सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.
सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक
सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक
सायकलीशी जडले नाते ३: नदीसोबत सायकल सफर
सायकलीशी जडले नाते ४: दूरियाँ नज़दिकीयाँ बन गईं. . .
सायकलीशी जडले नाते ५: सिंहगड राउंड १. . .
सायकलीशी जडले नाते ६: ऊँचे नीचे रास्ते और मन्ज़िल तेरी दूर. . . . . .
शहरामधील सायकलिंग. . .
१९ ऑक्टोबरला ६३ किलोमीटर सायकल चालवली व पायी पायीही बरंच चाललो होतो. मोठ्या राईडनंतर नेहमी येणारा अनुभव म्हणजे पुढच्या राईडची इच्छाच जाते. मोठ्या राईडमध्ये शरीराबरोबरच मनही थकतं. त्यामुळे लगेच मोठी राईड झाली नाही. त्यानंतर काही दिवस परत गॅप पडली. कोणत्याही गोष्टीमध्ये असंच होत असतं. उदा., व्यायाम- आपण काही दिवस नियमित करतो. मग अचानक लय तुटते. काही दिवस गॅप पडतो. कोणत्या ना कोणत्या कारणाने असं होतं.
अशा वेळेस आपलं काम आहे की, जर गॅप पडत असेल, तर येवो, पण आपण आपला प्रयत्न चालू ठेवावा. म्हणून गॅप पडली तरी सायकलिंग सुरू ठेवलं. छोट्या छोट्या राईड चालू ठेवल्या. पण दररोज चालवाता आली नाही. दररोज चालवण्यातली मोठी अडचण म्हणजे जवळपासचे सगळे रस्ते फिरून झाले आहेत. आता परत त्याच त्या रस्त्यावर फिरण्यात मजा येत नाही. खरी मजा तर रस्त्यांमध्ये नसून सायकलिंगमध्येच असते, हे तोपर्यंत कळलेलं नव्हतं! आणि दुसरी अडचण हीसुद्धा होती की पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये चालवणं अवघड वाटायचं. अगदी सकाळचा थोडा वेळ सोडला तर इतर वेळेस सर्वत्र ट्रॅफिक. आणि जशी गॅप मोठी होत जाते, सायकलवर राईड करणं कठिण होत जातं. मन तयारच होत नाही. त्यामुळे काही दिवस सायकल तशीच उभी राहिली. जेमतेम एक- दोन किलोमीटर चालवायचो. थंडीच्या दिवसांमध्ये पहाटे उठणंही जीवावर यायचं.
ह्या काळात इंटरनेटवरचे सायकलस्वारांचे अनुभव वाचणं सुरू राहिलं. त्यातून प्रेरणा मिळत राहिली. जेव्हा राहावलं नाही, तेव्हा सायकल पुन: काढली. पुण्यामध्ये कामासाठी फिरताना सायकल वापरली. आणि हा अनुभव मस्त आला. पुण्याच्या एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत सायकल चालवली. डिएसके- धायरीपासून विश्रांतवाडीपर्यंत. आधी जेव्हा नॅशनल हायवेवर सायकल चालवली होती, तेव्हा लॅपटॉप व सामान सोबत नेण्याचा अनुभव होताच. ह्या वेळेसही सामान घेऊन सायकल चालवली. वीस किलोपर्यंत वजन होतं. गमतीची गोष्ट म्हणजे अशी शहरी राईड- जाऊन- येऊन पन्नास किलोमीटर झाली व तीसुद्धा सहज! वीस किलो वजन घेऊनही डिएसकेचा चढ चढता आला. आणखी गंमत म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टने गेलो असतो, तर जितका वेळ लागला असता, तितकाच किंवा थोडा कमी वेळ ह्या प्रवासात लागला! आणि ट्रॅफिकमध्ये वाहनांच्या रांगा लागलेल्या असताना बाईकप्रमाणे सायकलही सरसर पुढे नेण्याचा आनंद घेता आला. आणि शहरामध्ये सायकलिंग करताना थोडं वेगळ्या प्रकारचं नैसर्गिक सौंदर्यही बघायला मिळतं ते वेगळंच!
आता सायकल चालवणं इतकं सोपं झालंय की, जवळ जवळ कुठेही चालवू शकतो. मागच्या राईडमध्ये झालं तसं जिथे सायकल चालवणं कठिण असेल, तिथे पायी पायीसुद्धा बरंच अंतर जाता येऊ शकतं. पुण्यामध्ये अशा तीन राईड झाल्या. त्यात दोन अर्धशतक झाले. आता अर्धशतक खूप सोपं झालं आहे. अर्धशतक एफर्टलेस वाटत आहे. पण मध्ये मध्ये गॅप पडल्यामुळे थोडा त्रास होतो. आणि अर्थातच दुस-या शतकाची प्रतीक्षासुद्धा आहे!
