गोविंदराव तळवळकर

विकास's picture
विकास in जनातलं, मनातलं
22 Mar 2017 - 9:44 am

आत्ताच कळले आणि नंतर वाचले की महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार-विचारवंत गोविंदराव तळवळकर यांचे ह्युस्टन येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ज्या एका व्यक्तीमुळे आजही जालावर मराठी वृत्तपत्र पहायला गेलो की आपोआप महाराष्ट्र टाईम्सचे पान उघडले जाते अशी एक विचारवंत व्यक्ती आज काळाच्या पडद्याआड गेली.

महाराष्ट्राच्या आणि त्यातही खासकरून मुंबई-पुण्याच्या वृत्तपत्रीय जगताची स्वातंत्र्यपूर्व काळात टिळक-आगरकर, काळकर्ते परांजपे, न.चिं केळकर आदी अनेक दिग्गजांनी एक जडणघडण घातली. त्याच काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळातही सुरवातीस आचार्य अत्रे, ह.रा. महाजनी आदींनी वैचारीक जडणघडण चालूच ठेवली. त्या जडणघडणीतलेच पुढचे वळण हे सोबतकार ग.वा.बेहरे, सकाळ-लोकसत्ता आदी वृत्तपत्राचे संपादक राहीलेले माधवराव गडकरी, लोकसत्ता संपादक अरूण टिकेकर, आणि अर्थातच महाराष्ट्र टाईम्सचे तत्कालीन संपादक गोविंदराव तळवळकर, त्याच बरोबर अनेक नामवंत पत्रकारांनी त्यात भर घातली. ८०च्या दशकावर विशेष करून तळवकर, गडकरी, बेहरे आणि इतर काही पत्रकारांचा हा विविधांगांनी प्रभाव होता. त्यात राजकारण होते, समाजकारण होते, अर्थकारण होते, तसेच इतर अनेक विषय असायचे.

शाळेत असतानाच सकाळी पेपर आल्यावर अग्रलेख वाचायची सवय ही तळवळकरांमुळे लागली. मला आठवते त्याप्रमाणे तळवळकर हे मुळचे रॉयिस्ट होते, यशवंतरावांच्या आणि कदाचीत नंतरच्या काळातील पवारांच्या देखील जवळचे होते असे देखील वाचल्याचे आठवते (यशवंतराव पण रॉयिस्ट होते). थोडक्यात डावे आणि काँग्रेसच्या विचाराला जवळ होते असे म्हणता येईल. संघाबद्दल त्यांच्या लेखनात प्रत्यक्ष टिका वाचल्याचे आठवत नसले तरी ते संघाच्या जवळ असण्याची शक्यता अजिबातच नव्हती. वास्तव असले तर ते संघाच्या विचारांच्या विरोधातले होते हेच असेल. त्यांचे एकूणच लिहीणे परखड, स्पष्ट असले तरी एकेरी, जहरीले नव्हते, पक्षिय वाटावे असे तर नक्कीच नव्हते!

कधीकाळी लहान असताना वाचले होते त्याप्रमाणे, त्यांचा आवडता ग्रंथ हा दासबोध होता. मराठी वाचनाबरोबरच त्यांचे इंग्रजी वाचन देखील खूप होते. तळवकरांच्या घरी पुस्तकांच्या भिंती आहेत असे तेंव्हा म्हणले जायचे. त्यांच्या अग्रलेखात त्यांचे वाचन संदर्भासकट दिसायचे. अग्रलेखाला अथवा नुसत्या लेखांना देखील वेधक आणि विचारी मथळे देणे हे तळवकरांमुळे कदाचीत पहील्यांदा पाहीले गेले असेल. जेंव्हा ८०च्या दशकात एक वेळ आली की "काय चालले आहे" असे वाटावे, तेंव्हा, त्यांच्या अग्रलेखाचे नाव होते, "नसे राम ते धाम सोडूनी द्यावे", (सुखा लागी आरण्य सेवीत जावे), बाँबे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे पक्षिमित्र सलीम अली जेंव्हा गेले तेंव्हा, "वृक्षवल्ली आम्हा सोयरी...", तत्कालीन सोव्हिएटचे प्रमुख गोर्बाचेव्ह बद्दल आकर्षण असल्याने, "गोर्बाचेव्ह यांचे शांत्यस्त्र" (peace weapon) म्हणत लिहीणे असे अनेक सांगता येतील. काँग्रेसच्या जन्मशताब्दीवर लिहीलेल्या अग्रलेखात, काँग्रेस मध्ये कसे विविध वैचारीक प्रवाह होते यावर भर होताच आणि शेवटी "शताब्दी ही काँग्रेसनामक चळवळीची आहे" असे सांगितले होते. आज इतक्या वर्षांनी जर ते आठवत असले तर त्यात माझ्या स्मरणशक्तीपेक्षा त्यांच्या लेखनशैलीचा प्रभाव किती असेल असेच राहून राहून वाटते.

