कातरवेळ

प्रसन्न केसकर's picture
प्रसन्न केसकर in जनातलं, मनातलं
21 Jan 2010 - 2:05 pm

सर्दी-खोकल्याचा त्रास होत असल्याने त्या शुक्रवारी मी जरा लवकरच घरी आलो होतो अन इंग्रजी चित्रपटाची सीडी लावुन बसलो होतो. कुशीत गोटु झोपला होता. अन रात्री अकरा वाजण्याच्या सुमाराला फोन घणघणला. सहसा माझ्या कार्यालयीन कामाचे फोन भ्रमणध्वनीवरच येतात त्यामुळे लॅन्डलाइनवरचा फोन बहिणीचा किंवा भावाचा असेल असा अंदाज करत मी उचलला.

"अरे आईला संध्याकाळपासुन चक्कर येतीये. डॉक्टरकडे जाऊन आलो आम्ही तर ब्लडप्रेशर जास्त होतं. त्यांनी ब्लडप्रेशरची गोळी घ्यायला सांगीतल होत अन ती गोळी तासाभरापुर्वी घेतली तरी अजुन चक्कर येतेच आहे," ठाण्याहुन बहिण बोलत होती. आवाजात तणाव जाणवत होता.

आई सुमारे दहा दिवसांपुर्वीच बहिणीकडे ठाण्यात रहायला गेलेली. जाताना पुण्यात डॉक्टरांकडे सगळे हेल्थ चेक अप केलेले अन तेव्हा तब्येत नॉर्मल असल्याचा निर्वाळा डॉक्टरांनी दिलेला. त्यामुळे काहीतरी किरकोळ असेल असे वाटले अन बहिणीला मी सांगीतले की, "थोडा वेळ वाट बघु, कदाचित बरे वाटेल. वाटल्यास डॉक्टरना परत फोन कर. नाहीतरी उद्या मला सुट्टी आहेच तर मी उद्या सकाळी तिकडे येतो." अन फोन ठेवला. पण कुठेतरी काहीतरी चुकत असल्याचे जाणवत होते. फोन ठेवला अन लक्षात आले की आपण ब्लड प्रेशर किती आहे, गोळी घेऊन किती वेळ झालाय ते विचारलेच नाही. परत फोन लावला तर बिझी होता. बहुतेक बहिण डॉक्टरांशीच बोलत होती. रिडायल केले तर फोन लागला.

"डॉ़क्टरांशी बोलले मी. ते म्हणाले गोळी घेतल्यावर लगेच चक्कर थांबायला हवी होती. त्यांनी ज्युपीटर हॉस्पीटल मधे न्यायला सांगीतलय," बहिण म्हणाली. चौकशी केली तर कळले डॉक्टरांनी तपासले तेव्हा ब्लडप्रेशर १०५/२१० होते. आई फोनवर बोलु शकत होती. तिने सांगीतले, "बहिण ऑफिसमधे गेल्यावर घरात ती एकटीच होती. संध्याकाळ पर्यंत सगळे ठीक होते पण पाच वाजल्यानंतर ती जरा आडवी झाली तर जोरात चक्कर यायला लागली." बोलण्यावरुन आई पुर्ण सावध असल्याचे जाणवत होते पण आवाज खोल गेला होता अन थरथरत होता. लगेच निर्णय घेतला अन बहिणीला कळवलं, "आईला मिळेल त्या वाहनानं लगेच हॉस्पीटलमधे ने. मी ताबडतोब ठाण्याला पोहोचण्यासाठी निघतो आहे."

फोन ठेवला अन पुन्हा परिस्थितीच भान आलं. बहिण ठाण्यात रहात असली तरी दिवसभर कामानिमित्त मुंबईतच असते. तिला ठाण्यातली फारशी माहिती असणे शक्यच नव्हते. त्यात आई अशी आजारी, ती एकटी अन रात्रीची वेळ. मदतीला कोणीतरी हवे, किमान मी ठाण्याला पोहोचेपर्यंत तरी. पहिले नाव डोळ्यासमोर आले ते आंतरजालावर भेटलेला मिपाकर सुहृद निखिल देशपांडे याचेच. सरळ त्याला फोन लावला अन सगळी परिस्थिती कानावर घातली. बहिणीचे फोन नंबर दिले अन विनंती केली तिच्याबरोबर संपर्क साधुन हवी ती मदत करण्याची. त्यानेही हात आखडता न घेता लगेच फोन करतो अन ताबडतोब त्यांना भेटायला जातो असे कळवले.

