.
भाग १ - काळाचा आवाका, भाग २ - नासदीय सूक्त, भाग ३ - अस्तिस्तोत्र, भाग ४ - उत्क्रांतीचे उत्तर, भाग ५ - कोंबडी आधी की अंडं आधी , भाग ६ - जंबोजेट दृष्टांत, भाग ७ - अचेतनापासून सचेतनापर्यंत, भाग ८ - रेणूंपासून पेशींपर्यंत , भाग ९ - अनैसर्गिक निवड , भाग १० - नैसर्गिक निवड , सिंहावलोकन , भाग ११ - सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट
विज्ञानाचा मानवी जीवनावर कसा परिणाम होतो? विज्ञानातून तंत्रज्ञान निर्माण होते. त्या तंत्रज्ञानाचे अनेक फायदेतोटे - मुख्यतः फायदे - आपल्याला दिसत असतातच. अनेक रोगांच्या साथींचे उच्चाटन, माल्थसच्या नाकावर टिच्चून गेल्या पन्नासेक वर्षांत दुष्काळावर मिळवलेला विजय, आंतरजाल आणि मोबाइलमुळे जवळ आलेले जग ही सगळी तंत्रज्ञानाच्या यशांची उदाहरणे झाली. त्या तंत्रज्ञानाला विज्ञानाचाच आधार आहे. पण याहीपलिकडे जाऊन माणसाच्या विचार करण्याच्या पद्धतीवरच विज्ञानाचा परिणाम होतो. अनेक वेळा तो चांगला असतो. पण काही वेळा तो वाईट असतो. तंत्रज्ञानातून जसा अणुबॉंब तयार होतो, तसंच वैज्ञानिक तत्त्वांचा गैर अर्थ किंवा सोयीस्कर अर्थ काढल्यामुळेही जगावर तितकेच भयंकर दुष्परिणाम होतात. गेल्या काही लेखांत आपण उत्क्रांतीवादाचा आढावा घेतला. या लेखात उत्क्रांतीवादाचा गैर अर्थ काढल्यामुळे विसाव्या शतकाच्या सुरूवातीला विचारसरणी कशी घडली, बदलली हे पाहाणार आहोत.
'सर्वात लायक टिकून राहातो' हा निसर्गनियम आहे. नैसर्गिक निवडीतून घडणाऱ्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेचा तो परिपाक आहे. मात्र हा निसर्गनियम सरसकटपणे मानवी वर्तनाला लावण्याचा प्रयत्न झाला. त्याची ही थोडक्यात गोष्ट.
१७७६ साली, डार्विनने आपला उत्क्रांतीचा सिद्धांत जगासमोर मांडण्याआधी सुमारे नव्वद वर्षे आधी अॅडम स्मिथने 'वेल्थ ऑफ नेशन्स' हा ग्रंथ लिहिला. त्यात त्याने अर्थशास्त्रीय तत्त्वांचे सर्वात प्रथम मूलभूत विश्लेषण केले. साडेतीनशे वर्षांनंतर आजही त्याचा गाभा लागू आहे. अॅडम स्मिथने आपल्या अर्थशास्त्रीय चर्चेत 'बाजाराचा अदृश्य हात' ही संकल्पना वापरली. अनेक लोकांच्या गरजा, त्यांच्या मागण्या, त्यांची विशिष्ट उत्पादनासाठी विशिष्ट किंमत मोजण्याची क्षमता आणि त्याचबरोबर त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी लागणारे कष्ट, आणि त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा यांच्यात समतोल साधण्याचे काम हा बाजाराचा अदृश्य हात करतो. काहीसे नैसर्गिक निवडीसारखंच. कोणी गरीब व्हावे, आणि कोणी श्रीमंत व्हावे हे बाजाराच्या गरजेनुसार आणि वैयक्तिक कौशल्यानुसार ठरते. ज्यांच्याकडे त्या गरजा पूर्ण करण्याचे कौशल्य, साधने असतात त्यांना श्रीमंत होता येते, ज्यांच्याकडे नसतात ते गरीब राहातात अगर बनतात. नैसर्गिक निवडीतही ज्या प्राण्यांकडे तत्कालीन परिस्थितीत तगण्यासाठी आवश्यक गुणधर्म असतात ते तगतात, बाकीचे मरतात. बाजाराचा आणि नैसर्गिक निवडीचा अदृश्य हात सारख्याच पद्धतीने काम करतो. निसर्गात घडणाऱ्या घटना आणि मानवी समाजात घडणाऱ्या घटनांमध्ये इथे साम्य दिसते.
