यंदा कर्तव्य आहे? भाग ५

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in जनातलं, मनातलं
28 Feb 2009 - 10:06 pm

यंदा कर्तव्य आहे? पुस्तकाचे
मनोगत
यंदा कर्तव्य आहे? भाग १
यंदा कर्तव्य आहे ? भाग २
यंदा कर्तव्य आहे? भाग ३
यंदा कर्तव्य आहे ? भाग ४
मंगळाची दहशत
पूर्वी मुलीच्या बापाला मुलगी म्हणजे एक भार त्यातून मुलीला मंगळ असला की विचारायलाच नको. अशावेळी एखादे गुरूजी कम ज्योतिषी कम मध्यस्थ ही मुलगी खपवायचे काम कुशलतेने करीत असत. हे ज्योतिषी कम मध्यस्थ राहू, केतू शनी इत्यादि ग्रहांना जाब विचारून मंगळदोष परिहार करून ही मंगळी खपवत असत. अशा मध्यस्थीतून त्यांना बराच फायदा होत असे. साहजिकच मंगळाचा बागुलबुवा जोपासला गेला कारण त्यात हितसंबंध गुंतलेले असायचे. त्यामुळे विवाहाच्या सौदेबाजीत मंगळ हा एक हुकमी पत्ता ठरला.
सांगून आलेल्या मुलाची / मुलाची पत्रिका मंगळाची आहे किंवा नाही हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज भासत नाही. किरकोळ आजारासाठी आपण लगेच डॉक्टरकडे धावतो का? आपल्याला घरगुती वा प्राथमिक उपचार माहीत असतात. तद्वत हा मंगळाचा प्रथमोपचार अनेकदा माहीत असतो. घरात धार्मिक प्रथमोचाराचे अंग म्हणून टांगलेल्या पंचांगात तो दिलेला असतो. जन्मकुंडलीत १,४,७,८,१२ यापैकी कुठल्याही स्थानात मंगळ असेल तर तो मंगळदोष आहे असे समजले जाते. ताऱ्यांना जशी तेजाची प्रत असते तशी या मंगळालाही प्रतवारी आहे. कडक मंगळ, सौम्य मंगळ, क्षम्य मंगळ वगैरे. ही प्रतवारी पत्रिकेत मंगळ किती पॉवरफूल आहे यावरून ठरवली जाते.
मंगळदोष म्हटला की वैवाहीक सौख्याचा बोऱ्या, वैधव्य असा समज आहे. उगीच विषाची परिक्षा कशाला घ्या! 'मंगळ्या`ला मंगळी नसली तरी चालते पण मंगळीला मात्र मंगळ्याच लागतो. जन्मकुंडलीतील बारा स्थानापैकी जर पाच स्थानात मंगळ म्हणजे जवळजवळ चाळीस टक्के जागा या मंगळाने व्यापली आहे. मग विवाह जमणे मुश्कील होईल म्हणून पूर्वाचार्यांनी सौम्य मंगळ, क्षम्य मंगळ अशी उपाययोजना करून ठेवली आहे. मंगळाचा इतिहास हा काही फार प्राचीन नाही. मंगळदोषाचे उल्लेख हे मुहूर्त गणपती, मुहूर्त चिंतामणी, भाव चिंतामणी, ज्योतिर्महार्णव अशा ग्रंथांमध्ये आढळतात. मुहूर्तचिंतामणी हा ग्रंथ रामभट या ज्योतिषाने श्री क्षेत्र काशी येथे शके १५२२ मध्ये लिहिला. या ग्रंथामध्ये मंगळदोषासाठी अपवादही निर्माण केले. वधुच्या पत्रिकेत जर वरील स्थानापैकी मंगळ असून वराच्या पत्रिकेतही त्याच वरीलपैकी स्थानात असेल तर मंगळाने मंगळास जाब पाहिला असे म्हटले जाते. आखाड्यातील पहिलवान जशी एकमेकाची ताकद अजमावत असतात त्या पद्धतीने वधूवरांच्या पत्रिकेत मंगळ एकमेकांना जाब विचारतात. अशा त-हेने मंगळ्याला मंगळी जमून जाते. आखिर लोहा लोहोको काटता है ना! नंतरच्या ग्रंथकारांनी जाब विचारण्याचे अधिकार हे शनी, राहू, केतू यांना दिले आहेत. पत्रिकेतील गुरू, शुक्र हे ही शुभ ग्रह आपापल्या स्टेटस नुसार नैतिक दबाव आणू लागले. मेष, कर्क, वृश्चिक, धनु, मीन या राशीही मंगळाला आंजारू गोंजांरू लागल्या. पत्रिका गुणमेलनात जर २७ किंवा त्यापेक्षा अधिक गुण झाले तर मंगळाकडे काणाडोळा करू लागले अशा रितीने मंगळाचे अपवाद वाढू लागले. अनेक ज्योतिषांनी सुद़्धा मंगळ हे खूळ आहे अशी सडेतोड भूमिका घेतली. या मध्ये वि.