सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.
सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक
सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक
सायकलीशी जडले नाते ३: नदीसोबत सायकल सफर
सायकलीशी जडले नाते ४: दूरियाँ नज़दिकीयाँ बन गईं. . .
सायकलीशी जडले नाते ५: सिंहगड राउंड १. . .
सायकलीशी जडले नाते ६: ऊँचे नीचे रास्ते और मन्ज़िल तेरी दूर. . . . . .
सायकलीशी जडले नाते ७: शहरामधील सायकलिंग. . . . . .
सिंहगड राउंड २!
सातत्य नसलं तरी जानेवारी २०१४ मध्ये सायकलिंग पुढे सुरू राहिलं. ७ जानेवारीला एक छोटी राईड केली. सायकलिंगमध्ये गॅप पडत असली तरी उत्साह वाढतोय. कदाचित योगासने व प्राणायाम करत असल्याचा (आठवड्यातून रोज नाही, पण आठवड्यातून चारदा) व जंप्सचा फायदा स्टॅमिना वाढण्यासाठी मिळतोय. आता डिएसकेचा छोटा क्लाइंब सहज चढतोय. परत एकदा सिंहगडावर जायला हवं. चार महिन्यांनी परत एकदा सिंहगडावर जाईन, कारण मी २०१४ च्या जून- जुलैमध्ये लदाख़मध्ये सायकलिंग करू इच्छितो. त्यासाठी माझी तयारी कशी सुरू आहे आणि मागच्या तुलनेत सिंहगड कसा चढतोय हे तिथे गेल्यावरच कळेल.
१६ जानेवारीला दिवस उजाडायच्या आधीच निघालो. थंडीचे दिवस असल्यामुळे स्वेटर घातलं. पण दहा मिनिटांच्या सायकलिंगमध्येच घाम आला, त्यामुळे स्वेटर कॅरिअरला लावून ठेवलं. हा घाम हाही फिटनेसचा एक इंडिकेटर आहे. जितका स्टॅमिना चांगला असेल, तितका घाम उशीरा येतो. धापही उशीरा लागते. जर स्टॅमिना कमी असेल, तर तीन मजले चढल्यावरही घाम येऊ शकतो, पण जर स्टॅमिना चांगला भक्कम असेल, तर त्यामुळे लवकर घाम येणार नाही. असो.
खडकवासलाच्या जवळून जाताना अजून सकाळ झाली नाहीय. विस्तारणा-या शहरामध्ये अजूनही ही जागा आपलं सौंदर्य टिकवून आहे. मिलिटरी कँपसजवळ असलेली शांत प्रसन्नता! सिंहगडाच्या पायथ्याजवळ डोणजेपर्यंत हा रस्ता नदीजवळूनच जातो. छोटी छोटी गावं लागतात. ही गावं अजून शहरीकरणाच्या विळख्यापासून दूर असली तरी इथेही अनेक रेसॉर्ट, बार, रो हाउसेस इत्यादी शहरी संस्कृती येतेच आहे. . चहा- बिस्किटाचा नाश्ता केला. बाटलीतलं पाणी रिचार्ज केलं. स्टॅमिनामध्ये किती फरक पडला आहे, हे आता कळेल.
सकाळ झाल्यानंतरही सिंहगडाभोवती दाट धुकं आहे. घाट रस्त्यावर सायकल सुरू केली. किंचित भिती वाटते आहे. पण चालवल्यावर लक्षात आलं की, मागच्या वेळेच्या तुलनेत सोपं जातं आहे. थोड्याच वेळात पहिला किलोमीटर पूर्ण झाला. मागच्या वेळेस जिथपर्यंत सायकल चालवली होती, ती जागाही मागे पडली! काहीच अडचण न येता सायकल चालवतोय. थोड्या वेळाने काही क्षण थांबावं लागतंय, पण अशा तीव्र चढाच्या रस्त्यावरसुद्धा सायकल चालवता येते आहे! ह्याचं खूप मोठं समाधान वाटलं. जिथे रस्त्याचा चढ तीव्र होता, तिथे राँग साईडने सायकल चालवली. बाईकवरून सिंहगडावर जाणारे लोक आश्चर्यचकित होऊन बघत आहेत. मला स्वत:लाही तितकंच आश्चर्य वाटतं आहे!
