शिलाहारांचे कोप्पेश्वर मंदीर......भाग-१
सिंघण यादवाने देवेगिरीला गेल्यावर शिलाहारांचे राज्य आपल्या राज्याला जोडले. सिंघण यादवांच्या काही शिलालेखात सर्परुपी भोजाला गरुडाने म्हणजे सिंघणाने पकडले असा उल्लेख आहे. त्याने कोपेश्वरच्या देवळाच्या चरितार्थाची सोय लावली मात्र ते पूर्ण करण्यास आर्थिक मदत केली नाही व ते बांधकाम अर्धवट पडले. नंतरच्या काळात केव्हातरी स्थानिक जनतेने देवळावर शिखर उभे केले पण ते मूळ देवळाशी अत्यंत विसंगत दिसते. पण एवढे काही वाईट नाही. नाशिकचे त्रंबकेश्वरचे मंदीर जर आपण बघितलेत तर आपल्याला समजेल की अशी देवळे एका जागतीवर (Platform) उभी असतात. उदाहरणार्थ खालचे गोंदेश्वरचे मंदीर बघा.
ही जागती अजून एका मोठ्या कट्ट्यावर उभी असते त्याला म्हणतात अधिस्थान. यापासून देवळाचे पवित्र अस्तित्व चालू होते असे म्हणायला हरकत नाही. या जागतीवर भक्त मंडळी आख्या देवळाला प्रदक्षिणा घालू शकतात. या देवळाचे अधिस्थान व जागती गाडले गेलेले असणार. जर शेजारी नदी व घाट असेल तर हे निश्चितच तेथे असणार.
या देवळाचा नकाशा बघितलात तर आपल्या असे लक्षात ये़ईल की गर्भगृह, अंतराळ व गुढमंडप या तिन्ही मंडपाची आकार बाहेरुन एखाद्या चांदणी सारखे आहेत. या देवळाच्या बाह्य भिंती नखशिकांत मूर्तींनी मढविलेल्या आहेत. सगळ्यात खालच्या पट्टयावर (गजपट) ९२ हत्तींनी हे देवळाचे वजन पेलल्याचा आपल्याला भास होतो. याच हत्तींवरुन असंख्य इंद्र, ब्रह्मा, विष्णू इ. देव येथे अवतिर्ण झालेले दिसतात. गर्भगृहाच्या पश्चिम, उत्तर व दक्षिण भिंतींवर शिव-पार्वतीच्या मूर्ती, नंदीसकट आपल्याला दिसतात. एकूण ९५ मूर्ती आपापल्या वाहनांवरुन येथे आलेल्या आपल्याला दिसतात. दुर्दैवाने यातील जवळजवळ सगळ्या मूर्तीसंहाराला बळी पडलेल्या आहेत.
गर्भगृहात काळ्या रंगाच्या तुळतुळीत दगडाचे शिवलिंग विराजमान झालेले आहे. गर्भगृह व गुढमंडप चांदणीच्या आकाराच्या पायावर उभे असल्यामुळे जेव्हा आपण बाहेरुन या भिंती बघतो तेव्हा आपल्याला एक मूर्ती समोरुन दिसते तर एक मूर्ती बाजूने दिसते. (प्रकाश चित्रे बघताना हे अधिक स्पष्ट व्हावे) त्यांच्या सावल्यांचा खेळ फारच मजेदार दिसतो.
हे देऊळ प्रकाशाच्या वेगवेगळ्या योजनांमधे बघायलाच पाहिजे. म्हणजे सकाळी, दुपारी व संध्याकाळी सूर्य मावळताना.
भिंतींवर अनेक सुरसुंदरींची शिल्पे मोठ्या डौलाने उभी आहेत. त्यांच्याकडे बघताना काही तर स्वर्गातील अप्सरा तर येथे अवतरल्या नाहीत ना असा भास होणे असंभव नाही. यातील काही वाद्ये वाजवत आहेत तर काही नृत्य करत आहेत. त्यातील काही शिल्पांचे रसग्रहण आपण पुढे करणारच आहोत. दक्षिण भिंतीवर गणपती आहे तर उत्तरेच्या भिंतीवर सरस्वती. याच भिंतींवर महिषासुरमर्दिनी, भैरव, विष्णू, ब्रह्मा इ. देवतांच्या मूर्ती आहेतच.
