माझी नवी मैत्रेण

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
23 Jan 2008 - 12:02 am

गजर झाला आणि झोपमोड झाली. मस्त गुबगुबित बिछान्यात रज‌ईत गुरफटलेला देह बाहेर पडायला राजी नव्हता. पाठोपाठ दूरध्वनी किणकीणू लागला आणि उठणे भाग पडले. दहाचे उड्डाण म्हणजे न‌ऊला हजेरी, म्हणजे साधारण आठला बाहेर पडणे आले. म्हणजे सातला उठलेले बरे. जरा आळसावायचे, एक चहा, जरा टंगळमंगळ, पुन्हा चहा, मग दाढी, तुषारस्नान, मग सामानाचा ताळेबंद एवढे सगळे जमवयला तास तरी हवाच. आठ दिवसाच्या दौर्‍यात पाच गावे पालथी घालायची तर ’विंचवाचे बिर्‍हाड पाठीवर’ अशी स्थिती. रोज नवे गाव, नवे हॉटेल, रोज सामान उघडा आणि दुसर्‍या दिवशी पुन्हा बांधा. चालायचेच! हँगज्झौ सारखे देखणे गाव वेस्ट लेक वर न जाता सोडणे अगदी जीवावर आले होते, पण ना‌ईलाज होता.

मारे आवरून आटोपून नाश्ता करून हॉटेल मधून सामानसह बाहेर पडलो आणि विमानतळाच्या दिशेने निघालो मात्र... सकाळी उठल्यावर ज्याचे कौतुक केले ते धुके आता प्रश्नचिन्ह हो‌उन उभे ठाकलेले दिसत होते. रस्त्यात पन्नास फुटांपलिकडचे दिसत नव्हते तर उड्डाण रखडणार हे न दिसणार्‍या सूर्या‌इतके स्पष्ट होते. मात्र तिथे जा‌ऊन ठाकलेले बरे, उशीर असला तर काढु वेळ असे म्हणत असतानाच हस्तसंच वाजला. हुंगयान होती, धुक्यामुळे तिला वनज्झौ ला पोचायला उशीर होणार होता, कदाचित संपूर्ण दिवस रखडून ती संध्याकाळी उशीराने मला भेटणार होती. मात्र काम अडणार नाही असा दिलासा देत तिने वनज्झौ विमानतळावर मला आणायला अमिशी येत असून तिला इंग्रजी येते असा दिलासा दिला. अंदाजा प्रमाणे तीन तासाच्या विलंबाने अखेर एकच्या सुमारास उड्डाण भरले आणि दोन वाजता वनज्झौला दाखल झालो. विमानत़ळावर अमिशी माझ्या नावाची पताका घे‌ऊन हजर होती, त्यामुळे तिला ओळखायला अडचण पडली नाही. बरोबर हु महाशय होते, ज्या आस्थापनेला भेट द्यायची होती तिचे संचालक.

