दी कॅट इन दी हॅट - अर्थात टोपीवाले मांजर

चित्रा's picture
चित्रा in जनातलं, मनातलं
3 Mar 2009 - 7:23 am

डॉ. सूस -

आजचे गूगलचे मुखपृष्ठ पाहिले तेव्हा लक्षात आले की आज डॉ. सूस यांचा वाढदिवस. आज असते, तर ते १०५ वर्षांचे झाले असते. डॉ. सूस हे त्यांचे खरे नाव नव्हे, खरे नाव थिओडोर गीजल. सूस हे त्यांच्या आईचे लग्नापूर्वीचे आडनाव (तसेच त्यांचे मधले नाव) त्यांनी लहान मुलांच्या गोष्टी लिहीताना टोपणनाव म्हणून लावले.

डॉ. सूस यांच्या पुस्तकांशी माझी तोंडओळख इथे अमेरिकेत आले तेव्हा पुस्तकांच्या दुकानांच्या शेल्फांवरच्या त्यांच्या एकदोन पुस्तकांमुळे झाली. कोणाच्या लहान मुलांना भेट द्यायला पुस्तके शोधायला जाताना लहान मुलांचे एक पुस्तक, "वन फिश टू फिश.." हे मी कायम त्या शेल्फांवर पाहिले होते. पुस्तक बरेच पॉप्युलर असणार, असे वाटले होते, पण त्यापलिकडे वाचण्याचा प्रश्न आला नव्हता त्यामुळे असेल एक कोणी लेखक, एवढीच कल्पना झाली होती.

पण नंतर असेच कोणी मुलीला भेट दिलेले पुस्तक म्हणून डॉ. सूसचे कॅट इन दी हॅट हे पुस्तक आमच्याच घरी आले. पुस्तक लहानच होते, ते तिला खूप आवडले. त्यानंतर असेच कधीतरी इथल्या दुकानांतून एका खाण्याच्या सीरीयलच्या डब्याबरोबर या पुस्तकावर आधारित एक अर्ध्या तासाची सीडी आम्हाला सुदैवाने मिळाली. तेव्हा मुलगी चार वर्षांची असेल, नसेल. आम्ही असेच एकदा ती लावली आणि त्या सीडीने आम्हाला वेड लावायचे बाकी राहिले. इतकी भन्नाट गाणी मी कधीच ऐकली नव्हती. त्यात काही गंमत संगितकारांनी जशी आणली होती, तसेच लक्षात आले की मुळात डॉ. सूस यांनी मुलांची नस बरोबर ओळखली होती. गोष्टीचा गाभा अगदी सरळ म्हणजे पावसाच्या रिपरिपीमुळे घरात बसायला लागणारा एक मुलगा आणि त्याची बहिण यांना आई घरी ठेवून कामाला जाते. ती पोरे अर्थातच कंटाळतात पण घरात कोणी नसल्याने काय करावे ते त्यांना उमजत नाही. आणि मग घरात येतो एक "कॅट इन दी हॅट" म्हणजे एक उंच टोपी डोक्यावर ठेवलेला .
हा बोका
"I know it is wet
And the sun is not sunny.
But we can have
Lots of good fun that is funny!"

"I know some good games we could play,"
Said the cat.
"I know some new tricks,"
Said the Cat in the Hat.
"A lot of good tricks.
I will show them to you.
Your mother
Will not mind at all if I do."

म्हणत घरात जी काय धमाल करतो, आणि गाणी म्हणतो, की त्या पोरांची कळीच उमलते. ही सीडी पाहिली आणि त्यानंतर अधाशासारखी आम्ही डॉ. सूस यांची अनेक पुस्तके आणली. तेव्हा लक्षात आले की या लेखकाला एक प्रकारची दैवी देणगीच मिळालेली आहे, त्यांना शब्दांना नुसते खेळवताच येत नाही, तर एकंदरीतच आयुष्याबद्दलचे विचार अगदी सहजतेने लोकांपर्यंत पोचवता येतात.

