खेळतं भांडवल आणि खेळता पैसा (लेख क्रमांक १)

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
27 Feb 2016 - 3:14 pm

==भाग पहिला ==
भांडवल आणि पैसा या दोन गोष्टी आहेत, तुम्हाला त्या खेळत्या हव्या असतील तर त्यांच्याशी तुम्हाला खेळता येत नाही. म्हणजे हेळसांड करता येत नाही. काटेकोरपणा ही इथली पहिली पायरी. खेळता पैसा हा तुम्हाला तुमच्या आवडी निवडीसाठी आवडी निवडी प्रमाणे वापरण्यासाठी असतो पण तो तुमच्याकडे तेव्हाच खेळता राहतो जेव्हा तुम्ही भांडवलाला खेळू देता. तुमचे श्रम आणि बुद्धी अभौतिक मानवी भांडवल किंवा स्रोत म्हणवता येतील. पण जेव्हा एखादा व्यवसाय उभारण्याची अथवा चालवण्याची वेळ येते त्यासाठी भौतीक स्वरुपाच्या भांडवलाची गरज असते उत्पादन-सामग्री. जमीन व श्रमिक असो वा तंत्रज्ञान उद्योग व्यवसायासाठी हे सर्व घटक उभे करण्यासाठी लागणार्‍या आर्थीक गुंतवणूकीस आपण भांडवल असे म्हणतो. यातील उत्पादन-सामग्री, जमीन तंत्रज्ञान इत्यादी स्थिर स्वरुपाची सर्वसाधारणपणे दीर्घकाळासाठी केलेली गुंतवणूक असते. या स्थिर गुंतवणूकी आपल्याला रोज दररोजच्या खर्चासाठी वापरता येत नाहीत. तुम्ही चहाच दुकान थाटलं तर लागणारी शेगडी/चूल आणि चहाचे भांडे, साखर पत्तीचे डब्बे, ही स्थिर गुंतवणूक असते.

व्यवसायासाठी रोजखर्चाला जो वरकड निधी अथवा पैसा लागतो त्यास खेळते भांडवल असे म्हणतात म्हणजे तो तुम्हाला नेहमी लागणार्‍या नित्याच्या व्यावसायिक खर्चांसाठी वापरता येतो. -म्हणजे चहाचे दुकान असेल तर चहा, पत्ती, दुकानाचे भाडे, लाईटबत्ती, कामगाराचा पगार इत्यादी - यात व्यावसायिक खर्चांसाठी हे फार फार महत्वाचे शब्द आहेत -म्हणजे व्यक्तिगत अथवा घर खर्चासाठी नव्हे हे भान काटेकोरपणे पाळावे लागते- हे मोठ्या अनुभवी व्यावसायिकांना माहितच असते -ते जेव्हा चुकतात माहित असून चुकतात ते वेगळे- , पण छोट्या छोट्या व्यावसायिकांनी आणि सर्वच व्यावासायिंकांच्या शेतकर्‍यांच्याही कुटूंबियांनी लक्षात घेण्याची कड्डक शीस्त अंगिकारण्यासाठीची महत्वाची बाब आहे. व्यवसायाच्या खेळत्या भांडवलातून घरखर्चाकडे पैसा वळता करणे हा तुम्ही तुमच्या व्यवसायाशी केलेला जघन्य अपराध असतो, कुटूंबीय म्हणून तुम्ही तुमच्या कुटूंबातील व्यवसाय कर्त्यावर भावनीक दबाव टाकून पैसा व्यवसायातून कौटूंबिक खर्चाकडे वळता केला तर ती तुम्ही तुमच्या घरातील व्यवसायकर्त्याचीच नव्हे स्वतच्या कुटूंबाशी केलेली एक मोठी प्रतारणा ठरत असू शकते. इथे शीस्त मोडलीतर आजच्या भाजीला पाहीजे म्हणून रोज दोन सोन्याची अंडी देणारी कोंबडी आजच मारुन खाणे होय. शास्त्रशुद्धपणे काढलेल्या निव्वळ नफ्या व्यतरीक्त व्यवसायातून घर खर्चास पैसा घ्यायचा नाही हा मंत्र पक्का गाठीशी बांधून घ्यावा, स्वतःच्याच कानी कपाळी १४०० वेळा ऐकुन, १७०० वेळा सांगून घ्यावे कारण छोट्या व्यवसायात आढळणारी मोठी चूक इथे कुठेतरी कधी कळत कधी नकळत कधी भावनेच्या आहारी इंपल्सीव सेंटीमेंट खाली होत असण्याची शक्यता असते.

