.
भाग १ - काळाचा आवाका, भाग २ - नासदीय सूक्त, भाग ३ - अस्तिस्तोत्र, भाग ४ - उत्क्रांतीचे उत्तर, भाग ५ - कोंबडी आधी की अंडं आधी , भाग ६ - जंबोजेट दृष्टांत, भाग ७ - अचेतनापासून सचेतनापर्यंत, भाग ८ - रेणूंपासून पेशींपर्यंत , भाग ९ - अनैसर्गिक निवड , भाग १० - नैसर्गिक निवड , सिंहावलोकन , भाग ११ - सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट , भाग १२ - सामाजिक डार्विनवाद
गेल्या भागात आपण 'सामाजिक डार्विनवादा'बद्दल जाणून घेतलं. 'लायक असलेले टिकून राहातात' या निसर्गनियमाचं 'बळी तो कान पिळी' अशा समाजनियमात रूपांतर झाल्यामुळे 'जगण्यास नालायक असलेल्यांना पुनरुत्पादन करू देऊ नये' या स्वरूपाचा विचार पुढे आला. त्यातूनच अनेक अपंग, दुर्बळ लोकांची सक्तीची नसबंदी करण्यात आली. हिटलरने हेच तत्त्व वापरून ज्यू वंशाचा संपूर्ण निःपात करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अनेक जणांच्या मनात डार्विनवाद किंवा उत्क्रांतीवादाची सांगड हिटलर आणि त्याच्या नृशंस कृत्यांबरोबर केली जाते. उत्क्रांतीला विरोध करणारे अनेक जण 'हिटलर उत्क्रांतीवादी होता' असं सांगून उत्क्रांतीवादावर कलंक फासण्याचा प्रयत्न करतात. असा प्रयत्न करणं अर्थातच साफ चूक आहे. ही चूक नक्की कशी होते ते आपण या भागात समजावून घेऊ.
उत्क्रांतीवाद 'वापरणं' म्हणजे काय? इथे काहीसा असा युक्तिवाद होतो - 'उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार निसर्गात जे कमकुवत असतात ते नष्ट होतात. जे शक्तीमान असतात, किंवा जगायला लायक असतात तेच टिकतात. अर्थातच, दुर्बळ नष्ट व्हावे आणि सबळ टिकून राहावे ही निसर्गाचीच इच्छा आहे. त्यामुळे जे दुर्बळ आहेत त्यांना जगू देऊ नये. जगलेच तर किमान त्यांनी पुनरुत्पादन करून त्यांचा दुर्बळपणा पुढच्या पिढीत जाऊ देता कामा नये. यासाठी त्यांच्यावर लग्न करायला बंदी करावी. किंवा त्याहून उत्तम म्हणजे त्यांच्यावर सक्तीची नसबंदी करावी.'
वरची वाक्यं पुन्हा एकदा वाचून पाहा. त्यातली पहिली दोन ही नैसर्गिक निवडीतून होणाऱ्या उत्क्रांतीची सत्यं आहेत. तिसऱ्या वाक्यात 'निसर्गाची इच्छा' हा शब्दप्रयोग वापरून त्या वर्णनाला एका उच्च शक्तीच्या प्रेरणेचं अधिष्ठान आलेलं आहे. आणि त्यानंतर 'त्या इच्छेनुसार या या गोष्टी व्हाव्यात' अशा प्रकारची विधानं आहेत. म्हणजे सुरूवात वैज्ञानिक सत्यांपासून होते आणि त्यावरून नीतिमत्तेबद्दल, किंवा मनुष्याने काय करावं याबद्दल निष्कर्ष काढले गेलेले आहेत. 'काय आहे' पासून 'काय असावे' इथपर्यंतचा हा प्रवास आपल्या नकळत होतो. यातला फोलपणा लक्षात घेण्यासाठी उत्क्रांतीऐवजी गुरुत्वाकर्षण वापरून वरचाच युक्तिवाद मांडून पाहू.
'गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार निसर्गात ज्या गोष्टी वर असतात त्या अपरिहार्यपणे खाली खेचल्या जातात. आणि खाली असलेल्या वस्तू खालीच राहातात. अर्थातच, वरच्या गोष्टी खाली याव्यात आणि सर्वच गोष्टी खाली राहाव्यात ही निसर्गाचीच इच्छा आहे. त्यामुळे वरती कुठच्याच वस्तू ठेवू नयेत. जर काही वस्तू वर असतील तर किमान त्यांना खाली आणून ठेवावं. यासाठी वरच्या वस्तू खाली आणणारी यंत्रणा जगभर बनवायला हवी. डोंगरमाथ्यावरून दगड खाली उतरवून ते मोकळ्या मैदानात आणून ठेवावे.'
हे वाचताना या युक्तिवादातली विसंगती स्पष्ट होते. हो, वरच्या वस्तू खाली खेचल्या जातात खऱ्या. पण त्या खालीच असाव्यात अशी कोणाची इच्छा आहे? निसर्गात एखादी गोष्ट घडताना दिसते म्हणजे ती तशी घडावी, घडत राहावी अशी जबाबदारी माणसावर येत नाही. गुरुत्वाकर्षण हे एक नैसर्गिक बल आहे. ते आंधळेपणाने काम करतं. त्यामागे कोणाची इच्छा नाही. किंबहुना ते बल आहे म्हणून खरं तर वस्तू वरती नेण्यासाठी आणि तिथे त्या टिकवून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न घ्यावे लागतात. उत्क्रांतीबाबतही हेच म्हणता येतं. गुरुत्वाकर्षणाप्रमाणेच उत्क्रांतीतूनही नैतिक मूल्यं काढण्याची गरज नाही. निसर्गात नक्की काय घडतं हे उत्तम रीतीने समजावून सांगणारा तो सिद्धांत आहे. गुरुत्वाकर्षणाप्रमाणेच तो अनेक वेळा सत्यही सिद्ध झालेला आहे. याचा अर्थ असा नाही की मानवी समाजात काय घडायला हवं याबद्दल काही निष्कर्ष आपण त्यातून काढावा. सामाजिक डार्विनवाद पुढे करणारांनी हाच निष्कर्ष काढण्याची चूक केली. हिटलरने आपल्या स्वार्थासाठी म्हणा, आपल्या ज्यूद्वेषापायी म्हणा, सोयीस्करपणे हा निष्कर्ष वापरून ज्यूंची कत्तल केली. पण त्यामागे उत्क्रांतीवादाला दोष देणं योग्य नाही. उद्या कोणी माथेफिरू हुकुमशहाने, राज्यातल्या सर्व वरच्या वस्तू खाली आणून ठेवण्यासाठी त्याच्या हातची यंत्रणा राबवली तर त्यासाठी गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताला दोषी धरण्याइतकंच ते निरर्थक आहे.
निसर्गात दिसणाऱ्या गोष्टींना आपण नैसर्गिक हा शब्द वापरतो. नैसर्गिक या शब्दाला इतरही छटा आहेत. जे जे काही सहजपणे येतं, जे बहुतेकांमध्ये दिसून येतं, अंगभूत गुणधर्म वगैरे वगैरे. नैसर्गिक म्हणजे काहीतरी चांगलं तर अनैसर्गिक म्हणजे काहीतरी विकृत, वाईट. त्यामुळे नैसर्गिक या शब्दातच एक हवेसेपणा, आदर्श असं काहीतरी आहे. प्राचीन काळापासून निसर्गाच्या वेगवेगळ्या भागांना देव मानण्याची प्रथा आहे. निसर्गाविषयी एक आदरयुक्त भीतीही आपल्या मनात असते. त्यामुळे निसर्गाला देवाच्या ठिकाणी ठेवून त्याच्या इच्छांना मान देण्यासाठी कल्पनेला फार ताण द्यावा लागत नाही. त्या स्वरूपाची मानसिकता आपल्यात आधीच तयार असते. यातून नैसर्गिक सत्य ते नैतिक नियम असा प्रवास होतो. या गोंधळाच्या प्रवासाला नॅचरॅलिस्टिक फॉलसी किंवा अपील टु नेचर असं म्हटलं जातं. दोन्हींचे अर्थ किंचित वेगळे असले तरी 'निसर्गात जे घडतं ते चांगलं किंवा स्वीकारार्ह, म्हणूनच नैतिकदृष्ट्या बंधनकारक असतं' ही भावना वापरून जे युक्तिवाद केले जातात, त्यांचं ते वर्णन आहे.