"OH, THE PLACES YOU'LL GO!
THERE IS FUN TO BE DONE! THERE ARE
POINTS TO BE SCORED. THERE ARE GAMES TO BE WON."
माणसाच्या आयुष्याचेच एक प्रकारे वर्णन नाही का हे? आपण तरी आयुष्यभर वेगळे काय करीत असतो?

तुमच्या माझ्या जन्माच्याही कदाचित खूप आधीपासून ह्या अमेरिकन लेखकाने लहान मुलांच्या आणि त्यांच्या आईवडीलांनाही गोष्टी ऐकवून गुंगवले आहे. मॅसॅच्युसेटसमधल्या स्प्रिंगफील्ड नावाच्या म्हटले तर खेडेगावीच, हा मुलगा वाढला. लहानपण सुखात गेले, आपल्याकडे जसे पूर्वी आया मुलांना गोड गाणी, ओव्या म्हणून झोपवायच्या, तसेच त्यांची आई तिच्या लहानपणी शिकलेल्या यमके असलेल्या कविता/गाणी म्हणून त्याला झोपवायची. मोठेपणी आईच्या ह्याच देणगीचा लयबद्ध, रंजक गोष्टी लिहायला त्यांना उपयोग झाला. कार्टूनिस्ट, तेलाच्या जाहिराती लिहीणारा लेखक, लहान ऍनिमेशन चित्रपटाचा निर्माता, असे करत करत त्यांनी व्हायकिंग प्रेसने त्यांना एका मुलांच्या पुस्तकांमध्ये चित्रे काढण्यास आवतण दिले. पुस्तक विशेष खपले नसले, तरी त्यांचे नाव चांगले झाले आणि परिणामी त्यांनी लिहीलेले आणि सजावटही त्यांचीच असलेले एक "अँड टू थिंक दॅट आय सॉ इट ऑन मलबेरी स्ट्रीट" हे पुस्तक व्हॅनगार्ड प्रेस (हॉटन मिफ्लिन) या प्रकाशन संस्थेने छापले. पण ज्या पुस्तकाने त्यांना नाव मिळवून दिले ते मात्र "दी कॅट इन दी हॅट". या पुस्तकामागची प्रकाशनसंस्थेची कल्पना अशी होती की ते मुलांना सोपे इंग्रजी शब्द शिकवता येतील अशा पद्धतीचे असावे. त्यामुळे कॅट, हॅट यासारखे यमक असलेले शब्द गोळा करून त्यांनी ही लहानशी गोष्ट लिहीली. १९५७ साली लिहीलेले हे लहानसे पुस्तक आजच्याही पोरांना आवडते, हातोहात खपते. १९७१ मध्ये यावर आधारित एक टीव्ही ऍनिमेशन चित्रफीत बनवण्यात आली. त्यातले एक गाणे आधी ऐकले असले तर अजून एक गाणे इथे ऐका.