त्यानंतर पुण्यातच असलेल्या बहिणीला फोन केला अन असे असे झाल्याने मी ठाण्याला जात असल्याचे कळवले. मेहुण्यानी धीर दिला परंतु मन काही थार्‍यावर नव्हते. मग टुर्स अ‍ॅन्ड ट्रॅव्हल बिझिनेस मधल्या माझा मित्र माऊली याला फोन केला अन ताबडतोब गाडी हवी असल्याचे कळवले. काय झाले आहे ते कळल्यावर त्याने स्वतःच माझ्याबरोबर येण्याचा निर्णय घेतला. अडचण फक्त एकच होती, त्याची सगळ्यात आरामदायक गाडी त्या दिवशी औरंगाबादला पाठवली होती अन केव्हाही परतणे अपेक्षित होती. कुणी गाडी नेलीय चौकशी केली तर कळले माझाच मित्र नितीनकडे ती होती. लगेच नितीनला फोन केला. तो रस्त्यात जेवायला थांबला होता पण मला गाडी हवीये म्हटल्यावर न जेवता तसाच पुण्याला परतला.

दरम्यान बहिणीने ठाण्यातच असलेली तिची एक मैत्रीण अन माझ्या तिथेच रहाणार्‍या मामेबहिणीशी संपर्क साधला होता अन ते सगळे लोक बहिणीच्या घरी पोहोचले होते. निखिल स्वतः हॉस्पीटलमधे त्यांची वाट पहात होता. हॉस्पीटल मधे जायला निघता निघताना आईला दोन उलट्या झाल्याचे कळले अन चिंता अजुनच वाढली. पण आई स्वतः फोनवर बोलत होती त्यामुळे जरा धीर येत होता.

तरी गाडी येऊन मी घरुन निघेपर्यंत साडेबारा-एक वाजलेच. पण निखिल, मामेबहिणीचा मुलगा, वगैरे मंडळी आईबरोबर असल्याने अन ते फोनवरुन थोड्या थोड्या वेळाने संपर्कात असल्याने जरा आधार वाटत होता. आईला ट्रीट करणार्‍या डॉ़क्टरांशीही त्यांनी फोनवर बोलणे करवुन दिले. रात्री अडीच-तीन वाजता मी हॉस्पीटलमधे पोहोचलो तेव्हा सगळे तिथेच थांबले होते. बराच आग्रह करुन सुद्धा निखिल वगैरे मंडळी पहाटेपर्यंत बरोबर थांबली. त्या दिवशी कुणालाच झोपता आले नाही.

तीन दिवस आय सी यु मधे अन एक दिवस वॉर्ड मधे काढल्यावर आईला डिस्चार्ज मिळाला अन ती पुण्याला परतली सुद्धा. डॉक्टरांनी सांगीतले मानेचे स्नायु आखडल्याने तिला त्रास झाला. आता औषधे, व्यायाम वगैरे सुरु आहे अन तिची तब्येत सुधारते आहे. पण अजुनही त्यारात्रीची आठवण अस्वस्थ करुन जाते. सुहॄदांच्या सहकार्यानेच अवघड परिस्थितीवर मात करुन ती कातरवेळ निभावुन नेणे शक्य झाले.

व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी किंवा रिअल व्हर्च्युअ‍ॅलिटी म्हणतात ती हीच असेल का?

औषधोपचारजीवनमानविचारसद्भावनाशुभेच्छाप्रतिसाद

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

21 Jan 2010 - 2:38 pm | प्रकाश घाटपांडे

व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी किंवा रिअल व्हर्च्युअ‍ॅलिटी म्हणतात ती हीच असेल का?

अगदी हीच. आभासी जगतातील आयडीं मागे माणुसच असतो शेवटी.
सहअस्तित्वातुन काही नाती तयार होतातच ना शेवटी. इथेही तसेच आहे.
आपल्या आईला निरोगी आयुष्य लाभो ही सदिच्छा!
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

प्राजु's picture

21 Jan 2010 - 9:29 pm | प्राजु

आंतरजालावरील आयडींच्या मागेही माणूस असतोच.
आपल्या आईंची तब्बेत लवकरात लवकर बरी होवो.

- प्राजक्ता
http://www.praaju.com/

मदनबाण's picture

21 Jan 2010 - 9:35 pm | मदनबाण

तुमच्या आईच्या तब्येतीला लवकर आराम पडो....

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

अक्षय पुर्णपात्रे's picture

21 Jan 2010 - 9:42 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री पुनेरी, आपल्या मातोश्रींची तब्ब्येत लवकरात लवकर पूर्वपदावर येवो.