महाराष्ट्र टाईम्स मध्ये अग्रलेखाच्या खाली त्यांचे एक सदर असायचे. आत्ता नाव आठवत नाही. पण त्यातून खूप चांगली माहीती मिळायची. विकी आणि गुगलच्या आधीच्या जगातली अशी अचानक मिळालेली माहिती खूप आनंद देयची की काहीतरी वेगळेच समजले!

त्यांचे विचार आणि लिहीणे हे स्वतःला योग्य वाटेल ते सांगाणारेच असायचे... याची दोन उदाहरणे आत्ता आठवतात त्याप्रमाणे, बेळगावच्या बाबतीत तो प्रश्न चिघळत ठेवू नये, महाराष्ट्राने आपल्या हट्टाने महाजन अहवाल झाला होता, आता मुकाट्याने माना असे त्यांचे म्हणणे होते. एम एफ हुसैन एकदा अणवाणी एका उच्चभ्रू क्लब मधे गेले आणि त्यांना पायात काही घातले नव्हते म्हणून क्लबच्या नियमांमप्रमाणे नाही म्हणून परत पाठवले. त्यावरून तमाम वार्तापत्रांनी टिका केली. मात्र तळवळकरांचे म्हणणे स्पष्ट होते की नियम न पाळण्याचे लाड कसले करायचे?

शाळेत असताना गंगाधर गाडगिळांचे दुर्दम्य वाचून टिळक पहील्यांदा समजले तर नंतर कॉलेजात असताना त्याच सुमारास प्रसद्ध झालेल्या तळवळकरांच्या "बाळ गंगधर टिळक" या पुस्तकामुळे मला टिळकांबद्दल विश्लेषणात्मक लेखन कसे असते ते समजले. ते वाचल्यावर टिळकांच्या लेखनाचा आणि लेखनशैलीचा देखील तळवळकरांवर प्रभाव असेल असे वाटले आणि तसा तो होता देखील. फक्त त्यात लेनिनच्या काही जनसंपर्क करण्याच्या पद्धतींची आणि त्यामुळे त्याची लोकमान्यांशी केलेली तुलना कुठेतरी खटकली, पण तितकेच...

तितकेच अशासाठी म्हणायचे, कारण तळवळकर आणि तसेच वर दिलेल्या इतर संपादकांचे लेख, अग्रलेख वाचत असताना काहीतरी विचार करायला शिकलो, इतकाच अनुभव आला, असे इतक्या वर्षांनी आणि ते देखील तळवळकरांच्या निधनाची बातमी वाचल्यामुळे वाटते. हे काय स्युडो, डावे, ते काय उजवे, असे काही कुणाबद्दल मला वाटते ९०च्या दशकापर्यंत वाटले नसेल. याचा अर्थ असा देखील नसेल की ह्या सगळेच पटू शकणारे विचार असत असे... पण मुद्दा वेगळा आहे. पत्रकारीता हा पेशा होता नुसता व्यवसाय नव्हता. वृत्तपत्रांचा खप वाढायला चांगले वैचारीक लिहीणे, "आपणासी जे जे ठावे, ते ते दुसर्‍यांसी सांगावे, शहाणे करून सोडावे, सकलजन" असा कळत अथवा नकळत उद्देश असलेल्या प्रत्रकार असलेला तो आता वाटते शेवटचाच काळ होता. टिआरपी हा शब्द अस्तित्वात येयचा होता. ब्रेकिंग न्यूज हा शब्द दूरदर्शनवर, "आत्ताच हाती आलेल्या ताज्या बातमी नुसार" अथवा, "अभि अभि प्राप्त हुए समाचार के अनुसार" इतक्याशीच मर्यादीत होता....

