यंदा कर्तव्य आहे? भाग ९

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in जनातलं, मनातलं
24 Mar 2009 - 5:19 pm

यंदा कर्तव्य आहे? पुस्तकाचे
मनोगत
यंदा कर्तव्य आहे? भाग १
यंदा कर्तव्य आहे ? भाग २
यंदा कर्तव्य आहे? भाग ३
यंदा कर्तव्य आहे ? भाग ४
यंदा कर्तव्य आहे? भाग ५
यंदा कर्तव्य आहे? भाग ६
यंदा कर्तव्य आहे? भाग ७
यंदा कर्तव्य आहे? भाग ८

विवाह ,पत्रिका आणि वास्तव... [पुढे चालू]

आजचा 'सिलिकॉन व्हॅली` वर्गही पत्रिका न बघण्याची 'रिस्क` सहसा घेत नाहीत. त्या रावनं बघा पत्रिका न बघता लग्न केलं, प्रेमविवाह ना! बुद्धीवादी ना! बसलाय आता बोंबलत. तो जाडया माहीतीये का? अरे त्याने गोऱ्या कातडीवर भाळून लग्न केलं, तरी आई सांगत होती चांगल्या ज्योतिषाला पत्रिका दाखव म्हणून ! पण नाही, अरे जवानी में तो गधी भी सुंदर दिखती है । आता म्हणतोय आईच ऐकलं असतं तर बरं झालं असतं. 'मित्राच्या मुलाच्या लग्नाचे वेळी ज्योतिषाने सांगितलं होत कि हे लग्न ठरवू नका कुटुंबातील व्यक्तिच्या जीवाला धोका आहे. मित्राने दुर्लक्ष केले व लग्न ठरवले. तरी बायको सांगत होती एका जर माझं! आणि काय सांगू! ऐन लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलाचा सख्खा भाउ अपघातात गेला. मी स्वत: डोळयांनी बघितलेली हकिगत आहे.`
ज्योतिषानं सांगितलं होतं 'मुलीचं कॅरॅक्टर नीट बघा.` चौकशी केली तेव्हा कळलं की तिचं ऑफिसातल्या मुलाबरोबर लफडं आहे म्हणूनं. 'मुलगा दिसायला, वागायला स्मार्ट, उच्चशिक्षित, पण ज्योतिषानं सांगितले की मुलगा बाहेरख्याली वाटतो आणि तस्सचं निघालं.` अशा प्रकारची अनेक उदाहरण आपल्या कानावर पडत असतात. ती खोटीच असतात असे नाही. अयशस्वी वैवाहिक जीवनाच वाढलेले प्रमाण, घटस्फोट इ. गोष्टी मनावर ताण निर्माण करतात. मग ज्योतिष जे मनाला आधार देतं ते तुमची तर्कबुद्धी वा विज्ञान देत नाही.
'आज एकवीसाव्या शतकातल्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या जगात माणूस वैज्ञानिक क्षेत्रात प्रगती करतो आहे. रोज नवनवीन शोध लागताहेत. या पार्श्वभूमीवर ज्योतिषांकडे लग्न जुळतय का? असे विचारयला येणारा तरूण वर्ग बराच कमी झाला असेल नाही? शिवाय तरूणांमघ्ये आता प्रेमविवाह करण्याचे प्रमाण वाढले आहे.` असे जेव्हा एका ज्योतिषाला विचारले तेव्हा तो म्हणाला, '' छे! अहो हल्ली घटस्फोट मिळेल का ? असे विचारायला येणारा वर्ग वाढलयं. विदेशात स्थायिक झालेले लोक जेव्हा भारतात लग्न करण्यासाठी येतात तेव्हा पत्रिका जरूर बघतात. तिकडं विवाहसंस्थेचा अगदी बोऱ्या वाजलायं ना! ``
पत्रिका ही काय फक्त उच्चभ्रू ब्राम्हण समाजाची मक्तेदारी राहिलेली नाही. बहुजन समाजातसुद्धा आम्ही काही आता मागासलेले राहिलो नाही हे दाखवण्यासाठी पत्रिका बघितली जाते. किंबहुना त्या विषयी आग्रही भूमिका घेतली जाते. एक वधूपिता त्याबाबत म्हणतो, '' अहो एकवेळ ब्राम्हण समाजात पत्रिका न पहाणे, हुंडा न घेणं, साधेपणाने रजिस्टर विवाह हे प्रमाण वाढत चालले आहे पण आमचे कडे मात्र पत्रिकेचे प्रस्थ वाढत चाललयं. मुलींच शिक्षण आता वाढत चाललयं. त्यामुळे अधिक शिकलेल्या मुलाच स्थळं मिळणं अवघडं. त्यातून पत्रिका जुळण्याचा आग्रह! त्यामुळे लग्न जुळवणं म्हणजे दिव्यचं होउन बसलंय!``
