संक्रांत!

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
13 Jan 2009 - 10:47 pm

"हे ऽऽ काऽऽऽप्पेऽऽऽ" असं बेंबीच्या देठापासनं ओरडत, उन्हानं तावलेल्या लालबुंद चेहेर्‍यानं गच्चीवरुन धावत जायचं आणि अनवाणी पायांना चटके बसत असले तरी गच्चीवरल्या कुंभीवर चढून कापला गेलेला पतंग कोणत्या पोरांचा होता हे टाचा उंच करुन शोधायचं हे दृश्य आता माझ्यासाठी तरी इतिहासजमा झालं आहे.

जानेवारी महिना आला तरी थंडी सुरुच असायची पण सकाळी-सकाळी उन्हात एकप्रकारचा प्रेमळ उबदारपणा जाणवायला सुरुवात झालेली असायची. संक्रांतीआधी तीनचार दिवस आम्ही मित्रमंडळीचा एककलमी कार्यक्रम पतंग बनवणे आणी मांजा सुतवणे. त्याची तयारी सुद्धा साग्रसंगीत असायची. आधी बाजारात जाऊन मजबूत धागा असलेला दोरा घेऊन येणे. त्यानंतर मांजा गुंडाळायला चक्री, काचेच्या बाटल्या, रंग, सरस, फडकी असे सर्व साहित्य गोळा झाले की तयारी झाली. आमच्यातली जरा मोठी मुलं होती ती कुठूनशा बियर वगैरेच्या बाटल्या पैदा करत त्याचं मला फार आश्चर्य वाटे. मग आम्ही जमवलेल्या साध्या काचेच्या बाटल्या आमच्यापेक्षा लहान मुलांना मांजा बनवण्यासाठी आम्ही उदारपणे दान देत असू! ती ही खूष आणि आम्हालाही मोठेपणा!
मग दुपारी जेवणे झाली की घरोघरी मोठ्यांची विश्रांती सुरु असे. घरात कार्ट्यांची कटकट नको म्हणून मग आम्ही भर रस्त्यात मांजा सुतवायला मोकळे! त्यावेळी, म्हणजे साधारण २५-२७ वर्षांपूर्वी, अहमदनगरला दुपारच्या टळटळीत उन्हात एखादा डबेबाटलीवाला, क्वचित कल्हईवाला, एखादी बोहारीण, एखादी कुल्फी आणि बर्फाचे गोळे विकणारी गाडी सोडली तर दुपारी रस्ते जवळजवळ सुनसान असत. त्याचा फायदा आम्ही घेतला नाही तरच नवल.

एका जाड फडक्यात घालून त्या बियरच्या बाटल्या विटेने बारीक कुटल्या जात. काचेची पूड अगदी एकसारखी होणे गरजेचे. चुकार तुकडे काढून टाकले की काच तयार. ती पूड एका जाड फडक्यात घ्यायची. मग एका वेताच्या जाड काडीच्या एका टोकाला 'V' आकाराची खाच पाडून घ्यायची. कोरा जाड दोरा घेऊन एक मुलगा उभा असे. दुसर्‍याने त्या दोर्‍याचे टोक चिकट सरस असलेल्या डब्यात 'V' आकाराच्या खाचेतून ओढून काढायचे. तिसरा मुलगा हातातल्या काचेच्या पुडीतून तो दोरा जाऊ देई. त्यामुळे काच दोर्‍याला चिकटे मग चौथा मुलगा रंगाच्या डब्यातून दोरा पुढे चालवी त्याने ती काच अधिकच घट्ट पकड घेई. थोड्या लांब अंतरावर पाचवा मुलगा चक्री गुंडाळत असे. अशी कामे आळीपाळीने वाटून भलामोठा मांजा सुतवणे पूर्ण होई. अजिबात गुंता न होऊ देता चक्रीवर मांजा गुंडाळणे हे अतिशय कौशल्याचे काम असे. एरवी अभ्यास म्हटले की पळून जाणारी एकाग्रता अशा कामात मात्र काय जमून आलेली असे महाराजा! तहान-भूक हरपून काम सुरु असे. मांजा झाला की मग तो जरा वाळायला ठेवायचा आणि पतंग करायला घ्यायचे. वेगवेगळ्या आकारमानाचे, रंगांचे, शेपटीवाले, बिनशेपटीवाले, गोंडावाले, नक्षीदार असे ५० एक पतंग तरी आम्ही सहज करत असू!
पतंगाचा तोल बघून त्याला मधल्या काडीभोवती अचूक ठिकाणी भोके पाडून दोरा ओवणे आणि सूत्र बांधणे हेही कौशल्याचे काम! ते चुकले की पतंग उडायचा नाही किंवा गिरक्या घ्यायचा मग त्याला एका बाजूला कन्नी (म्हणजे सुतळीचे वजन बांधून बॅलन्सिंग) करणे असले प्रकार. हे सगळे साहित्य कोणा एकाच्या घरी जपून ठेवणे म्हणजे महाकठिण काम. एकतर "कसले धंदे चाललेत रे तुमचे?" म्हणून मोठी ओरडणार आणि ज्यांचे लहान भाऊ-बहीण आहेत ती तिथे जाऊन त्या वस्तूंना हात लावणार. अशा दोन्ही आघाड्यांवर सांभाळावे लागे.

