ठहरने को बोला है

स्वीट टॉकर's picture
स्वीट टॉकर in जनातलं, मनातलं
8 Jul 2016 - 5:00 pm

साधारण पंचाऐंशी सालच्या आसपासची गोष्ट. सुट्टी संपवून मी बोटीवर निघालो होतो. बोट हॉन्गकॉन्गला होती. मुंबई विमानतळावर मी चेक-इन करताना माझ्या सामानाचं स्कॅनिंग झाल्यावर मला बाजूला बोलावून घेण्यात आलं. मला हे असं बोलावणं अजिबात नवीन नव्हतं.

माझ्या पाठीला ऐंशी साली दुखापत झाली होती तेव्हांपासून मी रोज काही विशिष्ट व्यायाम करायचो ज्याच्यासाठी दोन्ही घोट्यांभोवती वजनाच्या पिशव्या व्हेल्क्रोच्या पट्ट्यांनी लावायचो. या पिशव्यांमध्ये पोलादाच्या अगदी छोट्या छोट्या शेकडो चकत्या होत्या. दोन तीन मि.मि. व्यासाच्या. या चकत्यांचं सिक्यूरिटीला नेहमीच कुतूहल असायचं. सिक्यूरिटीवाला सहा फूट उंच आणि सहा फूट रुंद जाट होता. मी त्याच्या तुलनेत अर्धा. मी त्या "स्पेशल व्यायामाच्या आहेत" असं सांगितल्यावर तो हसला. ‘उपहासानी’ असं मला तेव्हां वाटलं. पण बहुदा तसं काही नसणार. असो.

“हमे करके दिखाओगे?” असं मला विचारल्यावर मी मानेनीच “नाही” असं दर्शवलं. वजनं दाखवायला बॅग उघडली होती तेव्हां त्यानी माझा युनिफॉर्म आणि हुद्द्याच्या ऍप्लेट्स बघितल्याच होत्या. बहुदा त्यामुळेच जास्त वाद न घालता त्यानी मला सोडलं.

सहप्रवाशांप्रमाणेच डिपार्चर गेटच्या जवळपासच्या खुर्चीवर स्थानापन्न झालो. थोड्या वेळानी माझ्या नावाची घोषणा झाली. “कृपया एअरलाईन स्टाफला भेटावे.” गेटपाशीच एक सुंदरी चार्ट न्याहाळत होती. जाऊन तिला भेटलो. तिनी मला तिथेच ताटकळंत ठेवलं.

मोबाइल फोन्स च्या आधीचा हा काळ. तेव्हां फक्त डुलकी लागलेल्यांच्याच माना खाली असायच्या. बाकी जवळ जवळ प्रत्येक जण नजरेनी चांभारचौकशा करायला मोकळा असायचा. एक सिक्यूरिटीचा मनुष्य आला आणि मला घेऊन गेला. डोळ्यांच्या दोनशे जोड्यांनी आम्हाला जिन्यापर्यंत पोहोचवलं. "मला का बोलावलं आहे?" असं त्याला विचारावं असा मध्यमवर्गीय विचार डोक्यात आला पण प्रयत्नानी जीभ आवरली. बहुदा त्या सहा बाय सहा शिपायानी काहीतरी काडी केली असणार.

त्याचा बॉस म्हणजे एक बाई अधिकारी होत्या. त्यांच्या ऑफिसच्या दारात माझी बॅग होती. प्रश्नोत्तरं झाली. ती वजनं पायाला बांधून काय व्यायाम केले जातात ते मी त्यांना दाखवलं. त्यांनी मला ती वजनं जमिनीवर ठेवून त्यांच्यावर उभं राहायला सांगितलं. मी ते करून दाखवलं. त्यांचं समाधान झाल्यावर आता त्याची एन्ट्री एका अधिकृत रजिस्टरमध्ये करणं जरूर होतं. त्यात “या वस्तूचं नाव काय लिहू?” असं त्यांनी मलाच विचारल्यावर मी म्हटलं, “Weight for Exercise” असं लिहा. “एस्गरसाइज?” असं त्यांनी विचारल्यामुळे माझ्या मनात आलं की बहुदा ‘Exercise’ च्या स्पेलिंगचा त्या राडा करणार. म्हणून मी ‘फिटनेस’ हा शब्द सुचवला. तो त्यांना पसंत पडला आणि माझी सुटका झाली.

