डाव - १ [ खो-कथा-दुसरी]
डाव - २ [खो कथा]
डाव - ३ [खो कथा]
-----------------------------------
सखाराम:
रात्री झोपेत अचानक माझ्या डोसक्यात ईचारचक्र सुरु झालं, आता समद स्पष्ट झालया, विकी रुपाच्या मागे, उस्ताद रुपाच्या मागे... आयला हा प्रेमाचा खो खो लई डेंजर. मागं असेच एक दोघाचे मुडदे पडले व्हते बाजुच्या गावात, असल्या प्रेमप्रकरणापाई. मला नगं बाबा हे लफडं..वस्ताद १० वी नापास, मारामारीे त्याच्या घरात रोजच हाय. त्याचा बाप आताच जेलमधून सुटुन आलाय. विहिरीवरच्या भानगडी वरुन वस्ताद आपल्याला नेहमी ब्लॅकमेल करत असतो. विकि,मी व रुपा या वर्षी फायनलला हाय, रुपा आणि विकी पैश्या वाल्या बापाची लेकरं, शिकली काय अन नाय शिकली काय, काय फरक पडतो. पण माजं तस नाय, मला पुढ शिकाया पहिजे. मला तर समद्या पेक्षा जास्तच मार्क पडत्यात, मास्तर बी माझ्यावर खुश असतात. आपली विहिरी वरची भानगड आणि वस्तादचा प्ल्यान हे समद मास्तरले सांगायला पाहिजे. तोच हे लफडं मिटवंल. आपण आपलं फायनल पास करु अन ठेट शहर गाठु. नग ईथ, आयुष्य बरबाद होईल उगाच. वस्ताद नक्कि काही ना काही करल दोन-चार दिसात, लवकर काहीतरी कराया पाहीजे. मास्तरले भेटायला पहिजे. विचारानं एकदम ताडकन डोळं उघडलं , सगळीकडं स्मशानशांतता होती थंड आणि मंद वार वहात होत व त्यात बाजुला झोपलेल्या पेंद्या आणि दाद्या यांच्या घोरण्याचा बारीक आवाज येत होता. अख्खं गाव मुर्दाडावानी झोपलं होतं. जवळच मस्तराचा बिछाना होता पण त्यावर मास्तर नव्हता कसला तरी चालण्याच्या आवाज थोडया दुरवरुन येत व्हतां. निरखून बघतोतर काय मास्तर गावा बाहेर झपझप चालत जात व्हतां. का बरं जातोया मास्तर ... थोड्या वेळ विचार केला पण काय उकल होईना. म्हणलं जाउन पाहुया आणि हिच वेळ योग्य आहे मास्तरंला समद सांगायची पण. मग काय सुरु केला पिच्छा मास्तराचा. मास्तर घुसला कंचनीच्या पडक्या महालात. अता मला गड्या मास्तर च्या वागण्यावर शंका येऊ राहली होती. मी हळुच महालाच्या वरच्या भागात पडक्या जिन्याच्या सहारे चढलो व लपुन बसलो, हा महाल आमचा रोजचा आड्डा, त्यामुळे इथला खडा न खडा अन कोनानकोना पाठ. थोड्याच वेळात रुपा तिथे आली. मला बाबो आता घाम फुटुन राहीला होता.आता ही भानगड वस्तादला कळाली तर काय होईल ह्या विचाराने माझे हातपाय कापायला लागले. रुपाने एक कागद मास्तरला दिला....... नंतर मास्तर तिच्या सोबत लगट करु लागला. नेमका त्याच वेळेला माझा पाय जरा सरकला आणि एक दगड वरुन मास्तराजवळ जाउन पडला, अन मास्तरला कोणीतरी असल्याची चाहुल लागली. मास्तर आरडला
"कोण हायं तिथं.?"
मी गप्पच
मास्तर पुन्हा आरडला "कोण हायं तिथं?"
मी बी इचार केला हिच येळ हायं मास्तरला रंगे हात पकडायची. म्हणजे मास्तर कब्जात ईल.
मी म्हणलं म्या हाई सखाराम आणि पडक्या जिन्यावरनं खाली आलो.
मास्तर माझ्या वर ओरडला "याद राख भाडxx कुणा जवळ बोलला तर. तुझ्या विहिरी वरच्या भानगडीचा भांडाफोड करील."
मी आवाकच झालो आयला हा मास्तर लई जायल हायं याला कस कळलं विहिरी वरच्या भानगडीचा. पण न घाबरता मी त्याला दमात उत्तर दिल " मास्तर दम भरायच काम नाय, ईचार करा जर वस्तादला कळालंतर तो तुमच काय करंल.
वस्तादच नाव काढताच मास्तर भानावर आला अन नरमला.
आजुबाजुला बघतो तर रुपा कधीच तिथुन पळुन गेली व्हती.
