काही दिवसांपुर्वी, बंगळूरात मित्रासमवेत राहत असतांना, एका दिवसभरात कमीत कमी ४ ते ५ अशा लोकांशी बोलणं झालं जे आपापल्या आयुष्यातल्या दु:खाला वैतागलेले होतेत. दोघा जणांनी तर जगण्यात काही राम नाही उरला असा निष्कर्षही काढून टाकला! अशावेळी शांतपणे समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घ्यायचे (व उगाच सांत्वन-प्रोत्साहनपर शब्द, त्यांना आलेल्या अडचणींवर उपाय शोधण्याचा प्रयत्न असले काहीही करायचे नाही !!) हे अनुभवाने आलेले शहाणपण वापरले व Be a Good Listener असाच वागलो! पण रात्री झोपण्याच्या प्रयत्नांत असतांना त्या सर्व गोष्टी परत आठवल्या अन् विचारांचे काहूर माजले. हे म्हणजे आपल्याच झोपेचं खोबरं होतंय असे जाणवलं अन् उठलो. चुपचाप एक टेक्नीकल पुस्तक काढून बसलो वाचायला. अपेक्षेप्रमाणे १५ मिनिटात झापड आली डोळ्यांवर.. मग झोपलो!!
दुसर्या दिवशी सकाळी पेपर उघडला वाचायला. नजर फिरवतांना एक गुन्ह्याची बातमी दिसली. कुणीतरी, एका अगदी लहान मुलीवर.... जीव नुसता कळवळून उठला. म्हटलं अरे काय हे, काय चाललंय काय... जवळपास अर्धातास त्याच मनस्थितीत होतो. पुन्हा आधल्या दिवशीचं संभाषण आठवायला लागलं. वाटलं आता दिवसभर आपले डोके असेच पकणार... शेवटी उठलो अन् हापिसाच्या तयारीला लागलो. मात्र त्या दिवशी रात्रीपर्यंत कसे कुणास ठाऊक डोके जास्त भणाणले नाही. कदाचित कामात गुंतलो असेन. रात्री घरी जेवण झाल्यावर अचानक दिवे गेले. म्हणजे झोप येण्यासाठी वाचायची सुद्धा काही सोय नव्हती! मनाला म्हटले किती वेळ पळणार..चल करूच आता यावर विचार.. चहा केला मोठा कप भरून अन् कप घेऊन गच्चीवर गेलो...
आभाळ मोठं सुंदर दिसत होतं. छान चांदणं पडलेलं. चुकार ढगही होते. मंद हवा सुटली होती. अगदी छान जमून आलेलं प्रसन्न वातावरण! म्हटले मला आत्ता हे अत्यंत प्रसन्न वाटणारं वातावरण कुणा दुसर्याला कितीतरी यातना देत असेल. किती दु:ख असावं आयुष्यात? सतत सर्वत्र फक्त अंधाराचंच साम्राज्य पसरलेलं. किती त्रागा-किती वैताग.. इतका की माणसाने मृत्यु शोधत फिरावे...
तेवढ्यात खाली रस्त्यावरून एक मरतुकडं कुत्रं फिरतांना दिसलं. ते नेहमीच गल्लीत रात्रीच्या वेळेस फिरायचं. त्याच्या अंगावर भयंकर खरूज झालेली होती. अन्न शोधत, काहीतरी हुंगत ते फिरत होतं. विचार आला, या कुत्र्याला मरावंसं वाटत नसेल काय? असं काय होतं, की ज्यासाठी त्यानं जगावं! पण तरीही ते जगत होतं. मग माणसाला का जगावंसं वाटू नये? लक्षांत आलं, प्राण्यांना जगण्यासाठी ध्येय लागत नाही; माणसाला लागतं! बुद्धी हे दुधारी अस्त्र आहे ना माणसाजवळ त्यामुळं एक तरी ध्येय लागतंच. नाहीतर जनावरं अन् माणूस यांत काही फार फरक नाही!
