यंदा कर्तव्य आहे? भाग २

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in जनातलं, मनातलं
22 Feb 2009 - 5:29 pm

यंदा कर्तव्य आहे? पुस्तकाचे
मनोगत

यंदा कर्तव्य आहे भाग १

पत्रिकेचे गुणमेलन म्हणजे काय?

वधूवरांच्या पत्रिका या विवाहाच्या अनुषंगाने एकमेकींशी किती जुळतात हे पहाणे म्हणजे गुणमेलन. गुणमेलन ही संकल्पना वैवाहिक जीवनासाठी वधू-वर एकमेकास अनुरूप आहेत किंवा नाहीत हे ठरवण्यासाठी निर्माण झाली असावी. प्रेम, त्याग, सांमजस्य, या गोष्टी सुखी वैवाहिक जीवनास पोषक असतात. दोन भिन्न प्रकृतीची माणसं जर एकत्र आली तर वैवाहिक जीवनाचा समतोल ढासळतो. तसे होउ नये म्हणून त्यांच्या प्रकृतीचे मूल्यमापन पत्रिकेच्या माध्यमातून करून त्याचा निष्कर्ष सांगण्याचा प्रयत्न गुणमेलनाद्वारे केला गेला असावा.
पत्रिका-गुणमेलन करताना वधू वरांच्या पत्रिका शेजारी ठेवून त्यातील राशी नक्षत्राच्या आधारे एकूण आठ विभागात गुणांची मांडणी होते. बारा राशींची ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा चार विभागात केलेल्या वाटणीला वर्ण म्हणतात. मानव, चतुष्पाद,जलचर,वनचर व कीटक अशा प्रकारे जी विभागणी केली त्याला वश्य म्हणतात. तारा म्हणजे वधू व वर यांचे मधील नक्षत्रात्मक अंतर. योनी म्हणजे नक्षत्रांची केलेली अश्वयोनी, गजयोनी, मार्जारयोनी, मूषकयोनी, अशा एकूण १४ प्रकारे केलेली विभागणी. ग्रहमैत्री म्हणजे राशीस्वामी असणाऱ्या ग्रहांची परस्पर असलेली मैत्री. त्यातून घेतलेले मित्रत्व समानत्व वा शत्रुत्व. गण ही नक्षत्रावरून केलेली देव, मनुष्य व राक्षस या प्रकारात केलेली विभागणी होय. राशी कूट म्हणजे वधूवरांच्या राशीतील परस्पर अंतर. नाडी ही नक्षत्रा नुसार आद्य, मध्य व अंत्य अशा तीन प्रकारात केलेली विभागणी आहे. या विभागांनुसार
वर्णगुणाला १,
वैश्यगुणाला २,
तारागुणाला ३,
योनी गुणाला ४,
ग्रहमैत्री गुणाला ५,
गणगुणाला ६,
राशीकूटगुणाला ७
आणि
नाडीगुणाला ८
अशा चढत्या क्रमाने गुण दिलेले असून सर्व गुणांची बेरीज ३६ होते. वर्ण, वश्य, ग्रहमैत्री व राशीकूट हे चार विभाग राशीनुसार पाडले असून त्यांची एकूण १५ गुण होतात. नक्षत्रानुसार तारा,योनी गण व नाडी हे चार विभाग असून त्यांचे एकूण २१ गुण होतात. असे राशी व नक्षत्र मिळून ३६ गुण होतात. एकंदरीत, परीक्षेसाठी असलेल्या अभ्यासक्रमात कुठल्या टॉपिकला किती गुण हे जसे दिलेले असते तसाच इथे प्रकार आहे. हे सर्व गुण वधू-वरांच्या पत्रिकेत चंद्र कुठल्या नक्षत्रात कितव्या चरणात आहे यावर ठरलेले असते. त्यासाठी पंचांगात रेकनर सारखे कोष्टक असते. ते पाहून ३६ पैकी १८ पेक्षा अधिक गुण जमले तर विवाह जमवण्यास हरकत नाही असा निकष असतो. थोडक्यात पन्नास टक्क्याचेवर मार्क मिळाले तर पास !
ज्योतिर्विभूषण प्रा. अरविंद बर्वे ग्रहसंकेत 'राष्टीय ज्योतिष संमेलन विशेषांक १९९७` मध्ये म्हणतात, '' केवळ वधूवर राशी नक्षत्रावरुन गुणमेलन होते. यासाठी वधूवरांच्या पत्रिकाच बघाव्या लागत नाहीत! ही आश्चर्य वाटणारी पण सत्यस्थिती आहे. गुणमेलनात विवाह करायचा की नाही हे केवळ राशिनक्षत्रावरुन ठरते. पण मोठेमोठे सुशिक्षितही यालाच पत्रिकामेलन समजतात हे मोठेच दुर्दैव होय. गुणमेलन हे पत्रिका न पहाताच केलेले पत्रिकामेलन आहे. बहुसंख्य महाराष्टीयन ( व अन्य प्रांतीय लोकही ) आजही याच भ्रामक अशास्त्रीय अपूर्ण, रुढ व परंपरागत गुणमेलनाच्या अंधश्रद्धायुक्त जोखडात अडकलेले आहेत. एखाद्या आजारी माणसाला बरा करण्यासाठी डॉक्टरला दाखवावे लागेल. डॉक्टरलाही त्याचा नुसता चेहरा पाहून भागणार नाही. तपासावे लागेल. वाटल्यास इतर आवश्यक चाचण्या, तपासण्या कराव्या लागतील. नंतरच रोगनिदान करुन उपचार होउ शकतात. वधूवरांच्या केवळ राशिनक्षत्रे पाहून पत्रिका (?) जमविणे म्हणजे रोग्याचा केवळ फोटा पाहून त्यावरुन डॉक्टरने औषधोपचार करण्याहून अधिक हास्यास्पद नाही काय? म्हणजेच गुणमेलन हे केवळ पत्रिका जुळवण्याचे नाटक आहे. कारण त्यासाठी प्रत्यक्ष पत्रिका उघडाव्याच लागत नाही. याचाच अर्थ गुणमेलन म्हणजे पत्रिकामेलन नव्हे.
