लुंपूरला त्यांच्या सासुरवाडी होते. त्यांनी ते एका आंतरराष्ट्रीय नरसंहारक्षम शस्त्रास्त्रांच्या निर्मितीच्या कटात सहहागी असल्याच्या आरोपांबद्दल आश्चर्य वाटल्याचे नाटक करून आपण होऊन या चौकशीत मदत करायची इच्छा दर्शविली.
अगदी निष्पाप दिसणार्‍या ताहीरनी नाटक चांगले वठविले. पण जरा खोलवर खणल्यावर त्याची कहाणीतील गुंतागुंत दिसून येऊ लागली. शेवटी त्यांनी लिबियाबरोबर व्यवहार केल्याचे मान्य केले आणि हा व्यवहार १९९७ साली खानसाहेबांच्याबरोबर इस्तंबूलला गद्दाफींच्या दोन हस्तकांना-Triple M आणि करीम-भेटण्यासाठी एका कॅफेमध्ये गेलेले असताना सुरू झाल्याचे सांगितले. खानसाहेब, Triple M आणि करीम व्यवसायाबद्दल बोलत असताना ताहीर एका बाजूच्या टेबलावर बसले होते. नंतर खानसाहेबांनी गद्दाफींच्या परमाणू प्रकल्पासाठी सेंट्रीफ्यूजेस पाठवायला त्यांना सांगितले असा ताहीरनी दावा केला. वीस वापरलेल्या P-1 सेंट्रीफ्यूजेस व २०० सेंट्रीफ्यूजेससाठी सुटे घटकभाग एका कंटेनरमध्ये घालून दुबईमार्गे पाठवायच्या होत्या. लिबियन सरकारकडून कित्येक कोटी डॉलर्स घेण्यात आले. पण सत्यस्थिती अशी होती कीं ही जुनी P-1 सेंट्रीफ्यूजेस पाकिस्तानात भंगारच समजली जात.

पुढच्या वर्षीं ताहीर आणि खानसाहेब लिबियनांना पुन्हा कासाब्लांका येथे भेटले. लिबियन्स नम्रतेने वागले खरे पण ते रंजीस आले होते. Triple M यांनी खानसाहेबांना सल्ला दिला कीं पूर्वी विकलेले सुटे घटकभाग उपयोगी पदले होते पण प्रकल्प मार्गी लागण्यासाठी अपुरे होते. लिबियन्सनी खानसाहेबांना कोपरखळी मारत सुचविले कीं आधी विकलेल्या P-1 सेंट्रीफ्यूजेसची सुधारित आवृत्ती P-2 त्यांना हवी होती व गद्दाफी पैसे द्यायला तयार होते. Triple M यांना १०,००० P-2 सेंट्रीफ्यूजेसच्या प्रकल्पाबद्दल बोलणी करण्याचा अधिकार गद्दाफींनी दिल्याचेही त्यांनी खानसाहेबांना सांगितले.

ताहीर चकितच झाले. अद्ययावत सेंट्रीफ्यूजेससाठी माल शोधणे, जमविणे, सेंट्रीफ्यूजेस बनविणे आणि त्या पोचविणे हे खानसाहेबांच्या जाळ्यालाही एक तर्‍हेचे नवे आव्हानच होते. पण Triple M जेंव्हां म्हणाले कीं त्यांचे सरकार त्यासाठी १४ कोटी डॉलर्स द्यायला तयार आहे तेंव्हां ताहीरच्या काळज्या मिटल्या. इतक्या पैशात त्यांना पंतप्रधानांचे कार्यालयसुद्धा विकता येईल असे हसत-हसत ताहीर म्हणाल्याचे त्यांचे मित्र सांगतात. खानसाहेबांनी ताहीरला हातातली सगळी इतर कामे टाकायला सांगितली. लिबियाबरोबरचा हा सौदा आता पाकिस्तानसाठी (व त्यांच्यासाठीही) सर्वात जास्त प्रधान्य असलेला प्रकल्प होता. ताहीरनी मलेशियन पोलीस अन्वेषकांना सांगितले कीं तो स्वतः त्याच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पातील सहभागाची नीट कल्पना समजून घेण्यासाठी लिबियाच्या हस्तकांना दुबईत भेटला होता.

