डाव १
--------------------------------------------
डाव - २
मास्तर :
“तुमची झेडपी पैका गियका पुरवत नाय का?” सरपंच जगन पाटलानं तक्याला रेलत विचारलं. जोरकस वजन पडल्यानं तो हवा भरलेल्या उशीवानी पिचकला.
“सहा महीने झाले अहवाल पाठवलाय पण आजून मदत मिळाली न्हाय. सरकारी कामं कशी असतात तुम्हाला तर माहीतच आहे.”
“चांगलंच माहिते.”
“शाळेची दयनीय अवस्था झालीये. चार वर्गांमधले टीनं फुटले, उन पाऊस डायरेक्ट झिरपतो, बसायला पट्ट्य्या नाहीत, ऑफिसचा दरवाजा तुटलाय. खांब्यावरचा दिवा गायब झाला, रात्री पेदाड अन जुगारी पोरांचा अड्डा भरतो शाळेत. पोरांना सकाळी बाटल्या सापडतात दारूच्या. काय संस्कार पडणार त्यांच्यावर.”
“बरोबर हाये तुमचं. म्या काय मदत करू म्हंता मग ?”
“सध्यापुती जर तुम्ही डागडुजी करून दिली तर बरं होईल. उधार समजा…”
“हाये का आता, असं बोलून लाजवताय की आम्हाला. पोरं शिकावी म्हणून तुम्ही कमी का मेहनत घेतली. पटसंख्या वाढवाया वाड्यावस्त्या अन पाड्यावर हिंडले. गरिबड्या घरच्या पोरांची किती सोय झाली तुमच्यामुळं.”
स्वतःची स्तुती ऐकून मी जरा फुशारलो.
“सरपंच म्हणून आमचीपण जबाबदारी हायेच की. करू काहीतरी शाळेसाठी.”
“धन्यवाद पाटीलसाहेब.”
“पान्ड्याS चा आन मास्तरले.” पाटलानं मान वळवून आवाज दिला
“जी मालक.”
“नको मी घेत नसतो.”
“घ्या हो.”
मी आपसूक मान हलवली. पाटलानं बाजूला ठेवलेला पानाचा डबा उघडला अन हिरवाकंच देठ खुडुन चुना लावायला घेतला. नजर पानावरून फिरणाऱ्या चुनाळलेल्या बोटाकडं होती. पण डोक्यात मात्र वेगळेच विचार सुरू आहेत असं दिसंत होतं.
“दाद्याच्या चकरा वाढल्यात इतक्यात साळंत. काही इशेष?” त्यांनी सुपारी कतरता कतरता बेरक्या नजरेने पाहत विचारलं.
“तो माझ्यासाठी जेवण घेऊन येतो शाळेत.“
“आस्सं?”
चेहऱ्यावरून विश्वास बसला नाही असंच दिसत होतं.
“हो सकाळी सैपाक बनवायला जमत नाही मला म्हणून तो म्हंला की…”
'छूम छूम छूम.'
काळजाच्या तारा झंकारणारा आवाज उमटला. माझे पुढचे शब्द घशातच गोठले. हळूहळू तो आवाज जवळ आला, अजून जवळ आला. अन पिवळाजरत ड्रेस घातलेली केळीच्या गाभ्यासारखी, तारुण्यानं मुसमुसलेली पाटलाची पोरगी रूपी बाहेर आली. तिचा उफाड्याचा बांधा, खडूपेक्षा किंचित कमी गोरटा रंग अन काळ्याशार फळ्यावानी लांबसडक केस. लवलवणारी कायेची ती स्वामिनी नागिनीसारखी सळसळत आली. तिचं प्रत्येक पावलाबरोबर हिंदकळणारं यौवन मनाला याड लावत होतं. मला बघताच तिनं छातीवरची ओढणी सावरली, चाल सावध बनली अन नजर आपोआप जमीन ढुंढाळू लागली.
“कुठं चालली?”
“पार्वती काकूकडं जाऊन यीती.”
“लवकर ये आंधार पडायच्या आत.”
तिनं दावणीला बांधलेल्या बोकडागत मान हलवली अन सॅन्डल पायात सरकवून निघून गेली.
“संस्कार हायेत पोरीवर. आंधार पडायच्या आत घरात.” पाटलांचा आवाज कानांवर पडला.
“हू..” माझं लक्ष मात्र भिताडावर लावलेल्या देवाच्या फोटोकडं होतं. त्या काचत मी तिची लयबद्ध हालणारी कंबर चोरट्या नजरेनं पाहून घेतली.