हे सर्व ठीकच आहे. मात्र प्रश्न येतो तो असा - की जंगलात जो नियम प्राण्याने जगावे की मरावे असे ठरवतो तोच नियम मानवी समाजासाठी, नैतिकता म्हणून लागू व्हावा का? अर्थशास्त्र काय, किंवा उत्क्रांतीवाद काय, एकदा वैज्ञानिक सत्य म्हणून मांडले गेल्यावर ते केवळ पुस्तकात राहात नाही. त्याचा आपल्याला सोयीस्कर अर्थ लावून त्याप्रमाणे फायदा करून घेण्यासाठी पुढे येणाऱ्या शक्ती समाजात असतात. या दोन्ही शास्त्रांचा संगम करून घेण्यात काही शक्तिवान घटकांचा फायदा होता. ते म्हणजे नवश्रीमंत - औद्योगिक उत्पादक किंवा कारखानदार. औद्योगिक क्रांतीनंतर मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या यंत्रयुगात कारखानदारांकडे पैसा एकत्रित होत होता. सधन आणि त्यामुळे शक्तिवान असा एक नवीन वर्ग तयार होत होता. या वर्गाला आपल्या हाती असलेली संपत्ती व सत्ता ही आपल्याला आपल्या कर्तृत्वामुळे मिळालेली आहे, त्यासाठी दुर्बळांचे शोषण करण्याचा आपल्याला नैतिक अधिकार आहे असे सांगणाऱ्या तत्त्वज्ञानाची आवश्यकता होती. सामाजिक डार्विनवादाने ती पूर्ण केली.
स्मिथने केलेल्या अर्थशास्त्राच्या मांडणीआधीही 'लेझे फेअर' किंवा फ्री मार्केट - मुक्त अर्थव्यवस्थेचे प्रतिपादक समाजात प्रबळ होते. त्यांच्या मते सरकारने बाजाराच्या कारभारात बिलकुल ढवळाढवळ करू नये, कारण अशा ढवळाढवळीमुळे बाजाराची कार्यक्षमता कमी होते असा युक्तिवाद असे. पण बाजाराचा अदृश्य हात, आणि सर्वात लायक टिकून राहातात हा निसर्गनियम यामुळे या युक्तिवादांना अधिष्ठान प्राप्त झाले. समाजात गरीब लोक का आहेत? याचे सोपे उत्तर म्हणजे जे आळशी आहेत, जे कमी बुद्धीमान आहेत, जे कमी कुशल आहेत, ज्यांच्याकडे श्रीमंत होण्याची क्षमता नाही, लायकी नाही ते गरीब राहातात - हा विचार पुढे यायला लागला, आणि प्रस्थापित व्हायला लागला. यातून श्रीमंत, सत्ताधारी आणि शक्तिवान हे नैसर्गिकरीत्या 'चांगले' आणि गरीब, सत्ताहीन आणि दुर्बळ हे नैसर्गिकरीत्या 'वाईट' किंवा कमी दर्जाचे हा विचार बळावायला लागला. त्यातून अनेक वाईट गोष्टी घडल्या. या मांडणीलाच 'सामाजिक डार्विनवाद' असे सामूहिकरीत्या म्हटले जाते.
