ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ७

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
10 Feb 2008 - 6:42 pm

याआधी: ले गई दिल 'दुनिया' जापानकी..६
रोक्कुसान
रोक्कूसान,रोक्कू पर्वत!आपण जसं हिंदीत आदरार्थी 'जी' लावतो ना,तसे हे जपानी 'सान' प्रत्यय लावतात.निसर्गाशी इतके कृतज्ञ असलेले हे जपानी लोक पर्वताच्या नावापुढेही 'सान' लावतात एवढेच नव्हे तर पेंग्विन्सान,डॉलफिनसान असेही संबोधतात.रोक्कूसानच्या पायथ्याशी असलेलं रोक्कूमिची हे सान नो मियापासून म्हणजे आमच्या गावापासून दुसरं स्टेशन,साधारण आपलं ठाणे-भांडुप अंतर असेल.तिथे जाऊन रोक्कूसान चढून तेथून मायासानवर जाऊन खाली उतरायचे असा बेत आम्ही ठरवला.त्याप्रमाणे रोक्कूमिची स्टेशनात उतरून पायथ्याशी जायला बस घेतली.एक जपानी आजोबा भारताविषयीच्या प्रेमाने आमच्याकडे कौतुकाने पाहत,तोडक्यामोडक्या इंग्रजीतून संवाद साधू लागले.त्यांनी आम्हाला केबलकारने वर जाण्याचा प्रेमळ सल्ला वजा आग्रहच केला.फुजितासानही हेच म्हणाली होती,केबलकारने वर जा आणि मग चाला हवे तितके.
रोक्कू केबलकारची ती भव्य पाटी आधी नजरेत भरली आणि लगेचच दिसली त्या पाटीखाली दिमाखात उभी असलेली ती केबल कार!आपल्या पेशवे उद्यानातील फुलराणी सारखी पण एकाच डब्याची ती गाडी साधारण ६०,६५ अंशाच्या कोनात उभी असावी.तिच्यात बसण्यासाठी मोठ्ठा जिना चढून जायचे.आजूबाजूला चिवचिवणारी मुलं,त्यांच्या आज्या,काचा नसलेल्या उघड्या खिडक्यातून दिसणारी रोकूसानची हिरवाई! डोंगरच्या कुशीतून,नव्हे अंगाखांद्यावरून थेट वरपर्यंत अत्यंत कठीण चढावर आपल्याच मस्तीत मशगूल होऊन ती जात असते, आणि रोकूसान आपल्याला बोलावत असतो,या माझ्याकडे! पहा तरी इथली झाडं,पानं,इथला निसर्ग!

डोळे भरून किती पाहू आणि किती नाही असे ते सारे दृश्य डोळ्यांनीच पित असताना आम्ही वर पोहोचलो.१००० मी उंचीवर, भन्नाट वारा, ढगाळ हवा,मध्येच येणारे चुकार किरण.. चालायला,फिरायला एकदम मस्त वातावरण!पक्ष्यांची किलबिल ऐकत,फुलं,पानं आणि फुलपाखरं पाहत,हवे तेथे थांबत,रोकूसानशी ओळख करून घेत आम्ही चालत सुटलो.पक्ष्यांच्या किलबिलाटाखेरीज दुसरा कसलाच आवाज नाही.एका बाजूने उंच उंच कडे तर दुसर्‍या बाजूला धुक्याच्या दुलईत गुरफटून शांत झोपलेली खोल खोल दरी! माळशेज किवा खंडाळ्याच्या घाटातल्या पावसाळी सहली आठवण साहजिकच होतं.. आमची बडबड,गप्पा आपसूकच थांबल्या आणि आम्हीही त्या नीरव शांततेत मिसळून गेलो.अक्षरशः भारावून चालत होतो.रोक्कूसानशी हळूहळू दोस्ती होत होती.