चहाच्या दुकानासाठी चहापत्ती आणि साखर हा जर कच्चा माल असेल तर एका झेरॉक्स (फोटोकॉपी हा अधिकृत शब्द) दुकानासाठी टोनर, ड्रम, कागद हा कच्चा माल असतो तर शेतासाठी बियाणे, पाणि, खते, जंतू नाशके हा कच्चा माल असेल, या प्रमाणे तुमच्या उद्योगासाठी जो काही कच्चा माल लागत असेल त्यासाठी लागणारे खेळते भांडवलाची उपलब्धता ही टॉप प्रिऑरिटी असते. हि पायरी खेळत्या भांडवालाच्या या भागाचे गणित सातत्याने आणि गांभीर्याने मांडण्याची म्हणता येईल. कच्च्या मालासाठी लागणार्‍या खेळत्या भांडवला बद्दल बर्‍याच गोष्टी विचारात घ्याव्या लागतात त्या एक एक करुन विचारात घेऊ पण सर्वात महत्वाची दक्षता म्हणजे कच्च्यामालासाठी जे खेळते भांडवल लागते त्यावर आपल्या ग्राहकास (कस्टमरला) कधीही (स्वप्नातही) उधारी देऊ नये किंवा असेही लिहिता येईल की किमान कच्च्या मालासाठी लागणारा पैसा/डिमांडड्राफ्ट कस्टमर कडून अ‍ॅडव्हान्समध्ये मिळवणे बेस्ट ते मागूनही शक्य झाले नाहीतर ऑन डेलिव्हरी मिळवला पाहीजे. (मागूनही शक्य झाले नाहीतर हे महत्वाचे आहे बरेच नवव्यावसायिक ग्राहकाला अ‍ॅडव्हान्स मागण्याबद्दल भिडस्तपणा दाखवतात हि जागा आवर्जून भिडस्तपणा टाळण्याची आहे) ह्याची निश्चिती कस्टमरकड्न ऑर्डर मिळवताना केलेली चांगली खास करून कस्टमर किंमत आणि डिस्काऊंट बद्दल घासाघीस करत असतो ते क्षण तुमच्या कच्च्या मालासाठी लागणार्‍या खेळत्या भांडवलाची आकडेवारी आणि व्यवस्था तुमच्या बॅक ऑफ माइंड असेल तर हि निगोशीएशन्सच्या वेळी सोपे पडते आत्मविश्वास राहतो.
==भाग दुसरा==
तुम्ही नवीन व्यवसाय चालू करणार असाल तर खेळत्या भांडवलाच्या आकडेवारीचा विचार प्रकल्प अहवालाच्या वेळे पासूनच अथवा व्यवसायाच्या पुर्वतयारी पासून झालेला असावयास हवा. इथे प्रकल्प अहवालाची आपण खूप चर्चा करणार नसलो तरीही खेळत्या भांडवलावर होणार्‍या परिणामांची चर्चा इथे वाजवी ठरावी. केवळ बँकेसाठी लिहिलेल्या चार्टर्ड अकाउंटटचा अहवाल, परिचितांकडून येणारी ऐकीव माहिती दुजोरे किंवा फ्रँचाईजी प्रोमोटर/ उत्पादन मशिनरीच्या सप्लायरकडून येणारी माहिती, नवव्यावसायिक म्हणून तुमचा (उतावळा) उत्साह या सर्वांचे महत्व आपापल्या जागी आहे पण प्रत्यक्षातला फिल्डसर्वे करुन आकडेवारीची स्वतः खातरजमा करणे अत्यंत आवश्यक असते. फिल्डसर्वे हे कॉपिबूक तंत्र आहे तुमच्यातल्या एंटर प्रीन्युअरच्या इंट्यूशन, उत्साह आणि जिद्दीची मोजणी कोणत्याही फिल्डसर्वे मधून होत नाही हे खरे असले तरीही जोखीमींंचा खरा खुरा अंदाज खेळत्या भांडवलाची नेमकी गरज आणि किंमत निर्धारणात वर्कींग कॅपिटलचा रोल इथे आपल्या लक्षात येत असतो, उत्साहाच्या भरात फिल्डसर्वे करने फाट्यावर मारले जाताना दिसते, नवव्यावसायिकाची आर्थीक जोखीम घेण्याची क्षमता मर्यादीत असते, खराखूरा व्यवस्थीत आपण स्वतः फिल्डसर्वे करण्यातला आळस उद्याचालून व्यावसायिकाच्या अंगाशी येऊ शकतो. खासकरून तुम्ही नवे व्यावसायिक असता त्याच व्यवसायात आधी पासून जम बसवून बसलेली मंडळी तुमच्या व्यवसायातून येणार्‍या नव्या स्पर्धेस जे काही शह काटशह देण्याचा प्रयत्न करतात त्यात उत्पादनाची अथवा सेवेची किंमत हा एक फॅक्टर असतो काही वेळा नवा व्यावसायिक आणि जुना व्यावसायिक आपल्याला लागणार्‍या खेळत्या भागभांडवलाची चिंता बाजूला सोडून किंमत स्पर्धेत हकनाक उतरताना दिसतात ज्याचे खेळत्या भागभांडवलाचे गणित व्यवस्थीत आहे तो स्पर्धेची जोखीम हाताळण्यात अधिक उजवा ठरतो. रेडीमेड प्रकल्प अहवाल केवळ ढोबळ अंदाज देतात ते सुद्धा तुम्ही स्वतः केलेल्या सर्वेक्षणाची जागा घेऊ शकत नाहीत.

