आख्यायिका

बिपिन कार्यकर्ते's picture
बिपिन कार्यकर्ते in जनातलं, मनातलं
20 May 2018 - 9:06 pm

भारत हा आख्यायिकांचा देश आहे. इथे हरघडी, हरवक्त, हरयुगी नवनवीन आख्यायिका जन्माला आल्या.

**

आख्यायिका सर्रियल भासतात. लाईफलाईक असतात. 'हे खरं आहे' असं वाटता वाटता एकदम भानावर येऊन लक्षात येतं अरे ही तर आख्यायिका आहे. पण आख्यायिका आभासी मात्र नसतात. किंबहुना त्या वास्तवाची जुळी प्रतिमा असतात. वास्तवाचं प्रतिबिंब असतात. त्यामुळे, आख्यायिका अमर आहेत. कारण वास्तव अमर आहे, अचल आहे.

**

भक्तीमार्गात नवविधा भक्ती सांगितल्या आहेत. श्रवण, किर्तन, स्मरण, वंदन, अर्चन, पादसंवाहन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन असे ते भक्तीचे प्रकार. सांगणारे सांगून गेले. पण भक्तीमार्ग जनमानसात रूजला आणि लोकांनी त्यात भर टाकली. त्यातून एक आख्यायिका जन्माला आली.

**

रावणाने रामाशी शत्रुत्व पत्करले. लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले, विटंबना केली. त्यामुळे रावण संतापला आणि त्याने सूड घ्यायचा चंग बांधला. रामाचा मत्सर, द्वेष करू लागला. सीतामाईला पळवून आणले. पुढे त्याचे शत्रुत्व इतके वाढत गेले की तो त्यामुळे पार आंधळा झाला. त्याने सतत रामाचा विचार चालवला, त्याचाच ध्यास घेतला, येता जाता त्याचे नाव घेऊ लागला. राममुक्त भारत करायचा चंगच बांधला म्हणा ना. पण भगवान विष्णू कसले लै भारी दयाळू. द्वेषामुळे का होईना पण तो आपले नाव घेतोय सतत हे त्यांना समजले आणि त्यामुळे त्यांनी रावणाचे कल्याण केले. शेवट आला तेंव्हा इतर कुणाच्याही हातून रावणाचा मृत्यू घडवून आणणे सहज शक्य असूनही त्यांनी स्वतः त्याला मारले. साक्षात भगवंताच्या हातून मृत्यू आला, मरतेसमयी भगवंताचे दर्शन झाले म्हणून रावण वैकुंठगतीला प्राप्त झाला.

**

याला विरोधभक्ती असं म्हणलं गेलं.

**

विरोध करताना डोळसपणा जपला पाहिजे. आंधळेपणा आला, तर आपण प्राणपणाने ज्याचा विरोध करतो, त्याच्यासारखेच आपण बनण्याचा जंगी संभव असतो. पण डोळसपणा जपणं फार कठीण.

**

ही झाली सत्यबित्ययुगातली कथा. काळ पुढे सरकला. युगं आली गेली. पार कलियुग आलं. मानवी वृत्ती मात्र सनातन तशीच राहिली. आंधळेपणाचे धोके तसेच राहिले. डोळसपणा जपणं कठीणच राहिलं.

**

भारत हा आख्यायिकांचा देश आहे. इथे हरघडी, हरवक्त, हरयुगी नवनवीन आख्यायिका जन्माला येत आहेत.

संस्कृतीइतिहासमुक्तकसमाजप्रकटनविचार

प्रतिक्रिया

गामा पैलवान's picture

20 May 2018 - 9:56 pm | गामा पैलवान

बिका,

या लेखाचं तात्पर्य असं की मोदींचा सारखा द्वेष करू नये. उगीच मरतांना मोदींचं नाव जिभेवर चुकून राहिलं तर .... !

उपतात्पर्य : पप्पूची जास्त टवाळी करू नका. मोदीपरीस ज्यादा डेंज्यार हाय त्ये.

आ.न.,
-गा.पै.

शाली's picture

20 May 2018 - 11:25 pm | शाली

+१

रमेश आठवले's picture

21 May 2018 - 2:19 am | रमेश आठवले

+1

कोण's picture

21 May 2018 - 11:17 am | कोण

+१

गणामास्तर's picture

20 May 2018 - 11:42 pm | गणामास्तर

समयोचित रुपककथा आवडली.
समर्थन किंवा विरोध करताना डोळसपणा हरवलेला जागोजागी दिसतोच आहे सध्या.

प्रचेतस's picture

21 May 2018 - 8:26 am | प्रचेतस

सहमत

अजून एक आख्यायिका आठवली सहजच.

महाभारत युद्ध शेवटच्या टप्प्यात आले होते, कर्णार्जुन घमासान युद्ध करत होते. इतक्यात कर्णाच्या रथाचे चाक भूमीने गिळले.. कर्ण हवालदिल झाला,
अर्जुनाला म्हणाला, बाबारे मला ते चाक तेव्हढे काढुदे. शस्त्रहीनावर वार करणे धर्मयुध्दात बसत नाही.
कृष्णाला संताप आला. त्याने कर्णाच्या सगळ्या पापांचा पाढा वाचून दाखवला आणि अर्जुनाला म्हणाला, बाबारे ज्यांचा जन्म अधर्म करण्यात गेला, त्यांचा मृत्यू धर्माने व्हायची गरज नाही.

अर्जुनाने बाण उचलला आणि कर्णाच्या मानेचा वेध घेतला. जग आज कृष्णालाही पूजते आणि अर्जुनालाही.

कथाच म्हणायची ती.

सस्नेह's picture

21 May 2018 - 12:25 pm | सस्नेह

रोख समजला.
..दु:ख इतकेच आहे की रावण कोण आणि राम कुठला इथेच घोळ आहे :)
किंवा कदाचित भूमिका बदलत असाव्यात =))

मराठी कथालेखक's picture

21 May 2018 - 5:15 pm | मराठी कथालेखक

सत्तेचं गाढव गेलं आणि नैतिकतेचं ब्रह्मचर्यही गेलं !!

मी तर डोळसपणालाच प्राणपणाने विरोध करणारे. थोड्या दिवसांनी मी पूर्ण डोळस होण्याचा जंगी संभव आहे. ;)