संध्याकाळचे सात-साडेसात झाले असतील. देवापुढे दिवा लावून आज दिवसभरात लावलेल्या दिव्यांची उजळणी करत होतो. मला अगदी स्पष्ट आठवतंय शुभंकरोतीच्या एकूण शृंखलेतील शेवटचा श्लोक गात(वाचा रेकत) होतो. मी म्हणत होतो की,
"सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो"
पुढला कलंक लागण्याआधीच आयमीन ऊच्चारण्याआधीच एका सृजनाचं वाक्य कानी पडलं. माझा सख्खाशेजारी 'राजेश' होता तो.
ये बाजी!! कुणीतरी तुला शोधतंय बहुतेक. ते ऐकून माझ्या काळजात धस्स-बिस्स अजिबात झालं नाही कारण एव्हाना माझा गजनी झाला होता. सुसंगतीतून बाहेर येत गॅलरीत जाऊन खाली पाहिलं तर, ग्रे कलरच शर्ट-पॅन्ट आणि त्याच रंगाची गांधी टोपी घातलेल्या एका इसमाला माझे काही फितूर दुश्मन लोकं हातवारे करून, "ते बघा! त्या कोपऱ्यातलं घर" असं काहीतरी सांगत होते. राजुच्या चाणाक्ष नजरेने आणि सिक्थ सेंन्सने ते कोणाला शोधात असतील हे हेरून मला लगेचच टिप दिली. (गवळीला दगडीचाळीत कशी टिप मिळायची तशी). गवळी लपून बसायचा... पण मी तसाच खाली उतरलो (तसाच म्हणजे हाफ चड्डीवर). सीबीआयचा माणूस आयमीन शाळेचा शिपाई बिल्डिंगच्या पायऱ्या चढायच्या आतच त्याला सामोरा गेलो.
मी :- काय झालं काका? नाही मामा.
तो :- शाळेत चला म्हणजे कळेल.
मी :- अहो काय झालं ते तर सांगा आधी.
तो :- शेख सरांनी बोलावलंय तुम्हाला.
शाळेचा शिपाई मला आदराने 'तुम्हाला' वैगरे बोलतोय हे ऐकून भारी वाटत होतं पण ते जास्त काळ टिकलं नाही. कारण तुम्हाला म्हणजे त्यात माझा क्राईम पार्टनर संजय देखील होता. भिजलेल्या मांजरासारखा थरथरत एका साईडला उभा होता पण अंधारामुळे दिसला नव्हता. संजय कानात पुटपुटला, 'बाजी' लोचा झालाय. ते खडूचं लफडं कळलंय शाळेत म्हणून बोलावलंय आपल्याला. आँ!! हैशपथ! आता थरथरायची पाळी माझी होती.
मी :- च्याआयला!! संज्या, तुला दुपारीच सांगितलं होतं. आज पाल अंगावर पडली, शाळेत काळी मांजर आडवी गेली आणि तू तोंड वर करून तुकारामांचे अभंग ऐकवत होता. आता बोल?
तो :- एकनाथ महाराजांचा होता तो.
मी :- अरे कोणाचा का असेना आपली बूच मारलीना तुझ्या महाराजांनी.
तो :- चल आता गपचूप. एकनाथ महाराज येणार आहेत का आपल्याबरोबर?
मी :- बादवे. कुणी सांगितलं असेल रे?
तो :- माहीत नाही. मी पण तोच विचार करतोय.
समहाऊ आम्हा दोघांना अख्या चाळीतली लोकं आमच्याकडेच बघताहेत असा भास होऊ लागला. जनता मार्केट मधील लोकं वळून वळून आमच्याकडेच बघताहेत असं वाटू लागलं. 'कुविख्यात चोर बाजी(उर्फ चिरा) आणि संज्या(उर्फ परपेंडीक्युलर) यांना खडूची स्मगलिंग करतांना अटक!. पोलिसांची मोठी कारवाई, हाफ चड्डी गॅंगला मोठा हादरा!!' अशी बातमी अंबिका स्वीटमार्टच्या समोर असलेल्या पेपर स्टॉलवर लटकत असल्याची मला क्षणभर दिसली.
मन चिंती तें वैरीही न चिंती. आमची वरात शाळेच्या वाटेवर असतांनाच संजयने सिम्पथीच्या धोतराला हातघालून शिपायाकडून शेख सरांना कोणी टिप दिली ते काढून घेतलं.