गो.नवाथे, सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, द्वा.ना. राजे, ज्योतिषाचार्य सुंठणकर इत्यादि मान्यवर लोकांचा समावेश आहे.
ज्योतिषाचार्य सुंठणकर यांची मते
ज्योतिषाचार्य सुंठणकरांनी तर मंगळदोषाचे स्तोम ज्योतिषांनीच माजवले आहे असे म्हणून 'विवाह मंगळाची अनावश्यकता` या १९६६ साली लिहिलेल्या पुस्तकात ज्योतिष शास्त्राच्या चौकटीत राहूनच ज्योतिषांचा खरपूस समाचार घेतला आहे. या पुस्तकाला आशिर्वाद पर प्रस्तावना संकेश्वर पीठाचे शंकराचार्य लिहताना म्हणतात, '' ही पुस्तिका वाचून विवाह जुळते समयी वधूवरांच्या कुंडलीतील १, ४, ७, ८, व १२ या स्थानातील मंगळ पाहून कोणीही घाबरुन जाउन विवाह मोडण्याची मुळीच जरुर नाही, एवढा अर्थबोध जरी झाला तरी पुस्तिका लिहिल्याचे सार्थक झाले.``
या पुस्तिकेत सुंठणकरांनी तर मंगळदोषाला १०७ फलज्योतिषशस्त्रीय अपवाद ग्रंथाधारे दिले आहेत. ते म्हणतात, ''भौगोलिक परिंस्थितीसुद्धा मंगळदोषाचा परिहार करतात.
गोदावरीदक्षिणतीरवासिनां भौमस्य दोषा नहि विद्यते खलु ।
अर्थ :- गोदावरी नदीच्या दक्षिण प्रदेशात स्थाईक असणाऱ्यांना मंगळ दोष मानू नये. हे एक संस्कृत वचन ज्योतिर्मार्णव ग्रंथात दिले आहे. त्याचप्रमाणे
कलिंगनामा यमुनांशमालवौ सुमागध: सिंधुसुभोजसौ नृपा: ।
अमीरस्युरंशोर्ग्रहजन्म देशकासस्थैव ते स्यु: फलदायका ग्रहा: ।।
ज्योतिष संग्रह या ग्रंथातील वरील शास्त्राधाराचा आशय असा की सूर्याचे जन्मस्थान कलिंग देश, चंद्राचे जन्मस्थान यमुना तीर, मंगळाचे जन्मस्थान मालवदेश, बुधाचे जन्मस्थान मगध देश, गुरुचे आणि शनीचे जन्मस्थान सौराष्ट् देश या ग्रहाचे जन्म प्रदेश शास्त्रात सांगितले असून त्या त्या ग्रहांचे परिणाम त्या त्या प्रदेशांवर विशेषत्वाने होत असतात. या अनुषंगाने मालव देशात तेवढाच मंगळ पहावा व बाकीच्या प्रदेशात मंगळ दोष मानू नये. या शिवाय धर्मशास्त्र असो वा ज्योतिषशास्त्र असो दोष आला म्हणजे परिहार वा तोडगा आलाच. मंगळाची शास्त्रोक्त शांती, विष्णु उपासना, शुचिर्भूतपणे मंगळाचा किमान १० हजार जप, मंगळजपाने अभिमंत्रित प्रवाळ रत्नाची अंगठी इत्यादी मुळे मंगळदोषाचा परिहार होतो. वैधव्याच्या भीतीतून मुक्त होण्यासाठी सावित्रीव्रताचे आचरण ही सांगितले आहे. त्या शिवाय कुंभविवाह धर्मसिंधुमध्ये सांगितला आहे. वैधव्य हरा: कुंभ विवाह:। वैधव्य टाळण्यासाठी विवाहापूर्वी मातीचा कुंभ घेउन त्यात विष्णुप्रतिमेची विधीपूर्वक स्थापना करावी. त्याची प्रार्थना करुन प्रतिमेसह तो कुंभ जलाशयात वा नदीकाठी फोडून तो विसर्जित करावा. म्हणजे कुंभरुप पतीशी विवाह होउन वैधव्यादियोग कुंभासमवेत नाश पावतात. नंतर मानवी पतीशी विवाह करावा.
