विश्वाचे आर्त - भाग २ - नासदीय सूक्त

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जनातलं, मनातलं
4 Dec 2015 - 10:28 pm

भाग १ - काळाचा आवाका

ऋग्वेद १०.१२९ । ऋषिः परमेष्ठी प्रजापतिः । छन्दः त्रिष्टुप् । देवता भाववृत्तम् ।

नास॑दासी॒न्नो सदा॑सीत्त॒दानीं॒ नासी॒द्रजो॒ नो व्यो॑मा प॒रो यत् ।
किमाव॑रीवः॒ कुह॒ कस्य॒ शर्म॒न्नम्भः॒ किमा॑सी॒द्गह॑नं गभी॒रम् ॥ १ ॥

न मृ॒त्युरा॑सीद॒मृतं॒ न तर्हि॒ न रात्र्या॒ अह्न॑ आसीत्प्रके॒तः ।
आनी॑दवा॒तं स्व॒धया॒ तदेकं॒ तस्मा॑द्धा॒न्यन्न प॒रः किं च॒नास॑ ॥ २ ॥

सृष्टीच्या सुरूवातीला काहीच नव्हतं. असणं नव्हतं किंवा नसणंही. धुळीची जमीन नव्हती, की वर आकाश नव्हतं. काही झाकलेलं नव्हतं, की लपलेलं नव्हतं. त्या क्षणी ना मृत्यू होता, ना मृत्यूपासून सुटका. एका निर्वात, निरावकाशाने स्वतःला जेव्हा आणलं, आणखी काही काही तिथे नव्हतं.
----

कुठल्यातरी तप्त वायूंची एक तबकडी स्वतःभोवती भिरभिरली. त्यातला मुख्य भाग गुरुत्वाकर्षणाने केंद्राकडे खेचला गेला. हा आपला सूर्य. त्या तबकडीच्या काही भागांत इतर वायू गोळा झाले. त्यांचे जागोजागी गोळे झाले. ते अव्याहतपणे गुरुत्वाकर्षणाने सूर्याभोवती फिरत राहिले. पोटात कमीजास्ती आग राखून ठेवून थिजले. आपापल्या परीने घट्ट-विरळ, ओले-कोरडे, थंड-गरम झाले. हे आपले सूर्यमालेतले ग्रह. त्यातलीच एक आपली पृथ्वी. पृथ्वीच्या उकळत्या लाव्ह्यावर थंड सायी आल्या, त्यांची जमीन झाली. पोटातून निसटणारी वाफ पाणी होऊन जमिनीवर स्थिरावली आणि वातावरणाचं पांघरुण टिकून राहिलं. त्यातच आपल्याला दिसणारी सर्व जीवसृष्टी फुलली. ही गेल्या साडेचार अब्ज वर्षांची कथा आहे. पण मुळात ही तप्त वायूची तबकडी आली कुठून?

त्यासाठी आपल्याला अजून मागे जावं लागतं. गेल्या लेखात आपण पृथ्वीच्या वयाचा अंदाज घेण्यासाठी एक वाव पसरून उभा राहिलेल्या माणसाची प्रतिमा डोळ्यांसमोर आणली. पण संपूर्ण विश्वाचा उगम बघायचा झाला तर त्या माणसाच्या अलिकडे अजून दोघांना वाव पसरून उभं राहावं लागेल. कारण विश्वाचं वय पृथ्वीच्या वयाच्या जवळपास तिप्पट आहे - १३.८ अब्ज वर्षं. हे वय आपल्याला अगदी अचूकपणे माहीत आहे - त्यातली संभाव्य त्रुटी हजारात पाच इतकीच आहे. आता हे वय कसं मोजलं? हे समजावून घेण्यासाठी आपल्याला महास्फोटाचा सिद्धांत (ज्याला सामान्यपणे बिग बॅंग असं नाव आहे) थोडासा समजावून घ्यावा लागेल.

दूरदूरच्या दीर्घिकांचा (आपल्या आकाशगंगेप्रमाणेच इतर तारकासमूहांचा) अभ्यास करताना शास्त्रज्ञांना हे लक्षात आलं की प्रत्येक तारकासमूह आपल्या आकाशगंगेपासून दूर दूर चाललेला आहे. हे काहीसं चक्रावून टाकणारं होतं. कारण पृथ्वी हे विश्वाचं केंद्रस्थान नाही, तो एका साध्यासुध्या दीर्घिकेतल्या साध्यासुध्या ताऱ्याभोवती फिरणारा ग्रह आहे हे उघड होऊनही शतकं लोटली होती. मग आता बरोब्बर आपणच केंद्रस्थानी असल्याप्रमाणे विश्व का वागत होतं? थोडी गणितं केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे तारकासमूह नुसतेच दूर जात आहेत असं नाही, तर जितके लांबचे तितके अधिक वेगाने दूर जात आहेत. याची सांगड कशी लावायची? लवकरच त्यांना उत्तर सापडलं. हे तारकापुंज फक्त आपल्यापासून दूर जात नसून, सगळेच सगळ्यांपासूनच दूर जात आहेत. किंवा वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर हे विश्वच प्रसरण पावतं आहे. अवकाशाची व्याप्तीच वाढते आहे.

गुलाबजाम तळायला टाकला की तो मोठा होतो हे आपण अनुभवलेलं आहे. आता कल्पना करूया की त्या गुलाबजामच्या आतमध्ये सगळीकडे पसरलेले बरेचसे वेलचीचे दाणे आहेत. आपण कुठच्यातरी वेलचीच्या दाण्यावर बसून इतर दाण्यांकडे बघत आहोत अशीही कल्पना करू. जसजसा गुलाबजाम मोठा होत जाईल, तसतसे तुमच्या मागचे पुढचे, वरचे खालचे सर्वच दाणे आपल्यापासून दूर जाताना दिसतील. कारण आख्खा गुलाबजाम फुलतो आहे. आता हा गुलाबजाम म्हणजे संपूर्ण विश्व, त्यातला खवा म्हणजे अवकाश, आणि वेलचीचे दाणे म्हणजे तारकासमूह हे समजून घेतलं की सर्वच तारकासमूह आपल्यापासून दूर का जात आहेत याचं कोडं सुटतं. किंवा हीच कल्पना एका फुग्याचं उदाहरण घेऊनही सांगता येते. समजा, एका फुग्यावर अनेक ठिपके काढलेले आहेत. यापैकी कुठल्याही दोन ठिपक्यांमधलं अंतर फुग्याच्या पृष्ठभागावर रेषा काढून मोजता येतं. आपण जसजसा फुगा फुगवू तसं प्रत्येकच ठिपक्यांच्या जोडीतलं अंतर वाढताना दिसेल.

तर विश्व विस्तारतं आहे. याचा अर्थ आपण जसजसं इतिहासात जाऊ तसतसं ते लहान होत जाणार. आणि एक क्षण असा येईल की ते एका बिंदूमध्ये सामावलं असेल. तिथपासून ते आत्तापर्यंतच्या विस्ताराची कथा भौतिकीच्या (फिजिक्सच्या) नियमांच्या आधारे सांगणारा सिद्धांत म्हणजे महास्फोट सिद्धांत - बिग बॅंग थियरी. या सिद्धांताच्या आधारे या स्फोटानंतरच्या अगदी काही मिलीसेकंदांपासून पुढे काय झालं याचं अगदी स्पष्ट टप्प्याटप्प्याचं चित्र मांडण्यात शास्त्रज्ञ यशस्वी ठरलेले आहेत. या मांडणीमुळे अर्थातच 'इतक्या अब्ज वर्षांनी अमुक अमुक गोष्टी दिसतील इतक्या इतक्या प्रमाणात दिसतील' अशा प्रकारची काही भाकितं करता येतात. त्यातली एक म्हणजे विस्ताराचा वेग. एका विशिष्ट प्रकारच्या सुपरनोव्हांचा - अत्यंत प्रखर ताऱ्यांचा - अभ्यास करून हा वेग मोजला. तो बरोब्बर १३.८ अब्ज वर्षांनी जितका असायला हवा तितका आला. कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राउंड रेडिएशन वापरून तापमानात होणारे चढउतार मोजले. तेही त्याच सिद्धांताच्या गणितानुसार १३.८ अब्ज वर्षांनी जितके असायला हवे तितकेच आहेत हे दिसून आलं. तसंच तारकासमूहांचं एकमेकांपासूनचं सरासरी अंतर किती असेल याचंही महास्फोट सिद्धांतानुसारचं गणित आणि सध्याचं निरीक्षण यामधूनही १३.८ अब्ज वर्षांचाच आकडा मिळतो.

थोडक्यात या सिद्धांताच्या तीन अंगांचा अभ्यास केला तर तिन्हींमधून उत्तर एकच येतं - आणि सत्याशी मिळतंजुळतं ठरतं. यापलिकडे अवकाशात प्रत्यक्षात दिसणाऱ्या अनेक गोष्टींची संगती लागते. महास्फोटाच्या सिद्धांतानुसार हायड्रोजन आणि हेलियम विश्वात प्रचंड प्रमाणात असतील आणि तसेच ते दिसतात. 'कॉस्मिक मायक्रोवेव्ह रेडिएशन दिसायला हवं' हेही महास्फोट सिद्धांताचं - आता खरं ठरलेलं भाकित आहे. म्हणजे आरोपीच्या हाताचे ठसे शस्त्रावर मिळणं, मृत व्यक्तीच्या कपड्याचे तंतू आरोपीच्या अंगावर सापडणं, शस्त्र विकत घेतल्याची पावती त्याच्याकडे सापडणं असे तीन स्वतंत्र पुरावे सापडले तर आरोपीच खुनी आहे हे ओळखू येतं. त्याहीपलिकडे त्याच्याकडे खून करण्यासाठी सबळ कारण असणं, आधी त्याने धमकी दिलेली असणं, त्या वेळेसाठी त्याच्याकडे दुसरीकडे असण्याचा पुरावा नसणं हेही दिसून आलं तर त्यावर शिक्कामोर्तबच होतं. इतकेच किंवा त्याहूनही अधिक भक्कम पुरावे महास्फोट सिद्धांतासाठी आहेत. याचा अर्थ सगळेच बारीकसारीक प्रश्न सुटलेले आहेत असं नाही. पण म्हणून आत्तापर्यंत सापडलेलं उत्तर टाकून देण्याची पाळी येणार नाही इतकं चांगलं सर्वसाधारण उत्तर सापडलेलं आहे हे निश्चित.