'मला गोड चव आवडते कारण तीतून मला आनंद मिळतो. हा आनंद मिळावा ही निसर्गाचीच इच्छा आहे, तेव्हा मी भरपूर साखर खावी.'
'हिंसेची प्रवृत्ती मनुष्यात नैसर्गिक आहे, त्यामुळे ती प्रवृत्ती वापरून जर कोणी कोणाला मारलं तर ते योग्यच समजलं जावं'
आपल्याला दिसणाऱ्या निसर्गनियमांचा विस्तार करून त्यातून नैतिक मूल्यं काढण्याची ही दोन उदाहरणं झाली. आपल्याला हे माहीत आहे की अतिरेकी गोड खाणं तब्येतीला चांगलं नाही. तसंच हिंसक प्रवृत्ती सर्वांमध्येच असल्या म्हणून त्यांचा वापर करणं समाजमान्य नाही. किंबहुना गुरुत्वाकर्षणाविरुद्ध बल वापरून वस्तू वर न्याव्या लागतात, त्याचप्रमाणे हिंसेच्या बाबतीतही काही विशिष्ट सामाजिक आणि मानसिक बल वापरून आपल्याला त्या प्रवृत्ती काबूत ठेवाव्या लागतात. गुरुत्वाकर्षणाविषयीच्या ज्ञानातूनच आपल्याला हे बल वापरण्याची गरज लक्षात येते. त्याचप्रमाणे मानवात हिंसक प्रवृत्ती आहेत या माहितीचा उपयोग त्यांना मोकाट सोडण्यासाठी नव्हे तर त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी करावा लागतो. 'काय आहे' वरून 'काय असावं' हे सरळसोटपणे ठरवून चालत नाही. किंबहुना 'काय आहे' यावरून 'हे असू नये, यासाठी काय प्रयत्न करावे' असा विचार करावा लागतो.
नैसर्गिकतेवरून नैतिकता ठरवण्यातून इतरही अनेक गोंधळ निर्माण होतात. विशेषतः लैंगिकतेच्या बाबतीत तर फारच गंभीर प्रश्न उभे राहातात. निसर्गतः मनुष्य किंवा इतर प्राणी हे एकपती/पत्नीव्रती असतात का? आत्तापर्यंत अनेक प्राण्यांमध्ये - ज्यांमध्ये एकाच जोडप्याने एकत्र राहाण्याची प्रथा आहे अशा प्राण्यांतही अनेक नर अनेक माद्यांशी संबंध ठेवताना आढळलेले आहेत. पक्ष्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक एकपत्नीव्रत असतं, पण लैंगिक एकपत्नीव्रत नसतं. शास्त्रज्ञांनी जेव्हा अनेक पक्षी प्रजातींचा अभ्यास केला तेव्हा त्यांना असं दिसून आलं की १०% ते ४०% पिलं ही जोडप्यात नसलेल्या नरापासून झालेली असतात. मग माणसांचं काय? एकंदरीत सस्तन प्राण्यांमध्येच जोडप्याने राहाण्याची प्रथा कमी प्रमाणात - फक्त सुमारे ४% प्रजातींमध्ये असते. माणसामध्ये अनेकपत्नी प्राण्यांचे अनेक गुणधर्म दिसतात. सर्वच समाजात ज्यांना परवडतं अशांमध्ये अनेक लग्नं करण्याची प्रथा होतीच. अनेकपत्नीव्रती प्राण्यांत माद्यांपेक्षा नर मोठे असतात, माणसातही तेच दिसतं. तेव्हा माणूस हा नैसर्गिकरीत्या अनेकपत्नीव्रती आहे. मग ही प्रथा सर्वत्र असावी का? जोडप्याप्रमाणे राहाणाऱ्या प्राण्यांमध्ये जोडप्याबाहेर संबंध ठेवलेले पाहाण्यात येतात म्हणून माणसांमध्येही ते नैतिक ठरेल का? अर्थातच याची उत्तरं फक्त 'निसर्गात ते दिसून येतं' एवढ्या एकाच कारणावरून देता येत नाहीत. समलैंगिकतेबाबतही तेच. आत्तापर्यंतच्या नैतिकतेच्या कल्पनांमध्ये समलैंगिकता अनैसर्गिक, म्हणून त्याज्य ठरवलेली होती. पण आता आपल्याला इतर प्राण्यांतही समलैंगिकता दिसून येते. मग काय करायचं?