प्रेमविवाहांची संख्या जशी वाढली तशी घटस्फोटांचीही संख्या वाढलीयं. केवळ शारिरिक आकर्षणातून निर्माण झालेले प्रेम हे अल्पजीवी ठरतं. त्यात विवेकापेक्षा भावनेचा पगडा जास्त असतो. तर दुसरीकडे सध्या प्रचलित असलेली विवाह जमवण्याची रीत ही एक प्रकारच्या जुगारासारखी आहे. त्यात केवळ व्यावहारिक गोष्टींसाठी बायोडाटा व 'स्थळ बघण्याचा` कार्यक्रम ज्यात मुलगा मुलगीचा थोडयाफार प्रश्नोत्तराचा अंतर्भाव. यातून एकमेकाच्या व्यक्तिमत्वाचा काय अंदाज येणार? तसही 'माणूस` ओळखणे हे अवघड काम. एकमेकाच्या सहवासात राहूनही परस्परांची खऱ्या अर्थान ओळख नसलेली माणसं जगताना दिसतात. तिथं आपल्याला आयुष्याचा साथीदार इतक्या तकलादू पद्धतीने निवडणे कितपतं योग्य आहे? परिचयोत्तर विवाह ही संकल्पना त्याला चांगला पर्याय होवू शकतो. मैत्रीतून स्वभावाविषयी थोडाफार तरी अंदाज आलेला असतो. त्यामुळे अशा संकल्पनेतून होणारा विवाह हा जुगार होण्याची शक्यता कमी. पण मैत्री व विवाह ही गोष्ट वेगळी. कारण विवाह ही व्यावहारीक गोष्ट आहे. नुसत्या उदात्त कल्पनेने काही जगता येत नाही. सांपत्तिक स्थिती, स्थावर, मानलौकीक, कौटुंबिक स्थिती या गोष्टी वा व्यावहारिक गरजा या महत्वाच्या आहेत. फिल्मी स्टाईल प्रेमाच्या त्याग-त्याग स्पर्धा व्यवहारात कुचकामी ठरतात असे लक्षात आल्यावर ते विवाह साहजिकच अयशस्वी ठरतात. त्यामुळेच 'घटस्फोट मिळेल का?` असे ज्योतिषाकडे विचारायला जाणारा वर्ग वाढलाय. एका मुलीन सांगितल की आम्ही आपली नॉमिनल पत्रिका बघितली होती. आता लग्नानंतर आठनउ महिन्यांनी नवऱ्याला एका ज्योतिषाने सांगितले की तुमची पत्रिका जुळत नाही. आता तो घटस्फोट मागतोय. घटस्फोटाच्या शेवटच्या टप्प्यात केस होती. ज्योतिषाला आपल सहज विचारायला गेलो तर त्याने सांगितलं की घटस्फोटाचा योग नाही. आणि काय सांगू महाराजा! केस फिरली. दोघे परत एकत्र आले. अजून त्यांच्या कुरबुरी चालू आहे हा भाग वेगळा. पण भविष्य खरं आले. मनाने विभक्त झालेले परंतु केवळ औपचारिकता म्हणून घटस्फोट घेता न एकत्र रहाणारे पतिपत्नी समाजात दिसतात.
प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ कै. वि. म. दांडेकर यांनी ३०० घटस्फोटित युगुलांच्या कुंडल्या संगणकाच्या मदतीने अभ्यासल्या. या अभ्यासात त्यांना फलज्योतिषीय नियमांचे लक्षणीय सातत्य कोठेच आढळले नाही. ज्या समंजस वाटणा या ज्योतिषाच्या मदतीने त्यांनी हा अभ्यास केला त्यालाही ही गोष्ट कबूल करावी लागली. यावरून हे लक्षात येईल की फलज्योतिष म्हणजे अंदाजपंचे दाहोदरसे अशा त हेच्या नियमांचा व ठोकताळ्यांचा एक संग्रह आहे. त्यांचा अनुभव येणे न येणे ही योगायोगाची बाब आहे.

फलज्योतिषविचार

प्रतिक्रिया

मराठमोळा's picture

24 Mar 2009 - 5:46 pm | मराठमोळा

घाटपांडे साहेब,

छान विवेचन केलेत. आवडले, सर्वाना ह्याचा नक्की उपयोग होईल.

आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

अवलिया's picture

24 Mar 2009 - 5:47 pm | अवलिया

उत्तम लेख

--अवलिया

सहज's picture

24 Mar 2009 - 6:01 pm | सहज

हाही भाग छान.

