अनेक वर्षे म्हणजे जवळजवळ ९०० वर्षे झाली हे देऊळ निसर्गाशी संघर्ष करत उभे आहे. उन, पाऊस, वारा, तापमानाचे चढउतार या सगळ्याशी टक्कर देत या देवळाचा गाभा (स्ट्रक्चर) अजुनही सुस्थितीत आहे. त्याचे आरेखन ज्या वास्तुविशारदाने केले आहे आहे त्याला मानावेच लागेल. ९०० वर्षात हे देऊळ गळत नाही ना कृष्णेच्या पाण्याने याला काही झाले. त्याकाळी वास्तुविशारदांनी देऊळ उभारले आणि मग ते नशिबावर हवाला ठेऊन बघत बसले असे नव्हते. त्यांचे नशीब ते देऊळ टिकले असे नसून त्यांनी प्रत्येक गोष्टींचा पूर्ण विचार केला असणार हे निश्चित. या देवळाचे आरेखन करताना एक एक तुकड्याचा विचार करताना या वास्तूविशारदांनी त्यांचा व्यापक दृष्टीकोन सोडला नव्हता हे लक्षात येते. सगळे बांधकाम वजनदार दगडाचे आहे हे लक्षात घेता सगळ्या वास्तूचा समतोल राखण्यासाठी त्यांना काय काय करावे लागले असेल याची आपण कल्पना करु शकतो. हे काम किती अवघड असेल हे कळण्यासाठी फक्त तुम्हाला हे देऊळ बांधायचे आहे तर सुरवात कुठून कराल असा विचार करायला घेतलात की बस्स !
मागच्या भागात म्हटल्याप्रमाणे आज आपण देवळातील मूर्तींकडे वळू. येथे जी स्त्रियांची शिल्पे आहेत त्यांना सुरसुंदरी अशी उपाधी आहे. या स्त्रिया वाद्ये वाजवताना दिसतात, नटताना दिसतात, नृत्य करताना दिसतात तर काही पत्र लिहितानाही दिसतात. काही स्त्रियांची शिल्प बघू.
पत्र लेखिका.
पत्र लेखिकांची एकूण पाच शिल्पे आहेत. कदाचित पत्र लिहायला सुरवात आणि त्याचा शेवट असा क्रम असावा. त्यातील काही शिल्पांची छायाचित्रे खाली देतो.
या स्त्रिया कागदाच्या भेंडोळ्यांवर लिहित असताना दाखविलेल्या आहेत. म्हणजे आपण जुन्या सिनेमात जे खलिते पहातो त्या प्रकारच्या कागदावर. मला वाटते त्या काळात कागदाचे ताव भेंडोळ्यांच्या स्वरुपातच उपलब्ध होत असावेत. त्यांनी अत्यंत नाजुकपणे हातात लेखणी धरलेली आहे. पहिल्या दोन बोटात लेखणी धरल्यावर उरलेली बोटे अत्यंत मोहकरित्या विलग झालेली दाखविलेली आहेत. मानवी आकृत्या काढताना किंवा घडवितांना गुडघ्याची ठेवण (वरून दिसणारी) किंवा कोपराचा बाक व ठेवण काढणे किंवा कोरणे अत्यंत अवघड. विशेषत: कोपराचे टोक ज्याप्रमाणे दिसते तसे आले नाही तर साऱ्या प्रतिमेची रयाच जाते. चित्र किंवा शिल्प मग बेढब दिसू लागते. किंवा ‘फ्लॅट’ होते. असे येथे ही अनेक शिल्पाच्या बाबतीत झाले आहे पण शिल्पकारांनी सुरसुंदरींच्या बाबतीत असे होणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली आहे. हे आपल्याला वरील छायाचित्रात दिसुन येते. तिन्ही शिल्पात त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची वस्त्रे परिधान केलेली दिसतात. फॅशन डिझायनरला हे देऊळ म्हणजे कल्पनांचा एक उत्तम स्त्रोत आहे. शेवटच्या शिल्पातील शॉर्ट स्कर्टसारखे दिसणारे वस्त्र आजही लोकप्रिय हो़ऊ शकते ( तो शॉर्टस्कर्ट नाही हे मला माहीत आहे). किंवा ती वस्त्रे व त्याला शोभतील असे दागिने असा एक उत्तम पोषाख हो़ऊ शकतो. असो.