बँकांच्या माध्यमातून कर्ज उभेकरून प्रथमच व्यवसाय टाकणार्‍यांना अजून एक अडचण भेडसावते ती म्हणजे बँका उर्वरीत सर्व गोष्टींसाठी पत पुरवठा करतात पण ऐन खेळत्या भांडवलावर हात आखडता घेतात फिल्डसर्वे टाळल्यामुले खेळत्या भांडवलाचा अंदाज आलेला नसेल आणि तुम्ही खेळत्या भांडवलाची क्रेडीबल व्यवस्था केली नसेल नवा उद्योग व्यवसाय सुरवातीसच अडखळणे चालू होते. हे खेळत्या भांडवला बद्दल घाबरवणे नाही, यशस्वी जोखीम व्यवस्थापना साठीची आवश्यकता आहे.

स्पर्धेतील वस्तु अथवा सेवेच्या किंमत निर्धारणाकडे वापस येऊ. आपल्या स्पर्धकापेक्षा आपली वस्तु अधिक किमंतीला कशी विकावी/वितरीत करावी याचे नवव्यावसायिकास काय भल्या भल्यांना कल्पना नसते त्यात नवव्यावसायिकास नवा ग्राहक मिळवण्यासाठी प्रस्थापित स्पर्धकापेक्षा कमी किंमतीवर आपले उत्पादन अथवा सेवा विकण्याचा विचार करु लागतो पण प्रस्थापितांशी किंमतीवर टक्कर घेणे हा काही गमतीचा खेळ नव्हे. ब्रँड म्हणजे प्रस्थापित असणे आणि गरज पडल्यास किमंतीवर टक्कर देण्यात सहसा प्रस्थापित उजवा ठरेल, नवव्यावसायिकास आपल्या उजव्या बाजू माहित हव्यात नवव्यावसायिकाकडचे तंत्रज्ञान सहसा नवे असण्याची शक्यता असते असले नसले तरी तसे ग्राहकाला सांगण्याची त्याला संधी असते (हे मी इथे प्रॅक्टीकल सांगतो आहे :) ) म्हणून माझी क्वालिटी प्रस्थापितस्पर्धकापेक्षा अधिक चांगली आहे हि नवव्यावसायिकाने पहिली भूमिका घ्यावी शक्यतो खरोखरही आपण दर्जात उजवे आहोत हे पहावे, दुसरी उजवी बाजू तुमच्याकडे नवे असल्यामुळे ग्राहकसंख्या कमी आहे कमी ग्राहकांना सेवा अधिक वेगाने आणि अधिक पर्सनल टच ठेऊन देता येते त्यामुळे अधिक चांगली सेवा हा दुसरा प्लस पॉइंट सांगावा हे दोन प्लस पॉइंट ग्राहकाला सांगितल्या नंतर किंमत सांगताना प्रस्थापित स्पर्धकापेक्षा पाच पैसे (किंवा २ ते ५ टक्के) अधिक किंमत सांगावी कमी सांगू नये, एकदा सांगीतल्या नंतर तो निगोशीएट करुन तुमची किंमत उतरवेलच पण ते ग्राहकाचे काम ग्राहकाला करु द्या किंमत कमी सांगून शक्यतो सुरवात करु नका. हे लक्षात घ्या की तुमच्या कडे अगदी नवीन असताना ग्राहक कमी आहेत जो काही सुरवातीस पैसा येणार आहे तो सहसा खेळत्या भागभांडवला साठी लागणार आहे. हाताशी खेळते भांडवल नसेल तर कच्चा माल आणता येत नाही तो नाही आणता आणला की गाडी वेगाने रुळावरुन घसरते. म्हणून खेळत्या भांडवलासाठी किमत निर्धारण अगदी डोळ्यात तेल घालून करावे किंमत स्पर्धेत उतरताना नव्या व्यावसायिकाने आपले ऑल अत्यंत जपून टाकावे.

वस्तुचा दर्जा, सेवेचि तत्परता आणि व्यक्तिगत लक्ष यात नवा स्पर्धक सरस असेल तर प्रस्थापितानेही किमंतीवर स्पर्धा करण्यापुर्वी आपल्या खेळत्या भागभांडवलाची स्थिती आणि किंमत पुन्हा एकदा वर्क आऊट करावी, बर्‍याचदा नवेव्यावसायिक त्यांच्या अननुभवामुळेही किंमतस्पर्धेत उतरतात एकदा खेळत्या भांडवलाची अडचण आली की धंदा मिळवण्यासाठी अजून डेस्परेट होऊन अजून किंमत कमी करण्याकडे कल होतो किंमत युद्धातून बुडणारा नवागत बेफिकीर असलेल्या प्रस्थापिताचेही गणित, स्पर्धा म्हणजे काय हे निटसे ठाऊक नसतानाही उलटेपालटे करत असतो त्यामुळे आपण प्रस्थापित आहोत ह्याचा अभिमान जरुर ठेवावा, किंमत युद्ध हे टेकनीक आहे त्याचा वापर आपण सांभाळून करतो आहोत ह्याची प्रस्थापितानेही दक्षता घेणे गरजेचे असावे. आपले वर्किंग कॅपिटल प्रेशरमध्ये न येऊ देता स्पर्धकाचे वर्किंग कॅपिटल प्रेशर मध्ये आणावे हा यशस्वी किंमतयुद्धाचा मुलमंत्र आहे.