दरीऐवजी आता छोट्या छोट्या टेकड्या ,त्यावर चरणार्‍या मेंढ्या दिसायला लागल्या.येथे जपानमधील सुप्रसिध्द वूल आणि चीज फॅक्टरी आहे.'रोकूसान पाश्चर,कोबे चीज हाऊस' चा तो परिसर खरोखरच पाहण्यासारखा आहे.चीज आणि लोकर कसे तयार करतात ते पहायला मिळते.एवढेच नव्हे तर कोबे चीज रेस्टॉरंट मध्ये चीजचे वेगवेगळे पदार्थही खायला उपलब्ध आहेत आणि लोकरीचे वेगवेगळ्याप्रकारचे गुंडे आणि कपडेही विकायला ठेवलेले आहेत.चरणार्‍या मेंढ्या,घोडे,गाई यांच्यातून वाट काढत,टेकड्या चढत,उतरत त्या परिसरात मनमुराद भटकलो.चीजकेक,चीजचॉकलेटांवर ताव मारला आणि परत डोंगरमाथ्यावरून दर्‍यांकडे पाहत,फुलं निरखित,फोटो काढत,रमतगमत पुढे चालू लागलो.'माया केबल शीता' च्या रस्त्याने जाताना उंच डोंगरमाथ्यावरून जावे लागते.तेथून सारे कोबे दिसते.

मायाकेबल शीताचा प्रवास दोन टप्प्यातला आहे.पहिल्या टप्प्यात एका बंद पाळण्यातून १०/१२ माणसे २०० मीटर खाली आणतात. तेथे मायादेवीचे मंदिर आहे.तिची मूर्ती काही शतकांपूर्वी भारतातून येथे आणवली हे ऐकून आणि वाचून मंदिराबद्दलचे कुतुहल वाढले होते तसेच 'माया' नावामुळेही!मंदिर साधेसेच आहे, सर्वत्र इतकी शांतता आहेच आणि तेथे गेल्यावर अजूनच शांत वाटतं.
येथून आता केबल कारने रोकूमिचीला जायचे होते.सकाळी ७० अंशात उभ्या केबलशीतातून चढलो होते आता तसेच खाली उतरायचे होते.ज्युरासिकपार्कच्या राइडच्या आठवणी ताज्या होत्याच, आणि फोटो काढायचे म्हणून अगदी पुढे जाऊन बसलो.अगदी ड्रायवरसीटच्या लगतच्याच बाकड्यावर टेकलो.ड्रायव्हर होती एक जपानी सुहास्यवदना!बस,टॅक्सी,इंजिन ड्रायव्हर बाया पाहिल्या होत्या पण केबलकार हाकणारी ही ललना प्रथमच पाहत होते.तिचे कौतुक वाटल्यावाचून आणि कौतुक केल्यावाचून राहवले नाही.
चढतानाची मजा वेगळी,उतरतानाची वेगळी!त्यातून येता आणि जातानाचा आमचा मार्गही वेगळा होता.एका ठिकाणी समोरून चढणारी केबलशीता येत होती,आमची उतरत होती.एकच ट्रॅक,फक्त क्रॉसिंगपुरती काही फिटची डबल लाईन,आम्ही उतारावर,समोरची चढणीवर..एका मिनिटाचा जरी हिशेब चुकला असता तरी ... काही क्षण जीव मुठीत धरून बसलो होतो आणि हे दिव्य कसे पार पडते याचे कुतुहलही होतेच. बरोब्बर क्रॉसिंगला दोन्ही केबलशीता समांतर आल्या,रुमाल,हात हलले आणि गाड्यांचे क्रॉसिंग सहज झाले.कुतुहलाने समोरच्या शीतातल्या चालकाकडे पाहिले.इथेही जपानी वनिता!

खाली सुखरूप आल्यावर आमच्या चालिकेचे पुनःपुन्हा आभार मानत आणि कौतुक करत आम्ही तिला रोकूमिचीला जाणारी बस कुठून सुटते ते विचारले.उत्तरादाखल ती धावतच सुटली.१०/१२ पायर्‍या उड्या मारतच उतरुन तिने रोकूमिचीला जाणारी बस थांबवली.असा सुखद,सुंदर अनुभव बहुतेक सारेच जपानी देतात,पटकन मदत करून मोकळे होतात.आपण 'अरिगातो गोझायमास' म्हणून धन्यवाद दिले तर परत परत झुकून स्वतःच 'अरिगातो' म्हणतात.तिला सायोनारा करून बसमध्ये चढलो.काही अंतर गेल्यावर समजले वाटेत एक बस बंद पडल्याने रस्ता बंद झाला आहे.काही अंतर चालावे लागेल किवा ती बस वाटेतून बाजूला होईपर्यंत थांबावे लागेल असे २ पर्याय उरले.दिवसभराच्या चालण्याची नशा अजून असल्याने आम्ही चालायला सुरुवात केली.आणि थोड्या अंतरावर दिसलेलं दृश्य पाहून परत जपानी वेगळेपण जाणवलं.आमच्या बसमधले काही प्रवासी,बंद बसमधले प्रवासी आणि दोन्ही बसचालक मिळून बंद बस रस्त्यातून बाजूला काढण्याचा प्रयत्न करत होते.येणार्‍या मदतीची वाट न पाहता आपणहूनच मदतीचे अनेक हात पुढे आले.आम्हीही आपला हातभार लावायला तेथे गेलो तर 'अतिथी' म्हणून आम्हाला नम्र नकार आणि सगळ्यावर कडी म्हणजे मदत करणार्‍या दोन्ही बसप्रवाशांकडून आणि बस सोडून चालत पुढे गेलेल्या सर्व प्रवाशांकडून चालकाने तिकिट घेतले नाही! तसदीबद्दल क्षमस्वच नाही तर तसदीबद्दल चक्क फुकट प्रवास! सामाजिक बांधिलकीच्या लंब्याचौड्या भाषणांपेक्षा ही एक कृतीच खूप काही सांगून आणि शिकवून गेली. रोक्कूसानने दाखवला खर्‍या अर्थाने जपानी माणूस!