तसे पाहिले असता उपरोक्त पाच स्थानात मंगळ असता वैवाहिक जीवन विफल होते अगर त्यात विघ्ने येतात हा लोकापवाद म्हणजे एक खूळच आहे. वैवाहिक जीवनात मंगळ विघ्ने आणू कसा शकतो हे शास्त्रीय दृष्टया गूढच आहे. बरे ज्या ज्योतिषशास्त्राने मंगळाच्या पद्धतीचा पुरस्कार केला त्या शास्त्राने उपरोक्त पाच स्थानापैकी प्रत्येक स्थानात कोणती विविक्षित फळे अनुभवास येतात याचा खुलासा अवश्य करावयास पाहिजे होता. म्हणजे या मंगळाच्या पद्धतीत विश्वासनीयता व निश्चिती आली असती. ज्यानी ही पद्धत पुरस्कारली त्यांनी या पद्धतीची तपशीलवार व सुसंगत फलमीमांसा अशी स्पष्ट केली नाही हे एक आश्चर्य होय. या दोन्ही पक्षाना ज्योतिषशास्त्राने अज्ञान अंधारात चाचपडत ठेवले आहे. जनता काय किंवा ज्योतिर्विद काय दोघेही निव्वळ अंधश्रद्धेने वा अंधानुकरणाने या मंगळाचा पाठपुरावा करीत असतात. मंगळ का पहायचा याची चिकित्सा कोणीही करीत नाही. करायची म्हणजे या पद्धतीस निश्चित अशी शास्त्रीय पार्श्वभूमी नाही. एवढे असूनसुद्धा जनता व ज्योतिषी या पद्धतीचा पिच्छा सोडण्यास तयार नाहीत. भारतीय जनतेत रुढीप्रियतेचा गुण वसत असतो. त्याचे प्रत्यंतर म्हणजे मंगळाची पद्धती होय. मंगळाच्या पद्धतीचे ठाम स्वरुप व निश्चित परिणाम कोणासही स्पष्टपणे ठाउक नाहीत व ते जाणून घेण्याची जिज्ञासाही विशेषसे कोणी दाखवत नाही. नाही पेक्षा मंगळ समस्या एवढी जाचक होउन बसली नसती. मेंढरे जशी अंधानुकरणाची प्रवृत्ती ठेवतात तद्वत समाज अंधानुकरणाने अनभिज्ञपणे वागतो. अशीच ही रुढी 'महाजनो येन गतस्स: पंथा:` या न्यायाने शतकानुशतके बागुलबुवा होउन समाजाकडून जोपासली गेली आहे.
या बागुलबुवाची दखल घ्यावयाची कोणी? तर ज्योतिर्विदांनी! ती आजपर्यंत कधी घेतली गेली नाही व अशी दखल ते घेणेही संभवत नाही. आजपर्यंत कोणा ज्योतिर्विदाने वैवाहिक जीवनात विविध विघ्नांचे उगमस्थान मंगळच आहे असे मंगळाच्या पद्धतीचे रहस्य उकलून समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला नाही. अर्थात तसा तो करताही येणार नाही व केल्यास शास्त्र व प्रत्यक्ष अनुभूती यांच्या कसोटीवर तो उतरणारही नाही. ही त्रिकालाबाधित वस्तुस्थिती आहे.समाजात मंगळाचे खूळ पसरवून ठेवून ते जोपासले जाईल असा एक सतत प्रयत्न करण्यात ज्योतिर्विदांनी चांगलाच हातभार लावला आहे. बिचारी अंधश्रद्धाळू व भाबडी जनता अवगत नसलेल्या ज्योतिषशास्त्रास प्रमाण मानण्यापेक्षा त्या शास्त्राचे प्रतिनिधित्व व परिशिलन करणाऱ्या ज्योतिर्विदावर विश्वास, भरवसा ठेवून चालते. ज्योतिर्विदांनी सांगितलेले मार्गदर्शन भाविकपणे प्रमाण मानायचे अशी प्रवृत्ती सामान्य जनात वसत असते. ही पद्धती चिकित्सक दृष्टिने न अभ्यासता अंधानुकरणाने ज्योतिषांनी एकमेकापासून उचलली असून आजतागायत या पद्धतीच्या प्रचारास खतपाणी घालण्याचे महान व्रत त्यांनी घेतले आहे. मंगळाच्या पद्धतीच्या फलसंहितेचा खुलासा करुन घेण्याची जिज्ञासा आजपर्यंत ज्योतिषांनी