पण मग १३.८ अब्ज वर्षांपूर्वी काय होतं? हा महास्फोट का झाला? तो कोणी घडवून आणला का? हे प्रश्न थोडे फसवे आहेत. कारण काळ आणि अवकाशच सुरू होण्याचा तो 'क्षण' आहे. अवकाश म्हणजे काही खरोखरचा गुलाबजाम नाही, जो आधी कोणीतरी तयार करावा लागतो. आख्खं विश्वच त्या एका बिंदूत सामावलेलं होतं. तिथपासून वेळेची मोजणी सुरू झाली. असं असताना 'त्याआधी काय होतं?' हा प्रश्नच निरर्थक ठरतो - शून्याने भाग देण्यासारखा.

वर उद्धृत केलेल्या नासदीय सूक्तात म्हटलेलं आहे - 'सृष्टीच्या सुरूवातीला काहीच नव्हतं. असणं नव्हतं किंवा नसणंही.' ही न-असण्याची स्थिती आपल्याला डोळ्यासमोर आणता येत नाही. 'धुळीची जमीन नव्हती, की वर आकाश नव्हतं.' या वस्तुमान अवकाश नसण्याच्या स्थितीची कल्पनाही आपल्याला करता येत नाही. नासदीय सूक्ताच्या कर्त्याला अर्थातच महास्फोट सिद्धांताचं ज्ञान नव्हतं. कारण या कळसापर्यंत पोचण्यासाठी आधी न्यूटन, नंतर आइन्स्टाइन आणि त्यानंतर आलेल्या अनेक शास्त्रज्ञांनी बांधलेल्या पाया, पायऱ्या आणि खांबांचा आधार लागतो. जर कोणीतरी काढलेल्या चित्रात आजच्या देवळाच्या कळसासारखा आकार दिसत असेल तर त्यावरून त्याकाळी आख्खं देऊळ होतं असं म्हणणं योग्य ठरत नाही. नासदीय सूक्तातलं वर्णन हे काव्यात्म वर्णन आहे. सत्य परिस्थितीच्या जवळ जाणारं आहे इतकंच. शब्दांच्या, भाषेच्या मर्यादा या सूक्तातही जाणवतात - कारण काळच सुरू झालेला नसतानाही तिथे-तेव्हा असे स्थितीकालदर्शक शब्द वापरल्यावाचून त्या परिस्थितीचं वर्णन करता येत नाही. त्यामुळे हा महास्फोट कोणी केला, कधी केला, कुठे केला हे प्रश्नच काहीसे निरर्थक बनून जातात. तो झाला हेच निश्चितपणे म्हणता येतं.

(मी मराठी लाइव्हवर पूर्वप्रकाशित)

हे ठिकाणविचार

प्रतिक्रिया

सोप्या भाषेतला छान लेख.

अर्धवटराव's picture

5 Dec 2015 - 12:24 am | अर्धवटराव

एकदम सरस.

संदीप डांगे's picture

5 Dec 2015 - 12:58 am | संदीप डांगे

येउदेत. छान चालली आहे मालिका... अगदी सोप्या सहज भाषेत.

रामपुरी's picture

5 Dec 2015 - 4:55 am | रामपुरी

"त्यामुळे हा महास्फोट कोणी केला, कधी केला, कुठे केला हे प्रश्नच काहीसे निरर्थक बनून जातात. तो झाला हेच निश्चितपणे म्हणता येतं"
"हा प्रश्नच निरर्थक ठरतो - शून्याने भाग देण्यासारखा"
हे पटलं नाही. प्रश्न निरर्थक ठरतात म्हणजे काय? यात आता पुढे संशोधन करण्यात अर्थ नाही हे सर्व वैज्ञानिकांनी स्वीकारले आहे काय? आणि त्याप्रमाणे त्यातले संशोधन आता थांबले आहे काय?
पुढचे देव्/ईश्वर वगैरे अडचणीचे ठरणारे प्रश्न टाळण्याचा हा प्रयत्न वाटतोय.
बाकीचे तपशील ठिकठाक.

राजेश घासकडवी's picture

5 Dec 2015 - 7:47 am | राजेश घासकडवी

हे पटलं नाही. प्रश्न निरर्थक ठरतात म्हणजे काय?

काळ सान्त आहे ही कल्पना आपल्याला करता येत नाही. त्यामुळे काळ कधीतरी सुरू झाला ही कल्पनाही करणं कठीण आहे. पण एकदा ती करता आली की 'त्याआधी' याला काही अर्थ राहात नाही.

'शून्याने भागणं हे निरर्थक आहे म्हणजे काय? त्यापुढे संशोधन करण्यात अर्थ नाही हे सर्व गणितज्ञांनी स्वीकारले आहे काय?' यासारखाच हा प्रश्न आहे. शून्याने भागून उत्तरं काय येतात, आणि त्याने गणितातलं संशोधन पुढे कसं जातं हे तुम्हीच का नाही सांगत?

असो. ही लेखमाला प्रस्थापित विज्ञान काय सांगतं याविषयी आहे. तुमचे विचार जर वेगळे असतील, तर तुम्हाला ते बाळगण्याचं स्वातंत्र्य जरूर आहे. पण प्रस्थापित विचार बदलण्यासाठी तुम्हाला काही करायचं असेल तर ते तितकं सोपं नाही एवढंच बोलून थांबतो.

संदीप डांगे's picture

5 Dec 2015 - 9:04 am | संदीप डांगे

तुमचे विचार जर वेगळे असतील, तर तुम्हाला ते बाळगण्याचं स्वातंत्र्य जरूर आहे. पण प्रस्थापित विचार बदलण्यासाठी तुम्हाला काही करायचं असेल तर ते तितकं सोपं नाही एवढंच बोलून थांबतो.
हे एक जब्राट स्टेटमेंट आहे. अध्यात्मापासून धर्मापर्यंत, राजकारणापासून भ्रष्टाचारापर्यंत कुठल्याही वाद-विवादात चपखल बसतं..

=))

ही लेखमाला प्रस्थापित विज्ञान काय सांगतं याविषयी आहे. तुमचे विचार जर वेगळे असतील, तर तुम्हाला ते बाळगण्याचं स्वातंत्र्य जरूर आहे. पण प्रस्थापित विचार बदलण्यासाठी तुम्हाला काही करायचं असेल तर ते तितकं सोपं नाही

बैलाचा डोळा स्टेटमेंट !
बाकी, १३.८ अब्ज वर्षांपूर्वी जे काही होतं किंवा नव्हतं, ते निरर्थक आहे, हे पटत नाही. असं म्हणता येईल की आजचे विज्ञान अजून त्या मितीचा थांग लावण्यात अयशस्वी ठरले आहे. पण भविष्यात नक्कीच ते समजू शकेल.
(आशावादी) स्नेहा

रामपुरी's picture

5 Dec 2015 - 8:55 pm | रामपुरी

'शून्याने भागणं हे निरर्थक आहे म्हणजे काय? त्यापुढे संशोधन करण्यात अर्थ नाही हे सर्व गणितज्ञांनी स्वीकारले आहे काय?' यासारखाच हा प्रश्न आहे.
फक्त एकदा गूगलून पाहीले असते तरी खालील उत्तर मिळाले असते.

"When something is divided by 0, why is the answer undefined? The reason is related to the associated multiplication question. If you divide 6 by 3 the answer is 2 because 2 times 3 IS 6. If you divide 6 by zero, then you are asking the question, "What number times zero gives 6?"

स्पष्ट आणि सहज समजण्याजोगी संकल्पना. म्हणून शून्याने भागणे निरर्थक आहे. पण तुम्ही ज्या विषयावर बोलत आहात तो एवढा सरळ आहे का?

"ही लेखमाला प्रस्थापित विज्ञान काय सांगतं याविषयी आहे"
आता असं वाट्त नाही. तसं असतं तर तुम्ही हे नक्की सांगितलं असतं कि हि थियरी आत्तापर्यंतच्या शोधांना पूरक आहे म्हणून जास्तीत जास्त लोकांनी स्विकारलेली आहे. यापुढचे संशोधन अजून बाकी आहे.

तुमचे विचार जर वेगळे असतील, तर तुम्हाला ते बाळगण्याचं स्वातंत्र्य जरूर आहे. पण प्रस्थापित विचार बदलण्यासाठी तुम्हाला काही करायचं असेल तर ते तितकं सोपं नाही एवढंच बोलून "मी सुद्धा" थांबतो.

दमामि's picture

5 Dec 2015 - 7:21 am | दमामि

आवडला लेख.

sagarpdy's picture

5 Dec 2015 - 8:35 am | sagarpdy

मस्त. पु भा प्र

sagarpdy's picture

5 Dec 2015 - 8:36 am | sagarpdy

मस्त. पु भा प्र

नासदासीन्नोसदासीत्तादानीं नासीद्रजो नो व्योमापरो यत |
किमावरीव: कुहकस्यशर्मन्नम्भ: किमासीद्गहनं गभीरं ||

आणि हे त्याचे आर्वाचिन भाषांतर :

सृष्टीसे पहले कुछ नहीं था...
सत भी नही, असत भी नही

अंतरिक्ष भी नहीं , आकाश भी नहीं था...
छिपा था क्या ,कहां,किसने ढका था....
उस पल तो आगम,अटल जल भी कहां था...

सृष्टीका कौन है कर्ता ?...
कर्ता है वा अकर्ता ?
ऊंचे आकाशमे रहता...
सदा अध्यक्ष बना रहता...
वोही सच मुचमे जानता
या नही भी जानता...
है किसीको नही पता....
नही पता,
नही है पता, नही है पता ......

http://www.misalpav.com/comment/431921#comment-431921 या प्रतिसादात वाचले होते.

भारत एक खोज वा भारत की खोज असली काही सिरीयल होती तिचं टायटल सॉंग होतं ना हे?

बोका-ए-आझम's picture

5 Dec 2015 - 10:46 am | बोका-ए-आझम

श्याम बेनेगल यांच्या भारत एक खोज या मालिकेचं हे शीर्षकगीत होतं. पं. वसंत देव यांनी ते लिहिलेलं आहे.