तळवळकरांसारख्या, वर म्हणल्याप्रमाणे डावे, रॉयिस्ट असलेल्या संपादकाचे आणि तत्सम आदी अनेक विचारवंतांचे लेखन वाचूनही मी कधी डावा जाउंदेतच पण पब्लीकला उजवा वाटण्याइतका वेगळा कसा काय झालो असा डोक्यात प्रश्न आला. वास्तवीक त्याचे उत्तर इतकेच आहे की नशिबाने ज्या विचारवंतांचे लहानपणी वाचले (त्यात डावे-उजवे दोन्ही आले) त्यांनी त्यांच्या लेखनातून ब्रेनवॉशिंग करण्याऐवजी कुठेतरी विचार करायला शिकवले. माझ्यापुरते व्यक्तीगत बोलायचेच झाले तर हे ह्या विचारवंतांचे बलस्थान होते, मर्यादा नाही. आता माध्यम आणि संपादक यांना मध्यम दर्जाचे म्हणणे पण जड जावे अशी अवस्था आली आहे.

म्हणूनच आज "संपादकमाळेतील मणी शेवटला" एकाएकी नसेल, पण काळाच्या ओघात ओघळल्यामुळे गतकाळातील या वेगळ्याच स्मृती जागा झाल्या आणि जे काही आठवत गेले ते टंकत गेलो. तळवळकरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

इतिहाससाहित्यिकसमाजप्रतिक्रियामाध्यमवेधबातमी

प्रतिक्रिया

गॅरी ट्रुमन's picture

22 Mar 2017 - 9:51 am | गॅरी ट्रुमन

गोविंदराव तळवलकरांना श्रध्दांजली.

माझ्या वयाच्या मिपाकरांच्या आठवणीत गोविंदरावांचे लिखाण फार नाही. तरीही जे काही थोडेफार वाचले त्यातून आणि इतर संदर्भांमधून त्यांच्या लेखणीचे सामर्थ्य नक्कीच कळले.

खेडूत's picture

22 Mar 2017 - 10:16 am | खेडूत

गोविंदराव तळवलकरांना श्रध्दांजली.. __/\__

२७ वर्षांच्या त्यांच्या संपादकपदाच्या काळात अखेरची १५ वर्षे म्हणजे माझ्या लहानपणी म टा नियमित वाचत असे.
त्याकाळी तो अत्यंत दर्जेदार पेपर होता. डाक एडिशन आमच्या गावात रात्री एस टीने आठ वाजता येई.

पैसा's picture

22 Mar 2017 - 10:17 am | पैसा

श्रद्धांजली. माझे वाचन आणि विचार जशी मी घडले त्यात गोविंदराव तळवलकरांचा फार मोठा भाग आहे. माझे वडील, काका संघाचे कार्यकर्ते असताना घरात रोजचा पेपर महाराष्ट्र टाईम्स असायचा. तो काळ तसाच होता. शरद पवार तेव्हा तरूण तडफदार आणि पुढे येणारे उगवते नेतृत्व होते. आणीबाणीनंतरचे दिवस आठवत आहेत. शाळेत जाण्याच्या वयाची असले तरीही आजूबाजूला जगात काय चालू आहे हे एका खेड्यातही आम्हाला नीट कळत होते कारण दुपारी बारा वाजता का होईना महाराष्ट्र टाईम्स घरी येत होता.

त्याचा अग्रलेख आम्ही संध्याकाळी वाचायचो. पण तरी रोजचा पेपर वाचायची सवय तेव्हाच लागली. म. टा, मधले "धावते जग" हे संपादकीय सदरही फार सुरेख असायचे. तळवलकरांचे सत्तांतराचे खंड आणि इतर पुस्तके संग्रही आहेत. पत्रकारिता ही तात्कालिक घटनांवर भाष्य करणारी असली तरी गोविंदरावांचे इतर वैचारिक लिखाणही अत्युच्च दर्जाचे आहे.

आताची पत्रकारिता लोकांच्या मागणीवर मागेपुढे धावत असते तर गोविंदरावांनी लोकांच्या आवडीला वळण लावण्याचे काम केले. त्या पिढीचे ते शेवटचे पत्रकार होते. गोविंदराव निवृत्त झाल्यानंतर आणि आर केंचा कॉमन मॅन मुखपृष्ठावरून हटल्यानंतर टाईम्सचा वेगळा चेहरा हरवला. आणि इतर पेपरांसारखाच अजून एक पेपर आवर्जून वाचायचे कारण उरले नाही.

ती सगळी पिढी काळाच्या पडद्याआड होताना आणि टीव्हीवरच्या कंठाळी अभिनेत्याना पत्रकार म्हणून मान्यता मिळत असताना तळवलकरांसारखे लोक अस्तंगत होत आहेत ही बातमी कोणत्याही टीव्ही चॅनेलवर अजून पाहिली नाही याचेही आता नवल वाटत नाही.

पुन्हा एकदा तळवलकरांना मनःपूर्वक श्रद्धांजली.