दाखविली नाही. यदाकदाचित मंगळाच्या पद्धतीचा बाष्कळपणा समाजास उकलला तर ज्योतिषी लोकांचा व्यवसाय फार मोठया प्रमाणात मार खाईल अशी साधार भीती त्यांना वाटत असल्यास न कळे! ज्योतिष कार्यालयांच्या उत्पन्नाचा फार मोठा वाटा या मंगळाने उचलला असल्याने ज्योतिर्विद मंडळी या पद्धतीच्या भंपकपणाकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करीत असतील असे म्हणणे धाडसाचे ठरणार नाही.
मंगळाचे जाब मंगळ, रवि,राहू केतू व शनि या ग्रहांच्या योगान पाहिला जातो हा सिद्धांत काटयाने काटा काटा काढण्याच्या न्यायावर आधारलेला आहे. एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील एखाद्या विविक्षित अंगात काटा मोडला असता काटा घेउन दुसऱ्या जोडीदाराच्या शरिरातील त्याचा विविक्षित अंगातून तो काटा काढतां म्हणणे बाष्कळपणाचे व हास्यास्पद ठरते. तद्वतच एखाद्या कुंडलीतील अनिष्ठ मंगळ दुसऱ्या कुंडलीतील १,४,७,८,१२ या स्थानात असणारे शनि, मंगळ, राहू, केतू, रवि आदि ग्रह जाब पहातात म्हणून तो सुनिष्ठ ठरतो असा सिद्धांत प्रतिपादणे असंयुक्तिक व अशास्त्रीय होय.
आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जन्मवेळेची अनिश्चितता. अनिश्चित जन्मवेळेनुसार तयार केलेल्या कुंडलीनुसार मंगळ पद्धती परिक्षिली जाते. पूर्वी घडयाळे नव्हती. असल्यास जन्मवेळ अनिश्चित आधारांवर नोंदवली जात असे. अंदाजे जन्मवेळेवरुन केलेल्या कुंडल्या विश्वसनीय नव्हेत. अशा कुंडलीवरुन मंगळ पद्धती पाहण्यात हाशील कोणते आहे? दुसरा मुद्दा असा की मंगळ पद्धती संपूर्ण चुकीच्या मार्गाने गावंढळपणे तपासली जाते. स्पष्टग्रह भावचलित कुंडली प्रमाणे मंगळ पहावा हा रास्त शास्त्रीय राजपथ! पण सिद्धांतानुसार अनुसरुन चालावे कोणी? स्पष्ट ग्रहभावचलित कुंडली करणारे ज्योतिर्विद दुर्मिळ! त्यातही अशा कुंडल्या जनतेच्या खिशास परवडणाऱ्या नव्हेत. मग भावचलित स्पष्ट ग्रह कुंडल्यानुसार झटपट रंगारी पद्धतीच्या मंगळ पद्धतीस तसे तिचे प्रचारक दलाल जे ज्योतिषी याना दुर्घट असलेला या शास्त्रीय मार्गाचे वावडे असल्यास नवल नाही. प्रत्येक वेळी साध्या कुंडलीपेक्षा भावचलित स्पष्टग्रह कुंडलीनुसार 'खुलासेवार मंगळ` तपासून घेण्याची दलाली सामान्य जनतेच्या ऐपतीबाहेरची आहे. तात्पर्य मंगळ पाहण्याची दिशा चुकीची, अशास्त्रीय, ढोबळ आहे. मंगळ पाहणेच चुकीचे! मग ते चुकीच्या मार्गाने पहाणे साफ घोडचूक ठरते. मंगळ पद्धती समाजाची नाहक दिशाभूल करुन आपल्या ''दलाला`` मार्फत गरीब जनतेस नाडवीत असते याचे हे ज्वलंत उदाहरण आहे.
जगात अगणित विवाह होत असतात. भारत सोडल्यावर सर्व जगभर मंगळ पद्धती विचारात न घेता विवाह जमत असतात. मंगळ पद्धती सर्व जगातल्या लोकांना कशी भोवत नाही? का फक्त भारतीय जनतेच्या बोकांडी बसण्याचा तिचा हेका आहे? सदा सर्वदा पृथ्वीतलावर थोडयाशा लोकांना वैवाहिक जीवन विफलतेचा फटकारा बसत राहणार या निसर्गक्रमास थांबवण्याची ताकद मंगळ पद्धतीच्या कुवतीच्या बाहेरची आहे.``

