यंदा कर्तव्य आहे? भाग ७

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in जनातलं, मनातलं
9 Mar 2009 - 9:15 am

यंदा कर्तव्य आहे? पुस्तकाचे
मनोगत
यंदा कर्तव्य आहे? भाग १
यंदा कर्तव्य आहे ? भाग २
यंदा कर्तव्य आहे? भाग ३
यंदा कर्तव्य आहे ? भाग ४
यंदा कर्तव्य आहे? भाग ५
यंदा कर्तव्य आहे? भाग ६
मुहुर्त.....

रूईकर पंचाग असल्यावर मुहूर्ताची काळजी कशाला?
आता एखाद्या पंचांगात जर मे,जून मध्ये मुहूर्त नाहीत म्हणून काय त्या काळात लग्न व्हायचीच नाहीत असे थोडे आहे. ज्यांना कसही करून करायचचं आहे ते कशाला मुहूर्ताची वाट बघतायतं? पण ज्यांना करायची तर इच्छा आहे पण मुहूर्ताची रूखरूख वाटू नये त्यासाठी रूईकर पंचांग लगेच पुढे सरसावले त्यांनी याकाळात सुद्धा 'शास्त्राधार` देउन मुहूर्त दिले आहेत. असे एखादे धर्मसंकट कोसळले की शास्त्राधार शोधले जातात व ते मिळतातही. या शास्त्रांच अगदी कायद्या सारखं आहे वाटा तेवढया पळवाटा. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला धर्मपंडितांनी नकार दिल्यावर सुद्धा काही धर्मपंडितांनी 'शास्त्राधार` शोधून त्यावर तोडगा काढलाच ना! मग एवढा द्राविडी प्राणायम करत बसण्यापेक्षा आपल्याच सोयीचा आधार घेतला तर काय वाईट?

सिंहस्थ आणि विवाह मुहूर्त
सिंहस्थात विवाह करू नये असे म्हणतात. सिंहस्थ याचा अर्थ असा की, गुरु जेव्हा सिंह राशीत असतो तो काळ. गुरु एका राशीत वर्षभर असतो. गुरु हा संततीचा कारक ग्रह मानला गेला आहे. गुरुलाच संतती देण्याचा मक्ता कुणी दिला याविषयी खुलासा सापडत नाही. तसे सर्वच ग्रहाचे कारकत्व कुणी ठरविले यालाही समर्पक उत्तर नाही. केवळ ग्रंथप्रामाण्य हेच त्याचे उत्तर आहे. पण गुरु हा संतती कारक ग्रह आहे याविषयी मात्र ज्योतिषांचे एकमत आहे. तर सिंह रास ही वंध्या रास मानली गेली आहे त्यामुळे संततीकारक ग्रह गुरुच जर या काळात वंध्या राशीत असेल तर या काळात विवाह केल्यास संतती होत नाही असा समज दृढ झाला. परंतु प्रसिद्ध ज्योतिषी श्री. के. केळकर यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या कुंडल्यांवरून जो सर्व्हे केला त्याचे निष्कर्ष मात्र या समजुतीच्या विरुद्ध आहेत. आक्टोबर १९४३ ते सप्टेंबर १९४४ या सिंहस्थ-काळात विवाहित झालेल्या १०२ दांपत्यांपैकी ९३ दांपत्यांना संतती झाली, तसेच आक्टोबर १९५५ ते आक्टोबर १९५६ या सिंहस्थ-काळात विवाहित झालेल्या १७४ दांपत्यापैकी १६५ दांपत्यांना संतती झाली, असे त्यांना आढळून आले. यावरून वरील समज बिनबुडाचा आहे हे सिद्ध होते. (संदर्भ :- ग्रहांकित जाने १९९१.)

आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणारं?

समजा एवढ सगळं करून जर मुहूर्तावर गोष्ट केली आणि त्यात अपयश आलं तर मग काय? त्यालाही उत्तर आहे. जर तुमच्या जन्मकुंडलीतच जर विवाहसौख्य नाही तर कितीही मुहूर्त पाहिले तरी जे आडातच नाही ते पोहऱ्यात कुठून येणार? तुमच्या जन्मकुंडलीतच जर वास्तूसौख्य नाही तर कितीही वास्तू शास्त्रानुसार घर घेतल आणि मुहूर्तावर गृहप्रवेश केलात तरी काय उपयोग. एक वास्तूशास्त्री कम ज्योतिषी म्हणतात,'' माझे कडे जे येतात त्यांची मी प्रथम पत्रिका बघतो व त्यात वास्तूसौख्याचा योग असेल तरच तुम्हाला वास्तूच्या अल्टरेशनसाठी सुचवतो. विनाकारण कुणाला खडयात घालत नाही.`` एका ज्योतिषाला एकदा मी विचारल, '' काहो आता विज्ञानाला प्रसूतीची वेळ सहज पुढे मागे करता येते. मग चांगल्या मुहूर्तावर जन्माला घालणे सहज शक्य आहे. मग जन्माला येणाऱ्या बालकाची जन्मवेळ बदलणे तुमच्या हातात आलं. म्हणजे भविष्य बदलणं आपल्या हातात आलं की? `` त्यावर त्यांनी शांतपणे सांगितलं की, '' अस जन्माला येणे हे निसर्गाला धरून नसलेने त्या ठिकाणी जन्मकुंडलीचे नियम तिथे लागू होत नाहीत.`` निवडणुकीचे फॉर्म सुद्धा मुहूर्तावर भरणे जरूरीचे मानतात. उगाच पनौती नको.प्रचाराचा प्रारंभसुद्धा मुहूर्तावरच होतो. कुणीतरी एकच उमेदवार निवडून येणार हे सर्वांना जरी माहीत असले तरी आपण आपल्याबाजूने काळजी घ्यावी. त्यातूनही अपयश आलचं तर नशीब,प्राक्तन आहेच.
महात्मा फुल्यांनी गेल्या शतकात विचारल होतं की का हो आपल्याकडे एवढी पत्रिका गुणमेलन करून मुहूर्त पाहून लग्न करतात तरी बाल विधवांचे प्रमाण जास्ती का? आणि तिकडे युरोपात गोऱ्या मडमा असे काही न करता लग्न करतात तरी तिकडे असे का नाही? साधी गोष्ट आहे आपल्याकडे बालविवाहाची पद्धत रूढ होती.साथीच्या रोगांमुळे बालमृत्यूचही प्रमाण जास्ती होतं साहजिकच बालविधवांचे प्रमाण जास्तच असणार. इथं कुठं मुहूर्त आणि पत्रिका आल्या.

