सार्वजनिक श्रीगणेशोत्सव म्हणजे गेल्या शतकभरापासून चालत आलेली महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपराच. या उत्सवाच्या तीन-चार महिने आधीपासूनच सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते उत्सवाच्या तयारीला सुरुवात करतात. मिपाच्या संपादक आणि साहित्य संपादक मंडळाचंही तसंच काहीसं झालं. १२ जून २०१५ ला आदूबाळनी मंडळापुढे श्रीगणेशोत्सवानिमित्त एका करियर विषयक लेखमालेचा प्रस्ताव मांडला. तिचं आयोजन, लेखक, याविषयी बरीच चर्चा झाली. सं.मं.च्या आणि सा.सं.मं.च्या सर्वच सदस्यांनी चर्चेत भाग घेऊन आपली मतं मांडली, मोलाच्या सूचना केल्या आणि ही लेखमाला करायची असं ठरलं. शशकच्या यशस्वी आयोजनामुळे नवीन काहीतरी करायचा उत्साह वाढला होताच.
या लेखमालेच्या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे, मिपासदस्य विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत, त्यांच्या विविध करियरविषयी लेख हा एक भन्नाट विषय होता. लेखकांनी वेळ काढून खरोखर मनापासून लेख लिहिले आणि वेळेत संपादकांकडे पाठवले. संपादकांनी केलेल्या सूचना स्वीकारून वेळोवेळी सुधारणा करून दिल्या. स्वत:बद्दल लिहायचं म्हणजे कधीकधी ‘जरा जास्तच’ चांगलं, आत्मप्रौढीयुक्त किवा मग स्वत:ला फारच कमी लेखणारं, सगळ्या चुकांचं उत्तरदायित्व स्वत:कडे घेणारं लेखन व्हायची शक्यता असते. मात्र या लेखमालेतले सर्व लेख अत्यंत प्रांजळ आहेत, कोणताही अभिनिवेश न घेता, कोणत्याही अहम्- किंवा न्यूनगंडाशिवाय लिहिले आहेत, हे कुणीही मान्य करेल. सर्व लेखांचं हे पहिलं सामाईक वैशिष्ट्य, आणि सर्व लेखकांचं कौतुक याचसाठी.
मेडिकल आणि इंजीनियरिंग या नेहमीच्या शाखांमधून शिकूनही, इतरांप्रमाणे स्वतंत्र वैद्यकीय व्यवसाय करून / गलेलठ्ठ पगाराच्या नोकर्या मिळवून भरपूर पैसा मिळवण्याच्या रुळलेल्या वाटा सोडून काहीतरी वेगळं करायची जिद्द दाखवली ती प्रास, कॅप्टन जॅक स्पॅरो आणि अन्य दातार यांनी. आपल्याला आवडेल त्या विषयाचं शिक्षण घेऊन त्यात त्यांनी वेगळी वाट धरली आहे. ‘मिपाचा बॅनरमॅन’ अभ्याचं तसंच काहीसं. त्याच्या कथनामध्ये कलावंताचा कलंदरपणा, मनस्वीपणा (आणि कदाचित यामुळेच येणारी सर्जकता) पुरेपूर दिसतो. प्रज्ञा देशपांडे यांनीही पत्रकारिता हे आपल्याला आवडणारं क्षेत्र निवडून त्यात एक वेगळीच उंची गाठली. या क्षेत्रातले अनुभव त्यांनी त्यांच्या दुसर्या लेखात मांडले आहेत.
तर, पिशी अबोली, लाल टोपी, मृत्युंजय, बोका-ए-आझम यांनी जाणीवपूर्वक अनवट वाटा निवडल्या. या वेगळ्या वाटांवरून चालताना त्यांना आलेले अनुभवही अगदी वेगळे, त्यांचं (आणि आपलंही) भावविश्व समृद्ध करणारे. आपापल्या व्यवसायानिमित्त लाल टोपींनी अर्धं जग पालथं घातलं आहे, तर पिशी अबोली महाराष्ट्रातल्या कानाकोपर्यात फिरल्या आहेत आणि बोका देशभरात विविध ठिकाणी फिरून नवी पिढी घडवायचं काम करताहेत. मृत्युंजय यांच्या क्षेत्राबद्दल तर सुशिक्षितही अज्ञानी आहेत हे वाचून गंमत वाटते.