ज्योतिषाचार्य द्वारकानाथ ना.राजे आपल्या 'जातक दीप` पुस्तकात म्हणतात, '' आमचे मते मंगळाचे जे प्रचलीत खूळ आहे त्यात काही अर्थ नाही. मंगळाचे गुणदोष, राशिस्थान व दृष्टियोग यानेच ठरवावे व ते जातकशास्त्रास अनुसरून असावे.``

ज्योतिषी ह.ने काटवे आपल्या 'मंगळ विचार` पुस्तकांत म्हणतात, '' आपल्या देशात विवाह जमविताना वधुवरांचा मंगळ पहाण्याचा प्रघात आहे. या मंगळा बद्दल सर्व मुहूर्त ग्रंथातून विवेचन केलेले आहेच. मंगळ पहाण्याची आजची जी पद्धत आहे ती अत्यंत हास्यास्पद आहे.``
मंगळदोष ही अंधश्रद्धा आहे असे काही आधुनिक ज्योतिषी सांगतात. अहो मंगळ हे धडाडी, कार्यक्षमता, यंत्रकुशलता यांचे प्रतिक. पूर्वीच्या काळात स्त्रीचे स्थान घरात होते. चूल आणि मूल. एकत्र कुटुंब पद्धती होती. अशी धडाडीची स्त्री सून म्हणून आल्यावर कुटुंबकलह वाढेल म्हणून पूर्वाचार्यानी तो दोष मानला. आताच्या जगात तो गुण मानला पाहिजे. कर्तृत्ववान स्त्री मंगळप्रधान असते. ज्योतिषाचे कालसुसंगत अर्थ लावले पाहिजेत. पत्रिका नीट तपसावी लागते. त्यात ऍक्यूरसी असली पाहिजे. कॉम्प्यूटराईज्ड ऎनालिसिस पाहिजे अन्यथा ऎनालिसिस चुकण्याचा संभव असतो. असे सांगणारा ज्योतिषी आपल्याला विज्ञाननिष्ठ वाटतो.
भारतीय ज्योतिषात मंगळ हा पुरुष पापग्रह असून तो क्रूर असा सेनापती आहे. तो तमोगुणी, क्षत्रिय, अग्नी तत्वाचा असून त्याची देवता ही षडानन आहे. नवग्रहांमध्ये रवि, चंद्र व गुरु हे त्याचे मित्र असून शुक्र व शनि यांचेशी तो तटस्थ आहे मात्र चंद्र हा त्याचा शत्रू आहे. ग्रीक संस्कृतीत सुद्धा मंगळाला युद्धाचीच देवता मानले आहे.
खगोलशास्त्राच्या मते हा मंगळ सूर्यमालेतील पृथ्वीनंतरच्या कक्षेतील एक ग्रह आहे. पृथ्वीच्या साधारणपणे निम्म्या आकाराने असलेल्या या ग्रहाला दोन चंद्र आहेत. सूर्याभोवती फिरण्यास त्याला ६८७ दिवस लागतात आणि स्वत:भोवती तो २४ तास ३७ मिनिटे व २३ सेकंदात फिरतो. पृथ्वीवर माणसचे वजन १०० किलो असेल तर मंगळावर ते ३८ किलो भरेल. तो लालसर रंगाचा दिसतो त्याचे कारण तेथे असलेले लोहाचे ऑक्साइड. मंगळावर जीवसृष्टी असण्याचा पुरावा अद्यापपर्यंत उपलब्ध नाही. पूर्वी तेथे पाणी असावे असे पुष्टी मिळणारे संशोधन अलिकडे केलेल्या अमेरीका व ब्रिटनच्या मंगळावर पाठविलेल्या मानवविरहीत यांनांच्या मोहिमांवरुन होउ लागले आहे. मंगळावरील मोहिमां पूर्वी तेथे प्रगत अशी जीवसृष्टी असावी असा समज होता. तेथील मानवसदृश प्राण्याला 'मंगळया` असे नांव देउन जगात अनेक मनोरंजनात्मक विज्ञानकथा लिहिल्या गेल्या.