==भाग ३ रा ==
तसे पाहू जाता, मल्टी टास्कींग छोट्या व्यावसायिकाचा मध्ये खरा कस लागतो, केवळ तो एकटा सर्व गोष्टी करतो असे नव्हे तर उत्कृष्ट पर्चेस मॅनेजर, उत्कृष्ट प्रॉडक्शन मॅनेजर, उत्कृष्ट एच आर मॅनेजर, उत्कृष्ट मार्केटींग मॅनेजर, आणि सर्वात महत्वाचे उत्कृष्ट फायनान्स मॅनेजर, ते गरजे प्रमाणे उत्कृष्ट तंत्रज्ञ, उत्कृष्ट कामगार, उत्कृष्ट डेलीव्हरी बॉय या सगळ्या भूमिका एका छोट्या व्यवसायाच्या मालकास वठवायच्या असतात यातील प्रत्येक भूमिकेचे महत्व तुम्ही लक्षात घेऊन जेवढ्या व्यवस्थीतपणे पारपाडता तेवढीच तुमच्या व्यवसायाच्या यशाची खात्री होत जाते.

आपण खेळत्या भांडवलाकडे वापस येऊ आपण अजूनही कच्च्या मालासाठी लागणार्‍या खेळत्या भांडवला पाशीच आहोत. अधिकाधीक नफा मिळवणे असो अथवा स्पर्धेला तोंड देणे खेळत्या भांडवलाचे प्रभावी व्यवस्थापन ही व्यावसायीक यशासाठीची महत्वाची गुरुकिल्ली आहे. कमीत कमी खेळत्या भांडवलात अधिकाधीक नफा हे कोणत्याही व्यवसायाचे लक्ष्य असले पाहीजे, कमीत कमी म्हणजे खेळत्या भांडवलाचा अभाव नव्हे. तुमची मागणी आणि उत्पादन वाढते तसे कच्च्या मालाची पर्यायाने खेळत्या भांडवलाची गरज वाढते, मागणी आणि उत्पादन पडते तसे कच्चा माल आणि त्यासाठी लागणार्‍या खेळत्या भांडवलाची गरज रोडावते. खेळते भांडवल हे गरजे एवढे असावे गरजे पेक्षा कमी अथवा अधिक नसावे. तुम्ही ज्यांच्या कडून कच्चा माल घेता आहात त्यांच्याशी दर्जावर तडजोड न करता कमीत कमी किमतीत शक्य तेवढ्या चांगल्या पेमेंट/क्रेडीट टर्मवर माल मिळवणे मागणी आणि उत्पादन वाढते तेव्हा तुम्ही कच्चा माल अधिक विकत घेत असाल तर त्यासाठी सप्लायर कडून डिस्काऊंट मिळवणे म्हणजे तुमचा ग्राहक तुमच्याशी ज्या प्रकारे निगोशीएट करतो तसेच तुम्ही तुमच्या पुरवठादाराशी निगोशीएट करावयास हवे म्हणजे कमीत कमी खेळत्या भांडवलात अधिकाधीक नफा हे लक्ष्य साधणे शक्य होते. पुरवठादारासही तुमच्या पेमेंट वेळेवर येतात याचा विश्वास झाल्यास तो अधिक चांगली प्राईस उपलब्ध करु शकतो म्हणून सेल्स साईडला तुम्ही ग्राहकाकडून गोडबोलून पैसे वेळेवर घेण्यातही कुशल असावयास हवे तरच तुम्ही तुमच्या सप्लायरला वेळेवर पैसे देण्यास सक्षम असाल.

एका वेळी किती कच्चा माल लागणार, माल जसा लागेल तसा विकत घ्यावा का कि एकदम विकत घेऊन ठेवल्यास अधिक चांगल्या किंमतीस मिळेल पण कच्च्या मालाची साठवणूक करुन ठेवल्यास आपले किती खेळते भांडवल अडकून पडेल या सर्व गोष्टंच्या आकडेवारी लक्षात घेऊन साधक बाधक बाजू लक्षात घेऊन आपले खेळते भांडवल आपण अधिकाधीक चांगल्या टर्मसवर राखून आहोत हे महत्वाचे.

अचानक मागणी वाढली अथवा काही कारणाने खेळत्या भांडवलावर ताण आलाच तर तुमचे बँका आणि पतपुरवठा संस्थांशी असलेले चांगले संबंध मदतीस येऊ शकतात. वस्तुतः हा संपूर्ण वेगळ्या धागाचर्चेचा विषय व्हावा, अनुभवी व्यावसायिकाम्नी खाली प्रतिसादातून या विषयी अधिक माहिती दिल्यास उपयूक्त असेल. खेळत्या भांडवलाच्या बाबत तुमचे काटेकोर असणे बँक आणि पतपुरवठा दारांचा विश्वास वाढण्यास साहाय्यभूत होऊ शकते.

मी या खेळते भांडवल विषयावर सवडीने अजून लिहिणार आणि हा लेख वाढवणार आहे. लेख सर्वसामान्य वाचकांना समजण्यास सोपा असावा इतपतच लिहिला आहे. तरीही समजण्यास सोपा आहे असा दावा नाही अधिक उदाहरणे जमल्यास चित्रे इत्यादींचे साहाय्य जाणकारांनी दिल्यास छान होईल. तांत्रिक भाषा तुर्तास टाळत आहे पण प्रतिसादातून जाणकारांनी माहिती दिल्यास चांगलेच. (चुभूदेघे)

जीवनमानतंत्रअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकमाहिती

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

27 Feb 2016 - 3:19 pm | आदूबाळ

वा! झकास. वाचतो आहे.