माहितगार's picture

22 Mar 2017 - 11:42 am | माहितगार

महाराष्ट्राच्या वैचारीक जडण घडणीत त्यांचा महत्वाचा वाटा होता हे नक्कीच. त्यांचे लेखन महाराष्ट्र टाईम्स/ टाईम्स ऑफ इंडीया ग्रुपने त्यांच्या वेबसाईटवर / आंतरजालावर मोफत उपलब्ध ठेवावयास हवे असे वाटते.

अजया's picture

22 Mar 2017 - 4:09 pm | अजया

तळवळकरांच्या अग्रलेखासाठी आपण महाराष्ट्र टाईम्स घ्यायचो असे मध्ये मला वडील म्हणाले होते. आताचा मटा त्यांना भेळेसाठी बरा वाटतो.
कित्येकदा वडलांनी समोर पेपर टाकून आजचा अग्रलेख वाचा.हे खरे साक्षेपी लिखाण सांगितलेले आठवतं. धावते जग वाचणेही.
प्रत्येक क्षेत्रातच पायावर डोके ठेवावी अशी माणसे कमी असण्याच्या काळात असे व्यासंगी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड जाणे कधीही दुःखदच.
श्रध्दांजली _/\_

विकास's picture

22 Mar 2017 - 6:22 pm | विकास

गोविंदरावांनी लोकांच्या आवडीला वळण लावण्याचे काम केले. त्या पिढीचे ते शेवटचे पत्रकार होते.
अगदी अगदी!

गोविंदराव निवृत्त झाल्यानंतर आणि आर केंचा कॉमन मॅन मुखपृष्ठावरून हटल्यानंतर टाईम्सचा वेगळा चेहरा हरवला.
हे कटू सत्य आहे. :(

तळवलकरांसारखे लोक अस्तंगत होत आहेत ही बातमी कोणत्याही टीव्ही चॅनेलवर अजून पाहिली नाही

तुमचा प्रतिसाद काल सकाळचा आहे. फक्त माहिती साठी सांगतो काल रात्री abp माझा आणि झी ने तळवळकर ह्यांच्यावर विशेष कार्यक्रम केले. झीचा कार्यक्रम माझ्यासारख्या मटाचा वाचक नसलेल्यांना त्यांची ओळख घडवणारा होता.

पैसा's picture

23 Mar 2017 - 2:29 pm | पैसा

नशीब! असे कार्यक्रम व्हायलाच हवे होते. टाईम्स नाऊ वर सुद्धा खरे तर.

विकास's picture

27 Mar 2017 - 12:50 am | विकास

ए बी पी माझावर त्यांची सुधीर गाडगीळ यांनी घेतलेली जुनी मुलाखत दाखवण्यात आली...

अप्पा जोगळेकर's picture

22 Mar 2017 - 10:48 am | अप्पा जोगळेकर

थोर माणूस.
महाराष्ट्र टाईम्स मध्ये अग्रलेखाच्या खाली त्यांचे एक सदर असायचे. आत्ता नाव आठवत नाही.
तुम्हाला 'धावते जग' म्हणायचे असावे बहुधा.

सुनील's picture

22 Mar 2017 - 6:51 pm | सुनील

त्या सदराचे नाव बहुधा 'वाचता वाचता' असे होते.

विकास's picture

22 Mar 2017 - 8:14 pm | विकास

ते "आयफेल टॉवर" होते.

मंजूताई's picture

22 Mar 2017 - 10:59 am | मंजूताई

गोविंदराव तळवलकरांना श्रध्दांजली.

ज्या एका व्यक्तीमुळे आजही जालावर मराठी वृत्तपत्र पहायला गेलो की आपोआप महाराष्ट्र टाईम्सचे पान उघडले जाते अशी एक विचारवंत व्यक्ती आज काळाच्या पडद्याआड गेली.

सहमत. आमच्या पिढीला त्यांचे अग्रलेख वाचायला मिळाले नाहीत. मात्र त्यांचे साधनेतील दीर्घ लेख म्हणजे जबरदस्त बौद्धीक मेजवानी असे. त्यांचा टागोरांवरचा आणि जेन ऑस्टिनवरचा हे दोन लेख अजून आठवतात. तळवलकरांना आदरांजली.

तळवळकरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

वरुण मोहिते's picture

22 Mar 2017 - 1:05 pm | वरुण मोहिते

वाटत आहे .. संपादकांना घडववणारे होते गोविंदराव . पत्रकारांना नाही .आमच्या एका ग्रुप वर कालच बोलो होतो कि टाइम्स ह्यांच्यामुळे चालला. नकळत्या वयात मला एकदा बोरिवली ला भेटलेले ,धडाधड २७ इंग्लिश पुस्तकांची लिस्ट काढून दिली त्यांनी . काय वाच म्हणून . आताशा भारतात कमी यायचे ते .