आधीच उशीर झाला आहे, आता जेवण-खाणात वेळ न घालवता थेट कार्यालय गाठू असे मी सांगत असाताना देखिल मंडळी एका भोजनगृहात घे‌उन गेली. म्हणजे आता दिड तास गेला. मला कामची चिंता होती कारण तो एकच दिवस हातात होता. अमिशी फारच मोकळी आणि गप्पिष्ट निघाली. एकमेकाची, कामाची माहिती देता घेता जेवण संपले आणि आम्ही कचेरीकडे निघालो. चीनी मुलींच्या मानाने मोठे डोळे असलेली, सोनेरी बटा कपाळावर भुरभुरणारी आणि बोलता बोलता मधेच मान वेळावायची लकब असलेली अमिशी खूप दिवसांच्या ओळखीची असल्यागत बोलत होती. कचेरीत छा घे‌उन कामाल सुरूवात झाली. अमिशी उत्साहाने त्यांच्या आस्थापनेची, उत्पादनांची माहिती देत होती. हु महाशयाना चीनी भाषेव्यतिरिक्त इतर भाषा येत नसल्याने आमच्या दरम्यान दुभाषाचे कामही तीच बजावत होती. बराच वेळ चर्चा व कमकाज झाल्यावर जरा विरंगुळा म्हणुन अंग ताणत बाहेर दाराशी आलो आणि मस्तपैकी हुंगमे‌ई वांग शिलगावली. दाराबाहेर ये‌ऊन धूर सोडतोय तोच दारात काळी मोटार ये‌उन थांबली आणि दरवाजा उघडला व ती बाहेर आली. तिचे लक्ष माझ्याकडे गेले. हा कामानिमित्त आलेला कुणी परदेशी असावा असा अंदाज बांधत तिने एक झकास स्मित दिले आणि मी नि हाव म्हणायच्या आत ती दारातुन आत शिरली.
पाठोपाठ मीही धुम्रपान आवरते घेत बडिशेपेची चिमुट तोंडात टाकली व आत बैठकिच्या खोलीत आलो. माझ्या अंदाजा प्रमाणेच ती तिथेच होती. मला पाहुन काहीशी लाजत ती पटकन मागे वळली आणि उगाच कपाटातल्या वस्तू काढु लागली. अमिशीने आतापर्यंतची टिपणे वाचुन दाखवायला सुरुवात केली. मी ही सगळे मुद्दे ऐकत होतो, म्हणजे तसे दाखवत होतो पण माझे लक्ष अमिशीच्या बोलण्यापेक्षा तिच्याकडे अधिक होते. थोडा वेळ आडुन आडुन बघत आणि नजरा नजर झाल्यावर गोड हसत ती अजिबात न बोलता वावरत होती. गोरीपान नितळ कांती, विलक्षण बोलके डोळे, धनुष्याकृती भिवया, आखूड केसांच्या चीनी पद्धतिच्या बटवेण्या मागे बांधलेल्या, खालचा ओठ मधेच दाताखाली दाबत भिरभिरत्या नजरेने बघणारी ती मुलगी मला एकदम मंत्रमुग्ध करुन गेली. ते ओळखुन अमिशीने तिला हाक मारली आणि आमची ओळख करुन दिली. ती हु महाशयांची मुलगी होती, तिलाही फक्त चीनीच येत असावी. न पेक्षा ती माझ्याशी बोलली असती. मग मी हात पुढे करून तिच्याची हस्तांदोलन करीत विचारले नि शम्मा मिंग ज्ज? प्रथमच थेट माझ्या डोळ्यात बघत ती लाजत म्हणाली ’चा‌ई येन’. मग तिच्या लक्षात आले की अजुनही तिचा हात माझ्याच हातात होता. लगबगीने तो मागे घेत शेजारच्या खुर्चीत बसली.

मैत्रीला भाषा नसते म्हणतात त्याचा प्रत्यय आला. आमचा संवाद भाषेची अडचण न येता साधत होता. काम संपले. एव्हाना सात वाजायला आले होते. काळोख पडला होता. अमिशीने जेवायला जा‌उया असा आग्रह धरला. तुम्हाला उशीर होतोय, ही तुमची जेवायचीच वेळ आहे, तुम्ही मला हॉटेल वर सोडा. तशीही हुंगयान अजुनही पोचलेली नाही, तिला वेळ आहे असा निरोप आहे तर मग ती आल्यावर आम्ही जेवु असे मी सुचवले. चाई येन् हळूच् अमिशीच्या कानाशी लागत् काहीतरी बोलली आणि मग माझ्याकडे पाहत तीने अमिशीला हलकेच धपाटा घातला. हसत हसत अमिशी म्हणाली, बघ तुझी मैत्रिण् इतका आग्रह करत्ये तर चल की जेवायला. आपण निघुन जेवायला जाणार, उपाहार गृहात पदार्थ मागवणारे मग ते येणार तो पर्यत हुंगयानही पोचेलच. अमिशीचे बोलणे संपताच चाई येन् पुढे आली आणि मला घेउन बाहेर निघाली. हा आग्रह मोडणे शक्यच नव्हते. बाहेर आम्ही सगळे जण येण्याची वाट पाहत उभे असताना चाई येन् हलक्या आवाजात गुणगुणत असल्याचे जाणवले. माझ्या ते लक्षात आले आहे आणि मी ऐकत आहे हे समजताच चाइ य़ेन् लाजली आणि मान् खाली घालुन उभी राहीली. अरे वा, सुरेख् गातेस् की तू! थांबलीस का? आमच्या भावनांना शब्दाचे बंधन नव्हते. भाषा भिन्न असुनही जणु तिला ते समजले. तिने खुणेने तुही म्हण असे सुचवले. काहीही बोलले तरी चाई येन् गोड हसायची आणि मग् स्वत्:शीच् लाजायची. अमिशी व हु कागदपत्रे आवरून व कचेरी बंद करायला सांगुन् बाहेर आली. गाडी कडे जाताच् पटकन पुढे होत चाई येन् ने मागचा दरवाजा उघडला व हाताने मला आत बसण्याची खूण केली अर्थातच एक गोड स्मित चेहऱ्यावर खेळवतच. मी आत शिरताच तीही शेजारी बसली.