युजेनिक्सचा जन्म आणि प्रसार हे त्याचे सर्वात भीषण स्वरूप. युजेनिक्स म्हणजे समाजातल्या वाईटांना पुनरुत्पादन करण्याची संधी नाकारणे, आणि चांगल्यांना अधिक पुनरुत्पादन करण्याची संधी देऊन एकंदरीत समाजाचे गुणधर्म सुधारण्याचा प्रयत्न. हे ऐकायला छान वाटते, पण चांगले कोण आणि वाईट कोण हे कोण ठरवणार? 'आम्ही श्रेष्ठ आणि ते कनिष्ठ' ही वर्णवादी, वंशवादी भावना पूर्वीपासूनच मानवामध्ये आहे. मात्र सामाजिक डार्विनवादातून जेत्यांना आपण केवळ जेते आहोत यापोटी इतरांना कनिष्ठ मानण्याची सबब मिळाली. त्याकाळी पसरत चाललेल्या साम्राज्यवादात ब्रिटिश हे भारतीयांपेक्षा श्रेष्ठ का आहेत, तर ज्याअर्थी ब्रिटिशांनी भारतावर विजय मिळवला त्याअर्थी ते श्रेष्ठच आहेत, त्यांचीच जगण्याची लायकी आहे, त्यांनाच हुकुमत गाजवण्याचा नैतिक अधिकार आहे. अशा प्रकारे स्वार्थ आणि शक्ती यांना इतरांवर हुकुमत गाजवण्याला नैतिक पाठबळ मिळाले. युजेनिक्स ही त्याच्या पुढची पायरी. समाजातले कमकुवत घटक नैसर्गिक निवडीने मरून जातात, आणि केवळ शक्तिवान घटक शिल्लक राहातात हा निसर्गनियम आहे. तेव्हा कमकुवत घटकांना मारून टाकणे, त्यांना गुलाम करणे, त्यांची संपत्ती हिरावणे, त्यांच्यावर सक्तीची नसबंदी करणे, त्यांना इतर 'सशक्त' वर्णियांशी लग्न करायला मनाई करणे अशा प्रकारच्या अनेक घटनांना ऊत आले होते. विसाव्या शतकातल्या पहिल्या दोन-तीन दशकांत अनेक देशांत या प्रकारच्या संशोधनाला आणि त्यानुसार कायदे व कारवाई करण्याला राजमान्यता होती.
युजेनिक्सची कल्पना फ्रान्सिस गाल्टनने - डार्विनच्या चुलतभावाने प्रथम मांडली. समाजाचा जनुक-समुच्चय सुधारण्यासाठी कमकुवत लोकांना पुनरुत्पादन करण्यापासून रोखले पाहिजे हे तत्त्व अनेक देशांनी अंगिकारले. अमेरिका, जर्मनी, स्वीडन यांसारख्या प्रगत देशांनी मंदबुद्धी व गुन्हेगारांना सक्तीची नसबंदी करण्याचे कायदे केले. अमेरिकेत विसाव्या शतकाच्या सुरूवातीपासून ते १९६० च्या दशकाच्या मध्यापर्यंत सुमारे ६४००० सक्तीच्या नसबंदी झाल्या. या नसबंदींच्या कार्यक्रमाच्या उदाहरणातूनच नाझी जर्मनीने आपला कार्यक्रम राबवण्यासाठी स्फूर्ती घेतली. युजेनिक्समागे एक वर्चस्ववाद होता, तो सरंजामशाही, वसाहतवाद, वर्णवर्चस्ववाद, फॅसिझम आणि नाझीझम यांतून दिसून आला. या सर्व तत्त्वप्रणालींना 'सामाजिक डार्विनवादाचाच' वैचारिक कणा होता. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट - टिकायला लायक टिकून राहातात या तत्त्वाचे रूपांतर 'आम्ही टिकलो, सत्तेत आलो याचा अर्थ आम्हीच श्रेष्ठ आहोत, आणि इतर नालायक आहेत' असा केला गेला होता. जगात कायमच जेते व जित असा भेदभाव होता. सामाजिक डार्विनवादातून त्या भेदभावाला वैचारिक पाठबळ मिळाले. तसे असणे हाच निसर्गाचा नियम आहे, आणि या नियमातूनच आपण जेते असण्यासाठी लायकीचे आहोत असा अभिमान जेत्यांना मिरवता आला.