१०,००० P-2 सेंट्रीफ्यूजेससाठी लक्षावधी सुटे घटकभाग लागणार होते आणि IAEAचे आणि पाश्चात्य सुरक्षादलांचे लक्ष वेधून घेणे टाळण्यासाठी ताहीर यांनी सर्व सामान वेगवेगळ्या देशातून मिळवायचे, दुबईतील (किंवा कुवैतमधील) मुक्तव्यापारविभागात[५] जमवायचे व मग ते सर्व सामान त्रिपोलीला पाटवायचे अशी योजना आखली. २००२सालच्या डिसेंबरमध्ये ब्रिटिश अधिकार्‍यांना दिलेल्या पावत्यांवरून व जहाजांच्या कागदपत्रांवरून असे दिसून आले कीं लागणारे घटकभाग मिळविण्यासाठी ताहीर १२ देशांतील ३० कंपन्यांशी व्यवहार करत होते. सहजासहजी हे व्यवहार कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून ही खबरदारी घेतली जात होती.

लिबियन्सना लागणारा कांहीं माल मलेशियात आणि ताहीर यांच्या शहा आलम येथील SCOPE कारखान्यात बनविणे शक्य होते. काप व त्यांच्या सहकार्‍यांना समजले कीं हा कारखाना लिबिया प्रकल्पासाठीच खास करून उभारला होता. लिबियन्सनी ताहीरना ३४ लाख डॉलर्स त्यांच्या कामासाठी दिले होते व त्या पैशातूनच त्यांनी अर्स टिनरना तो कारखाना चालवायला नेमले होते. हा सर्व माल चार शिपमेंट्समध्ये जायचा होता. ताहीरनी सांगितले कीं BBC China मधले ऑक्टोबर २००३ मध्ये पकडले गेलेले कंटेनर्स शेवटच्या शिपमेंटचा भाग होते. ती शिपमेंट पाठविल्यावर टिनर मलेशियाचा कारखाना बंद करून स्वित्झरलंडला परतले होते.

आपण या अन्वेषणाबाबत पूर्ण सहकार्य करीत आहोत हे ताहीरना दाखवायचे होते. मलेशियातील अन्वेषणाच्या फायलींवरून कळत होते कीं ताहीर यांनी आपल्या बडबडीत आपल्या अनेक युरोपियन व दक्षिण आफ्रिकेतील सहकार्‍यांची नावे जाहीर केली होती. त्यात 'लेबोल्ड हेरायस' कंपनीद्वारा निर्वातीकरणाची यंत्रसामुग्री पुरविलेले गोठार्ड लर्च होते, अ‍ॅल्युमिनियम कास्टिंग्ज आणि वीजनिर्मितीची यंत्रसामुग्री देणारे तुर्कस्तानचे गूनस चिरे होते, इलेक्ट्रिकल पॆनेल्स व वोल्टेजसंयमक पुरवणारे आणखी एक तुर्की इंजिनियर सलीम अल्ग्वादिस होते. तुर्कस्तानमधून आलेल्या पेट्या त्यांच्या दुबईच्या इतर घटकभागाबरोबर BBC Chinaवर थेट चढवायला ताहीरनी सांगितले होते. म्हणजे MI6 च्या लोकांनी पाच कंटेनर्स पकडले पण तुर्की कंटेनर बोटीवरच राहिला होता व त्रिपोलीला पोचला होता.

ताहीर यांनी आणखी एक कबूलीजबाब दिला.त्रिपोलीच्या विनंतीनुसार पाकिस्तानने त्यांच्या मशीन्समध्ये वापरण्यासाठी वीस टन UF6 वायूही दिला होता. शिवाय इराणप्रमाणे लिबियासुद्धा अणूबाँबची संरचना करण्याच्या दृष्टीने कांहीं पावले टाकेल म्हणून अतिशुद्धीकृत युरेनियमचे कांहीं कॅनिस्टर्स पाकिस्तान इंटरनॅशनलच्या विमानातून पाठविले होते[६].