यंदा कर्तव्य आहे? भाग ८

फलज्योतिषविचार

प्रतिक्रिया

अवलिया's picture

9 Mar 2009 - 11:02 am | अवलिया

उत्तम. वाचत आहे...

--अवलिया

अमोल नागपूरकर's picture

9 Mar 2009 - 3:17 pm | अमोल नागपूरकर

सिंहस्थ आणि विवाह मुहूर्त
मी सिंहस्थात विवाह न करण्याचे वेगळेच कारण वाचले आहे. सिंह ही नव ग्रहान्चा अधिप्ती असलेल्या सूर्याची राशी आहे तर ब्रुहस्पती हा देवगुरु आहे. म्हणजे सिंहस्थात गुरु हा ग्रहराजाच्या घरी येतो. अशा वेळेला विवाह किंवा मौज मजेचे इतर समारम्भ न करता हा काल जप तप , पूजा, धार्मिक क्रुत्ये इत्यादी करण्यात लोकांनी घालवावा म्हणून सिंहस्थात विवाह करत नाहित.

प्रकाश घाटपांडे's picture

9 Mar 2009 - 5:18 pm | प्रकाश घाटपांडे

लेखमाले च्या निमित्ताने अशा काही गोष्टींचे आदान प्रदान होते.विवाहाचे उद्देश बर्‍याचदा वंशवृद्धी असते. त्याला धोका म्हणल्यावर लोक विवाह करणार नाहीत असे हे सिंहस्थाचे भय.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

मराठी_माणूस's picture

9 Mar 2009 - 4:08 pm | मराठी_माणूस

'' अस जन्माला येणे हे निसर्गाला धरून नसलेने त्या ठिकाणी जन्मकुंडलीचे नियम तिथे लागू होत नाहीत.``

जन्म ही नैसर्गीक प्रक्रीया आहे त्याला "हे निसर्गाला धरून नसलेने " असे कसे म्हणता येईल

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Mar 2009 - 5:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्राण्यांनी 'केलेल्या' सर्व गोष्टी नैसर्गिक तर माणसाने केलेल्या अनैसर्गिक का? सिझेरीयन सेक्शनमधून झालेला जन्म निसर्गनिर्मित माणसामुळेच झालेला असतो ना? 'अनैसर्गिक' किंवा 'कृत्रिम' याची नक्की व्याख्या काय?

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

प्रकाश घाटपांडे's picture

9 Mar 2009 - 5:09 pm | प्रकाश घाटपांडे

त्यांचे मते सीझर बेबी ही डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे जन्माला घातलेले मुल म्हणजेच 'निसर्ग नियमाच्या विरुद्ध ' असा अर्थ लावला. नॉर्मल डिलिव्हरी ला कुंडलीचे नियम लागु होतात. आता सिझर सर्रास चालू असल्याने तो विचार फारसा करत नाही. काही वेळा (त्यातल्या त्यात)मुहुर्त पाहुन डॉक्टरांना सांगतात. आता सिझर करुन टाका.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

लिखाळ's picture

9 Mar 2009 - 5:14 pm | लिखाळ

नेमक्या त्या विवक्षित क्षणीच जन्माला येणे हे त्या मुलाच्या नशिबात असल्याने डॉक्टरांना सिझेरियन करुन जन्म देण्याची बुद्धी झाली. मला पत्रिका बनवता येत असती तर मी 'स्पेशल - देवाच्या तातडीच्या विशेष इच्छेने झालेली मुले' म्हणून अश्या पत्रिकेच्या परिक्षणाला जास्त शूल्क आकारले असते ;)
-- लिखाळ.

लिखाळ's picture

9 Mar 2009 - 4:35 pm | लिखाळ

लेखमाला चांगली चालू आहे. वाचतो आहे.
-- लिखाळ.

विनायक प्रभू's picture

9 Mar 2009 - 5:00 pm | विनायक प्रभू

असेच म्हणतो.