डिसेंबरमध्ये पानशेत डॅमच्या रस्त्यावर आणखी एक राईड केली. एक आठवड्याच्या गॅपनंतर करत असल्यामुळे पन्नास किलोमीटरचंच लक्ष्य ठेवलं. जाताना काहीच अडचण आली नाही. दिड तासामध्ये पंचवीस किलोमीटर गेलो. पण येताना हाल झाले. त्याच पंचवीस किलोमीटरसाठी जवळजवळ तीन तास लागले. हा एका प्रकारचा rustiness होता| कारण मी नियमित प्रकारे सायकलिंग करत नाहीय. एक मोठी राईड व मग आठ- दहा दिवसांची गॅप. एका राईडने शरीराला जो टेंपो आणि मूमेंटम मिळतो, तो इतक्या दिवसांमध्ये निघून जातो. त्याचं फळ भोगावं लागलं. फक्त ५१ किलोमीटरच्या राईडसाठी पाच तास लागले. योगायोगाने ह्या राईडसह पहिलं सहस्रक- १००० किलोमीटर पूर्ण झाले.
अजूनही मोठ्या राईडस तितक्या सहजतेने जमत नाही आहेत. आणि जितक्या नियमित प्रकारे करायला हव्यात, तितक्या करता येत नाही आहेत. हे थोडं गमतीचं गणित आहे. असं आहे- आपण जितक्या मोठ्या राईडस करतो, तितक्या त्या सोप्या होतात. पण त्यासाठी किमान पहिल्या पाच- सहा राईडस अशाच- कठिण- कराव्या लागतात व त्याचा ताण पडतो! त्यातून बाहेर पडणं कठिण जातं. पण मी प्रयत्न सुरू ठेवेन. केवळ पाच महिन्यांमध्ये १००० किलोमीटर पूर्ण झाले. बघताना हे छान वाटतं. पण खरी गोष्ट अशी आहे की, ह्या पाच महिन्यांमध्ये मी फक्त २० दिवस राईडस केल्या (१० किलोमीटरपेक्षा कमी राईडस मोजल्या नाहीत). म्हणजे एकशे पन्नास दिवसांमध्ये फक्त वीस दिवस! त्यामुळे सुधारणेला प्रचंड वाव आहे.
चांगली एक गोष्ट अशी आहे की, अनियमित प्रकारेच पण योग- प्राणायाम करतोय. त्याशिवाय छोट्या १०० उड्या आणि मोठ्या १५ उड्या सुरू केल्या आहेत व त्यामुळे आत्ताच्या राईडनंतर पाय जड झाले नाहीत- जे आधी नेहमी व्हायचे. त्याशिवाय आणखीही बरंच करायचं आहे- रनिंग किंवा स्विमिंग. त्यामुळेही सायकलिंगला बळकटी मिळेल. ह्या सर्व गोष्टी सायकलिंगला पूरक आहेत. शरीर आणखी मजबूत होतं. नोव्हेंबरच्या शेवटी एक अर्धशतक आणि डिसेंबरच्या सुरुवातीला दोन अर्धशतकांनंतर परत सायकल थांबली. चालवायला वेळच मिळाला नाही. त्यामुळे २०१३ वर्षातलं सायकलिंग इथेच थांबलं.
पानशेत रोडवरचं दृश्य
अनेकदा आपण अशी चूक करतो. जर आपलं टारगेट ४० मिनिट व्यायाम असेल, तर आपण एक तर ४० मिनिट व्यायाम करतो किंवा मग करतच नाही. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी! :) किंवा दहा सूर्यनमस्कार. करेन तर दहा नाही तर एकही नाही. मी हीच चूक करत होतो. खरं तर दृष्टीकोन असा हवा- चला, चाळीस मिनिट व्यायाम करता आला नाही, तर किमान वीस मिनिट तरी करू. तेही जमत नसेल तर दहा मिनिट प्राणायाम तरी करू. किंवा जर सायकलची मोठी राईड होत नसेल, तर दहा किलोमीटर तरी करू. पण मन छोट्या गोष्टीने संतुष्ट होत नाही आणि मोठ्या गोष्टींसाठी अडतं! असो. २०१३ वर्ष संपताना सायकलच्या विश्वाचं दार किलकिलं झालं आहे!
पुढील भाग ८: सिंहगड राउंड २!
अशा इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग
प्रतिक्रिया
1 Dec 2015 - 2:17 pm | आनंदराव
वाचतोय
आणि शहरामध्ये सायकलिंग करताना थोडं वेगळ्या प्रकारचं नैसर्गिक सौंदर्यही बघायला मिळतं ते वेगळंच!
