कंपास पेटी

OBAMA80's picture
OBAMA80 in जनातलं, मनातलं
20 Sep 2017 - 12:18 pm

कंपास पेटी
**********************
आपल्या सगळ्यांच बालपण अनेक लहानसहान गोष्टींनी व्यापलेले असते, मधल्या काळात त्या गोष्टींच आपल्याला अप्रूप वाटेनास होत आणि आयुष्याच्या माध्यान्ही अचानक त्या सापडल्यानंतर मन लहान मुलासारख बागडायला लागत. त्या सर्वांमधली “कंपास पेटी” ही ह्रदयाच्या सर्वात जवळची. आपल्या बालपणातील अनेक गमतीजमती, गुपीत, भांडण या पेटीशी जोडलेली असतात. त्या रम्य दिवसातील लाखों आठवणी हळुवारपणे अलगद जपून ठेवणार्‍या या छोट्या गोष्टीला “पेटी”शिवाय दुसरा योग्य शब्द नाही. ही आपल्या शालेय जीवनातील एक अविभाज्य घटक!! शालेय जीवनात सदासर्वदा सोबत करणारी ती आपली सर्वात पहिली जवळची मैत्रीण होती. दफ्तर या माझ्या मित्राबरोबरच ती माझ्या आयुष्यात आली आणि कायमची माझी बनून राहिली. हा मित्र बदलत राहिला पण ती मात्र तशीच काळजात खोल घर करून राहिली.
आजकाल बाजारात नानाविध रंगाच्या, आकाराच्या सुबक पेट्या मिळतात. आमच्या लहानपणी कॅमलिनची पिवळ्या-केशरी रंगाची पेटी जवळजवळ सगळ्यांकडे सारखीच होती आणि तिनेच आमच्या बालपणावर राज्य केले. “एकपत्नी” व्रतासारखेच माझे “एकपेटीत्व” व्रत होतं. इयत्ता चौथीत नवीन प्राथमिक शाळेत जाताना आजोबांनी घेऊन दिलेली, लहानपणीची ती मी अजून जपून ठेवली आहे. आजोबांची एक आठवण म्हणून आणि तेव्हांपासून प्रत्येक परीक्षेत याच “कंपास” पेटीमुळे “पास” होतोय या (अंध)विश्वासामुळे तिचा कितीही रंग उडाला, पोचे आले तरी, मी तिची आणि नंतर तिने माझी साथ सोडली नाही.
खरेतर, ही अगदी आपल्या बायकोसारखी असते. नवीन असताना सतत जवळ बाळगाविशी, सर्वांसमोर मिरवाविशी वाटते, तिचा विरह जराही सहन होत नाही आणि नंतर हिची आपल्याला येवढी सवय झालेली असते की तिच्यावाचून सगळ्या ठिकाणी आपले अडते. स्वतःचे रंग उडालेले आणि कित्येत भाग झिजलेले असून देखिल प्रत्येक महत्वाच्या वेळी ही सतत सावलीसारखी आपल्या सेवेला तत्पर असते.
नवी नवरी सासरच्या घरी नांदायला येताना जसे रूखवताचे सामान मिरवत घेऊन येते ना, तशीच ही पण आपल्याबरोबर १५ सेमी ची पट्टी, कर्कटक, गुणे, कोनमापक, बिनटोकाची पेन्सिल, पांढरा शुभ्र खोडरबर आणि टोक करायचा शार्पनर इ. अनेक गोष्टींचा लवाजमा बरोबर घेऊनच येते. नंतर हळूहळू हिच्या आणि आपल्या संसारात शाईचे पेन, त्याच्या निब, शाईचा ड्रॉपर, धारदार ब्लेडस, बॉलपेन, त्याच्या वेगवेगळ्या लांबीच्या स्प्रिंगज अशा बर्‍याच गोष्टींची सतत भर पडत राहते. दरमहिन्याला पॉकेटमनीतील सुट्ट्या पैशांची चळत देखील तिच्या संसाराचे ओझे वाढवायची. यातील बर्‍याच गोष्टींची मित्रांबरोबर देवाणघेवाण चालू रहायची. पण गृहिणीला शेजारणीकडे दिलेला डबा सुखरूप परत येत नाही तोपर्यंत जशी ती बैचेन असते तसेच आपल्या वस्तू परत सुखरूप येईस्तोवर मनाची घालमेल व्हायची.
