जि. प. प्रा.

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
18 Dec 2015 - 10:27 pm

"पाटीवर तुमचं आवडतं चित्रं काढा" गुर्जी मनले.
मी समद्यात पुढं. म्हंजी बसायला. बसलो 'टरक' काढत. दोन आडव्या रेघा. मग ऊभ्या. मग कॅबिन. मग चाकं. गेलो गढून. म्हागं समदी ऊभी राहिली. नान्या वाकून माझ्या पाटीत बघाय लागला.
"थांबा रं, त्यला आधी टरक काढू द्या" खुडचीवर बसलेल्या 'बाई' माझ्या डोक्यात टुपक्कन छडी मारत मनल्या. ही तर जगदंबाच. माझ्या ओझरतं कानावर आलं पण सुटून गेलं. डोक्यावर काय पडलं म्हणुन हात बी फिरवला.
नान्या माझ्या म्होरनं वर्गाभाईर जायला लागला.
"ये, आरं सर, माज्या आधी?" पाटी फेकत त्याला आडवत म्या आडवलं. आन एकदम ध्यानात आलं, मधली सुट्टी झाली वाटतं. च्यायला ह्या टरकंच्या नादात लक्षातच न्हाय आलं.
मग आमी नेहमीप्रमाने एप राईट करत लाईनीनं भाईल आलो. पोर रस्त्याच्या कडनं वाळलेल्या गवताला पाणी देत सुटली. सगळ्यात म्होरं नंबर लावून मी पण जाऊन आलू. रस्त्याच्या कडंला ओढा. त्याच्यात गच्च झाडं. गाभुळ्या चिच्चा उंचावर लटकलेल्या. पण तिकडं आमी कधी जायचू न्हाय. हाडुळीन हाय म्हण तिकडं.
मग मी मैदानात यीऊन झेंड्याच्या पायरीवर बसलू. तेवढ्यात नान्या आला. चार पदरी चपाती आणलीय म्हणाला. 'त्याल' टाकून त्याच्या आयशीनं टम्म फुगवलीय म्हणला.
"मला यक घास द्यायचा बरका" बंट्या मधनंच म्हणला. नान्या म्हणला, बरं. ही बारकी सुट्टी हुती. मोठ्या सुट्टीला आजून टाईम हुता.
मग आम्ही दंड वाफा खेळत बसलू. बब्यानं भाईर यीऊन शिट्टी मारली. समदी पोरं पुन्हा वर्गात गीली. मी बी गीलू.
पाटीवरची 'टरक' बघीतली आन पुसून टाकली. हिच्यामुळंतर आज आमचा पोपट झाला.
मग गुर्जी 'झेल्या' शिकवत बसलं चौथीच्या पोरांला. आमी आपलं ' सोनुताई सोनुताई' करत सुरात वरडत बसलू. तेवढ्यात दरवाज्यापशी चार 'ठोकळं' यीऊन ऊभं राहीलं. गुर्जीनं शिकवणं थांबवून त्यंला आत घेतलं. धरुन आणल्यावणी चौघंपण टेबलापशी भितीला टेकून आंग चोरत ऊभी राहिली.
"काय रे, नाव काय तुमचं?" गुर्जीनं ईचारलं.
थोडी चुळबूळ झाली मग मोठा 'ठोकळा' पुढं झाला.
"गोरख निंबाळकर, ह्या नळाच्या कडंकडंनं आलू, मग बंधाऱ्यावर पाण्यात पवलू, मग वढ्यात चिच्चा काढाय झाडावर चढलू, मग 'बई'नं बघीतलं, आन हितं घीऊन आली."
तो जे काय बोलला, समदं माज्या डोक्यावरनं गेलं. पण गर्जीम्होरं यवढ्या डिरींगनं बोलणारा पैल्यांदाच बघितला. मला तर तो पारधीच वाटला.
" गण्या, ह्यंला बसायला जागा दी, आन निंबाळकर रोज शाळंत यायचं, भांडणं करायची न्हायती, आंघुळ करुन यायचं " च्यायला ह्यंला शाळंत घेतलबी. मजी ही आशीच फिराय आलती, आन ह्यंला शाळंत घेतलबी. का मधलं मला काय आयकूच आलं न्हाय. का आमीच एखादी 'टरक' बिरक काढत बसलू हुतू. मला काय हा प्रकार झेपला न्हाय.
बब्या आमचा गरीबडा. दिसायला. पण आतून लय निबरा. आन हो नवा ठोकळा 'निंब्या' दिसायला राकट. पण जरा गरीबडाच वाटला. मोठ्या सुट्टीत बब्यानं त्याला धू धू धुतला. पार मातीत घोसाळला. हा मंजी 'पुंगी' खेळताना भांडण व्हायचीच. पण पैल्याच दिवशी बब्यानं त्याला पाणी पाजलं. गुर्जीनं त्याला उलट्या हातावर छड्या हाणल्या. मग आमी उस उस करत घरी गीलू.