त्यानंतर ताहीरला लिबियाबरोबरच्या सौद्याच्या रहस्याचे आणखी एक अंग उघड करायला प्रवृत्त करण्यात अन्वेषकांना यश आले. गद्दाफींच्या शास्त्रज्ञांनी त्यांना सेंट्रीफ्यूजेसचे घटकभाग स्वतःच बनविण्यासाठी स्वतःची यंत्रशाळा उभी करायला सांगितले होते. लिबियन्सना त्यांच्या कारागिरांना प्रशिक्षण द्यायचे होते व त्यांच्या गुदामांत तयार घटगभागांचा हवा तेवढा साठाही ठेवायचा होता. त्रिपोलीच्या कांहीं मैल पश्चिमेला सोनेरी वाळू आणि संत्र्यांच्या रायांसाठी प्रसिद्ध असलेल्या जानझूर येथे उभी करण्याचा बेत असलेल्या या प्रकल्पाला "Machine Shop 1001 प्रकल्प" असे सांकेतिक नांवही देण्यात आले होते. इथे लागणारी यंत्रें युरोपमधून मागवायची होती. त्यात अ‍ॅल्युमिनियमच्या पाईप्समधून P-2 सेंट्रीफ्यूजेसचा रोटर बनविण्यासाठी लागणारा फ्लो-फॉर्मिंग लेथ व इटलीहून मागविलेल्या नरमीकरणासाठी लागणार्‍या भट्टीचाही[७] समावेश होता.

ताहीर यांच्याशी व्यावहारिक संबंध असल्यामुळे आपल्या व्यवसायाबद्दलही चौकशी होत आहे असे ग्रिफिननी ऐकले होते. दुबईमधील त्यांच्या कंपनीच्या सुरुवात करून देण्यात मदत केलेला एक प्रायोजक अचानक त्यांच्या दारात येऊन उभा राहिला व त्याने ताहीर यांचा सर्व दस्तऐवज जाळून टाकायला सांगणारा निरोप दिला. ग्रिफिननी असे करण्याला नकार दिला कारण त्यांच्या दृष्टीने हे दस्तऐवज एक प्रकारचा संरक्षक विमाच होता.

पाठोपाठ ग्रिफिनना कळले कीं ताहीर यांनी "Machine Shop 1001 प्रकल्पा"च्या उभारणीत ग्रिफिन हेच त्यांचे मुख्य मध्यस्थ होते आणि हा सर्व सौदा त्यांच्या गल्फ टेक्निकल इंडस्ट्रीज (GTI) या कंपनीद्वारे करायचे होते असे सांगून त्यांचा विश्वासघात केला होता. त्यांना एका षड्यंत्रात अडकविले गेले होते आणि "Machine Shop 1001 प्रकल्प" असा प्रकल्प नव्हताच असा दावा ग्रिफिननी केला. १००१ हा क्रमांक GTIला मिळालेल्या ऑर्डर्स नोंदवायच्या वहीतील पुढचा प्रकल्प-क्रमांक होता इतकेच. पुराव्यादाखल त्यांनी वापरून जीर्ण झालेल्या कारखान्याच्या कामांच्या रोजनिशीच्या पानांची फोटोप्रत त्यांना दाखविली. त्यात १००१ या क्रमांकाखाली "लिबियन नॅशनल ऑइल कंपनीच्या दुरुस्तीकामासाठी उभारण्यात येणारी यंत्रशाळा" असा उल्लेख होता.

ताहीरनी ग्रिफिनना मे १९९४साली आपल्या दुबई येथील 'Mummy & Me' मधील सहाव्या मजल्यावरील सदनिकेत बोलावले होते. त्यावेळी ते दुबईला रहात नव्हते पण कामानिमित्त्य कांहीं दिवसांसाठी आलेले होते. ताहीर वा त्यांचे काका फारूक यांनी दुबईत उभारल्या जाणार्‍या एका नव्या यंत्रशाळेसाठी लागणार्‍या बर्‍याच प्रकारच्या यंत्रांची किंमत त्यांना विचारली होती. ग्रिफिनना ही यंत्रशाळा परमाणूप्रकल्पासाठी असावी अशी शंका आल्यामुळे त्यांनी तसे दोघांना विचारलेही होते. नकारार्थ उत्तर देत ती यंत्रशाळा लिबियन नॅशनल ऑइल कंपनीला त्यांच्या जळून गेलेल्या यंत्रांना बदलण्यासाठी नवीन यंत्रें बनविण्यासाठी उभी केली जात होती असे त्यांनी ग्रिफिनना सांगितले होते. पण दुबईत कुठल्याही तर्‍हेचे निर्बंध नसल्यामुळे त्यांना ती यंत्रें दुबईत बनवायची होती. यात कुठलेही काळे-बेरे न दिसल्यामुळे ग्रिफिननी एक यंत्रसामुग्रीची कंटेनरभर माहिती पाठविली होती.