आम्ही लवकरच एका भल्या मोठ्या प्रशस्त अशा उपहारगृहात पोचलो. दालनात शिरताच चाई येन् ने माझ्या शेजारची खुर्ची धरली आणि माझ्या खांद्यावरचा संगणक थैला त्या खुर्चीवर ठेवत मला हाताला धरुन पलिकडच्या दालनात घेउन गेली. माझ्या चेहर्‍यावरचे ’कुठे नेते आहेस’ हे भाव अचूक् ओळखत आपली नाजूक निमुळती बोटे ओठाकडे नेत ’पदार्थ दाखविण्यासाठी नेत आहे’ असे तिने सुचविले. बरोबरच होते ते; चीन मध्ये प्रत्येक मोठ्या उपहारगृहात सामिष-निरामिष सर्व पदार्थ व भाज्या, फळे तसेच मासे, खेकडे, झिंगे वगैरे जलचर जीव् काचेच्या पेट्यांमध्ये तर भाज्या व फळे वर रक्षक पापुद्रा लावुन हारीने मांडून ठेवलेली असतात; आपल्याला जे हवे ते निवडाचे व सेवक वर्ग ते शिजवुन आणतो. मी पटकन् मत्स्यपर्व ओलांडुन तिला घेउन भाज्या ठेवलेल्या भागात् घेउन आलो व सांगितले - ’वो शुथ्साय्’ मेइयो रो, मेइयो ची, मेइयो चितान्..(मी शाकाहारी आहे, मला मांस, मासे, अंडी नकोत्). ओठाचा चंबू करीत ती ओ असे म्हणाली व माझ्या साठी फळे, मिठाया वगैरे निवडु लागली. आता अमिशी आमच्या पठोपाठ येउन मागे उभी राहीली व लटक्या रागाने मला म्हणाली, ’नवी मैत्रीण् फारच आवडलेली दिसते, तिच्या सहवासात् मला देखिल विसरलास’. मग ती काय् म्हणते आहे ते चाई येन् ने तिला विचारले. आम्ही मेजावर स्थानापन्न झालो. जेवण् येताच् अमिशीने माझ्या साठी ’ताओ-च्छा’म्हणजे काटा चमचा मागवला, मात्र चाइ येन् ला ते आवडले नाही. तिने मला बांबूच्या काड्या घेउन खायची खूण केली. मी खुणेने ’जमत नाही’ असे सांगताच ती लटक्या रागाने पाहत खुर्चीतुन उठली आणि माझ्या शेजारी येउन उभी राहीली व तीने आपल्या हाताने मला काड्या धरयला शिकवल्या. मी एक शेंगदाणा टिपताच तिने उजवा अंगठा उंचावून दाखवला. पदार्थ येत होते. अमिशी, हु मला पदार्थ सांगत् होते. एका बशीत आक्रोडसारखी पण कमी कठीण अशी कवचीफळे आली. त्याला इंग्रजीत काय् म्हणतात ते कुणालाच माहित नव्हते. त्याला चीनी मध्ये ’ह्ख् त्थाव’ असे म्हणतात. मग् चाई येन् ने मला उच्चार शिकवला. आता मला येत नसलेले शब्द उच्चारुन् घेणे तिला फारच् आवड्ले, माझे चुकिचे उच्चार ऐकताना खळाळुन हसत ती माझ्या कडुन योग्य उच्चार करुन घेत होती. काकडीला जेव्हा मी ’क्वांगव्हा’ असे लयीत म्हणुन दाखवले तेव्हा ती खुष झाली.

