विश्वाचे आर्त - भाग ४ - उत्क्रांतीचे उत्तर

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जनातलं, मनातलं
8 Dec 2015 - 6:58 pm

भाग १ - काळाचा आवाका http://www.misalpav.com/node/33974
भाग २ - नासदीय सूक्त http://www.misalpav.com/node/33987
भाग ३ - अस्तिस्तोत्र http://www.misalpav.com/node/34009

----
कधी जन्मली पृथ्वी ? जमल्या
निळ्या वायूच्या लगडी सलग
कधी ?
कधी अन् जडतेला त्या
मनामनाचे आले पोत ?
- बा. सी. मर्ढेकर
----

मर्ढेकरांचा हा प्रश्न कळीचा आहे. ‘काही नाही’ या अवस्थेपासून आपल्याला दिसणार्‍या या जगड्व्याळ विश्वाचा पसारा कसा निर्माण झाला? वायूच्या लगडी जमून त्यांची हवा, पाणी, जमीन तयार झाली याची एक वेळ कल्पना करता येते - साध्या भौतिक आणि रसायनशास्त्राच्या नियमांनी ते समजता येते. पण निर्जीव, अचेतन पदार्थांपासून हाडामांसाचे जीव आणि धडधडणारी हृदये कशी काय झाली? मर्ढेकरांनी ही कविता लिहून साठेकच वर्षे झाली असतील पण शतकांनुशतकांपासून मानवाला या प्रश्नाने झपाटलेले आहे.

'आपण का आहोत?' 'या सृष्टीचे कारण काय?' 'माझ्या जगण्याचे उद्दिष्ट काय?' यासारख्या असाध्य पण पाठ न सोडणाऱ्या प्रश्नांसाठी - विंदा करंदीकरांच्या शब्दांत ‘काही केल्या, काही केल्या न जाणाऱ्या निळ्या पक्ष्या’साठी - 'देव' हे एक सुबक सोपे उत्तर आहे. पण हे उत्तर म्हणजे अनुत्तराचा कळस आहे. "या सर्व रचनांचा अर्थ लावायचा असेल तर मला शरण या. मला असा जादूगार माहिती आहे जो या सर्व रचना केवळ एक कांडी फिरवून करू शकतो." म्हणजे आपल्याला पडलेले सर्व प्रश्न घाऊक पातळीवर एकाच सतरंजी खाली लपवता येतात. या सर्वाचे एकच उत्तर - विधात्याची मर्जी. भाषांतर - माहीत नाही, विचारू नका, आणि विचारही करू नका. पण एक महान अतिप्रश्न शिल्लक राहतोच - जर हे सर्व प्रश्न फेकून ज्या अत्त्युच्च शक्तीच्या भरोशावर फेकून द्यायचे, तर ती कशी निर्माण झाली? याचे उत्तर "ती आहेच". या उत्तराचा ‘फायदा’ असा की फक्त एकच प्रश्न अनुत्तरित राहतो. तेवढा एक सहन केला की बाकी सर्व प्रश्नांची उत्तरे ‘सोपी’ होतात. हे म्हणजे हजार हजारची दहा वेगवेगळी कर्जे विकून टाकून त्या बदल्यात पाच लाखाचे एकच कर्ज (वरचे पैसे न मिळवता!) कबूल करण्यासारखे आहे.

पण मर्ढेकरांनी या ओळी लिहिल्या त्याच्या जवळपास शतकभर आधी या प्रश्नाचे उत्तर - निदान त्या उत्तराचा गाभा - एका शास्त्रज्ञाला सापडला होता. त्याचे नाव चार्ल्स डार्विन, आणि त्याने जे उत्तर दिले ते होते उत्क्रांतीवादाचे. एका नामवंत प्राणी शास्त्रज्ञाने म्हटले आहे "दुर्दैवाने उत्क्रांतीवादाचा प्रॉब्लेम असा आहे की तो आपल्याला कळला आहे असे सगळ्यांना वाटते." ते खरेही आहे. आपल्याला शाळेत शिकवल्यापैकी 'माकडापासून माणूस झाला' 'माणसाची शेपटी न वापरल्याने झिजून गेली' 'जिराफाची मान लांब झाली' 'सर्वायव्हल ऑफ द फिटेस्ट' 'समूहाच्या भल्यासाठी..' अशा तुकड्यापलिकडे फारसे काही लक्षात नसते. मानवाला सतावणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे त्यात आहेत हे तर कोणी सांगितलेलेही नसते.

डार्विनच्या काळात प्राण्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा मुख्यत्वे मानवकेंद्रित होता. बायबलमधल्या विचारांचा त्या दृष्टिकोनावर मोठा पगडा होता. देवाने मानवासाठी ही सृष्टी बनवली, आणि त्याच्या सुखासाठी प्राणी, पक्षी, फुले, फळे, झाडे निर्माण केली. अर्थातच देवाने एकदा प्राणी बनवले की ते बदलतील कसे? घोडा हा घोडा राहाणार, माकड हे माकडच राहाणार. त्यांच्यात बदल होणे शक्य नाही. पण हे तितकेसे खरे नाही हे हळूहळू उघड होत होते. आता अस्तित्वात नसलेल्या पण एके काळी पृथ्वीवर वावरत असलेल्या प्राण्यांचे अवशेष सापडत होते. एकाच लांडग्यासारख्या प्रजातीपासून शेकडो प्रकारचे कुत्र्यांची माणसांनीच पैदास माणसांनी केलेली दिसत होती. डार्विन गॅलापेगोस बेटांवर गेलेला असताना 'केवळ याच बेटांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे फिंच आणि इतर अनेक प्राणी निर्माण करण्यामागे देवाचा काय बरे हेतू असेल?' असा प्रश्न त्याला पडला. आणि अर्थातच या बेटांवर दिसणाऱ्या प्रजाती मुद्दामून वेगळ्या केलेल्या नसून, त्या त्या बेटावरच्या परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या आहेत - तेव्हा परिस्थितीप्रमाणे प्राणी बदलतात हे त्याच्यासाठी उघड झाले.

पण परिस्थितीमुळे प्राण्यांचे गुणधर्म कसे ठरू शकतील? त्याचे उत्तर आहे प्राण्यांमध्ये होणाऱ्या जगण्यासाठीच्या स्पर्धेत. या स्पर्धेत टिकून राहाण्यासाठीचे गुणधर्म ज्या प्राण्याकडे अधिक असतात त्यांना अधिक संतती जोपासता येते, आणि ज्यांच्याकडे नसतात त्यांना कमी संतती होते. आईवडिलांचे गुण पुढच्या पिढीत उतरत असल्यामुळे हे गुणधर्म पुढच्या पिढीत अधिक संख्येने दिसतात, आणि ते गुणधर्म नसलेल्या प्राण्यांची संख्या कमी झालेली दिसते. हरणे पकडण्यासाठी चित्त्यांना त्यांचा पाठलाग करावा लागतो. अशा वेळी ज्या चित्त्यांचा पुरेसा वेग असतो अशांना अन्न मिळते, आणि त्यांना आपली पिलावळ जपता येते. ज्यांचा पुरेसा वेग नसतो त्यांना कमी अन्न मिळते, आणि त्यांना पुरेशी पिले जगवता येत नाहीत. दरम्यान हरणांच्या बाबतीतही हेच होते. अधिक वेगवान हरणे जगण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे एखाद्या जंगलातली चित्त्यांची आणि हरणांची एक लाख वर्षांपूर्वीची पिढी आणि आजची पिढी यांच्या वेगाची तुलना केली तर आजची पिढी अधिक वेगवान असू शकते. थोडक्यात, हरणांमध्ये आणि चित्त्यांमध्ये बदल होण्यासाठी त्यांची परिस्थिती कारणीभूत ठरते.

मात्र 'हे चित्ते वेगाने धावतात. आणि वेग वाढवणे चांगले आहे, तेव्हा यांना ठेवूया. आणि जे कमी वेगवान आहेत त्यांना मारून टाकूया' असे कोणी म्हणत नाही. कमी वेगवानदेखील लगेच मरून जात नाहीत. वेगवान चित्त्यांचे लोकसंख्येतले प्रमाण पुढच्या पिढीत एखाद दोन टक्क्यांनी जास्त, त्याच्या पुढच्या पिढीत अजून एखाद दोन टक्क्यांनी जास्त असे होत होत शेकडो पिढ्यांनी कमी वेगवान चित्त्यांचा मागमूसही राहात नाही. नैसर्गिक निवड ही डोळस नाही, त्यामुळे काळी-पांढरीही नाही. पण त्यात महत्त्वाची बाब म्हणजे हे कोणा व्यक्तीने, शक्तीने करण्याची गरज पडत नाही. वरून सोडलेली वस्तू आपोआप गुरुत्वाकर्षणाने खाली यावी त्याप्रमाणे विशिष्ट परिस्थितीत उपयुक्त असणारे गुणधर्म टिकून राहातात, आणि निरुपयोगी गुणधर्म नाहीसे होतात. अन्न मिळवण्याच्या गरजेतून चित्त्यांचा सरासरी वेग पुढच्या पिढ्यांमध्ये वाढतो. म्हणजे निवड करणारा कोणी नसला तरी निसर्गात असलेल्या परिस्थितीचा परिणाम म्हणून ते होते. म्हणूनच याला 'नैसर्गिक निवड' म्हणतात.