आता प्रसिद्ध व लोकप्रिय अशा पंचांगात सुद्धा गुण मोजण्यात एकवाक्यता नाही. गुण मेलन कोष्टकाचे बाबतीत सर्वोत्तम म्हणता येईल असे एकच पंचांग आहे ते म्हणजे जन्मभूमी गुजराथी पंचांग. कर्क वधू व सिंह वर यांच्या नउ जोडयांपैकी दाते पंचांगाने तीनच जोडयांचे मेलन होते परंतु जन्म भूमी पंचांगाच्या गुणमेलन कोष्टकाच्या आधारे नउपैकी सर्वच्या सर्व १८ गुणाचे वर मेलन होते गुणमेलन छापताना अलीकडे पंचांगकर्ते कोष्टकात जमणाऱ्या गुणंासह असणाऱ्या दोषांचाही आवर्जून निर्देश करु लागले आहेत सर्व सामान्याना ज्ञान देण्याच्या उदात्त हेतू (?) धरुन जरी हे दोष छापले असतील तरीही हा दिशाभूल करण्याचा किंवा बुद्धीभेद करण्याचा प्रकार होत आहे.``
एक प्रथितयश ज्योतिषी श्री.श्री. भट हे आपल्या 'ज्योतिषाच्या गाभाऱ्यात या पुस्तकात म्हणतात, "विवाह पहाताना ठरविताना पत्रिका पाहणार नाही असा प्रचार केला जातो. तरुणांनी स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेऊ नये. वैवाहिक जोडीदार कोण असणार हे अटळ प्रारब्ध असते त्यात ज्योतिष हे निमित्त असते. " तर दुसरे मान्यवर ज्योतिषी श्री. व.दा.भट 'भाग्य` दिवाळी ९७ च्या अंकात म्हणतात, '' मी स्वत: ज्योतिषी असलो तरी एक गोष्ट प्रांजलपणे कबूल केली पाहिजे की वधूवरांची कुंडली जुळते अगर जुळत नाही या बद्दल हमखास अनुभवास येतील असे, ज्यावर पूर्ण विसंबून रहावे असे कोणतेही नियम नाहीत. पत्रिका जुळते अगर जुळत नाही या शब्दांना वास्तविक अर्थ नाही.
ज्योतिषी लोक विवाहसंस्थेत मानसिक गोंधळ घालण्यात पुढे असतात. विवाह घटनांमध्ये कुंडलीसंबंधाने भाष्य केव्हा, कधी कोणापुढे करावे याचे भान त्यांना नसते. विवाह निश्चित झाला असता, ठरला असता, साखरपुडा वगैरे गोष्टीपर्यंत प्रगती झाली असता पत्रिकांचा विचार बंद करावा. काही पालक भीतीपोटी, द्विधा मन:स्थितीपोटी किंवा काही प्रसंगामुळे एखाद्या ज्योतिषाला अशा परिस्थितीतही पत्रिका दाखवतात. ज्योतिषी नको त्या वेळेला नको ते भाष्य करतात! आणि मग गोंधळाला पारावार रहात नाही. नुसती धावपळ! या ज्योतिषाकडून त्या ज्योतिषाकडे धाव! साखरपुडा लग्न मोडावे की करावे ? रात्रंदिवस चिंता, घरात सर्वावर मानसिक दडपण! एखादा सामान्य ज्ञानाचा ज्योतिषी एवढा गोंधळ घालू शकतो असे दिसले की वाटते ज्योतिषशास्त्राचा विचार विवाहसंस्थेत नसला तर बरा! कमीत कमी कुटुंबप्रमुखाने पालकांनी एका विशिष्ट मर्यादेनंतर कुंडलीचा मुद्दा, विषय बंद करणे आवश्यक असते आणि ज्योतिषांनीही अशा वेळी नसते भाष्य करण्याचा मोह टाळला पाहिजे!
फलज्योतिषशास्त्राने निर्माण केलेले सामाजिक जीवनातील परिणाम विवाह संस्थेच्या बाबत जास्त तीव्रतेने आढळतात. रूढी, संस्कार एकदम झुगारुन देण्याइतपत मानसिक शक्ती सामान्य व्यक्तीची नसते. मुलामुलींचे विवाह ठरविताना 'जन्मकुंडली` चा विचार हा तसाच आहे. वास्तविक, संपूर्ण ज्योतिष शास्त्र हे शिफारसवजा आहे. सुखी वैवाहिक जीवनासाठी जन्मकुंडल्या पाहिल्याच पाहिजे असा दंडक किंवा नियम नाही. पाहिल्यास उत्तम एवढाच त्याचा अर्थ! मुलामुलींचे विवाह करताना कधी नव्हे ती जन्मकुंडलीची आठवण येते कारण आपले वडील, आजोबा पाहत असत आपणही ही परंपरा पाळावी, एक घराण्याची रुढी!
विवाह ही अत्यंत आनंदाने मनावर कोणतेही दडपण आणून न घेता साजरी करावयाची घटना! पण सध्याच्या ज्योतिषशास्त्राचा विवाह संस्थेतील सहभाग हा केवळ दु:ख, चिंता निर्माण करणारा, मनात कोठेतरी किंतू निर्माण करणारा आहे. सुखाच्या व आनंदाच्या काळाला आपल्या अगाध ज्ञानाने गालबोट लावण्यापलिकडे ज्योतिषी काहीही करीत नाहीत. परंपरेने, रुढीने मनावर झालेले चुकीचे संस्कार दूर सारून आनंदाने विवाह करावा.``
एकूण काय गुणमेलन करण्याच्या पद्धती या वाद ग्रस्त आहेत. त्यात अंतर्विसंगती आहेत.त्यामुळे त्याला ज्योतिषशास्त्रीय चौकटीत सुद्धा सर्वमान्यता नाही. ३६ गुण जुळूनही विवाहसौख्य नसलेली उदाहरणंही दिसतात. तर पत्रिका न पाहताही उत्तम वैवाहिक जीवन जगणारे लोक दिसतात. त्यावर काही ज्योतिषी म्हणतात की प्राक्तन हे जर आम्हाला सर्व कळालं असतं तर आम्ही ब्रम्हदेव झालो नसतो का? शेवटी प्राक्तन कुणाला टळलं आहे का? प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे. श्रद्धाळू माणसांना हे युक्तिवाद बिनतोड वाटतात.

