काही फायदा होतो म्हणून वाचन करु नये, हे जरी खरं असलं तरी त्यातून वेगवेगळे अनुभव आपण लेखकाच्या दृष्टीतून घेऊ शकतो. नाहीतर एका आयुष्यात असे घेऊन घेऊन अनुभव तरी किती घेणार? बसल्याजागी वेगवेगळे अनुभव - व्हिकॅरियसली म्हणजे दुसऱ्याच्या उसन्या दृष्टीतून का होईना, आपण पुस्तकाच्या वाचनातून घेऊ शकतो. 'का आपुला ठावो न सांडिता, आलिंगिजे चंद्रु प्रकटिता', असं कमलिनीबद्दल ज्ञानेश्वरीत म्हटलंय तसंच काहीसं.
अर्थात कुणाला कुठला अनुभव, कुठला विचार आवडेल हे सांगणं अवघड. त्या त्या व्यक्तीच्या पिंडावरती ते अवलंबून. कोसला काय किंवा द फाऊंटनहेड काय -- केवळ ती पुस्तकं ग्रेट आहेत यापेक्षा 'तुम्हांला' ती किती आवडतात हे महत्त्वाचं. केवळ गाजलेलं पुस्तक आहे म्हणून ते न आवडताच डोक्यावर घेऊ नये (उदा. शतकात सर्वश्रेष्ठ गणली गेलेली युलिसीस) किंवा जे बहुसंख्यांना आवडतं त्याला केवळ त्याच कारणाने हट्टाने नावं ठेवण्याचा अट्टाहासही करु नये.
कविता आणि त्यांचा अर्थ, त्या आवडणं म्हणजे अजून एक पुढची पायरी. ग्रेसच्या सगळ्याच कविता कुठे कळतात? त्यांच्या ओळी हा एक वैयक्तिक अनुभव असतो. प्रत्येकाच्या मनात ती कविता वाचून तयार होणाऱ्या स्पष्ट - अस्पष्ट प्रतिमा वेगवेगळ्या, ज्याच्या-त्याच्या पिंडावर आणि आजवर घेतलेल्या अनुभवांवर बेतलेल्या. दहा हजार कवींना वेगवेगळ्या दिसणाऱ्या चंद्राप्रमाणे निरनिराळ्या असल्या तरी शेवटी प्रत्येकाचा 'जस्ट वन' असलेला चंद्र असतो, तशा खासगी. अगदीच ढोबळ उदाहरण म्हणून, मर्ढेकरांची 'या गंगेमधि गगन वितळले' वाचून मला हटकून बाणगंगेचा तलाव आठवतो. कुणाला थेट गंगा नदी आठवेल, कुणाला कविताच आवडणार नाही.
शिवाय ही अनुभव ग्रहण करण्याची प्रत्येकाची पार्श्वभूमी काळाप्रमाणे बदलत जाते, हा भाग वेगळाच. आजचे नवीन अनुभव मग आपल्या पिंडाचा भाग बनतात. त्यामुळे आज एखादं पुस्तक/कविता आपल्याला जशी आवडली तशीच्या तशीच ती आपल्याला दहा वर्षांनी आवडणार नाही. जर आपल्याच आवडीत एवढा फरक पडू शकतो, तर दोन व्यक्तींच्या आवडी जुळणं हे अधिक कठीण.
पण असं असलं, तरी याचंही एक उलट टोक आहे. अनुभव जसे वैयक्तिक असतात, तसेच वैश्विकही असतात. वाचनातून आपण लेखक/कवीचे अनुभव व्हिकॅरियसली जगायचा प्रयत्न करतो, पण त्याचवेळी आपल्या पूर्वसंचितातल्या अनुभवाशी सांगड घालायचाही कुठेतरी नकळत प्रयत्न करत असतो. आपण कधीच न घेतलेले अनुभव (उदा. रारंगढांग) जसे आपल्याला आवडू शकतात, तसेच त्याच्या उलट जिथे जिथे आपली 'येथीचा जिव्हाळा तेथे बिंबे' सारखी स्थिती होऊन ज्या अनुभवांशी आपण आयडेंटिफाय करु शकतो तेही बेहद्द आवडतात.
लंपन आवडण्यामागे मग प्रकाश नारायण संतांची शब्दकळा, कथेची बांधणी, सूक्ष्म निरीक्षणशक्ती किंवा एका शब्दात सांगायचं झालं तर प्रतिभा/लेखनकौशल्य हे सारं असलं, तरी ही पुस्तकं वाचत असताना मी त्या वयाचा असताना असाच मॅडसारखा विचार करायचो असं वाचताना सतत वाटत राहतं आणि लंपनशी कुठेतरी धागा जुळतो; हेही एक महत्त्वाचं कारण असावं.
