अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: १ हिमालयाच्या पायथ्याशी

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
6 Oct 2015 - 3:21 pm

सर्व मान्यवर वाचकांना मन:पूर्वक अभिवादन! डिसेंबर २०१२ मध्ये उत्तराखंडमध्ये केलेल्या प्रवासाच्या आणि ट्रेकिंगच्या आठवणी इथे शेअर करत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये जिथपर्यंत रस्ता सुरू असेल, तिथपर्यंत फिरायला जावं ह्या विचाराने हा प्रवास केला. उत्तराखंडमध्ये हिवाळ्यामध्ये बद्रिनाथच्या जवळ भ्रमंती करताना अपूर्व असा रमणीय भाग बघता आला. त्याचं हे प्रत्यक्ष वर्णन. .

हिमालयाच्या पायथ्याशी

“अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराज: पर्वतोs हिमालय:” अर्थात् महाकवि कालीदासाने म्हंटलं आहे की, उत्तर दिशेला हिमालय म्हणून ओळखला जाणारा एक पर्वतांचा महाराजा आहे. हिमालयाकडे जाणा-या ह्या प्रवासाची सुरुवात संपर्क क्रांती एक्स्प्रेसने झाली. नाव सार्थ करत ट्रेनने फक्त दोन- तीन स्टेशन घेत वेळेमध्ये दिल्लीपर्यंत पोहचवलं. रस्त्यामध्ये राजस्थानात पहाटेच्या उजळत्या आकाशाआधी अमवस्येच्या थोड्या आधीचा चंद्र आणि त्याजवळ शुक्र ग्रहाचा अद्भुत नजारा बघायला मिळाला. नजारा इतका सुंदर होता की, नदीच्या पाण्यामध्येही दोघांचं सुंदर प्रतिबिंब पडलेलं होतं. लवकरच सूर्योदय झाला.

दिल्लीला पोहचल्यानंतर आनंद विहार आयएसबीटीवरून पिथौरागढ़ची बस घेऊन पुढचा प्रवास सुरू केला. नातेवाईक पिथौरागढ़ला जात असल्यामुळे प्रवास त्या बाजूने करायचा असं ठरवलं. उत्तराखंड परिवहन निगमची ही बस आहे आणि पहाडी रस्त्यांना लक्षात घेऊन छोट्या आकाराचीही आहे. दिल्लीच्या पुढे गाज़ियाबाद, मुरादाबाद, उधम सिंह नगर, रुद्रपूर अशा गावांमधून जाऊन पहाटे टनकपूरला पोहचलो. टनकपूर नेपाळच्या सीमेला अगदी लागून आहे. इथून पुढे पहाडी रस्ता सुरू होईल. टनकपूर- चंपावत- पिथौरागढ़ रस्ता नेपाळच्या सीमेला लागूनच जातो. इथून पुढे जाऊन कैलास मानससरोवर यात्रेचा एक मार्ग सुरू होतो.

थंडीच्या दिवसात हिमालयात फिरायचं असल्यामुळे थंडीची सवय होण्यासाठी स्वेटर वापरलं नाही. तशा थंडीत पहाटेचा नजारा सुरू झाला. सततच्या प्रवासामुळे डोळ्यांवर झोपही होती. पण जेव्हा रस्ता इतका रम्य असेल, इतका अपूर्व असेल तेव्हा झोप कशी येणार. ह्या रस्त्यापासून बीआरओ म्हणजेच सीमा सडक संघटनेचं कार्यक्षेत्रसुद्धा सुरू होतं. कश्मीरपासून मिझोरमपर्यंतच्या सर्व सीमावर्ती आणि दुर्गम भागांमध्ये बीआरओ सेनेसह आपली सावलीसारखी सोबत करते. ह्या मार्गावर टनकपूरपासून पिथौरागढ़ फक्त १५० किलोमीटर अंतरावर आहे. पण त्यात मोठ्या पर्वतरांगा ओलांडाव्या लागतात. नागासारखा सर्पिलाकार जाणारा रस्ता एक पर्वत पार करतो आणि परत उतरतो. लगेच पुढे दुसरा पर्वत तयार! अशा चढ- उतारांमध्येच शेत, मळे, गाव आणि डोंगरात आतमध्ये पसरलेली घरं! खरोखर इथून मानवप्राणीसुद्धा बदलतो! बदलणारच.


दूरवर बर्फाच्छादित पर्वतरांगांची एक रेखा

चंपावतच्या पुढे एका जागी लोहाघाटजवळ एक रस्ता फुटतो. हा रस्ता अल्मोडा जिल्ह्यातील मायावती आश्रमाकडे जातो. पिथौरागढ़च्या दिशेने जाताना आपण हळु हळु अशा उंचीवर पोहचतो जिथून दूरवरचा नजारा दिसू लागतो. इथून हळु हळु हिमालयातली एक एक पर्वतरांग दिसू लागते. त्रिशुल आणि ॐ पर्वत दिसतात. खरोखर २५० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरून ते दर्शन देतात. पण पुढे जाताना आपण पर्वत उतरून खाली येतो, तेव्हा ते दिसेनासे होतात आणि परत पुढच्या उंच बिंदूवरून दिसू लागतात.