पुन्हा विचार आला, बर्याच जणांना तर ध्येय हवंय हेही माहित नसतं. तरीही ते जगतातच ना? त्यांना सुख-दु:ख नसतं असंही नाही. मग आपला विचार काही पूर्ण नाही! पण याचाच अर्थ असा की अशा लोकांनां (भगवंत न करो)असं हृदय पिळवटणारं दु:ख झालं तर ते मृत्यूचा मार्ग जवळ करू शकतील; नाहीतर एखादं ध्येय/कारण तरी शोधतील जगण्यासाठी... विचारचक्र चाललेलंच...
आता समजा अशा व्यक्तींपैकी कुणी ठरवलं की मी माझ्या मुलासाठी जगेन, कुणी ठरवलं आई-वडीलांसाठी जगेन तर? ते नक्कीच जगू शकतील. (भगवंत न करो)पण हे ध्येयच त्यांच्यापासून दूर गेलं तर? तो आघात तर ते कधीच सहन करू शकणार नाहीत. याचा अर्थ असा की ध्येयही अशाश्वत, नष्ट होणारं नको.
मग असं कोणतं ध्येय असावं की ज्यासाठी माणसानं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही सर्व दु:ख सहन करत जगावं? लगेच काही दिव्य चरित्रं नजरेपुढं आलीत- कमलाताई होस्पेट, बाबा आमटे, कार्व्हर, बेडर, मदर तेरेसा, आबालाल रेहमान.
आपल्या संतांमधेही श्रीज्ञानेश्वर महाराज, श्रीचोखामेळा, श्रीतुकाराम महाराज, श्रीगाडगेबाबा यांना किती दु:खे सोसावी लागलीत... स्वतः येशूंना काय कमी त्रास झाला?
जाणवलं, ही सर्व माणसं एखाद्या अशा ध्येयासाठी जगलीत, जे शाश्वत, कधीही नष्ट न होणारं आहे. त्यांनी ते ध्येय शेवटपर्यंत सोडले नाही. श्रीज्ञानेश्वर महाराजांनी तर समाधी घेतली ती कृतकृत्यतेच्या समाधानात! अवघ्या एकअविसाव्या वर्षी हा महापुरूष कार्य पूर्ण झालं म्हणून समाधिस्थ झाला!
मन पुष्कळच शांतवलेलं होतं. बराचवेळ असा विचार चालू होता. गच्चीवर चकराही चाललेल्या. चहा केव्हा संपला तेही समजलं नव्हतं. खाली परत निघालो तर जिन्यात मला शेवटचा प्रश्न मला पडला, मी कशासाठी जगतोय? :)
शुभम्
प्रतिक्रिया
23 Jan 2009 - 8:39 pm | सुहास..सदेव हसनार्.. (not verified)
बुद्धी हे दुधारी अस्त्र आहे ना माणसाजवळ त्यामुळं एक तरी ध्येय लागतंच. नाहीतर जनावरं अन् माणूस यांत काही फार फरक नाही!
सही....
सुहास
(सध्यातरी मी कशासाठी जगतोयपेक्षा...कुठे जगतोय याचाच जास्त विचार करणारा...)
ब॑गळूरात कुठे आहात(मीही सध्या ईथेच्...E-cityमध्ये)
23 Jan 2009 - 8:40 pm | लिखाळ
चांगले स्फुट !
कुठलीच गोष्ट शाश्वत नाही आणि त्यामुळे शाश्वत असे ध्येय सुद्धा नाही. कितीही महापुरुषांची नावे घेतली तरी 'मातीवर चढणे एक नवा थर अंती' हीच वस्तुस्थिती आहे.
आपण सुखासाठी जगतो. आज दु:ख असेल तर उद्या सुख मिळेल या आशेने दिवस ढकलतो. जीवन संपवावेसे वाटणे हे स्वाभाविक वाटते आणि तसे करणे गैर वाटत नाही.
तरीही पुढे सुख येण्याची शक्यता असल्याने तिकडे डोळे लाउन जगणे हा जुगार फायदासुद्धा मिळवून देतो...
-- लिखाळ.
23 Jan 2009 - 8:51 pm | दशानन
खुपच छान विचार व्यक्त केले आहेस... मनापासून आवडले.