लंपनची पुस्तके असू देत किंवा थोड्या मोठ्या वयातलं 'शाळा' किंवा पंचविशीतल्या क्वार्टर-लाईफ क्रायसिस मधला 'पांडुरंग सांगवीकर'; 'टू किल अ मॉकिंगबर्ड' मधली जीन लुईस असो वा जे. एम. कॉटझींच्या 'बॉयहूड' मधला मुलगा -- कुठेतरी आपली ओळख पटते आणि ते पुस्तक आवडण्यामागचं एकमेव नसलं तरी महत्त्वाचं कारण बनून जातं.
फास्टर फेणे, गोट्या, हॅरी पॉटर इ. मध्ये आणि यासारख्या पुस्तकांत थोडा फरक आहे. पहिल्या गटातली पुस्तकं वाचताना मोठेपणीही हरवून जायला झालं, तरी 'पंखा' वाचताना बऱ्याचदा जी अंतरीची खूण पटते आणि क्वचित 'ते हि नो दिवसा: गता:' व्हायला होतं तसं वाटत नाही. जत्रेतल्या पाळण्यात बसून लहान मुलासारखा आनंद घेणं आणि खालीच थांबून पाळण्यातल्या हरखून गेलेल्या मुलांकडे पाहून त्यांच्या आनंदाशी, फार दिवसांनी भेटणाऱ्या जुन्या मित्रासारखी ओळख पटणं यात जो फरक किंवा साम्य आहे, तसंच काहीसं या दोन प्रकारच्या पुस्तकांत असावं असं मला वाटतं.
हे एवढं पाल्हाळ लावण्याचं कारण म्हणजे नुकतंच श्रीनिवास विनायक कुलकर्णींचं 'डोह' वाचनात आलं. वाचताना लंपनची ओळोओळी आठवण यावी असं. शांताबाई शेळक्यांनी लिहिलेल्या परीक्षणात म्हटल्याप्रमाणे बालपणीच्या निरागस वृत्तीने टिपलेले संस्कार व्यक्त करताना प्रौढ वयातल्या विश्लेषक जाणीवेचीही अधूनमधून जोड दिलेलं. त्यातल्याच 'आम्ही वानरांच्या फौजा' या कथेतला हा काही आवडलेला भाग --
...
पाऊस पडत असायचा. पाऊसच पाऊस... नेहमीचे कोवळे निळेशारपण मावळून आभाळ ढगाळले कधी, कळायचेही नाही. पावसाचे तिरपे पारदर्शक पाते एकसारखे फिरत राहायचे. पात्यामागे पाते -- आणि त्या पातळ तलम पात्यांच्या पदरापदरांचे पुन्हा एक पारदर्शक पाते...
आमच्या उघड्या पडवीच्या लाल कौलारओळींच्या थोडे अलीकडे आत आम्ही घरची सारी जणे ते कुतूहल डोकावून, न लवणाऱ्या डोळ्यांनी पाहत उभी असू. पाणी पाणी पापण्यांभरी पाहत... पाऊस कुठे कुठे पडत असेल, घाट कसा धुवून काळा लख्ख झाला असेल, वडाखालची तांबडमाती कशी सुवासत असेल, हे सारे मनात आणीत -- अंगणातून वाहत जाणाऱ्या पाण्यातून सोडलेल्या कागदी होड्या कुठल्या देशात वाहत जातील या तर्काच्या शिडाबरोबर हरवत...
पाऊसधारांचा गारवा शरीरात भरीत आम्ही चहाचे गरम गरम घुटके पडवीत उभ्याउभ्या घेत असू. कौलारओळींच्या शेवटाला घासून थोड्या वरून देशपांड्यांच्या भिंतीची रेषा खालती उतरत येत असे. त्या रेषेच्या उतारावरून एक अंगभर भिजलेली लेकुरवाळी वानरी, पोटाला घट्ट चिकटून राहिलेल्या पोरासह आमच्याकडे पाहत गहूगहू खालती सरकत असे.
ती बाई चिंब भिजलेली असे. छत्रीसारख्या डोक्यावरून पुढे आलेल्या तिच्या केसांची नोकदार झिपरी उसकटून गेलेली असे. तिच्या डोळ्यांच्या टिंबांत एक केविलवाणी इच्छा तेवे. ती खालती सरकायची आणि मग आई म्हणायची, "ये ग बाई, ये. भिजून गेली आहेस..."
एखादी भिजून आलेली बाई आत यावी तशी ती खुशाल आमच्या जवळ येऊन थांबे. सारे अंग हलवी; आणि भिजलेल्या पोराच्या केसातून पाणी निपटून काढी. मी तिचे अंग अंग जवळून पाही. तिचे काळे तोंड. नकटे नाक. तिच्या अंगावरली केसाळ लव. तिचे हात. तिच्या हातावरल्या रेषा... नि वाटे की, आजोबा आपला हात पाहतात, हिचाही त्यांना एकदा पाहायला सांगावे.
...