तुषार काळभोर's picture

5 Dec 2015 - 10:46 am | तुषार काळभोर

पंडीत नेहरुंच्या 'डिस्कवरी ऑफ इंडिया'वर आधारित ती मालिका होती.
शीर्षकगीत खरोखर एकदम मस्त आहे.

राजेश घासकडवी's picture

5 Dec 2015 - 3:51 pm | राजेश घासकडवी

धनंजयने या संपूर्ण सूत्राचं उत्तम मराठी भाषांतर आणि विवेचन केलेलं आहे. खाली त्यातला केवळ भाषांतराचा भाग डकवतो आहे. संपूर्ण लेख इथे वाचायला मिळेल.

१०.१२९ । ऋषिः परमेष्ठी प्रजापतिः । छन्दः त्रिष्टुप् । देवता भाववृत्तम् ।

नास॑दासी॒न्नो सदा॑सीत्त॒दानीं॒ नासी॒द्रजो॒ नो व्यो॑मा प॒रो यत् ।
किमाव॑रीवः॒ कुह॒ कस्य॒ शर्म॒न्नम्भः॒ किमा॑सी॒द्गह॑नं गभी॒रम् ॥ १ ॥
तेव्हा ना असणे ना नसणे होते,
धूळही नव्हती, ना आकाश पल्याड
कुठे, काय आश्रय, काय आवरण होते?
होते का पाणी गहन आणि गाढ?

न मृ॒त्युरा॑सीद॒मृतं॒ न तर्हि॒ न रात्र्या॒ अह्न॑ आसीत्प्रके॒तः ।
आनी॑दवा॒तं स्व॒धया॒ तदेकं॒ तस्मा॑द्धा॒न्यन्न प॒रः किं च॒नास॑ ॥ २ ॥
ना होता मृत्यू, ना अमृतत्व तेव्हा
रात्री-दिवसांचे प्रकटणे नव्हते
निर्वाताने एका स्वत:ला आणले जेव्हा,
आणिक नव्हते नाही, काहीच नव्हते.

तम॑ आसी॒त्तम॑सा गू॒ळ्हमग्रे॑ऽप्रके॒तं स॑लि॒लं सर्व॑मा इ॒दम् ।
तु॒च्छ्येना॒भ्वपि॑हितं॒ यदासी॒त्तप॑स॒स्तन्म॑हि॒नजा॑य॒तैक॒म् ॥ ३ ॥
अंधार होता, अप्रकट पाणीच पाणी
अंधाराने होते ते सगळे लपवले -
हे पोकळ झाकलेले, न-झालेले... आणि
त्यात तपातून एक महान उपजले

काम॒स्तदग्रे॒ सम॑वर्त॒ताधि॒ मन॑सो॒ रेतः॒ प्रथ॒मं यदासी॑त् ।
स॒तो बन्धु॒मस॑ति निर॑विन्दन् हृ॒दि प्र॒तीष्या॑ क॒वयो॑ मनी॒षा ॥ ४ ॥
पुढे उद्भवला प्रथम तो काम
काम म्हणजे काय तर रेत मनाचे
मनीषेने हृदयात कवींना ये ठाव -
कळे नसण्याशी नाते असण्याचे

ति॒र॒श्चीनो॒ वित॑तो र॒श्मिरे॑षाम॒धः स्वि॑दा॒सी३दु॒परि॑ स्विदासी३त् ।
रे॒तो॒धा आ॑सन्महि॒मान॑ आसन्त्स्व॒धा अ॒वस्ता॒त्प्रय॑ति: प॒रस्ता॑त् ॥ ५ ॥
ओढलेले आडवे किरण... यांपैकी
काय होते खाली नि काय बरे वर?
महिमान होते, होते रेतधारी,
स्वयंसिद्ध येथे, प्रयत्न तेथवर

को अ॒द्धा वे॑द॒ क इ॒ह प्र वो॑च॒त्कुत॒ आजा॑ता॒ कुत॑ इ॒यं विसृ॑ष्टिः ।
अ॒र्वाग्दे॒वा अ॒स्य वि॒सर्ज॑ने॒नाथा॒ को वे॑द॒ यत॑ आब॒भूव॑ ॥ ६ ॥
कोण बरे जाणतो, कोण सांगतो बोलून
कुठून उद्भवली, ही झाली कुठून?
देवही त्यापुढचे, झाले हे होऊन
कोण मग जाणतो, ही झाली कुठून?

इ॒यं विसृ॑ष्टि॒र्यत॑ आब॒भूव॒ यदि॑ वा द॒धे यदि॑ वा॒ न ।
यो अ॒स्याध्य॑क्षः पर॒मे व्यो॑म॒न्त्सो अ॒ङ्ग वे॑द॒ यदि॑ वा॒ न वेद॑ ॥ ७ ॥
उद्भवले हे होते होय ज्याच्यापासून
धारण याला करतो, का नाहीच मुळी धरत?
बघणारा जो आहे परम आकाशातून,
तो हे जाणतोच - की नाही तोही जाणत?

- - - - - -

अत्रुप्त आत्मा's picture

5 Dec 2015 - 5:44 pm | अत्रुप्त आत्मा

धन्यवाद हो घासुगुर्जि.. हे नासदीय सूक्त उदकशान्ति च्या पहिल्या अर्ध्या भागात येत..जे आम्ही नेहमी म्हणतो..याची रेकॉर्डेड क्लिप लावतो इथे लवकरच. अर्थ आशय आलेला आहे ..श्रुति ही असू दे थोड़ी.

या संदर्भातले कार्यक्रम नेहरु प्लॅनेटोरियम मध्ये बघितल्यानंतर प्रश्न पडायचा की हे मोजमाप कसं होत असेल? त्या प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत किंवा असलेल्या इतर प्रश्नांची येत्या भागात मिळतील त्याकरीता पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत....

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Dec 2015 - 5:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्यामुळे हा महास्फोट कोणी केला, कधी केला, कुठे केला हे प्रश्नच काहीसे निरर्थक बनून जातात.
शास्त्रिय जगतात असे म्हटले जाते की, "प्रत्येक उत्तर त्याच्या बरोबर शंभर प्रश्न घेऊन येते आणि त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शोधण्याच प्रयत्न होत गेल्यानेच शास्त्राची इथपर्यंत प्रगती होत गेली आहे." मग, कोणताही प्रश्न निरर्थक कसा होईल ? आणि प्रश्न असे निरर्थक म्हणुन सोडून दिले तर शस्त्राची प्रगती कशी होईल ?

तो झाला हेच निश्चितपणे म्हणता येतं.

The Big Bang Theory is the leading explanation about how the universe began. Because current instruments don't allow astronomers to peer back at the universe's birth, much of what we understand about the Big Bang Theory comes from mathematical theory and models.

विश्वाच्या उत्पत्तीसंबंधात सद्या उपलब्ध असलेल्या सिध्दांतांपैकी बिग बँग हा सर्वात जास्त मान्यताप्राप्त "सिध्दांत आहे (निश्चितपणे सिध्द झालेले सत्य नाही)"

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Dec 2015 - 5:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

इतक्या उत्तम विषयावरच्या व अन्यथा इतक्या सारासारविवेकाने लिहिलेल्या लेखमालेत, शास्त्राने पूर्णपणे सिध्द न झालेल्या काही गोष्टी, तुम्ही इतक्या ठासून का सांगत आहात हे कळले नाही... किंबहुना आश्चर्य वाटते आहे.

राजेश घासकडवी's picture

5 Dec 2015 - 5:58 pm | राजेश घासकडवी

- बिग बॅंग झाला हे निश्चित का याबाबत लेखात पुरावे दिलेले आहेत. नक्की अजून किती पुरावे हवेत?
- प्रश्न विचारणं महत्त्वाचं असलं तरी निरर्थक प्रश्न खरोखरच असू शकतात. कदाचित निरर्थक या शब्दापेक्षा तुम्हाला वेगळा शब्द आवडेल. '४ भागिले ० बरोबर किती?' या प्रश्नाला तुम्ही काय म्हणाल? त्याकडे गणितज्ञांनी दुर्लक्ष करू नये असं तुम्ही म्हणाल का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Dec 2015 - 6:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

"शास्त्राच्या दृष्टीने कोणताच प्रश्न दुर्लक्षिण्याजोगा नसतो" हे शास्त्रिय व सारासार विवेकबुद्धीवर अवलंबून असणारे म्हणणे आहे, इतकेच मी म्हणतोय.

तसे नसेल आणि जर कठीण अथवा सद्या निरुपयोगी वाटणारे अथवा प्रत्यक्ष जीवनात सद्या उपयोग नसणारे प्रश्न दुर्लक्षित करावे असे ठरवले तर विश्वाच्या बाबतीत चालू असलेले संशोधन आणि विषेशतः बिग बँग चा प्रत्यक्ष व्यवहारात कितीसा उपयोग आहे ?

फार तर एखाद्या संशोधनात तुम्हाला करायला / जाणून घ्यायला रस नाही हे समजण्यासारखे आहे. पण "कोणते एक संशोधन करण्यात अर्थच नाही" हे मत व्यक्तीगत एका टोकाचे मत म्हणून ठीक आहे (हा अधिकार लोकशाहीत आहे)... शास्त्रिय मत म्हणून ठीक नाही, इतकेच माझे म्हणणे आहे.

बेसिक सायन्समध्ये संशोधन अगोदर होते आणि त्याचा फायदा नंतर उठवला जातो... बर्‍याच वेळा असे संशोधन
(अ) केवळ प्रचंड कुतुहल म्हणून होते,
(आ) त्याचा अचूक काय फायदा होईल हे ते संशोधन करणार्‍या शास्त्रज्ञांना सुद्धा माहित नसते,
(इ) काही वेळेस संशोधनाच्या मूळ उद्येशापेक्षा वेगळेच काही सापडते आणि
(ई) संशोधक किंवा इतर कोणी मूळ संशोधकांच्या कल्पनेच्या पलिकडचे फायदे शोधून काढतो;
असा इतिहास आहे, नाही का ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Dec 2015 - 6:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

अरे हो...