दिवसभर धुक्यामुळे वाहतुकीत अडकलेली हुंगयान आता तिथे दाखल् झाली. तिचे जेवण् मागवे पर्यत मग् मी आणि चाई येन आपापल्या भाषेत गाण्यांच्या ओळी गुणगुणत होतो. मी कॅमेरा काढला व तिची छबी अनेक प्रकारे टिपली. जेवण संपले. निघायची वेळ झाली. खरे तर पाय निघत नव्हता पण जायला तर हवे होते. दुसर्‍या दिवशी सकाळी तीन तास प्रवास करुन तायज्झौ गाठाचे होते. निरोपाची वेळ् आली. मी चाई येन् चे हात् हातात घेत झाय चियेन (पुन्हा भेटुया) म्हणालो खरा पण नक्की कधी भेटणार् असा प्रश्न दोघांच्याही चेह्ऱ्यावर होता. काय गंमत् आहे! काही तासांच्या ओळखीत आमची गाढ मैत्री झाली होती, अगदी अनेक वर्षे एकमेकाला ओळखत असल्यासारखी. मी कॅमेरा अमिशीच्या हातात दिला व तिला आमचे दोघांचे चित्र टिपण्यास सांगितले. मी आणि चाई येन् शेजारी शेजरी उभे राहिलो. ’जरा हसरे चेहरे करा’ असे सांगत अमिशीने किरण साधला व ती कळ दाबणार इतक्यात मी तिला थांबवले. चाई येन् ने प्रश्नार्थक चेहर्‍याने माझ्याकडे बघीतले.

मी तिला पटकन उचलुन घेतली व त्याच क्षणी अमिशीने आम्हाले टिपले.

हे ठिकाणजीवनमानसद्भावनाअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

ऋषिकेश's picture

23 Jan 2008 - 12:36 am | ऋषिकेश

फार छान!
आम्हाला बॉ शेवटपर्यंट चाई येन् मोठी वाटली होती.. हा हा ! एकदम गंडलो.. मजा आली . बाकी छान वर्णन व त्या निमित्ताने येणारे स्थळ डोळ्यापुढे फोटोशिवाय उभे राहिले.

अवांतरः ह्या चित्रा मागच्या टेबलवर सगळे झाकून ठेवले आहे. तिथे अशीच पद्धत आहे की फोटोपुरतं?

बाकी लेखनशैली (नेहमीप्रमाणे) ग्रेटच :)

-ऋषिकेश

सर्वसाक्षी's picture

23 Jan 2008 - 4:44 pm | सर्वसाक्षी

धन्यवाद ॠषिकेश,

मागची झाक्-पाक अशासाठी की ज्या मेजावर लोक बसतील त्यावेळीच आच्छादन काढाचे. आणखी एक चांगला प्रकार म्हणजे जर आपण खुर्चीवर काही सामान वा कोट वगैरे ठेवले तर ताबडतोब त्या वस्तू सकट खूर्चीला एक गडद कापडाची खोळ आणून घालतात ज्यायोगे वस्तू काही सांडून खराब होत नाही व वेगळ्या रंगाच्या फुगीर आच्छादनमुळे आपली वस्तू घ्यायचे लक्षात राहते.

खरेतर अशा मोठ्या दालनात अनेक मेजांची रचना करण्यापेक्षा बर्‍याच चांगल्या उपाहारगृहांमध्ये गोल मेज, वर सरकती तबकडी, शीतकपाट, दूरचित्रवाणीसंच यानी सुसज्ज अशा अनेक स्वतंत्र खोल्या असतात. अगदी ५-६ ते १२-१५ पर्यंत माणसे बसू शकतील अशा आकाराच्या खोल्या असतात व प्रत्येक खोलीतच लगतचे प्रसाधनगृह देखिल असते. मात्र खाद्य्पदार्थ प्रदर्शित करण्याची पद्धत फारच आकर्षक असते. मत्स्य व जलचर प्रेमींना तर पर्वणी असते, सांगाल तो जीव पेटीतून फर्माईश करणार्‍याच्या देखत जीवंत काढुन नेला जातो व हवा तसा बनविला जातो.