संक्रांतीच्या आदल्या संध्याकाळी रंगीत तालीम असे. दोन चार 'टेस्ट पतंग' जुन्या मांजाला लावून उडवले जात तेव्हा एखाद्या विमानाची 'ट्रायल फ्लाईट' पूर्ण झाल्याचा आनंद मिळे. मग कोणाच्या गच्चीत किती वाजता जमायचे हे ठरून तो दिवस संपे. रात्री झोपा नीट लागत नसत इतके आम्ही उतावळे झालेले असू. कधी एकदा ते पतंग उडवतोय असे झालेले असे!
एकदाची संक्रांत येई! कधी नव्हे ते पटापट आवरुन आम्ही आईने केलेल्या गुळाच्या पोळ्या, तीळ लावलेली बाजरीची भाकरी त्यावर लोणी, वांग्याचं भरीत, थंडगार ताक असलं मालामाल जेवण चापून पळत असू! जाताना चड्डीच्या दोन्ही खिशात तीळगुळाचे लाडू आणि रेवड्या भरुन जायचो. एकीकडे बाबांचे " पत्र्यावरुन चढून पळू नका. चौकाच्या फार बाजूला जाऊ नका, वरुन पडाल आणि हातपाय मोडून घ्याल!" अशा सूचना सुरु असायच्या "हो, नाही" करत त्या ऐकून घेतल्यासारखे करत सटकायचो!

मग आमची टोळधाड सर्व पतंग आणि मांजा घेऊन ठरलेल्या गच्चीवर जमत असे. आजूबाजूला निरीक्षण करून कोणकोणते पतंग आणि प्रतिस्पर्धी आहेत ह्याचा आदमास घेतला जाई. एकूणच 'वारा कसा वाहतोय' ह्याचा अंदाज घेऊन पतंग उडवायला सुरुवात होई! मग आमच्यातल्या थोड्या अनुभवी शिलेदाराला पहिला पतंग उडवायचा मान मिळे. चक्री धरुन मागे रहाणे हेही जोखमीचे काम असे. वारा भरपूर असला तर पतंग सरसरत वर जाऊ लागे तेव्हा आम्ही हर्षभरित होऊन जात असू. वारा जेमतेम असला तर मात्र उडवणार्‍याची दमछाक असे. आमच्या जुन्या वाड्याच्या सभोवताली अतिशय दाट वस्ती आणि इतरही जुने वाडे होते त्यांच्या गच्च्या एकमेकांना लागून-लागून असल्याने पतंगांच्या दिवसात फार फायदा होई. कुठूनही कुठेही पळणे आणि उड्या मारुन जाणे सहज शक्य असे. एकेक करुन आजूबाजूच्या घरांवरुन पतंग सरसरत वर जात असत. थोड्याच वेळात संपूर्ण आसमंत पतंगांनी भरुन जाई. मग एखाद्या जवळच्या गच्चीवरल्याच्या पतंगाला आव्हान देऊन आपला मांजा टेस्ट करायचा डाव साधायचा! त्याच्याशी गोत घेऊन त्याचा पतंग काटला की काय आनंद! ते पहिलं यश अमाप ओरडाआरड्याने साजरे होई! मग भीड चेपली की जरा लांबचे मोठे पतंग गाठायचे आणि कापून काढायचे. दे धमाल! कधी आपला कापला गेला की मग पलीकडचे जल्लोश करत त्यावेळी अपमानाने संताप होई!
त्यावेळी भराभर मांजा गुंडाळून घेणे हे अति कठिण काम असे!
एका वर्षी आम्ही सलग १३ पतंगांना 'धरती दाखवली' होती! :) त्यावेळचे रेकॉर्ड अजूनही लक्षात आहे! एकामागे एक पतंग कापले गेल्याने आमच्याशी गोत घ्यायला कोणी तयार नव्हते.