“पोरीनं शिकायचं म्हटलं तर आपण अडवलं न्हाय.”
“वा वा छान. कोणत्या इयरला हायेत रूपाताई आता ?”
“फायनल हाये यंदा.”
“अरं वा.”
तेवढ्यात चहा आला. सोबतीला चिवडा होता. पाटलानं पान अन मी चिवडा चघळता चघळता पुढच्या गप्पा पार पडल्या. पण आता लक्ष फुटक्या टिनांवरून अन फाटक्या सतरंजावरून उडून गेलं होतं.
वाड्याच्या दरवाजातून बाहेर पडतांना कुणाचीतरी धडक बसली. आडदांड शरीराचा अन कोळश्याच्या रंगाचा वस्ताद माजलेल्या रेड्यासारखा गुरकावून माझ्याकडं पाहत होता.
“रामराम मास्तर. तुम्ही दिसलेच नाय बघा येताना.”
“हरकत नाही.” मी खांदा चोळत म्हणालो. तो चामडी पायतान वाजवत वाड्यात गडप झाला.
एव्हाना अंधार पडायला लागला होता, सिमेंटच्या खांब्यावरचे दिवे भगभग पिवळा उजेड फेकू लागले होते, शिवारातून परतलेल्या ढोरांना चारापाणी करणाऱ्या गडीमाणसांची ड्यूटी सुरू झाली होती, मोठाल्या गोठ्याशेजारुन जातांना चरव्यांमध्ये दूध पिळण्याचा ‘चर्र चर्र’ असा लयबद्ध आवाज येत होता. गावच्या मधोमध मारुतीचं देऊळ अन भलामोठा पार होता. पिंपळाचा डेरेदार महावृक्ष. गार वारा सुटला की जीव नादखुळा होऊन जायचा. तिथं हमखास टारगट पोरांचा अड्डा भरलेला. मी येताना दिसलो अन ते जरा सावरले, होटाखाली आलेली तंबाखू दाढंखाली दाबून शाह्यन्या माणसासारखं बसले. नेहमीच आसं होतं. दराराच आहे माझा तसा. गावात येऊन मला अडीच वर्ष झाली. जिल्हा परिषदची शाळा अन त्यातल्या त्यात सडाफटींग माणूस म्हणल्यावर कुठंही फेकणार हे फिक्स. मलाही फेकलं या बाभूळवाडीत. तसा मी खेड्यातलाच पण शिक्षण शहरात झाल्यामुळं जुळवायला जरा अवघड गेलं. गाव बाराचा असल्यानं जरा जास्तच कठीण. पण हळूहळू रुळलो. आता अख्खा गाव मला मानायला लागला होता, अर्थात बदलीची ऑफर नाकारण्याचं हे कारण अजिबात नव्हतं.
‘फाट फाट फाट फाट फाट फाट’
बुलेट जवळ येऊन थांबली. पुन्हा वस्ताद. हा खविस काही पिच्छा सोडत न्हाय.
“कुठं घरला चालला का ?”
“हो.”
“बसा सोडतो.”
“नाही नको.”
“बसा म्हंतो न.” आवाजातली जरबच अशी की बसावच लागतं.
माझं घर म्हणजे दहा बाय दहाच्या दोन खोल्या, त्याला दोन दरवाजे, तीन खिडक्या अन वरती स्ल्याब. हवा दिवसरात्र खेळती कारण घर होतं गावाच्या एका टोकाला, शेतांच्या बेचकीत दबलेलं. पाटबंधारेच्या इंजीनियरसाठी बांधलेलं हे घर दोन वर्षांपासून मी वापरत होतो. इंजीनियर आठपंधरा दिवसांतून धरणावर यायचा अन दिवस मावळायच्या आत पाखरावानी भुर्रकून उडून जायचा. मलाही चांगलंच होतं. काही गोष्टींचं प्ल्यानिंग शांततेत अन एकांतातच केलेलं चांगलं.
मी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होतो ती उजाडायला तीन दिवस गेले. यावेळी हुरहूर जरा वेगळी होती. दिवसभर टाळलं तरी मऊशार गादीवर कोसळलं की आठवणीच्या इंगळ्या डसायच्या अन जिवाची कालवाकालव व्हायची, जोडीला काम फत्ते होईल न ही चिंता. पण माझ्या हाती होतं वाट पाहणं. स्वतःहून पाऊल उचलणं धोक्याचं होतं.