परत गेटपाशी आलो. तासाभरानी बोर्डिंगची वेळ आली पण बोर्डिंग काही होईना. पण या उशीराचा आपल्याशी काही संबंध आहे असं मला वाटायचं काहीच कारण नव्हतं. पण संबंध होता. मला पुन्हा बोलावणं आलं. आता मी कोण हे माहीत असल्यामुळे घोषणा देण्याची जरूर नव्हती. सुंदरी जातीने माझ्याकडे आली आणि मला घेऊन एरोड्रोम मॅनेजरच्या ऑफिसकडे निघाली. आता मात्र सगळे दोनशेच्या दोनशे डोळेजोड माझ्यावर आळ घेत होते. कनेक्टिंग फ्लाइट जर का चुकली तर कोण जबाबदार हे त्यांना ठाऊक झालं होतं. पुन्हा कोपर्‍यापर्यंत डोळ्यांची सोबत होती. एकदाचं दृष्टीआड झाल्यावर मला बरं वाटलं.

एरोड्रोम मॅनेजरच्या ऑफिसबाहेर पुन्हा माझी बॅग हजर असणार असा माझा कयास. पण नव्हती. जरा हायसं वाटून मी आत शिरलो. एअरलाइनचा अधिकारी आणि एरोड्रोम मॅनेजर वाद घालत होते.

“मैं नही छोड सकता सर जी!” एरोड्रोम मॅनेजर.

“बॅगके फिटनेसकी बात कर रही है मॅडम। हवाइ जहाजके नही। पॅसेंजर और लगेजको डीप्लेन कर देते हैं। फिर छोड दो फ्लाइटको।” एअरलाइनचा अधिकारी.

मी चरकलो. मला आणि माझ्या सामानाला डीप्लेन करण्याबद्दल चाललंय की काय?

“मगर मेरी जिम्मेदारी है।” एरोड्रोम मॅनेजर.

“जब कुछ रोकनेका होता है तभी जिम्मेदारी होती है आपकी। कुछ करनेका होता है तो जिम्मेदारी नही लेते।” प्रत्येक मतभेदाप्रमाणे याला देखील इतिहास असणार. “लो. ये साहब आ गये।” एअरलाइनचा अधिकारी. हे शेवटचं वाक्य माझ्याकडे बघून.

“इनका क्या है? इनकी बॅग तो क्लियर है। फिटनेस सर्टिफिकेट दिखाओ और ले जाओ अपना हवाई जहाज.” एरोड्रोम मॅनेजर.

मला त्यांच्या बोलण्यात कसलाच संदर्भ लागत नव्हता. माझी बॅग क्लियर आहे असं जरी तो म्हणाला असला तरीपण जे काय चाललं आहे ते आपल्यासाठी चांगलं नाही याची खात्री होती. मात्र ‘फिटनेस’ हा शब्द ऐकल्यावर माझ्या डोक्यात थोडा प्रकाश पडू लागला. प्रत्येक बोटीला तसंच विमानाला सुद्धा पुनःपुन्हा चाचण्यातनं जायला लागतं. बोट seaworthy आहे ना आणि विमान airworthy आहे ना यासाठी विविध चाचण्या असतात आणि त्या सर्टिफिकेटला Certificate of Fitness असं देखील म्हटलं जातं. विमानाच्या फिटनेसची माझ्या फिटनेसशी काहीतरी गफलत झाली असणार असं मला वाटलं. म्हणून मी त्यांना सांगितलं की मी बोटीवर नोकरी करंत असल्यामुळे मला Certificate of Fitness ची काही माहिती आहे. तर काय झालंय ते मला सांगता का?