हिने परीक्षांच्या काळात गणपती, दत्त यांसारख्या खर्‍या जगातील देवांना आदराने स्थानापन्न केले तर इतर वेळी हि-मॅन, सुपरमॅन सारख्या काल्पनिक विश्वातल्या हिरोंना पण कायमच मान दिला. नंतर कधीमधी घरच्यांची नजर चुकवून माधुरी, काजोल, ऐश्वर्या सारख्या देवींनापण हिने न कुरकुर करता आपल्या संसारात प्रवेश करू दिला. हिच्या आतल्या भागात कायमच शाळेच्या वेळापत्रकाची व भारताच्या तिरंग्याची हक्काची जागा होती. बाकी आतल्या इतर प्रत्येक वस्तूची जागा व संख्या ठरलेली असायची. शाईचे पेन, दोन टोक केलेल्या नटराजच्या पेन्सिली, पांढरे म्हणावे असे एक खोडरबर, आवडत्या रंगाचे शार्पनर, पायाने किंचीत अधू झालेला कर्कटक, संख्या पुसल्याने स्वतःची उंची हरवलेली पट्टी इ. सामान भरले जायचे. सणासुदीला घर जसे पाहुण्यांनी खचाखच भरते तसेच परीक्षेच्या काळात हिच्यात अजून काही नवीन गोष्टींची भर पडायची. ओझ्याने वाकून कधीमधी कुरकूर करायची पण साथ नाही सोडायची.
शाळेतली ही जवळची मैत्रीण कॉलेजला गेल्यावर का कोणास ठाऊक एकदम नकोशी होते. खिशात एक बॉलपेन अडकवल की हिची फारशी गरज नाही भासायची. हिला फक्त प्रयोगशाळेत बरोबर नेले जायचे आणि इतरवेळी बिचारी आपली आठवण काढत घरात झुरायची.
परवा सोलापूरला (माझ्या माहेरी) घर साफ करताना अचानक जुना खजिना सापडावा तशी ही सापडली. अजूनहि तशीच देखणी आहे. तिला बघून माझ्या डोळ्यात पाणी आले, ती पण बहुधा माझ्या मायेच्या स्पर्शाने मुकपणे रडली असेल. आत अजूनही दोन टोक केलेल्या पेन्सिली, संख्या पुसट झालेली पट्टी, अधू कर्कटक आणि लाला रंगाचा शार्पनर तसाच होता. या मौल्यवान खजिन्यातील खोडरबर मात्र त्याच्या मित्रांची ताटातूट होऊन कुठेतरी हरवला होता. झाकणावरचा दत्तगुरूंचा फोटो तसाच प्रसन्न व मनःशांती देणारा भासला तर उजव्या कोपर्‍यातील स्पायडरमॅन अजूनही तसाच तरूण व डॅशिंग होता. आतल्या भागात भारताच्या तिरंग्याचे रंग अजूनही तसेच गहिरे होते आणि इयत्ता दहावीचे वेळापत्रकही अजूनही ठळक दिसत होते. ते काढून पाहिले तर अचानक त्यामागे दडवलेला “हम आपके है कौन” मधला माधुरीचा एक सुंदर फोटो सापडला. आम्हांला भुरळ पाडलेले तिचे ते लोभस हास्य अजून तसेच मनमोहक भासत होते. या सतत बदलणार्‍या आधुनिक जगात मी मात्र नक्की बदललो होतो. हट्टाने मी हिला सिंगापूरच्या सामानात भरले. सिंगापूरातील कार्यालयीन रूक्ष कामकाजातून व कुटुंबाला वेळ देऊन झाल्यावर कधी बालपणात रमावेसे वाटले तर हिचे बोट धरून त्या रम्य आठवणींच्या डोहात थोडा वेळ स्वच्छंदपणे डुंबूंन घेतो. मन हलके व ताजतवाने होते. ही मैत्रिण मनाला खूप शांतता व समाधान देते.
माझ्या प्रत्येक लेखाची पहिली वाचक आमच्या सौभाग्यवती. मी कंपासपेटीला दिलेली पहिल्या जवळच्या मैत्रिणीची उपमा वाचून ती जरा खट्टू झाली. मग तिचे सुरू झाल, नवरा हा “दप्तरा”सारखा असतो. येवढी पुस्तके वाहून सुध्दा जशी त्याला बुध्दी येत नाही तसेच एवढी वर्षे संसार करून सुध्दा नवर्‍यांच्या अकलेत काहीच वाढ होत नाही. वर त्याचं ओझं आयुष्यभर वागवाव लागतं. शेवटी हसत हसत माझे बंद करकचून आवळले गेले.......

