हे सुरांनो चंद्र व्हा रे

ॐकार's picture
ॐकार in जनातलं, मनातलं
26 Mar 2010 - 2:16 am

हे सुरांनो चंद्र व्हा रे... अर्चना कान्हेरेंने आळवलेली ही विनवणी. ह्याला गाणं म्हणावं तर त्यातल्या आर्ततेशी प्रतारणा केल्यासारखं होईल. अगदी सुरुवातीचा आलाप डोळे बंद करून ऐकावा. एकदा नव्हे, दोनदा नव्हे अनेकदा. जोवर त्यासोबत झंकारणारा तंबोरा आणि तबल्यावरची थाप अंगावर काटा आणत नाही तोवर पुढे जाऊच नये. डोळ्यांत पाणी दाटण्यावेळी कधी बोलायचा प्रयत्न केला असाल तेव्हा कंठ, आवाज जसा कंप पावेल तशी तबल्याची सुरुवात. सुरांनो चंद्र व्हा म्हणताना 'व्हा'मध्ये येणारी जीवघेणी आर्तता ह्या दोन ओळींवर खिळवून ठेवेल. चांदण्यांचे कोष - 'माझ्या' म्हणताना माझ्यातला अलवारपणा अगदी आपली अतिशय अल्लड आठवण, सुकुमार चीज वा अगदी जीव की प्राण असलेली एखादी शेवटली गोष्ट आपण कोणाकडे सुपूर्त करत आहोत असे भासवून जातो. बरं प्रियकराला पोचवा सांगतानाही किती काळजीने सांगावं. आणि मग एकदम निश्चयी मुद्रेने हुकुम करावा तसा दुसर्‍यांदा गायलेला 'पोचवा'. आणि मग पुन्हा चंद्र व्हा मधला हळवेपणा.
वाट एकाकी तमाची ऐकताना लक्ष देऊन तबला-डग्गा ऐकावा. एकदम पोटात खड्डा पडावा असे घुमणारे बोल वाजतात. तितक्याच पोटतिडकीने केलेली साथ बरेचदा दुर्लक्षित राहते....असो. भर अरण्यात, अगदी मिट्ट काळोखात तुम्ही चालताहात असा विचार करायची गरज नाही. अगदी कधीतरी घराच्या खिडकीशी, गच्चीवर, अंगणात भर रात्री एकटे बसले असाल आणि अंगाला गारा वारा चाटून गेला किंवा पानांची सळसळ ऐकल्यावर अंगावर सर्रकन काटा आला असेल असा एखादा प्रसंग आठवा. नंतर किती वेळ स्वतःला सावरण्यात घालवला असाल? अगदी त्याच अंगाने ही एकाकी वाट आळवलेली आहे. जितकी एकाकी, जितकी दूरवर जाणारी तितकी आळवणी. एखादवेळेस वाटेल की किती वेळ आलापी चालू आहे मध्येच. पण डोळ्यातून खळ् कन वाहणार्‍या पाण्याशी त्याची तुलना करा. पुसावसं कितीदा वाटतं. जेव्हढं वाहू द्यावं तितकं हलकं वाटतं. तसंच आहे हे. स्वरांना अडवून का धरावं... आणि त्यात मध्येच अडखळणारा तबला ऐकू येत्तो. मुद्दामच विराम घेऊन वाजवलेला. चालता चालता ठेच लागावी त्याची आठवण करून देणारा. एकाकी वाट, त्यात अंधार. हरवलेल्या माणसाची ह्या शब्दांतली किमया बघा. वाट ही हरवलेल्या माणसाची. माणूस गौण आहे. माणूसच नसल्याने बिचारी वाटच बावरली आहे. तीच एकाकी आहे. हरवलेल्या माणसाचीमागून येणारी साथीची पेटी/ऑर्गन जणू त्याला शोधणार्‍या नजरेची री ओढत आहे असे वाटावे इतकी व्याकूळतेने वाजवली आहे. बरसूनी आकाश सारे, अमृताने न्हाहवा! काय गंमत आहे. न्हाहवा. वाटेला न्हाहवा. मनाला न्हाहवा. हरवलेल्या माणसाला न्हाहवा. रात्रीला न्हाहवा. एकाकीपणाला न्हाहवा. आणि शेवटी न्हाहवा म्हणताना अगदी बरसणारी सर यावी आणि पटकन भिजवून निघूनही जावी तसे स्वर.