चौथ्या रात्री मी नेहमीसारखा मारुतीच्या देवळासमोर आलो अन पटांगणात गादी आथरून लवंडलो. मोकळंढाकळं पटांगण अन गारेगार हवा. उजव्या हाताला भाग्या घोरत होता अन पायथ्याशी जराशा अंतरावर सखाराम झोपला होता. थोड्या वेळानं दाद्या अन पेँद्या सतरंजा घेऊन आले. आजचा त्यांचा नूर वेगळाच दिसत होता. थोड्याच वेळात त्यांच्या कुजबुजल्या आवाजात गप्पा चालू झाल्या.
“…वस्ताद…लफडं…मायला या विक्याच्या.” तुटकतुटक शब्द ऐकू येत होते. मी उठून बसलो अन सरकत सरकत त्यांच्याजवळ गेलो. मी दिसताच दाद्या गप बसला पण पेँद्या पाठमोरा आसल्यानं बिनधास्त बोलत होता,
"साली ती रूपी, ह्याला काय भीक घालत नाय. आन ह्यो चाललाय डाव टाकायला. मी तर…”
“मास्तर झोपले नाय का आजुन ?”
दाद्या त्याचं वाक्य मधातच तोडत बोलला. पेँद्यानं मागं वळून पाह्यलं.
“कोण टाकतंय डाव ?”
“कुठं कोण ?”
“माझ्यापासून काय लपवायचं, मी तुमच्याच पार्टीतला माणूस हाये.”
“त्यो विक्या हो, येडं बेणं हाये ते. पाटलाच्या पोरीच्या मागं लागलं.”
“तुला सगळ्यांचे लफडे बरोब्बर म्हाइत असतात रे.” मी हसून त्याच्या पाठीवर थाप मारत म्हणालो.
हास्याच्या फुलबजा पेटल्या.
“तुम्हाला सांगतो,या पोरींच्या मागं लागणं म्हणजे मुर्खपणा. आपण भले अन आपलं काम भलं.”
“बरोबर हाये मास्तर तुमचं. तुम्ही आशा भानगडीत पडले न्हाई म्हणून टिकले.”
“तेच तर. तुम्ही त्या वस्तादचीबी संगत सोडून द्या. एखाददिवशी तुम्हाला भलत्या नादाला लावल तो.”
“दाद्या चाल जरा चक्कर मारून येऊ.” पेंद्या उभा राहत बोलला. वस्तादविरोधात बोललेलं यांना आवडत नाही हा अनुभव मला होता.
मी परत अंथरुणावर येऊन झोपलो. टाइम पहायला मोबाईलमध्ये खोलला तर एक मॅसेज आलेला. लगेचच नजरेखालून घातला.
आता झोप येणार नव्हती. मी गादी गुंडाळली अन देवळाच्या मागच्या बाजूनं पथारी पसरली. इथून गायब झाल्यावर कुणाच्या लक्षातपण आलं नसतं.
रात्रीचा एक वाजला अन मी उठलो. आजुबाजुला नजर फिरवून कानोसा घेतला. सगळीकडं स्मशानशांतता होती. मी गादीवर उशा ठेवल्या अन त्या चादरीनं झाकल्या.
भायेर चतुर्दशीचा झक्क चंद्र गुलछबू रातीच्या गाभाऱ्यातून डोकावत होता. अख्खं गाव मुर्दाडावानी झोपलं होतं. लांबवरून एक कुत्रं विव्हळण्याचा आवाज तेवढा येत होता. मी पायाला भोवरा बांधल्यासारखा झपझप चालत निघलो. कंचनीचा पडका महाल गावाच्या बाहेर होता. पंचवीसाव्या मिन्टाला मी पाह्यजे तिथं पोहचलो होतो.
कंचनीचा तो एकेकाळी पाचमजली असलेला महाल आता कोसळून जेमतेम दोन मजले उरला होता. दगडामातीच्या भिताडातून झाडंझुडपं उगवले होते. मोठमोठ्या खिडक्यांच्या चौकटी बेडकाच्या बटबटीत डोळ्यांसारख्या वाटत होत्या. कमानीच्या कोनाड्यात येऊन मी उभा राहलो.
जास्तवेळ वाट पहावी लागली नाही. थोड्याच वेळात दोन हात माझ्या गळ्यात पडले. ते नाजुक हात हातात धरून मी गर्रकन वळलो. पुसट आंधारात चेहरा दिसत नसला तरी तरी तिच्या आखीवरेखीव बांध्याची कडा स्पष्ट दिसत होती.
“आली व्हय रूपे.”
“व्हय रे मास्तरड्या. नुसती आली नाही, काम करून आली.”
“काय सांगतीस माझ्या राणी.”