युजेनिक्स आणि एकंदरीतच सामाजिक डार्विनवादाची विचारसरणी विसाव्या शतकाच्या मध्याच्या सुमाराला - दुसऱ्या महायुद्धानंतर मागे पडली. याचे मुख्य कारण म्हणजे हिटलरने ज्यू वंशाची हत्या करण्याचे काम याच युजेनिक्सच्या तत्त्वांखाली केले होते. मानवी हक्कांची घोषणा जेव्हा जगातल्या बहुतेक देशांनी मान्य केली तेव्हा युजेनिक्स वापरण्याचा प्रयत्न करणे हे मानवी हक्कविरोधी ठरवण्यात आले. आणि सुदैवाने तेव्हापासून जगभरात वांशिक हत्याकांडाला मान्यता राहिलेली नाही.
आपल्याला सामाजिक डार्विनवाद्यांचे कुठेतरी चुकले हे मनातून समजते. पण नक्की गल्लत कुठे हे नीट समजत नाही. तगायला लायक ते टिकून राहातात हा निसर्गाचा नियम असेल तर तो मानवी समाजाला का लागू होऊ नये? उत्क्रांतीवादच जर म्हणत असेेल की शक्तीवान टिकून राहातात तर याचा अर्थ त्यांनी टिकून राहावे असा होत नाही का? इथे जो काही गोंधळ आहे तो नीट समजावून घेणे आवश्यक आहे. या दोनमध्ये मुख्य फरक आहे तो 'काय आहे' आणि 'काय असावं' यातला. डार्विनचा उत्क्रांतीवाद 'काय आहे' हे सांगतो. 'काय असावं' हे उत्क्रांतीवाद ठरवत नाही. 'आहे' पासून 'असावं'पर्यंतचा प्रवास हा कुठच्याही ठाम पायावर आधारलेला नाही. ती एक हवेत घेतलेली वैचारिक उडी आहे. निसर्गात अमुकतमुक दिसून येते म्हणजे निसर्गाची तशी इच्छा आहे हे आपणच कुठेतरी मनात गृहित धरतो. आणि मग ती इच्छा आपण स्वतःवरच नियम म्हणून लादून घेतो. खरे तर निसर्गाला इच्छा कसलीच नसते. तगायला लायक तगून राहातो या नियमातही टिकलेला तो चांगला असे म्हटलेले नाही. तो टिकलेला आहे, पुढच्या पिढीत गेलेला आहे इतकंच. तो विशिष्ट गुणधर्म पुढे जावा अशी कुठल्या निर्मात्याची, उच्च शक्तीची इच्छा आहे म्हणून नव्हे.
थोडक्यात, उत्क्रांतीवादाच्या तत्त्वाचा वर्चस्ववाद्यांनी आणि वर्णद्वेष्ट्यांनी आपल्या फायद्यासाठी गैर अर्थ काढून वापर करून घेतला. आपल्या जेतेपदामुळेच आपण जे करतो ते योग्य ठरते असे मानायला नैतिक अधिष्ठान मिळवले. आणि हे झाले याचे कारण म्हणजे उत्क्रांतीवादाने जे आहे त्याचे वर्णन केले तर सामाजिक डार्विनवाद्यांनी सोयीस्करपणे त्यातून काय असावे असा अर्थ काढला. सत्याचा राजकीय, आर्थिक सोयीसाठी अर्थ काढणे हे आजही जागोजागी दिसून येते. इतिहासातल्या उदाहरणांतून समज घेऊन अशी धूळफेक आपण जितक्या लवकर ओळखू तितके बरे.
प्रतिक्रिया
10 Jan 2016 - 11:44 pm | राही
अतिशयच आवडला हा लेख.
11 Jan 2016 - 12:12 pm | अर्धवटराव
पण युजेनिक्स खरच कळलं असं ठाम वाटत नाहि. आणखी विचार करावा लागेल.
युजेनिक्स खोडुन काढायला आपण युजेनिक्सच वापरत आहोत काय?
