सर्वांन्न दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, दिवाळीच्या मुहुर्तावर आमचा पहिलावहीला लेख.कृपया चुकलं माकलं सांगा.
दिवाळीमधे किल्ला बनवन्याची प्रथा नेमकी कधी सुरु झाली हे माहीत नाही, परंतु किल्ला हा प्रत्येक लहान मुलाची कल्पना शक्ती फुलवनारा नक्कीच आहे,
दिवाळीची सुट्टी ही नवे कपडे, चिवडा, लाडु, फटाकडे या सर्वांपेक्षा या किल्ल्यामुळेच अधिक हवीहवी वाटायची. परीक्षा कधी संपतेय न कधी किल्ला बनवायला लागतोय असच होऊन जायचं. दिवाळीच्या
आधीच बरेच दिवस साहित्याची जुळवाजुळव सुरु व्हायची. दगड व काळी माती कुठुन आणन्याचा प्रश्नच नसायचा पन सलाईन च्या पायपा, बुधल्या, सायकल च्या पुंगळ्या, गेलेले बल्ब, कुठे बांधकाम चालले असले तर तिथुन कापलेले फरशांचे तुकडे ई.ई. सामान गोळा करुन ठेवावे लागे. लाल माती मात्र टेकडीवरुन आणावी लागत असे ती मी व मोठा भाऊ पोत्यात घालुन आणायचो. आधी मातीतले मोठे खडे फोडायचे, त्या नंतर आम्ही तिला कापडामधून बारीक गाळुन घेत असु. बारके मोठे दगड, विटा, काळी माती, लाल माती हे सारे गोळा झाले की त्या नंतर मग मुख्य कार्यक्रम सुरु व्हायचा. आमचा मुख्य सिविल विंजनेर(मोठा भाऊ) आणि मि बिगारी. खाली मोठाले दगड मांडायचे, त्यावर लहान दगड, विटांचे तुकडे, मधे सापटी राहील्या, तर त्यात साप जाऊन बसेल म्हणुन मग माती आणि चिखल ओतत रहायचा, एकावर एक दगड रचत रचत डोंगरा सारखा आकार बनवायचा, त्यावर एक चांगला बरापैकी चौकोनी फरशीचा तुकडा ठेवायचा, हि झाली महाराजांची जागा, त्याच्या कडेला दोन बाजुला दोन अखंड विटा उभ्या केल्या की झाले बुरुंज तयार, मग जरा खालच्या बाजुने फरशांचे लहान पातळ तुकडे जोडत तटबंधी तयार व्हायची तिला पुट्ठ्याचा महादरवाजा बनवुन लावायचा हे सारं झालं की त्यावर चाळलेली लाल माती कालवुन ओतायची. एवढ सारं जड काम पार पडलं की लहान पन महत्वाची कामे सुरु व्हयची, त्यातले पहिले पाय-या बनवने, घट्ट चिखल बनवायचा मग तो किल्ल्यावर पाहिजे तिथे थापायचा अन फरशीचे दोन तुकडे घेऊन पाय-यांचे आकार बनवायचे. त्यानंतर किल्ल्याखाली काळी माती पसरली की रान तयार, मंदीर हा सुद्धा एक अत्यावष्यक घटक होता. विहिर किंवा तळे मात्र डोकेदुखी वाटायची. आई दारात खड्डा पाडु द्यायची नाही. छोटे घमेले ठेवायला आमचा ठाम विरोध. गुहा करने सुद्धा तसेच. गुहेतुन साप आत जातो कि काय या भितीने गुहेला परवानगी नाकारली जायची.
हे सारे होता होता किल्ला तयार होत आलेला आसे. पन किल्ल्यावर झाडे तर हवी ना. मग दुकानातुन हळीव आणनेका, त्यात झाडांच्या व्हरायटी साठी मोहरी मिसळनेका अन किल्ल्यावर, रानामधे पसरनेका. त्यावर परत वरुन थोडी माती पसरनेका. थोडी वाळावाळी झाली कि मग बुरुंजाला रंग मिळायचा.