व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी किंवा रिअल व्हर्च्युअ‍ॅलिटी म्हणतात ती हीच असेल का?

आंतरजालावर भेटून लोक विवाहबद्ध देखिल होतात. संवाद नेहमीच (जालावर असो वा प्रत्यक्ष जीवनात) वास्तव असावा असे वाटते.

संदीप चित्रे's picture

21 Jan 2010 - 11:29 pm | संदीप चित्रे

तुमच्या आई लवकरच पूर्ण बर्‍या होवोत ह्या शुभेच्छा !

अशाच प्रसंगांमधून जाणवत राहतं की अर्ध्या रात्री हाकेसरशी गोळा होणारी माणसं जोडणं ह्याइतकं दुसरं धन नाही !

चित्रा's picture

23 Jan 2010 - 12:22 am | चित्रा

असेच म्हणते.

तुमच्या आईला लवकर बरे वाटू दे.

भानस's picture

22 Jan 2010 - 12:39 am | भानस

आंतरजालावरील आयडींच्या मागेही माणूस असतोच.
आपल्या आईंची तब्बेत लवकरात लवकर बरी होवो. माणसं आपसूक जोडली जातात फक्त अशा प्रसंगातून ती जोडलेली माणसं आपल्या हाकेला धावून येतील यावरचा विश्वास वाढीस लागतो. शुभेच्छा!
भाग्यश्री

निमीत्त मात्र's picture

22 Jan 2010 - 1:12 am | निमीत्त मात्र

आईंना लवकर आराम पडो. उदंड आयुष्यासाठी त्यांना ढीगभर शुभेच्छा!

व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी किंवा रिअल व्हर्च्युअ‍ॅलिटी म्हणतात ती हीच असेल का?

नाही. व्हर्चुअल रिअ‍ॅलीटी म्हणजे मोहमय जगच वास्तव वाटू लागते त्याला म्हणतात. इथे तुम्हाला मदत करणारे सगळे वास्त्वातले आहेत व्हर्चुअल नाहीत.

धनंजय's picture

22 Jan 2010 - 2:29 am | धनंजय

तुमच्या आईंना लवकर आराम मिळो ही सदिच्छा.

पाषाणभेद's picture

22 Jan 2010 - 3:23 am | पाषाणभेद

तुमच्या आई लवकरच पूर्ण बर्‍या होवोत ह्या शुभेच्छा !

खडूस's picture

22 Jan 2010 - 9:39 am | खडूस

तुमच्या आईंना लवकर आराम पडो. उदंड आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा!

- आहेच मी खडूस
पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत

समंजस's picture

22 Jan 2010 - 11:56 am | समंजस

हेच म्हणतोय!
माझ्या सुद्धा सदिच्छा!!

स्वाती२'s picture

22 Jan 2010 - 4:47 pm | स्वाती२

तुमच्या आईंना लवकरच आराम पडो.

ईन्शाअल्लाह , तुमची आई लवकर बरी होईल ...आमीन !!
~ वाहीदा

शाहरुख's picture

23 Jan 2010 - 1:54 am | शाहरुख

तुमच्या आईसाठी सदीच्छा !!

बहिणीचे शेजारी ??

बट्ट्याबोळ's picture

23 Jan 2010 - 11:28 pm | बट्ट्याबोळ

सदिच्छा!!सदिच्छा!!सदिच्छा!!सदिच्छा!!

दिनेश५७'s picture

24 Jan 2010 - 10:05 am | दिनेश५७

तुमच्या आईला लवकर बरे वाटू दे, ही सदिच्छा!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jan 2010 - 10:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुमच्या आईला लवकर बरे वाटू दे, हीच सदिच्छा ..!

[निखिल देशपांडे, बरं वाटलं रे... आता त्यात काय वगैरे म्हणाल. पण, आभासी जगातील माणुसकीचा प्रत्यय आला.]

-दिलीप बिरुटे

अमोल खरे's picture

24 Jan 2010 - 10:57 am | अमोल खरे

फक्त एका फोनकॉल वर निखिल पुनेरींच्या मदतीला धावला........काहि दिवसांपुर्वी राजे ला अपघात झाला त्यावेळी पण पुनेरी, परा, बिपिनदा आणि इतर अनेक मिपाकरांनी धावुन धावुन मदत केली. इतके डेडिकेटेड सभासद मिळणे हे केवढे मोठे भाग्य आहे...... मिपाचे ह्याहुन मोठे यश काय असु शकते. पुनेरींच्या आईंना लवकर बरे वाटो व त्यांना दीर्घायुष्य मिळो हीच प्रार्थना.