"बिग बँग हे अंतिम सत्य नाही... तो इतर कोणता इतका प्रबळ सिद्धांत नसल्यामुळे सद्याच्या घडीला जास्तित जास्त शास्त्रज्ञांनी स्विकारलेला सिद्धांत आहे. इतर काही जास्त सबळ पुरावे असलेला सिद्धांत सापडला तर शास्त्रज्ञांची तो दुसरा सिद्धांत स्विकारण्याची तयारी असेल.", हे माझे वैयक्तीक मत नाही तर आखिल शास्त्रिय जगताचे मत आहे. मी फक्त ते उद्धृत केले आहे, इतकेच.

राजेश घासकडवी's picture

5 Dec 2015 - 9:00 pm | राजेश घासकडवी

अहो, तुम्हाला साधा प्रश्न विचारला '४ भागिले ० बरोबर किती?' या प्रश्नाला काय म्हणाल?

विज्ञानाच्या कुठच्याही थियरीबद्दल 'अधिक सबळ पुरावा असलेली थियरी सापडली की ही टाकून देऊ आणि नवीन स्वीकारू' ही भूमिका असते. तो अलिखित डिस्क्लेमर असतो. पण म्हणून आत्ताच्या थियरीसाठी प्रचंड पुरावा आहे ही गोष्ट नाकारता येत नाही. आणि जेव्हा एवढा प्रचंड पुरावा असतो तेव्हा मूळ थियरी नष्ट न होता ती किंचित काही सुधारली जाते.

उदाहरणच द्यायचं झालं तर न्यूटनची थियरी. आइन्स्टाइनने सापेक्षतावाद मांडल्यावर न्यूटनची थियरी 'टाकून दिली' गेली नाही, किंवा खोटी ठरली नाही. पदार्थांचे वेग जेव्हा प्रकाशाच्या वेगाच्या तुलनेत नगण्य असतात तेव्हा न्यूटनचे नियम उत्कृष्टरीत्या लागू पडतात.

काळ अनादी आणि अनंत आहे, अवकाश अनंत आहे याची आपल्याला कल्पना नीट करता येत नाही. म्हणून बिग बॅंग थियरीला इन्स्टिंक्टिव्हली विरोध होतो. आणि हे सामान्यांकडूनच नाही तर वैज्ञानिकांमध्येही झालेलं आहे. म्हणून तर फ्रेड हॉइल आणि नारळीकरांनी स्टेडी स्टेट थियरी मांडली. मात्र ती टिकली नाही. कारण विश्वाचे अनेक गुणधर्म दिसतात जे स्टेडी स्टेट थियरी वापरून सिद्ध करता येत नाहीत. याउलट वर दिल्याप्रमाणे बॅकग्राउंड कॉस्मिक मायक्रोवेव्ह रेडिएशन दिसेल हे भाकित बिग बॅंग थियरीने ते प्रत्यक्ष दिसण्याआधीच केलं होतं. त्याप्रमाणेच ते दिसतं. गेली ऐशी वर्षं शेकडो शास्त्रज्ञांच्या चर्चांमधून, आक्षेपांमधून, गणितांतून आणि निरीक्षणांतून ही थियरी तावून सुलाखून निघालेली आहे. तिला सत्य म्हणण्याशिवाय पर्याय नाही.

ती बदलू शकेल, आणि कदाचित कोणीतरी येऊन सगळं विश्व अनंत आहे असं सिद्ध करेल ही आशा बाळगायला काहीच हरकत नाही. तो व्यक्तिगत निर्णय आहे. पण आधी म्हटल्याप्रमाणे तो प्रस्थापित विचाराच्या विरुद्ध आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Dec 2015 - 11:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

चला, म्हणजे बिग बँग थियरी अंतिम नाही त्यात बदल होऊ शकतो हे तुम्हाला मान्य आहे तर !

मुद्दा, बदल अमुलाग्र होईल की थोडा हा नव्हताच... तो नवीन मुद्दा तुम्ही आता या प्रतिसादात स्वतः पुढे आणलात (का माहित नाही ?! ;) ).

मुद्दा फक्त आता "बिग बँग व इतर काही बाबतीत 'हाच शेवटच शब्द' अशी परिस्थिती नाही" हा होता. हेच शास्त्रज्ञ म्हणताहेत आणि मी त्यांचेच म्हणणे सांगत होतो... त्यात माझे योगदान केवळ भारवाही हमालाचेच होते !

***

तुम्ही मला घातलेल्या गणिताचा परत उल्लेख केलात म्हणून त्याबद्दल थोडेसे...

१. मुख्य मुद्दा असा की, इथे माझ्या गणिताच्या ज्ञानाची परिक्षा घेण्यापेक्षा माझ्या (पर्यायाने, म्या भारवाही हमालाने आणलेल्या) बिग बँग इत्यादीबद्दलच्या शास्त्रिय माहितीत चूक असल्यास तिचा शास्त्रिय भाषेत प्रतिवाद अपेक्षित होता... निदान अश्या गंभीर धाग्यावर मुद्द्याला दिलेली अशी बगल अपेक्षित नव्हती. योग्य शस्त्रिय पुराव्यांसह प्रतिवाद झाला असता तर मी तो मानला असता व माझ्या ज्ञानात भर घातल्याबद्दल आभारही मानले असते. असो.

२. "४ भागिले ० बरोबर किती?" आणि "बिग बँग च्या अगोदर काय असावे ?" हे दोन प्रश्न एकाच तोलामोलाचे आहेत असे तुम्हाला वाटणार नाही असा माझा अंदाज होता, केवळ प्रतिवादाच्या ओघात वाहवत जावून तुम्ही तसे विचारले असे वाटले म्हणूनच तुमच्याबद्दलच्या आदरामुळे मी तिकडे हेतुपुर्सर डोळेझाक केली होती... पण, काळाच्या आवाक्याबद्दल लेखमाला लिहिणारा लेखक हे दोन्ही प्रश्न एकाच तोडीचे आहेत असे गंभिरपणे म्हणत असेल तर काय म्या पामराने म्हणावे ?

२. शिवाय, वादविवादासाठी समजा की "४ भागिले ० बरोबर किती? या प्रश्नाचे उत्तर मला माहीत नाही" किंवा अगदी "त्या प्रश्नाचे उत्तर आजतागायत कोणालाच माहित नाही" अशी परिस्थिती असली तर त्यामुळे "बिग बँग च्या अगोदर काय असावे ?" हा प्रश्न दुर्लक्षिण्याजोगा होतो का ?... हे डिडक्शन शस्त्रिय प्रक्रियेत बसणारे आहे का ?

३. माझ्या मते दोन्ही प्रश्नांचा एकामेकाशी अर्थाअर्थी काहीच संबंध नाही. पण दोन्ही प्रश्नांची उत्तरे महत्वाची आहेत. "४ भागिले ० बरोबर किती?" याबाबतीत शास्त्रज्ञांचे एकमत आहे, दुसर्‍याचे उत्तर अजून अजिबात/नक्की माहीत नाही... ते शोधावे, शास्त्रज्ञ ते शोधत आहेतच... शास्त्रज्ञ (अ) मला माहीत नाही किंवा (आ) ते फार कठीण आहे किंवा (इ) त्याचा उपयोग नाही असे अगोदर जाहीर करून कोणताच प्रश्न टाळत नाहीत किंवा "मला माहित नाही ते आस्तित्वातच नाही" असा दावा कधीही करत नाहीत.

******

असो. या प्रतिसादात सुरुवातीला लिहिल्याप्रमाणे "सद्या बहुमतात असलेल्या सिध्दांतात बदल होऊ शकतात" या माझ्या मूळ मुद्द्यावर एकमत झाल्याने, त्यावरचा वादविवाद अजून पुढे वाढवण्यात अर्थ नाही.

पुभाप्र.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Dec 2015 - 6:02 pm | अत्रुप्त आत्मा

धन्यवाद हो घासुगुर्जि.. हे नासदीय सूक्त उदकशान्ति च्या पहिल्या अर्ध्या भागात येत..जे आम्ही नेहमी म्हणतो..याची रेकॉर्डेड क्लिप लावतो इथे लवकरच. अर्थ आशय आलेला आहे ..श्रुति ही असू दे थोड़ी.

पुभाप्र. नासदीय सूक्त अनुवाद वाचायला मिळाल्याने कळणे सोपे झाले.

चित्रगुप्त's picture

5 Dec 2015 - 6:10 pm | चित्रगुप्त

मुळात सार्थक आणि निरर्थक म्हणजे काय ? एकादी गोष्ट आपल्याला "अर्थपूर्ण" आहे, असे का, केंव्हा , कश्यामुळे वाटते ? कितीतरी अब्ज वर्षांपूर्वी काय झाले असावे, हा विचार कुणाला निरर्थक तर कुणाला अर्थपूर्ण का वाटतो ?

राजेश घासकडवी's picture

5 Dec 2015 - 9:08 pm | राजेश घासकडवी

निरर्थक या शब्दावरून उगीच गोंधळ झाला आहे असं वाटतं. म्हणून मी तिथे उदाहरणही दिलेलं आहे - ४ भागिले ० बरोबर किती? हा प्रश्न ज्या अर्थाने निरर्थक आहे त्याच अर्थाने मी निरर्थक शब्द वापरला आहे.

Division by zero is an operation for which you cannot find an answer, so it is disallowed.

आता या वाक्यातल्या डिसअलाउड शब्दावर जर कोणी तक्रार केली की 'गणितात कशावर बंदी कशी घालतात हे लोक? हा स्वातंत्र्याचा संकोच आहे' तर काय म्हणायचं?

चित्रगुप्त's picture

5 Dec 2015 - 11:00 pm | चित्रगुप्त

राजेशपंत, मी विचारलेल्या सार्थक - निरर्थक विषयावरील प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहेत तुमचेकडून.

राजेश घासकडवी's picture

8 Dec 2015 - 3:13 am | राजेश घासकडवी

अहो ते फारच गहन प्रश्न आहेत. या जगात व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत. कोणाला कशाचं तर बोडकीला केसाचं... असं म्हणतात. आता काही जणांना ऑफिस सांभाळूनही दिवसातले आठ तास ऑनलाइन गेम खेळायचं वेड असतं, तर काही जणांना उगीचच २६ मैल धावायचं वेड असतं. त्यांतून त्यांना काहीतरी अर्थ सापडतो. आणि अशा टोकाच्या वेडांचंही जग कौतुक करतं - कारण प्रत्येकालाच अशी वेडं असतात आणि संसारापायी त्यातली काही टाकून द्यावी लागल्याचं दुःख असतं. कोणीतरी दुसरा तसंच काही करतो आहे हे पाहून बरं वाटतं.