सवड मिळाल्यावर आणखी लिहीन.

बाबा योगिराज's picture

27 Feb 2016 - 4:13 pm | बाबा योगिराज

व्यवसायाच्या खेळत्या भांडवलातून घरखर्चाकडे पैसा वळता करणे हा तुम्ही तुमच्या व्यवसायाशी केलेला जघन्य अपराध असतो

मुद्दा 100% बरोबर आहे.
पुलेशु. पुभाप्र.

विवेकपटाईत's picture

27 Feb 2016 - 5:22 pm | विवेकपटाईत

मस्त लेख, आवडला.

मार्मिक गोडसे's picture

27 Feb 2016 - 6:32 pm | मार्मिक गोडसे

छान सुरवात.

लेख सर्वसामान्य वाचकांना समजण्यास सोपा असावा इतपतच लिहिला आहे.

असे सोपे लिहिणे हे अधिक कठीण असते.

तर्राट जोकर's picture

27 Feb 2016 - 6:32 pm | तर्राट जोकर

प्रथमतः तुमचे अभिनंदन आणि आभार, ह्या विषयावर लिहायला घेतल्याबद्दल. लेख सावकाश वाचतो. अनेक धन्यवाद!

चांगला विषय आहे. व्यवसायाच्या सुरुवातीला अशा किती चुका आपण करीत होतो ते आज कळतेय.
पण काही म्हणा, धंद्यात थोडा आदर्शवाद बाजूला ठेवावाच लागतो. अगदी कॉपीबुक पध्दतीने तत्वे जपत धंदा करणे सध्या पॉसिबल नाही. शक्य तेवढे सोयीस्कर मार्ग काढून सर्व पैसे वसूल करण्याकडे लक्ष ठेवणे, त्यातून अगदीच कट टू कट नफा नसला तरी एक खर्चाचे एक परसेंटेज ठरवणे. तेवढीच रक्कम वैय्क्तिक अथवा बाहेर खर्च करणे हे आवश्यक आहे.
दोन दिवसापूर्वीच मुद्रण दिन साजरा झाला. सोलापुरात मुद्रक परिषदेतर्फे झालेल्या व्याख्यानात अगदी हाच विषय चर्चिला गेला. (इतके दिवस नव्या टेक्नॉलोजी शिवाय न बोलणारे मुद्रक ह्यावेळी खरोखर आस्थेने बोलत होते)

माहितगार's picture

27 Feb 2016 - 7:37 pm | माहितगार

हम्म, किंवा खरेतर माझा प्रयत्न पुस्तकी लिहिण्याचा कमी असेल किंवा पुस्तके हाताळून मध्ये बरीच वर्षे निघून गेलीत, त्यामुळे पुस्तकी भाग प्रतिसादातून जाणकारांनी जोडावा अशी विनंती आणि अपेक्षा आहे. माझा या लेखमालेतून कॉपीबुक अथवा आदर्शवाद पेक्षा प्रॅक्टिकल अडचणींचीच चर्चा करण्याचा प्रयत्न असेल अर्थात हे लेखन बर्‍याच मायक्रोसाइज व्यवसायांना जवळून पण तटस्थतेने अभ्यासताना एक वाणीज्य शाखेच्या पार्श्वभूमीतून मी मला जाणवले त्यातून येते आहे, त्यात आपल्या सारख्या व्यावसायिकांचे प्रत्यक्ष अनुभव प्रतिसादातून असेच येत राहील्यास या धागा लेखाची उणीव पूर्ण होण्यास हातभारच लागेल त्यामुळे प्रतिसाद अधिक विस्ताराने आल्यास छानच

अभ्या..'s picture

27 Feb 2016 - 7:46 pm | अभ्या..

अवश्य. येऊद्यात

मास्टरमाईन्ड's picture

28 Feb 2016 - 12:10 am | मास्टरमाईन्ड

धंद्यात थोडा आदर्शवाद बाजूला ठेवावाच लागतो. अगदी कॉपीबुक पध्दतीने तत्वे जपत धंदा करणे सध्या पॉसिबल नाही. शक्य तेवढे सोयीस्कर मार्ग काढून सर्व पैसे वसूल करण्याकडे लक्ष ठेवणे, त्यातून अगदीच कट टू कट नफा नसला तरी एक खर्चाचे एक परसेंटेज ठरवणे. तेवढीच रक्कम वैय्क्तिक अथवा बाहेर खर्च करणे हे आवश्यक आहे.

एकदम पटलं.
याशिवाय व्यवसायात टिकून / जिवंत राहणे अवघड आहे.

मास्टरमाईन्ड's picture

28 Feb 2016 - 12:07 am | मास्टरमाईन्ड

खरंच छान लेख.
अजून येऊ द्यात.