मास्तर नरम आवाजात बोलला चल तुला सगळ सांगतो.
"रुपाला मी गेल्या दोन वर्षा पासुन ओळखतो, गेल्या सहा महीन्या पासुन हळु हळु आम्ही एकमेकांच्या जवळ आलो."
"लईच जवळ आलात मास्तरं" मी मध्येच बोललो.
"हो, पण मी लग्न करणार आहे तीच्या सोबत"
"बरं.. पुढे बोला तो कागुद कश्याचा होता तिनं दिलेला"
"अरे तो कागद, ते तर प्रेमपत्र होतं"
"मास्तर येडा खुळा समजलात का?, म्या आईकलं समद. पुजाऱ्याच्या रंजीबरोबर मैत्री वाढवली आणि विक्याला नादाला लाउन चोरुन आणला तो कागद रुपानं. काय भानड कायं हाय"
"सांगतो, लई बेरका हाय तू"
"हो मग आहेच, सांगा पुढं कायते"
"आईक एकदा मी असाच रात्रीची झोप येत नव्हती म्हणुन मंदिराच्या मागं बसलो होतो. तेंव्हा तिथल्या एका अडोश्याला रंजीचा आजा आणि विक्याचा आजा हाळु हाळु गप्पा मारत होते. एका गुप्त खजिन्याबद्द्ल. हा खजिना म्हणजे आपल्या गावाच्या मंदिरातले दागिने सुमारे ३०० वर्षा पुर्वी लुटारुंच्या भितीने गुप्त पध्दतीने दडवुन ठेवले होते व याबद्द्ल फक्त विक्या आणि रंजीच्या खापर खापर पंजोबांना महित होत. पण त्या दोघांच निधन झाल्यामुळे तसेच त्या खजिन्याला शाप लागला आहे असे पसरवल्या मुळे, नंतर कोणी तो दडवलेला खजिना पुन्हा वर काढला नाही. पण त्या खजिन्याच्या नकाशाची नक्कलं एका पीढी कडुन नंतरच्या पीढी कडे येत गेली. रंजीचा आजा आणि विक्याचा आजा यांनी तो खजिना त्यांच्या जवानीत शोधन्याचा खुप प्रयत्न केला पण त्यांना यश आलं नाही. कारण नकाश्यातले संकेत त्यांना निट उमगले नाही. मागच्या वर्षी दोघांच निधन झालं. मला पुरातन संकेतांकाची चांगल्या प्रकारे उकलता येते तसा अभ्यास आहे माझा.मग मी विचार केला हा खजिना जर मीच शोधला तर, पुढच संपुर्ण आयुष्य फुकट बसुन खाता येईल. मग रुपाला कामाला लावलं. तिने हा नकाशा विक्या आणि रंजीकडुन प्राप्त केला. आता पुढचं काम म्हणजे खजिना शोधायचा. या कामात तू जर मला मदत केली तर तुला सुध्दा हिस्सा मिळेल. बोल काय म्हणतोस"
मास्तरच्या गप्पा आइकुन मला बी आता खजिन्याची हाव सुटली होती. मी विचार केला वाईट काय आहे त्याच्यात. खजिना मिळाला की मस्त शहरात जाऊन राहु आरामात.
"मी म्हणालो ठिक आहे देईन मी साथ, पण त्या वस्तादचं काय करायच ? तो रुपाच्या मागं पार येडा झाला आहे, त्याला जर कळलं तर तो जिव घेईल सगळ्यांचा."
त्यावर मास्तर म्हणाला "तू घाबरु नको मी बघतो त्याचं काय करायचं. पण एक लक्षात ठेव कोणाला काही सांगायचं नाही"
एवढं बोलत बोलत आम्ही मारुती मंदिराजवळ आलो......
प्रतिक्रिया
7 Apr 2017 - 12:09 pm | रातराणी
गाडीन ट्रॅक बरोबर पकडलाय! पुढचा खो कुणाला?
7 Apr 2017 - 7:14 pm | दीपक११७७
प्राची अश्विनी पुढचा खो तुम्हाला. ऑल द बेस्ट
8 Apr 2017 - 11:18 am | प्राची अश्विनी
खो स्विकारत आहे.
7 Apr 2017 - 12:17 pm | अॅस्ट्रोनाट विनय
दीपकभौ, भारी जमेश...
उत्सुकता वाढत चाललीये.
7 Apr 2017 - 12:49 pm | एमी
वा!! मस्त!!
7 Apr 2017 - 6:17 pm | Ranapratap
मस्त जमलंय
7 Apr 2017 - 6:37 pm | जव्हेरगंज
वट्ट भारी लिव्हलंय!
जाऊंद्या जोरात!!
8 Apr 2017 - 3:52 pm | विनिता००२
वाचतेय. उष्माघाताने डोके हलके झालेय. समजून घ्यायला वेळ लागतोय.