असो, तर माझ्या मते कोणाला काय सार्थक वाटतं आणि काय निरर्थक वाटतं; त्यातलं कोणाचं बरोबर कोणाचं चूक ही चर्चा करण्यात फार अर्थ नाही. या धाग्यावर तर ते फारच अवांतर होईल.

मारवा's picture

5 Dec 2015 - 7:14 pm | मारवा

सत्याचे साधारण दोन प्रकार मांडता येऊ शकतात. एक निर्विवाद सत्य दुसरं विवादीत सत्य. उदा. ब्रिटीशांनी भारतावर राज्य केलं हे एक निर्विवाद सत्य आहे. दुसरं ब्रिटीशांनी नेमकी कीती वर्षे भारतावर राज्य केलं हे एक विवादीत बाब आहे. यावर नक्कीच वाद होऊ शकतो. कुठुन सुरुवात धरायची १५० वर्षे १७० वर्षे इ. १८५७ नंतर खरया अर्थाने की अगोदर पासुन इ.इ.

आता आपल्या समोर काही महत्वाचे प्रश्न आहेत उदा. भारत या देशावर झालेला परकीय सत्तेचा आर्थिक सामाजिक इ. काय परीणाम झाला हे शोधुन काढणे. परकीय सत्तेने आणलेल्या अनेक नविन बाबी त्याला भारतीयांनी दिलेला प्रतिसाद त्याने त्यांच्या जीवनावर झालेला मुलगामी परीणाम. या सर्व महत्वाच्या अभ्यासाला चर्चेला समजा सुरुवात केलेली आहे. अनेक कळीचे प्रश्न अनेक गोष्टी आता उघड होणार आहेत. पुढचा सर्व डेटा विवेचन अत्यंत महत्वाचा आहे. त्यातुन येणार असलेल्या निर्ष्कर्षांवर आपली सध्याची वाटचाल एक निर्णायक वळण घेऊ शकते. इतके सर्व महत्वाचे आहे.

आता ही चर्चा होऊच नये अशी माझी इच्छा आहे. मग मी आता या चर्चेला कशी खीळ घालु शकतो ?

तर मी पुढील चर्चे संदर्भात महत्वाचे मौलिक प्रश्न उभे करणार ते असे काहीसे असतील.
१- पहीला इंग्रज भारतात कधी आला, दिसला, त्याचे नाव काय वडीलांचे नाव काय आडनाव काय ?
२- तो ख्रिस्ती धर्माचा होता की ज्यु की अजुन कोण होता ?
३- तो मुळात कोणत्या वर्णाचा होता पुर्ण गोरा ? ब्राऊन की अजुन वेगळा ?
४- त्याचे काही अवशेष उदा. कवटी इ. अस्तित्वात आहे का ? त्याचा आजच्या कोणत्या आधुनिक साधनाने आपण वय वगैरे निश्चीत करु शकतो का ?
५- तो कुठल्या मार्गाने इंग्लंडहुन प्रवास करुन भारतात दाखल झाला ? समुद्र मार्गे तर त्याचा रुट नेमका कुठला होता ?
६- त्याला कीती दिवसांचा प्रवास इथे येण्यास करावा लागला ?
७- त्याचे कपडे कुठल्या रंगाचे होते ? कुठल्या प्रकारचे होते ?
८- त्याने इथे येतांना तो जी इंग्रजी भाषा बोलला त्यात साधारण कोणते महत्वाचे १०० -२०० शब्द त्याच्या भाषेत होते.
इ.इ.इ.इ.

वरील सर्व प्रश्न असंबधित आहेत का ? नाही
वरील सर्व प्रश्नांची उत्तरे जोपर्यंत मिळत नाहीत तो पर्यंत चर्चा पुढे जाण्यात काहीच अर्थ नाही. जो पर्यंत पहीला इंग्रज क्लीअर होत नाही तो पर्यंत त्याच्या नंतर त्याचे कीती भाऊबंद इथे आले कसे आले त्यांनी आमच्यावर कीती वर्ष राज्य केलं काय वाटोळं केल काय परीणाम झाला इ.इ. सर्व निरर्थक असंबधित प्रश्नांना खर म्हणजे काहीच अर्थ नाही

कळीचा प्रश्न पहीला इंग्रज

बाकी जे त्यानंतर झाल ते त्यामानाने फार किरकोळ आहे बिनमहत्वाच आहे त्यात वेळ घालवण चुकच आहे. नव्हे पुढील चर्चा करणं म्हणजे मुळात मुळ प्रश्न नाकारण असेच नव्हे का ?
मुलगामी शोध जो म्हणतात तो असाच घेतला गेला पाहीजे.

तर घासकडवी सरांना पुढील महत्वाचा प्रश्न तुम्ही जे वरील नासदीय सुक्त दिलेलं आहे ते कशावरुन मुळ शुद्ध रुपात आहे.
तुम्ही हे कुठल्या प्रतीतुन घेतलेलं आहे त्याचा अर्थ वगैरे आपण नंतर बघु मला हे सुत्र च मुळात बनावट वाटत आहे.
सर्व महत्वाची चर्चा या सुत्रावरच व्हायला हवी असे मी आग्रहाने नमुद करतो.

संदीप डांगे's picture

5 Dec 2015 - 7:32 pm | संदीप डांगे

हे बाकी खरं हां....

लोक दगडापासून माणूस बनला असं सांगतात ते ऐकायचं निमूट. आणि दगड कशापासून बनला हा प्रश्न विचारला की तो असंबंधित प्रश्न. का तर आम्ही फक्त दगड ते माणूस इतकाच घटनाक्रम सांगणार, त्यावरून असे मत मांडणार की देव नाही. तुम्ही ते गप ऐकायचं आणी देव नाकारायचा. आमच्याच लॉजिकने आम्हाला प्रतिप्रश्न विचारू नये. व्व्व! जब्रा लॉजिक आहे...!

माय रिस्पॉन्सेस आर लिमिटेड - आय रोबो ची आठवण झाली.

इंग्रजाचे उदाहरण साफ गंडलंय काका.... जा बदलून आणा.

पहीला इंग्रज महत्वाचा बास.
बाकी नंतर त्याचे भाउबंद कीती आले ? त्यांनी काय केलं ? त्याचा काय परीणाम झाला ? त्यांनी स्वतःबरोबर काय आणलं ?
जातांना काय नेलं ? आमच्यावर काय अत्याचार केले वा उपकार केले ? आम्ही काय लढा दिला ? आमच्या समाजावर आर्थिकतेवर मनावर काय परीणाम झाला हे आणि इतर सर्व
बिनमहत्वाचे गैरलागु अस्थानी किरकोळ प्रश्न आहेत पुढील सर्व इंग्रज राजवटीचा अभ्यास आपण करण्यात एक क्षणही वेळ घालवायला नको त्यातुन काहीच साध्य होणार नाही.
आपला महत्वाचा प्रश्न एकच
पहीला इंग्रज
एका संतांनी म्हटलेलचं आहे एक साधे सब साधै
एका कविने म्हटलेलचं आहे
राह पकड तु एक चला चल पा जाएगा मधुशाला
एका शायर ने म्हटलेलचं आहे
जुस्तजु जिसकी थी उसको तो ना पाया हमने
मगर इस बहाने से देखली दुनिया हमने.

संदीप डांगे's picture

5 Dec 2015 - 11:58 pm | संदीप डांगे

मारवा, लै त्रागा नका करुन घेऊ.

साधा प्रश्न आहे, त्याचे उत्तर देण्याऐवजी गोलमोल बोलण्यात वेळ घालवणे वैज्ञानिक विचारदृष्टी बाळगणार्‍यांनी करू नये अशी अपेक्षा होती. पण कट्टर धार्मिक अणि कट्टर नास्तिक यांच्यात फार फरक नाही असे जाणवतंय.

असो.

नगरीनिरंजन's picture

6 Dec 2015 - 1:28 pm | नगरीनिरंजन

एवढी बडबड करण्यापेक्षा देव असाल्याचा एक तरी पुरावा का देऊन टाकत नाही तुम्ही? सगळ्या मूर्ख शास्त्रज्ञांची तोंडे एकदम बंद होऊन जातील बघा.

संदीप डांगे's picture

6 Dec 2015 - 1:32 pm | संदीप डांगे

मी कधी म्हटलंय की देव आहे म्हणून...? हे माझं विधान असेल तर पुरावा देण्याची जबाबदारी माझी. बोला कुठे आणि कधी म्हटलंय मी की 'देव आहे'?

प्रतिसादांचा आगापिछा माहित नसता इतका उद्विग्न प्रतिसाद देण्याचे काय कारण?

नगरीनिरंजन's picture

6 Dec 2015 - 1:47 pm | नगरीनिरंजन

तुम्हाला देव नाकारायला कोणी आग्रह करत नसूनही वर तुम्ही त्याबद्दल त्रागा व्यक्त केला म्हणून म्हटले.

संदीप डांगे's picture

6 Dec 2015 - 3:47 pm | संदीप डांगे

म्हणूनच म्हटलं, आगापिछा माहित नसतांना कमेंटी टाकू नये...

दत्ता जोशी's picture

6 Dec 2015 - 3:20 pm | दत्ता जोशी

ज्याची उत्तरे माहिती नाहीत ते प्रश्न निरर्थक, पायाशुन्य, अज्ञान आणि आकसापोटी केलेले असतात हे लक्षात असुद्या. ;-)

राही's picture

6 Dec 2015 - 10:44 am | राही

जर उपरोध असेल, (तसा तो आहे असे वाटतेय.) तर एवढ्या सूक्ष्म उपरोधासाठी शंभर दंडवत.
जर उपरोध असेल तर तो ओळखण्यात आल्याबद्दल आम्ही आमची पाठ थोपटून घेतो.
तसा तो नसेल तर रट्टे मिळतीलच.

जातवेद's picture

5 Dec 2015 - 8:15 pm | जातवेद

...

""अतिशय हास्यास्पद विधान
रामपुरी - Sat, 05/12/2015 - 20:55 नवीन
'शून्याने भागणं हे निरर्थक आहे म्हणजे काय? त्यापुढे संशोधन करण्यात अर्थ नाही हे सर्व---------
आणि इतर.