मितभाषी's picture

28 Feb 2016 - 12:20 am | मितभाषी

शून्यातून विश्व निर्माण केलेला तरीही ह्या वानिज्य संकल्पना माहीत न्सलेला नव व्यवसायिक.
मितभाषी.

सर्वात महत्वाची दक्षता म्हणजे कच्च्यामालासाठी जे खेळते भांडवल लागते त्यावर आपल्या ग्राहकास (कस्टमरला) कधीही (स्वप्नातही) उधारी देऊ नये किंवा असेही लिहिता येईल की किमान कच्च्या मालासाठी लागणारा पैसा/डिमांडड्राफ्ट कस्टमर कडून अ‍ॅडव्हान्समध्ये मिळवणे बेस्ट ते मागूनही शक्य झाले नाहीतर ऑन डेलिव्हरी मिळवला पाहीजे.

भावना नक्कीच योग्य आहे. बहुतेक व्यवसायिक अगदी सहज सहमत होतील.

पण धंद्यात असं होउ शकत नाही. तीस/साठ अगदी नव्वद दिवस पर्यंत उधारी दिली जाते. उधारी हा खेळत्या भांडवलाचा एक भाग आहे आणि ही गोष्ट सर्वमान्य आहे. अगदी बँकाही या उधारीच्या तारणावर कर्ज (खेळत्या भांडवलासाठी) मंजूर करतात.

कदाचित आपल्याला असं म्हणायचंय की ग्राहकाने कबूल केल्यावेळी त्याच्याकडून उधार वसूल व्हायला हवी..

बाकी या विषयावर लिहिताय त्याबद्दल अभिनंदन.. प्रतिसाद बघूनच कळतंय की या विषयावर कुणी लिहिणं किती आवश्यक होतं ते! धन्यवाद!

माहितगार's picture

28 Feb 2016 - 9:14 am | माहितगार

भावना नक्कीच योग्य आहे....

नाही, अहो भावना नाही, साधे गणित आहे :) व्यवसायाच्या प्रकारांप्रमाणे उधारीच्या कालावधीच्या वेगवेगळ्या संस्कृती असतात हे खरे आहे. काही व्यवसाय प्रकारात चेनच्या सर्वात वरच्या लेव्हलला मागणीवर ताण असेल तर तो ताण पुरवठादारांच्या खालच्या साखळीवर पडत जातो. समजा कारची मागणी अचानक घटली तर कार डिस्ट्रीबुटर कडून कार मॅन्यूफॅक्चरर कडे उधारीचा कालावधी वाढेल आणि कार मॅन्युफॅक्चरच हा वाढलेला कालावधीचा ताण खाली आपल्या पुरवठादारांवर पास ऑन करेल आता त्या पुरवठादारांचे पुरवठादार असतील तर त्यांना आणखी ताण पडेल. पण मार्केट एकदा सुरळीत झाले की पेमेंट टर्मस सुधारावयास हव्यात बर्‍याचदा मार्केट सुधारल्या नंतर चेन मधला कुठला तरी व्यावसायिक खाली उधारिचा कालावधी कमी न करता पैसा तिसरीकडेच फिरवतो आणि उधारीच्या संस्कृतीला सरावलेला पुरवठादार निमुटपणे सहन करतो कारण संस्कृतीला तो सरावलेला आहे. या संस्कृतींमध्ये जेवढा बदल करणे शक्य आहे तेवढ्यासाठी झगडत राहणे (भांडणे नव्हे) व्यावसायिकाचे स्वतःच्या व्यवसाया प्रती कर्तव्य आहे. केवळ संस्कृतीला सरावलेल्या मुळे पैसा उशीरा येत असेल तर जास्तीच्या उधारीच्या कालावधीमुळे कॉस्ट एस्कलेशन होते या बाबत आणि उधारींचा कालावधी कमी केला तर कॉस्ट कमी होऊन मागणी वाढण्यात मदत होऊ शकते ह्याची समजदार ग्राहकाला आठवण द्यावयास हवी. पेमेंट्स कशी मागावीत आणि मिळवावीत या बाबत वेगळा लेख लिहिणार आहे तेव्हा त्यावर अधिक चर्चा करुयात

अजून एक मुद्दा आपण येथे लक्षात घ्या मी संपूर्ण खेळत्या भांडवलावर उधारी न देण्याबद्दलही बोललो नाही केवळ लागणार्‍या कच्च्या माला बाबतचा पैसा शक्यतोवर स्वतच्या व्यवसायातून बिनव्याजी असेल तेवढी तुमची स्पर्धा क्षमता वाढते.
त्यासाठी समजा काही ग्राहकांना तुम्ही अधिक उधारी देताय पण कच्च्यामालासाठी लागणारा पैशाचा भाग इतर पेमेंट ऑन डेलिव्हरी ग्राहकांकडून उभा रहात असेल तर उत्तम पुढे लिहिताना हे शक्य असलेल्या व्यवसाय क्षेत्रातले एक उदाहरण देईन.

पण सांगण्याचा मुद्दा असा की मी वर सर्व

असंका's picture

28 Feb 2016 - 12:51 pm | असंका

प्रतिसाद अपूर्ण आहे ना?