यानंतर डॉ. सूस यांनी मुलांसाठी अनेक पुस्तके लिहीली, ती देखील खूप खपली. हे एक पुस्तक मला असेच फार आवडते. मुलांना रमवत, मोठ्यांना विचार करायला लावत लिहीलेली ही पुस्तके म्हणजे एक प्रकारचा खजिना आहे. Bartholomew and the Oobleck ही एक अशीच कथा. या कथेत असे की एका गावच्या एका बालिश राजाला एकदा आकाशातून पडणारा पाऊस, ऊन, बर्फ काहीच नकोसे होते, त्याला काहीतरी वेगळे हवे असते. मग गावचे मांत्रिक त्याला असा एक पदार्थ तयार करून देतात, आणि मग खरेच चिकट हिरवा पदार्थ आकाशातून पडायला सुरूवात होते. राज्यात बिकट परिस्थती ओढवते. यातला लहानसा बेलबॉय "बार्थॉलॉम्यु कबिन्स" मात्र स्वतः किती लहान आहे याचा विचार न करता सतत राजाला शहाण्यासारखा सल्ला देत असतो, आणि या परिस्थितीतून लहान मोठ्या सर्वांना वाचवण्यासाठी, त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी जिवाचा आटापिटा करतो. कथेचा बाज न सोडता, शब्दांवर हुकुमत ठेवून अशी लहान-मोठ्यांना विचार करायला लावणारी, चांगली दिशा देणारी गोष्ट लिहीणे सोपे काम नाही. सध्या गाजत असलेले झपाट्याने होणार्‍या औद्योगिकीकरणामुळे तयार होणारे पर्यावरणाचे प्रश्न या लेखकाने "दी लोरॅक्स" या लहानशा पुस्तकातून १९७१ मध्येच समोर आणले होते.

त्यांच्या अनेक गोष्टींचा वरवर जाणवणारा अर्थ आणि त्याच्या तळाशी असलेला विचार यांची सांगड घालून लहान मुलांसाठीच्या लेखनाचा एक आदर्शच त्यांनी घालून दिला आहे म्हणायला हरकत नाही. आज एवढ्या वर्षांनंतरही या लेखकाच्या लिखाणाची मोहिनी, त्याने मुलांच्या मनावर केलेली जादू तशीच टिकून आहे यातच बरेच काही आले. आमच्या आयुष्यात अनेक हसरे क्षण आणणार्‍या या लेखकाला हा लहानसा लेख समर्पित.

संदर्भः काही माहिती येथून घेतली आहे: http://www.catinthehat.org/

कथाबालकथासाहित्यिकअनुभवमाहितीआस्वाद

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

3 Mar 2009 - 10:06 am | विसोबा खेचर

चित्रातै,

या नितांत सुरेख लेखाबद्दल आपले मनापासून अभिनंदन...

"OH, THE PLACES YOU'LL GO!
THERE IS FUN TO BE DONE! THERE ARE
POINTS TO BE SCORED. THERE ARE GAMES TO BE WON."

सुंदर,.!

डॉ सूसना आमचाही दंडवत..

तात्या.

सहज's picture

3 Mar 2009 - 10:15 am | सहज

डॉ. सूस व पुस्तकाची छान ओळख.

अवलिया's picture

3 Mar 2009 - 12:24 pm | अवलिया

छान लेख.

--अवलिया

अमोल केळकर's picture

3 Mar 2009 - 1:09 pm | अमोल केळकर

नवीन माहिती बद्दल धन्यवाद

--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

डॉ. स्यूस ची छान ओळख करून दिलीत. धन्यवाद.

माझ्या ही मुलीने इंग्लीश वाचन शिकताना सुरवातीस डॉ. स्यूसची पुस्तके वाचलेली आहेत. सोपे शब्द आणि यमक ह्यामुळे तिला वाचताना मजा यायची.

आज त्यांचा वाढदिवस (२ मार्च). त्या निमित्ताने मुलीच्या शाळेत 'डियर' (DEAR - Drop Everything And Read)
हा कार्यक्रम असतो. त्यात अनेकवेळा जेव्हा केव्हा शा़ळेत स्पिकर वरून अनाउन्स केले जाईल की हा डियर टाइम आहे त्यावेळी शाळेतील हजर सर्व व्यक्तींनी हातातील कामे सोडून वाचन करायचे. डियर मागचा उद्देश हाच की प्रत्येकासाठी वाचन किती महत्वाचे आहे हे प्रत्यक्षात अमलात आणून दाखवणे आणि त्या बरोबर जराशी मौजमजा. मुलांना हा डियर कार्यक्रम खूप आवडतो.