मुक्तकसाहित्यिकसमाजशिक्षणलेखअनुभव

प्रतिक्रिया

पैसा's picture

20 Sep 2017 - 2:23 pm | पैसा

खूप छान!

पद्मावति's picture

20 Sep 2017 - 2:32 pm | पद्मावति

मस्तच.
मग तिचे सुरू झाल, नवरा हा “दप्तरा”सारखा असतो. येवढी पुस्तके वाहून सुध्दा जशी त्याला बुध्दी येत नाही तसेच एवढी वर्षे संसार करून सुध्दा नवर्‍यांच्या अकलेत काहीच वाढ होत नाही. वर त्याचं ओझं आयुष्यभर वागवाव लागतं. =)) आवडलं खुप.

पगला गजोधर's picture

20 Sep 2017 - 5:38 pm | पगला गजोधर

लेख व लेखकनाव यमकात आहे ....

कंपास पेटी ..... ओबामा एटी ....

चौथा कोनाडा's picture

28 Sep 2017 - 9:21 pm | चौथा कोनाडा

:-))

एस's picture

20 Sep 2017 - 5:43 pm | एस

छान लिहिलंय.

परवा सोलापूरला (माझ्या माहेरी) ????????????

पद्मावति - हा हा हा ..बर्याच जणांनी हेच सांगितले.

पगला गजोधर-- वॉव....छान नोटिस केले आहे. हा हा हा.

भिंगरी - मी सोलापूरचा. वाचकांना कळावे मी माझ्या घराबद्दल बोलतो आहे ते कळावे म्हणून.

गामा पैलवान's picture

21 Sep 2017 - 7:09 pm | गामा पैलवान

ओबामाऐशी,

माझी जुनी क्याम्लिनची कंपासपेटी आठवली. मी तिच्यात बेडूक भरून नेत असे. एका गुरुजींना तरी तो रबराचा वाटला. त्यांनी सांगितल्यानुसार मी आज्ञाधारकपणे तो उचलून त्यांच्या टेबलावर ठेवला. तरीही त्यांचा विश्वास बसला नाही. चेहरा खाली करून ते त्यास न्याहाळू लागले. मग मी त्याच्या (=बेडकाच्या) विशिष्ट जागी स्पर्श केला. तर तो उड्या मारू लागला. प्रत्येक उडीसरशी मास्तरांचा चेहरा मागे मागे जात राहिला. तिसरी उडी झाल्यावर मीच त्याला पडकून परत कंपासपेटीत बंदिस्त केला. वर्गर एकंच हशा उसळला. मास्तर दयाळू होते म्हणून बरं. नाहीतर माझी रवानगी कुठेतरी झाली असती.

आ.न.,
-गा.पै.

@ गामा पैलवान:- तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आम्हांला लहानपणी काडेपेटीचे छाप (Match box) गोळा करायची सवय होती. त्यात शाळेत मित्रांबरोबर देवाणघेवाण चालायची. घरच्यांपासून लपविण्यासाठी ते कंपासपेटी ठेवले जायचे. एकदा बाबांनी तातडीने पेन हवे म्हणून कंपास उघडला...आणि मग जी काय आमची हजामत झाली विचारू नका.
त्या छोट्या पेटीत आपले विश्व सामावलेले असायचे आणि म्हणूनच आपल्या जिव्हाळ्याची होती...रादर आहे.

मनिमौ's picture

25 Sep 2017 - 9:51 am | मनिमौ

छान लिहीले आहे. लंपास मधे वेळापत्रक मानावे आणी ते टिकावे म्हणून आम्ही मैत्रीणी जरा जाडसर कागद मिळवायला बघायचो. त्यांची आठवण आली. पाचवीत गेल्यावर माॅर्डन च्या दुकानात चायना पेन आणी नवीन कंपास सहट आाठी णी आईची बोलणी पण आठवली.

माॅर्डन च्या दुकानात चायना पेन

हे अस्सल सोलापूरकर बघा.
कीतीही वेळा सांगा आम्हाला ते मॉर्डन नाही मॉडर्न आहे.
आम्ही एकच सांगणार" तेच बे, तेच की ते कामतसमोरले मॉर्डन."

गामा पैलवान's picture

25 Sep 2017 - 6:28 pm | गामा पैलवान

सोलापुरीवर कोल्हापुरी : ते मॉर्डनच आहे. लंडनला कधी गेला नाहीत वाटतं? बघा इथे मॉर्डन आहे : https://en.wikipedia.org/wiki/Morden
-गा.पै.

राघवेंद्र's picture

29 Sep 2017 - 1:07 am | राघवेंद्र

अभ्या बे, आमच्या काळात मॉडर्न पार्कच्या चार पुतळ्या समोर होते. आता तिथे कार चे शोरूम आहे.

एक वेळ काळजापूर मारुतीचे मंदिर उघडे मिळेल पण मॉडर्न फार कमी वेळ उघडे असायचे. :)

राघवा ती कारची शोरूम जागा पैल्यापासून तशीच होती, मॉडर्न ची जागा सिटी पार्क हॉटेलची झाली. कशी ताब्यात घेतली ती वेगळी स्टोरी. ;)

राघवेंद्र's picture

29 Sep 2017 - 1:34 am | राघवेंद्र

सिटी पार्क ... बरोबर

होऊन जाऊदे एखादी गोष्ट.. बरेच दिवस काही नवीन लेखन आले नाही तुझ्या पोतडीतून

चौथा कोनाडा's picture

28 Sep 2017 - 9:28 pm | चौथा कोनाडा

सुंदर नॉस्टेल्जिक लेख !

पट्टी, कर्कटक, गुणे, कोनमापक, बिनटोकाची पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, शाईचे पेन, त्याच्या निब इ. गोष्टींचा आपल्या संसारात शाईचा उल्लेख वाचून मला डायरेक्ट माझ्या कंपास पेटीचा वास यायला लागलाय !
गेले ते दिन गेले !