मुद्दा असा आहे की नैतिकता आणि नैसर्गिकता याचा 'केवळ नैसर्गिक म्हणून नैतिक' इतका सरळ संबंध लावता येत नाही. नैतिकतेचे नियम एक समाज म्हणून जगण्यासाठी आवश्यक आहेत. पण त्यासाठी निसर्गासारख्या कुठच्यातरी उच्च शक्तीच्या तथाकथित इच्छेचा आधार घेणं योग्य नाही. कारण निसर्गाला इच्छा नसते. निसर्ग केवळ असतो, आपल्या भवतालाला आणि आपल्याला सामावून घेत. ज्याला आपण निसर्गाचे नियम म्हणतो ते निसर्गाने घालून दिलेले नियम नाहीत, तर निसर्गाला नियंत्रित करणारे नियम आहेत. ते नियम हे अणुरेणूंच्या पातळीवर सुरू होतात, आणि लक्षावधी किलोमीटरच्या पातळीवरही लागू होतात. त्यांमध्ये आपपरभाव नाही, हेतू नाही. या नियमांनुसार काय आहे हे ठरतं. आणि जगण्यासाठी हे ज्ञान आवश्यक आहे. पण काय असावं हे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय अशा संकल्पनांच्या आधारावर ठरवावं लागतं. आणि त्यासाठी काय करावं हे सुजाण मानवी समाजाने ठरवायचं असतं.
प्रतिक्रिया
15 Jan 2016 - 8:00 am | एस
नैतिकतेची नैसर्गिकपणापासूनची फारकत समजाऊन सांगणारा लेख आवडला. बहुतेक वेळेस नैतिक अधिष्ठान शोधू पाहणार्यांचे हेतू हे तद्दन अनैतिक आणि स्वार्थी असतात असेच सामान्यतः दिसून येते. या पार्श्वभूमीवर, निसर्ग कसा तटस्थ असतो व त्याचे नियम हे प्रत्यक्षात त्याला नियंत्रित करणारे असतात हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
15 Jan 2016 - 8:22 am | अर्धवटराव
गुरुत्वाकर्षणाचं उदाहरण आवडलं.
15 Jan 2016 - 10:14 am | विवेक ठाकूर
'केवळ नैसर्गिक म्हणून नैतिक' इतका सरळ संबंध लावता येत नाही
हे सगळ्यांना माहिती आहे.
त्यासाठी काय करावं हे सुजाण मानवी समाजाने ठरवायचं असतं.
म्हणजे नक्की काय करावं?
15 Jan 2016 - 11:20 am | विवेक ठाकूर
.
15 Jan 2016 - 10:39 am | असंका
गुरुत्वाकर्षणाचं उदाहरण फारच जबरदस्त होतं.
(आपण अशा जागी आहात की केवळ आपण लिहिलं म्हणून वाचलं जातं, हे आपल्याला माहित असेलच. विनंती अशी आहे की आपण आपले लेख जरा काटेकोरपणे एडीट करायचा विचार करा. हा लेख जरा लहान होउ शकला असता. खरं म्हणजे या मालिकेतले सगळेच लेख वाचल्यावर असं वाटत राहिलेलं आहे. )
15 Jan 2016 - 1:56 pm | राही
क्लिष्ट कल्पना सोप्या करून सांगायच्या तर स्पष्टीकरणासाठी आणि उदाहरणांसाठी अधिकचे शब्द हवेतच.
मला तर वाटते की आधीचे काही लेख अधिक मजकुराचे हवे होते.
15 Jan 2016 - 11:51 am | मारवा
राजेशजींनी वेगवेगळया लेखांतुन दिलेली एकुण ३ उदाहरणे असामान्य बिनतोड युक्तिवादाचा नमुना आहेत.