निवड हा शब्द काहीसा गोंधळात टाकणारा आहे. कारण त्यामागे 'कोणीतरी निवड करतो' असा छुपा अर्थ आहे. पण आपोआप होणाऱ्या निवडीची इतर उदाहरणंही आपल्याला दिसून येतात. पृथ्वीकडे बघितले तर सर्व जलसमुदाय एकीकडे आणि जमीन एकीकडे अशी बऱ्यापैकी रेखीव आखणी झालेली दिसते. ही आखणी कोणी ठरवून केली का? अर्थातच नाही. पृथ्वीच्या भूखंडांचा आकार विशिष्ट प्रकारे उंचसखल आहे ही नैसर्गिक परिस्थिती आणि पाणी उंचावरून वाहात खाली जाते एवढा भौतिक नियम, यामुळे अशी विभागणी आपोआप होते. ते कोणी घडवून आणावे लागत नाही. त्याचप्रमाणे पुरेश्या पिढ्या गेल्या की हरणे आणि चित्ते हे त्यांच्यातल्या भक्ष्य आणि भक्षक या नात्यामुळे आपोआप बदलताना दिसतात.

कालांतराने, परिस्थितीनुरुप बदल घडत वेगवेगळ्या प्रजाती निर्माण होतात, हे ठीक आहे. पण यातून जीवसृष्टीचा उगम कसा सांगता येतो? याचे उत्तर काही शब्दांत सांगणे सोपे नाही. पण आपल्याला जर रेणूंपासून पेशी कशा तयार झाल्या हे सांगता आले, तर त्या पेशींपासून द्विपेशीय जीव, त्यांच्यापासून 'सुधारित' अनेकपेशीय जीव कसे झाले हे समजून घेता येते. चित्ते आणि हरणांचा वेग जसा एकमेकांमुळे वाढत गेला, तसा सर्वच प्राण्यांचा विकास अगदी साध्या सुरूवातीपासून ते आत्ता दिसणाऱ्या वैविध्यापर्यंत कसा झाला हे समजू शकते. याचे काही टप्पे आपण पुढच्या काही लेखांत खोलवर जाऊन तपासून पाहू.

पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे सजीवसृष्टी जन्मण्यासाठी कोणा उच्च शक्तीच्या नियंत्रणाची गरज नाही. पुनरुत्पादनाची प्रक्रिया असली की नैसर्गिक निवडीतून आपोआप हे चराचर फुलून येते. या सत्याच्या जाणीवेत जगाकडे, स्वतःकडे आणि मानवांमधल्या परस्परसंबंधाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात क्रांती करण्याची शक्ती आहे. माझ्या देवाने जग निर्माण केले की तुझ्या देवाने हा प्रश्नच या सत्यापुढे विरघळून जातो, आणि सर्व धर्मयुद्धे निरर्थक ठरतात. 'मी या जगात का आहे?' या प्रश्नाचे साधे सोपे उत्तर - 'माझ्या आईवडिलांनी मला जन्माला घातले म्हणून' हे स्वीकारता येते. आणि त्यांचे आईवडील, त्यांचे आईवडील असे मागे जात जात आपल्या सगळ्यांची नाळ चार अब्ज वर्षांपूर्वीच्या कुठल्यातरी एकपेशीय जीवापर्यंत पोचवता येते. मी अमुक जातीचा, आपण तमुक धर्माचे, त्या हरामखोर परधर्मीयांचा नायनाट केला पाहिजे वगैरे विचार मग पोकळ ठरतात. अवकाशाच्या गहन पोकळीत साडेचार अब्ज वर्षांपूर्वी एक ग्रह नैसर्गिकरीत्या निर्माण झाला. त्यावर नैसर्गिकरीत्या प्राणीसृष्टी तयार झाली. आपण मनुष्य म्हणून जे काही लाख वर्षे आहोत, आणि सुसंस्कृत म्हणवत जी काही हजार वर्षे जगतो आहोत, ती या काही अब्ज वर्षांच्या आवाक्याच्या नखाचे टोक आहे. आपणही इतर प्राण्यांप्रमाणेच आहोत, फक्त जास्त हुशार आहोत, कपडे घालतो आणि वेगवेगळ्या भाषा बोलतो इतकंच. आपल्याला बनवणारे कोणी नाही, आपण बनलो. हा निसर्ग, हे प्राणी, ही सृष्टी आपल्यासाठी बनवलेली नाही - ती फक्त आहे. आपल्याप्रमाणेच या नैसर्गिक निवडीतून आणि भौतिकी-रासायनीच्या नियमांनी घडलेली, उत्क्रांत झालेली. हा विचार स्वतःला अनेक पाशांपासून, पूर्वग्रहांपासून मुक्त करणारा आहे.

हा विचार डार्विनने मांडला त्याला दीड शतक उलटून गेले. दुर्दैवाने अजूनही जगाच्या लोकसंख्येचा प्रचंड मोठा भाग या मुक्तीदायी सत्यापासून वंचित आहे.

(मी मराठी लाइव्हमध्ये पूर्वप्रकाशित)

हे ठिकाणविचार

प्रतिक्रिया

राजेश घासकडवी's picture

8 Dec 2015 - 7:03 pm | राजेश घासकडवी

लेखात पुरेसं स्पष्ट केलेलं नाही, पण या लेखात सादर केलेलं उत्तर म्हणजे गणिताच्या पुस्तकाच्या शेवटी लिहिलेल्या उत्तरासारखं आहे. ते कसं आलं, त्याच्या वेगवेगळ्या पायऱ्या काय याबद्दल पुढच्या भागांमध्ये चर्चा होईलच. त्यातली काही चर्चा इथे होणं अस्थानी नाही, पण विविध भागांवर त्या त्या पायरीची चर्चा होणं जास्त उपयुक्त ठरेल.

दुर्दैव हा शब्द 'इथं' खटकला. याहून अधिक समर्पक शब्द उचित ठरला असता. बाकी उत्तम लेख!

राजेश घासकडवी's picture

8 Dec 2015 - 9:48 pm | राजेश घासकडवी

लेख आवडल्याचं सांगितल्याबद्दल धन्यवाद. दुर्दैवी हा शब्द जर योग्य वाटत नसेल तर कुठचा शब्द जास्त समर्पक ठरेल?

देव आणि दैव या शब्दांवर, त्यांच्या मूलभूत विचारावर तुमचा आक्षेप असताना सु अथवा दुर्दैव हे शब्द उचित वाटत नाहित.
'आपल्या म्हणण्यानुसार' लोकांचं अज्ञान किंवा ज्ञानाचा पाठपुरावा करण्याबाबत उदासीनता हे शब्दसमूह योग्य ठरावेत.

राही's picture

9 Dec 2015 - 9:22 am | राही

दुर्वास्तवाने अथवा दुर्वास्तवरीत्या? (इथे दूर्वा आणि दुर्वास या परंपरागत वेगळा अर्थ लाभलेल्या संज्ञा आठवतील. पण सतत वापराने त्यांचा अपेक्षित अर्थ रूढ होऊ शकतो.)

यनावाला's picture

10 Feb 2016 - 2:02 pm | यनावाला

"दुर्दैव" या शब्दाऐवजी "दुर्भाग्य" असा शब्द योजता येईल. तद्वतच सुदैवासाठी सद्भाग्य.

विलासराव's picture

8 Dec 2015 - 10:09 pm | विलासराव

मस्त चाललीय लेखमाला.
इंटरेस्टिंग होत चाललीय.
मी खुप पूर्वी वाचले होते डार्विनचे पुस्तक.
बहुतेक ओरिजिन ऑफ़ स्पेसीज की असेच काहीतरी नाव होते.
डार्विनने चर्चला घाबरून आपला थिसिज उघड केला नव्हता.
दुसऱ्या कोणीतरी त्याच निष्कर्षाप्रत पोहोचले आणि त्याने तो त्याचा प्रबंध डार्विनकडे पाठवला. मग डार्विनने त्याचा थीसिस ओपन केला. ऎसे काहीसे वाचल्याचे स्मरते.
सर्वायवल ऑफ़ द फिटेस्ट नसून जे बदलाला सामोरे जाऊ शकतात ते टिकतात अस काहीतरी आहे.
मस्त लिहिताय तुम्ही. मजा येतेय वाचायला.

तो न सोडवता सरळ उत्क्रांतीवादापासून सुरुवात म्हणजे निव्वळ अशास्त्रिय मांडणी होते . त्यातून डार्वीनचा उत्क्रांतीवाद म्हणजे पुन्हा एक वैज्ञानिक अंधश्रद्घाच आहे कारण माकड ते माणूस यात निश्चित अशी लिंक एस्टॅब्लीश होत नाही .

अत्रुप्त आत्मा's picture

9 Dec 2015 - 12:05 am | अत्रुप्त आत्मा

मस्त हो घासुगुर्जी..मस्त!

अर्धवटराव's picture

9 Dec 2015 - 3:36 am | अर्धवटराव

'आपण का आहोत?' 'या सृष्टीचे कारण काय?' 'माझ्या जगण्याचे उद्दिष्ट काय?'

या मूलभूत प्रश्नांना डार्वीनचय थेअरीने कसा हात घातला हे कळलं नाहि.

राजेश घासकडवी's picture

9 Dec 2015 - 4:45 am | राजेश घासकडवी

आपल्या अस्तित्वाचं कारण काय? या प्रश्नामध्ये 'का कोणीतरी मला बनवलं? किंवा मानवजातच या पृथ्वीवर का आहे? आणि ही सृष्टी कोणी बनवली, का बनवली?' असे प्रश्न अंतर्भूत असतात.

बऱ्याच वेळा अमुक का? याचं उत्तर अमुक कसं? या प्रश्नाचं उत्तर दिलं की सुटतात. डार्विनच्या थिअरीने प्राणीसृष्टी शून्यापासून कशी निर्माण झाली हे सांगितलं, तीमागचा कार्यकारणभाव सांगितला. एकदा आपला जन्म कुठच्या प्रक्रियेने झाला हे कळलं की आपल्या अस्तित्वाचं कारण समजतं.

अर्धवटराव's picture

9 Dec 2015 - 7:23 am | अर्धवटराव

अमुक का? हा प्रश्न बाजुलाच राहु देऊ. कारण त्यात उगाच तत्वज्ञानाचा प्रांत डोकावतो. आणि अमुक कसं? पासुन अमुक का? ची उत्तरं शोधणं म्हणजे उगाच ते आध्यात्म आणि विज्ञानाचा सांधा जोडणं वगैरे जंजाळ झालं. या लेखमालेत हा प्रकार नको आणायला.