दुसऱ्या दिवशी जवा शाळंत आलू तवा बब्या नारळाच्या झाडाखाली दगडावर बसला हुता. मी बी आपला त्याच्या म्हागं जाऊन ऊभं राहिलू. आमी काय कुटं बी जाऊन आसंच ऊभं राह्यचू. शाळा भराय आजून टायम हुता.
"हि आशी जीभ फिरवायची व्हटावरनं, लगीच घुलती" आब्ज्या सागत हुता बब्याला. बब्या कान दिऊन ऐकत हुता. मला काय तर गंभीर चाललयं यवढं समजलं. मग आमी धोपटी घीऊन पुन्हा झेंड्याच्या पायरीवर जाऊन बसलू. बसल्या बसल्या डबा काढून कांदापोह्याचं चार घास तिथंच फस्त केलं. तेवढ्यात नान्या आला. मला मनला, टुक टुक माकाड.
"तुज्या तर आयचा..." धोपटी टाकून मी त्याच्या म्हागं लागलू. मला बघून बाप्या बी त्येज्या म्हागं लागला. पाण्याच्या टाकीभोवती गोलगोल फिरुन त्ये ब्येनं डांबरीवरनं वढ्यात घुसलं. आमास्नी काय घावलं न्हाय. मग बाप्या म्हणला, " त्येला बघतुच संध्याकाळी, तु कशाला त्यच्या नादी लागतू रं?"
"त्येच्या तर आयचा..." मग गुर्जी आलं. आमी धुपटी घीऊन वर्गात बसलू.
मग आमचं पुना एकदा "सुनुताई, सुनुताई" सुरु झालं. मग दुधाची गाडी आली. मोठ्या ठोकळ्या पोरांनी जाऊन 'किरेट' ऊचलून आत आनलं. गुर्जीनं कात्रीनं पिशवीचं कोपरं छाटत दूध वाटायला सुरु केलं. वर्षी वर्गातली सगळ्यातली 'सुंदर' पोरगी. 'सुंदर' हा शबुद आम्हा समद्यास्नी तिच्यामुळंच समजला. बब्याच्या भाषेत 'चिकणी'. केसात फुलाफुलांचा पट्टा घालून यायची. पण तिला दूध आवडत नसायचं. आधी बळंबळं प्यायची मग एके दिवशी सोडूनच दिलं. मग बब्यानबी सोडून दिलं. एके दिवशी माज्या शेजारी बसणाऱ्या 'शाकी'नबी सोडून दिलं. मग म्या बी सोडून दिलं.
'मोज्या'! त्याचं खरं नाव शाहजहान का कायतरी हुतं. पण त्याला 'मोज्या' का म्हणायची काय म्हाईत. एकदम 'ढ' पोरगं. हासताना पोरीसारखं त्वांड करायचं. हावऱ्या हावऱ्यासारखं दूध प्यायचं. एकदिशी त्यनंबी सोडून दिलं. च्यायला हे जळपाटनं आजून कुणावर मरतयं. बहुतेक वर्षीवरच. पण वर्षी कुणाला भाव देत न्हवती. ती फकस्त बब्याची पेशल लाईन. तर आता झोप आलीय. झोपतुच आता. बाकी ऊंद्या.

कथाजीवनमानशिक्षणमौजमजाप्रकटनप्रतिभा

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

18 Dec 2015 - 10:54 pm | चांदणे संदीप

झकासच की!! :))

जुना, परत न येण्यासाठी गेलेला काळच क्षणभरासाठी डोळ्यासमोर तरळला!

ही तर माझीच गावातली शाळा!
मस्त...मस्त...मस्त!
Sandy

आनंद कांबीकर's picture

18 Dec 2015 - 11:23 pm | आनंद कांबीकर

झोपा आता! पर उंदयाच्याला अजुन असलच चान चान लिव्हायचं बरका!

किसन शिंदे's picture

18 Dec 2015 - 11:34 pm | किसन शिंदे

भाषा, माहोल मस्तच जमवलाय..पण जरा सरधोपट मार्गाने जाते.

आजून लित र्‍हावा की अस्लं काय बाय..