घटस्फोट घेताय?" मग हे पाहीलेच/वाचले पाहीजे असे अनेक पूरक धंदे आता बरकतीत येतील. पण लोक असा धंदा नीट चालेल की नाही बघायला परत ज्योतीषाकडेच जातील ;-) घटस्फोट ही एक सामान्य बाब आहे व तो झाल्यावर संबधितांचे प्रश्न सुटून पुढले आयुष्य बरेच सुकर होउ शकतात असे प्रबोधन तसेच विना कटकट घटस्फोटाची सोय झाली तर लोक पत्रिका-घटस्फोटाचा जादा बाउ करणार नाहीत.

लेख उत्तमच आहे पण प्रबोधनाबरोबर आधुनिक वैद्यकिय विज्ञान व त्याचे दृष्य परिणाम पर्यायाने काळ हेच एक औषध आहे तोवर ही ज्योतिषाची दुकाने काही बंद होणार नाहीत. :-)

प्रकाश घाटपांडे's picture

24 Mar 2009 - 9:53 pm | प्रकाश घाटपांडे

घटस्फोट ही एक सामान्य बाब आहे व तो झाल्यावर संबधितांचे प्रश्न सुटून पुढले आयुष्य बरेच सुकर होउ शकतात असे प्रबोधन तसेच विना कटकट घटस्फोटाची सोय झाली तर लोक पत्रिका-घटस्फोटाचा जादा बाउ करणार नाहीत.

आजच 'हिंदोळा' हा परित्यक्ता स्त्रियांच्या प्रश्नावर असलेला लघुपट पाहिला व त्यावरील परिसंवाद ऐकला. त्यात ऍड निशा शिवुरकरांनी हा घटस्फोटाच्या प्रतिष्ठेचा मुद्दा अधोरेखित केला. त्यात त्यांनी वरील प्रतिपादन केले. (पत्रिका या विषयावर नाही)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

बेसनलाडू's picture

24 Mar 2009 - 10:29 pm | बेसनलाडू

पुढील भाग वाचण्यासाठी उत्सुक.
(कर्तव्यदक्ष)बेसनलाडू

नितिन थत्ते's picture

24 Mar 2009 - 11:59 pm | नितिन थत्ते

मुलगा १५ दिवसांसाठी अमेरिकेहून आला आहे. तेवढ्यात आईवडिलांनी पाहून ठेवलेल्या आणि मुलाने जिचा फक्त फोटो पाहिला आहे अशा मुलीशी त्या १५ दिवसात लग्न उरकून पुन्हा अमेरिकेस प्रयाण. ही स्थिती सोडली तर 'ऍरेन्ज्ड मॅरेज' ही सुद्धा परिचयोत्तर विवाहात रूपांतरित करता येतील.
म्हणजे विवाह ठरल्यापासून ते तो प्रत्यक्ष घडेपर्यंतचा काळ वधुवरांनी सत्कारणी लावला तर पुढे न पटण्याचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच पाऊल मागे घेता येईल. त्यासाठी दोघांचीही मानसिक स्थिती 'भारावून गेल्याची' असून उपयोग नाही. तर परस्पर भेटीच्या प्रत्येक प्रसंगी संतुलित रित्या भावी जोडीदाराचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे.
या परस्पर भेटीत भावी जोडीदाराचे विचार नीट जाणून घेणे आवश्यक आहे.
एखाद्या बाबतीत जोडीदाराचे मत/आवड/सवय काय आहे असे जाणून घेणे.
आपले याबाबतीतील मत/आवड/सवय काय आहे?
आणि ती वेगळी असेल तर ती वेगळी असणे मान्य आहे काय?
ती मान्य नसतील तर आपण या तडजोडीस तयार आहोत का?

हे तपासणे महत्त्वाच्याच नव्हे तर क्षुल्लक गोष्टीबाबतही करायला हवे. म्हणजे समजा कुणाला झोपताना पंखा चालत नाही. अशावेळी जोडीदाराला पंखा लागतोच असे असेल तर तडजोड करणार्‍या जोडीदाराचे सुरुवातीस तरी खूप त्रास होऊ शकतो.
हे वधूच्या बाबतीत जास्तच महत्त्वाचे कारण तडजोडीची अपेक्षा तिच्याच्कडून जास्त असणार.

असो घाटपांड्यांचा लेख पत्रिका पाहणे या विषयावर आहे परंतु घटस्फोट आणि विवाहानंतर एकमेकांचे न पटणे या गोष्टींचा उल्लेख झाला अहे म्हणून हे सर्व लिहिले.

