यशवंतराव:
त्याला आधी दोरीनं वर बांधला. मग खालून मिरचीची धुरी दिली. सगळ्या तुरुंगात धूरंच धूर. बघावं तिकडं खोकला. पण त्यानं काय तोंड उघडलं नाही.
हवालदार बनसोडे पळतंच आला. म्हणला, "सायेब, डेपुटी चीफ हिकडंच यायलेत. ह्ये इझवाय लागल"
च्यायला, आधनं ना मधनं ह्ये ब्येनं आज हिकडं कसंकाय?
"ह्येला लटकवूनच ठेवा, फकस्त ती पाटी फेकून द्या" मी वर्दी ठिकठाक करत म्हणलो.
"मरंल त्ये"
"मरु दे तिच्यायला, चप्पल चोरताना अक्कल कुठं गेलती?"
रिमांड होममधून बाहेर पडल्यावर मी डोक्यावर टोपी चढवली. तडक हाफिसमध्ये चालत आलो. खुर्चीवर बसलेल्या सुभेदाराला कडक सॅल्युट ठोकला. ह्ये आसलं पटकंवालं ब्येनं 'डेपुटी चीफ' कधीपासून झालं?
"नाय नाय, आमाला कशाला सलाम ठोकताय, बसा बसा यशवंतराव, वाईच काम हुतं"
बनसोडेला भोसडला पायजे. ह्या धोतरवाल्याला 'डेपुटी चीफ' म्हणतोय म्हजी कमाल झाली.
मी खुर्चीवर बसून जरा गार पाणी पिलो. त्या धोतरंवाल्याला पण थोडं दिलं.
"आईसायबांनी पाठिवलंय, व्हय घरलाच गेल्तो आधी, म्हणल्या पोरगं ठेसनात आसंल, तिकडंच जाऊन गाठ घ्या" त्या धोतरंवाल्यानं पान बिन काढून चुना बिना लावत मस्त रंगवायला घेतलं.
"बरं क्येलं, बरं क्येलं, पण काय काम हुतं म्हणला?"
"आवो मी पाटील, वळीखलं नाय का, सुपारी फोडाय जायचंय. आईसायबांनी सांगितलं आसंलंच की"
आसं आसं तिच्या मारी. मी इसरूनंच गेल्तो. फोटोतली पोरगी फटाकडी वाटत हुती म्हणा. पण मी इसरूनंच गेल्तो.
"ह्या रैवारी नक्की बघा पाटील. येळंच नाय. लय कामं पडल्यात"
मग पाटील जरा गोंधळात पडलं.
"आता हाय का, समदी पै-पावणी टेंम्पोत भरून आणल्यात. हितं चौकीच्या भाईर गाडी हुबी केलीय. आण तुमी म्हणता रैवारी!"
आरं तिच्या बायली. मजी आजंच जायचंय की काय. आसल्या आवतारात. मिरचीची धुरी लागलीय वर्दीला. पण म्हणलं ना, ह्यो गोतावळा गोत्यातंच आणणार येक दिवस. त्योच आजचा दिवस.
चौकीतली पेश्शल पेट्रोलिंगची गाडी काढली. गायतोंडे हुता चालवायला. म्हागं कॉम्बॅट टीम बसलेली रायफली हातात घेऊन. बायली, पोरगी बघाय चाललो का एनकाऊंटरला? पण पाटील म्हणले रायफली पायजेत. ढकलू ढकलू बसवलं टीमला. बायली इंप्रेशन पडतं म्हणे.
म्हागं टेम्पो. गोतावळा खचाखच. बायली पोरगी बघाय एवढे तर लग्नाला किती? साईडनं मोटारसायकली. धुराळा उडवत गाड्या बाभुळगावात.
येकतर ह्या पाटलानं येवढ्या उन्हाचं बोलावलं हुतं. पावणे म्हणून गावात आलो पर गाड्या बघून फाट्यावरली, आडावरली, चढावरली दारं खटाखट बंद झाली. पाराखालची लोकं पत्ते टाकून पाय लावून पळत सुटली. उसाच्या शेतात हातभट्टीची टिपाडं पालथी झाली. बायली भुरटी कुरटी सगळी झटक्यात परागंदा झाली.
पाटलाच्या वाड्याजवळ आल्यावर हालग्या तडतड तडतड करत घुमायला लागल्या. लेझीम काय, गुलाल काय, घोडा बघून छातीत धस्सच झालं. बायली आजंच आपलं उराकणार का काय?