ग्रिफिननी त्यानंतर या प्रकल्पाबद्दल कांहींच ऐकले नव्हते. त्यांना वाटले होते कीं हा प्रकल्प बहुदा सोडून दिला गेला असाव. पण १९९७ साली ताहीरनी त्यांना खर्चाचा नव्याने अंदाज करायला सांगितले होते. ग्रिफिन म्हणाले होते कीं ताहीरना त्यांना दलाली द्यावी लागेल. ताहीर दलाली द्यायला तयार झाले. ताहीरनी जेंव्हां सांगितले कीं हा लिबियन प्रकल्प एक कोटी डॉलर्सचा आहे तेंव्हां ग्रिफिननी त्या प्रकल्पाकडे पूर्ण ध्यान द्यायचे ठरविले. मग ते आपली पत्नी अ‍ॅनाबरोबर दुबईला रहायला आले व त्यांनी GTI कंपनी स्थापली. पण ग्रिफिन यांच्यापुरते बोलायचे झाल्यास हा सौदा फक्त लिबियन नॅशनल ऑइल कंपनीबरोबरच होता.

ताहीरनी ग्रिफिनना तर्‍हेतर्‍हेच्या विनंत्या केल्या पण ग्रिफिनना कुठल्याच विनंतीची काळजी वाटली नाहीं. सर्वात आधी ताहीरनी दुबई यंत्रशाळेतील यंत्रांच्या खरेदीसाठीच्या नावाखाली २० लाख डॉलर्स GTIच्या बँकबुकात टाकले. फोनवरून या बँकबुकातून लर्च, गूनस चिरे, खानसाहेबांचे जावई नाउमन शहा अशांच्या खात्यांत ताहीर यांच्यावतीने पैसे पाठविण्याबद्दल ताहीर ग्रिफिनना सूचना देत. त्यानुसार ग्रिफिननी नऊ-एक वेळा त्यांनी पैसे पाठविले. ग्रिफिननी हे पैसे लिबियन नॅशनल ऑइल कंपनीच्या प्रकल्पाच्या खात्यातून चालले असल्याची आठवण करून दिच्यावर् ताहीर यांनी ते पैसे त्यांना परत करतील असेही वचन दिले होते व त्यानुसार पैसे आलेही. पण मग ग्रिफिन यांच्या लक्षात आले की असे पैसे पाठविण्याबद्दल स्वसंरक्षणासाठी लागणार्‍या लेखी सूचना त्यांच्याकडे नव्हत्या.

हे पैसे लिबियाच्या परमाणूप्रकल्पाशी संबंधित आहेत व MI6 आणि CIA त्या प्रकल्पाच्या मागावर आहेत याची ग्रिफिनना माहिती नव्हती असा दावा ग्रिफिन यांनी केला. ग्रिफिननी मान्य केले कीं त्यांना तसा पुसटसा संशय आला होता इतकेच. ताहीरना ते वर्षानुवर्षे ओळखत होते, अगदी ताहीर लहान असल्यापासून, व त्यांच्यावर त्याकाळी त्यांचा पूर्ण विश्वास होता. पण त्यांची खूप निराशा झाली होती कारण ताहीर आपल्याला असा धोक्यात टाकेल असे त्यांना वाटले नव्हते.

१९९९मध्ये ताहीरनी दोन फ्लो-फॉर्मिंग लेथ स्पेनहून पुरवायला सांगितले. या सौद्यामुळे ग्रिफिन स्वतःला अडकवत होते व खानसाहेबांचे जाळे आणखी श्रीमंत बनत होते. १५.६ टन वजनाचे हे लेथ अजस्त्र आकाराचे होते व एकेकाची किंमत ३५०,००० डॉलर्स होती. जुलै/ऑगस्टमध्ये ते दुबईत ताहीरना पुरविण्यात आले. गिर्‍हाइकाला चालते लेथ पहायचे असल्यामुळे ताहीर यांनी ग्रिफिनना ते लेथ एक जागा भाड्याने घेऊन उभे करायला व चालू करायला सांगितले. ग्रिफिननी त्यानुसार कारवाई केली पण ताहीर उगवलेच नाहींत. मग त्यांचा फोन आला कीं त्यांचे अशील ते लेथ घेऊन जाण्यासाठी येत आहेत. ग्रिफिन त्यामुळे खुषीत होते. ग्रिफिनना याबद्दल पुढची माहिती कळली ती ताहीरने ते लेथ लिबियाबरोबरच्या परमाणूप्रकल्पाचे भाग होते असा कबुलीजबाब मलेशियन अधिकार्‍यांना दिल्यानंतर. ताहीरच्या अधिकार्‍यांना जाब विचारण्यासाठी ग्रिफिन दुबईला आले. तिथे तर सवळागोंधळ होता. शेकडो लोक ताहीरना शोधत होते. आपला बचाव करण्यासाठी ग्रिफिननी दुबईच्या कस्टम्स खात्यालाही भेट देऊन या लेथबद्दलचे कागदपत्र हस्तगत करण्याचा प्रयत्न केला.