अशी कल्पना करायची की, सूर्यापासून प्लूटोपर्यंत पसरलेली आपली संपूर्ण सूर्यमाला एका रुपयाएवढ्या लहानशा वर्तुळात मावेल एवढी लहान केली आहे. ही रुपयाच्या आकाराची सूर्यमाला एका विस्तीर्ण मैदानात मध्यभागी ठेवली आहे. आता या प्रमाणावर, म्हणजे स्केलवर, ग्रह-नक्षत्रांच्या ताऱ्यांची मांडणी मैदानात करायची आहे. त्यासाठी त्या रुपयाच्या भोवती ३०० फूट त्रिज्येचे एक वर्तुळ काढायचे. या वर्तुळाच्या आत एकही तारा नाही. त्याच्या बाहेर पसरलेल्या विस्तीर्ण मैदानात मैलभर अंतरापर्यंत डोळ्यांना दिसू शकणारे राशी-नक्षत्रांचे तारे विखुरलेले आहेत. मृग नक्षत्रातला व्याधाचा तारा ५५० फूट अंतरावर आहे. काही नक्षत्रांचे तारे दीड-दोन हजार फूट अंतरावर आहेत. आता जरा आपल्या रुपयाकडे पहा. त्यावर कुठेतरी आपली पृथ्वी व चंद्र एका तिळाएवढ्या लहानशा जागेत आहेत असे समजायचे. पृथ्वीवर उभे राहून चंद्राकडे पहाणारा म्हणत असतो की मला चंद्र आत्ता मृग नक्षत्रात दिसतो आहे, वास्तविक तो बापडा चंद्र कुठे असतो आणि ते मृग नक्षत्र कुठे असते! तरी पण फलज्योतिषात असे म्हणायचे असते की माझ्या जन्मवेळी चंद्र मृग नक्षत्रात दिसत होता म्हणून माझे जन्मनक्षत्र मृग. या नक्षत्राचा मालक कोण तर मंगळ, म्हणून मला जन्मत: मंगळाची महादशा चालू झाली! तो पत्रिकेत १,४,७,८ व १२ स्थानात आहे म्हणून मुलगी झाली मंगळी.

यंदा कर्तव्य आहे? भाग ६
यंदा कर्तव्य आहे? भाग ७
यंदा कर्तव्य आहे? भाग ८

फलज्योतिषविचार

प्रतिक्रिया

अवलिया's picture

1 Mar 2009 - 2:30 pm | अवलिया

उत्तम लेख

--अवलिया

सखाराम_गटणे™'s picture

1 Mar 2009 - 2:43 pm | सखाराम_गटणे™

काफी अच्छा लेख. आप ऐसी ही लिखिए, हम पढ रहे हैं.

----
तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.

लिखाळ's picture

1 Mar 2009 - 5:25 pm | लिखाळ

उत्तम लेख .. आणि लेखमाला !
पुढे वाचण्यास उत्सुक.

-- लिखाळ.