- विज्ञानात अजून बरेच (पूर्ण) सिद्ध न झालेले सिद्धांत आहेत परंतू त्यांना छेद देणारे दुसरे येत नाहीत तोपर्यंत तेच चालू ठेवण्याचा प्रघात असतो.एवढे बोलून मी खाली बसतो.

रामपुरी's picture

6 Dec 2015 - 11:05 am | रामपुरी

"विज्ञानात अजून बरेच (पूर्ण) सिद्ध न झालेले सिद्धांत आहेत परंतू त्यांना छेद देणारे दुसरे येत नाहीत तोपर्यंत तेच चालू ठेवण्याचा प्रघात असतो.एवढे बोलून मी खाली बसतो."
मलाही हेच म्हणायचे आहे. पण त्यांचे म्हणणे असे दिसतेय कि "शून्याने भागणे निरर्थक आहे" हे जसे पूर्ण सिद्ध झालेले आहे तसेच "विश्वाच्या सुरूवातीच्या अगोदर नक्की काय होते याचा विचार करणे निरर्थक आहे" हे सिद्ध झालेले आहे . माझा विरोध त्याला आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Dec 2015 - 6:21 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पहीला इंग्रज महत्वाचा बास.

(y)

गुर्जी, तुम्ही पुढचे लेख लिहा हो. विकीपीडीयाछाप आकलनावर फाडलेले फाटे येऊदेत. ते मला विनोदासाठी वापरून घेता येतील.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Dec 2015 - 2:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

विकीपीडीयाछाप आकलनावर फाडलेले फाटे येऊदेत. ते मला विनोदासाठी वापरून घेता येतील.

वा, वा !

"मलाच्च सगळे म्हायतेय, इतरांना काय कळतेय ?"... असे समजणे शास्त्रिय विचाराला मारक असते... असे ऐकले आहे.

आणि "जेव्हा शास्त्रिय प्रतिवाद करणे शक्य नसते आणि/किंवा आपली चूक स्विकारण्याचे घैर्य नसते (जे शास्त्रिय विचारसरणीत आवश्यक समजले जाते), तेव्हा दुसर्‍यांना बुद्दू ठरवून वेळ मारून नेण्याची पाळी येते"... असेही ऐकले आहे ;) :)

रामपुरी's picture

6 Dec 2015 - 7:36 pm | रामपुरी

"मलाच्च सगळे म्हायतेय, इतरांना काय कळतेय ?"
विश्वाच्या (पक्षी मिपाच्या) सुरुवातीपासून काही स्वयंघोषित शास्त्रज्ञांचे हेच चालत आलेले आहे. तेंव्हा टेन्शन घेउ नका.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Dec 2015 - 9:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मला काय कळत नाही हे मला कळतं. ह्या (खगोलशास्त्र) विषयातली पदवी देताना माझ्या माय-बाप लोकांनी या गोष्टीची जाणीव मला सगळ्यात आधी करून दिली. पण असो. तुम्हाला हौस असेल तर चला, आपण गणित-गणित खेळूया, मग विकीपिडीयाछाप माहिती कोणाला आहे आणि कोणाला नाही ते समजेल.

हायजेनबर्गच्या तत्त्वापासून सुरुवात करायची का सापेक्षतावादापासून? का तुम्ही इथे दोन वाक्यांत लिहिलेल्या मेंब्रेन सिद्धांताची गणितं समजावून सांगताय सुरुवातीला?

आपल्या ज्ञानाच्या क्षमता आणि मर्यादा दाखवून दिल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन!

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Dec 2015 - 11:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

लेखाच्या लेखकाने प्रतिसादकांच्या काही गोष्टी मानून व वादविवाद संपल्याचे लिहून झाल्यावरही कोणाला काही प्रतिस्पर्धा आयोजित करायची असेल तर त्याला ही जागा आणि/अथवा वेळ योग्य नाही... किंबहुना अश्या प्रतिस्पर्धेने खाली सांगितलेल्या कारणांमुळे मूळ मुद्द्यांना काहीच फरक पडत नाही !

इथे कोण कोणापेक्षा जास्त ज्ञानी ही चढाओढ नाही आणि कोणाला कोणापेक्षा जास्त डिग्र्या आहेत हा मुद्दा तर अजिबात नाही. (हा मुद्दा इथे कसा काय आला असावा बरे ?!)

इथे आणि कोणत्याही वादविवादात "कोणता मुद्दा मांडलेला आहे आणि तो मुद्दा बरोबर आहे की चूक आहे" हा मुख्य मुद्दा असतो. सर्वात महत्वाचे म्हणजे, कोणी लिहिले यापेक्षा काय लिहिले हे जास्त महत्वाचे असते... "शास्त्रिय" आणि "सारासार विवेकाने" केलेल्या वादविवादात हे अत्यंत आवश्यक असते असे म्हणतात.

आता आमचे शिक्षणच म्हणायचे तर, "आईन्स्टाईननेसुध्दा एखादी चूक केलेली असली तरी तो आईन्स्टाईन आहे म्हणून मान खाली घालून ते बरोबरच आहे असे म्हणायचे नाही", हे आम्ही शिकलोय, शिकवलेय व व्यवहारात पाळत आलोय... हेच सत्य शास्त्रिय जगतात पाळले जात आहे म्हणूनच तर आईन्स्टाईनच्या आणि इतर अनेक अग्रगण्य शास्त्रज्ञांच्या सिद्धांतांत अनेक बदल होऊन ते अधिकाधिक विकसित केले गेले आहेत / केले जात आहेत / केले जातिल. डिग्री, पूर्वओळख इत्यादी पार्श्वभूमीवर व्यक्तीचे / लेखनाचे / कामाचे मुल्यमापन करणे ही केवळ अशास्त्रियच नव्हे तर अनितीकारक पध्दत होईल.

माझा असा अंदाज आहे की लेखकाला अश्या प्रकारच्या वादावादीमुळे मिळणार्‍या टीआरपीमध्ये अजिबात रस नसणार... आणि मला इथे गणित-गणित खेळून काही सिद्ध करण्याइतका वेळ अथवा रस नाही. तेव्हा, रामराम !

अय्या, अदि तिने लेख वाचलेले नाहीत काय आधीचे?
जुने लेख आहेत बाळा हे. अज्ञानी बालकांच्या उद्धारा साठी लिहिलेले लेख पुन्हा इथे पेस्टवलेत गुरुजींनी.

जव्हेरगंज's picture

6 Dec 2015 - 7:57 pm | जव्हेरगंज

खिक्क!

मागे डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी यांनी दैनिक सकाळ मधे लेखमाला लिहुन "पृथ्वीवरचा माणुस उपरा " याला गती दिली होती. नासदीय सूक्त याच्या ही मागे जाते आणि ब्रह्मांडाच्या उत्पत्तीवर प्रकाश टाकु पहाते आहे. मिसळपाव कर यावर गांभिर्याने चर्चा करत आहेत. राजेशसाहेब आपले अभिनंदन. इतर शेरे फारसे विचारात घेऊ नका

नगरीनिरंजन's picture

6 Dec 2015 - 1:43 pm | नगरीनिरंजन

"स्फोट होण्यापुर्वी" असे म्हणणे गणिती भाषेत मांडणे अशक्य आहे म्हणून त्या स्थितीला शास्त्रज्ञ "सिंग्युलॅरिटी" असे म्हणतात. सिंग्युलॅरिटी म्हणजे ज्याची कल्पना करणे मानवी बुद्धीला अशक्य आहे ती स्थिती. विश्वाचे सगळे वस्तुमान व ऊर्जा एका बिंदूत सामावले असणे याची कल्पना आपण करु शकत नाही कारण विश्वाच्या व्याख्येनुसार आपण विश्वाबाहेरुन विश्वाकडे पाहू शकत नाही.
तरीही मल्टीव्हर्स असणे किंवा आपण एका कॉम्प्युटर सिम्युलेशनमध्ये जगत असण्याची शक्यता किंवा आपले विश्व दुसर्‍या अतिप्रचंड विश्वातला सूक्ष्म भाग असणे वगैरे कल्पनांचे पतंग उडत असतात; पण या कल्पना सिद्ध करणे खूप अवघड आहे. यातल्या कोणत्याही कल्पनेवर विश्वास किंवा श्रद्धा ठेवण्याचे स्वातंत्र्य कोणालाही आहेच तसेच देवाच्या कल्पनेवर विश्वास किंवा श्रद्धा ठेवण्याचेही आहे. त्यासाठी गणिती पुराव्यांना खोटे ठरवणे किंवा सिंग्युलॅरिटीबद्दल बालिश अंदाज करण्याची गरज नाही.

मारवा's picture

6 Dec 2015 - 3:07 pm | मारवा

अत्यंत मार्मिक प्रतिसाद !
स्वातंत्र्याशी सहमत आहेच.

दत्ता जोशी's picture

6 Dec 2015 - 3:16 pm | दत्ता जोशी

"स्फोट होण्यापुर्वी" असे म्हणणे गणिती भाषेत मांडणे अशक्य आहे म्हणून त्या स्थितीला शास्त्रज्ञ "सिंग्युलॅरिटी" असे म्हणतात. सिंग्युलॅरिटी म्हणजे ज्याची कल्पना करणे मानवी बुद्धीला अशक्य आहे ती स्थिती.

जी गोष्ट गणिताने सिद्ध करता येत नाही, जिला वस्तुमान, रंग गंध, वजन, चव नाही ती विज्ञानाला अमान्य असते. "सिंग्युलॅरिटी" - याचा अभिप्रेत अर्थ "एकतत्व" किंवा "अद्वैत" असा आहे. अगम्य असा नाही. "सिंग्युलॅरिटी" ( अद्वैत) आणि ड्युअलिटि ( द्वैत)म्हणजे जे अद्वैत नाही ते किंवा एका पासून वेगळे/ विभिन्न/ विरुद्ध आहे ते. या कल्पना परत तत्व्ज्ञानाकडेच नेतात.

यातल्या कोणत्याही कल्पनेवर विश्वास किंवा श्रद्धा ठेवण्याचे स्वातंत्र्य कोणालाही आहेच तसेच देवाच्या कल्पनेवर विश्वास किंवा श्रद्धा ठेवण्याचेही आहे.