अगदी लहानपणापासून वानरासंबंधी मला काहीतरी निराळे वाटत असे. आईबरोबर जाताना कुठून तरी पुढे धप् दिशी उडी मारून तोंड विचकून गेलेले वानर मला आठवते. त्याच्या डोक्यावरल्या झिपरीमुळे ते छपराखाली राहिले आहे व त्या छपराला पाय फुटले आहेत असा माझा चमत्कारिक समज तेव्हा झाला होता. त्याचे लुकलुकते डोळे, त्याच्या शेपटाचा डौल माझ्या चांगल्या स्मरणात आहे. मला तो काहीतरी, अगदी गरीब, कपडे नसलेल्या माणसातलाच एक वेगळा प्रकार वाटे. ती गावातून कशासाठी तरी सतत धावत असतात. कुठेतरी काहीतरी त्यांचे मोठे काम निघालेसे भासे. थंडीच्या दिवसांत आजीबरोबर वडाखाली ऊन्ह खायला यावे तेव्हाही कितीतरी वानरे, पाराजवळ ओळीने उन्हाला पाठ देऊन बसलेली असत. आणि मनात येई, कुणाकुणाच्या मागे राहून गेलेल्या नुसत्या सावल्यांतच जीव भरला आहे नि त्यांची वानरे झाली आहेत.
पतझडीच्या दिवसातल्या एका निष्पर्ण झाडाच्या सांगाड्यावर एकदा इतकी निश्चल वानरे मी पाहिली होती की, ते एखाद्या विचित्र झाडाचे फळपीकच वाटावे.
...
आजारीपणात मी पडवीत वरती तोंड करून पडलेला असे. कौलाराच्या छिद्रातून आकाशाचा निळा पारा उन्हाच्या वेळी चमचमे. एखादे वानर आपले दोन डोळे त्या छिद्रात लावून माझी तब्बेत पाही. नि मग ती सारी छिद्रे मला आढळायला आलेल्या असंख्य वानरांच्या डोळ्यांचीच झाली आहेत असे अतिशय वाटे.
लहानपणी आपण वानर म्हणून का जन्मलो नाही याची सूक्ष्मशी खंत माझ्या मनात होती. वानरांच्या निर्भर जीवनाचे विलक्षण कडे तेव्हा वाढता वाढता माझ्याभवती पडलेले होते...संध्याकाळ होत आलेली असे. अंधार भरत येई. घरातला गार अंधार, घरांवर वरल्या झाडांचा अंधार आणि झाडांवर आभाळातून उतरत येणारा अंधार...अंधारावर अंधार...अंधार ही जशी दिवसाची कपऱ्याकपऱ्यातली झोप असे...दूरभर कुठे तरी हरवलेली झोप पाखरासारखी डोळ्यातून भरे. थोरली आई कुणाकुणाच्या नावाचा एक घास तोंडात भरवी. पानातच हळुवारपणे हात धुवी. आपल्याजवळच्या दुलईत गुरगटून घेई. अंगभरच्या गुंगीवर मऊ हात फिरवी. प्रेमाने थोपटी आणि अंधुकसे सांगत राही:
"बरं का, आपली आणि त्या मोठ्ठ्या कुणाची प्रत्येक जन्मी गाठभेट होते आहे...तो गोकुळात कृष्ण म्हणून आला तेव्हा आपण गोपाळांच्या मेळ्यात होतो...तो रामराजा होता त्या वेळी आपण त्याच्या वानरांच्या फौजांत होतो...
तुम्ही अवतरले गोकुळी, आम्ही गोपाळांच्या मेळी
तुम्ही होते रामराजा, आम्ही वानरांच्या फौजा..."
...
[हाच लेख येथेही वाचता येईल.]
प्रतिक्रिया
19 Oct 2007 - 4:18 pm | आजानुकर्ण
अप्रतिम अभ्यासपूर्ण लेख.
केवळ ती पुस्तकं ग्रेट आहेत यापेक्षा 'तुम्हांला' ती किती आवडतात हे महत्त्वाचं. केवळ गाजलेलं पुस्तक आहे म्हणून ते न आवडताच डोक्यावर घेऊ नये.
शतशः सहमत.
आजच एक वाक्य वाचले ते देण्याचा मोह आवरत नाही.
What's right isn't always popular... and what's popular isn't always right.
साहित्यात राईट व राँग असे काही नसले तरी आशय बराचसा लागू होतो.
19 Oct 2007 - 4:20 pm | आजानुकर्ण
लंपन, कोसला, हॅरी पॉटर यांसोबत "कॅचर इन द राय"चा उल्लेख नाही पाहून आश्चर्य वाटले.
19 Oct 2007 - 4:28 pm | नंदन
धन्यवाद, योगेश. कोसलाबद्दल लिहिताना 'कॅचर इन द राय' डोक्यात आले होते, पण ते वाचले नसल्याने त्याचा उल्लेख केला नाही. कोसला लिहिताना नेमाडेंनी 'कॅचर...'वरुन मोठ्या प्रमाणावर प्रेरणा घेतली आहे असाही प्रवाद ऐकला आहे.