१- ब्रेल लिपी च उदाहरण ( माझ सर्वात आवडत )
२- स्वेटर थिअरी उदाहरण
३- वरील गुरुत्वाकर्षण उदाहरण
उदाहरणकार घासकडवी म्हणुन भविष्यातली आंतरजालीय पिढी त्यांची आठवण काढेल.
वरील आक्षेपाशी असहमत घासकडवींचा माझ्या अंदाजानुसार प्रत्येक लेखाचा मुळ खर्डा किमान दुप्पट साइझ चा नक्कीच असेल तो एडीट त्यांनीच करुन निम्म्यावर आणला असेल मला खात्री आहे.
अजुन कात्री उलट चालवु नये
21 Jan 2016 - 3:19 pm | अनुप ढेरे
सहमत. उदाहरणं एकदम चपखल आहेत. ते युवतीच्या चित्रावर झेरॉक्समध्ये तीळ येऊन ती अजूनच छान दिसणं हे उदाहरणं विशेष आवडलं होतं.
15 Jan 2016 - 1:20 pm | साती
आवडला.
15 Jan 2016 - 6:11 pm | राजेश घासकडवी
अनेकांनी लेखांच्या लांबीबद्दल प्रतिसाद दिलेला आहे. आधीच लिहिल्याप्रमाणे ही लेखमाला वर्तमानपत्रासाठी लिहितो आहे त्यामुळे सुमारे बाराशे शब्दांची मर्यादा येते. त्यामुळे उत्क्रांतीसारखा मोठा विषय हाताळणं जरा कठीणच जातं. त्या विषयाचे लहान लहान तुकडे करून एकेका लेखात एक संकल्पना सांगणं हा हेतू आहे. दर आठवड्याला लेखन येत असल्यामुळे क्रमशःचा पर्यायही नाही. तेव्हा प्रत्येक लेख हा एक स्वतंत्र निबंध व्हावा असा प्रयत्न करावा लागतो. काही वेळा एखादी संकल्पना इतकी मोठी असते की बाराशे शब्दांत मावत नाही. तर काही वेळा ती बरोबर बसते.
या लेखात मला डिस्क्रिप्टिव्ह विरुद्ध प्रिस्क्रिप्टिव्ह हा मुद्दा प्रामुख्याने मांडायचा होता. त्याचबरोबर 'हिटलरने उत्क्रांतीची तत्त्वं वापरली आणि बघा त्यातून काय निपजलं ते!' असं म्हणणारांनाही उत्तर द्यायचं होतं. आणि शेवटी 'निसर्ग केवळ असतो, त्याची इच्छा म्हणून काही नसते' हे लेखमालेतलं सूत्रही त्यात येऊ द्यायचं होतं. तसंच उदाहरणं दिली की क्लिष्ट असो वा सोपी असो, संकल्पना स्पष्ट व्हायला मदत होते.
माझी विनंती अशी आहे की ही संपूर्ण लेखमाला एक पुस्तक वाचतो आहोत अशा पद्धतीने वाचून पाहावी. आत्तापर्यंत एखाद्या पुस्तकाची सुमारे पस्तीस पानं भरावीत इतका मजकूर झालेला आहे. मला शब्दमर्यादा नसती तर याच विषयांवर कदाचित यापेक्षा जास्त मोठं लिखाण झालं असतं असं मला वाटतं.
21 Jan 2016 - 3:17 pm | मराठी कथालेखक
हे प्राणी कोणते ?
तसेच काही प्राण्यात दिसणार्या काही विशिष्ट प्रवृत्तींबद्दल त्या तशा का असू शकतील (जनूकीय वा उत्क्रांतीवादाच्या भूमिकेतून) हे सुचवू शकाल काय ?
१) मांजर, वाघ , सिंह या जातीत नर हा दुसर्या नरावर हल्ला करुन त्यास मारु पाहत असतो. परिसरातील सर्व माद्यांना होणारी पिल्ले ही आपलीच असावी ही प्रेरणा असेल हे मी समजू शकतो. पण ही प्रेरणा नेमकी का निर्माण झाली असावी ? आणि सगळ्याच प्राण्यात विशेषतः कळपात रहाणार्या प्राण्यांत अशी प्रवृत्ती का नसते ?
२) एका कीटकाच्या जातीत (बहूधा प्रार्थना कीटक) मादी समागमानंतर नरालाच खावून टाकते ? असे का ? त्याच नरापासून अधिक अपत्ये तिला नको असतात का ?