महास्फोटानंतर सृष्टीनिर्मीती व पुढे विवीध प्रकारची बलं आणि द्रव्यनिर्मीती हा एक टप्पा, व अणु-रेणुंपासुन पेशी निर्मीती हा दुसरा टप्पा. पण द्रव्यापासुन पेशी कशी इव्हॉल्व झाली या बद्दल डार्वीन काहिच बोलत नाहि, हा माझा प्रश्न होता.

राजेश घासकडवी's picture

9 Dec 2015 - 7:56 am | राजेश घासकडवी

बहुतेक वेळा 'कसं?' या प्रश्नाचं उत्तर मिळालं की 'का?' हा प्रश्न बाजूला पडतो. एक उदाहरण देतो. एके काळी देवीचा रोग कोणाला होईल हे सांगता येत नसे. कारण तो कसा होतो हे माहीत नव्हतं. त्यामुळे 'माझ्याच मुलीच्या चेहेऱ्यावर देवीचे वण का उठले?' या प्रश्नाचं उत्तर देता येत नसे. पण त्या रोगाची लागण कशी होते, त्यावर उपाय म्हणून लस कशी टोचून घ्यावी ही उत्तरं मिळाली की हे 'का?' प्रश्न विरघळून जातात. का प्रश्नामध्ये कार्यकारणभावाविषयीचं अज्ञान असतं. कसं च्या उत्तरामध्ये हे अज्ञान नष्ट करण्याची क्षमता असते.

द्रव्यापासून पेशी कशी बनली याबाबत चर्चा पुढच्या काही लेखांत होईलच. पण एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे पेशीमध्ये द्रव्यापलिकडे काही नसतं. द्रव्याची अतोनात क्लिष्ट रचना पेशीत असते. सर्वसामान्य अचेतन जगात दिसणाऱ्या सोपेपणापासून या क्लिष्टतेकडे कसा प्रवास होऊ शकतो याचा रोडमॅप डार्विनच्या थियरीतून मिळतो.

अर्धवटराव's picture

9 Dec 2015 - 11:25 am | अर्धवटराव

परिणाम डायल्युट झाला कि 'का?' बाजुला पडतो. जिज्ञासा आणि गरज उपयुक्ततावादाच्या आवाक्याबाहेर क्वचीतच असतात. पण 'का?' चं डायमेन्शन 'कसं?'पेक्ष नेहमीच भिन्न असतं.

राजेश घासकडवी's picture

10 Dec 2015 - 8:24 am | राजेश घासकडवी

पण 'का?' चं डायमेन्शन 'कसं?'पेक्ष नेहमीच भिन्न असतं.

याबद्दल वादच नाही. का चे प्रश्न काहीसे कर्तरी असतात तर कसं चे प्रश्न कर्मणि असतात. उदाहरण द्यायचं झालं तर,

तू हे का केलंस? हा प्रश्न कार्यासाठी व्यक्ती कारण आहे याउलट
हे कसं घडलं? या प्रश्नात प्रक्रियेबद्दल माहिती विचारणं आहे.

पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना कदाचित 'मी नाही हे केलं, अमुकअमुक झालं त्यामुळे हे असं दिसतंय' असं उत्तर मिळू शकतं. हेच का वरून कसं वर जाणं असतं. आणि अनेकवेळा आपल्याला का ऐवजी कसं चं उत्तर देऊन भागतं.

हे अगदी दगडावरच्या रेषेसारखं नाही. का चे प्रश्न जास्त व्यापक असतात, आणि बऱ्याच वेळा कसं च्या प्रश्नांना ते सामावून घेतात. पण बहुतेक वेळा त्या प्रश्नांमध्ये मूलभूत फरक आहेत हे निश्चित.

विवेक ठाकूर's picture

9 Dec 2015 - 11:28 am | विवेक ठाकूर

डार्विनच्या थिअरीने प्राणीसृष्टी शून्यापासून कशी निर्माण झाली हे सांगितलं, तीमागचा कार्यकारणभाव सांगितला. एकदा आपला जन्म कुठच्या प्रक्रियेने झाला हे कळलं की आपल्या अस्तित्वाचं कारण समजतं.

डार्विन शून्यापासून जीवसृष्टी कशी निर्माण झाली सांगतो ? आहो, पहिल्या लेखापासून तुम्ही शून्यच नाकारतायं आणि बिग बँग पासून सुरुवात केलीये. आणि आता, जीवसृष्टीची निर्मिती गृहित धरून, डार्विन एक तकलादू उत्क्रांतीवाद मांडतो त्याला तुम्ही सगळी उत्तरं सापडली असं मानून लेखमाला पुढे ढकलतायं.

शून्यापासून सुरुवात केली तर पुन्हा शून्यापर्यंत येऊन उत्तर सापडतं कारण सर्व निर्मिती, स्थिती आणि लय त्यात आहे. अर्थात, शून्य कळायला सगळा वैचारिक उहापोह थांबायला लागतो आणि ते अत्यंत दुर्लभ आहे.

तस्मात ही लेखमाला निव्वळ गृहितकांवर आधारलेला कल्पनाविलास आहे.

विवेक साहेब, आम्ही आपले पंखे झालोय. लगे रहो!

नगरीनिरंजन's picture

9 Dec 2015 - 5:10 am | नगरीनिरंजन

लेखमाला लिहायचे कारण समजले नाही. हे सगळे डार्विनच्या व इतरांच्या पुस्तकांमध्ये आहेच आणि ज्याला समजून घ्यायचे आहे तो ते वाचेलच.
शिवाय अशा लेखांमध्ये कधीही स्पष्ट लिहीले जात नाही की आपल्या अस्तित्वाला कारण असले तरी प्रयोजन काहीही नाही. आईनस्टाईनसारखे शास्त्रज्ञही गॉड डझन्ट प्ले डाईस म्हणतात हे वाचून. मानसिक मायाजाल आणि अहंकार इतका मोठा असतो की डिनायल मोडमध्ये जाणे सोपे असते आणि मग पास्कल्स वेजर सारख्या पांगळ्या लॉजिकल गोष्टींचा आधार घेतला जातो त्याचे परिणाम कितीही भयंकर असले तरी.
शिवाय निर्माता आणि पाप-पुण्याचा निवाडा करणारा सर्वज्ञ असा कोणीतरी आहे यावर विश्वास असूनही दुसर्‍यांना त्रास देणारे इतके असतात तर असा कोणी नाही म्हटल्यावर निव्वळ चांगुलपणासाठी चांगुलपणा करणे अशा लोकांना कसे शक्य होईल?
त्यामुळे असे ज्ञान फक्त स्वान्तबोधाय आहे. ज्यांना समजले व पटले ते अलिप्तपणे निघून गेले. बाकीचे लिप्त लोळत राहणार अध्यात्माच्या व देवाधर्माच्या गप्पा मारत.

राही's picture

9 Dec 2015 - 7:13 am | राही

आपल्या जालीय वावराविषयी अत्यंत आदर आहे. त्यामुळे प्रतिसादाची मांडणी नेहमीप्रमाणे आवडली. पण,
मानवी अस्तित्वाला कारण असले तरी प्रयोजन नाही असे म्हटल्याने सगळे शून्य होऊन जाते. लेखमालेला प्रयोजन नाही तसे या प्रतिसादालाही प्रयोजन नाही असे म्हणता येते.
ज्याला वाचायचे आहे तो वाचेल, समजावून घ्यायचे आहे तो घेईल असे झाले तर कशाचीच मांडणी करायला नको. तेव्हा हा अ‍ॅप्रोच तितकासा बरोबर नाही, सेल्फ-कॉन्ट्रॅडिक्टरी आहे.

नगरीनिरंजन's picture

9 Dec 2015 - 9:46 am | नगरीनिरंजन

माझी भाषा थोडी चुकली. लेखमाला लिहायचा उद्देश कळला नाही असे मला म्हणायचे होते.
एखाद्या गोष्टीच्या आकलनात फरक पडला तर त्या अनुषंगाने वागणुकीतही बदल घडतो असे निरीक्षण आहे. आपल्या अस्तित्वाबाबतच्या आकलनात फरक पडल्याने वागणुकीत कोणते बदल अपेक्षित किंवा संभाव्य आहेत? या आकलनानंतर माणसे/प्राणी/जीवसृष्टी जगवण्याच्या प्रयत्नांबद्दलही मूलगामी चर्चा व्हायला हवी का? नसल्यास का नाही?
माणसाच्या जन्माला प्रयोजन नसले तरी एकदा जन्म मिळाला म्हटल्यावर आणि स्वभान असल्याने आयुष्यात काय करायचे ते माणूस ठरवू शकतो किंवा किमान ईच्छा करु शकतो. त्यामुळे योगायोगाने का होईना पण जन्माला आलेल्या जिवंत माणसाच्या कोणत्याही कृतीला प्रयोजनाची आवश्यकता नाही.

सतिश गावडे's picture

9 Dec 2015 - 12:10 pm | सतिश गावडे

अशा लेखमाला यायला हव्यात. त्या निमित्ताने विषयाची आवड असणार्‍या वाचकांना नविन संदर्भ कळतात. उदाहरणच दयायचे झाले तर मी निरिश्वरवादी असूनही मला रिचर्ड डॉकिन्सबद्दल माहिती नव्हते. डॉकिन्सचा पहिला उल्लेख मी घासकडवींच्याच एका लेखात वाचला. तो होता डॉकिन्सने लिहिलेल्या "सेल्फिश जीन्स" या पुस्तकाच्या संदर्भातील. त्यानंतर मी डॉकिन्सची सेल्फिश जीन्स, दी गॉड डिल्युजन, दी ब्लाइंड वॉचमेकर, दी मॅजिक ऑफ रीअ‍ॅलिटी आणि दी ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ ही पुस्तके विकत घेऊन वाचली.