मी :- आँ!! राजेंद्र कांबळे? काय सांगतोस? च्याआयला त्याच्या!! अरे कालच एकत्र आम्ही साबुदाण्याची खिचडी आणि खीर खाल्ली होती. त्याला म्हणालो पण होतो मी की खीर खातांना मला नेहमी श्राद्धाचं जेवतोय असं वाटतं.
संजय :- हो ना.. आता स्वतःचं स्वतःच्या डोळ्याने बघ.
मी :- ह्या ह्या ह्या!
संजय :- खी खी खी!
शिपाई :- काय निर्लज्ज कार्टी अहात रे तुम्ही!!. तुम्हाला शेख सर काय चीज अजून माहीत नाहीये.
शेख सरांशी आमचा कधी संबंध आलाच नव्हता. ना ते आम्हाला शिकवायला होते ना त्यांची ड्युटी सकाळ अधिवेशनला होती. ते रात्रशाळेचे प्रिन्सिपल होते इतकंच माहीत होतं. आमचं अज्ञान पाहून शिपाई मामाने मग चालता चालता शेख सरांचे किस्से (क्रौर्य) सांगू लागला. ते ऐकून शेखसर मला गब्बरच्या आसपासचे वाटू लागले. तसंही शोले सिनेमात गब्बर प्रत्यक्ष पडद्यावर येतो तेच मुळात सिनेमा सुरू होऊन जवळपास दीड तासानंतर! मात्र तोपर्यंत त्याच्याबद्दलच्या नुसत्या संवांदातून त्याची दहशत जाणवायला लागलेली असते. सिनेमात त्याची पहिली ओळख होते ती "वो मशहूर डाकू?" ह्या साध्या प्रश्नाने. पण मग सिनेमाचं कथानक जसजसं वेग घेऊ लागतं तसतसं त्याचे क्रौर्य दिसू लागतं आणि त्याची दहशतही वाढायला लागते. त्याच धर्तीवर शिपायाने शेख सरांचे कॅरक्टर रंगवून आमच्यावर दडपण आणायला सुरवात केली. दोन-चारशे वर्षांनंतर भारतीय संस्कृतीतल्या 'लार्जर दॅन लाईफ' अशा खलनायकांबद्दल जेव्हा कधीही गप्पा होतील तेव्हा त्यात पाच नावं नक्की असतील - रावण, दुर्योधन, कंस, गब्बर सिंग आणि शेख सर असा एकूण सूर शिपाई मामाचा होता.
मला तर एव्हाना शेख सरांमधे गब्बर दिसू लागला होता. मिलिटरी ऑलिव ग्रीन रंगाची, पिदडून वापरलेली त्याची पँट आणि नजरेत खुपणारे दणकट काळे बूट, खुरटलेली दाढी, पायांच्या जोडीने सापासारखा वळवळत, खडक घासत फिरणारा काडतुसांचा चामडी पट्टा! आधीच अंगावर येणारं विचित्र आवाजात भेसूरपणे कुत्रं रडल्यासारखं पार्श्वसंगीत आणि पहिल्यांदा दिसतो तेव्हाच कानशिलात लागवल्यासारखे ते शब्दही.
"सूअर के बच्चों!”
संजय :- (मला हलवून) ये विन्या!! सर बघ काय विचारताहेत.
शेख सर :- कोणाचे रे तुम्ही?
मी :- आम्ही?, .... स स स.. 'सूअर' चे.
शेख सर :- आँ!!
टॉमची बुबुळं गरागरा फिरतात तशी सरांची बुबुळं क्षणभर फिरली. त्यांच्या बुबुळांचे टप्पे थांबण्याआधीच,
मी :- सॉरी सॉरी. काय विचारलंत सर?
संजय :- एन के चौधरी.... क्लास टिचर 'एन के चौधरी' सर.