[चौकस यांचे 'निळे पेन'ही याच (लंपन - डोह वगैरे) सदराच्या जवळ जाते, असे वाटते.]
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
19 Oct 2007 - 4:34 pm | आजानुकर्ण
कोसला आणि कॅचर इन द राय चा संबंध असण्याची शक्यता आहे.
पण कोसलाच्या तुलनेत कॅचर फारच टोकदार प्रभावी वाटले.
कॅचरची एका मैत्रिणीकडून उसनी घेऊन वाचलेली प्रत ही कधीही मोडून पडतील असली पिवळट पाने व त्यांचा विशिष्ट वास असलेली जुनाट होती. त्यामुळे कॅचरमधले होस्टेलचे वर्णन अगदीच अनुभवता आले. ;)
- (वाचक) आजानुकर्ण
22 Oct 2007 - 2:33 am | कोलबेर
...अनेकदा वाचायला घेउन सोडून दिले आहे पण 'कॅचर' मात्र परदेशी असून एका बैठकीत वाचून काढावेसे वाटले. कोसलातील नेमाड्यांची शैली अनेकांना भुरळ घालत असली तरी मला झेपत नाही.. तेव्हा थोडक्यात, 'केवळ ती पुस्तकं ग्रेट आहेत यापेक्षा 'आपल्याला' ती किती आवडतात हे महत्त्वाचं.' हेच खरं!!
22 Oct 2007 - 1:48 pm | जुना अभिजित
आमच्या एका मास्तरांनी कोसला वाचा असं आम्हाला सांगीतलं. त्याचं कौतुक करताना ते म्हणाले होते की यातून जीवनविषयक दृष्टी मिळते. आम्ही वाचलं पण घंटा काही दृष्टी वगैरे मिळाली नाही. मराठी साहित्यातला मैलाचा दगड असा उल्लेख कोसलाबद्दल केला जातो. पण का ते कळत नाही. कदाचित आमची आवड जुळत नसावी. कोसला, बिढार, झूल, जरीला सगळी पुस्तके वाचली आहेत. पण अफलातून वगैरे वाटली नाहीत.
अनोळखी लेखकांची अनेक अप्रतिम पुस्तके कथा वाचनात आल्या आहेत.
नेमाडेंचा क्षमस्व अभिजित
19 Oct 2007 - 4:53 pm | धनंजय
तसाच आस्वादपूर्ण. मस्त लेख.
19 Oct 2007 - 5:42 pm | विसोबा खेचर
नंदन,
सायबा, केवळ सुरेख लिहिलं आहेस..
तुझं मराठी साहित्यावरील प्रेम आणि वाचन पाहिलं की खरोखरंच थक्क व्हायला होतं! तुझ्या व्यासंगाला आपला सलाम...
तात्या.
21 Oct 2007 - 6:03 pm | बेसनलाडू
१०१% सहमत!!!
(सहमत)बेसनलाडू
19 Oct 2007 - 6:19 pm | प्रियाली
सुरेख, अभ्यासपूर्ण लेख. वानरांचे, त्यासोबत आलेले पावसाचे, कौलांच्या छिद्रातून दिसणारे आकाशाच्या निळ्या पार्याचे वर्णन फारच छान.
20 Oct 2007 - 12:16 am | सर्किट (not verified)
सुंदर लेख. हल्लीच चेतन भगत चे फाईव्ह पॉइंट समवन वाचून, माझी आणि बायकोची चर्चा झाली. तिला ते पुस्तक अजीबात आवडलं नाही, आणि मला ते प्रचंड आवडलं. ह्याचे कारण एकचः
ही पुस्तकं वाचत असताना मी त्या वयाचा असताना असाच मॅडसारखा विचार करायचो असं वाचताना सतत वाटत राहतं आणि लंपनशी कुठेतरी धागा जुळतो; हेही एक महत्त्वाचं कारण असावं.
आय आय टी च्या होस्टेल मधला (किंवा इतर कुठल्याही होस्टेलमधला) अनुभव नसेल, तर फाईव्ह पॉइंट समवन आवडणे कठीण आहे.
- सर्किट
20 Oct 2007 - 12:39 am | सहज
जसे कुठलाही कलाविष्कार सादर करताना त्या कलाकाराची एक "ग्रेस/फ्लूएन्सी" बघायला मिळते तशी नंदन तुमच्या वाचनाला/रसग्रहणाला देखील एक "नजाकत" आहे.
वाचनातून रसग्रहण व एकंदर तुमची जडणघडण ह्याचा एक अंदाज आला. :-) तयार कान असलेल्या श्रोत्यासारखे तुम्ही "पट्टीचे" (आदराने/कौतुकाने) वाचक आहात.
