गुलाबी थंडीच्या दिवसात सकाळी सकाळी वॉचमन केबिन मधल्या रेडीओमधून आर एन पराडकरांच्या आवाजातील दत्त भक्ती गीते एकामागून एक ऐकू येऊ लागली की दत्त जयंती आल्याचे मला कळते. मी मुलांना,
दत्त दत्त
दत्ताची गाय
गायीचं दूध
वगैरे सांगू लागलो तर मोठा म्हणाला, "आपण म्हशीचं दूध घेतो बाबा, गायीचं इतकं काही खास नसतं असं अम्मा म्हणते." एकंदरीत आपल्या आणि आपल्या मुलांच्या अम्मापुढे कुणाचं काही चालत नाही त्या अत्रीनंदनाला कळले असावे म्हणून त्याने देखील अम्मापेक्षा हम्माच जवळ केली असावी अशी शंका मनाला चाटून गेली. मी मनोमन अवधूताला नमस्कार केला आणि इतर कामांच्या मागे लागलो.
पूजा करायला बसलो असताना ही म्हणाली, "आज मला मैत्रिणी कडे जायचे आहे, मार्गशीर्ष गुरुवारची सवाष्ण म्हणून. तेंव्हा तुम्ही बाहेरच जेवा." दत्त महाराज जागृत देव आहेत हे ऐकून होतो पण सकाळच्या नमस्काराला इतक्या लवकर फळ देतील असे वाटले नव्हते.
मी जिम चालू केल्यापासून आमच्या घरगुती ऋजुता दिवेकरला प्रचंड उत्साह चढला आहे. त्यामुळे मी सध्या कंदमूळ भक्षण करणाऱ्या ऋषी मुनींच्या हालअपेष्टांचे प्रत्यक्ष अनुभव घेत होतो. त्यामुळे, “आज बाहेर जेवा,” अशी आज्ञा मिळाल्यावर मी प्रचंड खूष झालो. मनातल्या मनात त्या मैत्रिणीच्या घरच्या दिनदर्शिकेत, प्रत्येक दिवस मार्गशीर्षाचा गुरुवार म्हणून छापला जावो अशी प्रार्थना केली.
मित्रांना फोन केले पण सगळे लेकाचे कामात बिझी. म्हटलं अरे बाबांनो मी पैसे देतो बिलाचे, पण वर्षाच्या शेवटच्या दिवसात माझे सर्वाहारी मित्र देखील अट्टल मांसाहारी होतात मग त्यांना माझ्या शाकाहारी पार्टीचे कुठून कौतुक असणार. फोन करण्यासाठी मैत्रिणी असण्याइतपत प्रगती मी शालेय आणि नंतरच्या जीवनात केलेली नसल्याने दुपारी जेवण एकट्यानेच उरकत असताना हिचा फोन आला. म्हणाली, "दोन पर्याय आहेत. आज संध्याकाळी एक तर बाजीराव नाहीतर उत्सव. बोला काय बघायला जायचे ते? सासूबाई, माझे आई बाबा, आणि मुलं सगळे येणार आहेत. "
मी सटपटलोच. म्हटलं, "अगं! उत्सव काही सहकुटुंब बघण्यासारखा चित्रपट नाहीये. आणि आता कुठल्या थेटरात लागलाय तो ?" (हा शेवटचा प्रश्न नजीकच्या भविष्याच्या तरतुदीसाठी होता). पण माझ्या सर्व मनसुब्यांवर पाणी फिरवत ही म्हणाली, "ओ शशी कपूर! मी जिमखान्यावरच्या डोंबिवली उत्सव बद्दल बोलतेय." मग इतक्या सगळ्या लोकांना एकावेळी भन्साळीचा बाजीराव दाखवायची मोहीम खुद्द बाजीरावाने देखील नाकारली असती आणि, "एकवेळ मी मस्तानीला सोडतो पण हे असलं काही सांगू नका !" असेच तो म्हणाला असता याची उगाच खात्री वाटल्याने मी उत्सवचा पर्याय स्वीकारला. नंतर धाकटा मला सांगत होता की अम्मा म्हणाली की, "बाबांना बाजीरावाचे नाव सांगितले की ते गुपचूप उत्सवला येतील म्हणून." मला तर खात्री आहे की मागल्या जन्मी ही नाना फडणवीस असावी. पण मी मुलांशी आदराने वागत असल्याने सध्या ते फडणवीसांच्या दप्तरी माझे हेर म्हणून रुजू झाले आहेत.