वाद्ये वाजविणाऱ्या स्त्रिपुरुषांची शिल्पे.
वरील स्त्रीने तिचे केस अंबाडा घालून खाली सोडले आहेत. तसेच तिने केसातही दागिने घातलेले दिसतात. तिच्या हातात एक छोटे मृदूंग दिसत आहे. कोपराजवळ एक दागिना आहे किंवा ती वाकी असावी पण ती दंडावर न घालता बरीच खाली घातलेली दिसते. व खांद्यावरही एक दागिना आहे. असे दागिने मी तरी बघितले नाहीत. शेजारील शिल्पात एक पुरुष मृदूंग वाजवताना दिसत आहे तर त्याच्या शेजारील माणसाची टोपी वेगळीच दिसते.
खालील शिल्पात ही स्त्री जे वाजवते आहे ते साधे मृदूंग नाही. याच्या वर चामड्याला ताण देण्याच्या दोऱ्यांखाली सरकत्या खुट्या असतात. एका हाताने हे वाद्य वाजवायचे व त्याचवेळेस त्या खुट्ट्या सरकवून वेगळा ध्वनी निर्माण करायचा असा हा अवघड प्रकार असतो. या प्रकारचे वाद्य दक्षिणेत वाजवत असत पण बहुदा आता कोणी वाजवत नाहीत.
खालील चित्रात एक स्त्री विणेसारखे एक वाद्य वाजवताना दाखविले आहे. ती वीणा निश्चितच नाही पण दोन भोपळ्याच्या वाद्यासारखे काहीतरी दिसत आहे. शेजारीच काटकोनातील भिंतीवर एक सुंदर स्त्री नृत्य करताना दिसते. मी मागे म्हटले ते येथे स्पष्ट व्हावे.समजा ती नृत्य स्त्री समोरुन बघितली तर वाद्य वाजविणारी स्त्री बाजूने दिसते. जर ती समोरुन बघितली तर नृत्य करणारी बाजूने दिसते.
खालील शिल्पात शेवटी एक नागकन्या दाखविलेली आहे. ती संपूर्ण नग्न असून तिच्या मांडीला सर्पांनी विळखा घातलेला दिसतो व तिने तिचे हातही नागाच्या फण्यासारखे वर पसरलेले दिसत आहेत.
हे शिल्प चक्क एका धनुर्धारी स्त्रीचे आहे. एका हाताने तिने तिचे धनुष्य तोलले आहे तर दुसरा हात भात्याकडे वळलेला दिसतोय. या मूर्तीचे परस्पेक्टीव्ह जरा चुकलेले दिसते....
माझी अत्यंत आवडती दोन शिल्पे.. या दोन शिल्पांवर पडणारा प्रकाश हा केवळ अद्वितीय आहे. याचीही मोडतोड झाली आहे नाहीतर या सुंदरींच्या लावण्याची किर्ती दुरवर पसरली असती.
वरील अर्धे छायाचित्र हे पहिल्या शिल्पाचेच आहे. आता ही दोन शिल्पे बघण्याची मजा समोरुन नाही हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. समोरुन ही शिल्पे साधी मान वळवलेल्या स्त्रियांची वाटतात पण मी हे छायचित्र ज्या कोनातून काढले आहे त्या कोनातून बघा मग तुम्हाला त्याचे खरे सौंदर्य समजून ये़ईल. दुसऱ्या चित्रात ती स्त्री अचानक मागे वळून बघते आहे व तेही इतक्या मोहकपणे, तिच्या चेहऱ्यावरचे भावही बघण्यासारखे आहेत.
ही अजून एक सुंदर स्त्री. यात तिचा कमनीय बांधा आपल्याला मोहवून टाकतो. दुसरे शिल्प एका नग्न स्त्रीचे दिसते.
श्रीकृष्णाला वंदन करुन या छायाचित्रांबरोबर ही लेखमाला संपली असे..............(कारण इतकी छायाचित्रे आहेत की तुम्हाला आता कंटाळा येईल.)
जयंत कुलकर्णी.
परत केव्हातरी आता हंपी संपवतो........:-)
.
प्रतिक्रिया
22 Apr 2013 - 9:02 pm | मुक्त विहारि
मस्तच..