त्यावेळी टीव्हीचे अँटेना खूप उंच असत. कधी त्यात अडकून पतंग फाटला तर फारच वाईट वाटे. असा सगळा दिवस पार सूर्य बुडेपर्यंत पतंग उडवायचे. मग दिसेनासे झाले की खाली यायचे. हातपाय धुताना धारदार मांजाने कुठे कुठे कापले आहे ते लक्षात येई. मग जरा जास्त लागले असले तर औषध लावणे अन्यथा काही नाही!
मग घरात आजोबांकडून, आई-बाबांकडून, वाड्यातल्या सर्वांकडून तीळगूळ घेऊन बाहेर पडणे. आम्ही मित्र टोळक्याने आमच्या बर्‍याच शिक्षकांच्या घरी जात असू. प्रत्येक ठिकाणी आमचे अतिशय मायेने स्वागत होई. हातातल्या पिशव्यात, काटेरी हलवा, रेवड्या, तीळगुळाचे लाडू, चिक्की असला असली माल भरभरुन असे. मनात कुठेतरी एक आपुलकीची भावनाही असे पण ती तीव्रतेने जाणवण्याजोगे वय नव्हते असे आता वाटते. माझ्या सर्वात लाडक्या, मला चौथ्या इयत्तेत शिकवणार्‍या, रसाळ बाईंकडे गेल्याशिवाय संक्रांत साजरी झाल्यासारखे मला वाटत नसे. मी त्यांच्याघरी जाताच "ये रे ये. कसा आहेस बाळा?" असं म्हणून मायेनं पाठीवरुन हात फिरवला की कसं भरुन येई! त्यांच्या घरच्या तीळगुळाला मायेचा काही वेगळाच स्वाद असे.
त्यांच्या घरच्या विठ्ठलमंदिरातल्या त्या सावळ्याचं दर्शन घेऊन आणि तो तिळगूळ खाऊन मनाचं जे समाधान होई ते शब्दातीत आहे! आजही संक्रांत आली की मला बाईंची हटकून आठवण होतेच. गेल्या ४ वर्षात त्यांची भेट झालेली नाही आणि तो प्रेमळ खाऊ आणि मायेचा हातही पाठीवर टेकला नाही. ह्या लेखाच्या निमित्ताने त्या आठवणींना उजाळा मात्र मिळाला.
सर्व मिपाकरांना संक्रांत सुखाची आणि आनंदाची जावो आणि त्यांच्या यशाचा पतंग असाच आसमानात उडत राहो विषमतेचा आणि अपयशाचा मांजा कापून सगळे मिळून जल्लोश करु "हेऽऽ काऽऽप्पे"! :)

चतुरंग

संस्कृतीसमाजजीवनमानविचारअनुभवप्रतिभा

प्रतिक्रिया

आजानुकर्ण's picture

14 Jan 2009 - 12:28 am | आजानुकर्ण

चतुरंग झकास लेख.

आमच्याही संक्रांती अशाच हलव्यासारख्या काटेरी आणि तीळगुळासारख्या स्निग्ध आहेत. वर्गातील मुलींशी तीळगूळ देताना बोलायला मिळायचे त्यामुळे संक्रांत फार आवडत होती.