ऋषिकेश's picture

23 Jan 2008 - 7:30 pm | ऋषिकेश

मत्स्य व जलचर प्रेमींना तर पर्वणी असते, सांगाल तो जीव पेटीतून फर्माईश करणार्‍याच्या देखत जीवंत काढुन नेला जातो व हवा तसा बनविला जातो.
हे वाचून विषेश आनंद जाहला :).. माहितीबद्दल आभार

प्रकाश घाटपांडे's picture

23 Jan 2008 - 5:51 pm | प्रकाश घाटपांडे

लई भारी हाये. चीन म्हनल आमच्या डोळ्यासामनी हे
फेंगशुईच म्हनजे काय? अस येत पघा. आन त्या गल्लासात काय हाय? पानिय कि काय समजाना? प्रकाश घाटपांडे

सुनील's picture

23 Jan 2008 - 12:47 am | सुनील

एकदम ऍन्टी-क्लायमॅक्स!!!

मैत्रीण म्हटल्यावर उत्सुकता अधिकच चाळवली आणि निघाली ती ही गोड, निरागस मैत्रीण!

लेख उत्तम! असेच चीन भेटीवर अजून लिखाण येऊदेत!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

धनंजय's picture

23 Jan 2008 - 1:10 am | धनंजय

अपेक्षाभंग इतका आवडावा असे क्वचितच होते :-)

नंदन's picture

23 Jan 2008 - 10:04 am | नंदन

म्हणतो. लेख आवडला.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

सहज's picture

23 Jan 2008 - 7:56 am | सहज

मैत्रीण कोण असेल याचा अंदाज आला होता पण तरी देखील वाचायला छान मजा आली.

मागे तुमचा "चहा व चहाचे चषक" विषयी लेख वाचल्याचे स्मरते. तुमच्या प्रवासविषयक लेखांची एक चांगला संग्रह होऊ शकेल.

कृपया अजुन लिहावे.

विसोबा खेचर's picture

23 Jan 2008 - 8:19 am | विसोबा खेचर

साक्षिदेवा,

शेवट क्लासच केला आहेस, मजा आली! :)

आणि निघाली ती ही गोड, निरागस मैत्रीण!

सुनीलरावांसारखं मीही हेच म्हणतो! सुंदर, दिलखुलास लेख!

साक्षिदेवा, तू आता ठाणेकर राहिला नसून बराचसा चिनीच झाला आहेस! :)

असो, मिसळपाववर तुझं मनापासून स्वागत. पुढच्या लेखांची वाट पाहात आहे...

आपला,
(गाववाला) तात्या.

प्राजु's picture

23 Jan 2008 - 8:30 am | प्राजु

हे म्हणजे... एकदम सिक्सरच मारलात...

मस्त लेख. फसले मी...
बाकी मैत्रिण एकदम गोड आहे...

- प्राजु

आजानुकर्ण's picture

23 Jan 2008 - 10:18 am | आजानुकर्ण

मस्त लिहिले आहे. :) लेख खूप आवडला

(आनंदित) आजानुकर्ण

आनंदयात्री's picture

23 Jan 2008 - 10:44 am | आनंदयात्री

म्हणतो. बर्‍याच दिवसांनी तुमचा लेख आला, आवडला.

स्वाती दिनेश's picture

23 Jan 2008 - 12:25 pm | स्वाती दिनेश

मस्त !
खूप दिवसांनी चिनी लेख लिहिलात, तुमची मैत्रिण फार आवडली,:)
स्वाती

विसुनाना's picture

23 Jan 2008 - 2:04 pm | विसुनाना

सर्वसाक्षीजी, हा ललितलेख खूप आवडला. अगदी सफाईदार झाला आहे.

केशवसुमार's picture

24 Jan 2008 - 4:38 pm | केशवसुमार

साक्षीशेठ,
उत्तम लेख.. मधे मधे येणारे चीनी शब्द/नावे जरा मनातल्या मनात उच्चारुन वाचायला त्रास झाला पण झकास लेख..
बरेच दिवसांनी आपले लिखाण वाचायला मिळाल्याचा आनंद झाला. मध्यंतरी एकदमच जालावरून गायब होता..
बाकी ते मालक वर्गाबद्दल एकदम सहमत..( आम्ही जुमानत नाही ते सोडा)
पुढचे लेख लवकर लवकर येऊदेत..
केशवसुमार

सर्वसाक्षी's picture

23 Jan 2008 - 4:54 pm | सर्वसाक्षी

धकाधकीच्या आयुष्यात असे विरंगुळ्याचे क्षणही येतात. आपल्याला आवडले हे वाचून बरे वाटले, धन्यवाद.