संध्याकाळी घरी पोहोचलो तर, पूर्वजन्मीचे फडणवीस, त्यांचे आई वडील, सासू आणि माझे दोन गुप्तहेर सगळे तयार होते. दारातच माझ्या हातात चहाचा कप ठेवला आणि पाच मिनिटात तयार व्हायचे फर्मान सोडून सगळेजण खाली उतरले. कार मध्ये बसताना कार थोडी छोटी झाल्यासारखे वाटले. मी धरून पाच मोठे आणि दोन छोटे, कसे बसे आत कोंबून आमची वरात उत्सवच्या दिशेने निघाली. मुलांना तिथली जत्रेसारखी गर्दी आवडते आणि हिला खरेदीची संधी. मला तर वाटते सध्याच्या या बाजारकेंद्रीत समाजामध्ये खरेदीच्या मिळणाऱ्या अगणित संधी आणि त्या साधण्यासाठी घरोघरीच्या काशीबाईन्नी केलेली चढाईच अनेक आधुनिक बाजीरावांना मस्तानीबद्दल विचार देखील करू देत नसतील. बाजाराने प्रेमाचा गळा घोटला हेच खरे.
असे सगळे विचार करत असताना आम्ही जिमखान्याजवळ पोहोचलो. सगळ्यांना गेट जवळ उतरवून मी पार्किंग ची जागा शोधायला पुढे गेलो. पण माझ्या आधी अनेक घरच्या फडणवीसांनी आपापल्या कोतवालाला आणले असल्याने मला पार्किंगला जागाच मिळेना. थोडा थोडा करीत इतका पुढे गेलो की अजून पाच मिनिटे पुढे गेलो असतो तर एक प्रदक्षिणा पूर्ण करून घरीच परत पोहोचलो असतो. शेवटी एका अंधाऱ्या सांदी कोपऱ्यात गाडी उभी केली. तोपर्यंत हिचे लवकर या म्हणून फोन चालू झाले होते. म्हणून मग तिकडून रिक्षा करून पुन्हा उत्सवच्या गेटपर्यंत पोहोचलो.
प्रतिक्रिया
26 Dec 2015 - 2:48 pm | विवेक ठाकूर
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
26 Dec 2015 - 3:41 pm | यशोधरा
खुसखुशीत!
26 Dec 2015 - 3:49 pm | कुसुमिता१
मस्त! खुसखुशित लेखन!
26 Dec 2015 - 3:53 pm | पद्मावति
मस्तं, खुसखुशीत. पु.भा.प्र.
26 Dec 2015 - 3:57 pm | बिपिन कार्यकर्ते
मज्जा!
26 Dec 2015 - 4:27 pm | किसन शिंदे
मज्जा आली वाचताना. खुसखूशीत पद्धतीने लिहिलंय.
26 Dec 2015 - 5:04 pm | संजय पाटिल
तुम्ही बाहेर जेवा असे आमिष दाखवले ..
बहुतेक मोठा फटका बसणार असे वाटत्येय...
पु. भा. प्र.
26 Dec 2015 - 5:11 pm | एस
पुभाप्र!
26 Dec 2015 - 5:27 pm | अजया
:)पुभाप्र.
26 Dec 2015 - 6:38 pm | इशा१२३
मस्तच! पुभाप्र...
26 Dec 2015 - 9:04 pm | बोका-ए-आझम
पुभाप्र!
26 Dec 2015 - 9:29 pm | कंजूस
आगरी महोत्सवालापण गेलात?
26 Dec 2015 - 10:05 pm | Anand More
नाही... तेव्हा बाजीराव आला नव्हता
26 Dec 2015 - 10:23 pm | पैसा
मस्तय!
27 Dec 2015 - 5:54 am | सोत्रि
सुरूवात खुसखुशीत झालीय एकदम, लवकर येउद्या पुढचा भाग. पुभाप्र!
- (कोतवाल असलेला) सोकाजी
27 Dec 2015 - 10:06 am | उगा काहितरीच
हाहाहाहा मस्त! पुभाप्र ...
27 Dec 2015 - 10:08 am | एक एकटा एकटाच
चांगलाय
28 Dec 2015 - 8:26 am | चतुरंग
लै भारी!
(पर्मनंटकोतवाल्)रंगा
28 Dec 2015 - 1:05 pm | मी-सौरभ
तुमच्या लेखन शैलीचा फॅन झालोय सर :)
28 Dec 2015 - 1:39 pm | चांदणे संदीप
मी पण! :)
Sandy