त्यामुळे असे ज्ञान फक्त स्वान्तबोधाय आहे. ज्यांना समजले व पटले ते अलिप्तपणे निघून गेले. बाकीचे लिप्त लोळत राहणार अध्यात्माच्या व देवाधर्माच्या गप्पा मारत.

याच्याशी सहमत असलो तरीही या मार्गावरून चालणार्‍या नवख्यांना कुणी थोडा प्रकाश दाखवला तर प्रवास अधिक सुलभ होतो. मिपावरील एक मित्रवर्य आहेत आमचे. त्यांच्या मनाला बर्‍याच गोष्टी पटायच्या नाहीत. मात्र लहानपणी झालेल्या संस्कारांमुळे त्या गोष्टी झटकून टाकायला मन कच खायचे. वरचेवर होणार्‍या भेटींमध्ये यावर चर्चा होऊ लागली आणि त्यांची वैचारीक बैठक पक्की होऊन मनातील कोलाहल थांबला.

नगरीनिरंजन's picture

9 Dec 2015 - 12:36 pm | नगरीनिरंजन

वेगळा वैचारिक कोलाहल सुरु व्हायला पाहिजे की नको? नव्या कल्पनांबरोबर जीवनासक्ती, अहंकार, अपत्यप्राप्ती याबाबतच्या विचारांमध्ये काहीच उलथापालथ होत नाही?

सतिश गावडे's picture

9 Dec 2015 - 1:42 pm | सतिश गावडे

माय ब्याड. कोलाहलच्या ऐवजी "गोंधळ" वाचा. :)

नगरीनिरंजन's picture

9 Dec 2015 - 1:56 pm | नगरीनिरंजन

ओके. माझंही थोडं क्ल्यारिफिकेशन. लेखमाला लिहू नये असं मला म्हणायचं नाही. मला असं म्हणायचंय की ही "माहिती" आधीच डार्विन्/डॉकिन्सच्या पुस्तकांमध्ये आहे. ती बर्‍याच लोकांना आधीच माहित आहे आणि काहींना माहित असून/नसून त्यावर विश्वासच नाही. म्हणून आधीच माहिती असलेल्या लोकांसाठी याच्या पुढच्या पायरीवरचे चिंतन केलेले बरे होईल. उत्क्रांती समजावून सांगायची गरज आजच्या काळात खरं तर भासू नये.

pacificready's picture

9 Dec 2015 - 12:49 pm | pacificready

@ ननि,
खिक्क्क.

राजेश घासकडवी's picture

9 Dec 2015 - 6:47 pm | राजेश घासकडवी

हे सगळे डार्विनच्या व इतरांच्या पुस्तकांमध्ये आहेच आणि ज्याला समजून घ्यायचे आहे तो ते वाचेलच.

हे तितकं सोपं नसतं. एकतर डार्विनच्या पुस्तकांत ही उत्तरं आहेत हे माहीत नसतं. मला नव्हतं माहीत. बारावीत असताना मी या बाबतीत चाचपडत होतो. कोणीतरी शक्ती हे सगळं जग चालवते यावर विश्वास नव्हता, पण त्याचबरोबर जीव कसे निर्माण झाले हे माहीत नव्हतं. उत्क्रांतीबद्दल 'जीव सुधारतात' 'सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट' 'प्रजातीच्या भल्यासाठी' वगैरेपलिकडे काहीच कल्पना नव्हती. सेल्फिश जीन वाचलं आणि डोळे खाडकन उघडले. आता जर डॉकिन्सने ते पुस्तक लिहिलंच नसतं, तर मी चाचपडत राहिलो असतो कदाचित. मी काही डॉकिन्स नाही, पण मला जे समजलं आहे, ते इतरांना समजावून सांगायची मला गरज वाटते कारण माझ्यासारखंच कोणीतरी चाचपडत असेल, त्यांना आपला रस्ता सापडू शकेल.

दुसरी गोष्ट म्हणजे इंग्लिशमध्ये या विषयावर ढिगाने पुस्तकं लिहिली गेली असली तरी मराठीमध्ये अगदी मोजकीच आहेत. त्यातही तुम्ही म्हटल्याप्रमाणे 'कर्ता नाही, आपोआप निसर्गनियमांतून सृष्टी निर्माण झाली' हे अधोरेखित केलंच असेल असं नाही.

ही लेखमाला लिहिताना केवळ उत्क्रांतीच नव्हे, तर एकंदरीत विज्ञानाने शोधून काढलेलं विश्व किती अद्भूतरम्य आहे हे मांडण्याचा प्रयास आहे. कोणीतरी तिसऱ्याने येऊन अंधश्रद्धा निर्मूलन वगैरे करण्यापेक्षा सत्याचं सौंदर्य जर भिडलं तर माणूस आपोआप बदलेल अशी माझी धारणा आहे. त्या दृष्टीने एक छोटासा प्रयत्न इतकंच.

सतिश गावडे's picture

9 Dec 2015 - 7:15 pm | सतिश गावडे

या विषयावर डॉ. सुलभा ब्रम्हनाळकर लिखित गोफ जन्मांतरीचे नावाचे सुंदर पुस्तक मराठीत सध्या मिळते.

कार्ल सगन यांच्या shadows of forgotten ancestors त्याच नावाचे रमेश लऊळ यांनी केलेले मराठी भाषांतरही सुंदर आहे.

नगरीनिरंजन's picture

10 Dec 2015 - 5:31 am | नगरीनिरंजन

ओके. समजले. मला स्वतःला मात्र डोळे खाडकन उघडले म्हणजे काय काय झाले त्यावर चर्चा करण्यात रस आहे.

अनुप ढेरे's picture

9 Dec 2015 - 9:51 am | अनुप ढेरे

लेखमाला आवडते आहे. चित्रविचित्र शंकांना पेशंटली उत्तर देणं पण आवडलं!

sagarpdy's picture

9 Dec 2015 - 11:14 am | sagarpdy

मस्त. पु भा प्र.

विवेक ठाकूर's picture

9 Dec 2015 - 3:22 pm | विवेक ठाकूर

बऱ्याच वेळा अमुक का? याचं उत्तर अमुक कसं? या प्रश्नाचं उत्तर दिलं की सुटतात

`का' (वॉट)? हा आध्यात्मिक प्रश्न आहे आणि `कसं' (हाऊ?) हा शास्त्रिय प्रश्न आहे.

`कसं' हा प्रश्न, घटना गृहित धरून ती का घडली याची कारणमिमांसा आहे.

सफरचंद खाली पडल्यावर न्यूटन ते `वर न जाता खालीच का पडलं' याचा विचार करतो. परंतु `का' हा प्रश्न `अस्तित्त्व का आहे' याचा वेध घेतो.

थोडक्यात, आध्यात्म हा, ज्यात घटना घडते त्या अवकाशाचा घटनेसकट घेतलेला वेध आहे आणि शास्त्र हे घटनेचा अ‍ॅनॅलिसिस आहे.

म्हणजे `कसं' पूर्वी `का' आहे आणि त्यामुळे `कसं' बापाजन्मात `का' चं उत्तर देऊ शकणार नाही.

अर्थात, एक मानसिक समाधान म्हणून `उत्तर मिळालं' हा भुलावा उपयोगी असेल पण पुढचा प्रश्न तो फार काळ टिकू देत नाही.

यावरनं एक ज्योक आठवला. एकदा वर्गात एक शिक्षिका विद्यार्थ्यांना सांगते की आज मी तुम्हाला मानवी जीवनातल्या अत्यंत महत्त्वाच्या शोधाबद्दल सांगणार आहे आणि ती गुरुत्त्वाकर्षणाच्या शोधा विषयी सांगते. मागच्या बाकावरचा एक विद्यार्थी हात वर करतो आणि विचारतो :

`मॅम, हा शोध लागण्यापूर्वी सफरचंद खालून वर जायची का'?

अनुप ढेरे's picture

9 Dec 2015 - 3:34 pm | अनुप ढेरे

काहीही वॅल्यु अ‍ॅडिशन न करता प्रतिसादांच्या लेंड्या टाकण्याचं कसब वाखाणण्याजोगं आहे.

राही's picture

9 Dec 2015 - 4:09 pm | राही

का?
सफरचंद वरून खालीच का पडतं याचं उत्तर त्या बाळाला आधीच गवसलं असतं तर असा वेड्यासारखा प्रश्न त्याने विचारला नसता. पण काय करणार. बाळच ते.
' कसं' हा प्रश्न, घटना गृहित धरून ती का घडली याची कारणमिमांसा आहे.' 'का' घडली याचीच कारणमीमांसा ना? झालं तर मग.

विवेक ठाकूर's picture

9 Dec 2015 - 5:11 pm | विवेक ठाकूर

त्या खाली पडण्याला फक्त गुरुत्त्वाकर्षण असं नांव दिलं गेलं, त्यानं प्रोसेसमधे फरक पडला नाही. मूळ प्रश्न झाड आणि सफरचंद का आहेत आणि त्याहूनही महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्यात ही घटना घडतेयं ते अवकाश काय आहे हा आहे. एखादे वेळी बालबुद्धीला प्रश्नाचा आवका लक्षात आला नसेल.

तुमच्या या प्रतिसादावरुन असे दिसते की "सफरचंद झाडावरून खालीच का पडते?" हा अध्यात्मिक प्रश्न आहे.
तुमचे एकंदरीत प्रतिसाद पाहता तुम्ही या क्षेत्रातील जाणकार दिसता. या "का?" चे उत्तर देऊ शकाल का?