मी शेयर बझार मध्ये लुटला म्हणून आत्महत्या करणारे.... प्रेमासाठी जिव देणारे... काहीच करु शकत नाही ह्या निराशेतून जिव देणारे ह्या तीन कॅटेगिरीतील लोकांना ते जिवंत असताना .... त्याच्या मरनाच्या काही काळ आधी भेटलो आहे.... अक्षरशः त्यांची दुख: अंगावर येत होती त्यावेळी पण जसा जसा काळ गेला तसे तसे कळाले / समजले / उमजले की त्यांनी लास्ट पर्याय निवडावयास नको होता.. शक्यतो अजून एक चान्स मिळाला असताच त्यांना.. ! पण काय होतं की आपण त्यांना विचार व्यक्त करुच देत नाही व फक्त हे करु नकोस ते करु नकोस हेच सांगतो..... काही महिन्यापुर्वीच माझा एक जानकार त्याने आत्महत्या केली ! शेयर मार्केट मध्ये नको एवढं नुकसान खालं.. पण त्याच्या चेह-यावरील हसू कधीच संपल नाही मला वाटलं पण नव्हतं की तो आत्महत्या करेल.. पण त्यांने जे पत्र शेवटी लिहले होते ते वाचल्यावर असं वाटलं की तो मेलेचाच बरा.. !
एकच सांगतो... कृष्ण करे तो रास लिला , हम करे तो पाप !
त्याच भाषेत .... संतांनी घेतला जिव तर ती समाधी, आम्ही दिला तर आत्मघात !
प्रत्येकाच्या नजरेतून जग वेगळचं !
हेच खरं !
23 Jan 2009 - 8:56 pm | लिखाळ
जीवनात करण्यासारखे काही राहिले नाही असे वाटल्याने जीव देणे, दु:ख सोसत नाही म्हणुन जीव देणे, संकटांना सामोरे जाणे शक्य उरले नाही म्हणून आत्महत्या करणे आणि सुखाचा शोध लागला आहे असे जाणून त्यातच राहण्याचा प्रयत्न करताना प्राण त्यागणे या प्रत्येक कृतीत फर आहे असे मला वाटते.
देह त्याग हे समान सूत्र असले तरी प्रत्येक क्रियेत हेतू आणि परिणाम वेगळे आसावेत.
-- लिखाळ.
23 Jan 2009 - 9:52 pm | दशानन
फरक कोण व्यक्त करनार ?
त्यांना सुखाचाच शोध लागला आहे हे कोण ठरवणार....
वर ज्याचा उल्लेख केला आहे त्यांन आपल्या शेवटच्या चिठी मध्ये हेच लिहलं होतं " मी जगताना खुप दुखः सोसलं पण मरताना मला अत्यंत सुख लाभत आहे"
24 Jan 2009 - 9:13 pm | राघव
संतांनी घेतला जिव तर ती समाधी, आम्ही दिला तर आत्मघात !
खरं आहे तुमचं म्हणणं.
कारण संतांना अगदी लहानपणापासून त्यांचं जीवन प्रयोजन माहित असतं. त्यासाठीच ते जगत असतात. त्यांचं कोणतंही कार्य स्वार्थप्रेरीत नसतं. कारण स्वार्थ त्यागल्याशिवाय संत होऊच शकत नाही. सामान्य माणसांना सुख-दु:खाला तोंड देताना नाकी नऊ येतात. पण संतांच्याच म्हणण्यानुसार, संत "ही सर्व ईश्वरेच्छा" असं जाणून त्यात अलिप्त असतात. ते प्रपंचात दिसतात, पण त्यात नसतात. अगदी जरूरीपुरता प्रपंच करून ते त्यांच्या मूळ जीवनप्रयोजनात गुंतलेले असतात. मूळ मनोभूमिका, चित्तवृत्ती वेगळी असल्यामुळे असं घडतं. जसं आंब्याची कोय कितीही निपटली तरी त्यात थोडा तरी आंब्याचा मूळ रस शिल्लक राहतो, पण चिकूची बी अलिप्त असते.. मूळ फळाची प्रकृती वेगळी असल्यामुळे असं घडतं.