त्यांचे संपादकीय आणि बहुधा त्यांनीच लिहिलेली धावते जग, इंग्रजी ग्रंथ परिचय वगैरे सदरे फारच छान वाटत. तेव्हाचा मटा वाचूनच कितीतरी वेगवेगळी माहिती, विचार यांची ओळख होत असे.

कंजूस's picture

22 Mar 2017 - 5:05 pm | कंजूस

मी त्यांचे लेख वाचायचो॥ त्यावेळी माझी स्वतंत्र अशी कोणतीच विचारसरणी नव्हती. भाषाशैली म्हणून आवडायचे.
खरंम्हणजे वेगवेगळे लेखक संपादक पुढे आणण्यात टाइम्स ग्रुप अग्रेसर आहे.

आनंदयात्री's picture

22 Mar 2017 - 8:45 pm | आनंदयात्री

गोविंदराव तळवलकरांना श्रध्दांजली. समयोचित लेखाबद्दल आभार.

गामा पैलवान's picture

22 Mar 2017 - 11:47 pm | गामा पैलवान

तळवलकरांचं लेखन फारसं वाचलं नाही. मी लहानपणापासून हिंदुत्ववादी. त्यामुळे डाव्या पठडीतलं लेखन फारसं आवडंत नसे. टाईम्स डावा असूनही काँग्रेसच्या बाजूने लिहितो म्हणजे अप्रामाणिक आहे अशी काहीशी समजूत होती. मला तळवलकरांचं लेखन फार पाश्चात्यकेंद्रित वाटंत असे (हे बरोबर की चूक ते ठाऊक नाही).

शिवाय तळवलकर शिवसेनेच्या विरोधात लिहायचे, त्यामुळे पटायचे नाहीत. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर लिहिलेला इंग्रजी लेख फार म्हणजे फारंच खटकला (दुवा सापडंत नाहीये).

मात्रं असं असलं तरी त्यांचे अग्रलेख समतोल असंत. आज कोणीही उठवळ तोंडाचा माणूस स्वत:स संपादक म्हणवतो, त्यामानाने तळवलकर भारदस्त होते. वैचारिकदृष्ट्या विरोधी कंपूतले असले तरी ते आदरणीय व्यक्तिमत्व होते. त्यांना आदरांजली.

-गा.पै.

बिघडलेली होती तेव्हा जी अनेकरंगी पवित्रे व वळणे त्यांच्या निर्भीड लेखणीने घेतली ते फार रंजक होते. त्यातले ४ लेख जरी कूठे मिळाल्यास जरूर वाचा अर्थात नंतर माझी मनस्थीती खराब हती हे मान्य करण्याचा मोठेपणा ही होताच.

मारवाजी, कुठे मिळू शकतील हे लेख? एकूणच गोविंदरावांचे त्यांच्या बहारीच्या काळातील(संपादक म्हणून) अग्रलेख एकत्रीत केलेले आहेत काय? असल्यास वाचायला आवडतील.

विकास's picture

23 Mar 2017 - 7:18 pm | विकास

तळवळकरांचे वैचारीक आणि कदाचीत व्यक्तीगतही मित्र असलेले पुल आणि दुर्गाबाई पण आणिबाणीविरोधात उतरल्या तरी ते असला जाहीर विरोध करू शकले नाहीत. तुम्ही म्हणता तसे त्यांनी ते नंतर जाहीर पणे मान्य देखील केले आणि म्हणूनच त्यांच्या अग्रलेखांच्या संकलनात त्या काळातले अग्रलेख प्रकाशीत केले गेले नाहीत. खालील उतारा हा म.टा. मधील आजच्या अग्रलेखातील (मृत्यूलेखातील) आहे:

"इंदिरा गांधी यांनी १९७५ मध्ये `आणीबाणी' लादली आणि त्यांच्या लेखणीचा प्राण जणू जेरबंद झाला. पण त्यांना संपादकपद सोडून सत्याग्रहही करवला नाही. तळवलकरांचे मोठेपण असे की, आणीबाणीनंतर त्यांनी वाचकांची बिनशर्त माफी मागितली आणि पुढच्या एकाही लेख किंवा अग्रलेखांच्या संग्रहात त्या काळातील लेखन समाविष्ट केले नाही. "

सत्तरच्या दशकात न्यूयाॅर्क महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमांचे वृत्त महाराष्ट्र टाईम्समध्ये लिहीत होते त्याचे किती कौतुक व्हायचे मटा कडून आणि महाराष्ट्र ते बडोद्या पर्यंतच्या आप्तांपर्यंत त्याची आठवण आली.