ग्रिफिन यांच्या लक्षात आले की नोव्हेंबर २०००मध्ये ते दोन लेथमधील कमीत कमी एक लेथ लिबियन नॅशनल ऑइल कंपनीला न पाठविता GTIचा नकली invoice वापरून दक्षिण आफ्रिकेला पाठविला गेला होता. ग्रिफिननी त्यांना या व्यवहराबद्दल कांहींच माहिती नसल्याचे सांगितले. जहाजाचे भाडे आरोपानुसार दुबईत ग्रिफिन यांच्या कंपनीने दिले होते व स्वीकारणार्‍या कंपनीचा पत्ता होता जोहान्सबर्गपासून ४० मैल नैऋत्येला असलेले फांडरबिलपार्क हे खाणकामवाल्या गांवातील ट्रेडफिन इंजिनियरिंग या धातूकाम करणार्‍या एका कंपनीचे. कागदपत्रांनुसार हा लेथ १३ महिने दक्षिण आफ्रिकेत होता व त्यानंतर ट्रान्झिट म्हणून मलेशियात जाऊन तो पुन्हा दुबईला पाठविण्यात आला. दक्षिण आफ्रिकेते त्यात कांहीं सुधारणाही करण्यात आल्या असण्याची शक्यता होती. दुबईत १२ डिसेंबर २००१ला पोचल्यावर तो पुन्हा कांहीं दिवसांनी GTIच्या हुसेन यांच्या सूचनांनुसार मलेशियाला पुनर्नियात करण्यात आला. ग्रिफिन म्हणाले कीं त्यांनी कुणाही हुसेन नावाच्या माणसाला नोकरीवर ठेवले नव्हते. माझ्या कंपनीचा दुसरा कुठला व्यवहार लपविण्यासाठी दुरुपयोग करण्यात आला होता. हुसेनचा संपर्क नंबर ताहीर यांच्या दुबईतील SMB Distribution या कंपनीत वाजला. ताहीर यांनी आपल्या हुसेन या मित्रालाही त्यात गोवले होते. आपल्या नावावर आलेले हे लेथ कुठे पोचले हे ग्रिफिनना कळेना. त्यासाठी त्यांना वाट पहावी लागणार होती.

२००१च्या ऑगस्टमध्ये ग्रिफिननी दुबईतले चंबूगबाळे आवरून युरोपला प्रस्थान केले. त्यांच्या गमनापूर्वी ताहीर यांच्याशी त्यांचे फोनवर बोलणे झाले. GTI कंपनीचा उपयोग कांहीं गोष्टी आयात करण्यासाठी करण्याबाबत ताहीरनी त्यांना विचारले असता त्यांनी उत्तर दिले कीं या मंपनीबरोबरचे सर्व व्यवहार आता वाणिज्य व वैध तत्वावरच होतील. त्यांनी दक्षिण फ्रान्समध्ये एक हवेली विकत घेतली. पण २००१च्या नोव्हेंबरमध्ये ग्रिफिनना GTIच्या तत्कालीन व्यवस्थापकाचा फोन आला कीं GTIच्या नावाने एक अल्युमिनियम पाइप्सची शिपमेंट आली होती पण GTIच्या कागदोपत्री अशा ऑर्डरचा कांहीच उल्लेख नव्हता. अल्युमिनियम पाइप्स म्हणजे नक्कीच ताहीर य़ांचा परमाणूप्रकल्पातला व्यवहार असणार हे ओळखून त्यांनी आपल्या व्यवस्थापकाला आज्ञा दिली कीं ती GTIची शिपमेंट नसल्याचे त्याने ताबडतोब त्या शिपिंग कंपनीला फोन करून सांगावे व ताहीरना फोन करून त्यांनाही जाब विचारला. ताहीर यांनी निर्लज्जपणे कबूल केले कीं ती शिपमेंट त्यांचीच होती. ग्रिफिननी अशा व्यवहाराला हरकत घेऊन सांगितले कीं त्यांच्याबरोबरचे सारे संबंध ते तोडत आहेत व अशी हरकत पुन्हा केल्यास ते दुबईत त्यांना कोर्टात खेचतील. खूप वर्षांनंतर ताहीरना पकडल्यानंतर आपल्याला लिबियाच्या परमाणूप्रकल्पात कसे सापळ्यात अडकविले होते ते ग्रिफिनना कळले.