असे वाटत होते की. ह्या मुर्ती तोडणार्यांना पकडून आणावे आणि त्यांना सौंदर्य-द्रूष्टी शिकवावी.
22 Apr 2013 - 9:23 pm | बॅटमॅन
सरजी अजून लेख लिहिले तरी बेहत्तर....कंटाळा येणार नाही वाचायला आजिबात :)
22 Apr 2013 - 9:58 pm | अत्रुप्त आत्मा
+१
22 Apr 2013 - 10:07 pm | सुहास झेले
अगदी अगदी.... अजून येऊ द्यात :) :)
22 Apr 2013 - 11:23 pm | पैसा
कंटाळा नाही आला. अजून येऊ द्या सर! पण एक शंका. तेव्हा भारतात कागद होता की भूर्जपत्रे आणि कापडावर लिहिले जायचे? बादशाही फर्माने आणि देवळांमधे असे कापडावरचे लिखाण असल्याचे ऐकले आहे.
23 Apr 2013 - 6:49 am | जयंत कुलकर्णी
त्या स्त्रिया ज्यावर लिहीत आहेत ते कागद किंवा कापड काहीही असू शकते हे खरे.... भारतात कागद केंव्हा आला हे शोधले पाहिजे....
23 Apr 2013 - 8:42 am | श्रीमान
एक बार देखा है अब बार बार देखेंगे , औरोंकोबि दिखाऐंगे.
23 Apr 2013 - 11:26 am | मन१
वाचतोय...
अधिक भाग आलेले आवडतील.
23 Apr 2013 - 11:37 am | प्रचेतस
खूप सुंदर.
ते शिल्प धनु राशीचे आहे. अशीच इतरही ११ राशींची शिल्पे इथल्या बाह्य भिंतींवर आहेत.
23 Apr 2013 - 11:54 am | जयंत कुलकर्णी
वल्ली मला दिसली नाहीत पण तुझ्याकडे त्याचे फोटो असतील तर टाक म्हणजे पुढच्यावेळेस जाईन तेव्हा त्याचे फोटो काढेन. मी पूर्ण देवळाचे फोटो बाहेरुन काढले पण मला काही ती ११ शिल्प सापडली नाहीत. त्याचे रुप आपण बघतो त्या राशींच्या चित्रांपेक्षा वेगळी आहेत का ?
23 Apr 2013 - 12:13 pm | प्रचेतस
वेगवेग़ळ्या स्वरूपात आहेत. काही शिल्पे स्त्रीरूपांत आहेत तर काही मेष, वृषभ इत्यादी प्राण्यांच्या रूपाने कोरलेली आहेत.
पैकी कुंभ राशीचे शिल्प मला ठळकपणे घेता आले. इतर शिल्पे उंचावर असल्याने व्यवस्थित घेता आली नाहीत.
कुंभ रास
मेष रास ( हे शिल्प अग्नीचे आहे का मेष राशीचे याबद्दल मला संभ्रम आहे. पण या भिंतीवर इतर दिक्पाल दिसत नाहीत)
23 Apr 2013 - 1:25 pm | जयंत कुलकर्णी
हे अग्नीचेच आहे हे निश्चित.......करण तो एडका आहे..
23 Apr 2013 - 1:17 pm | नितिन थत्ते
ठाण्याला कौपिनेश्वर मंदिर आहे. ते यापैकीच असावे का? ठाण्यावरशिलाहारांचेच राज्य होते असे ऐकले/वाचले आहे.
23 Apr 2013 - 2:44 pm | प्रचेतस
हो.
तेही शिलाहारांचेच. उत्तर कोकणचा शिलाहार राजा मुन्मुणी याच्या कारकिर्दित हे मंदिर बांधले गेले असावे. कौपिनेश्वराच्या सभामंडपातील स्तंभ आणि त्याखालील दगडी चौथरा हे तत्कालीन आहेत. मूर्तीभंजकांच्या तडाख्यामुळे भग्न झालेल्या ह्या मंदिराचा नंतर कधीतरी जीर्णोद्धार झाला आहे.
खिद्रापूरचा कोपेश्वर हे कोल्हापूर शाखेच्या शिलाहारांनी बांधलेय.
तर शिलाहारांची तिसरी शाखा दक्षिण कोकणात (गोवा/रत्नागिरी) इथे राज्य करत होती.