रामदास's picture

23 Mar 2017 - 9:35 am | रामदास

विनय हर्डीकर यांनी २०१६ मध्ये अंतर्नादच्या अंकात लिहिलेला गोविंदराव आय मिस यु हा लेख जरूर वाचावा. हा लेख माझ्याकडे पीडीएफ स्वरुपात आहे पण इथे तो कसा अपलोड करायचा ते कळत नाही.

सुनील's picture

23 Mar 2017 - 9:54 am | सुनील
विकास's picture

23 Mar 2017 - 8:13 pm | विकास

लेखाचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद! (अजून पूर्ण वाचून होयचा आहे, पण) खूपच माहितीपूर्ण लेख आहे. नुसताच तळवळकरांसंदर्भात नाही तर त्या काळाचे चित्रण बघण्याकरता पण.

सस्नेह's picture

23 Mar 2017 - 11:29 am | सस्नेह

तळवलकरांच्या स्मृतीस अभिवादन !
उत्तम लेख. पैसाताईचा प्रतिसादही समर्पक !

लहानपणी परवडत नव्हते म्हणून केवळ नवाकाळ वाचता यायचा. त्यातील निळुभाऊंचे अग्रलेख अगदी कामगारी भाषेत असायचे. त्यामुळे ते देखील डावेच वाटायचे. मात्र त्यानंतर जयश्री खाडीलकरांनी त्यातील रया घालवली. नंतर काही दात्यांच्या कृपेने सार्वजनिक मित्रमंडळांतील मोफत वाचनालयात लोकसत्ता, मटा दिसू लागले व वाचता देखील येऊ लागले. मुळातच कोणत्याही वर्तमानपत्राचा अग्रलेख वाचणे म्हणजे वर्तमानपत्रातील अत्युच्य उंचीचे सदर वाचणे हा संस्कार मनात रुजविण्याचे श्रेय निळुभाऊंनाच जाते. कॉलेजात कितीही शिकून मोठे झालो तरी बालवाडीतल्या बाईंना न विसरता येण्यासारखा काहीसा प्रकार माझ्या बाबतीत झालाय खरा. मात्र मटा आणि लोकसत्ता यांच्यातुन निवड करायची वेळ येत असे तेव्हा मी लोकसत्ताचीच निवड करत असे. सामना केवळ रविवारच्या पुरवणीसाठी बघीतला जायचा. त्यातील सदरे खरोखरीच सुंदर असायची.
गोविंदरावांच्या नंतर मटाने स्वत:चे फार झपाट्याने पतन करुन घेतले असे वाटते. असो. आज सगळी वर्तमानपत्रे वाचण्याइतका वेळ आणि पैसा आहे पण वाचता यावे असे कंटेंट मिसींग आहे असे वाटते. कदाचित "भुतकालस्य कथा रम्या" असा प्रकार माझ्याबाबतीत असावा.

असो. गोविंदराव तळवळकर यांना श्रद्धांजली !

स्वाती दिनेश's picture

23 Mar 2017 - 11:53 pm | स्वाती दिनेश

गोविंदराव तळवलकरांना विनम्र अभिवादन आणि श्रध्दांजली.
ज्यो,
गोविंदरावांनी लोकांच्या आवडीला वळण लावण्याचे काम केले. त्या पिढीचे ते शेवटचे पत्रकार होते.
गोविंदराव निवृत्त झाल्यानंतर आणि आर केंचा कॉमन मॅन मुखपृष्ठावरून हटल्यानंतर टाईम्सचा वेगळा चेहरा हरवला.
अगदी सहमत आहे.
स्वाती