पिथौरागढ़च्या आधी घाट नावाच्या ठिकाणापासून अगदी सुंदर नजारा दिसतो. तसं तर उत्तराखंडातलं प्रत्येक स्थान पर्यटन स्थळ आणि रम्य स्थळ आहे. तरीही उंच जागांवरून आणखी सुंदर नजारा दिसतो. जवळच उंच पर्वत आणि जवळच दरी आणि त्यांच्या मधोमध वाहणारी खळाळती रामगंगा नदी. . .

गुरना नावाचं एक छोटं मंदिर आहे. रस्त्यामध्ये प्रवाशांचा थकवा दूर करून त्यांना सुरक्षित वाटण्यासाठी असे स्थान पहाडात सर्वत्र आहेत. प्रकृतीचा अविष्कार इतका विराट आणि रौद्र आहे की, मन:शांती ठेवण्यासाठी जुन्या काळापासून असे स्थान बनवले गेले असावेत. निसर्गसुद्धा त्याच्या बाजूने माणसाला शांत करण्याचा प्रयत्न करतो आहे. डोंगरांमधून वाहणारे शुद्ध पाण्याचे झरे त्यासाठीच तर आहेत. उत्तराखंडच्या पहाडी प्रदेशांमध्ये पिण्याचे पाणी ब-याच प्रमाणात नैसर्गिक स्रोतामधून येणारं वाहतं पाणीच असतं. ही निसर्गाची एक छोटीशी देणगी आहे आणि निसर्गाच्या जवळ पोहचल्याचं एक छोटसं बक्षीससुद्धा.

खरोखर पुढचा सगळा नजारा असा विलक्षण आहे की फोटो, शब्द, व्हिडिओ अशा गोष्टींमध्ये तो मावूच शकत नाही. ज्याची मिती विराट आहे; ज्याचे पैलू अथांग आहेत, त्याचं वर्णन करावं तरी कसं? हिमालयाची ती अथांग उंची आणि तितकीच प्रगाढ खोली! सूर्य नाही पण सूर्याचं प्रतिबिंब म्हणून हे काही फोटो. .

अशा रम्य मार्गाने दुपारपर्यंत पिथौरागढ़ला पोहचलो. मानस सरोवराच्या एका मार्गावर असलेला हा उत्तराखंडच्या पूर्व- उत्तर सीमेवरील जिल्हा आहे. गांव छोटंच आहे आणि अगदी डोंगरात वसलं आहे. पिथौरागढ़ला नातेवाईकांसोबत एक दिवस थांबेन आणि तिथून ट्रेकिंगला पुढे जाईन. जोशीमठ- बद्रिनाथ परिसरात रस्ता चालू असेल तिथपर्यंत जाण्याचा विचार आहे. म्हणून जातानाच पहिले कर्णप्रयाग आणि बागेश्वरच्या बसची चौकशी केली आणि चांगली माहिती मिळाली. इथून बागेश्वरपर्यंत डायरेक्ट बस जाते. ती पहाटे पाचला निघते.
संध्याकाळी आराम केला. थंडी खूप जास्त आहे. रात्री थोडा पाऊससुद्धा पडला. हे एक चांगलं लक्षण आहे. जर हिवाळ्याच्या सुरुवातीला हिमालयाच्या पायथ्याच्या भागांमध्ये पाऊस होतोय ह्याचा अर्थ निश्चितच उच्च पर्वतांवर बर्फ पडत असणार. उद्या पहाटेपासून पुढचा खरा प्रावास सुरू होईल. . .


रमणीय रामगंगा


कूमाऊँ रेजिमेंट!

पुढील भाग: अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: २ थल- बागेश्वर मार्गे रमणीय बैजनाथ!

हा लेख हिंदीमध्ये वाचण्यासाठी आणि इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग

प्रवासआस्वादअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

6 Oct 2015 - 3:25 pm | यशोधरा

अहा! वाचते..

प्रीत-मोहर's picture

6 Oct 2015 - 3:29 pm | प्रीत-मोहर

मस्त. तुमच नाव पाहुन अधाश्यासारखा लेख उघडला आणि वाचला. सार्थक झाल हो.

मलाही लिहिणं सार्थक झालं असं वाटतंय! :)

वाहवा! आत्ता फक्त प्रतिसाद देऊन ठेवतोय. हा लेख निवांतपणे वाचण्यासाठी राखून ठेवत आहे.