सरस्वती:
ही मूर्ती जराशी उंचावर असल्यामुळे मूर्तीभंजकांच्या तावडीतून सुटली असावी. भारतीय मूर्तीशस्त्रात सरस्वतीची एकंदरीत बारा रुपे पहायला मिळतात. त्याप्रकारात तिच्या हातात असलेली आयुधांवरुन तिची नावे पडलेली आहेत. उदा. महाविद्या सरस्वती : हिच्या हातात अक्षमाला, पद्म, वीणा व पुस्तक असते. पण सर्व प्रकारात मला वाटते पुस्तक असतेच. ही मूर्ती पद्मासनात बसलेली असून तिच्या मस्तकावर तिने मुकुट धारण केलेला दिसतो. एका हातात अक्षमाला असून दुसऱ्या हातात एक पोथी दिसते. (इथे दिसत नाहे) एका हातात पाश आहे तर दुसऱ्या हातात अंकुश आहे. गळ्यात सुंदर दागिने घातलेले असून पायातही दागिने घातलेले दिसतात. महाराष्ट्र व कर्नाटकात वीणाधारी सरस्वतीचे शिल्प फार दुर्मिळ असते.
एका राजपुत्राचे शिल्पही उल्लेख करण्याजोगे आहे.
राजपुत्र ‘
या मूर्तीचा मुकुट बघण्यासारखा आहे. शिलाहार शिल्पकलेचा हा एक चांगला नमुना म्हणावा लागेल. काही हलकीफुलकी शिल्पही दिसतात.
उदा येथे एक नाचणाऱ्या स्त्री-पुरुषाचे शिल्प कोरलेले आहे.
हे शिल्प एका कोपऱ्यावर कोरलेले असल्यामुळे एका भिंतीवर एक व दुसऱ्यावर एक अशी रचना असली तरीही ते एकच वाटते. शंकराचे देऊळ असले तेरीही शिल्पकाराला इतर देवतांचे विशेषत: विष्ष्णूचे वावडे दिसत नाही. ब्रह्मा, विष्णू, महावीरांच्याही मूर्ती देवळाच्या भिंतींवर विराजमान आहेत. गुढमंडपाच्या दक्षिण द्वारावर एक महावराहावताराची मूर्ती आहे. तर आत एक उभा असलेला जय अजुनही बराच शाबूत आहे तर विजय गायब आहे.
जय:
आतील नाहिसा झालेला विजय:
ही खालचा व वरचा भाग तोडलेली मूर्ती एकसंध असताना खरोखरच सुंदर असणार हे त्याच्या दागिन्याच्या नक्षिकामामुळे कळून येते. त्याचे एका जवळून काढलेले छायाचित्र:
गुढमंडपातील खांबांवर अनेक कथा कोरलेल्या आहेत त्यात पंचतंत्रातील गोष्टीही आहेत. एका खांबावर दोन बगळे काठीला लोंबकाळणाऱ्या कासवाला घेऊन जातात ही गोष्ट स्पष्ट दिसते तर एकावर मगर व माकडाच्या गोष्टीतील एक चित्र कोरलेले आहे. या देवळाच्या बाहेर जेवढी उठावदार शिल्पकला आहे तेवढी आत नाही. सभामंडपात एका कोपऱ्यात सप्तमातृकांच्या मूर्ती ठेवलेल्या दिसतील पण त्या अत्यंत वाईट अवस्थेत आहेत व अंधारात असल्यामुळे छायाचित्र काढता आलेले नाही. अनेक देवळात आपल्याला सप्तमातृकांच्या मूर्ती दिसतात. उदाहरणार्थ वल्लीने टाकलेले वेरुळमधील सप्तमातृकेची शिल्पे. कोण असतात त्या ? या सप्तमातृका म्हणजे स्त्रीशक्तीची रुपे आहेत. यातील सर्व मातांच्या जन्माच्या कथा आहेत व बहुतेक मातांचा जन्म हा राक्षसांचा वध करण्यासाठी झालेला दिसतो. उदा. अन्धकासुर कथेत त्याच्या जमिनीवर पडणाऱ्या रक्तापासून नवीन राक्षस तयार हो़ऊ नयेत म्हणून या देवांनी उत्पन्न केल्या अशी कथा आहे तर एका कथेत नैर्ऋताचा वध करण्यासाठी ब्रह्मदेवांनी यांना उत्पन्न केले असे म्हटले आहे. त्या काळी या मातृकांना बरेच महत्व असले तरीही यांचे वेगळे मंदीर माझ्यातरी पाहण्यात नाही. यांना अनेक देवळात जागा मात्र दिलेली असते. बदामीचे राजे त्यांचे राज्य हे सप्तमातृकांच्या कृपेने मिळाले असे म्हणतात. यांना नावेही आहेत, ती अशी – ब्रह्माणी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्रणी व चामुंडा. सप्तमातृकांचे एक शिल्प मला जयपूरच्या अल्बर्ट म्युझियममधे दिसले त्याचे छायाचित्र आपल्याला कल्पना यावी म्हणून खाली देत आहे.