आपण एका क्षेत्रांसंबंधी शिक्षण घेतो आणि शेवटी वेगळ्याच क्षेत्रात आपला झेंडा (तोही दूरदेशात!) उंच फडकतो, याचं उदाहरण म्हणजे पेठकरकाका. आपल्या ‘ताटात’ काय वाढून ठेवलं आहे ते आपल्याला माहीत नसतं, आणि ते एकदा समजलं की ‘भरल्या ताटाने’ आपण दुसर्यांना तृप्त करतो, असे त्यांचे अनुभव खरोखर ‘रुचकर’ आहेत.
आपल्या आवडीचं क्षेत्र जाणीवपूर्वक निवडून त्यात करियर करा हे ‘थ्री इडियट्स’मधलं रँछो सूत्र सर्वांनाच पटतं-जमतं असं नाही. या सर्वांनी ते केलंच; त्याचबरोबर आपल्या कारकिर्दीच्या वाटचालीमध्ये अनेक टक्केटोणपे खावे लागतात, कडू प्रसंग अनुभवावे लागतात, त्यांनी खचून न जाता त्यातून मार्ग काढायची जिद्द या सर्वांच्या कथनातून जाणवते. सर्व लेखांचं आणि लेखकांचं हे दुसरं सामाईक वैशिष्ट्य.
मिपासारखं संस्थळ म्हणजे अनेकांना व्यक्त होण्याची संधीच. व्यक्त होणं इथे महत्त्वाचं, शुद्धलेखनाचा आग्रह धरणं फार आवश्यक नाही. मात्र, जेव्हा अशा लेखमाला, दिवाळी अंकासारखे विशेष अंक प्रकाशित करायचे असतात, तेव्हा संपादकीय दृष्टीकोनातून शुद्धलेखनाकडे लक्ष देणं आवश्यक ठरतं. या लेखमालेतल्या लेखांचं मुद्रितशोधन करताना विशेष अनुभव आला. एक तर, सगळेच चांगले अनुभवी लेखक असल्यामुळे त्यांच्या लेखनात शुद्धलेखनाच्या फारशा दुरुस्त्या कराव्या लागल्या नाहीत. ज्या काही थोड्या दुरुस्त्या कराव्या लागल्या, त्यांचं लेखकांनी स्वागत केलंच, शिवाय व्यनिद्वारे त्यांचं स्पष्टीकरणही जाणून घेतलं आणि यापुढे योग्य शुद्धलेखन करायचं ठरवलं. आपलं काम जास्तीत जास्त चांगलं करण्याचा ध्यास आणि त्यासाठी नवीन काहीतरी शिकायची तयारी त्यांच्या व्यवसायक्षेत्रातही दिसते, हे सर्वांचं तिसरं वैशिष्ट्य.
सर्वच लेखांना मिपाकरांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. कुणी या लेखांना मोदकाचं रूपक दिलं, आणि सर्वांनी रोज नव्या मोदकाची वाट पाहिली. प्रत्येक लेखकानेही इतर लेखांचं कौतुक करणारे प्रतिसाद दिले. असे प्रतिसाद मिळणार असतील, तर लेखकालाही लेख लिहिण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. या लेखमालेने काही लेखकांना आणि प्रतिसादकांनाही पुन्हा लिहितं केलं, हाही एक फायदाच झाला. भरघोस प्रतिसादांसाठी वाचकांचंही कौतुक करायलाच हवं.
लेखांवर संपादकीय संस्कार झाल्यावर, भारतीय प्रमाणवेळेनुसार रोज रात्री बारा वाजता एक असे दहा लेख प्रकाशित करायचे होते. सं.मं.ने (पैसाताईंनी) ही जबाबदारी पार पाडली आहे. आपापले व्यवसाय-नोकर्या सांभाळून संपादक मंडळी मिपासाठी एकूणच खूप काम करतात. संपादक मंडळ म्हणजे या लेखमालेचा (आणि एकूणच मिपाचा) ‘पाठीचा कणा’ आहे.