'रीड ऍक्रॉस अमेरिका ' हा वाचनाशी निगडित अमेरिकेतील एक मोठा कार्यक्रम आहे. डॉ. स्यूस यांचा वाढदिवस साजरा करण्या करता आणि त्या निमित्त्ताने मुलांना 'त्यांच्या शालेय जीवनात वाचन नुसतेच महत्वाचे नाही तर खेळाप्रमाणेच उत्साह , आनंद देणारे आहे ' हा संदेश देण्याकरीता १९९८ पासून ('रीड ऍक्रॉस अमेरिका') हा कार्यक्रम सुरू झाला. येथील वाचनालयांमध्येही डॉ. स्यूस ह्यांचा वाढदिवस त्यांच्या पुस्तकांची वाचने किंवा त्यावर आधारित मुलांची नाटके बसवून साजरा करण्यात येतो.

चित्रा's picture

3 Mar 2009 - 5:42 pm | चित्रा

लेखात नसलेली खूपच छान माहिती दिलीत. अनेक धन्यवाद!

ही पुस्तके नुसतीच वाचायला देण्याची नाहीत, तर त्यांना मोठ्याने वाचून दाखवण्याचीही आहेत, हेही लिहायला गडबडीत राहून गेले होते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Mar 2009 - 5:50 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

चित्राताईंचा लेख आणि वेलदोड्यांचा प्रतिसाद दोन्ही आवडले.

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

प्रमोद देव's picture

3 Mar 2009 - 8:48 pm | प्रमोद देव

अदितीशी पूर्णपणे सहमत!
गाणी आणि गोष्टींचे ध्वनी-चित्र मुद्रणाचे दुवेही झकास आहेत.
तेवढ्या वेळेपुरता मीही लहान झालो होतो.

आणि वाचकांचेही आभार!

तात्या, वर दिलेले युट्युबचे दुवे उघडून ती गाणी जरूर पहा/ऐका, वेळ मिळेल तेव्हा. मजेशीर आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Mar 2009 - 6:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉ.सूस आणि त्यांच्या पुस्तकाची ओळख करुन दिल्याबद्दल आभार !!!

-दिलीप बिरुटे

स्वाती२'s picture

3 Mar 2009 - 7:28 pm | स्वाती२

छान लेख चित्रा. माझ्या मुलाच्या शाळेतपण डिअर असायच. प्रत्येक वर्गाच्या दारावर, मुलं त्यांच्या आवडत्या पुस्तकावर आधारीत सजावट करायची. आणि त्या बोक्याची किंवा ग्रिंच ची टोपी घालून फिरणारे शिक्षक . माझ्या मुलासाठी मी एकदा greeen eggs and ham सारखी eggs केली होती. या लेखामुळे पुन्हा एकदा त्या आठवणी उजळल्या. धन्यवाद.

रेवती's picture

3 Mar 2009 - 7:46 pm | रेवती

चित्राताई,
डॉ. सूस यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला ही भेट दिल्याबद्दल तुझे धन्यवाद!
माझ्या मुलाच्या शाळेत दर सोमवारी त्यांच्या छोट्या वाचनालयात मी काम करते.
तेथे त्यांनी एक छोटा विभाग "ईझी टू रीड" पुस्तकांचा केला आहे त्यात ही सगळी पुस्तके नेहमी पाहत असते,
पण कधी उघडून नाही बघीतली. आता मात्र मुलानी नाही वाचली तरी मी वाचणार आहे.
तिथल्या लायब्ररीयन बाई बरीच पुस्तके माझ्या मुलासाठी सुचवतात व ती आणलीही जातात.
मला मिसेस डिव्हाईनबद्दल आदर आहे कारण त्यांना प्रत्येक मुलाची साधारण आवड माहीत असते,
ते मूल शाळेत दिसले की त्या सांगतात्,"तू मला येऊन भेटशील का? एक छान पुस्तक काढून ठेवले आहे."
अशी माहिती देऊन कितीतरी मुले (आणि पालकही ;))वाचनासाठी प्रवृत्त होतात. धन्यवाद!