वानरांबद्दल खूप फुलवलेला लेख असला तरी लहानपणी पाचगणीला धप्प्कन समोर आलेले, दोन पायावर उभे राहील्यावर (बसलेल्या माझ्यापेक्षा) अजूनच धिप्पाड असलेले काळ्या तोंडाचे निडर माकड जेव्हा फस्स्कन आवाज करून माझ्या हातातून पापड घेऊन गेले, तेव्हा पासून मी वानराला जरा टरकून, बरीच श्वापदे ही दुरूनच उत्तम. :-) माझी इतर भावंडेपण भेदरली होती. आम्ही सगळे मग खेळताना ते मीरकॅट फॅमीली सारखे वॉच ठेवून असायचो. बनेश्वरला सहलीला तर ती माकडे हातातील खाऊ, पिशवी पळवायला चोरी करायलाच यायची. असो ह्या आठवणीमुळे म्हणा की माझ्या अल्पमतीमुळे ते लहान मुलाने केलेले वानराचे वर्णन जरा जास्तच वाटते. :-) असतील बुवा त्यागावची गरीबडी वानरे.....
20 Oct 2007 - 4:55 am | चित्रा
आमच्या उघड्या पडवीच्या लाल कौलारओळींच्या थोडे अलीकडे आत आम्ही घरची सारी जणे ते कुतूहल डोकावून, न लवणाऱ्या डोळ्यांनी पाहत उभी असू. पाणी पाणी पापण्यांभरी पाहत...
कौलाराच्या छिद्रातून आकाशाचा निळा पारा उन्हाच्या वेळी चमचमे.
"डोह" वाचलं नाही. आधी च कुठेतरी कबूल केल्याप्रमाणे हल्ली वाचन कमी झाले आहे. पण वाचावंसं वाटतं आहे हे मात्र नक्की.
तुम्ही म्हणता तसे लहानपणच्या अनुभवांशी हे वर्णन जुळून गेले. पडवी शब्दानेच लहानपण आठवले. पडवीचे गज, वर जुन्या घरात जाणारा जिना, बाहेरचे खांब, लहानपणी पावसात पाकोळ्या घरात येत ते सर्वच आठवले. लंपन आणि सुमा हे तर आधीच मनात खोलवर बसले आहेत. लंपनच्या आजीआजोबांच्या गावासारखेच आमचेही गाव होते (एके काळी म्हणायला हवे). कदाचित लंपन आवडण्याचे कारण त्याचे ते सुंदर गावही असेल. असे वर्णन वाचले की तुम्ही म्हणता ते अनुभव अधिक उमाळ्याने समोर येतात. त्यामुळे (मनापासून) धन्यवाद.
20 Oct 2007 - 12:04 pm | स्वाती दिनेश
अर्थात कुणाला कुठला अनुभव, कुठला विचार आवडेल हे सांगणं अवघड. ती पुस्तकं ग्रेट आहेत यापेक्षा 'तुम्हांला' ती किती आवडतात हे महत्त्वाचं.
कुठेतरी आपली ओळख पटते आणि ते पुस्तक आवडण्यामागचं एकमेव नसलं तरी महत्त्वाचं कारण बनून जातं.
अनुभव ग्रहण करण्याची प्रत्येकाची पार्श्वभूमी काळाप्रमाणे बदलत जाते, हा भाग वेगळाच. आजचे नवीन अनुभव मग आपल्या पिंडाचा भाग बनतात. त्यामुळे आज एखादं पुस्तक/कविता आपल्याला जशी आवडली तशीच्या तशीच ती आपल्याला दहा वर्षांनी आवडणार नाही. जर आपल्याच आवडीत एवढा फरक पडू शकतो, तर दोन व्यक्तींच्या आवडी जुळणं हे अधिक कठीण.
सुंदर लेख! एखादे पुस्तक आपल्याला का आवडते किवा तितकेसे का आवडत नाही, याचे विवेचन अगदी आतून पटले.
स्वाती
21 Oct 2007 - 5:58 pm | नंदन
आपल्या प्रतिक्रियांबद्दल मन:पूर्वक आभार.
सहजराव, त्या मूळ लेखात माकडांच्या हिंस्त्रपणाचेही वर्णन आहे. पण एकंदरीतच तुम्ही म्हणता तसं त्यांच्याविषयीचं आकर्षण अधिक दिसून येतं.
चित्रा, तुम्ही म्हणताय ते खरंय. पहिल्या ओळीपासूनच मनात जुनी चित्रं आठवायला लागतात आणि त्यात वाचत जाऊ तसतसे अधिक डिटेल्स भरत जातात. आणखीन वीस-तीस वर्षांनी येणार्या पिढीला कदाचित हे लेखन (किंवा बटाट्याची चाळ) वगैरे तितकंसं आपलं वाटणार नाही कारण वर सर्किट यांनी म्हटल्याप्रमाणे हॉस्टेलसारखे जुने अनुभव गाठीशी नसतील.
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
26 Dec 2008 - 5:27 pm | बिपिन कार्यकर्ते
नंदन, काय सुंदर ओळख करून दिली आहेस रे!!! आता पुढच्या भारतवारीत 'डोह' नक्की घेणार. तू एकंदर वाचण्याबद्दल जे काही लिहिलं आहेस ते पण ग्रेटच आहे. मस्त.