11 Jan 2016 - 6:23 pm | राजेश घासकडवी
युजेनिक्स म्हणजे थोडक्यात मानवजातीची अनैसर्गिक निवड. मागे आपण कणसांचं उदाहरण पाहिलं. त्यात सर्वात लांब कणसं निवडून फक्त त्यांचीच लागवड करायची, आणि बाकीच्यांची लागवड होऊ द्यायची नाही असा प्रयत्न होता. तसंच मानवजातीबाबत करायचं असा प्रयत्न होता. पण माणसं म्हणजे कणसं नव्हेत. प्रत्येकाला आपलं जीवन जगण्याचा अधिकार आहे. मूल जन्माला घालण्याचा अधिकार आहे. अशी सक्तीची नसबंदी करणं म्हणजे मूलभूत अधिकारांवरच घाला येतो. त्यामुळे मानवी हक्कांच्या घोषणेत युजेनिक्सच्या प्रयत्नांवर बंदी आहे.
12 Jan 2016 - 6:52 am | अर्धवटराव
डेफिनेटली. ते गैर आहेच. पण सशक्तांना, सुस्वरुपांना, दिर्घायु लोकांना श्रेष्ठत्वाची जाणिव होणं म्हणजे त्यांचे गुण पुढील पिढीला ट्रान्सफर करण्याची नैसर्गीक प्रोसेसचा भाग असावा काय? माणुसकी, नैतिकता, न्यायबुद्धी वगैरे गोष्टी शिष्ट समाजाचा आचारविचार झाला. ति ही एक प्रकारची अनैसर्गीकताच/कृत्रीमताच. जर सगळ्या मानवी प्रेरणा अंतीमतः नैसर्गीक सिलेक्शन प्रोसेसने घडल्या आहेत तर मनुष्य शरीर टिकुन राहायला, बळकट व्हायला जे काहि कारणीभूत ते कंटिन्यु करण्याची प्रेरणा देखील स्वाभावीक म्हणावी लागेल ?
माझा जगण्याचा हक्क कुणी हिरावुन घेत असेल तर त्याला प्रतिकार करणं हा जसा शरीर टिकवण्याचा प्रकार आहे तसाच प्रकार सुंदर, सुदृढ शरीर भावी पिढीला हस्तांतरीर करण्याच्या प्रेरणेमागे असेल?
12 Jan 2016 - 6:35 pm | राजेश घासकडवी
व्यक्तीगत इच्छा, ऊर्मी या काही प्रमाणावर निसर्गातून आलेल्या आणि काही प्रमाणात संस्कारातून शिकलेल्या असतात. 'माझा वंश पुढे चालावा' ही इच्छा जगात सर्व समाजात दिसून येते. ती नैसर्गिक प्रेरणा आहे, त्यामुळे कुठचाही समाज बनवताना त्या प्रेरणेचा आदर असावा. आपला समाज बळकट व्हावा ही समाजाची प्रेरणा असते. तीही साधली जावी. फक्त समाजाच्या बळकटीसाठी त्यातल्या काही घटकांच्या मूलभूत अधिकारावर गदा येऊ नये.
आपला वंश पुढे चालावा, आपल्यासारखंच शरीर/गुणधर्म असलेलं मूल असावं ही अर्थातच जनुकीय प्रेरणा आहे. ज्या जनुकांनी अशी ऊर्मी असलेली शरीरं/मेंदू तयार केले, तेच जीनपूलमध्ये टिकले. ज्यांनी अशी प्रेरणा नसलेली शरीरं तयार केली ते नाहीसे झाले. त्यामुळे सुंदर, सुदृढ किंवा कसंही शरीर भावी पिढीत निर्माण करावं ही प्रेरणा बहुतांशांना असते.
11 Jan 2016 - 8:38 pm | मारवा
सक्तीची नसबंदी एका बाजुने दुसरी कडुन गर्भपाताचा अधिकार न देणे
नैतिकतेचे प्रश्न आव्हाने फार कॉम्प्लेक्स असतात. एक या निमीत्ताने आस्तिक=नैतिक हे एक अत्यंत चुकीच समीकरण वापरल जात असत किंवा आस्तिक=पवित्र प्रामाणिक चांगुलपणा यावर सहसा आक्षेप घेतला जात नाही.
एक मांडणी पोप्युलर आहे धार्मिक बाजुने धर्म आहे म्हणुन नीती आहे लोक नितीने देवाच्या भयाने का होइना वागतात
देवच नसेल तर लोक नितीने का वागणार? याला अगदी प्राथमिक प्रतिवाद म्हणजे ट्रॅफिक पोलिस आहे म्हणुनच वाहतुकीचे नियम पा़ळणे. वाहतुक तीची समस्या त्यावरची उपाययोजना हा कॉम्प्लेक्स भाग बिनमहत्वाचा करुन पोलिसाचे अस्तित्व मध्यवर्ती बनविणे असा काहीसा गमतीदार प्रकार.