माहितगार's picture

28 Feb 2016 - 2:06 pm | माहितगार

होय प्रतिसाद अपूर्ण आहे- उर्वरीत उत्तर लेखात लिहू का प्रतिसादात नक्की नाही केल. पेमेंट कलेक्शन बद्दल एक धागा लेख लिहिन उर्वरीत प्रतिसादाचा काही भाग कदाचित त्यात घ्यावा लागेल. माझी लेखनाची प्रक्रीया अधून मधून चालू राहील त्यामुळे माझे प्रतिसाद पूर्ण होण्या पुर्वीही चर्चा चालू ठेवण्यास आणि अगदी त्रुटीही काढण्यास हरकत नसावी.

त्या दृष्टीने नाही हो. चर्चा चालू ठेवूच. पण वरच्या प्रतिसादात शेवटचे वाक्यच अर्धवट राहिले आहे...तेवढे पूर्ण करा.

ऑर्डर् पेक्षा पेमेंट मिळवणे हे कुठच्याही धंद्यात आव्हानात्मक आहे.
तीस/साठ अगदी नव्वद दिवस पर्यंत उधारी देणे हे जीवघेण्या स्पर्धेतून होत असेल.
प्रतिस्पर्धी व्यावसायिकाला दाबण्यासाठी असले प्रकार केले जात असतील तरी आपली सेवा आणि दर्जा चांगला असेल तर केवळ क्रेडिट नाही म्हणून नकार मिळत नाही. मोठ्या कंपन्या पर्याय म्हणून दोन पुरवठादार नेहेमीच ठेवतात.
पण त्यातही आपला सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करता येतील.

अर्थात प्रत्येक व्यवसायागणिक इतके बारकावे आहेत की काही एक बोलले तर सरसकटीकरण होईल.

क्रेडीट न देता धंदा / व्यवसाय करू शकणारे नसतीलच असं काही मला म्हणायचं नाही. पण ते कायमच मायनोरीटीत रहाणार.

खेळते भांडवल या शीर्षकाखाली उधारी नसावीच असं म्हणलं गेलंय ते जरा त्रासदायक वाटतंय . प्रत्यक्षात उधारी हा खेळत्या भांडवलाचा एक महत्त्वाचा घटक समजला जायला हवा.

कंजूस's picture

28 Feb 2016 - 9:00 am | कंजूस

कन्फ्युज्ट अकाउंटट +1
फारच आदर्श लेखन आणि म्हणून अव्यवहार्य.

माझे मत : तुमचे सप्लाइअर धंदेवाइक असतात आणि त्यांना मालाचे पैसे द्यायचे असतात परंतू तुमचे गिह्राइकही दुसरे धंदेवाइकच असतील तर फार गोची करतात.ते पैसे थकवणे म्हणजेच पैसे न देणे हे पक्के ओळखून असतात.त्यांना लगेच बुडितही धरता येत नाही पण एकूण ते बुडवतातच.तसं सामान्य गिह्राइकाचं नसतं.ते बुडवे गिह्राइक असतं आणि आपण पैसे बुडले मांडून पुढे जातो.जेवढे लवकर तुम्ही मान्य कराल बुडलेल्या रकमेबद्दल तेवढा त्रास कमी होतो.
पैसे देण्यात टोलवाटोलवी करण्यात औरंगाबाद एमआइडीसीचा नंबर पहिला आहे असं मला एका सप्लाइअरने सांगितले.नुसत्या ओर्डरी देतात आणि कायम एक रक्कम थकववून ठेवतात.
शहरात श्रीमंत( सधन) बनणे एकवेळ सोपे परंतू गावांत फार अवघड असते.
तुमचे खेळते भांडवल खेळतच राहते ,फक्त दुसय्रांच्या धंद्यात.
( प्रतिसाद थोडा कडवट आहे, माफ करा )

प्रतिसाद थोडा कडवट आहे, माफ करा

अहो, पैसे बुडवणार्‍यांना कडवट लागेल, मनमोकळा प्रतिसाद आहे आणि प्रत्यक्ष अनुभवच शेवटी महत्वाचे त्यामुळे ते सर्वांनी लिहित रहा तरच धागा लेख मालिकेचा उद्देश पूर्ण होईल. तसेही पेमेंट कलेक्शनचा धागा केव्हा तरी काढणार होतो तो काढेन मग वर्कींग कॅपिटलच्या उर्वरीत भागाकडे पुन्हा येईन. आज तसाही रविवार वाचक कमी असतात आहे मंगळवार पर्यंत या धाग्यावर अजून प्रतिसाद येतील त्या नंतर उर्वरीत लेखांकडे जाता येईल.

सुबोध खरे's picture

28 Feb 2016 - 10:08 pm | सुबोध खरे

एका वेगळ्या विषयावर लिहायला घेतल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद. एक सूचवावेसे वाटते. आपला लेख बराच सोपा आहे परंतु त्यात उदाहरणे देऊन मुद्दे विशद केले असते तर ते जास्त खेळते/ प्रवाही झाले असते असे वाटते कारण नोकरी करणाऱ्या लोकांना यातील बर्याच गोष्टी समजणे थोडे कठीण आहे असे वाटते. एके काळी सरकारी नोकरी करीत असल्याने या सर्व गोष्टींशी मी पूर्णपणे अनभिज्ञ होतो आज व्यवसाय करीत असल्याने या गोष्टी सहज समजून घेत आल्या.