बिपिन कार्यकर्ते
26 Dec 2008 - 6:43 pm | यशोधरा
नंदन, नेहमीप्रमाणेच सहज, सुंदर भाषेतला ओघवता लेख.
26 Dec 2008 - 7:16 pm | दत्ता काळे
कोसला, शाळा - हे वैयक्तिक अनुभवाचे वैश्विक अनुभवांतर आहे. पांडुरंग सांगवीकर आपणही असतो आणि तसेच आपल्याही डोळ्यासमोर एखादी शिरोडकर असते.
अश्याच प्रकारचा अनुभव " म्हैस - पु.ल. देशपांडे - वाचतानासुध्दा येतो. कथा आपल्यासमोर घडते आहे असं वाटतं.
26 Dec 2008 - 7:20 pm | चेतन
सुंदर लेख आणि डोह मधले वर्णनही मस्तच्.
त्यामुळे आज एखादं पुस्तक/कविता आपल्याला जशी आवडली तशीच्या तशीच ती आपल्याला दहा वर्षांनी आवडणार नाही. जर आपल्याच आवडीत एवढा फरक पडू शकतो, तर दोन व्यक्तींच्या आवडी जुळणं हे अधिक कठीण.
मला मात्र काही पुस्तक/कविता कधिही तेव्हढ्याच आवडतात. दोन व्यक्तींच्या आवडी जुळणं हे अधिक कठीण हे खरं
डोह नक्की वाचेन
अवांतरः कधी कधी एखाद लेखक आवडत नाही किंवा अजुन काही कारणास्तव बरेचजणं मुद्दामुन फक्त लेखनातल्या चुकाच शोधत बसतात.
चेतन
26 Dec 2008 - 7:43 pm | रामदास
नंदन आभारी आहे.कुणीतरी या पुस्तकांवर लिहावं असं बरेच दिवस वाटत होतं आज अचानक हा लेख समोर आला.लेख आवडला.फार पूर्वी राम पटवर्धनांनी पाडस नावाची कादंबरी लिहीली होती ती आज परत आठवली.श्रीनीवास कुळकर्णी साहेबांचं अक्षरसुद्धा मोत्यासारखं होतं (त्यांच्या लिखाणाला शोभेसं).मौजेत फेर्या मारायचो तेव्हा एक नमुना मिळवला होता.सापडला तर अपलोड करतो.
27 Dec 2008 - 4:24 am | लिखाळ
उत्सुक आहे.
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
27 Dec 2008 - 4:23 am | लिखाळ
मस्त लेख !
डोह हे माझे सुद्धा आवडते पुस्तक आहे. पाठ्यपुस्तकात 'उन्हातले दिवस' ही कथा होती. तेव्हाच कथासंग्रहाचे नाव लक्षात ठेवले होते. नंतर पुस्तक घेऊन वाचले.
फारच सुंदर भाषा आणि वातावरन निर्मिती आहे. त्यातले काही शब्द लक्षात राहण्यासारखेच आहेत.
'पौष पाहटेच्या गारव्याने ओठ फुटायचे..' अश्या सारखी त्यातली वाक्ये मला नेहमीच लक्षात राहिली आहेत.
माझ्या आवडत्या पुस्तकाची अनेक दिवसांनी आठवण झाली. बरे वाटले.
हे मला सुद्धा अतिशय आवडलेले आणि लक्षात राहिलेले...
लेख उत्तम आहे.
-- (जुन्या जन्मीचा वानर)लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
15 Feb 2013 - 7:54 pm | इनिगोय
सुंदर पुस्तकावरच्या सहज लेखावरच्या सुरेख प्रतिक्रिया!
नंदन, तुमचा व्यासंग आणि पुस्तकांबद्दलचा जिव्हाळा.. यांच्यासाठी हा लेख वर काढत आहे. :)
15 Feb 2013 - 8:23 pm | अग्निकोल्हा
हा भाग वाचताना अक्षरशः एखाद्या सार्त्रच्या कादंबरीचा अनुवाद वाचतोय की काय वाटुन गेलं. क्लासिक! इनिगोय अतिशय धन्यवाद धागा वर काढल्याबद्दल.
15 Feb 2013 - 8:48 pm | आशु जोग
प्र ना संत
आणि श्रीनिवास कुलकर्णी दोघे कराडचे का ?
15 Feb 2013 - 9:05 pm | बॅटमॅन
केवळ अप्रतिम लेख. व्यासंग करण्यापेक्षा असे मोती अल्लाद वाचकांसमोर ठेवणे यासाठी पाहिजे नंदनच्या जातीचेच! येरा गबाळाचे काम ते अज्जीच नोहे. :)
16 Feb 2013 - 8:39 am | लई भारी
लंपन वाचून खुळा झालोच होतो! म्हणजे कळायचे नाही की आपल्याला लहानपणी वाटणाऱ्या गोष्टी अगदी जशाच्या तशा कशा काय शब्दबद्ध केल्या आहेत, आणि आजपर्यंत त्या कधीच कुणी शब्दात मांडणे राहू द्या, आपण सुद्धा कुणाला सांगितल्या नव्हत्या :)
लंपनची बेळगाव कडील मराठी तर कानात रुंजी घालत असते! निपाणी-बेळगाव भागात नेहमीच ऐकत आल्यामुळे खूप जवळची वाटते.