रेवती

लिखाळ's picture

3 Mar 2009 - 7:58 pm | लिखाळ

वा .. फार छान लेख. सूस यांची ओळख आवडली. दिलेल्या दुव्यांवरची गाणे नंतर ऐकिनच.
वेलदोड्यांच्या प्रतिसादातून सुद्धा माहिती मिळाली.

लेख फारच छान. असे वेगळे लेख वाचायला चांगले वाटते.
-- लिखाळ.

सुनील's picture

3 Mar 2009 - 8:05 pm | सुनील

सुंदर ओळख करून दिली आहे.

अवांतर - हे एक पुस्तक मला असेच फार आवडते
हा दुवा चालत नाही.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चित्रा's picture

4 Mar 2009 - 9:11 am | चित्रा

प्रतिसादकांचे आभार!
पुस्तकाचा दुवा चालत नसल्याचे लक्षात आणून दिल्याबद्दलही आभार. हे पुस्तक -
http://www.amazon.com/Hatful-Seuss-Five-Favorite-Stories/dp/0679883886

मृण्मयी's picture

3 Mar 2009 - 8:52 pm | मृण्मयी

लेख आवडला. खूप छान लिहिलाय.

डॉ स्यूस ह्यांची ओळख मला माझा मुलगा तीन वर्षांचा असताना झाली. त्यानंतर पुस्तकातली भाषा आणि चित्र इतकी प्रचंड आवडली की दुकानात असतील तेव्हडी पुस्तकं संग्रही असावी असं वाटायला लागलं. आता १० वर्षांनंतरही ही पुस्तकं देऊन टाकवत नाहीत.

प्राजु's picture

3 Mar 2009 - 9:20 pm | प्राजु

माझा लेक वेडा आहे डॉ. सूस साठी. डेझी हेड मेझी... कॅट इन अ हॅट.. वन फिश, टू फिश...
सिडीज तर पारयाणे झाली आहेत.
चित्राताई, २८ फेब्रु. ला लायब्ररी मध्ये डॉ.सूस यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम होता. केक, ज्युस.. आणि बरेच क्राफ्ट वर्क होते. लेकाला घेऊन गेले होते.एकदम खुश होता.
डॉ.सूस यांचे ऋणच आहेत आपल्यावर असं वाटतं अनेकदा. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

धनंजय's picture

4 Mar 2009 - 9:52 pm | धनंजय

इंग्रजी शब्दांचे याचे खेळ आबालवृद्धांना आवडतात - असे जमणे म्हणजे प्रचंड कौशल्य आहे. माहितीबद्दल चित्रा व वेलदोडा यांना धन्यवाद. यात वर्णन केलेली पुस्तके नक्की वाचेन (किंवा पुन्हा वाचेन...).

पक्या's picture

5 Mar 2009 - 1:06 am | पक्या

डॉ. स्यूस ची छान ओळख करून दिलीत. माहितीबद्दल चित्रा व वेलदोडा यांना धन्यवाद.

येत्या १० मार्च ला आमच्या घराजवळील वाचनालयात पण डॉ. स्यूस यांचा वाढदिवस साजरा होणार आहे. त्यात जवळच्याच हायस्कूल ची मुले डॉ. स्यूस यांच्या कथांवर आधारित छोटी नाटके (स्किट्स ) सादर करणार आहेत. मग वाढदिवसाची पार्टी ..त्यात केक कापणार, मग मुलांना केक, ज्यूस, स्वहस्ते बनवलेले घरी घेउन जाता येईल असे क्राफ्ट वर्क . मुलांसाठी फारच छान कार्यक्रम आहे. आणि तोही मुफ्त.

वेलदोडा's picture

5 Mar 2009 - 7:58 am | वेलदोडा

माझा वरचा प्रतिसाद आवडलेल्यांना धन्यवाद.