थोड्या वेळासाठी वाटलं की, मी कदाचित दिड तासामध्ये सिंहगडावर पोहचेन आणि एका अर्थाने लदाख़मध्ये सायकल चालवण्यासाठी 'पात्र' ठरेन. एक तास सायकल चालवत राहिलो. पण हळु हळु जास्त ब्रेक्स घ्यावे लागत आहेत. पाणी सारखं प्यावं लागत आहे. लवकरच दोन किलोमीटरचा किंचित उताराचा टप्पा आला. हे दोन किलोमीटर एकदम लवकर झाले. उतारामुळे सायकल चांगली पळाली. वेगामुळे वारा आणि वा-यामुळे पोटभर श्वास घेतला. परत स्फूर्ती आली. इथे आणखी एक रस्ता सिंहगडाच्या घाटात येऊन मिळतो. इथून परत पक्का रस्ता आहे. ह्या रस्त्याने बहुतेक बससुद्धा गडावर जात असावी.
आता परत तीव्र चढ. शेवटचे तीन किलोमीटर राहिले आहेत. परत चढावावर सायकल सुरू केली. पण आता खूप थकवा आलाय. सायकल चालवणं अगदी कठिण झालं आहे. कसं बसं एक किलोमीटर पूर्ण झालं. धाप लागते आहे आणि ऊर्जाही क्षीण होतेय. शेवटी नाइलाजाने पायी पायी जाण्यास सुरुवात केली. शेवटचा दिड किलोमीटर पायी पायी जावं लागलं. आणि पायी जातानाही त्रास होतोय. पायी पायी जात असताना एक सायकलस्वार वरून खाली जाताना दिसला. त्याने माझ्याकडे असं बघितलं की, जणू कोणी शहरवासी आदिवासी माणसाला बघतोय! हेलमेटधारी तो सायकलस्वार फक्त पातळ सॅक पाठीवर घेऊन सायकल पळवतोय आणि मी कॅरिअरवर बॅग लावून जातोय! सिंहगड आता खूप जवळ आला आहे, पण तरीही परत परत थांबावं लागतं आहे. दिड तास तर गेलेच, पोहचेपर्यंत सव्वादोन तास झाले. पण मागच्या वेळेच्या तुलनेत सुधारणाही बरीच आहे. तेव्हा फक्त दिड किलोमीटर सायकल चालवू शकलो होतो, आता साडेसात किलोमीटर सायकल चालवली. दोन किलोमीटरचा किंचित उतार सोडला तरी साडेपाच किलोमीटर चढावर सायकल चालवली! आणि तीसुद्धा एका तासात. जर स्टॅमिना थोडा जास्त असता, तर ह्याच गतीने उरलेलं दिड किलोमीटरही वेळेत पूर्ण करता आले असते. पण जमलं नाही.
आता एक गोष्ट स्पष्ट झाली की, थोडीशी अजून तयारी केली तर मी ह्या सायकलवरच सिंहगडावर दिड तासात पोहचू शकेन. ही सायकलसुद्धा मोठा घाट चढू शकते. ही सायकल गेअरची असली तरी साधीच आहे, पण तिच्यात क्षमता आहे. आणि खरं तर कोणतीही सायकल चालवता येऊ शकेल. कारण हे जास्त चालवणा-यावर अवलंबून आहे. गेल्या पिढीत आशा पाटील ह्यांनी मुंबई- पुणे १६० किलोमीटर अंतर- त्यात घाट व चढ- हे सगळं पावणे सहा तासांमध्ये पूर्ण केलं होतं. आणि अविश्वसनीय बाब म्हणजे त्यांच्याकडची सायकल जुन्या काळातली (१९७० च्या दशकातली) लेडीज सायकल होती. बिना गेअरची. आणि त्या वेळेसचे रस्ते व त्यावेळेसची फिटनेसची साधनं! त्यांच्याबद्दल विचार करतो तेव्हा प्रचंड आश्चर्य वाटतं. . . २५ किलोमीटर प्रती तास व तेही साध्या लेडीज सायकलने! विश्वास बसत नाही.
माझ्या सायकलिंगचं एक प्रेरणास्थान ह्याही आहेत
त्यांच्याविषयी अधिक माहिती इथे मिळेल.
उतरताना काही अडचण आली नाही. काळजीपूर्वक हळु हळु उतरलो. तीव्र उताराच्या जागी पायी पायी आलो. घरी पोहचायला वेळ लागला, कारण पुढे थकवा वाढत गेला. पण आता भरपूर उत्साह वाढला आहे. एकदा मनात आलं की, सिंहगडावर रोज येईन. माझ्या त्यावेळच्या घरापासून फक्त २१ किलोमीटर तर अंतर होतं! पण एकदा जाऊन आल्यानंतर परत इच्छा होत नाही. जाऊन- यायला साडेपास तास लागतात. रोज इतका वेळ काढणं शक्य नाही. पण हेही खरंच की, रोज सिंहगडावर गेलो तर अनेक फायदे होतील. घाट रस्त्याचा व सायकलिंगचा मस्त सराव होईल. पुढे कोणताच घाट भितीदायक वाटणार नाही. फिटनेस व सायकलिंगमध्ये लक्षणीय सुधारणा होईल. आणि नेहमी जात राहिलो तर ह्या राईडला साडेचार किंवा चार तासातही पूर्ण करता येऊ शकेल. पण. . . पण पुन: सिंहगडावर जायची इच्छा लगेच झाली नाही. असो.