(आवांतर :- गब्बरच्या विचारचक्रात आम्ही कधी शाळेत पोहोचलो, शिपायाने कधी आम्हाला शेख सरांच्या केबिनमधे नेलं, शेखसरांनी कधी प्रश्न विचारायला सुरवात केली याचं अजिबात भान मला नव्हतं. संजयने मला शुद्धीवर आणून थोडी बहुत वेळ मारून नेली म्हणून बरं झालं नाहीतर शेखसर मला कानफटवायच्या तयारीत होते. आता मी शुद्दीवर आलोय, तुम्हीही खुर्चीत सावरून बसा आणि पुढे काय संवाद झाला तो वाचा)
शेख सर :- एव्हढे चांगले सर आणि असा नालायकपणा करता होय?
आम्ही :- सॉरी सर. पुन्हा नाही करणार सर.
शेख सर :- पुन्हा करायची गरज पडणारच नाहीये कारण हॉल तिकिटच देणार नाहीये तुम्हाला.
आम्ही :- प्लिज सर, असं नका करू (आम्ही काकुळतीला आलो)
संजय :- आम्ही खडूचे बॉक्स परत आणून देतो सर. प्लिज सर
मी :- हो सर. (एव्हाना डोळ्यात पाणी माझ्याही आलं होतं)
शेख सर :- आणि कपाटाची काच फोडली त्याचं काय?
आम्ही :- आँ!! नाही सर, आम्ही नाही फोडली, आधीच फुटलेली होती.
शेख सर :- खोटं बोलू नका, राजेंद्रने सांगितलंय सगळं. अरे चांगल्या घरची मुलं तुम्ही आणि अश्या चोऱ्यामाऱ्या करता?
मी :- सॉरी सर, आम्हाला ते खडू असेच पडून आहेत म्हणून अभ्यासासाठी नेले.
शेख सर:- खडूने अभ्यास?. ते काही नाही, तुमच्या पालकांना बोलवा आत्ताच्या आता. कळूदेत तुमचे प्रताप त्यांनाही.
शेख सरांचा आवाज आता टिपेला पोहोचला होता. गब्बरसारखे एक एक पत्ते टाकत पोटात भीतीचे गोळे वाढवत होते. संजय आणि मला यातून कसं बाहेर यायचं तेच कळत नव्हतं. हॉल तिकीट नाही मिळालं तर?, घरी चोरी बद्दल कळालं तर?, घरची उत्तर पूजा कशी असेल? या सगळ्या विचारांनी आमच्या दोघांच्या डोक्यात काहूर माजलं. मेंदू बधिर होत चालला होता. पण एक गोष्ट आम्ही नेटाने करत होतो. सरांच्या कुठल्याही प्रपोजलला तयार होत नव्हतो. काय कुदवायच ते कुदवा आणि खडूचे बॉक्स रिटर्न घेऊन मॅटर संपवा असा एकूण पवित्रा आम्ही घेतला होता. मेलेला कोंबडा आगीला भीत नाही तशी एकूण मानसिक परिस्तिथी आमची झाली होती. कुठून झक मारली आणि ते बॉक्स उचलले हा पच्छातापही छळत होता. आपण चोर आहोत हे ऐकून स्वतःची घृणा वाटत होती. बराच वेळ असच टेंस वातावरण होतं आणि थोड्या समहाऊ काहीतरी अनपेक्षित घडलं. जे घडलं त्यासाठी आपल्या मिलिंद इंगळेच्या गारव्याची सुरवातीच्या काही ओळी अगदी चपलख बसतील.
"इतक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो,
ऊन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो..
दुपार टळुन संध्याकाळचा सुरू होतो पुन्हा खेळ,
ऊन्हामागुन चालत येते गार गार कातर वेळ..
चक्क डोळ्यांसमोर ऋतू कूस बदलून घेतो..
पावसा आधीच ढगांमधे कुठून गारवा येतो?
काय झालं काहीच कळलं नाही, कुणाची पुण्याई कामी आली माहीत नाही, शेख सरपण एव्हाना कंटाळले होते. गुन्हा कबूल पण शिक्षा फक्त मार खाण्याचीच हवी होती आम्हाला. बराच वेळ अश्या बार्गीनिंगमधे गेल्यानंतर.
शेख सर :- जा चालायला लागा. पुन्हा असं करू नका. उद्या बॉक्स शाळेत जमा करा.
आँ!!
आम्ही कमालीचे आश्चर्यचकित!! आम्हाला आमच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. पण सरांचा विचार बदलायच्या आत आम्ही केबिन मधून बाहेर आलो. एकमेकांना टाळी दिली. हाफ चड्डी गॅंगचे चोर बाजी(उर्फ चिरा) आणि संज्या(उर्फ परपेंडीक्युलर) अगदी स्वस्तात सुटले होते.