ताहीरनी त्यांच्याबद्दल अफवा पसरविल्यानंतर ग्रिफिन फारसे कुणात मिळतमिसळत नसत. पण ताहीर यांचे इतर सहकारी इतके नशीबवान नव्हते. त्यांच्या भावाला दुबईत कैद झाली. गूनस चिरेंना इस्तंबूलमध्ये कैद झाली व कित्येक महिने त्यांची कसून चौकशी चालली होती. त्यातल्याच एका चौकशीत ते मरण पावले. ग्रिफिन मात्र बालंबाल बचावले.

पाकिस्तानात मात्र कुणीच वाचला नाहीं. मुशर्रफनी खानसाहेबांना बळी देण्यापूर्वी त्याच्या समर्थनाची पुरेपूर तयारी केली. २३ नोव्हेंबरच्या संध्याकाळी KRL संचालक व खानसाहेबांच्या अनेक वर्षांच्या सहकार्‍यांपैकी एक कनिष्ठ अधिकारी डॉ. मोहम्मद फारूक आपल्या इस्लामाबादमधील घरातून नाहींसे झाले. ताबडतोब एक अफवा उठली कीं डॉ. फारूक यांना अटक करून ISI च्या मुख्यालयात राष्ट्रीय सुरक्षिततेच्या बाबतीत चौकशी करण्यासाठी नेण्यात आले आहे. पाठोपाठ डॉ. फारुक यांच्या अटकेच्यावेळी त्यांच्या घरी भेटीला गेलेले डॉ. बदर हबीबसुद्धा नाहींसे झाले. त्यांना अटक करणार्‍यांमध्ये पाकिस्तानी कपड्यातली गोरी मंडळीही होती व ही कारवाई कदाचित् CIAच्या नियंत्रणाखाली सुरू झाली आहे. त्याच रात्री KRL च्या उत्पादक्षेत्राचे प्रमुख डॉ. यासीन चिहान, सेंट्रीफ्यूज संरचना विभागाचे प्रमुख डॉ. सईद अहमद, शमीम नावाचे एक तंत्रज्ञ, KRL च्या स्वास्थ्य व पदार्थविज्ञान विभागाचे संचालक डॉ. अब्दुल मजीद आणि KRL चे एक अभियंता डॉ. झुबेर खान यांच्यासारखे आणखी कांहीं शास्त्रज्ञही घरातून नाहींसे झाले. पण पाकिस्तानच्या गृहखात्याने व ISI ने अशा कांही अटकी केल्याचे नाकारले व जे कांहीं चालले आहे ते KRL चा अंतर्गत मामला आहे असे सांगितले. या सर्व गोंधळात मुशर्रफ यांची योजना गूढच राहिली.

दरम्यान KRL शास्त्रज्ञांच्या परदेशी जाण्यावर बंदी घालण्यात आली. पुढील कांहीं दिवसांत सरकारने चौकशी चालू असल्याचे मान्य केले पण कुणालाही अटक केली असल्याचे नाकारले. मुशर्रफ यांचे प्रवक्ते सांगत होते की त्यांची चौकशी होत आहे व त्यांच्याकडून माहिती गोळाकेली जात आहे. सर्व लोकांची वैयक्तिक विश्वासार्हता चांचणी घेतली जात होती.