या लेखमालेमुळे आपल्यातल्याच काही जणांचे वेगळे विचार, अनुभव, त्यांची कार्यक्षेत्रं, त्यांची जिद्द आपल्याला जाणून घेता आली. इतरांनीही अशीच जिद्द दाखवली असेल, त्यांना या लेखमालेतून पुन:प्रत्ययाचा आनंद मिळाला असेल. तर, एखाद्या नव्या अनवट क्षेत्रात धाडसाने पाऊल टाकणार्याला या लेखांतून नक्कीच प्रेरणा मिळेल, हे या लेखमालेचं यश आणि फलित आहे.
अनंत चतुर्दशीला श्रींचं विसर्जन झालं. विसर्जनाच्या वेळी आपण बाप्पांना म्हणतो – पुढच्या वर्षी लवकर या! या लेखमालेचा समारोप करताना आपण असंच म्हणू या – मिपावर अशाच समयोचित लेखमाला प्रसिद्ध व्हाव्या आणि अशीच वाचन मेजवानी मिळावी.
प्रतिक्रिया
28 Sep 2015 - 12:39 pm | नाखु
या मालिकेसाठीच्या सर्व ज्ञात अज्ञात सहभागींचे मनःपूर्वक अभिनंदन आणि कौतुक !!!!!!
28 Sep 2015 - 12:45 pm | खेडूत
चांगला आढावा.
सं. मं.चे आणि सर्व लेखकांचे एकत्रित आभार.
आता प्रतिक्षा दिवाळी अंकाची! तोही सुंदर असणार.
28 Sep 2015 - 12:45 pm | वेल्लाभट
जितकी सुरेख लेखमाला तितकंच सुरेख सिंहावलोकन...
28 Sep 2015 - 12:48 pm | अन्या दातार
असेच म्हणतो
28 Sep 2015 - 7:00 pm | रुस्तम
मी पण असेच म्हणतो ...
28 Sep 2015 - 12:48 pm | ज्ञानोबाचे पैजार
ही मालिका म्हणजे खरोखरच मेजवानी होती.
आजचा लेख कोणाचा आणि कोणत्या क्षेत्रा विषयी याची रोज सकाळी उत्सुकता वाटत होती.
दर दिवशी एका नवे सरप्राइज सर्व वाचकांना मिळत होते .
या लेखमालेसाठी प्रत्येक लेखकाने आणि प्रत्येक लेखकाच्या बरोबरीने संपादक मंडळाने घेतलेली अपार मेहनत पदोपदी जाणवत होती. सर्व लेखकांचे, संपादकांचे आणि इतर सहभागी व्यक्तींचे मनोमन आभार.
शतशब्दकथा आणि गणेशलेखमालेच्या पार्श्र्वभूमीवर दिवाळी अंकाबद्दलची उत्सुकता अतिशय ताणली गेली आहे.
मिपाचा या वर्षीचा दिवाळी अंक पण असेच दणदणीत यश मिळवो ही शुभेच्छा.
पैजारबुवा,
28 Sep 2015 - 1:00 pm | उगा काहितरीच
सर्व लेख सुंदर, प्रेरणादायी होते. सर्व लेखकांचे, मिपा संपादक मंडळाचे मनापासून आभार.पुढील अंकही असाच सुंदर व्हावा ! शुभेच्छा !
28 Sep 2015 - 1:11 pm | नाव आडनाव
लेखमालेतले सगळेच लेख चांगले होते.
वेगवेगळ्या क्षेत्रातले अनुभव हे त्या-त्या क्षेत्रात नवीन येणार्या लोकांना कामाला येतील. लेखमाला संपली असली तरी असे वेगवेगळे अनुभव ज्यांना असतील त्यांनी या नंतरही नव्या येणार्या लोकांना फायदा होईल, प्रेरणा मिळेल या साठी ते लेख लिहावेत असं वाटतं.
28 Sep 2015 - 1:15 pm | अनुप ढेरे
लेखमाला खूप आवडली!