विवेक ठाकूर's picture

9 Dec 2015 - 11:43 pm | विवेक ठाकूर

मूळ प्रश्न झाड आणि सफरचंद का आहेत आणि त्याहूनही महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्यात ही घटना घडतेयं ते अवकाश काय आहे हा आहे.

म्हसोबा's picture

10 Dec 2015 - 12:12 am | म्हसोबा

तुमच्या या प्रतिसादाने मला मूळ प्रश्न काय आहे हे तरी कळाले. ते डार्विनवादी काहीही म्हणोत, मला हे सारे अभ्यासू व्यक्तीकडून अध्यात्माच्या अंगाने समजून घ्यायला आवडेल.

तुमच्या प्रतिसादात दोन प्रश्न आहेत.

१. झाड आणि सफरचंद का आहेत?
२. ज्यात ही घटना घडतेयं ते अवकाश काय आहे?

माझ्यासारखा सामान्य वाचक पहिल्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल. कुणीतरी सफरचंदाच्या झाडाचे बी लावले, त्याला पाणी घातले, झाड मोठे झाले आणि त्याला निसर्गधर्माने फळ आले. अर्थात यामागे काही गुढ असेल तर ते माझ्यासारख्या सामान्य वाचकाच्या आकलनापलिकडचे आहे.

दुसर्‍या प्रश्नाचे म्हणाल, तर मला काहीच कळत नाही. कदाचित तुम्ही किंवा तुमच्यासारखी कुणीतरी अभ्यासू व्यक्तीच यावर भाष्य करू शकेल.

पण या लेखमालेवर ती चर्चा अयोग्य होईल. कदाचित हा लेख गोल्डफिश आणि गेस्टाल्ट आणि त्यावरचे प्रतिसाद तुम्हाला अवकाशाची कल्पना देऊ शकेल.

अर्धवटराव's picture

10 Dec 2015 - 1:15 am | अर्धवटराव

==))
अवकाश संप्रदायात याची उत्तरे आहेत होय :) तरीच म्हटलं हि लेखनशैली कुठेतरी वाचली आहे आगोदर.

पिलीयन रायडर's picture

10 Dec 2015 - 10:14 am | पिलीयन रायडर

संक्षी, तुम्हाला ३ वर्षांपुर्वीच डु आयडी घ्यायचं "कसं" सुचलं?
की
संक्षी, तुमच्या सारख्या निडर, बेधडक, स्वच्छंद, उत्स्फुर्त माणसाने डुआयडी "का" घेतला? शोभत नाही हो..

जो प्रश्न तुमचा फेवरिट असेल त्याचे उत्तर द्यावे प्लिझ!

पिलीयन रायडर's picture

10 Dec 2015 - 10:38 am | पिलीयन रायडर

३ वर्षांपुर्वी ह्या शब्दात "काळ" ही संकल्पना वापरली जात आहे जी आमच्या सरांना मान्य नाही. म्हणुन मी माझा पहिला प्रश्न मागे घेते.... (ही चुक लगोलग ध्यानात आणुन दिल्याबद्दल, धन्यवाद घासुगुर्जी!)

पहिल्या प्रश्नाऐवजी हा ही चालुन जावा:-

संक्षी, आता "कसं" वाटतय? गार्गार वाटतय?

संदीप डांगे's picture

10 Dec 2015 - 10:46 am | संदीप डांगे

अजूनही चुकताय वो ताय तुम्ही...

तुम्हाला अजिबात कळत नाही आहे की हा आयडी तो डुआयडी असं काहीही नसतं... सगळं अवकाशव्याप्त आहे. एकाच प्रेरणेची वेगवेगळी रुपे आहेत. खाली वाचा: संदर्भ

कोणत्याही खेळात किंवा नृत्यात प्राविण्य मिळवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं शरीरापासूनचं वेगळेपण जाणवणं, सगळा रियाज फक्त या एका गोष्टीसाठी चालू असतो, बाकी कौशल्य, स्वतःची स्टाइल वगैरे नंतर येतं. गेस्टाल्ट बदलल्यामुळे तुम्हाला आपण शरीरापासून वेगळे आहोत असं जाणवू लागेल, शरीरात एक हलकेपणा जाणवू लागेल. तुम्ही जीवनाकडे आणि कोणत्याही प्रश्नाकडे त्याच्या समग्रतेनं बघू लागाल, निष्कारण डिटेल्समध्ये शिरणं आणि गुंतून पडणं कमी होईल. तुमच्या आकलनाचा आवाका वाढेल, एखादी गोष्ट तुम्हाला सुरुवातीपासून शेवटापर्यंत कळू लागेल. आकारात अडकलोय असं वाटल्यानं निराकाराची सुटका दिसत नाही, ती कळू लागेल, "आता सर्व पर्याय संपले" असं वाटत असताना अचानक नवा पर्याय उपलब्द्ध होइल.

ते तेव्हाच सांगून गेल्ते... द्रष्टे आहेत, उगाच नै आम्ही त्येंचे फ्यान...!

पिलीयन रायडर's picture

10 Dec 2015 - 10:53 am | पिलीयन रायडर

आमचा अभ्यास नाही हो तेवढा... आधी समग्र संक्षी वाचायला हवं, मगच प्रश्न विचारण्याची जुर्र्त करायला हवी होती..
गुस्ताखी मुआफ..

मी दोन्ही प्रश्न मागे घेते हं सर...
आधी ते अवकाश, प्रेरणा आणि गॅन्डॉल्फ का कायसंस जे आहे ते समजुन घेते..

संदीप डांगे's picture

10 Dec 2015 - 10:58 am | संदीप डांगे

खिक्क! मिपावर संक्षीपुराणाचा अभ्यास मॅण्डेट्री आहे...

डांगे अण्णा, आपली वाटचाल सर-पणाकडे होतेय असं नम्रपने णि-दर्शनास आणून देऊ इच्छितो.

आरोह's picture

9 Dec 2015 - 9:43 pm | आरोह

एक सुंदर लेख वाचनात आला....बघा पटतय का?
The evolution of the species is observable. This really we can’t deny. However, I am not a Darwinist and I don’t subscribe to the notion that the survival of the fittest can explain the entire evolutionary process. The impulse of evolution is spiritual.

The process of evolution is correct, as Darwin explained it. However, there is a spiritual force behind it that Henry Bergson coined as elan vital or the vital force. This elan vital is immaterial. It appears in organic matter. As the organization of matter becomes more complex the size and the faculties of the elan vital increase.

What Bergson called elan vital is what our ancestors called soul. Volvox is an organism, or is it? You can break the unity of volvox and its components can live independent from each other. By coming together they can work in conjunction as if there is a mind controlling the entire group. The organism suddenly acquires a super-mind that is responsible for the behavior of their collectivity. You can observe the same phenomenon in a school of fish, a skein of geese, a host of sparrows, a flock of sheep, a swarm of bees, etc. Who controls these animals in group? How a murmuration of starlings know when to turn right or left simultaneously without an apparent leader? Watching hundreds of thousands of starlings move synchronically without bumping to each other, forming amazing shapes in sky is fascinating. How can they do that?

There seems to be that by coming together these animals become recipient of their super mind. This super mind is of spiritual nature. Whenever organisms of the same species come together and work jointly in harmony they become the seat of their super consciousness that takes control of them and moves them as if they were a single organism.

The entire evolution is based on this principle. Atoms are formed when particles join together. Particles are alive. But when they are organized as atom, they become the seat of a new spirit: the spirit of atom. Atoms are alive, even though their life is so primitive that we don’t consider them living. The process continues. Atoms form molecules, molecules form mega molecules, mega molecules form proteins, proteins form cells and cells form big organisms like humans. In each stage of the evolution matter becomes the seat of a bigger spirit and more “lively.” The cells composing your body are individually alive, but there is no comparison between your life and theirs.

Darwin was not wrong. His description of evolution was correct. But he did not see the spiritual force behind it. This spiritual force explains why despite entropy evolution is incremental. Why organisms are growing more complex instead of more disorderly.

संदीप डांगे's picture

9 Dec 2015 - 10:28 pm | संदीप डांगे

सहमत आहे. अगदी तंतोतंत....

राजेश घासकडवी's picture

9 Dec 2015 - 11:14 pm | राजेश घासकडवी

हा सगळा लेख एलान व्हिटे, आणि स्पिरिच्युअल फोर्स या शब्दांशिवाय वाचला तरी बरोबर ठरतो. उदाहरणार्थ,

As the organization of matter becomes more complex the size and the faculties of the elan vital increase.
याऐवजी
As the organization of matter becomes more complex the size and the faculties of the structure increase.
असं सोप्या भाषेत म्हणता येतं.

Atoms are alive, even though their life is so primitive that we don’t consider them living.

याला काव्यमय वाक्यापेक्षा दुसरं काही म्हणता येत नाही. अणूंचे जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म वापरून रेणू का तयार होतात, आणि त्यांचे विशिष्ट गुणधर्म तसे का असतात हे सांगता येतं. त्यासाठी कुठल्या इतर शक्तीची गरज पडत नाही.

How a murmuration of starlings know when to turn right or left simultaneously without an apparent leader?

https://www.youtube.com/watch?v=HxUL4I5CEN0 इथे फ्लॉक कसे तयार होतात, आणि एकत्र राहून स्वतंत्र निर्णयातून आपल्याला दिसणारं सुंदर दृश्य कसं तयार होतं याबद्दल थोडीशी माहिती आहे. प्रत्येक पक्षी आपल्याला जास्तीत जास्त गोष्टी दिसतील अशा पद्धतीने फक्त उडतो.

This spiritual force explains why despite entropy evolution is incremental.