डोह वाचताना अगदी असेच विचार आले होते!
(मी लंपन अक्षरशः पुरवून पुरवून वाचतो आहे. तशी उशिराच गाठ पडली, त्यामुळे अजून 'झुंबर' बाकी ठेवलंय :) )
आपल्या लिखाणाबद्दल मी काय बोलू..
अनेक धन्यवाद!
16 Feb 2013 - 10:51 am | पैसा
इतकं सुंदर लिहितोस आणि आता फक्त तेही सणासुदीला? हा आमच्यावर अन्याय आहे!
16 Feb 2013 - 5:48 pm | हारुन शेख
वाह ! काय लिहिलंय . वाचकाशी असा मनस्वी संवाद करणारे लिहू शकणारा विरळा. नंदनसाहेब मी आपला फ्यान झालो हे वाचून.
18 Feb 2013 - 7:07 pm | चतुरंग
'डोहा'त बुडवलेत! :)
-(आनंदाने गुदमरलेला)चतुरंग
25 Nov 2013 - 7:29 pm | यशोधरा
नेहमी का लिहित नाहीस रे नंदन! पुन्हा वाचलं.
26 Nov 2013 - 9:39 pm | बिपिन कार्यकर्ते
+१
हा प्रश्न बर्याच लोकांना लागू आहे.
17 Feb 2014 - 10:26 am | नवनाथ पवार
लेख वाचून लगेच बुकगंगेवरुन 'डोह' मागवत आहे
वाचनखुण साठवून ठेवली
28 Mar 2014 - 7:30 am | मारकुटे
पांच सांत वर्षांपुर्वी जरा बरं लिहून नाव कमवुन नंतर वांझ झालेल्या लेखकांना पाहून गहीवरुन येतं.
28 Mar 2014 - 10:08 am | भाग्यश्री कुलकर्णी
मी डोह वाचले नाही.पण मला पंखा, झुम्बर जाम म्हणजे जाम आवडते.मी प्रकाश संतांच्या लेखनशैलीची खुप चाहती आहे. लंपन आत हलवून जातो लक्ककन.ते वातावरण मलाही खुप जवळचे वाट्ते.कदाचीत ती बेळगावी बोली,ती लाल माती, तो मिलीट्री महादेव मला परत लहानपणीचा गंध देतात.डोह नक्की वाचीन.जुन्या आठवणी जागवल्याबद्दल आभार!
23 May 2015 - 7:46 pm | यशोधरा
एक सुरेख लेख.
मुद्दाम वर काढत आहे.
23 May 2015 - 7:52 pm | चुकलामाकला
वाह! वर आणल्याबद्दल धन्स!
5 Jun 2015 - 12:05 am | लई भारी
सुंदर लिखाण! लंपन बद्दल अगदी असेच वाटते.
गेली ४ वर्षे अक्षरश: पुरवून पुरवून वाचतो आहे. प्रत्येक भाग कितीही वेळा वाचला तरी कंटाळा येत नाही.
सध्या पुणे आकाशवाणीच्या '७९२ कि.हर्ट्झ ए. एम.' वाहिनी वर सकाळी १०:३० वाजता 'लंपन' च्या कथांवर आधारित कार्यक्रम चालू आहे. छान वाटते.
बरेच दिग्गज कलाकार आहेत.
5 Jun 2015 - 12:56 am | विशाल कुलकर्णी
अप्रतिम लेख ! हा लेख वर आणल्याबद्दल शतशः धन्यवाद !
5 Jun 2015 - 6:56 am | पिचकू
सध्या टारगट प्रतिक्रिया देण्याच्या फॅडामुळे तीनचार वर्षांपुर्वी लेखन करणारे सोडून गेलेत.
7 Jul 2016 - 6:41 pm | पुंबा
हा लेख अप्रतीम सुंदर आहे. डोह वाचलीच पाहीजे.
अवांतरः लंपन च्या चारही पुस्तकांतील कथा इतक्या विलक्षण जादूभरल्या असताना सुद्धा कुणालाच अद्यापपर्यंत त्या चित्रपट, मालीका किंवा नाट्यरूपात आणाव्याश्या का वाटल्या नसाव्यात? की ते वातावरण, लंपणचे भावविश्व उभे करणे 'अपने बस की बात नही' हे मान्य केलेय? मुळात लंपनच्या कथांचा जीव मोठा आहे. संतांची शैली अतिशय निर्भेळ आहे. आपल्या डोळ्यासमोर कथा घडत आहे असं वाटावं इतक्या सहजपणे ते कथा फुलवतात. इतकं सारं मटेरीयल असुन्देखील कुणाला मोह होत नाही याचं वैषम्य, कुतुहल वाटतं. कधी संधी मिळेल तर नकीच हे करयला आवडेल.