“खरंच.” तिनं कमीजच्या गळ्यातून आत हात घातला अन आतल्या इल्यास्टीकमध्ये फसवलेला कागद भायेर काढला.
“पुजाऱ्याच्या रंजीबरोबर मैत्री वाढवली, येड्या विक्याला गाजर दाखवला तव्हा कुठं हे गावालंय. आता पुढची जबाबदारी तुझी.”
“रूपा डार्लिंग तू टेन्शनच नको घेऊ, हा मास्तर पाह्य आता काय खेळ खेळतो. “
मी कागदाची घडी घालून खिशात घालत म्हणालो. तिच्या रेशमी गळ्यात दोन्ही हात टाकले. निष्काळजी ओढणी घसरून एका खांद्यावर आली होती. फटीतून दिसणारे पुसट आकार चेकाळून टाकत होते.
“रूपे खरं सांगू, आज जाम सेक्सी दिसून राह्यली तू.”
“आस्सं ? अन काय रे, त्यादिवशी वाड्यावर आला होता तव्हा तव्हा लेच टकामका पाहत व्हता. आबाच्या लक्षात आलं आस्त तर?”
“तुझा आबा होता म्हणूनच तर चुप बसलो नाहीतर तिथंच…”
“तिथंच काय…”
“सांगू?”
“सांग की.” तिने नशिल्या आवाजात विचारलं
अन मी सरळ तिच्या ओठांना भिडलो. दोन्ही हात भरगच्च कमरेभोवती गुंडाळून जवळ खेचली. तिच्या सर्वांगावर माझे हात फिरू लागले. तिने स्वतःला सावरत मला दूर लोटलं “चावट मास्तरा काय करतुस”
“तू फायनलले आहेस न. चाल तुले काही फायनल धडे शिकवतो.”
मी पुन्हा तिला भिडलो अन यावेळी तिनं मला रोखलं नाही.
--------------------------------------
प्रतिक्रिया
5 Apr 2017 - 9:14 pm | रांचो
एक से एक बहाद्दर आहेत...दोन्ही भाग सलग वाचले. दोन वेगवेगळ्या व्यक्तींनी लिहीलयं अस जरा सुध्धा वाटत नाही. मज्जा येणार आहे वाचायला..
5 Apr 2017 - 10:11 pm | अॅस्ट्रोनाट विनय
दोन वेगवेगळ्या व्यक्तींनी लिहीलयं अस जरा सुध्धा वाटत नाही.
>> हुश्श... प्रयत्न सफल झाला.
5 Apr 2017 - 9:19 pm | Ranapratap
मजा आली वाचायला अगदी शंकर पाटील, द मा, व बा बोधे सर यांची आठवण आली.
5 Apr 2017 - 10:13 pm | अॅस्ट्रोनाट विनय
__/\__
5 Apr 2017 - 11:27 pm | जव्हेरगंज
झबरदस्त!
गावरान जमतंय की तुमास्नी ;)
मस्त वळवली आहे!
5 Apr 2017 - 11:52 pm | अॅस्ट्रोनाट विनय
:) धन्यवाद. तुमच्या खास झणझणित शैलीचा मी चाहता.
गावरान विनोदीच लिव्हल्या होत्या आतापर्यंत. त्यापण वर्हाडीत. तुमच्यासोबत कोल्हापूर, सातारा,सांगली हिंडुन आलो.
6 Apr 2017 - 12:09 am | दीपक११७७
खो कथेतील ह्या कथेला एकदम दमदार सुरुवात झाली.
दोघांनी पण ( जव्हेरगंज व अॅस्ट्रोनाट विनय )अगदी सचिन- सेहवाग सारखी
सुरुवात केली. आता पुढच्यांना पण मेहनत करावी लगेल
क्या बात क्या बात क्या बात..........................
6 Apr 2017 - 11:55 am | पुंबा
मस्त मस्त मस्त..
6 Apr 2017 - 12:44 pm | राजाभाउ
दोघांनीही __/\__ स्विकारा राव. जबरदस्त !!!!
6 Apr 2017 - 2:25 pm | अॅस्ट्रोनाट विनय
दीपक ११७७, पुढचा खो तुम्हाला. ऑल द बेस्ट
6 Apr 2017 - 2:30 pm | दीपक११७७
खो स्विकारत अाहे धन्यवाद
6 Apr 2017 - 3:04 pm | एमी
जबरदस्त!!! _/\_
6 Apr 2017 - 6:00 pm | प्राची अश्विनी
चांगली चाललीय खो कथा.
7 Apr 2017 - 7:36 am | रातराणी
दोन्ही भाग जबरदस्त झालेत! पुभाप्र!