बाकी भीड भिकेची बहीण असते त्यामुळे सुरुवातीलाच स्पष्टपणे अटी आणि शर्तीन्बद्दल बोलणे करून घ्यावे अन्यथा बोटचेपे पणा केल्यास नुकसान सोसावे लागते.
बहुसंख्य छोटे उद्योजक हातात पैसा आल्यावर धंद्यात टाकण्य ऐवजी चैनीच्या वस्तूंवर पैसा खर्च करताना आढळतात आणि बाजाराची परिस्थिती बिघडली कि धंद्यात खोट येऊ लागते. सुरुवातीच्या दिवसात धंद्यात काही पैसा राखीव म्हणून बाजूला टाकणे आवश्यक आहे अन्यथा पैशाला वाटा फार लवकर फुटतात. धंदा सुरु केल्यवर सुरुवातीला पोट आवळून काम केल्यामुळे पैसा हातात खेळायला लागल्यावर छोट्या उद्योजकाना सढळ हाताने पैसा घरी खर्च करताना पहिले आहे . २००८ च्या मंदीत अनेक लहान उद्योजकांना अशा सवयींमुळे गाशा गुंडाळावा लागल्याचे प्रत्यक्ष पाहिलेले आहे.उदा कर्ज घेऊन मोठे घर किंवा किमती गाडी घेणे. आणि मग धंदा मंद झाल्याने तेच घर विकायला लागले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Feb 2016 - 10:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

उपयोगी विषयावर क्लिष्टता न आणता सुंदर लिहिले आहे !

लेखात काहीसा आदर्शवाद असला आणि देणेकरी-घेणेकर्‍यांसंबंधी प्रत्येक गोष्ट आदर्शवादाला धरून करता येण्याजोगी नसली तरी त्या दोघांच्या कृतीच्या गोळाबेरजेवरच;
(अ) आपला व्यवसाय चालविण्यासाठी लागणारे खेळते भांडवल आणि
(आ) आपले घर चालवण्यासाठी लागणारा निव्वळ फायदा;
हे दोन्हीही ठरत असतात.

तेव्हा त्यांचे समिकरण चुकू नये आणि त्या दोन्ही रकमा कमीत कमी आवश्यक आकारात का होईना पण सतत उपल्ब्ध असाव्यात यासाठी व्यावसायीकाने सतत दक्ष राहण्याची गरज आहे.

तसेच,

१. व्यवसायाच्या "प्रत्येक पायरीत शक्य असलेल्या सर्व बारीकसारीक" धोक्यांचा अभ्यास करून ते (अ) घडू नये यासाठी काय खबरदारी घ्यावी आणि (आ) घडल्यास काळ-श्रम-वित्त-प्रत यांच्यावर कोणते वाईट परिणाम होतील व त्यांचे निवारण करण्यासाठी काय करावे लागेल; हे काम सुरू करण्याआधीपासून ठरवून ठेवा. म्हणजे धोके टाळता येतील व ते घटले तर ऐन वेळेस गोंधळून न जाता त्वरीत कृती करणे शक्य होईल. याला Failure Mode and Effects Analysis (FMEA) असे म्हणतात. व्यवसाय टिकविण्यासाठी आणि त्याची वृद्धी करण्यासाठी केवळ वित्तच नव्हे तर FMEA मधे जमेस धरले जाणारे काळ-श्रम-वित्त-प्रत हे चारही मुद्दे कळीचे मुद्दे आहेत.

२. प्रत्येक व्यवसायात ज्ञात-ज्ञात (known known), ज्ञात-अज्ञात (known unknown) आणि अज्ञात अज्ञात (unknown unknown) असे तीन प्रकारचे धोके असतात. त्यातले पहिले दोन धोके सरळ सरळ माहित असल्याने त्यांच्यासाठी तरतूद केली जाते. मात्र, तिसर्‍या प्रकारचे धोके कोणते आणि ते कधी घडतील हे माहित नसल्याने नियोजनात नेहमी विसरले जातात. त्यांच्यामुळे व्यवसाय बुडीत जाऊ नये यासाठी व्यवसायाच्या स्वरूपाप्रमाणे एका कायम रकमेची तरतूद करणे आवश्यक असते.

३. नवीन व्यवसाय सुरु करताना, व्यवसायाच्या स्वरूपाप्रमाणे, पहिले ६ महिने ते एक वर्ष निव्वळ फायदा शून्य असणार आहे असे जमेस धरून घरखर्चासाठी लागणारी रक्कम वेगळी ठेवली पाहिजे. ती व्यवसायाकरिता वापरू नये.

४. मुख्य म्हणजे, अत्युत्तम यशाची अपेक्षा जरूर ठेवावी पण नियोजन करताना वाईटात वाईट धोक्यांसाठी तयारी करावी (Hope for the best but plan for the worst). आत्मविश्वास अत्यंत आवश्यक आहे पण अतीआशावादाइतके (माझे काहीच वाईट होऊ नये / होऊ शकत नाही) घातक दुसरे काहीही नाही.

यावर अजून लिहायचे आहे जरा वेळ पाहिजे.