एकाक् क्षणी अखेरीस स्वरांतली आर्तता जाते आणि सुरांना थेट चंद्र व्हा असा हुकुम मिळतो. तोच आवाज, तोच स्पष्टपणा पण स्वरांची किमया अशी की भाव अगदी वेगळा. तरीही स्वर ऐकत नाहीत म्हटल्यावर पुन्हा हतबलतेचा भाव येतो. ह्यावेळचा चंद्र व्हा मधला व्हा ऐकावा. इतका आर्द्र स्वर....आणि पुन्हा तोच भाव चांदण्यांचे कोष माझ्या मधल्या प्रत्येक शब्दांत आणि त्यानंतर वाजणार्‍या ऑर्गनमध्येही... संपू नये असं वाटत असतं पण आळवणी संपते.. मग मी शब्दांचा जमाखर्च मांडू लागतो. पण ह्हे कुसुमाग्रजांचे शब्द काही मला दाद देत नाहीत... अशावेळी रंग मदतीला येतात ...

स्वरांनी , शब्दांनी आणि रंगांनी सगळं अवकाश व्यापतं आणि त्यातून कधीतरी मिळतं ते समाधान. मग अगदी कधीपासून दिलखुलासा दाद द्यायची राहिलेली असते ती देऊन मी मोकळा होतो!

टीपः चित्र - sumopaint.com हे ऑनलाईन टूल वापरून चितारलेलं आहे.

कलासंगीतनाट्यकवितावाङ्मयप्रकटनआस्वाद

प्रतिक्रिया

शुचि's picture

26 Mar 2010 - 2:42 am | शुचि

कविताच किती सुंदर आहे. -

हे सूरांनो चंद्र व्हा
चांदण्याचे कोष माझ्या
प्रियकराला पोचवा||

वाट एकाकी तमाची
हरवलेल्या मानसाची
बरसुनी आकाश सारे
अमृताने नाहवा||

.......वाट एकाकी तमाची अमृताने नाहवा : ) ....... क्या बात है!

आज संध्याकाळी ऐकेन अर्चना कान्हेरेंनी गायलेले गाणे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
हंसः श्वेतो बकःश्वेतो को भेदो बकहंसयो:|
नीरक्षीरविवेके तु हंसः हंसो बको बकः||

चित्रा's picture

26 Mar 2010 - 4:40 am | चित्रा

हे अतिशय सुंदर ध्वनिमुद्रण आमच्याकडेही आहे. पहिल्याने ऐकले तेव्हा अर्चनाताईंच्या आवाजाची प्रत अलिकडे ऐकलेल्या आवाजांपेक्षा वेगळी, खडी वाटली. ते त्या गाण्याला योग्य आहे का असे आधी वाटले, पण नंतर जेव्हा जेव्हा म्हणून दुसर्‍या कोणी हेच गाणे गायलेले ऐकले, तेव्हा तेवढे भावले नाही, ते गाणे त्यांनीच म्हणावे इतके सुरेख म्हटले आहे.

मुक्तसुनीत's picture

26 Mar 2010 - 4:48 am | मुक्तसुनीत

या गाण्याचे संगीतकार : पं. वसंतराव देशपांडे !

कान्हेरेंच्या आवाजातल्या गाण्याची लिंक असेल तर जरूर द्या ही विनंती.

* I stand corrected. हे अभिषेकींचेच गाणे आहे. दिलगीरी.