आता बारी असायची ती कारंजे, व खेळ तयार करायची, सायकल च्या पुंगळ्या सलाईन च्या पायपांना जोडल्या की मस्त कारंजे तयार व्हायचे. गेलेल्या बल्ब चा मागील भाग निट काढला कि नुसता काचेचा बल्ब राहतो, त्यातली मधली तार व आत आलेला भाग फोडायचा, रानात काठी खोचायची त्यावर तो बल्ब न एका बाजुने सलाईन चा पाईप लावलेली पुंगळी. झाला खेळ तयार, मग सलाईन चे पाणी कमी जास्त करुन फिरनारा बल नियंत्रीत करता यायचा.
हे सारे कुटाने करुन झाले की आठवण व्हायची सैनीकांची, किल्ल्याची जानच ते, मग गेल्यावर्षीचे सैनिक काढायचे त्यातले निटनेटके निवडायचे मग त्यांना थोडा कलर मारायचा,
महाराजांची मात्र खुप चाचपणी होत आसे. थोडा जरी ड्यमेज, किंवा काय आसले तरी नवाच शिवाजी, एका वर्षी वडीलांनी आम्हाला घोड्यावरचा शिवाजी आनला होता, एका हाताने लगाम खेचलेला, दुस-या हाताने तलवार पकडलेली, असा तो शिवाजी घेऊन मी अन भाऊ दोघे जल्लोशाने नाचलो होतो.
हे सैनिक म्हनजे बरच काही असायचं शिवाजी, मावळे, डफ वाला, ढोल वाला, तुतारी वाला, तोफ आणि तोफवाला, वाघाचे तोंड पकडलेला संभाजी, पुजा करनारा भटजी, दुधाचा डेरा घेतलेली गवळन, दंडधारी, बंदुकधारी, पोलीस, वाघ, सिंह, हरिण हत्ती,बदक, कोंबडे, पोपट, घोरपड......प्लास्टीकचे सैनिक ..... हुश्श.
किल्ला या सर्वांनी गजबजुन जायचा मग रोज सैनिक मांडणे, किल्ला भिजवणे ह्यात खुप मजा होती. दिवाळी च्या दिवशी आई सारवलेल्या अंगणात रांगोळी काढायची, किल्ल्या समोर सुद्धा छान रांगोळी सजायची. दिवे लावुन आम्ही घराबरोबर किल्ला सुद्धा ऊजळुन टाकायचो.
हळु हळु आमचे किल्ला तंत्र प्रगत होत गेले. कडेने खंदक करणे, विटांची तटबंधी, फोटो पाहुन हुबेहुब किल्ला तयार करणे, एखाद्या प्रसंगाचा देखावा तयार करणे असे टप्पे वय वाढेल तसे येत गेले. आयता किल्ला या खुळाचे न आमचे मात्र कधी पटले नाही.तोच प्रकार दगडांवर पोते हाथरुन किल्ला करण्याचा. सजावटीमधे मात्र आम्ही खुप प्रयोग करायचो. किल्ला हा खेळ पुर्ण सुट्टी पुरायचा.
किल्ला बनवन्याईतकेच किल्ला काढायला पन मजा यायची. सारे सैन्य कागद, चिंध्या यामधे गुंडाळुन व्यवस्थीत खोक्यात घालुन ठेवले जायचे. ईकडे आमची सु्ट्टी संपत यायची, तशा किल्ल्याला भेगा वाढत रहायच्या, न आम्ही एखाद्या दिवशी दिवाळीत राखुन ठेवलेले सुतळी बॉम्ब भेगांमधे घालुन किल्लाच ऊडवुन द्यायचो. त्यानंतर मग मात्र राहीलेला दिवाळी अभ्यास अाणि छडी घेतलेला मास्तरासुर यांच्या आठवणीने अंगावर काटा ऊभा रहायचा.
प्रतिक्रिया
10 Nov 2015 - 12:30 pm | जव्हेरगंज
किल्ल्याला भेगा वाढत रहायच्या, न आम्ही एखाद्या दिवशी दिवाळीत राखुन ठेवलेले सुतळी बॉम्ब भेगांमधे घालुन किल्लाच ऊडवुन द्यायचो.>>>>>> घोर अपमान .
16 Nov 2015 - 12:59 pm | वेल्लाभट
आमचा तर सोहळा असायचा हा शेवटच्या दिवसाचा. त्यासाठी बनवतानाच खास भगदाडं, दरवाजे यांची विचारपूर्वक आखणी व्हायची. आणि मग शेवटच्या दिवशी "रेडी?....लागला......." पळणे आणि ढाम !