यंदा कर्तव्य आहे? भाग ३
यंदा कर्तव्य आहे ? भाग ४
यंदा कर्तव्य आहे? भाग ५
यंदा कर्तव्य आहे? भाग ६
यंदा कर्तव्य आहे? भाग ७
यंदा कर्तव्य आहे? भाग ८

फलज्योतिषविचार

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

22 Feb 2009 - 5:37 pm | विनायक प्रभू

बद्दल धन्यवाद

अवलिया's picture

22 Feb 2009 - 8:33 pm | अवलिया

उत्तम माहिती

--अवलिया

दशानन's picture

23 Feb 2009 - 9:20 am | दशानन

सुंदर !

अवांतर : माझं लग्न ठरत आहे पण मीच तयार होत नाही आहे अशी काही स्थिती निर्माण होत असते नेहमी... कृपया करुन सांगता का कुठला ग्रह फितुर झाला आहे ते :?

नाय सरळ त्या ग्रहावरच हल्ला चढवू =))

Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero.
सत्य वचन :D

प्रकाश घाटपांडे's picture

23 Feb 2009 - 9:36 am | प्रकाश घाटपांडे

माझं लग्न ठरत आहे पण मीच तयार होत नाही आहे अशी काही स्थिती निर्माण होत असते नेहमी... कृपया करुन सांगता का कुठला ग्रह फितुर झाला आहे ते

अशी स्थिती होण्यासाठी ,फितुरी करण्या साठी वा तसे करण्यास प्रवृत्त करण्यासाठी एकच ग्रह कारणीभुत असतो तो म्हणजे पुर्वग्रह:) :-)
आन अशा पुर्वग्रहावर राजे तुम्ही नी हल्ला करनार? त्येच्या साठी ज्योतिषाची शांती कराया लागतीया म्हाशय तव्हा कुठ जमतय! ;) ;-)
प्रकाश घाटपांडे

दशानन's picture

23 Feb 2009 - 9:38 am | दशानन

>ज्योतिषाची शांती कराया

ह्म्म, गुरुदेव त्यासाठि मला काय करावे लागेल :?