धन्यवाद. अनुमोदन. तसेच आपण देव या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही म्हणजे जे विश्वास ठेवतात त्यांना मूर्ख, अडाणी, मागास सम्ज्ण्यचेहि करण नाही. कारण दोन्ही गोष्टी या विश्वासाशी निगडीत आहेत.

नगरीनिरंजन's picture

6 Dec 2015 - 4:30 pm | नगरीनिरंजन

सिंग्युलॅरिटी हा शब्द तुम्ही म्हणता त्या अर्थाने वापरला जात नाही आणि सिंग्युलरॅलिटीचा विरुद्ध शब्द ड्युअ‍ॅलिटी नाही एवढेच नमूद करतो.
यात द्वैत-अद्वैत वगैरे काहीही अभिप्रेत नाही.

the state, fact, quality, or condition of being singular.
"he believed in the singularity of all cultures"
synonyms: uniqueness, distinctiveness, difference, individuality, particularity
a peculiarity or odd trait.
plural noun: singularities
synonyms: idiosyncrasy, quirk, trait, foible, peculiarity, oddity, eccentricity, abnormality

2. PHYSICSMATHEMATICS
a point at which a function takes an infinite value, especially in space–time when matter is infinitely dense, such as at the centre of a black hole.
3. a hypothetical moment in time when artificial intelligence and other technologies have become so advanced that humanity undergoes a dramatic and irreversible change.

संदीप डांगे's picture

6 Dec 2015 - 4:44 pm | संदीप डांगे

सहमत.

थोडक्यात 'सिंग्युलॅरिटी म्हणजे अशी स्वयंभू अवस्था आहे, जिच्यात बदल होणे आतल्या-बाहेरच्या कुठल्याही कारणाने, बलाने, पदार्थाने, उर्जेने शक्य नाही. शास्त्रज्ञांच्या समोरचं गुढ हेच की असं काय झाले की बिगबँगची अवस्था निर्माण झाली'.

मी जे समजतोय ते बरोबर आहे का?

डांगे साहेब चहा प्यायचा का? single single घेऊ.

संदीप डांगे's picture

6 Dec 2015 - 6:00 pm | संदीप डांगे

कॉफी घेऊ. थंड किंवा गरम न होणारी. ;-)

संदीप डांगे's picture

6 Dec 2015 - 6:09 pm | संदीप डांगे

वरचा माझा प्रतिसाद चुकलाय. जरा गोंधळ झाल्याने शब्दाचा अर्थ चुकीचा लावलाय.

हे कॉस्मॉलॉजी सरकारी भाषेप्रमाणे आहे. एक एक शब्दावर एक एक लेख व्हईल... :-(

दत्ता जोशी's picture

6 Dec 2015 - 11:17 pm | दत्ता जोशी

काळजी नसावी. कारण जो क्रमांक २चा अर्थ त्यांना अभिप्रेत आहे ते एक गृहीतक ( hypothesis ) आहे. त्यमुळे तुम्ही लावलेला अर्थ पण hypothetically correct च आहे. :D

नगरीनिरंजन's picture

6 Dec 2015 - 6:09 pm | नगरीनिरंजन

या लेखात विवेचन आहे थोडंसं.

The conclusion of this lecture is that the universe has not existed forever. Rather, the universe, and time itself, had a beginning in the Big Bang, about 15 billion years ago. The beginning of real time, would have been a singularity, at which the laws of physics would have broken down. Nevertheless, the way the universe began would have been determined by the laws of physics, if the universe satisfied the no boundary condition. This says that in the imaginary time direction, space-time is finite in extent, but doesn't have any boundary or edge. The predictions of the no boundary proposal seem to agree with observation. The no boundary hypothesis also predicts that the universe will eventually collapse again. However, the contracting phase, will not have the opposite arrow of time, to the expanding phase. So we will keep on getting older, and we won't return to our youth. Because time is not going to go backwards.

संदीप डांगे's picture

6 Dec 2015 - 6:17 pm | संदीप डांगे

लिंकसाठी धन्यवाद!

दत्ता जोशी's picture

6 Dec 2015 - 11:14 pm | दत्ता जोशी

धन्यवाद. लेखात स्टीफन होकिन्स संपूर्ण लेखात परत परत " would have been" May have been , May , Prediction , Hypothesis असले शब्द वापरतात बुवा!

नगरीनिरंजन's picture

7 Dec 2015 - 5:01 am | नगरीनिरंजन

त्यालाच विज्ञान म्हणतात हो! मातीत उंटाच्या पायाचे ठसे दिसल्यास रॅशनल माणसे "इथून उंट चालत गेला असावा" असे म्हणतात; "उंट चालत गेलाच" असे म्हणत नाहीत कारण उंटाच्या पायाच्या आकाराचे बूट घालून कोणी गाढव गेला असण्याची कितीही सूक्ष्म का असेना शक्यता उरतेच.
ते काही अध्यात्म नाही अमुकच असते आणि तमुकच असते, मी स्वतः अंतःचक्षूंनी पाहिलंय आणि तुम्ही "पुरेशी" साधना केली तर तुम्हालाही "साक्षात्कार" होईल अशी ढिशक्याँव मारायला.

नगरीनिरंजन's picture

7 Dec 2015 - 5:04 am | नगरीनिरंजन

हायपोथिसिस आहे ते मान्य आहेच. तुम्हाला खोडायचा असल्यास खोडून दाखवा. "हायपोथिसिस आहे म्हणजे ते खोटेच" हे लॉजिक अध्यात्मात चालत असेल पण इथे नाही.

दत्ता जोशी's picture

7 Dec 2015 - 7:42 am | दत्ता जोशी

"हायपोथिसिस आहे म्हणजे ते खोटेच" हे लॉजिक अध्यात्मात चालत असेल पण इथे नाही.

मी अध्यात्माविषयी काही बोलोच नाही तरीपण अध्यात्माविषयी आकस प्रकट केल्याबद्दल अभिनंदन. पण नेमके उलटे आहे. आणि तेच दाखवून द्यायचे आहे. अध्यात्मातील गृहीतके सांगितली कि पुरावे द्या म्हणायचं. आणि विज्ञानातील संकल्पना गृहीतक आहेत हे फक्त अधोरेखित केलं कि चिडचिड करायची याला काही अर्थ नाही.
हायपोथेसिस आहे तर घासकवडी साहेबांनी लेखाखाली तसा डिस्क्लेमर द्यावा किंवा वाक्य रचनेत बदल करावा असं सहज सुचवलं होतं. आपण दिलेला लिंक त्याला दुजोरा देतो इतकाच सुचवायचं होतं. बाकी वैयक्तिक काही घेण्याची गरज नाही.

नगरीनिरंजन's picture

7 Dec 2015 - 8:18 am | नगरीनिरंजन

वैयक्तिक घेतलेले नाही आणि लेखात कुठेही हे असंच आहे अशी भाषा मला तरी वाटली नाही. अध्यात्माबद्दल मला प्रचंड आकस आहे व तो दाखवून द्यायला मला यत्किंचितही लाज नाही.

आपली गृहितके चुकीची आहेत असं मला वाटत आहे.
आकस असण्याबद्दल हरकत नाही. कीप आकसिंग.;-)

नगरीनिरंजन's picture

8 Dec 2015 - 3:28 am | नगरीनिरंजन

धन्यवाद! हरकत नाही. तुम्हालाही वाटेल ते वाटून घ्यायचा अधिकार आहे. या गृहीतकांच्या समर्थनार्थ मिळणार्‍या पुराव्यांवर विश्वास ठेवणार्‍यांशी वाद घालण्यात वेळ घालवणे व्यर्थ आहे; तरीही लेखमालेत पुढे "सजीव आपोआप निर्माण झाले अशी शास्त्रज्ञमान्य थियरी आहे" वगैरे गोष्टी येणार आहेत त्या वाचून परत हेच आक्षेप तिथेही नोंदवण्याचे स्वातंत्र्यही आहे सर्वांना. स्वातंत्र्याचा आणि लॉजिकचा काहीही संबंध नाही. :-)

दत्ता जोशी's picture

6 Dec 2015 - 2:51 pm | दत्ता जोशी

विज्ञानाच्या कुठच्याही थियरीबद्दल 'अधिक सबळ पुरावा असलेली थियरी सापडली की ही टाकून देऊ आणि नवीन स्वीकारू' ही भूमिका असते.

धन्यवाद. कहारेतर आधीच लिहिणार होतो पण तुम्ही स्वतःच लिहिली आहे तर. लेखात एक चोतोशी सुधारणा सुचवू इच्छितो. तो असा कि एकतर लेखाखाली हा disclaimer लिहावा किंवा जी AFFERMATIVE ( होकारार्थी) वाक्ये आहेत तिथे "असावे", "असू शकेल", "असेल असे वाटते", "असे माझे किंवा शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे" असा बदल करावा.
मागे कोणत्यातरी धाग्यात तुम्हाला काही प्रश्न विचारले होते त्याची उत्तरे मिळाली नाहीत. पण परत एकदा वेद आणि वैज्ञानिक गृहीतके यांची सरमिसळ का करत आहात किंवा त्या गृहितकांना मजबुती देण्यासाठी वेदांचा आधार घेण्याची वेळ का येते आहे असे विचारणे जास्ती सयुक्तिक ठरेल.

पण म्हणून आत्ताच्या थियरीसाठी प्रचंड पुरावा आहे ही गोष्ट नाकारता येत नाही.

कोणता पुरावा? दूरवरच्या तार्यांवरून येणारा प्रकाशाची तीव्रता मोजून त्या ताऱ्याचे वय आणि / किंवा पृथ्वीपासूनचे अंतर निश्चित कर्णे हि अत्यंत ढोबळ आणि सदोष पद्धत आहे पण आजमितीला दुसरी कोणतीही पद्धत आपल्या हातात नाही म्हणजे हे बिनचूक आहे असे नव्हे.
प्रसरण पावणारे विश्वाच्या प्रसारणाचे मोजमाप घेवून काही निष्कर्ष काढताना ( extrapolate )करताना २-३ दशकात केलेली निरीक्षणे इतक्या मागे नेणे निर्दोष / अचूक असूच शकत नाही. म्हणजे आता जे प्रसरण/ expansion होत आहे त्याचा दर/ rate काय? त्याचे सातत्य काय? हे expansion 'लिनेअर' आहे कि 'एक्ष्पोनेन्तिअल' याची कोणतीही माहिती नाही. किंवा ते plot करणे अशक्य आहे. अर्थात मी जे लिहितो आहे ते समजून घेणे सोपे नाही पण हे सत्य आहे म्हणूनच हि सर्व गृहीतके आहेत हे मान्य करावेच लागेल.
या अनुषंगाने एक प्रश्न : प्रकाशाचा वातावरणातील वेग काय याचे उत्तर सुधा निःसंदिग्धपणे मिळत नाही. तुम्हाला या विषयी काही माहिती आहे काय ? असल्यास कृपया थोडी माहिती द्यावी.