दुसर नीती हा पुर्णपणे स्वतंत्र विषय आहे तत्व आहे त्याचा सविस्तर धर्म-निरपेक्ष अभ्यास आचरण करता येत. उलट धर्मात जो नितीचा वापर असतो तो फार तुटक मर्यादीत आउटडेटेड असतो. उदा. टॅन कमांडमेंट्स किंवा शेजार्यावर प्रेम करा
असे नीतीचे आदेश शिकवण अपुर्णतेने तकलादु रीतीने धर्मात हाताळले जातात ते कालबाह्य अपुर्ण असतातच शिवाय विशिष्ट हितसंबंधातुन बनविलेले असतात. त्यामानाने धर्मनिरपेक्ष नितीचा स्वतंत्र अभ्यास तत्वे आचरण हे एका विशाल परीघातुन केले जाते. त्यात बदलत्या सतत बदलत्या सत्याला परीस्थीतीला प्रतिसादात्मक अशी मुल्य निर्मीती होत असते. धर्मग्रंथातुन स्टॅटीक नीती प्रतिपादन केलेली असते. धर्मनिरपेक्ष तात्विक नीती ही डायनॅमिक असते. धार्मिक माणसाचा नितीनिर्णय भय प्रलोभनातुन येतो. जन्नत बाय जिहाद स्वर्ग बाय दानव वध इ. एका अ-धार्मिक व्यक्तीचा नितीनिर्णय धर्म-निरपेक्ष तात्विकतेच्या आधारावरुन आलेला अधिक व्यापक खोल असतो. बदलत्या परीस्थीतीला एकुण सत्याला सामावणारा असतो काल सुसंगत असतो.
12 Jan 2016 - 7:07 pm | आदूबाळ
लेख उत्तम आहेच, पण सामाजिक डार्विनवादाच्या मुळाशी - अजाणतेपणे का होईना - अॅडम स्मिथ आहे हा निष्कर्ष काही पटला नाही.
12 Jan 2016 - 8:04 pm | राजेश घासकडवी
लेखाचा उद्देश 'वैज्ञानिक सिद्धांतांचा मानवी जीवनावर परिणाम कसा होतो?' असा आहे. आणि सामाजिक डार्विनवादाची जडणघडण कुठल्या कुठल्या सिद्धांतांच्या पायांवर उभी आहे याचा किंचित आढावा आहे. लेझे फेयर विचारसरणी हा अर्थशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि अॅडम स्मिथचं नाव केवळ अर्थशास्त्राचा जनक म्हणून आलेलं आहे. मार्केटचा अदृश्य हात जशा गोष्टी घडवून आणतो तसंच डार्विनच्या उत्क्रांतीवादात नैसर्गिक निवडीचा अदृश्य हात प्राण्यांमध्ये बदल घडवून आणतो. या दोन्हींमध्ये 'सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट' आहेच. सामाजिक डार्विनवादात 'अनफिटांना मारून टाकलं पाहिजे म्हणजे फिट सर्व्हाइव्ह होतील' अशी मांडणी होती. त्यामुळे हे सर्वच विचारप्रवाह संबंधित आहेत. उत्क्रांतीवाद आणि अर्थशास्त्र डिस्क्रिप्टिव्ह आहेत, तर सामाजिक डार्विनवाद प्रिस्क्रिप्टिव्ह आहे. पहिली दोन प्यूअर सायन्सेस आहेत, तर तिसरं 'तंत्रज्ञान' आहे.
26 Jan 2016 - 2:08 am | बबलु
अतिशय आवडला हा भाग. एकूणच ही मालिका अप्रतिम.
26 Jan 2016 - 2:13 am | बबलु
राजेश, बादवे.., एकदा या मालिक मालिकेत गलापगॉस आयलण्ड वर पण लिहावे अशी विनन्ती. :)