28 Sep 2015 - 1:18 pm | प्रभाकर पेठकर
रोजच्या जीवनांत, व्यवसायात, भूतकाळात, वर्तमानकाळात विचारांचा, अनुभवांचा भलामोठा गुंता निर्माण होत असतो. तो नीट सोडवून त्याची वेगवेगळी रिळे भरून ठेवणे ही गरज आणि मौज असते. अशी सुंदर भरलेली रिळे जेंव्हा रसिक श्रोत्यांसमोर, वाचकासमोर उलगडली जातात आणि त्या रंगीबेरंगी धाग्यातून लेखरुपी एकसंघ वस्त्र निर्माण होतं तेंव्हा वाचकांइतकीच, 'व्वा!' अशी आपलीही भावना होते. ते समाधान, तो आनंद शब्दात वर्णिता येत नाही. अशा आनंदाचा अनुभव मिपामुळे मिळाला. अत्यंत मर्यादित सर्क्यूलेशन असलेल्या 'समांतर भाग्य' ह्या मासिकात माझे अनेक लेख छापून आले, युरोपातील मराठी मंडळानेही छापले आणि दुबईच्या मंडळाच्या मासिकानेही छापले. ह्या सर्वातून जो आनंद मला मिळाला, जे कौतुक केलं गेलं त्या सर्वाचा पाया मनोगत आणि मिसळपाव ह्या दोन संस्थळांनी घातला.
मध्यंतरी मिसळपाववर चालणार्या डू आयडींच्या मारामार्या, प्रमाणाबाहेरील उथळपणा, दुस्वास इत्यादींनी मन विटलं होतं. त्या सर्वावर श्रीगणेशलेखमालेने स्वच्छतेचे आणि मांगल्याचे पांघरूण घातले. वाचकांच्या प्रतिसादाने 'अजून कांही तरी लिहावे', हा हुरुप आला. खुप ज्ञान मिळाले, प्रेरणा मिळाली, नवचैतन्य लाभले.
ह्या लेखमालेसाठी अहोरात्र झटणार्या संपादक, साहित्यसंपादकांनी स्वतः मागे राहून आम्हाला झळकायची ही संधी उपलब्ध करून दिली त्या बद्दल त्यांचा मी शतशः ऋणी आहे.
धन्यवाद.
28 Sep 2015 - 1:24 pm | मुक्त विहारि
इतक्या सुंदर सिंहावलोकनाला मनापासून सलाम.
28 Sep 2015 - 1:36 pm | बोका-ए-आझम
हे सिंहावलोकन हाच एक अप्रतिम लेख आहे. तुमच्या मुद्रितशोधन व्यवसायातल्या अनुभवांवर एक लेखमाला येऊ दे आता!
28 Sep 2015 - 3:18 pm | सस्नेह
एका कौतुकास्पद उपक्रमाचा तितकाच वाचनीय आढावा !
नूलकरकाका, अतिशय अचूक आणि तत्पर मुद्रितशोधनाबद्दल तुमचंही अपार कौतुक आहे !
28 Sep 2015 - 4:17 pm | कविता१९७८
सुंदर सिंहावलोकन
28 Sep 2015 - 4:32 pm | मधुरा देशपांडे
संपुर्ण लेखमाला खूप आवडली. प्रत्येक लेखावर प्रतिसाद द्यायला जमले नाही पण प्रत्येक लेख आवर्जुन वाचावा असा होता. आणि हा आढावा देखील तेवढाच उत्तम.
28 Sep 2015 - 4:38 pm | यशोधरा
असेच म्हणते!
28 Sep 2015 - 4:41 pm | लाल टोपी
शुध्दलेखनाचे बारकावे, संदर्भ या सर्वच बाबतीत तुमचा शब्द प्रमाण मानला जात आहे. आमच्या सारख्या हौशी मंडळींसाठी तुमच्यासारख्या तज्ञ व्यक्तीचा हातभार लागला हे भाग्यच आहे असे मानतो. मनापासून धन्यवाद.
28 Sep 2015 - 4:47 pm | इशा१२३
सं. मं.चे आणि सर्व लेखकांचे आभार.अतिशय प्रेरणादायी विषय निवडला गेला लेखमालेसाठी.तितकेच सुंदर लेख वाचायला मिळाले.या लेखमालेसाठी कष्ट घेतलेल्या प्रत्येकाचे कौतुक.