खराटा
(रंग माझा वेगळा)

मस्त कलंदर's picture

25 Mar 2009 - 12:16 am | मस्त कलंदर

मी यंदा.. चे सारे भाग वाचले नाहीयेत... त्यामुळे हा विषय येथे चर्चिला गेला आहे की नाही ते ठाउक नाही... पण जसे या लेखात लिहिले आहे अन खरेही आहे म्हणा कि आजकाल बर्याच मुली आणी मुलांची लग्ने लांबणीवर पडताहेत... ३२ वर्षांचा लग्नाळलेला मुलगा वा मुलगी काही नवीन नाही... अशा वेळेस मुलींना मंत्रपठण, स्त्रोत्र, पांढरे शुक्रवार, जप, रूक्मिणीस्वयंवर वाचन (जरी त्यात ती श्रीक्रूष्णासोबत पळून गेली होती.. म्हणजे आईबाबांना मुलीचे लग्न करून द्यायचे आहे.. की तिने पळून जाऊन लग्न करावे अशी अपेक्षा आहे???) असले प्रकार करावयास भाग पाडले जाते... मुलांच्या बाबतीत ही असे घडते का???

अवांतरः हल्ली बर्याच लोकांच्या तर्जनीमध्ये पुष्कराजाची अंगठी दिसते... त्याने काय लाभ होतो नी तो खरेच होतो का? याची जाणकारांनी माहीती द्यावी...

प्रभाकर पेठकर's picture

25 Mar 2009 - 1:30 am | प्रभाकर पेठकर

ज्योतिष शास्त्रातील गैर प्रथा, समाजाची कमकुवत मनःस्थिती, सारासार विवेकाला देण्यात येणारी तिलांजली आदी मुद्यांवरील विवेचनातून घाटपांडे साहेबांनी ज्योतिष शास्त्राच्या चिंधड्याच उडविल्या आहेत.
एक विनोद म्हणून मला वाटते लग्न ठरविताना 'गुण' जुळविण्यापेक्षा 'दुर्गुण' जुळतात का हे पाहिले तर जास्त विवाह यशस्वी होतील. जसे:

वराला रविवारी सकाळी ११ पर्यंत लोळायला आवडते. वधूलाही आवडते.
वराला शनिवारी रात्री उशीरा पर्यंत जागून पिक्चर पाहणे, मादक द्रव्यांचे सेवन करणे आवडते, वधूला 'साथ' द्यायला आवडते.
वराला वस्तू जागच्या जागी ठेवणे जमत नाही, वधूला उकिरड्यावर राहणे पसंद आहे.
वराला कपडे मॅचिंग वापरायचे कळत नाही, वधू 'कलर्-ब्लाईंड' आहे.

अशी 'दुर्गुणी' जोडपी यशस्वी संसार करू शकतात. जन्म भर आनंदी राहतात. पण,,,

वराला रविवारी सकाळी ६ वाजता उठायला आवडते. वधू रविवारीही सकाळी ६ वाजता उठते.
इथे सकाळी चहा कोणी करायचा ह्यावरून ६|| ला भांडण होऊ शकते.

वराला शनिवारी रात्रीही लवकर झोपायची सवय असेल आणि वधू ही लवकर झोपते.
पण मग वंश वाढावा कसा? इतर दिवशी दोघांच्याही नोकर्‍या आणि धावपळीने थकून लवकर झोपावेच लागते.

वराला वस्तू जागच्या जागी ठेवण्याचा शौक आहे, वधूला टापटिपीचि भयंकर आवड आहे.

मुलांनी केलेल्या पसार्‍यावरून दोघांमध्ये सततचे वाद होत राहतील. मुलांना शिस्त लावयची कोणी? हा कळीचा मुद्दा होऊ शकतो.

वराला मॅचिंग कपडे असल्याशिवाय घराबाहेर पडत नाही. वधू नवर्‍याच्या कपड्यांना स्वतःचे कपडे मॅच करूनच त्याच्या बरोबर बाहेर पडते.

हे म्हणजे अगदी 'बँड-पथकात' काम केल्यासारखे होऊन जीवन निरस होऊ शकते.

म्हणजेच काय? गुण जुळवू नका, दुर्गुण जुळतात की नाही ते तपासा.

असो.

मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

प्रकाश घाटपांडे's picture

25 Mar 2009 - 10:22 am | प्रकाश घाटपांडे

गुण जुळवू नका, दुर्गुण जुळतात की नाही ते तपासा.

लोहा लोहेको काटता है या चालीवर मंगळाला मंगळाचा जाब विचारणे हा विचार मंगळाची दहशत मध्ये वर्णिलेला आहेच.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

विशाल कुलकर्णी's picture

25 Mar 2009 - 12:04 pm | विशाल कुलकर्णी

मार्गदर्शक आहेत सगळेच लेख ! प्रचंड माहिती आहे ही आमच्या सारख्या साठी !! धन्यवाद ..!!

सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)