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

25 Mar 2017 - 4:36 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

गोविंदराव तळवलकरांना श्रध्दांजली.
अभ्यासपूर्ण लेख व अग्रलेख ही त्यांची खासियत. आणीबाणीच्या काळतले लेख( व एकण्दरीतच मटातले लेख) मात्र कधी मानवले नाहीत. नेहरूवाद्,रॉयवाद वाचकांना समजावून सांगताना ते घराणेशाहीचे,काँग्रेसचे समर्थन करीत नाहीत ना असे वाटायचे. राजीव गांधी सत्तेवर आल्यावर तसे जास्तच वाटू लागले. विश्वनाथ प्रताप सिंगानी राजीव गांधींना बोफोर्सवरून अडचणीत आणले व म.टा.त विश्वनाथ प्रताप,जनता दलावर पराकोटीची टिका छापून येऊ लागली. दर पंधरवड्याला 'देशाला दिशा देण्याची ताकद कॉन्ग्रेस्मध्येच आहे..जनता दल म्हणजे कडबोळे आहे..' वगैरे. प्रत्येक व्यक्तीस राजकीय मत असते. संपादक त्यास अपवाद नसावा पण प्रचारी थाटातले,विचार्शैली वाचकांच्या गळी उतरवू पाहणारे लेख 'पडायला' लागले की चाणाक्ष वाचक ते ओळखतात.
नंतर कुमार केतकर आले आणी त्यांनी तर कमालच केली! 'पत्र नव्हे स्मार्ट काँग्रेस मित्र' असे हे विनोदाने म्हणत. अर्थकारण, मोठाले ग्रंथ्,मोठे युरोपियन लेखक्,कवी..ह्यांच्या कार्याची ओळख मात्र गोविंदरावांनीच करून द्यावी.

विकास's picture

26 Mar 2017 - 6:16 pm | विकास

मला वाटते "काँग्रेस मित्र" म्हणणे हे त्या काळातील तळवळकरांसहीत अनेक विचारवंतांना लागू पडेल... शरद पवारांचा तळवळकरांवरील म.टा. मधे आलेला श्रध्दांजली-लेख वाचण्यासारखा आहे. त्यात जसे तळवळकर कळतात तसेच तो काळ देखील समजतो.

आणिबाणिच्या काळात अग्रलेख वाचण्याच्या वयात मी नव्हतो. पण, जे काही नंतर वाचले त्यानुसार त्यांनी आणिबाणि उठल्यानंतर जनतेची माफी मागितली आणि त्यांच्या कुठल्याही लेखसंग्रहात अथवा अग्रलेखसंग्रहातील पुस्तकात त्या काळातले लेख समाविष्ट होऊन दिले नाहीत.

राजीव गांधी सत्तेवर आल्यावर तसे जास्तच वाटू लागले.
खरे आहे. तरी देखील मला वाटते त्या वेळेस त्यांनी शहाबानोच्या संदर्भात जे काही राजीव गांधींनी ३/४ बहुमताच्या जोरावर केले त्यावर टिका केली आणि आरीफ मोहम्मंद खान वर (परत, जर बरोबर आठवत असेल तर त्यांनीच) "आरीफ यांची पुन्हा एकदा तारीफ" म्हणून अग्रलेख लिहीला होता. राजीव-हत्येनंतरच्या लेखांमधे तुम्ही म्हणता तसे त्यांचे राजीव प्रेम दिसले होते. त्यावेळेस जे म्हणाल तर परदेशी असलेल्या मार्क टली ला भारताची, भारतीय जनतेची आणि लोकशाहीची खात्री वाटली होती ती खात्री स्वातंत्र्यपूर्व आणि त्या सुमारास जन्माला आलेल्या अनेकांना वाटली नव्हती. तळवळर त्याला अपवाद नव्हते. त्यांच्या लेखनात हताशपणा दिसत होता. एका लेखात त्यांनी त्यांच्या आणि राजीव गांधींच्या एका वैयक्तिक भेटीचा उल्लेख केला होता. तो पाहून आश्चर्य वाटले होते. तसेच त्या काळात एकूणच मराठी नेत्यांना देखील भाव मिळत नसताना एका वृत्तपत्रसंपादकाला ते ही आपल्या आवडत्या संपादकाला, काँग्रेसचा सर्वोच्च नेता बोलवतो हे वाचून कुठेतरी (बालबुद्धीला!) कौतुक वाटले होते.

विश्वनाथ प्रताप,जनता दलावर पराकोटीची टिका छापून येऊ लागली.
विषयांतर टाळून इतकेच म्हणेन की तो तळवळरांचा दोष नाही. त्याचे सर्व "श्रेय" व्हि.पी. सिंगांकडेच जाते हे आता इतिहासाने सिद्ध केले आहे! :)

प्रत्येक व्यक्तीस राजकीय मत असते. संपादक त्यास अपवाद नसावा पण प्रचारी थाटातले,विचार्शैली वाचकांच्या गळी उतरवू पाहणारे लेख 'पडायला' लागले की चाणाक्ष वाचक ते ओळखतात.

अगदी खरे आहे. तळवळकर हे काँग्रेसच्या नक्कीच जवळ होते. काही अंशी त्यांना आणि त्या काळातील इतर संपादकांना मला सूट द्याविशी वाटत आहे. अर्थात हे त्यांचे समर्थन नाही. पण काळ समजून प्रतिक्रीया तयार करण्याचा एक प्रयत्न आहे.