23 Apr 2013 - 1:29 pm | जयंत कुलकर्णी
डोक्यावर माळ बांधलेली व गळ्यात उपरण्यासारखे वस्त्र असलेला माणूस पर्थियन असावा. कारण त्यावेळे त्यांची बरीच येजा होत होती.
23 Apr 2013 - 2:51 pm | प्रचेतस
हे अरबी / इराणी म्हणजेच पार्थियन व्यापारी लोक असावेत.
शिलाहारांनी त्यांना मशिदी बांधण्यासाठी अनुमती देऊन त्यासाठी दाने सुद्धा दिली होती. तर दक्षिण कोकणच्या अवसर (तिसरा) याने दोन व्यापार्यांना १०० दिनारांची वृत्ती दिली होती असा उल्लेख त्याच्या एका ताम्रपटात आहे.
याच परदेशी माणसाच्या शेजारीच एका मंगोलियन माणसाचे शिल्प कोरलेले आहे.
23 Apr 2013 - 2:08 pm | स्मिता.
सगळे भाग वाचलेत पण सगळ्यांना मिळून एकच प्रतिक्रिया देतेय.
कोणताही भाग वाचतांना कंटाळा अजिबात आला नाही. उलट मोहक चित्रांच्या जोडीने आलेली रोचक माहिती यामुळे लेख कधी संपला हेसुद्धा कळले नाही. आपल्या सांस्कृतिक वारश्यात अतिशय सुरेख कलाकृती आहेत. अनेक रेखीव शिल्पांची झालेली नासधूस पाहून फार हळहळ वाटते. धार्मिक भावनांची नाही तर सौंदर्याची कदर ठेवून तरी ती शिल्पे अभंग रहायला हवी होती असं वाटलं.
23 Apr 2013 - 6:20 pm | प्यारे१
लेखमाला संपवू नका.
अजून फोटो येऊ द्या.
23 Apr 2013 - 6:53 pm | राही
सर्व लेखांक आवडले.फोटो सुंदरच आहेत.शिल्पमूर्ती किती सौष्ठवपूर्ण असतील याची पुरेपूर कल्पना फोटोंवरून येते.मला तर आठ-नऊ-दहा क्रमांकाच्या चित्रपट्टिकांमधली लावण्यवती अतिशय आवडली. तिचा चेहरा अगदी मीनाकुमारीच्या चेहर्यासारखा दिसतोय.अप्रतिम शिल्पांकन.
24 Apr 2013 - 6:45 am | स्पंदना
सुरेख! सुरेख! काय शिल्पे आहेत. काय ती कला! हे सारं अस पुर्ण माहीतीसह आमच्या पर्यंत आणल्याबद्द्ल खरच अतिशय धन्यवाद.
25 Apr 2013 - 6:49 am | जयंत कुलकर्णी
सर्वांना धन्यवाद !!
25 Apr 2013 - 12:42 pm | महेश नामजोशि
सर्व शिल्पे अतिशय सुंदर आहेत. इतकी सौष्ट्वता कुठेच बघायला मिळत नाहि. याचा अर्थ स्पष्ट आहे कि भारतीय स्त्रिया जगात का वाखाणल्या जातात ते उगाच नाहि. उगाच ते नवीन फॅडच्या नादि लागून अगदी बारीक होण्याचा प्रयत्न करतात पण त्याकाळी असे कुणी करण्याच्या फंदात पडत नसतील त्यामुळे शिल्पकारांनी जी शिल्पे सगळीकडे भारतात कोरली आहेत ती अतिशय प्रमाणबद्ध अशी आहेत. जर ती सर्व शिल्पे नष्ट न होता आपल्याला बघायला मिळाली असती तर किती बरे झाले असते. एकूणच भारतात सर्व ठिकाणी शिल्पे मुद्दामून फोडलेली आहेत. निसर्गामुळे त्याचा विध्वंस झालेला नाहि. एक तर तो काळ शांत वातावरणाचा असावा व शिल्पकारांची सर्व सोय राजे करीत असतील त्यामुळेच पिढ्यानपिढ्या ते शिल्पे कोरीत रहिले. कित्येक मंदिरे तर पूर्ण करण्याला काही शतके लागली यावरूनच याचा अंदाज येतो.