पण ह्या राईडमुळे तयारीबद्दल स्पष्टता मिळाली. माझी तयारी योग्य दिशेने जाते आहे, हे कळालं. बस अजून थोडं जास्त सातत्य हवं. आणखी पुढे जाऊ शकेन.
पुढील भाग ९: दूसरे शतक. . .
अशा इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग
प्रतिक्रिया
4 Dec 2015 - 8:30 am | एस
वा! छान भाग.
4 Dec 2015 - 9:17 am | मोदक
चांगली सुरू आहे लेखमाला.
ती पातळ सॅक म्हणजे बहुदा हायड्रेशन पॅक असावे.
योग्य निगा राखली तर एकदम उपयोगी - पाण्यासाठी ब्रेक घ्यावे लागत नाहीत, सायकल चालवताना बाटलीने पाणी पिण्याची कसरत नाही.. एकदा भरले की ७० ते १०० किमी नॉन स्टॉप सायकल चालवता येते.
आणि महत्वाचे म्हणजे बाटलीपेक्षा जास्त पाणी प्यायले जावून शरिरामधले पाण्याचे प्रमाण एकदम संतुलीत राहते.
4 Dec 2015 - 10:51 am | बाबा योगिराज
फार महत्वाची माहिती दिली. लेख वाचतांना मी ही अशी काहीतरी वस्तु असेल असाच विचार करत होतो.
4 Dec 2015 - 10:54 am | बाबा योगिराज
मस्त लिहित आहात. छोट्या छोट्या गोष्टी पण फार महत्वच्या आहेत. माहिती एकदम परिपूर्ण आहे.
वाट बघत आहोत.
बिन सायकलीचा बाबा.
4 Dec 2015 - 10:54 am | बाबा योगिराज
मस्त लिहित आहात. छोट्या छोट्या गोष्टी पण फार महत्वच्या आहेत. माहिती एकदम परिपूर्ण आहे.
वाट बघत आहोत.
बिन सायकलीचा बाबा.
4 Dec 2015 - 11:31 am | बोका-ए-आझम
हा भाग पण मस्त! आशा पाटील यांच्या माहितीबद्दल धन्यवाद! त्यांनी स्वतः लिहून ठेवलेलं आहे का काही त्यांच्या अनुभवांबद्दल?
4 Dec 2015 - 1:01 pm | बाबा योगिराज
मी पण हेच म्हणतो.
बोका भौशी सहमत.
4 Dec 2015 - 8:13 pm | मार्गी
बोका ए आझमजी, काही कल्पना नाही. पण त्यांचं कर्तृत्व किती बोलकं आहे!
4 Dec 2015 - 11:43 am | आदूबाळ
लय भारी. वाचतो आहे.
4 Dec 2015 - 2:43 pm | मधुरा देशपांडे
फारच छान चालली आहे लेखमाला. आशा पाटील यांच्या प्रेरणादायी व्यक्तीमत्वाशी ओळख करून दिल्याबद्दल आभार.
4 Dec 2015 - 3:03 pm | वेल्लाभट
खल्लासच
4 Dec 2015 - 4:08 pm | मित्रहो
सिंहगडाची राइड मस्त झाली.
आशा पाटील यांच्याबद्दल माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.
4 Dec 2015 - 5:27 pm | अजया
मस्तच आहे आजची राइड.आशा पाटील यांची माहिती नव्यानेच कळली.धन्यवाद.
4 Dec 2015 - 5:45 pm | कविता१९७८
मस्त लेख अन माहीती
4 Dec 2015 - 6:01 pm | पिलीयन रायडर
वा!! आशा पाटीलां बद्दल माहित नव्हते. ही पण राईड आवडली!
सिंहगडावर जायला हवे आता..
4 Dec 2015 - 8:11 pm | मार्गी
इतकं प्रोत्साहन दिल्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि सायकलिंगसाठी शुभेच्छा!! चांगली माहिती दिलीत मोदकजी. :)
4 Dec 2015 - 9:36 pm | मीता
मस्त लेख
5 Dec 2015 - 11:01 am | इडली डोसा
मार्गीजी तुमची सायकल सफर प्रेरणादायी आहे. पुढिल सफरीसाठी शुभेच्छा!
पुभाप्र.
5 Dec 2015 - 11:34 am | सस्नेह
छान उत्साहपूर्ण लेख.