10 Nov 2015 - 12:34 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
मास्तरासुर =))
लहानपण देगा देवा झालं राव वाचुन. मी लहानपणी एकदा माझ्या किल्ल्याला मोठी दुतोंडी गुहा करुन त्यामधे आमच्या बोक्याला बळजबरीने कोंबायचा प्रयत्न केलेला =))
10 Nov 2015 - 12:36 pm | भीमराव
ति गरज होती, आमची वस्ती माळाला, त्यामुळे आत काय असेल ते सांगता येने कठीण असायचे, त्यामुळे हाताने किल्ला काढने धोकादायक पेक्षा ही भयानक होते, एकदा किल्ला काढताना माझ्या हातात भला मोठा साप आलेला, त्याला तसाच टाकुन मि भिऊन पळालो तर तो बाबा घरात शिरला. त्यामुळे हा आमचा मार्ग होता
14 Nov 2015 - 10:40 am | मांत्रिक
@बाबुदादा
लेख आवडला. जुन्या आठवणी जाग्या केल्याबद्दल धन्यवाद.
तुम्ही माळावर राहत होतात असे म्हणालात. थोडं त्या जीवनाविषयी लिहिलेत तर वाचायला आवडेल.
10 Nov 2015 - 2:17 pm | संदीप डांगे
माझा मामेभाऊ याबाबतीत फार उद्योगी होता. आम्ही चार विटांचे किल्ले बनवायचो. तो लेकाचा चांगला सहा फूट बाय दहा फूट च्या क्षेत्रफळाचे चांगले दोन अडीच फूट उंच, बारीक-सारिक डीटेल असलेले किल्ले बनवायचा. राज्यपातळीवर भाग घ्यायचा. एक-दोनदा बक्षीसही मिळाले बहुतेक त्याला.
10 Nov 2015 - 3:29 pm | उगा काहितरीच
वा ! मस्त खुसखुसीत लेख , आवडला !
10 Nov 2015 - 7:47 pm | हेमंत लाटकर
मी सुद्धा लहानपणी किल्ला बनवायचो. वडिल पुठ्याची तटबंदी, दरवाजा करून द्यायचे मी डोंगर तयार करायचो. दिवाळी झाल्यावर काही दिवसांनी किल्ल्याला छिद्र पाडून सुतळी बाॅम्बने उडवे.
13 Nov 2015 - 8:51 pm | भीमराव
प्रतिसादकर्ते व मुक वाचकांचे मनापासुन आभार.
13 Nov 2015 - 9:05 pm | पैसा
खूप छान लिहिलंय. भारी उपद्व्याप! २/३ वर्षांपूर्वी कोणीतरी त्यांचे महाराज विरोधी गटाने चोरून नेलेले आणि तटबंदीसाठी शाळेची कौले काढून शाळा भुंडी केल्याच्या आठवणी लिहिल्या होत्या. त्याची आठवण झाली! =))
15 Nov 2015 - 3:38 am | एस
http://www.misalpav.com/comment/347576#comment-347576
इथे शाहिर आणि खाली मोहनराव यांच्या प्रतिसादांमध्ये हे किस्से सापडतील.
14 Nov 2015 - 12:41 am | अभ्या..
राक्षसाची बिडी करत नव्हता का तुम्ही किल्ल्याला?
आतमध्ये नारळाचे केसर ठासायचे. बाहेर राक्शसाचे तोंड करायचे. तोंडात एक बिळ ठेवून तेथे दोर्याच्ये रिकामे रिळ लावायचे. आतून केसर पेटवले की त्यातून धूर यायचा. लै भारी.
15 Nov 2015 - 12:04 am | विशाल कुलकर्णी
मास्तरासुर !
लई भारी राव. आवल्डा लेख !
15 Nov 2015 - 9:45 am | मुक्त विहारि
मस्त खुसखूशीत लेख...
15 Nov 2015 - 2:58 pm | भीमराव
पैतै,एस जी, ठांकु बर का, तुम्ही दिलेल्या लिंकवरचे प्रतिसाद खुपच मजेशिर आहेत. अभ्यादादा राक्षसाची बिडी नवतो म्हनत पन हा प्रकार सुद्धा करायचो कधीतरी, ते मात्र टायपायचं राहीलं.