एंट्रॉपीचा युक्तिवाद जुना आहे, मात्र क्लिष्ट रचना तयार होण्यासाठी त्याने अडथळा येत नाही. एके ठिकाणी एंट्रॉपी कमी झाली तर ती त्या प्रक्रियेत इतर ठिकाणी बरीच जास्त वाढते. आपल्या घरातल्या फ्रिजमध्ये बर्फ तयार होतो तसं. किंवा निव्वळ सूर्याच्या उष्णतेने खाऱ्या पाण्याचं बाष्प होऊन विरघळलेल्या मिठाची एंट्रॉपी कमी होते - व मिठाचे स्फटिक तयार होतात, तसंच.

असो. लेखकाला उत्क्रांती झाली हे मान्य आहे. मात्र मांडणीत अनेक त्रुटी आहेत.

नगरीनिरंजन's picture

10 Dec 2015 - 5:29 am | नगरीनिरंजन

हा हा हा.. गमतीशीर आहे. आजवर निर्माण झालेल्या प्राण्यांच्या प्रजातींमधल्या ९०% पेक्षा जास्त प्रजाती नामशेष झाल्या आहेत आणि प्रजाती नामशेष व्हायचा वेग आता खूप वाढला आहे. तेव्हा हा स्पिरिच्युअल फोर्स कुठे जातो? काहीतरी करुन माणूसच निर्माण करायचा व टिकवायचा अशी कोणा महान शक्तीची इच्छा आहे असेच सिद्ध करायचे असे ठरवून हे म्हटल्यासारखे वाटते.
शिवाय उल्का पडल्याने डायनॉसॉर्स नामशेष झाले व सस्तन प्राणी विकसित झाले. जर उल्का पडलीच नसती तर उत्क्रांतीने वेगळा मार्ग आक्रमिला असता. आता उल्कासुद्धा स्पिरिच्युअल फोर्सने पाठवली होती असे म्हणायचे असेल तर प्रश्नच मिटला.
राहता राहिला प्रश्न एन्ट्रॉपीचा तर पृथ्वीच्या आकारापुढे प्राण्यांचे बायोमास बरंच कमी आहे आणि माणूस वगळता इतर प्राणी अत्यंत कमी ऊर्जा वापरतात. शिवाय पृथ्वी ही पूर्णतः "क्लोज्ड सिस्टीम" नाहीय. सूर्याकडून ऊर्जेचा पुरवठा होतो पृथ्वीला आणि त्याचा दर स्थिर असला तरी तो प्राण्यांनी वाढवलेल्या एन्ट्रॉपीला पुरुन उरत असणार.

आरोह's picture

9 Dec 2015 - 10:47 pm | आरोह

Murmuration ची लिंक विसरलो
https://youtu.be/M1Q-EbX6dso

संदीप डांगे's picture

10 Dec 2015 - 1:23 am | संदीप डांगे

घासूगुरुजी, यनावाला यांनी फार कौशल्याने संक्षिप्त अवकाशाला कर्मबंधित ग्लानीतून बाहेर काढले आहे. विवेकाच्या रुपात तो प्रकटला असून आपल्या दिव्य ज्ञानकिरणांची मुक्तपणे उधळण करण्यास त्याने प्रारंभ केला आहे.

माझ्या बालबुद्धीला प्रतिसाद वाचून जे कळलं त्यावरून "का" हा प्रश्न उरतोच...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Dec 2015 - 5:17 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आदूबाळ डँबिस आहे.

विवेक ठाकूर's picture

11 Dec 2015 - 10:05 am | विवेक ठाकूर

"का" हा एकाच वेळी प्रश्न आणि उत्तर सुद्धा आहे.

`कसं' हा प्रक्रियेचा किंवा घटनेचा उलगडा आहे आणि तो शास्त्रिय दृष्टीकोन आहे . `का' हा ज्यात घटना किंवा प्रक्रिया घडते त्या स्पेसचा वेध आहे आणि तो आध्यात्मिक प्रश्न आहे.

शास्त्र निर्विवादपणे उपयोगी आहे आणि त्यामुळे जीवन बव्हंशी सुखी झालं आहे पण शास्त्र म्हणजे उत्तर नव्हे. कितीही सुखासिन जीवनात, कुणीही कोणत्याही पदाला असो, शेवटी जगण्यातली अनिश्चितता उरतेच. ही अनिश्चितता शास्त्र सोडवू शकत नाही, `का' चा उलगडा ती दूर करते कारण `का' ही निश्चितता आहे.

`का' ही कायम आणि एकसंध असलेली स्थिती आहे आणि घटना किंवा प्रक्रियेनं आबाधित आहे. शिवाय ती घटना किंवा प्रक्रियापूर्व अनिवार्यता आहे त्यामुळे शास्त्र तिचा उलगडा कदापिही करु शकत नाही. अध्यात्म प्रथम आणि शास्त्र पश्चात आहे.

त्यामुळे लेखमाला उत्तर देऊ शकणार नाही हे सुरुवातीलाच सांगितलं. `का' चं उत्तर देणारा एक सदस्य इथे होता, तो आता उत्तर देऊ शकत नाही.

पिलीयन रायडर's picture

11 Dec 2015 - 10:19 am | पिलीयन रायडर

तो एक सदस्य संक्षी आहेत ना? खरं सांगा... पण तसंही तुम्ही सांगु शकताच की मग..

बरं, मी तुमचा हा प्रतिसाद नीट वाचला. मला समजला सुद्धा. की "का" चे उत्तर हे फिक्स्ड कंपोनंट आहे. कोणत्याही घटनांचा, प्रकियेचा किंवा कशाचाच "का" वर परिणाम होऊ शकत नाही. आणि "का" चे उत्तर शास्त्र देऊ शकत नाही. ते तुमच्या मते अध्यात्म देऊ शकते. ओके?

ठिके.. तसं तर तसं.. ही लेखमाला "कसं" बद्दल तर बोलेल? आजवर कुणी काय थिअरी मांडल्या आहेत, आत्तापर्यंत शात्रज्ञांचे मत काय आहे इ उपलब्ध माहिती सोप्या भाषेत, एकाच ठिकाणी तर मिळेल? तुम्हाला नसेल त्यात इंटरेस्ट कारण तुम्हाला मुदलात डार्विन पण मुर्ख वाटतो.. तर तुम्ही नका वाचु.

सतत ह्या लेखमालेवर येऊन, ती कशी बोअर आहे, निरुपयोगी आहे हे सांगण्याचे प्रयोजन काय? तुमच्या भाषेत :-
"का" असं करताय?

आता ह्या प्रश्नाचे एकच फिक्स उत्तर असले पाहिजे, नाही का?

फक्त लेखकाचा हा दावा :

बऱ्याच वेळा अमुक `का'? याचं उत्तर अमुक `कसं'? या प्रश्नाचं उत्तर दिलं की सुटतात

हे मान्य नाही. कारण प्रोसेसचा उलगडा म्हणजे स्पेसचा उलगडा नाही.

कारण प्रोसेसचा उलगडा म्हणजे स्पेसचा उलगडा नाही.

हे योग्य वाटतंय.

पण राघांच्या म्हणण्यातल्या "बऱ्याच वेळा" या शब्दांतून आणि अन्य स्पष्टीकरणातून वाक्य खालीलप्रमाणे लिहीता येईल असं वाटतं.

बहुतांश व्यावहारिक आणि व्यक्तिगत पातळीवर पडलेल्या "का?" रुप प्रश्नांबाबत (उदा. मलाच का झालं हे) "कसं?" रुपी उत्तर / प्रोसेस कळली तर या गटातल्या "का?" रुप प्रश्नांतल्या "का" या भागाच्या उत्तराची निकड / प्रायॉरिटी नाहीशी होते.

बाकी का? हा प्रश्न हा एकच मोठ्ठा प्रश्न आहे. कोणाच्याही "ईषणे" शिवाय इतकी परस्परावलंबी व्यवस्था अस्तित्वात असू शकते हे मनाला पटवणं अतिशय अवघड असतं. त्यामुळे का हा प्रश्न निरर्थक असू शकतो हे पटवणंही.

विवेक ठाकूर's picture

11 Dec 2015 - 8:59 pm | विवेक ठाकूर

बहुतांश व्यावहारिक आणि व्यक्तिगत पातळीवर पडलेल्या "का?" रुप प्रश्नांबाबत (उदा. मलाच का झालं हे) "कसं?" रुपी उत्तर / प्रोसेस कळली तर या गटातल्या "का?" रुप प्रश्नांतल्या "का" या भागाच्या उत्तराची निकड / प्रायॉरिटी नाहीशी होते.

एक साधी गोष्ट पाहा :

`आत्ता, या क्षणी, आपला श्वास का चालू आहे?' या अत्यंत फंडामेंटल प्रश्नाचं उत्तर :

`आपण जीवंत आहोत म्हणून' किंवा हृदय चालू आहे म्हणून अथवा फुफ्फुसे काम करतायंत म्हणून, इतकं बाळबोध देऊन समाधान होत असेल तर प्रोसेसनं `का' चं उत्तर मिळालं म्हणता येईल. पण वस्तुस्थिती इतकी सोपी नाही.

काही हजार कोटी किलोमिटर्सवर सूर्यप्रकाशमान आहे त्यामुळे पृथ्वीवर जीवसृष्टी आहे. त्यात पृथ्वी स्वतःभोवती फिरतेयं म्हणून जळून खाक होत नाही. शिवाय गुरुत्त्वाकर्षणाच्या विविक्षित फोर्समुळे ती एका ठराविक परिघातच सूर्याभोवती फिरतेय. या सगळ्या भानगडींमुळे समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन ढग तयार होऊन पाऊस पडतोय. त्यामुळे झाडं जीवंत आहेत आणि त्यांचा उत्छ्वास आपला श्वास झाला आहे. आणि त्याच वेळी आपला उत्छ्वास त्यांचा श्वास झाला आहे. शिवाय हे अत्यंत ढोबळ आणि ज्ञात फॅक्टर्स आहेत. आणि त्याहून पुढे जाऊन या सर्व प्रक्रिया सायमल्टेनियस आणि डायनॅमिक आहेत त्यामुळे नक्की काय घडतंय याचा कुणाला कधीही पत्ता लागू शकणार नाही. आणि पत्ता लागला तरी पुढच्या श्वासाला सर्व काँबिम्नेशन्स बदलेली असतील.