एरोड्रोम मॅनेजरने माझ्याकडे तुच्छ कटाक्ष टाकून दुर्लक्ष केलं. पण बुडत्याला काडीचा आधार. एअरलाइनच्या अधिकार्याला मिळेल ती मदत पाहिजेच होती. त्यानी मला समस्या सांगितली.

“यहां की जो सिक्यूरिटी-इन-चार्ज मॅडम है उन्होने सिक्यूरिटी रजिस्टरमें रिमार्क लिखा है की "फिटनेस सर्टिफिकेट के लिये रोक लो।" अब सिक्यूरिटीके लोगोंको ‘Certificate of Fitness’ मांगने का कोई हक नही है। मगर एअरपोर्ट मॅनेजर मानते ही नही। मॅडम जब तक घर नही पहुचेंगी तब तक हम उनके साथ संपर्क भी नही कर सकते।”

मी रजिस्टरमधली एन्ट्री वाचली आणि हसायलाच लागलो. त्यांना चूक समजावल्यावर एक मिनिटात प्रश्न सुटला.

काय होती ती एन्ट्री?

Weight for Fitness ऐवजी बाईंनी लिहिलं होतं Wait for Fitness!

कथाkathaaप्रवासलेखअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

गंम्बा's picture

8 Jul 2016 - 5:08 pm | गंम्बा

:-)

रुस्तम's picture

8 Jul 2016 - 5:09 pm | रुस्तम

लै भारी किस्सा

सुबोध खरे's picture

8 Jul 2016 - 6:50 pm | सुबोध खरे

+१

शान्तिप्रिय's picture

8 Jul 2016 - 5:10 pm | शान्तिप्रिय

मस्त साहेब!
अगदी खुसखुषीत!
इंग्रजीच्या तर्कशून्य स्पेलिंग मुळे बसलेला आणखी एक फटका!

नाखु's picture

9 Jul 2016 - 8:46 am | नाखु

मम म्हणतो

बहुगुणी's picture

8 Jul 2016 - 5:10 pm | बहुगुणी

मस्त उत्कंठावर्धक लिखाण.

धनंजय माने's picture

8 Jul 2016 - 5:19 pm | धनंजय माने

मस्त लिहिलंय!
शेवटपर्यंत काय होतंय याबद्दल weight करत वाचलं.

स्पा's picture

8 Jul 2016 - 5:22 pm | स्पा

भारीच किस्सा

सौंदाळा's picture

8 Jul 2016 - 5:28 pm | सौंदाळा

कहर किस्सा.
विमानात तुमच्या शेजारी बसलेला माणुस प्रवास संपेपर्यंत सॉलिड टरकला असेल ;)

जयन्त बा शिम्पि's picture

8 Jul 2016 - 5:37 pm | जयन्त बा शिम्पि

साहेबाचं इंग्रजी , आमच्या कस्ं पचनी पडायचं ? भन्नाट किस्सा ! मज्जा आली वाचून !

हे हे... :)
लिहीलंय पण मस्तच.

पगला गजोधर's picture

8 Jul 2016 - 6:03 pm | पगला गजोधर

१+

जोरदारच पंच बसला...मजा आली!!

राजाभाउ's picture

8 Jul 2016 - 6:20 pm | राजाभाउ

भारीय किस्सा.
बरतबर तुम्ही exercise चं fitness करायला लावल, नाहीतर एरोड्रोम मॅनेजरने त्या अधिकार्याला व्यायाम करायला लावला असता.