मी आज पर्यंत जे महान कलाकृती लिहल्या... आहेत त्या दान करुन का.. कोणाला तरी :?

Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero.
सत्य वचन :D

विकास's picture

22 Feb 2009 - 10:27 pm | विकास

माहीतीपूर्ण लेख (नेहमीप्रमाणे.!)

मधे सनई-चौघडे/कांदेपोहे हा चित्रपट पाहून वेळ वाया घालवला. तेंव्हा त्यात अशा अर्थी वाक्य होते की पुर्वी मंगळे म्हणल्यावर मुलाचे/मुलीचे नाव कटाप केले जायचे पण आता अभिषेक ऐश्वर्या (दोघांनाही मंगळ) यांच्या उदाहरणानंतर (रोल मॉडेल!) मंगळ असणे हे हायलाईट केले जाते...

वरील विधानात तथ्य आहे का?

प्रकाश घाटपांडे's picture

23 Feb 2009 - 9:17 am | प्रकाश घाटपांडे

तेंव्हा त्यात अशा अर्थी वाक्य होते की पुर्वी मंगळे म्हणल्यावर मुलाचे/मुलीचे नाव कटाप केले जायचे पण आता अभिषेक ऐश्वर्या (दोघांनाही मंगळ)

या बाबत मी अनभिज्ञ आहे ही काय भानगड आहे सांगाल का? विकासराव म्हणले की आम्हाला मंगळावरच्या बाईची आठवण येते.
प्रकाश घाटपांडे

प्राजु's picture

23 Feb 2009 - 6:20 am | प्राजु

माहितीपूर्ण लेख नेहमीप्रमाणेच!!

त्यावर काही ज्योतिषी म्हणतात की प्राक्तन हे जर आम्हाला सर्व कळालं असतं तर आम्ही ब्रम्हदेव झालो नसतो का? शेवटी प्राक्तन कुणाला टळलं आहे का? प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे. श्रद्धाळू माणसांना हे युक्तिवाद बिनतोड वाटतात.

+१
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

यशोधरा's picture

23 Feb 2009 - 8:44 am | यशोधरा

हाही लेख आवडला.

लक्ष्मणसुत's picture

23 Feb 2009 - 5:02 pm | लक्ष्मणसुत

पत्रिकेपेक्षा रक्तगटाला महत्व द्या.

लक्ष्मणसुत

विसोबा खेचर's picture

23 Feb 2009 - 5:08 pm | विसोबा खेचर

आमचा धोंड्या म्हणतो,

"साला हा प्रकाश घाटपांडे लै डेंजर माणूस आहे. जेव्हा एखादा धागा जेव्हा फलज्योतिषाची बाजू मांडणारा असतो तेव्हा हा त्या विरुद्ध लिहितो आणि जेव्हा एखादा धागा फलज्योतिषविरोधी असतो तेव्हा हा फलज्योतिषाच्या बाजूने लिहितो..!

एक नंबर अवसान घातकी, डब्बलढोलकी लेकाचा!"

असो, या अवांतर माहितीबद्दल प्रकाशकाका आम्हाला नक्कीच माफ करतील! :)

बाकी चालू द्या..:)

आपला,
(प्रकाश घाटपांडेंचा फ्यॅन) तात्या.

लिखाळ's picture

23 Feb 2009 - 5:24 pm | लिखाळ

हा हा .. हे मस्तंच :)

प्रकाशरावांना फलज्योतिष पटत नसले तरी ज्योतिषशात्राबद्दल त्यांना आदर आहे असे दिसते.

हा लेख सुद्धा छान आणि नवीनच माहिती देणारा..
पुढचे भाग वाचायला उत्सुक आहे.
-- लिखाळ.

प्रकाश घाटपांडे's picture

24 Feb 2009 - 9:42 am | प्रकाश घाटपांडे

कधी इरोधकांना वाटत हा आपल्यातला हाय. तर कधी समर्थकांना. विषय मात्र आपल्या जागीच आहे. त्यामुळे आमचे कधी सँडविच होते तर कधी आम्ही दुवा बनतो. असो पुस्तकाची लेखमाला पुर्ण झाल्यावर एक वेगळी बाजु टाकणार आहे.

प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.