सप्तमातृका.
जेथे गुढमंडपातून आपण बाहेर येतो तेथे दरवाजावर खालच्या बाजूला काही शिल्पे आहेत मला वाटते ही शिलाहारांच्या राजा-राणीची असवीत.....त्याचे छायाचित्र खाली देत आहे.
स्वर्गमंडपाची रचना आपण जर नीट बघितलीत तर लक्षात ये़ईल की त्याचा वरचा भाग अत्यंत वैषिष्ठ्यपूर्ण आहे. याचे वर्णन करणे मला तरी अशक्य आहे म्हणून खाली एक छायाचित्र देत आहे.
खांबांवर दगडी तुळया व त्याच्या वर जे वर्तुळाकार आकार दिसत आहेत त्याला काय म्हणावे हे मला कळत नाही. प्रत्येक खांबावर पुढे आलेल्या भागावर अष्टदिक्पालांच्या व इतर देवतांच्या मूर्ती आहेत. या मूर्ती वरुन खाली चाललेले कार्यक्रम बघत आहेत अशी कल्पना असावी. दिकपालांची कल्पना थोडक्यात समजून घेऊया.....
आठ दिशांचे स्वामी म्हणून इंद, अग्नि, यम, निर्ऋति, वरुण, वायु, कुबेर आणि इशान यांना ओलखले जाते. काही उपदिशांची नावे यांच्यावरुनच पडली आहेत उदा. आग्नेय, वायव्य, इशान्य इ.इ...सुर्य पूर्वेस उगवतो व सुर्यामुळेच हे प्राणिमात्र जिवंत आहे म्हणून पूर्व दिशा ही देवांची म्हणून ओळखली जाते. व इंद्राला त्याची देवता/पालक म्हणून मान्यता मिळालेली आहे. याच्या विरुद्ध असलेली दक्षिण ही त्यामुळे मृत्युची, अंताची दिशा म्हणून यमाला त्याची देवता/पालक म्हणून मान्यता मिळालेलेली आहे. भारतवर्षाची पश्र्चिम सीमा समुद्राने अधोरेखित केली आहे असे मानल्यामुळे पाण्याच्या देवतेला म्हणजे वरुणाला त्या दिशेचे पालकत्व मिळाले आहे. यक्ष इ. मंडळी उत्तरेला राहतात म्हणून कुबेर उत्तरेचा पालक झाला. तर या सर्व दिशांच्या पालकांनी ब्रह्मा, विष्णू इत्यादि देवांबरोबर स्वर्गमंडपातील कार्यक्रमाला हजेरी लावली आहे व स्वर्गातून ते खाली बघत आहे अशी कल्पना असावी. त्यातील इंद्राचे छायाचित्र खाली देत आहे.
स्वर्गातून खाली बघणारी इंद्रदेवता.-
स्वर्गमंडपातून बाहेर येण्यासाठी तीन बाजुला तीन दरवाजे असून त्याला पायऱ्या आहेत या पायऱ्यांनाही हत्तींनी आधार दिला आहे असे दाखिवले आहे व त्यावर नक्षीकामही केलेले आहेत. अर्थात यातील बराचसा भाग आता गाडला गेल्या असल्यामुळे जे उरले आहे त्याचे छायाचित्र देण्यावाचून गंत्यंतर नाही.
पायऱ्या-
स्वर्गमंडपाचे काही खांब व त्यावरील नक्षीकाम -
गुढमंडपातून बाहेर येताना राजाराणीच्या शिल्पाशेजारी जी गवाक्षे आहेत ती पहायला विसरु नका. त्याचे सौंदर्य भन्नाट आहे. त्यातील प्रत्येक नक्षीकाम वेगळे आहे. ही हवा जाण्यासाठी केलेली असवीत कारण उजेडासाठी याचा विशेष उपयोग असावा असे वाटत नाही.
गवाक्ष:
मधल्या ओळीततील कमळात शिल्पकाराने केलेली चूक बघितली का ? पण अर्थातच ती डिझाईनवाल्याची चूक आहे व ती शिळेची चुकीची मोजमापे घेतल्यामुळे झाली असवी.