इतक्या व्यापक जगात, जिथे आपल्याला सगळ्यात निकटच्या गोष्टीचा उलगडा होऊ शकत नाही, तिथे `विश्वोपत्तीचा उलगडा झाला' आणि तेही `काल या मानव निर्मित कल्पनेवर' म्हणणे अत्यंत हास्यास्पद आहे.

लेखकानं एक सोपं मोड्यूल घेऊन, फक्त स्वतःची समजूत घालण्याचा प्रयत्न चालवला आहे.

विवेक ठाकूर's picture

11 Dec 2015 - 10:23 pm | विवेक ठाकूर

उत्तरार्धात, ज्या अवकाशात या सर्व घटना घडतायंत ते अवकाश काय याचा वेध आहे आणि तो खरा `का'? आहे.

लेखकाचा सगळा फोकस प्रोसेसवर आहे, ते तर अवकाश मानायलाच तयार नाहीत. त्यात अवकाश ही प्रोसेसपूर्व स्थिती असल्यानं ती प्रोसेसला उलगडणं असंभव आहे.

अवकाश काय आहे हे समजण्यातच हयात घालवावी लागते. त्यानंतर, अवकाश आत-बाहेर, यत्र-तत्र, सर्वत्र आहे आणि ते आपल्याला अंतर्बाह्य व्यापून आहे याचा उलगडा होण्याची शक्यता निर्माण होते. मग सरते शेवटी अवकाश आणि आपण एकरुप आहोत या अत्यंत दुर्लभ वस्तुस्थितीचा बोध होतो.

त्या बोधात मग सर्व प्रश्न सुटतात असं नाही, तर प्रश्न विचारणाराच उरत नाही, सगळा कोलाहल शांत होतो. मग हे सर्व अस्तित्त्व एक रहस्य होतं आणि आयुष्य आनंदाचं होतं. आणि ते खरं उत्तर आहे.

अर्थात, अवकाश हे शब्दाचे बुडबुडे वाटत असतील आणि गाढवाला डोक्यावर घेतलं जात असेल तर, उत्तर सोडाच प्रश्न ही कळण्याची शक्यता दुरावते.

गणामास्तर's picture

11 Dec 2015 - 1:42 pm | गणामास्तर

असं समजा कि तुम्ही या सर्व शाब्दिक बुडबुड्यांच्या मध्ये आहात..(ही मान्यता आहे, वस्तुस्थिती नाही.)
त्यामुळे होतंय काय कि तुम्हाला आत मधून बाहेरचे सर्व अत्यंत डीस्टॉर्टेड आणि वेगळंच दिसतंय.
बुडबुडा हा देह आहे आणि तुम्ही त्यात बंद आहात अशी तुमची धारणा झालीये, त्यामुळे तुम्हाला सगळं डीस्टॉर्टेड दिसतंय. गेस्टाल्ट बदलून बघा म्हणजे तुम्हाला आपण बुडबुड्या पासून वेगळे आहोत असं जाणवू लागेल, विचारात एक हलकेपणा येईल.तुम्ही तुम्हाला पडलेल्या प्रश्नाकडे समग्रतेने बघू शकाल.. तुमच्या आकलनाचा आवाका वाढेल आणि तुम्हाला एकदाचे कळेल कि तुम्ही बुडबुड्या मध्ये बंद नाही आहात.
प्रयत्न करा तुम्हाला नक्की जमेल. पुन्हा पुन्हा हा प्रतिसाद वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचेय ते. उगाच उप प्रतिसाद द्यायची घाई करू नका.

संदीप डांगे's picture

11 Dec 2015 - 9:01 pm | संदीप डांगे

@संदीप डांगे,

that awkward moment when you make a funny question and people take it seriously.

प्रसाद१९७१'s picture

11 Dec 2015 - 2:02 pm | प्रसाद१९७१

ननि म्हणतात तसे मला ह्या मालिकेचा उद्देश अजिबात कळलाच नाही. पाठ्यपुस्तकातल्या बेसिक गोष्टी कवितांची फोडणी लाऊन दिल्यामुळे त्यातुन काही न वाचलेले आणि ऐकलेले कळत नाही. कदाचित वर्तमानपत्रांच्या बाल-पुरवणीत हे ठीक दिसेल ( त्यातल्या कविता काढुन ).

तसेही डार्विन थियरी बद्दल इतके आक्षेप असताना त्याला मुक्तीदायी सत्य वगैरे म्हणणे म्हणजे अति च आहे.
कोणी ७ - १० दिवसात ही सॄष्टी निर्माण केली असे नक्कीच कोणाला वाटत नाही पण डार्विन ची थियरी पण अगदी बेसिक प्रश्नांना पण उत्तरे देत नाही.

आबा's picture

11 Dec 2015 - 3:00 pm | आबा

आपल्या खालच्या प्रतिसादावरून आपण पाठ्यपुस्तके वाचली असावीत असे वाटत नाही

प्रसाद१९७१'s picture

11 Dec 2015 - 2:17 pm | प्रसाद१९७१

१. तसेही प्रचंड पसरलेल्या रासायनिक गोष्टीतुन आरेनए, डीएनए किंवा एकपेशीय सजीव निर्माण होणे हे अशक्य आहे आणि ते शक्य असल्याचा पुरावा अजिबात नाही.
२. जरी चुकुन एकपेशीय सजीव तयार झाला तर ही अत्यंत रेअर अशी घटना असणार आहे. त्या पहील्यांदाच तयार झालेल्या पेशी ला पुनरुत्पादन का करावे लागले किंवा वाटले असेल.
३. त्या एक पेशीय सजीवातुन द्वीपेशीय, चार पेशीय सजीव निर्माण होण्यामागे प्रेरणा काय? असे व्हावेच का ह्याचे काही उत्तर नाही.
४. अगदी बॅक्टेरीया सारखे सुक्ष्म जीव निर्माण झाले तरी त्यातुन त्याहुन मोठ्ठे जीव का निर्माण व्हावेत?
५. वेगात धावणारे चित्ते वगैरे सोडा पण मासे आणि कासवांच्या शरीरात सुद्धा असलेले अवयव ( हृदय, फुफुस, रक्तवाहीन्या, पचन संस्था ) असे ऑपोआप सुधारणा होत तयार का व्हाव्यात.
६. जिराफाची मान उंच वगैरे होण्याचे कारण ( उंच झाडावरचा पाला खाणे ) हे तद्दन बकवास आहे. उंचावरचे खावे लागले म्हणुन उंच मानेचे जीन तयार होत नाहीत.

असे बरेच पॉईंट आहेत घासु गुर्जींकडे ह्याची उत्तरे नक्कीच नाहीत आणि तशी ती कोणाकडेच नाहीत..

मानवाला काय झाले नाही ( ७ दिवसात जीव सृष्टी वगैरे ) हे माहीती आहे पण काय नक्की झाले असेल ते माहीती नाही.

लेखमालेत प्रचलित सिद्धांत सोपे करून सांगण्यासाठी जे तुम्ही कष्ट घेतलेत ते कौतुकास्पद आहेत. पण काही गोष्टी खटकल्या.
१. बिग बँगची सुरुवात किंवा त्याच्या आधी काय झाले हा विचार निरर्थक आहे हे म्हणणे पटले नाही. हे म्हणजे देवाची लिला अपरंपार म्हणून विषय टाळण्यासारखे आहे. खरं तर ह्या गोष्टीच स्पष्टीकरण देण्याइतक सध्याच भौतिक शास्त्र प्रगत नाही हे सांगण जास्त योग्य. आणि कुणीतरी ह्या गोष्टींचा विचार करतय म्हणून क्वाँटम ग्रॅव्हिटी सारखे विषय हाताळले जातात.
२. डार्विनचा सिद्धांत हा ज्याकाळात जनुकशास्त्राबद्दल काहीही माहित नव्हते त्याकाळात इतका मोठा विचार मांडला म्हणून त्याच्या कल्पना शक्तीचे खरोखर कौतुक वाटत आणि त्याविषयी आदरही आहे. पण त्यासाठी तेच एक पूर्ण सत्य म्हणून मान्य करणे योग्य नव्हे. डार्विनच्याच शब्दात सांगायच झालं तर "I am quite conscious that my speculations run quite beyond the bounds of true science." त्याच्या थेयरीच्या मर्यादा इथे पाहायला मिळतील
http://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3246855/

अंधश्रद्धा कुठेही घातकच मग ती देवावर असो वा शास्त्रावर.
जाताजाता, आमच्या पुर्वीच्या कंपनीत मी जेव्हा कामाला लागलो तेंव्हा लोकांनी मला एक गोष्ट सांगितली होती - There are two kind of sciences logical and biological. सुरुवातीच्या काळात मला असं वाटायचे की बॉयोलॉजिस्टची टांग खेचण्यासाठी केलेला एक विनोद होता. सहा वर्ष ह्या क्षेत्रात काल केल्यावर तो विनोद नाही असं सारखं वाटायला लागलं आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Dec 2015 - 6:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

चपखल !

अजया's picture

11 Dec 2015 - 7:17 pm | अजया

प्रतिसाद आवडला.पटला.

राजेश घासकडवी's picture

11 Dec 2015 - 6:40 pm | राजेश घासकडवी

काळाचा उगम जर एका क्षणाला झाला असेल तर 'त्याआधी' विषयी बोलणं विसंगत ठरतं, हे बऱ्याच वेळा म्हणून झालेलं आहे, त्यामुळे त्यावर आणखी वेळ खर्च करत नाही.

