यंदा कर्तव्य आहे? भाग ६

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in जनातलं, मनातलं
6 Mar 2009 - 7:24 pm

यंदा कर्तव्य आहे? पुस्तकाचे
मनोगत
यंदा कर्तव्य आहे? भाग १
यंदा कर्तव्य आहे ? भाग २
यंदा कर्तव्य आहे? भाग ३
यंदा कर्तव्य आहे ? भाग ४
यंदा कर्तव्य आहे? भाग ५

मुहूर्ताच्या निमित्ताने.....
आता पत्रिका जुळते आहे, एकमेकांची पसंती आहे, इतर व्यावहारिक गोष्टी जमताहेत म्हणल्यावर नंतर येतो तो मुहूर्ताचा टप्पा. मुहूर्त म्हणले की भास्कराचार्य-लीलावतीची गोष्ट हमखास सांगितली जाते. लीलावती ही भास्कराचार्यांची लाडकी लेक. तिच्या कुंडलीत वैधव्ययोग होता. पण भास्कराचार्यांनी असा विवाहाचा मुहूर्त शोधून काढला की तिचा वैधव्ययोग टळेल. पण विवाहाचे वेळी अक्षतेचा दाणा घटिकापात्रात डोकावून पहात असताना नकळत पडलेने तो तळाशी जावून भोकात अडकला व मुहूर्त चुकला व शेवटी व्हायचे तेच झाले. या दंतकथेच्या छटा बदलतात पण आशय तोच. मुहुर्ताची महती. थोडा इकडेतिकडे झाले की काय उलथापालथ.
इ.स. २००० मे,जून मध्ये विवाहमुहूर्त नाहीत- दाते पंचांग
मे महिना म्हणजे सुट्टी,लग्नसराईचे दिवस. आता या काळात लग्नाचा मुहूर्त नाही म्हणजे गैरसोयच नाही का? कार्यालयाची उपलब्धता हा पण एक सध्या महत्वाचा मुद्दा आहे. मुहूर्त असलेल्या तारखांना कार्यालय मिळणे हे देखील भाग्य. पंचांगात रेडीमेड मुहूर्त दिलेले असतात. पण हे रेडिमेड मुहूर्त सुद्धा 'लाभतात` की नाही हे बघावे लागते. कारण रेडिमेड कपडे सुद्धा सर्वांनाच 'फिट` होतील असे नाही. त्याला कधी कधी 'अल्टर` करावे लागते. तसेच मुहूर्ताचे आहे.एखादी वेळ ही कुणासाठी आनंदाची असते तर कुणासाठी तीच वेळ दु:खाची असते, कुणाची कसोटीची असते तर कुणाची निवांतपणाची असते, कुणाची जोडायची असेल तर कुणाची तोडायची असेल, कुणाची जन्माची असेल तर कुणाची मृत्यूची असेल. कुणाची कशीही असो ती ग्रहांच्या सोयीची असते म्हणून ती मुहूर्त असते.
आता पेपरमध्ये एकदा बातमी आली होती की इ.सन २००० मे,जून मध्ये मुहूर्त नाहीत म्हणून. कारण त्या काळात गुरू,शुक्राचा अस्त आहे. विवाह, मुंज, गृहप्रवेश वगैरे महत्वाचे प्रसंगी गुरु या शुभ ग्रहाची साथ आहे की नाही हे पहातात. हे मंगल प्रसंग असतात त्यामुळे अशा प्रसंगी अमंगल ग्रहांची वाकडी नजर पडून काही अमंगळ होउ नये म्हणून गुरुबळ बघितले जाते. गुरु हा ग्रह नैतिक बळ देतो, चांगले गुण वृद्धिंगत करतो. गुरु जर अनुकूल नसेल तर गुरुच्या सुवर्ण प्रतिमेचे पूजन करून तो अनुकूल करून घेता येतो. शुक्र,गुरू यांचा अस्त याचा अर्थ एवढाच कि त्यांची पृथ्वी सापेक्ष स्थिती ही सूर्याच्या जवळ असल्याने ते सूर्याबरोबर उगवतात व सूर्याबरोबरच मावळतात. त्यामुळे ते दिसू शकत नाहीत या अर्थाने त्यांचा अस्त झाला. खरंतरं ही एक दरवर्षी घडणारी खगोलशास्त्रीय घटना आहे. जशी अमावस्येचे वेळी चंद्र सूर्याबरोबरच उगवतो व सूर्याबरोबरच मावळतो त्यामुळे तो आपल्याला दिसत नाही. याला चंद्र सूर्य युती असेही म्हणतात. आपल्याकडे जरी अमावस्या अशुभ असली तरी दक्षिणेत मात्र ती शुभ मानतात. कारण युतीमुळे चंद्राची फळे ही वृद्धिंगत झाली. म्हणजे मुहूर्त ही बाब स्थलसापेक्ष झाली. मुहूर्त ही खरी म्हणजे कार्याच्या सोयीची पूर्वनियोजित वेळ. पण त्यात शुभाशुभत्व एवढं घट्ट चिकटले की ते त्यातून बाजूला काढताच येत नाही. त्यातून हे पंचांगात दिलेले रेडिमेड मुहूर्त हे तार्किक पातळीवर सुद्धा टिकत नाहीत. तरी पण केवळ ठरविलेला मुहूर्त पंचांगात नसल्याने लग्नाची तारीख बदलण्याचा प्रसंग मी पाहिलेला आहे. तारीख ठरली, कार्यालय ठरलं पण मध्येच मुलाच्या काकू/मावशी पैकी कुणालातरी साक्षात्कार झाला की ठरवलेला मुहूर्त पंचांगात नाही.त्यांना बरच समजावयाचा प्रयत्न केला. अहो गुरूजींनी वधूवरांच्या पत्रिका पाहून मुहूर्त काढलाय.पंचांगात नसेना का? पण नाही. मग काय? तारीख बदला. आता आली का पंचाईत? दुसऱ्या तारखेला हॉल बुक करा. नशीबानं म्हणजे योगायोगानं ती तारीख त्याच हॉलसाठी उपलब्ध झाली म्हणून ठीक नाहीतर मुलीकडच्यांचे पैसे पाण्यात. विवाहासारख्या महत्वाच्या संस्काराचे वेळी गुरू शुक्रासारख्या शुभ ग्रहांची उपस्थिती नाही म्हणजे त्यांचे आशिर्वाद, नैतिक बळ नाही मग मंगळ शनिसारख्या दुष्ट ग्रहांचे चांगलेच फावले की? कुणाला वैधव्य दे,कुणाचे सासू-सासरे मार,कुणाला अपघात कर, कुणाला सासुरवास कर. मग काही नडलय का मुहूर्त नसताना लग्न करायची?

यंदा कर्तव्य आहे? भाग ७
यंदा कर्तव्य आहे? भाग ८

फलज्योतिषविचार

प्रतिक्रिया

अवलिया's picture

6 Mar 2009 - 7:25 pm | अवलिया

वाचतोय येवु द्या अजुन...

--अवलिया