एकदा एक आखडू मुलगी प्रेमाने तीळगुळ देत नव्हती तिला तीळगुळाच्या नावाखाली खड्याचे मीठ दिले होते. बघण्यासारखा चेहरा झाला होता

आपला
(संक्रांत) आजानुकर्ण

संदीप चित्रे's picture

14 Jan 2009 - 12:32 am | संदीप चित्रे

एकदम खूप सार्‍या आठवणींना उजाळा दिलास रे मित्रा...
काटलेल्या पतंगांमागे पळताना वाटेतले काटेकुटे, दगड टोचले तरी जाणवायचे नाहीत !!
आजच एका सहकारणीची बोलत होतो की आपली मुलं इथे भारतातल्या किती आणि कोणत्या गोष्टींना मुकतायत.
हे मांजा तयार करणं, वेगवेगळे खेळ, पत्ते ह्या सगळ्यातून किती प्रकारचं ज्ञान नकळत (आणि आनंदात) गोळा केलं त्याला सीमा नाही !
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

विसोबा खेचर's picture

14 Jan 2009 - 12:55 am | विसोबा खेचर

एकदम खूप सार्‍या आठवणींना उजाळा दिलास रे मित्रा...

सहमत आहे!

रंगा, सुरेख लेखन रे! जियो..!

आपला,
(पतंगाच्या आठवणीने हळवा!) तात्या.

मुक्तसुनीत's picture

14 Jan 2009 - 12:33 am | मुक्तसुनीत

उत्तम लेख. पतंगांचे , लहानपणीच्या नगर गावचे एकेक डीटेल वाचताना त्याची गोडी पुरेपूर अनुभवली.

यंदाच्या "मौज" दिवाळी अंकात दिलीप चित्रे यांचा लेख आलाय ( हे चित्रे म्हणजे दिलीप पुरुषोत्तम चित्रे नव्हेत.) त्याचे नाव आहे "बिनपैशाचे खेळ". त्यांनीसुद्द्धा त्यांच्या दिवसातले पतंगांची सगळी "प्रोसेस" कशी होती ते इत्थंभूत लिहिले आहे. गुणवत्तेच्या बाबतीत चतुरंग यांचा लेख अगदी त्याच तोडीचा आहे !

दिपक's picture

14 Jan 2009 - 12:41 pm | दिपक

'बिनपैशाचे खेळ' वाचला त्यावेळी पंतगांची आणि लहानपणीच्या केलेल्या उद्दोगांची आठवण झाली होती आज परत झाली..

एकदम खूप सार्‍या आठवणींना उजाळा दिलास रे मित्रा...
सहमत :)

--दिपक

कोलबेर's picture

14 Jan 2009 - 12:38 am | कोलबेर

मस्त! कितीतरी जुन्या आठवणी आठवल्या. आमच्याकडे पतंग आणि संक्रांत हे समीकरण नसले तरी हिवाळ्यात साधारण दिवाळी नंतर पतंग उडवणे भरपूर व्हायचे. मांजा बनवताना एकदा बाटल्या कुटण्यासाठी घरातला खलबत्ता हळूच नेला होता, खलबत्याचा हा वापर कळल्यावर घरी जो गहजब झाला होता तोही आठवला. :)

छान नॉस्टॅलजीक लेख.

-कोलबेर

अनामिक's picture

14 Jan 2009 - 12:43 am | अनामिक

हेच म्हणतो!
आमच्याकडेही पतंग आणि संक्रांत हे समीकरण नव्हतं, आणि मी पण माझ्या मामेभावा बरोबर मांजा करायला घरातला खलबत्ता वापरला होता.
खलबत्त्याचा असा वापर घरी कळला तेव्हा आमच्याकडेही गजहब झालेला.

चतुरंग, तुमचा लेख खुप आवडला!

अनामिक.

प्राजु's picture

14 Jan 2009 - 12:39 am | प्राजु

पतंगाचा मांजा तयार करण्याचं वर्णन खास. मला हे माहिती नव्हतं. माझ्या ज्ञानातही भर पडली. :)
मस्त आठवणी.. :)
माझ्याही काही अशाच आठवणी आहेत संक्रांतीच्या. लिहिन कधीतरी.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

आपला अभिजित's picture

14 Jan 2009 - 12:40 am | आपला अभिजित

आम्हाला पतंग उडवायला (कुठलेच!) कधीच जमले नाही, पण तुम्ही त्याचा फील दिलात!!