अाईशप्पथ! सही किस्सा अाहे!
अगदी सुरूवातीला बाहरिनला जाताना मी येड्यासारखी केबिन बॅगमध्ये भाजणी,कोंथिबीर वडीचे उंडे,मोदक पिठी असं काय काय घेतलं होतं.त्यात मी १५ आॅगस्टला निघालेले.बॅग लाल कलरची!
माझं जे काही सिक्युरिटी चेकींग झालं होतं विचारू नका.निरनिराळी मशिन आणुन आणुन पिठं चेक होत होती.प्रत्येक आॅफिसर मला खाऊन दाखवायला सांगायचा.शेवटी एक बाई आली.तिला म्हंटलं आता इथेच सर्व खाऊ का थोडं नेऊ पण.ती हसायला लागली.आप ऐसे कैसे ये सब भरके लाई.आपकोभी झंझट हमकोभी.येणारे जाणारे माझ्याकडे मी ड्रग्ज घेऊन जात असल्यासारखे लुक देऊन जात होते.मला सिक्युरिटीने एकदाचे जा सांगितले आणि स्टँप द्यायला विसरले. मला तेव्हा पत्ताच नव्हता हे चेक करायचे असते.बोर्डिंगला परत अडवले.मैडम स्टैंप नहीं है आप नही एंटर कर सकते.झालं.मी परत धावत सिक्युरिटीला.परत सगळा ड्रामा.कारण ड्युटी बदलून नवे लोक आलेले.विमान माझ्यासाठी ताटकळलेले.एअरलाइनची बया येरझाऱ्या घालतेय वाॅकीटाॅकी घेऊन.आणि मला तर मेल्याहुन मेल्यासारखे वाटत होते.शेवटी एकदाचं कोणाला तरी दया येऊन, अर्ध्या तासाने विमान लेट करुन स्टँप मिळाला.मी विमानात शिरले तर आख्खे विमान डोकावून माझ्याकडेच बघतेय.मी जे काही तोंड लपवून बसले ते डायरेक्ट विमान उतरल्यावरच उठले!

धनंजय माने's picture

8 Jul 2016 - 6:27 pm | धनंजय माने

असा प्रकार झाला तर!

पियुशा's picture

10 Jul 2016 - 4:47 pm | पियुशा

महालोल किस्सा =))))

माम्लेदारचा पन्खा's picture

8 Jul 2016 - 6:23 pm | माम्लेदारचा पन्खा

तुमची लिहिण्याची हातोटी फार उत्कंठावर्धक आहे !

मोदक's picture

8 Jul 2016 - 6:31 pm | मोदक

+१११

भारी किस्सा..!!

बोका-ए-आझम's picture

8 Jul 2016 - 6:40 pm | बोका-ए-आझम

English is a very funny language हे अर्जुनसिंग वल्द दशरथसिंग वल्द भीमसिंग यांनी सांगितलेल्या महान वचनाची सत्यता पटवून देणारा किस्सा आहे.

मार्मिक गोडसे's picture

8 Jul 2016 - 7:01 pm | मार्मिक गोडसे

मस्त किस्सा

मी-सौरभ's picture

8 Jul 2016 - 7:06 pm | मी-सौरभ

आवडेश

यशोधरा's picture

8 Jul 2016 - 7:18 pm | यशोधरा

मस्त हहपुवा किस्सा!

कविता१९७८'s picture

8 Jul 2016 - 7:29 pm | कविता१९७८

मस्त किस्सा

पिलीयन रायडर's picture

8 Jul 2016 - 8:23 pm | पिलीयन रायडर

=))

संत घोडेकर's picture

8 Jul 2016 - 9:07 pm | संत घोडेकर

छान !

राघवेंद्र's picture

8 Jul 2016 - 9:29 pm | राघवेंद्र

मस्त किस्सा!!

टवाळ कार्टा's picture

8 Jul 2016 - 10:00 pm | टवाळ कार्टा

Lol

चाणक्य's picture

8 Jul 2016 - 10:37 pm | चाणक्य

भारी किस्सा

स्वीट टॉकर's picture

8 Jul 2016 - 10:56 pm | स्वीट टॉकर

सर्वजण,
धन्यवाद!