तुमच्या सर्वच लेखमाला वाचनखूण साठविण्यासारख्या असतात. त्यातलीच ही एक असणार याबद्दल शंका नाही.

द-बाहुबली's picture

6 Oct 2015 - 3:49 pm | द-बाहुबली

अजया's picture

6 Oct 2015 - 4:45 pm | अजया

वाचतेय.पुभाप्र.

प्रचेतस's picture

6 Oct 2015 - 5:34 pm | प्रचेतस

लेख आवडलाच.

बाकी “अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराज: पर्वतोs हिमालय:" हा श्लोक देताना महाकवी कालिदासाने चूक केली होती याची आठवण आली.

कुमारसंभवाची सुरुवातच ह्या श्लोकाने होते.

अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा हिमालयोनाम नगाधिराजः |
पूर्वापरौ तोयनिनिधीवगाह्य स्थितः पृथिव्या इव मानद्ण्डः ||

अर्थात उत्तर दिशेला नगाधिराज हिमालय नावाचा देवतात्मा आहे तो पूर्वसमुद्रापासून पश्चिमसमुद्रापर्यंत पसरलेला असून पृथ्वी मोजण्याचा जणू हा मानदंडच आहे.

ह्यातले हिमालय हा पूर्वसमुद्रापासून पश्चिमसमुद्रापर्यंत पसरलेला आहे हे विधान भौगोलिकदृष्ट्या चुकीचे आहे.

मार्गी's picture

7 Oct 2015 - 9:49 am | मार्गी

तपशीलांबद्दल धन्यवाद!

बोका-ए-आझम's picture

6 Oct 2015 - 6:48 pm | बोका-ए-आझम

नवीन लेखमाला! मस्तच! पुभाप्र! वाखूसाआ.

_मनश्री_'s picture

6 Oct 2015 - 8:31 pm | _मनश्री_

वा !!
छान आहे हा भाग
पुढील भागाच्या प्रतीक्षेत

आदूबाळ's picture

6 Oct 2015 - 9:27 pm | आदूबाळ

तुम्ही एक नंबर आहात राव!

आमचे प्रवास "रिव्हर्स एंजिनियर्ड" असतात. म्हणजे "कुठे पोचायचं --> तिथे काय करायचं --> कसं जायचं --> केव्हा जायचं --> तयारी" असा अल्गोरिदम वापरून केलेले. आयटेनरी आणि टु-डू लिष्टा असलेले.

थंडीच्या दिवसांमध्ये जिथपर्यंत रस्ता सुरू असेल, तिथपर्यंत फिरायला जावं ह्या विचाराने हा प्रवास केला.

या विचाराने प्रवासाला लागणं हे लय भारी आहे.

फक्त यासाठी मी तुमचे लेख वाचले असते. मग तुम्ही कुर्डुवाडी जंक्शनला गेला असतात तरी. हिमालय आणि दृष्टिसुख वगैरे बोनस आहे.

बोका-ए-आझम's picture

7 Oct 2015 - 12:50 am | बोका-ए-आझम

सहमत. आपला हिमालयातला प्रवास पण दररोजच्या लोकलच्या प्रवासासारखा मोजूनमापून असतो. पाठीला रकसॅक असते पण त्यापेक्षा मनगटावरच्या घड्याळाकडे जास्त लक्ष असतं. मार्गींसारख्यांचे लेख वाचले की आपण आजवर केलेले ट्रेक्स आणि प्रवास हे कसे चुकीच्या पद्धतीने केले त्याची जाणीव होते.

मार्गी's picture

7 Oct 2015 - 9:49 am | मार्गी

:) :)

स्वाती दिनेश's picture

6 Oct 2015 - 9:33 pm | स्वाती दिनेश

किती सुंदर फोटो आहेत,
पुभाप्र.
स्वाती

पद्मावति's picture

7 Oct 2015 - 12:14 am | पद्मावति

सुंदर सुरूवात. पु.भा.प्र.

मदनबाण's picture

7 Oct 2015 - 3:11 am | मदनबाण

वाचतोय...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jyothi Lakshmi... :- Jyothi Lakshmi

मार्गी's picture

7 Oct 2015 - 9:48 am | मार्गी

सर्वांना खूप धन्यवाद!

रामगंगेचा फोटू मोहक आलाय.

मधुरा देशपांडे's picture

8 Oct 2015 - 3:29 pm | मधुरा देशपांडे

पुन्हा नवीन लेखमालेची पर्वणी. वाचतेय.

सविता००१'s picture

9 Oct 2015 - 5:18 pm | सविता००१

कय सुरेख फोटो आहेत, लेखनच छान आहे

पैसा's picture

20 Oct 2015 - 8:20 pm | पैसा

किती बघू अन किती नको असं होत असेल. असं निरुद्देश भटकायची माझीही इच्छा आहे! इन्शाल्ला! कधी पुरी होणार बघू!