त्या काळत, एकूणच माध्यमांची घडी वेगळी होती. कितीही झाले तरी मराठी माध्यम परंपरेत टिळक-आगरकर- (संंपादक म्हणून नाही पण विचारवंत म्हणून) रानडे - गोखले यांचा प्रचंड मोठा वारसा होता आणि त्यामुळे कदाचीत इतर भाषिक आणि विशेष करून इंग्रजी भाषिक वर्तमानपत्रांपेक्षा अधिक नैतिकता होती. गोविंदरावांच्याच काँग्रेस शताब्दीच्या लेखात म्हणल्याप्रमाणे, काँग्रेस ही एक स्वातंत्र्यपूर्व काळातील चळवळ होती. त्यात विविध विचारांना सुरवातीस अधिक नंतर ते कमी होत गेले, पण स्थान होते. ४७ नंतर गांधीजींच्या इच्छेचा मान न राखता, काँग्रेस विसर्जीत करण्याऐवजी पक्षाने काँग्रेस हेच नाव ठेवल्याने, आजच्या मार्केटींगच्या भाषेत, brand recongintion करणे सोपे गेले. इतर पक्ष तयार झाले नव्हते. स्वतः डावे विचारवंत असले तरी तळवळकर काही साम्यवादी नव्हते. त्यामुळे कम्युनिस्टांना एक राजकीय पक्ष म्हणून किती समर्थन करायचे यावर बंधन होतेच. आधी जनसंघ आणि नंतर भाजपा हे देखील फार मोठे पक्ष नव्हतेच, शिवाय त्यांचे राजकीय तत्वज्ञान हे डाव्या विचारवंतास मान्य होणे लांब राहीले मानवणे पण शक्य नव्हते. अशातच नेहरूंच्या प्रतिमेने कायम स्वरूपी घातलेल्या भुरळीतून ह्या रॉयिस्ट मुर्तीभंजकाला देखील बाहेर पडता आले नाही. हे त्यावेळच्या तमाम पिढीचे वास्तव आहे. यात नेहरू बरोबर का चूक अथवा त्यांच्या कार्याची आणि चुकांची शहानिशा करण्याचा प्रश्न नाही. तर एखाद्या व्यक्तीस देवत्व देऊन इतर पर्याय न मानण्याचे एकेश्वरी वर्तन करण्यातला प्रकार आहे. म्हणूनच "नेहरूंनंतर कोण?" हा मुद्दा त्यांच्या हयातीत देखील खूप चघळला गेला होता.

तरी देखील एक महत्वाचा मुद्दा असा आहे की तळवळकरांनी त्यांच्या नंतरच्या काळात सुरू झालेल्या दिशाभुल (विरोधी विचारांना एकतर राक्षस ठरवणे अथवा निर्बुद्ध-अडाणी म्हणण्याच्या) लेखनाची सुरवात केली असे म्हणण्यास वाव नाही. एकमेकांबद्दल वैचारीक दृष्ट्या विरोध असला तरी आदर असण्याचा आणि मैत्री ठेवण्याचा तो काळ होता. वैचारीक अस्पृश्यता आणि जातियता ही नंतरच्या काळात वाढीस लागली आणि सामाजिक तेढ करण्यास कारणीभूत ठरली.

तळवळकरांच्या लेखनाची आणि अग्रलेखाची आवड असलेला मध्यमवर्गीय मराठी समाज, तो ही विशेष करून मुंबईचा आणि मग विरळ होत इतर ठिकाणचा... पण त्यातील नक्की किती आंधळे काँग्रेस समर्थक झाले अथवा कितींनी काँग्रेस विरोधक असलेल्या कधी जनता पार्टी तर कधी शिवसेना आणि भाजपाला मते दिली हा संशोधनाचा विषय आहे. परीणामी कधी कधी त्यांचे लेखनातील (राजकीय) म्हणणे पटले नाही तरी मूळ लेखात म्हणल्या प्रमाणे, "त्यांच्या लेखनातून ब्रेनवॉशिंग करण्याऐवजी कुठेतरी विचार करायला शिकवले." इतकेच वाटत राहीले.

नंदन's picture

27 Mar 2017 - 2:35 am | नंदन

समयोचित, नेमका लेख आणि प्रतिसाद.
(तळवलकरांचे अग्रलेख ते आजची 'मटा'री भाषा हे चित्र पुरेसं विदारक आणि परिस्थितिनिदर्शक असावं.)