मुमुक्षु
23 Jan 2009 - 8:54 pm | अनामिक
छान आणि विचार करायला लावणारा लेख!
आपण जगतोय कारण आपल्या कुणालाच मरण नको असते म्हणून. 'ध्येय' हे तुमच्या लेखात उल्लेख झालेल्या (आणि तशाच) काही असामान्य व्यक्तींकडेच असु शकतं. नाहीतर आपण आणि आपले ध्येय म्हणजे आपल्यापुरतेच मर्यादित असतात. माझं घर, माझे आई-बाबा, माझी बायको-मुलं, भावंड यांच्यापुढे आपले ध्येय जातच नाही. आपल्यातला "मी" जपण्यातच आपलं आयुष्य जातं. खरं तर आपल्यात आणि जनावरात काहीच फरक नाही... पण तुम्ही म्हणता ते अगदी पटतं..."बुद्धी हे दुधारी अस्त्र आहे ना माणसाजवळ त्यामुळं एक तरी ध्येय लागतंच..." आणि खेदाची बाब म्हणजे आपलं ध्येय हे आपणच आहोत... आणि तेवढंच आपल्याला जगण्यासाठी पुरेसं असतं (हे माझं मत).
अनामिक
23 Jan 2009 - 9:53 pm | मनीषा
अगदी खरं आहे ..
विचार करायला लावणारा लेख आहे .
जगण्यासाठी प्रयोजन असणे फार मोठी गोष्ट आहे ... प्रत्येक सामान्याजवळ ते असतच असं नाही .
मला वाटतं आपल्याला जे मिळालं आहे त्याचा स्विकार करणे हेच 'कारण' जगण्यासाठी पुरेसं आहे .
आणि जे आपण देउ शकत नाही, निर्माण करु शकत नाही ... ते संपवण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाही ...
23 Jan 2009 - 10:13 pm | दशानन
>>ते संपवण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाही ...
सहमत.
पण तो अधिकार आहे का नाही हे ठरवणार कोन ?
आपल्या पिनल कोड नुसार आत्महत्या पाप आहे व सजा होऊ शकते... पण केव्हा ? जर तो मेला नाही तर ! मेला तर ? सुखी ! नाही मेला तर ? जेल मध्ये .. दुखी !
23 Jan 2009 - 10:54 pm | अवलिया
अंमळ विचारात पडायला लावणारा विचार
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
24 Jan 2009 - 10:51 pm | सहज
मुमुक्षु स्फुट आवडले.
सारे संत महात्मे तत्वज्ञानवाले तुम्ही उल्लेख केलेल्या जगण्या-मरण्याला शब्दात बांधायचा खेळ करुन गेले, करत आहेत व करतील.
म्हणुन आज जगात जगताना फार भव्य दिव्य करायची गरज नाही आहे. तर माणस जितकी जोडता येतील तितकी जोडणे, यथाशक्ति यथामती दुसर्याला मदत बस्स. बाकी जे होईल ते होईल. जगात ज्ञान कमी नाही पण तरीही दु:ख, वाईट काम होतेच. तसेच चांगली कामे देखील होतात. जगात होणार्या चांगल्या कामात साथ द्यायची. बस झाले!!
तसेच आचार, आहार व विचार आपल्या तब्येतीला झेपेल इतकाच करायचा. :-)
24 Jan 2009 - 11:31 pm | प्रभाकर पेठकर
(विचार) मंथन, विवेचन, स्फुट जे काही आहे ते छान आहे.
प्रत्येकाचे जगण्याचे ध्येय वेगळे. 'काही ध्येय नसणे' हा त्यातही अजून वेगळेपणा.
इहलोकीची यात्रा मस्तीत जगणे, सर्व ऐहिक सुखांचा उपभोग घेणे, आपली कर्तव्ये पार पाडणे हेही एखाद्याचे ध्येय असू शकते.
समाज सेवेत, समाज प्रबोधनात, समाजोन्नतीत आयुष्य व्यतित करणे काहींना जमते, सर्वांनाच नाही. पण म्हणून त्यांच्या आयुष्याला उदात्त ध्येयच नाही आणि म्हणून त्यांचे जीणे व्यर्थच आहे असा अर्थ नाही.