हे काय तेही सांगा जरा विस्कटुन !
1 Dec 2015 - 2:33 pm | मित्रहो
मधे रहदारीचा त्रास होतो. रविवारी सकाळी तर रीक्षावाले आणि टॅक्सीवालेच रस्त्यावर असतात तरी ते डाव्या बाजूने जानाऱ्या सायकल वाल्याला हॉर्न देतात. उलट जानारे दूधवाले हाही एक त्रास असतो.
कमी रहदारीचे रस्ते सेफ वाटतात.
लेखमाला छान चाललीय.
1 Dec 2015 - 2:36 pm | मोदक
लेखमाला छान चाललीय.
+१
1 Dec 2015 - 2:56 pm | एस
वाचतोय. पुण्यात सायकल चालवायला हल्ली भीती वाटते.
1 Dec 2015 - 3:35 pm | आदूबाळ
पुण्यात सायकल चालवताना हेल्मेट घालावं लागतं का?
1 Dec 2015 - 4:26 pm | मोदक
नियमाने - नाही.
सुरक्षिततेच्या दृष्टीने - हो.
1 Dec 2015 - 4:35 pm | आदूबाळ
ओके. म्हणजे मोटरसायकलवर वापरतात तसं हनुवटी झाकणारं हेल्मेट नव्हे, रैट्ट?
1 Dec 2015 - 4:43 pm | मोदक
ते हेल्मेट स्टंट करणारे लोक वापरतात. आपण सरळ साध्या रस्त्यावरून सायकल चालवत असल्याने साधे हेल्मेट पुरेसे होते.
(फक्त हेल्मेटचा पुढचा भाग आपल्या नाकाच्याही पुढे गेला पाहिजे)
शक्यतो यातले मधल्या प्रकारचे हेल्मेट वापरावे.
2 Dec 2015 - 11:13 am | मार्गी
वाचनाबद्दल व प्रतिसादांबद्दल सर्वांना धन्यवाद! सुंदर चर्चा रंगली आहे.
हेलमेटविषयी माझं मत आहे की, ते एडव्हान्स्ड सायकलिंगसाठी आवश्यक आहे. मोठ्या राईडस. अगदी छोट्या राईडसाठी विशेष गरजेचं नाही.
2 Dec 2015 - 3:04 pm | मोदक
हेलमेटविषयी माझं मत आहे की, ते एडव्हान्स्ड सायकलिंगसाठी आवश्यक आहे.
असे काही नसते हो. आपण कसे दुचाकीचे हेल्मेट कितीही अंतरासाठी वापरतोच वापरतो.. तसे सायकलचे हेल्मेट नेहमी वापरावेच्च..!!
2 Dec 2015 - 4:04 pm | मार्गी
मोदकजी, हेलमेट वापरणे चांगले आहे, हे मान्य. त्याचे फायदेही आहेत- डोक्याला थोडी सुरक्षा, रात्री इंडिकेटर म्हणून आणि हेलमेटसह सायकलिंग करताना वेगळाच उत्साह येतो. पण ते सुरक्षेसाठी त्या अर्थाने 'अपरिहार्य' किंवा 'पुरेसे' अजिबात नाही. २-२ लेनचा रस्ता असतो तिथे मोठी वाहने दादागिरीने ओव्हरटेक करतात किंवा गर्दीमध्ये आंधळे चालक कोसळत असतात, तिथे हेलमेट काय कामाचं? शिवाय कडक पाऊस, कडक ऊन, कडक थंडीतही हेलमेट उपयोगी पडत नाही. हे फक्त माझं मत आहे. तुमचं मत वेगळं असणार व त्याचा मी आदर करतो.
आणि बाईकच्या हेलमेटबद्दल- मला वाटतं हेलमेटपेक्षाही बाईकला दोन्ही आरसे लावणं व त्यामध्ये नियमित बघणं कंपल्सरी करायला हवं! :) शिवाय रस्त्यावर ड्रायव्हिंगच्या शिस्तीसाठी व इतर वाहनांविषयी संवेदनशीलतेसाठी वेगळं प्रशिक्षण हवं. :) आदर्श चालक तो जो चालवताना आजूबाजूने जाणा-यांच्या संभाव्य चुका विचारात घेऊन तेवढी सेक्युरिटी मार्जिन ठेवतो. असो. धन्यवाद.
2 Dec 2015 - 6:21 pm | मोदक
तुमच्याही मताचा आदर आहे तरीही हेल्मेट वापराच असे सुचवेन.
3 Dec 2015 - 6:42 pm | शिव कन्या
हा भाग ही माहिती पूर्ण.