7 Jul 2016 - 8:29 pm | बोका-ए-आझम
काही कादंबऱ्यांवर चित्रपट बनूच नये. रारंग ढांग, रणांगण अशा नितांतसुंदर कादंबऱ्या चित्रपटाच्या नादात भ्रष्ट होण्याची शक्यता जास्त. लंपनचंही तसंच आहे. चित्रपट म्हटलं की त्यात mass ची, नफा-तोटा, अनुदान वगैरेंची गणितं येतात, तो चालावा म्हणून केलेल्या अपरिहार्य तडजोडी येतात. त्यापेक्षा कादंबरी वाचता वाचता डोळ्यांसमोर visualize करावी आपली आपणच.
8 Jul 2016 - 12:06 pm | पुंबा
खरंय आपलं.. असं काही हे धंदेवाईक निर्माते करायला जातील तर कदाचीत अन्यायच होईल लंपनवर. पैठणीला ठीगळं जोडलेली पहावणार नाहीत असंच वाटतय. गॉडफादर सारखी रसरशीत आणि पुस्तकाइतकीच शानदार असणारी कलक्रुती कधी घडेल मरठीत काय माहीत? :-(
9 Jul 2016 - 6:10 am | कंजूस
सध्या प्रनासंत काय करतात?
9 Jul 2016 - 11:05 am | आदूबाळ
वर गेले आहेत :(
18 Oct 2016 - 1:46 pm | पुंबा
संत कराडचे. आणि मीदेखील कराडला ४ वर्षे शिक्षणासाठी होतो.. त्यांची भेट व्हायला हवी होती असे फार वाटते.. :(
20 Oct 2016 - 11:55 pm | palambar
रेडिओ पुणे आकाशवाणीवर लंपन वर मालिका
प्रसारित झाली होती , छान केली होती बरेच दिवस
झाले, पाच वर्षे झाली असतील.
24 Oct 2016 - 12:14 pm | पुंबा
आता ऐकावयास मिळेल काय? हे आकाशवाणी वाले युट्यूबवर का नसतात काय माहिती?
21 Oct 2016 - 2:40 pm | अलका सुहास जोशी
नंदन……......वाचण्यातली खरी गंमत काय हे कळणे महत्वाचे. गोष्टी ऐकून करमणूक करून घेण्याची यत्ता मागे पडली की खरे वाचन सुरू होते. तुमच्या लेखनातून आणि त्यावरील प्रतिक्रीयांमधून एका बोटीतले समानशील भेटल्याचा आनंद झाला.
लंपन, सुमी, शारदासंगीत, लंपूचे आजीआजोबा, त्याचे “नकादुचेण्यापकासके” हे सगळे काही अवर्णनीय अनुभव देणारे आहे. संतांची पुस्तके बालकांचे भावविश्व उलगडतात हे अर्धसत्य आहे. लंपूच्या संगीतशिक्षिका आणि त्यांची न लिहिलेली भुतकाळातली गोष्ट, लंपनचे विद्वान आजोबा आणि खमकी आज्जी यांच्यामधली केमिस्ट्री असं खुप कायकाय आपल्याला शहाणं करणारं लिहून जातात प्रनासंत, लंपूच्या मागे लपून.
लंपूचं निरागस हळवेपण वाचताना डोळे पाझरायला लागतात. तसं काय, कितीतरी पुस्तके वाचताना रडू येतंच की. पण लंपूबरोबर त्याच्या म्याड गावात हिंडताना, त्याच्या भवतालची माणसे वाचताना, डोळे दु:खभावनेने ओले होत नाहीत. लंपूचा कसा घसा दुखायचा हळवेपणी……तसं कासावीस तगमगायला होतं अगदी. तरीही, हे पुस्तक संपूच नये असंही वाटत रहातं.
चांदणयांचा रस्ता हा संतांच्या अकाली निधनानंतरचा माौज प्रकाशनाने काढलेला लेखसंग्रह. तो वाचूनही दोनेक वर्षे झाली. त्यात त्यांनी आईबद्दल लिहिलेला लेख वाचला आणि इंदिरा संत यांची कविता नव्याने समजलेली.
विशीपंचविशीत वाचलेले काही काही म्हंजे वपु, गाडगीळ, गोखले , वगेेरे आता पुन्हा वाचताना कंटाळा दाटतो. पुंडलिक , मर्ढेकर , आचवल , श्रीविकु, दुर्गाबाई, किणीकर, ग्रेस आणि बरेचजण मात्र ताजेताजे वाटतात………आजही.
बादवे……..चष्मा चिकटल्यावर माझे वाचन आटले आहे. मिपाकरांचा काय अनुभव??