अवलिया's picture

14 Jan 2009 - 9:57 am | अवलिया

मस्त

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

मैत्र's picture

14 Jan 2009 - 11:35 am | मैत्र

"हेऽऽ काऽऽप्पे"!
सुरुवात पाहून वाटलं की नगर असेल.. चक्री, सरस वाचून वाटायला लागलं की नक्की नगर आणि पुढे ती सगळी धमाल उभी केलीत..
नगरच्या मध्य वस्तीतल्या गल्ल्यांबमधल्या सगळ्या जोडलेल्या गच्च्या आणि पत्रे यांच्या चक्रव्युहात आपली शक्य तितकी उंचावरची जागा धरणे आणि मग अंदाज घ्यायचा. माझे मामेभाऊ पतंगाची दिशा पाहून ओळखायचे कोणाचा पतंग आहे आणि त्याप्रमाणे डावपेच ठरायचे. क्रिकेट प्रमाणे जुन्या टीम्स ची तयारी माहिती असायची. मातब्बर लोकांना मान मिळायचा. मग त्याप्रमाणे तयारीचे गडी पतंग हातात घ्यायचे.
"गोत" घ्यायची असेल तर आणि जवळचा पतंग असेल तर ओरडून विचारायचं " घेतोस का गोत"... मग जे सुरुवात ते पार पतंग संपेपर्यंत किंवा अंधारात दिसेनासं होइपर्यंत चालायचं.
पतंग डुगडुगत असेल तर लांब "लेपटी" लावायची आणि ती चिकटवायची भाताने...
मांजा बनवण्याचं वर्णन तर एकदम पर्फेक्ट..सही लिहिलंय. कित्येक वर्षात ते पाहिलं नाही परत.
गंज बाजारात पतंगांबरोबर आता तयार मांजासह चक्री मिळते.
नगरचे सगळे शब्द - टर्म्स एकदम वेगळ्या होत्या.. कन्नी, लेपटी, गोत, मांजा सुतवणे
पतंगांचे प्रकार आणि नावंही मजेशीर होती... काही आठवत नाहीत आता.

कधी आपला कटला तर मांजा हापसण्याची लढाई ही गोत घेण्याइतकीच तयारीची असायची. कारण कटलेल्या पतंगापासून आपल्यापर्यंत वाटेतल्या सर्व गच्च्या मिळणारा नवा मांजा ढापायला टपलेल्या असायच्या. कारण तशी संधी मिळाल्यावर आपलाही तोच उद्योग चालायचा. माझ्या भावाला एकदा असा मांजा धरताना कापायला काही मिळालं नाही. मजबूत नवा मांजा तुटेना. तो दातात धरून तोडताना तिकडे चक्री वाल्याने हिसका मारला आणि याचा गाल सर्रकन कापला. आता पंधरा वर्ष झाली पण वण टिकून आहे! आणि आपला पतंग जवळपास कटला असेल तर तो परत मिळवायला काय सॉलिड फाइट व्हायची.. काही पोरं फक्त या कटणार्‍या पतंगांवर लक्ष ठेवून असायची. कोणी जवळपास आपला पतंग किंवा मांजा धरला तर चक्क दगड विटा फेकायचे!!

नगरला खुप उंच आणि मोठ्या(लांबीला) अँटेना असायच्या. त्याशिवाय मोठ्या मोठ्या पिंपळा सारख्या झाडांमध्येही किती तरी पतंग अडकायचे...

खूप छान लिहिलं आहे.. धन्यवाद.
संक्रांतीच्या शुभेच्छा!!

झेल्या's picture

14 Jan 2009 - 12:28 pm | झेल्या

'पतंग' जोरदार उडवलात..!

आकाशाशी नातं जोडणारा 'रंगी'त पतंग...

-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )

श्रावण मोडक's picture

14 Jan 2009 - 12:56 pm | श्रावण मोडक

कन्नी, सूत्र, गोत वगैरे शब्द सगळीकडेच आहेत की काय? बेळगावातही हेच शब्द होते.
लेखाने जुन्या आठवणी जागवल्या.