तो अलिखित डिस्क्लेमर असतो. पण म्हणून आत्ताच्या थियरीसाठी प्रचंड पुरावा आहे ही गोष्ट नाकारता येत नाही. आणि जेव्हा एवढा प्रचंड पुरावा असतो तेव्हा मूळ थियरी नष्ट न होता ती किंचित काही सुधारली जाते.

दत्ता जोशी's picture

6 Dec 2015 - 3:23 pm | दत्ता जोशी

हे expansion 'लिनेअर' आहे कि 'एक्ष्पोनेन्तिअल'

लिनेअर' आहे कि 'एक्ष्पोनेन्तिअल हे कृपया "linear आहे कि exponential " असे वाचावे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Dec 2015 - 9:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

दूरवरच्या तार्यांवरून येणारा प्रकाशाची तीव्रता मोजून त्या ताऱ्याचे वय आणि / किंवा पृथ्वीपासूनचे अंतर निश्चित कर्णे हि अत्यंत ढोबळ आणि सदोष पद्धत आहे पण आजमितीला दुसरी कोणतीही पद्धत आपल्या हातात नाही म्हणजे हे बिनचूक आहे असे नव्हे.

१. विज्ञानातली कोणतीही पद्धत १००% खात्रीशीर नसते; जर १००% खात्रीशीर मोजमापं करता आली असा दावा कोणी करत असेल तर त्यांनी त्यांची मापनपद्धती बदलण्याची गरज आहे असं खुशाल समजावं. अगदी आपण आपलं वस्तुमान मोजलं, ज्याला सर्वसामान्यपणे वजन म्हणतो, त्यातही दोष असतो. आपलं वजन मोजण्याच्या काट्याचा लीस्ट काऊंट - वजनात किती फरक झाल्यावर काट्यावर दिसेल तो जर १०० किलो असेल तर निराळा काटा वापरण्याची गरज आहे. आपल्या मोजमापात किती त्रुटी (एरर) आहे याचा योग्य अंदाज करता येणं विज्ञानात फार महत्त्वाचं असतं.

२. आपल्यापर्यंत येणाऱ्या प्रकाशातून काय आणि किती गोष्टी कळतात याची कल्पना तुम्हाला कितपत आहे हे माहीत नाही. पण या प्रकाशातून ताऱ्यांचंच नाही तर दीर्घिकांचं वय, त्यांचं वस्तुमान, त्यांचा आकार, त्यांच्यात काय-काय घटकद्रव्यं आहेत या अनेक गोष्टी सांगता येतात. ताऱ्यांकडून, दीर्घिकांकडून येणाऱ्या प्रकाशाची फक्त तीव्रता मोजत नाहीत; त्यांचा वर्णपट शोधला जातो, त्यात निरनिराळे बदल कसे होतात यांचा अभ्यास होतो. कधी हा प्रकाश, भिंगातून आल्यासारखा वाकडा येतो, त्याचा अभ्यास होतो.

३. तुम्ही ज्याला एकच पद्धत म्हणत आहात, ती पद्धत एकच नाही. तीव्रतामापन, वर्णपट, गुरुत्वीय भिंग, अशा अनेक पद्धती आहेत. ज्यांचं मापन करून वेगवेगळ्या पद्धतींनी उत्तरं आणि त्यांच्यामधल्या त्रुटी किती हे समजतं. त्यातून वयाचा अंदाज केला जातो. त्यातल्या त्रुटी किती यांचंही गणित केलं जातं.

प्रसरण पावणारे विश्वाच्या प्रसारणाचे मोजमाप घेवून काही निष्कर्ष काढताना ( extrapolate )करताना २-३ दशकात केलेली निरीक्षणे इतक्या मागे नेणे निर्दोष / अचूक असूच शकत नाही.

२-३ दशकं निरीक्षण केलेलं असलं तरीही आपल्याला 'दिसतात' ते काही क्वेझार्स काही अब्ज वर्षं जुने आहेत. थोडक्यात २-३ दशकं निरीक्षणं करून आपण काही अब्ज वर्षांमागे काय घडलं हे आज बघू शकत आहोत.

जी गोष्ट गणिताने सिद्ध करता येत नाही, जिला वस्तुमान, रंग गंध, वजन, चव नाही ती विज्ञानाला अमान्य असते.

जी गोष्ट गणिताने सिद्ध करता येते, त्या प्रत्येक वस्तुला वस्तुमान, रंग गंध, वजन, चव असेलच असं नाही. उदाहणार्थ प्रकाशकण, अर्थातच फोटॉन. डार्क एनर्जी हा प्रकार काय आहे हे अजूनही खगोलशास्त्रज्ञ आणि/किंवा कणभौतिकशास्त्रज्ञांना समजलेलं नाही. हिग्ज बोसॉन दिसला तोही अगदी अलीकडेच.

"सिंग्युलॅरिटी" - याचा अभिप्रेत अर्थ "एकतत्व" किंवा "अद्वैत" असा आहे. अगम्य असा नाही.

"सिंग्युलॅरिटी" याचा अर्थ एका कणात - ज्याला लांबी, रुंदी, उंची काहीही नाही, त्यात सगळं सामावलेलं होतं असा आहे. ते अजूनही अगम्य आहे. ते गमतं का गमत नाही याचा त्या शब्दाशी काहीही संबंध नाही. ते नक्की काय होतं हे कदाचित समजेल, कदाचित समजणारच नाही असं गृहितक कदाचित उद्या मांडलं जाईल.

---

अवांतर - लेखनावर प्रतिसाद देणाऱ्या सगळ्यांचेच आभार. विज्ञान, विज्ञानाची पद्धत, खगोलशास्त्र, विश्वरचनशास्त्र या विषयांबद्दल चांगल्या, सवंग भोंदूपणा नसलेल्या आणि सर्वांना समजेल अशा भाषेत लेखनाची किती गरज आहे हे या धाग्यांमध्ये दिसत आहे.

सुंदर माहीतीपुर्ण प्रतिसादांची मालिका खंडीत होऊ नये
कारणीभुत कोणीही होवो. काहीही होवो.
कुठलाही प्रश्न होवो.
इतकीच एकच इच्छा.

दत्ता जोशी's picture

6 Dec 2015 - 2:54 pm | दत्ता जोशी

अजून एक. वायूची तबकडी हा निष्कर्ष कोठून आला?

दत्ता जोशी's picture

6 Dec 2015 - 2:56 pm | दत्ता जोशी

आकाशाज्जाय्ते वायुः ..तर नव्हे??

विलासराव's picture

6 Dec 2015 - 10:39 pm | विलासराव

काय ठरलय मग?
विज्ञानाला मानायच.
अध्यात्माला मानायच.
दोघांना मानायच.
की दोघांनाही नाही मानायच.
काही सुचेनास झालय ही चर्चा वाचून.

संदीप डांगे's picture

6 Dec 2015 - 11:03 pm | संदीप डांगे

स्वतः बनवलेलं रॉकेट घेऊन बालाजीच्या चरणी आशिर्वादासाठी जायचं.
नवा कंप्युटर, कार घरी आणल्यावर त्याला पाच कुंकवाचे टिके लावायचे.
सॅटेलाईटचा वापर करून शेकडो किलोमीटरच्या केबलमधून येणार्‍या इंटरनेटवरून साइबाबाची ऑनलाईन आरती करायची.
डीटीएच टीवीच्या डिशमधून फुल्ल एच्डी ७० इन्च टीवीतून दिसणार्‍या आसाराम बाप्पुला नमन करायचे.
अजून बरीच मोठी लिस्ट आहे काय करायचं त्याची... मानणे न मानण्याने काय होणार?

ज्यांना हे कळतं त्यांना अजून काय कळायची आवश्यकता आहे...?

नगरीनिरंजन's picture

7 Dec 2015 - 5:20 am | नगरीनिरंजन

सत्यवचन!

तुषार काळभोर's picture

7 Dec 2015 - 9:58 am | तुषार काळभोर

विसंगती कधी न घडो
(सु/सृ)जनवाक्य कानी पडो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Dec 2015 - 11:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्ये तुमचं ह्याला मानायचं, त्याला मानायचं सोडून द्या की ओ... मनमानी करा, बास !

गहन विषय आहे.पण छान चाललीय चर्चा.
सृष्टीसे पहले कुछ नहीं था...
सत भी नही, असत भी नही

अंतरिक्ष भी नहीं , आकाश भी नहीं था...
छिपा था क्या ,कहां,किसने ढका था....
उस पल तो आगम,अटल जल भी कहां था...

सृष्टीका कौन है कर्ता ?...
कर्ता है वा अकर्ता ?

आवडलं.

कवितानागेश's picture

8 Dec 2015 - 12:38 pm | कवितानागेश

नक्की कुणाकुणाला कायकाय सिद्ध करायचय?! :)

असं विचारुन आपण काय सिद्ध करु इच्छित आहात?

फारतर "त्याच्याआधी काय होते हे सध्याच्या थेरीला समजले नाही" असे म्हणा. प्रश्न बाय इटसेल्फ निरर्थक नाहीये. पेनरोज या शास्त्रज्ञाने आजवर असे अनेक बिगबँग झाले असावेत असाही एक कयास मांडलेला आहे.

पेनरोज या शास्त्रज्ञाने आजवर असे अनेक बिगबँग झाले असावेत असाही एक कयास मांडलेला आहे.
सहमत.
या विश्वातली प्रत्येक गोष्ट उत्पन्न होते.नष्ट होते.परत उतपन्न होते. परत नष्ट होते.
असे वर्तुळ न आदि न अंत चालूच आहे.
अगदी दीर्घिकाही याला अपवाद नाहीत. लाइफसायकल मोठी असेल पण अंत होतो.
मला फार योग्य शब्दात मांडता नाही येत.असो.