हे ठिकाण

प्रतिक्रिया

राजे's picture

10 Feb 2008 - 6:50 pm | राजे (not verified)

वा, नेहमी प्रमाणेच अप्रतिम लेखन.
जपानी समाजाची सामाजिक बांधिलकी विषयी ह्यापुर्वी ही खुप काही वाचले व येथे आलेल्या जपानी मित्रांशी वागताना जाणवलेच होते त्यावर तुमच्या लेखाने शिक्का मोर्तब केला.

पुढील भाग लवकर लिहा वाट पाहत आहे.

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

सुधीर कांदळकर's picture

10 Feb 2008 - 7:55 pm | सुधीर कांदळकर

फारच सुरेख. छायाचित्रे देखील छान. मजा आली. अरिगातो गोझायमास.

सर्वसाक्षी's picture

10 Feb 2008 - 10:21 pm | सर्वसाक्षी

सुरेख आणि नेमके वर्णन. एखादे ठिकाण पाहताना तिथली संस्कृतीही न्याहाळायची आणि बोध घ्यायचा हा प्रवासगुण आवडला

बेसनलाडू's picture

14 Feb 2008 - 12:14 pm | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

विसोबा खेचर's picture

11 Feb 2008 - 12:16 am | विसोबा खेचर

सामाजिक बांधिलकीच्या लंब्याचौड्या भाषणांपेक्षा ही एक कृतीच खूप काही सांगून आणि शिकवून गेली.

क्या बात है. जपान्यांकडून खरंच खूप शिकण्यासारखं आहे!

स्वाती, लेख नेहमीप्रमाणे उत्तम. चित्रंही क्लासच आहेत..

तात्या.

प्राजु's picture

11 Feb 2008 - 9:11 am | प्राजु

स्वाती,
खरंच, माणसे किती मदत करतात ना तिथे जपान मध्ये..!
खूप ऐकून आहे जपानी सामाजिक बांधिलकी बद्दल.

तुझी लेखनशैली तर खूपच सुंदर आहे. फोटोंवरून कल्पना येऊ शकते .

- प्राजु

सहज's picture

11 Feb 2008 - 6:28 am | सहज

बरेच दिवसांनी सहलीला नेलेत स्वातीसान. धन्यवाद, मजा आली. :-)

निसर्गाची मुक्त उधळण, त्याला शिस्तबद्ध नियोजनने सर्वांनी आस्वाद घ्यावा अशी सोय, वाहवा!!!

जुनी (कु) प्रसिद्ध जपानी म्हण
डोल्फीनसान, व्हेलसान | चविष्ट किती छान छान!! ||

प्रमोद देव's picture

11 Feb 2008 - 8:24 am | प्रमोद देव

स्वाती मस्तच लिहिले आहेस. प्रवासवर्णन,स्थानिक लोकांची आपुलकी आणि सभोवतालचा रमणीय निसर्ग ह्यांचे अतिशय नेमक्या आणि मोजक्या शब्दात चितारलेले दृष्य आणि सोबतची तितकीच बोलकी छायाचित्रे(त्याबद्दल दिनेशचे अभिनंदन) ह्यांनी आम्हीही ह्या प्रवासात सहप्रवासी आहोत असे वाटले.
तुझ्या निवेदनशैलीला सलाम!
असा सुखद अनुभव दिल्याबद्दल जपान्यांच्या भाषेत म्हणायचे झाले तर 'अरिगातो गोझायमास'

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Feb 2008 - 7:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वातीसान तुम्हाला 'अरिगातो गोझायमास' दिलेच पाहिजे सुंदर प्रवासवर्णनासाठी.
जपान्यांची आपूलकी, सुंदर निसर्गवर्णन आणि ओघवत्या भाषाशैलीने हा भागही नेहमीप्रमाणेच झक्कास झालाय.