आपल्या मराठी भाषेत दूधाने तोंड पोळल्यावर, माणूस ताक पण फुंकून पितो अशी काहीशी म्हण आहे तश्याच अर्थाची पोर्तुगीज भाषेतही एक म्हण आहे.
"काओ पिकाडो पोर कोब्रा, टेम मेडो डी लीगूइका"
अर्थात,
"साप चावलेला कुत्रा, सॉसेजेसला ना तोंड लावत ना वास घेत"
पुन्हा कधीही खडूच्या वाटेला जायचं नाही हा निर्धार करूनच आम्ही घराकडे निघालो. आनंद गगनात मावेनासा झाला होता.त्याच खुशीत जवळ-जवळ धावतच घराकडे निघालो. पण भय इथले संपत नाही,
नियती आम्हाला पाहून विकट हास्य करत होती, जनता मार्केटहुन आमच्या गल्लीत शिरलो तेव्हा संजय आणि माझ्या बिल्डिंगच्या मध्यात असणाऱ्या मैदानात अजून एक प्रकरण आमची वाट पहात उभं होतं.
काय होतं ते प्रकरण? चारुचा दणकट भाऊ दंड थोपटून मैदानात कशासाठी उभा होता? आगीतून परत फुफाट्यात आम्ही कसे गेलो या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी वाट पहा,
"हाफ चड्डी गँग (The Conclusion)"
प्रतिक्रिया
10 Sep 2017 - 8:36 pm | यशोधरा
भाग ३ लवकर टाका! =))
10 Sep 2017 - 10:13 pm | पैसा
मस्त!
10 Sep 2017 - 10:25 pm | प्रमोद देर्देकर
लय भारी. वा बाजीप्रभु मस्त खिंड लढवलीत.
11 Sep 2017 - 12:18 am | एस
लैच!
11 Sep 2017 - 1:59 am | शलभ
सहीच..
11 Sep 2017 - 6:03 am | तुषार काळभोर
तो आणि कशाला आला ??
तिसरा भाग अर्जंट टाका!
11 Sep 2017 - 7:20 am | वरुण मोहिते
रहो
11 Sep 2017 - 7:20 am | वरुण मोहिते
रहो
12 Sep 2017 - 8:55 am | शित्रेउमेश
जबरदस्त..!!!!
12 Sep 2017 - 10:29 am | संजय पाटिल
जबरदस्त!!!
आता ही चारू कोण?
लवकर येऊदे...
12 Sep 2017 - 11:44 am | पगला गजोधर
मेहुणपुरा की हसबनीस-बखळ मधले हो तुम्ही देशपांडे ?
12 Sep 2017 - 2:08 pm | बाजीप्रभू
यशोधराजी, पैसाताई, प्रमोद देर्देकरजी, एस भाऊ, शलभजी, पैलवानजी, वरुण मोहितेजी, शित्रेउमेशजी, संजय पाटिल, पगला गजोधर _/\_
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!
तिसरा पार्ट लिहिणार आहे... फक्त विकांतात वेळ मिळतो त्यामुळे... भागांची चळत लावण्यास उशीर होतो.
पहिला भाग "वॉटर टेस्ट" असतो... प्रतिक्रिया बऱ्या असतील तर पुढे लिहितो नाहीतर Ctrl+Alt+Del .
12 Sep 2017 - 3:23 pm | पगला गजोधर
सीतेप्रमाणेच तुम्ही अग्नीपरीक्षा पास झाला आहात असं समजा...
बिन्दास्त लिहा अनुकूल/प्रतिकूल प्रतिक्रिया येवोत/न-येवोत.
12 Sep 2017 - 4:54 pm | मितान
भारी लिहीत आहात !!!!
येऊद्या पुढचा भाग :))
13 Sep 2017 - 5:05 pm | पुंबा
झक्कास्स!!
मस्त जमलंय..
पुभाप्र..
14 Sep 2017 - 11:59 am | सनि
मस्त जमलंय
31 Oct 2017 - 12:27 pm | बिपिन कार्यकर्ते
पुढे?
25 Jan 2018 - 2:02 pm | नावातकायआहे
पुढे?