पण हे खरे नव्हते. कारण ब्रि. सजवालना जेंव्हां चौकशीसाठी नेण्यात आले तेंव्हां त्यांचा मुलगा डॉ. शफीक त्यांच्याबरोबर होता. खानसाहेबांना काय चालले आहे याची कल्पनाच नव्हती व ते निर्विकार होते. नेले गेलेले लोक इतके ज्येष्ठ होते कीं कांहीं गंभीर गोष्ट घडत आहे असे कुणालाच वाटले नाहीं. ही सर्व मंडळी सरकारच्या बाजूची होती, राज्यकर्ती होती, पाकिस्तानची गौरवस्थाने होती व लष्कराची पिढ्यान् पिढ्या साथ दिलेली माणसे होती. खानसाहेबांनी जे कांहीं केले होते ते देशासाठी व सरकारी हुकुमानुसार केले होते. खान इतके बिनधास्त होते कीं ते इस्लामाबादपासून तीस मिनिटांच्या अंतरावरील बानी गाला तलावावर सुटीसाठी निघून गेले. इस्लामाबादला पाणी इथूनच मिळते. तो विभाग हरित पट्टा म्हणून जाहीर केला होता व पिण्याचे पाणी दूषित होऊ नये म्हणून तिथे कुठलीही घरे बांधायला परवानगी नव्हती. पण खानसाहेबांनी शनिवार-रविवारांसाठी एक बंगली बांधली होती व त्यांच्या घरचे सांडपाणी बिनदिक्कतपणे शुद्धीकरण न करता त्या तळ्यात सोडले होते!
------------------------------------------------------
[१] ही माहिती मुशर्रफ यांच्या In the line of fire या पुस्तकात त्यांनी दिली आहे. हे पुस्तक मी वाचले आहे व 'ललितवाङ्मय (fiction)' म्हणून वाचायला हरकत नाहीं. पण मुशर्रफ यांचा एक पैशानेही आर्थिक फायदा होऊ नये म्हणून माझ्यासारखी "pirated edition"च विकत घ्यावी असा आग्रही सल्ला मी देईन.
[२] हे पाकिस्तानचे भूतपूर्व लष्करशहा अयूब खान यांचे खास निकटवर्ती अल्ताफ गौहर यांचे सुपुत्र. अल्ताफ गौकर यांनी अयूब खान यांच्या जीवनचरित्राचे "Friends, Not Masters", त्यांच्यावतीने शब्दांकन केले होते (ghost-writing) आणि हुमायून हे त्यावेळी मुशर्रफ यांच्या "In the Line of Fire" या पुस्तकाचे शब्दांकन करीत होते.
[३] Atomic Energy Organization of Iran
[४] एवढे सारे IAEAला सांगितले असूनही अलीकडील अहमदीनेजाद यांनी संघर्षयुक्त पवित्रा कां घेतला हे समजत नाहीं!
[५] Free-Trade Zone
[६] केवढी ही प्रवाशांच्या आरोग्याबद्दल कळकळ!
[७] Annealing furnace

राजकारणभाषांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

9 Jul 2010 - 11:57 am | विसोबा खेचर

काळेसाहेब, या सार्‍या लेखमालेची एक पीडीफ बनवून ठेवा प्लीज..

तात्यासाहेब,
धन्यवाद. एकदा रूपांतर हातावेगळे झाले कीं 'पीडीएफ' फॉर्मॅटमधे एक पुस्तकासारखे बनवायचा विचार आहे. 'सकाळ'ला पीडीएफ चालत नाहीं म्हणून अद्याप करायचे राहिले आहे.
सकाळच्या खूप वाचकांनीही 'पीडीएफ'ची विनंती केली आहे.
कुणी 'वळखीचा' प्रकाशक असल्यास ओळख करून द्या. पुस्तकरूपात हा अनुवाद मराठी लोकांपुढे यावा असे माझ्याही खूप फार मनात आहे.
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: http://tinyurl.com/2cknfpb (प्रकरण दहावे, आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)

आळश्यांचा राजा's picture

9 Jul 2010 - 5:52 pm | आळश्यांचा राजा

म्हणजे आपण अजून पुस्तकरुपाने प्रकाशित करण्याची तयारी केलेली नाही? चांगले प्रकाशक बघा. विषय आणि पुस्तक दोन्ही महत्त्वाचे आहेत.

लेखाच्या तळटीपा आपल्या आहेत की मूळ लेखकांच्या?

आळश्यांचा राजा

सुधीर काळे's picture

9 Jul 2010 - 7:39 pm | सुधीर काळे

धन्यवाद. पुण्या-मुंबईत असतो तर एव्हांना कांहींतरी 'जुगाड' जमलं असतं. पण इथं जकार्ताहून करणे फार कठीण वाटतंय्.
तळटीपा सगळ्या नाहींत पण बहुतांशी माझ्या आहेत.
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: http://tinyurl.com/2cknfpb (प्रकरण दहावे, आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)