बाहेर गजपटाच्या आड अनेक मूर्ती दडलेल्या आहेत. त्यांची छायाचित्रे घेण्याचाही प्रयत्न मी केला. ती छायाचित्रे पुढच्या भागात दे़ईनच. पण त्या अगोदर सुरसुंदरीविषयी लिहायलाच पाहिजे....आता काम आहे...हेही पुढच्या भागात टाकेन...
क्रमशः
जयंत कुलकर्णी
प्रतिक्रिया
21 Apr 2013 - 8:37 pm | अन्या दातार
स्वर्गमंडपाची रचना अत्युत्कृष्ट आहे यात वादच नाही. प्रत्येक गवाक्षावर निरनिराळे डिझाइन आहे. ते पॅटर्न्स बघत बघतही निम्मा दिवस आरामात निघेल. :)
21 Apr 2013 - 9:21 pm | अत्रुप्त आत्मा
काका फोटो अतिशय जबरदस्त काढले आहात... एकदम मस्त :)
21 Apr 2013 - 10:06 pm | महेश नामजोशि
काय वर्णन करावे हेच समजत नाहि. इतकि अप्रतिम नक्षि कशि कोरली असॅल ? त्यान्ना सलांम.
21 Apr 2013 - 11:45 pm | मुक्त विहारि
च्या मारी ह्या मुर्ती फोडणार्यांना काय अक्कल वगैरे असते का?
वाचनाची गोडी नाही आणि सौंदर्य द्रुष्टी तर अजिबातच नाही.
दानव परवडले. ते निदान मुर्ती तरी फोडत नसत.
22 Apr 2013 - 12:02 am | अभ्या..
अप्रतिम जयंतकाका. केवळ अप्रतिम.
स्वर्गमंडपाच्या अतुल्य प्रकाशचित्रासाठी तुम्हाला त्रिवार सलाम.
प्रत्यक्ष पाहताना जे जाणवले नाही ते तुम्ही कॅमेर्यातून टिपून आमच्यासाठी आणलेत त्याबद्दल धन्यवाद.
काय ती स्वर्गमंडपातली परफेक्ट सिमेट्री, कीती लेअर्स, कसे रिपीटेशन. त्यातून जाणवलेला छायाप्रकाशाचा खेळ. जणू सारे फंडामेंटल्स ऑफ डिझाईन इथेच शिकावेत. केवळ अप्रतिम.
22 Apr 2013 - 12:15 am | प्यारे१
अप्रतिम!
या छायाचित्रांचं सुंदर पुस्तक प्रकाशित होऊ शकतं .
22 Apr 2013 - 12:22 am | गणपा
नक्षीकाम मती गुंग करणार आहे.
या लेखमालेसाठी धन्यवाद.
22 Apr 2013 - 1:48 am | बॅटमॅन
स्वर्गमंडप अतुलनीय आहे यात शंकाच नाही. मी गेलेलो तेव्हा ते पाहून वेडा झाल्तो.
22 Apr 2013 - 10:59 am | नि३सोलपुरकर
सलाम त्रिवार सलाम त्या रचनाकारांना ,कलाकारांना आणी तुमच्या प्रकाशचित्रांना.
काका खुप खुप धन्यवाद.
23 Apr 2013 - 11:27 am | प्रचेतस
अप्रतिम
23 Apr 2013 - 12:11 pm | स्पंदना
कोणताही पाहु शकणारा माणुस अशी कला उद्ध्वस्त करुच नाही शकत.
आंधळे, धर्मांधळेच अश्या गोष्टी तोडु फोडु शकतात.
इतक्या सुरेख मुर्ती, इतकी वर्षे घेतलेली मेहनत..अरेरे.
फार छान इतिहासाच अन शिल्प्कलेच वर्णन. वल्ली पाठोपाठ तुम्ही हे काम हाती घेतलत ते ब्येष्टच.
23 Apr 2013 - 12:48 pm | प्रचेतस
कोप्पेश्वराच्या सभामंडपात उजव्या व डाव्या अशा दोन्ही कोपर्यांत सप्तमातृकांचे दोन शिल्पपट आहेत. दोन्ही अगदी सारखेच आहेत.
डाव्या बाजूला वीरभद्र शिव, मध्यभागी सप्तमातृका आणि उजवीकडे गणेश. ह्या सर्व मूर्तींखाली त्यांची वाहनेसुद्धा कोरलेली आहेत.
9 Jan 2017 - 11:01 am | हृषिकेश पांडकर
Apratim kaka..
Khup savistar ani abhyaspurn lekhan ..
Dhanyavad