अजया,
मी जे काही तोंड लपवून बसले ते डायरेक्ट विमान उतरल्यावरच उठले! =))

पिशी अबोली's picture

8 Jul 2016 - 11:07 pm | पिशी अबोली

हा हा. मस्त!

हा हा.. एअरपोर्टच्या आठवणी नंतर मजेशीर वाटतात, पण त्या प्रसंगातून जातानाची धाकधूक ती व्यक्तीच जाणे!

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jul 2016 - 5:43 am | डॉ सुहास म्हात्रे

=)) =)) =))

अनिरुद्ध प्रभू's picture

9 Jul 2016 - 9:11 am | अनिरुद्ध प्रभू

लिहिण्याची शैलीही उत्तम आहे हो...

झेन's picture

9 Jul 2016 - 9:53 am | झेन

:-)

चतुरंग's picture

9 Jul 2016 - 10:27 am | चतुरंग

जबरी किस्सा!! =))

तुमच्या लिखाणाच्या शैलीमुळे एकदम खुसखुशीत बाकरवडी खाल्ल्यासारखं वाटलं...:)

रातराणी's picture

9 Jul 2016 - 12:03 pm | रातराणी

:)

बरखा's picture

9 Jul 2016 - 3:46 pm | बरखा

लेख वाचुन खुप हसले. मस्त लिहलय.

छान किस्सा. लिहण्याची हातोटीपण खुसखुशित.

पाषाणभेद's picture

10 Jul 2016 - 4:39 am | पाषाणभेद

भारीच किस्सा.
ह्या वेट मुळे माझीही एकदा फसगत झालेली होती.

एकदा आर्थिक कारणाच्या केवासीच्या फॉर्मवर त्या बयेने सह्या, घरचा पत्ता, फोन नं. पॅन कार्ड नं, ईमेल आदी घेतले. ती काऊंटरच्या पलीकडे होती अन मी अलीकडे.

फॉर्म मला दिला अन मी तो काऊंटरवरच भरला. नंतर तो भरलेला फॉर्म घेण्यासाठी ती उठली अन मला 'वेट' म्हणाली. मला वाटले की ती आता मला वेट म्हणजे वजन करायला लावणार कारण वजन हा विषय केवासी रीलेटड असू शकतो असे वाटले अन मी मग काउंटरच्या आत जाण्याच्या दरवाजाकडे निघालो. मी म्हटले वजनकाटा कुठाय? तेव्हा ती म्हणाली वेट म्हणजे थांबा.

नशीब त्या वेळी तेथे वर्दळ नव्हती.

स्वीट टॉकर's picture

10 Jul 2016 - 4:45 pm | स्वीट टॉकर

सर्वजण,
धन्यवाद !

पाषाणभेद - " वजन हा विषय केवासी रीलेटड असू शकतो " -:)

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Jul 2016 - 4:54 pm | कैलासवासी सोन्याबापु

कमाल किस्सा आहे स्वीटटॉकर सर!!!

रेवती's picture

10 Jul 2016 - 5:42 pm | रेवती

किस्सा आवडला.

महामाया's picture

10 Jul 2016 - 10:13 pm | महामाया

किस्सा आवडला.

त्या अधिकारी बाई उत्तर भारतीय असतील का?

नठ्यारा's picture

12 Apr 2024 - 6:53 pm | नठ्यारा

स्वीट टॉकर,

किस्सा ऐकायला छान वाटतं पण सहभागींची हालत ब्येक्कार. यावरनं शशिकांत फडणीसांचा किस्सा आठवला. त्यांना प्रयोगशाळेतलं कसलंसं रसायन test करायला सांगितलं. ते त्यांनी taste केलं. तर ते महाप्रचंड गोड लागलं. त्या प्रकारच्या रासायानास सुक्रालोज असं नाव देण्यात आलं. त्यातनं पुढे स्प्लेंडा हे मिष्टकारक ( स्वीटनर ) विकसित केलं गेलं.

अधिक माहिती : https://en.wikipedia.org/wiki/Sucralose#History

-नाठाळ नठ्या