पर दु:ख शीतलम् अशी उक्ती आहे. पण दु:खात, संकटात, आपत्तीत कमजोर मनं ढासळतात. पण कुठल्याही प्रकारच्या दु:खाचा, संकटांचा सामना करणं, स्वतःला सावरणं, त्यातून बाहेर पडणं ह्या साठी आवश्यक असे मनोबल मिळवणं हे जास्त महत्त्वाचे. तसे प्रयत्न असावेत. ह्या साठी फक्त 'स्वतः' भोवती फिरणार्या विचारांची व्याप्ती वाढवून त्यात इतरांनाही स्थान देवून त्यांचाची विचार करावा. स्वतःची दु:खं कमी होतात निदान त्यांची तीव्रता तरी कमी होते. ह्यालाच कदाचित परमार्थही म्हणत असावेत.
27 Jan 2009 - 1:38 pm | राघव
प्रत्येकाचे जगण्याचे ध्येय वेगळे. 'काही ध्येय नसणे' हा त्यातही अजून वेगळेपणा.
खरंय!
इहलोकीची यात्रा मस्तीत जगणे, सर्व ऐहिक सुखांचा उपभोग घेणे, आपली कर्तव्ये पार पाडणे हेही एखाद्याचे ध्येय असू शकते.
समाज सेवेत, समाज प्रबोधनात, समाजोन्नतीत आयुष्य व्यतित करणे काहींना जमते, सर्वांनाच नाही. पण म्हणून त्यांच्या आयुष्याला उदात्त ध्येयच नाही आणि म्हणून त्यांचे जीणे व्यर्थच आहे असा अर्थ नाही.
आयुष्य व्यर्थ आहे असे ज्या लोकांना वाटते तेच आत्मघात करतात. प्रत्येकासाठी निश्चित असे ध्येय तर असतेच. फक्त आपले आपण ओळखले म्हणजे झाले. :)
पर दु:ख शीतलम् अशी उक्ती आहे. पण दु:खात, संकटात, आपत्तीत कमजोर मनं ढासळतात. पण कुठल्याही प्रकारच्या दु:खाचा, संकटांचा सामना करणं, स्वतःला सावरणं, त्यातून बाहेर पडणं ह्या साठी आवश्यक असे मनोबल मिळवणं हे जास्त महत्त्वाचे. तसे प्रयत्न असावेत. ह्या साठी फक्त 'स्वतः' भोवती फिरणार्या विचारांची व्याप्ती वाढवून त्यात इतरांनाही स्थान देवून त्यांचाची विचार करावा. स्वतःची दु:खं कमी होतात निदान त्यांची तीव्रता तरी कमी होते.
ज्यांची मनं कमजोर आहेत त्यांना अशा अवस्थेत भगवंताची आठवणसुद्धा तारून नेते. म्हणूनच ईश्वर आहे किंवा नाही हे माहीत नसतांना सुद्धा लोकं ईश्वराला तो "आहे" अशा श्रद्धेने भजतात. ज्याचा त्याचा मार्ग वेगळाच. नाही?
ह्यालाच कदाचित परमार्थही म्हणत असावेत.
याबद्दल मतभेद राहतीलच. कारण परमार्थ समजण्यासाठी आधी तो करावा लागतो. अन् समजण्या अगोदर करण्याची बुद्धी होण्यासाठी भगवंताची कृपा लागते!! आम्हीसुद्धा अजुन त्याच प्रतिक्षेत आहोत. :)
मुमुक्षु
24 Jan 2009 - 11:37 pm | प्राजु
लेख नीट वाचला.. आणि समजला सुद्धा!
खूपच छान.
आवांतर : जाता जाता मला हा प्रश्न दिलात तुम्ही आता.. मी कशासाठी जगते आहे?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
26 Jan 2009 - 12:44 am | विसोबा खेचर
सुंदर लिहिलं आहे!
(मुमुक्षुरावांचा फ्यॅन) तात्या.