या कथेचा प्रयोग घरी परत येताच प्रथम पत्नीवर व मग एकदा सासुरवाडी गेलो असता केला होता. सुरुवातीचे मैत्रीण प्रकरण ऐकताच सौ. च्या मामांनी ताबडतोब तिला हाक मारुन विचारले की या मैत्रीणी वगैरे तुला कशा चालतात? मग आम्ही दोघे खो खो हसू लागलो व सौ. ने मामांना चाई येनचे वय सांगताच मामा समजून चुकले की भाची व भाचे जावई यांना आपल्याला 'मामा' बनविले आहे:))

हा लेख आमचे परमस्नेही व मिसळपंथी मा. तात्यामहाराज यांचे आग्रहास्तव काल खास लिहुन काढला, न पेक्षा गेल्या अनेक महिन्यात काहीही लेखन घडले नव्हते. (दुष्ट मालक वर्ग चार दमड्यांच्या बदल्यात हली फार काम करून घेतो, त्यातून वेळ असलाच तर नसते उद्योग असतात). असो.
तात्यासकट सर्वांचे पुन्हा आभार. असाच लोभ असूद्या!

आपला स्नेहांकित
साक्षी

विसोबा खेचर's picture

23 Jan 2008 - 5:12 pm | विसोबा खेचर

हा लेख आमचे परमस्नेही व मिसळपंथी मा. तात्यामहाराज यांचे आग्रहास्तव काल खास लिहुन काढला, न पेक्षा गेल्या अनेक महिन्यात काहीही लेखन घडले नव्हते.

साक्षीदेवा, माझ्या विनंतीला मान देऊन तू लिहिलेस याचे बरे वाटले. यापुढेही रोजच्या कामकाजाच्या रगाड्यातून मिपाकरता दोन घटका वेळ काढत जा आणि असंच इथे चांगलंचुंगलं लिहीत रहा हीच तुला गाववाला म्हणून आग्रहाची विनंती...

आपला,
(मामलेदारची मिसळप्रेमी गाववाला) तात्या.

अवांतर - एकदा केव्हातरी सवडीने वेळ काढ. दोघं मामलेदाराला जाऊ आणि यथास्थित मिसळ हाणू! :)

स्वाती राजेश's picture

23 Jan 2008 - 4:55 pm | स्वाती राजेश

आमची पण फसगत झाली.
लेख फारच छान लिहिला आहे. वर्णन डोळ्यासमोर उभे राहते.
तुमची मैत्रिण फारच छान आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Jan 2008 - 8:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख आवडला !!!! सुंदर वर्णन केले आहे.

वरदा's picture

23 Jan 2008 - 8:04 pm | वरदा

उत्सुकता छान ताणलेय्...खूप आवडली!

raje1981's picture

23 Jan 2008 - 8:07 pm | raje1981

raje gadavar

मनीष पाठक's picture

24 Jan 2008 - 4:58 pm | मनीष पाठक

शेवटी फसगत अन तीही गोड!

लेख खुपच आवडला. अजुन येउ द्या.

मनीष पाठक

सुंदर वर्णन वाह क्या बात..

सिरुसेरि's picture

4 Jan 2016 - 8:50 am | सिरुसेरि

मध्यंतरी व्हॉटसअ‍ॅपवर एका छोट्या चिनी मुलीचा गाणे म्हणतानाचा २,३ मिनीटाचा व्हिडीओ खुप फिरत होता. त्यामध्ये हि मुलगी स्टेजवर येऊन धिटपणे गाणे म्ह्णते , मधेच थोडा नाच करते , चहा पिण्याची नक्कल करते असे काहिसे होते . भाषा , शब्द कळत नसूनही ते गाणे लक्षात राहते .

चौथा कोनाडा's picture

4 Jan 2016 - 2:27 pm | चौथा कोनाडा

सुं द र !