फारच मजेशिर.जि.प.च्या कित्येक शाळा डोळ्यासमोर आल्या.फक्कड.

अजया's picture

19 Dec 2015 - 11:30 am | अजया

खरंच फक्कड !

नाखु's picture

19 Dec 2015 - 12:58 pm | नाखु

मागची पोरं पाडत्यात म्हणून खिश्यात टाकून बसलोय.. पुढची ष्टूरी ऐकायला..

जीवन शिक्षाण मंदीर

DEADPOOL's picture

19 Dec 2015 - 6:24 pm | DEADPOOL

एक नं!

संदीप डांगे's picture

19 Dec 2015 - 7:43 pm | संदीप डांगे

जि करून टींब, प करून टिंब, प्रा करून टिंब, म करून टींब, शाळा. ल्हानपन आटोलं...

जव्हेरगंज's picture

21 Dec 2015 - 2:05 pm | जव्हेरगंज

म करून टींब?

हे नाही समजले.

चांदणे संदीप's picture

21 Dec 2015 - 4:10 pm | चांदणे संदीप

अस शाळेत शिकत असताना बरीच मुल लिहिता लिहिता स्वत:शीच बोलत राहतात.
मीही त्यातलाच एक! तुम्ही नाही का??

संदीप डांगे's picture

21 Dec 2015 - 5:25 pm | संदीप डांगे

मराठी...

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा. ते म. आधी की प्रा. आधी आहे ते आठवत नाही आता.

कैलासवासी सोन्याबापु's picture

19 Dec 2015 - 7:49 pm | कैलासवासी सोन्याबापु

पोर रस्त्याच्या कडनं वाळलेल्या गवताला पाणी देत सुटली.

जव्हेरभाऊ स्टाइल म्हणतात ती माझ्यामते हीच!! काय मायला निरिक्षण!! काय मातीत जगण्याचा अनुभव असलेले दिसणे, काय तो बाज! अप्रतिम

अभ्या..'s picture

19 Dec 2015 - 10:25 pm | अभ्या..

"हि आशी जीभ फिरवायची व्हटावरनं, लगीच घुलती"

तिज्यायला. तवाची लॉजिक लैच खत्रा.
भारी जव्हेरभौ. यूवूंद्या वर्षीचे आजून काय किस्से.

सौन्दर्य's picture

19 Dec 2015 - 11:27 pm | सौन्दर्य

जव्हेरगंज साहेब, तुम्ही फारच सुंदर लिहिता, वाचायला आवडतं देखील. पण एक गोची होते, संपूर्ण आयुष्य मुंबईत आणि मोठ्या शहरात गेल्याने तुमच्या गोष्टीतील एकूण एक शब्दांचे अर्थ कळतीलच असे नाही. आता वरील गोष्टीतील, दंड वाफा, ठोकळा, पुंगी, उस उस करत, घुलती, डांबरीवरनं, जळपाटनं ह्या शब्दांचे अर्थ संदर्भांनुसार लावण्याचा प्रयत्न केला, पण ते अर्थ बरोबरच असतील असे नाही. तुमच्या लेखाच्या/गोष्टीच्या शेवटी, "मराठी धड्याच्या खाली 'कठीण शब्दांचे अर्थ' दिले असतात, तसे तुम्ही द्या" असे म्हणून तुमच्या ह्या लिहिण्याच्या शैलीचे मला अवमूल्यन करायचे नाही, पण ह्यातून काहीतरी मार्ग निघावा असे वाटते. तसे केल्याने तुमच्या लिखाणाचा आस्वाद अजून चांगल्या प्रकारे घेता येईल असे मला वाटते.

जव्हेरगंज's picture

21 Dec 2015 - 7:28 pm | जव्हेरगंज

धन्यवाद सौन्दर्य,
काही शब्दांचे अर्थ मलाही माहीत नसतात. जमेल तसे देतो.

दंड वाफा = लहान मुलं खोटी खोटी शेती खेळतात त्यातला प्रकार.

ठोकळा= याऐवजी तुम्ही 'दगड' ही वापरु शकता.

पुंगी= फार मजेशीर खेळ आहे. विस्तृत लिहावे लागेल. पुन्हा कधीतरी सांगेन.

उस उस करत= हळहळ करत

घुलती= फशी पाडणे

डांबरीवरनं= रस्त्यावरुन

जळपाटनं = येडचाप

धन्यवाद सर्वाचे :)

जव्हेरगंज's picture

21 Dec 2015 - 4:13 pm | जव्हेरगंज

:)