३) तसेच माणसांप्रमाणे जवळच्या नात्यांत [आई/बाप आणि भिन्नलिंगी अपत्य वा भिन्नलिंगी भावंड] सहसा संबंध न प्रस्थापित करणारे अजून कोणते प्राणी आहेत का ?
21 Jan 2016 - 4:54 pm | राजेश घासकडवी
Of the roughly 5,000 species of mammals, only 3 to 5 percent are known to form lifelong pair bonds. This select group includes beavers, otters, wolves, some bats and foxes and a few hoofed animals.
इथे संपूर्ण लेख वाचायला मिळेल.
जोडीदार निवड ही नैसर्गिक निवडीचा मोठा हिस्सा आहे. त्यासंबंधी एक लेख लवकरच येईल. मात्र थोडक्यात सांगायचं झालं तर प्राण्यांच्या बाबतीत शुक्रजंतू पुरवणारे आणि अंडं पुरवून अर्भकाच्या वाढीची जबाबदारी घेणारे अशी दोन लिंगं आहेत. त्यांच्यात असलेल्या या असिमेट्रीपोटी त्यांच्या लिंगभूमिका ठरतात. दोन्ही लिंगं आपापला फायदा पाहातात - त्यातून नर निवडण्याचा मादीचा अधिकार, चटकन संभोगाला तयार असण्याची नरांची प्रवृत्ती, नरांमध्ये होणाऱ्या मादीसाठीच्या लढाया या अनेक गोष्टींचा उलगडा होतो.
१. आसपास आपली अपत्यं असावीत याहीपलिकडे आपण कुटुंब सांभाळण्यासाठी जे कष्ट घेऊ त्यातून आपलीच जनुकं पुढे जावीत अशी स्ट्रॅटेजी असते. हा जागृत विचार होत असेलच असं नाही. पण अशी स्ट्रॅटेजी घेणारी शरीरं जी जनुकं बनवतात ती पुढे जातात.
२. हे कोळ्यांच्या अनेक जातींमध्ये दिसतं. पुन्हा निव्वळ शुक्रजंतू पुरवणारा नर त्या कोळिणीसाठी अन्न म्हणून उपयोगाला येतो. जोपर्यंत आपली जनुकं पुढे जाण्याची जवळपास खात्री नराला असते, तोपर्यंत त्यासाठी तो हा धोका पत्करतो. जे प्राणी कळपात राहात नाहीत, किंवा सामाजिकदृष्ट्या एकपती/पत्नी व्रत पाळत नाहीत त्यांच्यासाठी त्याच नराकडून अधिक अपत्यं मिळण्याची गरज राहात नाही.
३. प्राण्यांमध्ये इन्सेस्ट हा तितका टॅबू नसला तरी काही प्राण्यांमध्ये तो टाळण्यासाठी काही प्रथा आहेत. हाईनांमध्ये माद्या फक्त त्यांच्या कळपात ज्यांचा अलिकडेच जन्म झालेला आहे किंवा जे नर बाहेरून कळपात आलेले आहेत अशांबरोबरच समागम करतात. त्यामुळे आपोआपच वडील आणि भावंडं टाळली जातात. लेमूर एकमेकांच्या लिंगांचा वास घेऊन ठरवतात - जवळच्या नात्यांमध्ये तो वास निर्माण करणारी जनुकं सारखी असतात. तर उंदीरदेखील अंगाच्या वासावरून कोण आपल्यासारखाच आहे हे ओळखू शकतात. प्रयोगशाळेत असं दिसून आलेलं आहे की जर तुम्ही उंदीर भाऊ-बहिणीला एकत्र ठेवलं तर नाईलाजाने ते पिलावळ निर्माण करतात. पण जर तिथे बिननात्याचा दुसरा नर ठेवला तर ती मादी त्याला स्वीकारते. इतकंच नाही तर नवीन उंदीर येण्याअगोदर ती गरोदर झालेली असते तर ती गर्भपात घडवते (कशी हे नक्की माहीत नाही) आणि नवीन उंदरापासून पिलं होऊ देते.