तुम्ही दिलेल्या दुव्यात खरं तर हे आक्षेप खोडून काढलेले आहेत. इररिड्युसिबल कॉंप्लेक्सिटी, मिसिंग लिंक्स वगैरे धार्मिक लोकांचे दावे आहेत. त्यांचा उत्क्रांतीवादावर राग आहे, कारण त्यामुळे देवाची निर्मितीक्षमता काढून घेतली जाते व मुलं नास्तिक होतात असं त्यांना वाटतं. अमेरिकेत झालेले उत्क्रांतीवादाविरुद्धचे कायदे हा फारच गमतीदार विषय आहे.

अंधश्रद्धा कुठेही घातकच मग ती देवावर असो वा शास्त्रावर.

हे किंवा अशी इतर वाक्यं कायम ऐकू येतात. पण देवावर विश्वास असणं आणि विज्ञानाच्या सत्यांवर विश्वास असणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे. बायबलमध्ये लिहिलं आहे म्हणून ते सत्य म्हणून विश्वास ठेवा असं सांगितलं जातं. याउलट विज्ञानाच्या क्षेत्रात प्रत्येक सत्य डोळसपणे तपासून पाहिलं जातं.

मला एक सांगा, तुम्ही विमानाने प्रवास करायचा झाला तर ते उडेल, खाली पडणार नाहीस(मिलियनमध्ये एक अपघात होतो ते सध्या बाजूला ठेवू), असा विश्वास ठेवून जाता की नाही? तो अंधविश्वास असतो का? याचं कारण तुम्ही विमानं उडताना पाहिलेली असतात. प्रत्यक्ष विमान प्रवास करून आलेले लोक तुम्हाला माहीत असतात. विमानाचं तंत्रज्ञान गेली शंभर वर्षं सुधारत चाललेलं आहे याची तुम्हाला माहिती असते. आणि अगदीच तुम्हाला गरज पडली तर हे तंत्रज्ञान काय आहे याचा अभ्यास तुम्हाला करता येतो. इतकं सगळं स्वच्छ आणि उघड असताना आपण जो डोळसपणे विज्ञानावर विश्वास ठेवतो त्याला अंधश्रद्धा का म्हणावं?

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Dec 2015 - 7:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

पण देवावर विश्वास असणं आणि विज्ञानाच्या सत्यांवर विश्वास असणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे.

त्यांनी "अंधश्रद्धा" शब्द वापरलाय "विश्वास" हा तुमचा शब्द आहे. हा एक शब्द बदलल्याने वाक्याच्या अर्थात जमीनस्मानाचा फरक पडतोय !!!

तुम्ही विमानाने प्रवास करायचा झाला तर ते उडेल, खाली पडणार नाहीस(मिलियनमध्ये एक अपघात होतो ते सध्या बाजूला ठेवू), असा विश्वास ठेवून जाता की नाही? तो अंधविश्वास असतो का?

हा विपर्यास आहे !

विमानाने केला जाणारा प्रवास हा... "लांब अंतराच्या प्रवासात विमानप्रवासामध्ये वेळ, श्रम व पैश्याची तुलनात्मक बचतच होते आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे व त्या सेवेत असलेल्या धोका टाळण्यासाठी घेतलेल्या काळजीमुळे विमानप्रवासात अपघात होण्याची शक्यता स्विकारार्ह असावी इतकी खूप खूप कमी असते"... या गृहितकांवर केला जातो. असा एखाद्या गोष्टीपासून होणार फायदा आणि तिच्यात असणारा धोका यांची तुलना करून तो धोका पत्करण्याचे अथवा न पत्करण्याचे अनेक "व्यावहारीक" ("अंधविश्वासी नव्हे") निर्णय आपल्याला रोजच्या जीवनात सतत घ्यावे लागतात.

साधी उदाहरणे द्यायची झाली तर...

१. "विमानप्रवासापेक्षा रस्त्यावरून केलेला प्रवास जास्त धोक्याचा आहे (उदा. दर दशलक्ष किमी प्रवासाला मृत्युचे प्रमाण, इ) हे अनेकदा सिद्ध झाले आहे. म्हणून रस्त्यानेही प्रवास करायचे टाळायचे काय की तो अंधविश्वासामुळे केला जातो ?

२. शाळा-कॉलेजाची डिग्री घेतल्याने नोकरी मिळेल... इतकेच काय घोकंपट्टी पुस्तकी ज्ञानापेक्षा जास्त काही मिळेल... याचीही १००% खात्री कोणीच देत नाही. म्हणून शिक्षण घेणे अंधश्रद्धा होत नाही.

दर दिवसाला आपण असे निर्णय डझनांनी घेतो. पण हातातल्या मुद्द्यासाठी इतके पुरेसे आहेत.

राजेश घासकडवी's picture

11 Dec 2015 - 7:47 pm | राजेश घासकडवी

तुम्ही उदाहरणावर अडून बसू नका. माझा मुद्दा त्या तंत्रज्ञानावर खात्री असण्याबाबत आहे. ती खात्री आहे कारण
१. त्यामागची वैज्ञानिक तत्त्वं जगजाहीर आहेत, आणि वारंवार तपासली गेलेली आहेत. ती कोणालाही अभ्यासता येतात.
२. विमान कसं बनवावं याचं शास्त्र अनेक संशोधनांनंतर अधिकाधिक समृद्ध झालेलं आहे. याचं कारण म्हणजे वेळोवेळी त्यांवर लोकांनी शंका घेतल्या, चुका काढून टाकण्याचा प्रयत्न केला.
३. या संशोधनाची आणि तंत्रज्ञान विकासाची पद्धत ही वैज्ञानिक पद्धत आहे. त्यातल्या पीअर रिव्ह्यू पद्धतीमुळे अनेकांकडून ते तपासलं जातं.
४. या तंंत्रज्ञानाचा धोका किती, सक्सेस रेट किती ही आकडेवारी सर्वत्र उपलब्ध आहे.

या सगळ्या गोष्टींना मी डोळसपणा म्हणतो. म्हणून मी 'विज्ञानावर अंधश्रद्धा' या शब्दप्रयोगाला फक्त आक्षेप घेतलेला आहे.

असो, मला श्रद्धा, अंधश्रद्धा वगैरे वादात पडायचं नाही. विज्ञानाच्या बाबतीत डोळसपणा आणि पारदर्शकता आहे इतकंच माझं मत मांडून थांबतो. विज्ञानातही अंधश्रद्धा असतात वगैरे मुद्दे इथे अवांतर होतील, त्यासाठी स्वतंत्र लेखन करावं ही विनंती.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Dec 2015 - 8:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

शास्त्रिय विषयावरचे लेख व प्रतिसाद यात केवळ आणि केवळ शास्त्रियदृष्ट्या योग्य असेच लिहावे, अन्यथा शास्त्रिय विचार पसरण्याऐवजी गैरसमज पसरवले जातात, असे मला वाटते. इतकेच !

पॉइंट ब्लँक's picture

11 Dec 2015 - 7:39 pm | पॉइंट ब्लँक

प्रतिक्रिया निट वाचेलली दिसत नाही. आपल्या लेखनमालिकेच्या प्रयत्नाचे कौतुक केले आहे. फक्त ज्या गोष्टी पुर्णपणे सिध्द झालेल्या नाहीत त्यावर ठाम भुमिका घेने हे खटकले इतकेच नमुद केले आहे. एखादी क्लिष्ट गोष्ट सोपी करून सांगताना त्यांमुळे गैरसमज पसरनार नाहीत ह्याची काळजी घेतली जावी अशी अपेक्षा आहे. अनुमान काय आणि सत्या काय हे स्पष्ट नमूद करणे विज्ञानात आवश्यक असावे अशी अपेक्षा होती.

पण देवावर विश्वास असणं आणि विज्ञानाच्या सत्यांवर विश्वास असणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे.

मान्य. वि़ज्ञान कशाला म्हणायचे हे एकदा स्पष्ट करा म्हणजे पुढे चर्चा करता येइल.

बाकी, कोलगेटन सांगितल की विज्ञान म्हणतं की मिठ आणि कोळष्यामुळं दात खराब होतात, आम्ही वि़ज्ञानप्रेमी मिस्री सोडून पेस्ट तोंडात कोंबनार आणि पुढ २५ वर्षांनी आपके पेस्ट मे नमक और कोयला नही है अस वाकुल्या दाखवल्यावर परत त्यांची मिठ आणि कोळसा असेलेली पेस्ट वापरायला तय्यार. धन्य आहे अशा विज्ञानप्रेमींची.

अनुप ढेरे's picture

11 Dec 2015 - 9:22 pm | अनुप ढेरे

बाकी, कोलगेटन सांगितल की विज्ञान म्हणतं की मिठ आणि कोळष्यामुळं दात खराब होतात, आम्ही वि़ज्ञानप्रेमी मिस्री सोडून पेस्ट तोंडात कोंबनार आणि पुढ २५ वर्षांनी आपके पेस्ट मे नमक और कोयला नही है अस वाकुल्या दाखवल्यावर परत त्यांची मिठ आणि कोळसा असेलेली पेस्ट वापरायला तय्यार. धन्य आहे अशा विज्ञानप्रेमींची.

मी नाय ब्वॉ थेट कोलगेटचं ऐकत. मी माझ्या डेंट्याला विचारतो. त्याला असल्या पेस्टांचा फायदा/तोटा माझ्यापेक्षा नक्कीच जास्तं समजतो.

कोल्गेट जाहिरातून गंडवतं याचा आणि विज्ञानप्रेमींचा सबंध नाही समजला.

मार्मिक गोडसे's picture

11 Dec 2015 - 10:30 pm | मार्मिक गोडसे

असं असेल तर काही वर्षापूर्वी कोंग्रेसचे खासदार नवीन जिंदाल यांनी स्नायुंचे दुखणे दूर करणारे 'तिरंगा' नावाचे ब्रेसलेट बाजारात आणले होते, त्यावरही विश्वास ठेवायचा का?