हेल्मेट वापरणे जरा त्रासदायक वाटत असले तरी, सुरक्षेच्या दृष्टीने उत्तम.
3 Dec 2015 - 6:56 pm | सायकलस्वार
Each year about 2 percent of motor vehicle crash deaths are bicyclists. In a majority of bicyclist deaths, the most serious injuries are to the head, highlighting the importance of wearing a bicycle helmet. Helmet use has been estimated to reduce the odds of head injury by 50 percent, and the odds of head, face, or neck injury by 33 percent.
http://www.iihs.org/iihs/topics/t/pedestrians-and-bicyclists/fatalityfac...
मी हेल्मेट वापरत नाही, पण मी रस्त्यांवर सायकल चालवतही नाही.
3 Dec 2015 - 7:50 pm | मोदक
हे मार्गी साहेबांना उद्देशून नाही परंतु हेल्मेटसक्ती या धाग्यावर दिलेला माझा प्रतिसाद पुन्हा येथे देत आहे. जो सायकलींग हेल्मेटसाठीही तितकाच लागू आहे..!!!
जोपर्यंत स्वतः / नातेवाईक / एखादा जवळचा मित्र अपघातातग्रस्त होत नाही आणि 'हेल्मेट असते तर...' असा प्रश्न पडण्याइतका मार लागत नाही (आणि अशा पेशंटच्या वेदना आपल्याला "अनुभवण्यास" लागत नाहीत) तोपर्यंतच्च.. हेम्लेट वापरणे हे ऐच्छीक असावे.. सरकार कोण नियम करणार किंवा याचा फायदा, त्याचा फायदा वगैरे प्रश्न पडतात.
एखादी केस जवळून पाहिली किंवा जीवावरचे थोडक्यात निभावले की असे प्रश्न पडत नाहीत. हेल्मेट हे सेकंड नेचर होवून जाते.
"मी हेल्मेट वापरणार नाही" अशी प्रतिज्ञा करणार्यांनी स्वत:ला आत्तापर्यंत खूप खूप नशीबवान समजण्यास हरकत नाही.
4 Dec 2015 - 1:08 am | बोका-ए-आझम
लेख नेहमीप्रमाणेच उत्तम! मी तर हेल्मेट वापरा असंच सुचवेन कारण तुम्ही कितीही सावधगिरीने सायकल किंवा कुठलंही दुचाकी वाहन चालवत असलात तरी तुमच्या बाजूने वाहन चालवणारे तितक्याच सावधगिरीनं त्यांची वाहनं चालवतीलच याची खात्री तुम्ही काय, कोणीही देऊ शकत नाही.
4 Dec 2015 - 2:12 am | चतुरंग
सायकलने पायांना येणारा जडपणा घालवण्यासाठी सायकलिंग नंतर करायचे स्ट्रेचिंग करा. फारच उपयुक्त आहे.
https://youtu.be/1VCM7xnL2QY
हेल्मेट्बद्दल माझे मत - पर्याय नाही, तुम्हाला धडधाकट राहायचे असेल तर!
माझा सध्याचा मॅनेजर गेली १५ वर्षे रोज ८.५ मैल सायकलिंग करुन हाफिसात येतो. अमेरिकेतल्या खूपच शिस्तबद्ध ट्रॅफिकमध्येही तीन वेळा ड्रायव्हरच्या गलथानपणामुळे हा रस्त्यावरुन बाजूच्या खड्यात फेकला गेला आहे. प्रत्येकवेळी हेल्मेटनेच त्याला वाचवले. चेहेर्याला थोडे खरचटणे, हातापायाला दुखापत एवढ्यावरच निभावले!
मी तर सांगेन की हेल्मेटच नव्हे तर दोन्ही डोळे व्यवस्थित झाकले जातील असा गॉगलही वापरा. कारण समोर वेगाने जाणार्या दुचाकी/चारचाकी वहानांच्या टायर्समुळे छोटे मोठे खडे, खिळे वगैरे वस्तू वेगाने मागे फेकल्या जातात आणि डोळ्यांना भयंकर इजा पोचवू शकतात.
(सायकलप्रेमी)रंगास्वार
4 Dec 2015 - 6:02 pm | पिलीयन रायडर
हा ही लेख आवडला!! वाचत आहे.. पण ऑफलाईन असले तर प्रतिसाद देता येत नाही आणि मग राहुन जाते.
छानच चालु आहे ही लेखमालिका!
मोदकशी हेल्मेट बाबत सहमत!
4 Dec 2015 - 7:50 pm | मार्गी
सर्वांना खूप धन्यवाद! धन्यवाद चतुरंगजी आणि मोदकजी! :)
26 Dec 2015 - 10:58 pm | पैसा
खूप छान लिहिताय!