"मटानंच करणार हुतू. पण आज येकादस ना" आल्या आल्या गाठभेट नाय, पाणी सरबत नाय, पोरीचं नखबी बघाय नाय, येवढ्या लांबनं आणून शाबुदाना खिचडी खायला बशिवल बायली ह्या पाटलानं. पंगता पडल्या. गावजेवण झालं.
सोफ्यावर बसलू जरा गार हवा घेत. म्हणे "चहा घ्या". आसतू गड्या घ्यायचा मग हाणला येकयेक कप. मग म्हणे, "पोहे घ्या" आसती गड्या घ्यायची मग हाणली येकयेक प्लेट. मग म्हणे," बोलवा पोरीला" आसतं गड्या .... तिच्या बायली. आता नेमकं करायचं तरी काय? पोरगी तिकडं वळचणीला आन गोतावळ्याची तोंडं माझ्याकडं. बायली आता कशी बघायची पोरगी?
मग आमच्यातलाच येक म्हातारा पुढे सरकला. हळदी कुंकू लावलं. म्हणाला, "पोरी तुझं नाव काय?"
"रूपाली"
आहाहा! नावासारखीच रूपवान हाय बरका पोरगी. मग आवड निवड गणिताची मार्क. सैपाक कराय येतुका? बऱ्याच फैरी झडल्या.
मग आमच्या कॉम्बॅट टीममधला 'येकनाथ' नावाचा शार्पशूटर म्हणला, "येकलं साडा दोघास्नी, तेवढीच जरा बोलाचाली हुईल" म्हणलं बास गड्या. आता नडगीत गुळी घालून तुझं प्रमोशन करतूय का न्हाय बघ बेट्या.
माडीवर दुसऱ्या तिसऱ्या खोलीत पुन्हा एकदा सोफ्यावर गार हवा घेत बसलो. मग पोरगी आत आली. म्हणे "घ्या चहा". बायली, कितीयेळा घ्यायचा पण हाणला येकयेक कप.
मग जरा लाडात कोडात येऊन म्हणाली, "फौजदार सायेब, बाकी कायबी म्हणा, तुमास्नी बघितल्यावर ठसकाच लागला बघा मला"
येकतर तिचं त्ये 'फौजदार' ऐकूण मलाच ठसका लागला. पण तिचा ठसका मनातल्या मनातंच असावा. तरी पाटील येता येता चारवेळा खोकला हुताच.
बायली, म्हणलं नव्हतं का, मिरचीची धुरी चढलीय वर्दीला.
माडीवरून खाली आलो. पाटलाला नमस्कार घातला. म्हटलं, "चलतो आता"
पुन्हा एकदा हालग्या तडतडल्या. गुलाल, घोडा उधळला. चौकीचं जिपडं स्टार्ट झालं. निघणार तेवढ्यात तो वस्ताद का फुस्ताद वरडतंच पळत आला.
येवढा आडदांड माणूस त्याच्या तोंडातून शब्द फुटेना. "ख..ख..खिंडारात बॉडी पडलीय.. रगात... ख..खून.."
कॉम्बॅट टीम रायफली काढून तयार झाली.
बायली आता पैपावण्यात फुकटची ड्युटी करावी लागणार. जिपडं स्टार्ट मारून हाय आसा गोतावळा घेऊन खिंडाराकडं निघालो.
क्रमश:
प्रतिक्रिया
14 Apr 2017 - 8:17 pm | अॅस्ट्रोनाट विनय
झ्याक जमलंया.... शेवटचा ट्विस्टपण भारी. अब आयेगा मजा
14 Apr 2017 - 8:27 pm | किसन शिंदे
'हानला' वाटतं विक्याला..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मास्तुरड्याने!
14 Apr 2017 - 9:49 pm | प्राची अश्विनी
झकास!
14 Apr 2017 - 9:54 pm | जव्हेरगंज
धन्यवाद मंडळी.
पुढचा खो '५० फक्त' यांना.
14 Apr 2017 - 10:58 pm | पुंबा
जव्हेरगंजभौ, दंडवत घ्या.. निव्वळ अफलातून. ५० मित्र यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे असं दिसतंय. पुभाप्र.
15 Apr 2017 - 2:04 pm | दीपक११७७
छान झाला हा भाग पुभाप्र.
16 Apr 2017 - 10:18 am | Ranapratap
झालं जव्हेरभाऊ मस्त बॅ टिंग केली. शेवटच्या बोल ला सिक्सर. झकास
16 Apr 2017 - 10:49 am | पैसा
हे शाबास!
16 Apr 2017 - 11:48 am | प्राची अश्विनी
बायली चांगली झाली. पुढल्या भागाची उत्सुकता.
20 Apr 2017 - 11:03 am | पुंबा
पुढचा भाग टाका लवकर.. फार उत्सुकता लागलिये..