विंजिनेर's picture

26 Mar 2010 - 7:40 am | विंजिनेर

मला वाटतं अभिषेकीबुवांनी संगीत दिलंय ह्याला.
नाटक: ययाती आणि देवयानी.

विकास's picture

26 Mar 2010 - 7:49 am | विकास

मला वाटतं अभिषेकीबुवांनी संगीत दिलंय ह्याला.
नाटक: ययाती आणि देवयानी.

बरोबर. मत्स्यगंधा ते महानंदा या त्यांच्या गाण्याच्या अल्बम मधे आहे.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

मिसळपाव's picture

26 Mar 2010 - 7:16 am | मिसळपाव

http://bit.ly/c67h6E
बरेच दिवसानी ऐकलं परत एकदा. काय फिरत आहे आवाजाला...

प्रमोद देव's picture

26 Mar 2010 - 8:48 am | प्रमोद देव

अर्चना कान्हेरे मस्तच गातात.
ह्या गाण्यात अगदी त्रिवेणी संगम घडून आलाय.. अप्रतिम.
कुसुमाग्रजांची सकस रचना...अभिषेकीबुवांची तितकीच उत्तम चाल आणि अर्चनाताईंची खडी आवाजी आणि समर्थ गायकी.
ॐकार,खूपच छान वर्णन केलं आहेस आणि चित्र देखिल मस्त जमलंय.

अवांतर: मराठीत खड्या आवाजांच्या गायिकांची कमी नाही...उदा. आशा खाडिलकर,रजनी जोशी, दिप्ती भोगले(पूर्वाश्रमीची लता शिलेदार)इत्यादि

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Mar 2010 - 8:52 am | बिपिन कार्यकर्ते

गाणं, गाण्याची नुसती आठवण आणि वरचे चित्र... सगळ्यांनीच अंगावर काटा आणला...

बिपिन कार्यकर्ते

श्रावण मोडक's picture

26 Mar 2010 - 10:29 am | श्रावण मोडक

या गाण्यात भावनांचा (खरं तर एकाच भावनेचा) एक कल्लोळ आहे. चित्रातल्या रंगसंगतीत छानसा आलाय.

मी_ओंकार's picture

26 Mar 2010 - 11:45 am | मी_ओंकार

नीलहंसा, (बरोबर ना?)
छान वर्णन आणि चित्र.
हे गाणे माझ्याकडे दीनानाथ मंगेशकरांच्या आवाजात आहे. त्या आवाजात ते आणखीच धीरगंभीर आणि व्याकुळ वाटते.

- ओंकार

प्रमोद देव's picture

26 Mar 2010 - 11:47 am | प्रमोद देव

दीनानाथांच्या आवाजात?
कसे शक्य आहे ते?

मी_ओंकार's picture

26 Mar 2010 - 12:17 pm | मी_ओंकार

देवकाका,
मला शंका होतीच. बहुतेक मास्टर दीनानाथ नसावेत मग. वसंतराव आहेत बहुतेक. गाणे इथे चढवलेले आहे. ऐकून सांगता का मला?

- ओंकार.

प्रमोद देव's picture

26 Mar 2010 - 12:21 pm | प्रमोद देव

पंडीत जितेंद्र अभिषेकींचा मुलगा.

मी_ओंकार's picture

26 Mar 2010 - 12:29 pm | मी_ओंकार

असो.

अन्वय's picture

26 Mar 2010 - 6:42 pm | अन्वय

ओंकार छान व्यक्त झालास. चारूकेशी राग आहे हा. हे गाणं रागातील सूरांना व्यक्त करतं

हेही वाच
http://www.misalpav.com/node/3942

धनंजय's picture

27 Mar 2010 - 3:08 am | धनंजय

काळ्या-निळ्या-सफेत रंगांनी गाण्यातले भाव सुरेख चितारलेले आहेत.

योगेश२४'s picture

31 Mar 2010 - 10:25 pm | योगेश२४

ॐकार अगदि मनातील भावना या गाण्याविषयी तुम्ही मांडल्या आहे.

क्रुपया"राजे!"