अवांतरः- माणसांशी आदराने बोलणे समजते, पण निसर्गाशी आदराने बोलणारे जापानी नं. वनच असतील.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वाती राजेश's picture

11 Feb 2008 - 8:20 pm | स्वाती राजेश

स्वाती, छान लेखन केले आहेस. जपानी लोकांची मदत करण्याची व्रुत्ती छानच.
तसेच निसर्गाचे हुबेहुब वर्णन केले आहेस.फोटो नेहमी प्रमाणे मस्तच.

चतुरंग's picture

11 Feb 2008 - 8:25 pm | चतुरंग

फारच छान 'पूर्वरंग'! बर्‍याच दिवसांनी सुंदर-सचित्र सफर घडवून आणल्याबद्दल धन्यवाद.
आमच्या कंपनीत कामासाठी येणार्‍या जपान्यांचा अनुभव असाच आहे, अतिशय नम्र आणि विनयशील माणसे.
पण थेट जपानमधला अनुभव काही निराळाच असणार. जपानला भेट द्यायची उत्सुकता आणखीन वाढली हे नक्की!

चतुरंग

ऋषिकेश's picture

12 Feb 2008 - 8:11 pm | ऋषिकेश

चित्रदर्शी शब्द ही तर तुमच्या प्रवासवर्णनांची खासियत. सुबक शैली, चपखल शब्दयोजना आनि प्रामाणिक वर्णन यामुळे तुमचे प्रवासवर्णन वाचायला खूप आवडतं.

जसं हिंदीत आदरार्थी 'जी' लावतो ना,तसे हे जपानी 'सान' प्रत्यय लावतात

असं वाक्यागणिक समोरच्याशी नातं साधणं ही मला एकुणच आशियायी खासियत वाटते. आपणहि नाहि का अगदी कंडक्टर, रिक्षाचालक यांना कंडक्टर-काका, रिक्षावाले-काका किंवा भाजीवालीला मावशी असं नातं आपण सहज साधतो. याच मुळे जेव्हा विवेकानंद "ब्रदर्स अँड सिस्टर्स" म्हणाले असतील तेव्हा अमेरिकनांना मात्र ते नवीन आणि आपलंसं वाटलं असेल :-)

बाकी तिसर्‍या फोटोत दिसणारं सोनेरी झाड मला खूप खूप आवडलं. हा पानांचा रंग आहे की सूर्यकिरणांनी वाळलेली पानं सोन्यासारखी झळाळत आहेत?
बाकी हा ही भाग मस्त जमलाय हे वे सां न ल

-ऋषिकेश

स्वाती दिनेश's picture

14 Feb 2008 - 8:51 pm | स्वाती दिनेश

सूर्यकिरणांनी वाळलेली पानं सोन्यासारखी झळाळत आहेत?
हो ,तीसूर्यकिरणांचीच किमया :)
स्वाती

वरदा's picture

12 Feb 2008 - 11:38 pm | वरदा

मलापण जपानला जाऊन आल्यासारखं वाटंलं...एकदम बोलकं प्रवासवर्णन...

नंदन's picture

13 Feb 2008 - 12:23 am | नंदन

वर्णन आणि छायाचित्रे आवडली. मायादेवीच्या मंदिराबद्दलची माहिती रोचक आहे.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

चित्तरंजन भट's picture

14 Feb 2008 - 12:14 pm | चित्तरंजन भट

ओघवत्या लेखनशैलीतली ही लेखमाला उत्तम आणि माहितीपूर्ण झाली आहे. अभिनंदन, स्वातीसान!!

मनीष पाठक's picture

14 Feb 2008 - 3:17 pm | मनीष पाठक

मलाही जपानला जाऊन आल्यासारखं वाटंलं इतक बोलक प्रवास वर्णन आणि सुरेख छायाचित्रे. अजुन येउ द्यात.

मनीष पाठक

स्वाती दिनेश's picture

14 Feb 2008 - 8:49 pm | स्वाती दिनेश

धन्यवाद रसिकजनहो..सर्वांना मनापासून अरिगातो गोझायमास!
स्वाती