21 Jan 2016 - 7:02 pm | मराठी कथालेखक
असे नर जगण्याकरिता मादीशी लढण्याचा प्रयत्न करुन असफल होतात की असा कोणताही प्रतिकार न करताच मादीच्या रुपातील मृत्यूला कवटाळतात ?
21 Jan 2016 - 8:07 pm | राजेश घासकडवी
नरांसाठी अर्थातच बचेंगे तो और भी लडेंगे या न्यायाने समागम करूनही जीव वाचवणं केव्हाही आवडतं. मात्र अनेक वेळा समागमात ते जर अडकलेले असते तर तो अर्धा सोडण्याऐवजी जीव देणं पसंत करतात. त्यांच्या शरीराची रचनाच अशी असते की मादीने डोकं खाल्लं तरी उरलेलं शरीर आपला कार्यभाग साधत राहातं.
22 Jan 2016 - 12:35 pm | मराठी कथालेखक
मला वाटतंय मी याच विशिष्ट रचनेला कारणीभूत जनुकामूळे परपीडन/स्वपीडन (सॅडिसम, मॅसोचिसम) या प्रवृत्ती (विकृती म्हणू शकतो हवं तर) मानवात विकसित झाल्या असतील. मात्र त्या प्रवृत्तीची तीव्रता कमी झाली (म्हणजे अगदी जीव घेतला जात नाही, पण इजा मात्र पोचवली जाते) आणि मादीकडे परपीडन व नराकडे स्वपीडन असे सरळसरळ विभाजन न होता दोहोंमध्ये दोन्ही प्रवृत्ती काही प्रमाणात निर्माण झाल्या असतील.
मानवाखेरीज अन्य कोणत्या प्राण्यात मर्यादित स्वपीडन्/परपीडन असेल का याचा शोध घेणे रंजक असेल.
21 Jan 2016 - 6:08 pm | चौकटराजा
निसर्गात विकृत संस्कृत असं काहीच असत नाही.आपण तत्वत: सर्व रचना विधात्याने हेतूपूर्वक केली आहे असे मान्य केले तर प्राणीमात्र व जड यात स्वत:चा नाश करून घेण्याची ताकद प्राणॆमात्रात जडा पेक्षा जास्त आहे हे विधात्याने ओळखून प्राणीमात्रात नीति अनीति चे द्वैत निर्माण केले असावे.
21 Jan 2016 - 8:03 pm | राजेश घासकडवी
निर्मितीच्या प्रश्नाला उत्क्रांतीचं उत्तर असं आहे की कोणी निर्माता नाही, त्यामुळे त्याच्या हेतूचा प्रश्न उद्भवतच नाही. अणूरेणूंपासून पेशी तयार झाल्या - एकपेशीय जीवांपासून अनेकपेशीय जीव झाले - त्यानंतर त्या पेशींच्या समुच्चयांचा अवयव म्हणून वापर व्हायला लागला - आणि त्यांची क्लिष्टता वाढत वाढत आजची जीवसृष्टी दिसते आहे.
किंबहुना जड पदार्थांमध्ये जो टिकाऊपणा असतो त्यापेक्षा एक वेगळा टिकाऊपणा सजीव सृष्टीत असतो. तो म्हणजे तो विशिष्ट जीव नाहीसा झाल्यावरसुद्धा त्याची प्रतिकृती (हुबेहुब नाही, पण गुणधर्मांचा संचय) नवीन पिढीत टिकून राहाते.
नीती-अनीती या संकल्पनाही मनुष्य जितक्या प्रमाणात स्वतःला लावतो तितक्या प्रमाणात प्राणीजगतात कुठेही दिसत नाही. क्रौर्य आणि स्वार्थीपणाचा प्रचंड प्रभाव दिसतो. निःस्वार्थीपणाही दिसतो, आणि त्याचीही जनुकीय कारणं सांगता येतात.
22 Jan 2016 - 10:20 am | चौकटराजा
जग हेतूपूर्वक चालत नाहीच म्हणूनच तत्वत: मानले तर असा शब्द वापरला. माझ्या सारखा निरिश्वर वादी सुद्धा काही वेळा असे बोलून जातो ते असे " त्याने जास्त चां गली माणसे निर्माण केलीयत म्हणून जग चालले आहे.त्यालाच काळजी जगाची "