सिंहावलोकनहि सुरेख.
28 Sep 2015 - 4:55 pm | पैसा
अतिशय उत्तम झालेल्या या वर्षीच्या श्रीगणेश लेखमालेचा सुंदर समारोप!
सर्वच लेखकांना खूप धन्यवाद! इतके सुंदर लेख एकामागोमाग एक वाचायला मिळाले. आणि चांगल्या लिखाणाला मिपावर प्रतिसाद मिळत नाहीत ही गैरसमजून खोडली गेली. त्यासाठी भरभरून प्रतिसाद देणार्या वाचकांचेही आभार! अगदी मनापासून धन्यवाद स्वतः नूलकरांना! दिवाळी अंकासाठी ते आम्हाला नेहमी मदत करतातच, पण या वेळी हे जास्तीचे काम. त्यांनी वेळात वेळ काढून या मालिकेतील प्रत्येक लेख निर्दोष करा राहील हे पाहिले. तुम्ही अजून जास्त लिहीत जा हो!
आदूबाळाने ही अभिनव कल्पना मांडली तेव्हाच मालिकेचे यश निश्चित झाले होते. मात्र तिचा पाठपुरावा करणे, लेखकांना चिकाटीने लिहा लिहा करून लेख वेळेत पुरे करून घेणार्या संपादक आणि साहित्य संपादकांचेही प्रचंड कौतुक. दोन्ही अन्या दातारांनी स्वतःच सुंदर लेख लिहिले आहेत. मिपासंवादच्या इतर सदस्यांनीही खूप छान सहभाग दिला.
मिपावर साहित्य संपादक असावेत ही कल्पना अजयाने मांडली आणि नीलकांतने लगेच अंमलात आणली. ती किती यशस्वी ठरली हे शशक स्पर्धा आणि श्रीगणेश लेखमाला यानिमित्ताने पहायला मिळाले. या निमित्ताने साहित्य संपादकांचे जाहीर कौतुक करण्याची संधी घेत आहे!
एकूण मजा आली! मंडळी, असाच उत्साह दिवाळी अंकासाठी आणि इतर उपक्रमांसाठी दाखवा! इत्यलम!
गणपतीबाप्पा मोरया!
28 Sep 2015 - 5:05 pm | सानिकास्वप्निल
हे सिंहावलोकन खूप आवडले.
गणेशलेखमालेतील निर-निराळ्या क्षेत्राबद्दलची माहिती, अनुभव वाचताना खूप छान वाटले.
एक स्तुत्य उपक्रम आम्हा वाचकांसाठी उपलब्ध करुन दिला त्याबद्दल संमं आणि सासंमं ह्यांचे मनःपूर्वक आभार.
28 Sep 2015 - 5:17 pm | पिशी अबोली
संमं आणि सासंमंचे दोन कारणांसाठी आभार. एक, इथल्या अफाट यशस्वी लोकांच्या कारकीर्दीबद्दल वाचता आलं यासाठी, आणि दुसरं माझ्या या यशस्वी लोकांच्या खिजगणतीतही नसलेल्या करियरबद्दलसुद्धा तितक्याच आत्मीयतेने विचार करून, माझ्याकडून ते योग्य पद्धतीने लिहून घेण्यासाठी.
नूलकर काकांनी छोट्यातल्या छोट्या चुकासुद्धा नुसत्या सुधारल्याच नाहीत, तर त्यांच्यामागची कारणमीमांसाही समजावली. मिपावरचे सुंदर लेख नेहमीच वाचले जातात. पण नवख्या लेखकाकडून लेख लिहून घेण्याचं काम हे सगळे लोक किती छान करतात हे कळणं हा एक सुंदर अनुभव होता.
धन्यवाद!
28 Sep 2015 - 5:22 pm | रेवती
सुधांशुजी, सिंहावलोकन मस्त केलय.
सगळे लेख ग्रेटच होते.
28 Sep 2015 - 6:13 pm | अभ्या..
सुधांशूदादा, खूप खूप धन्यवाद. आम्ही लिहिलेल्या शब्दांना व्याकरणाचे अन शुध्द्लेखनाचे अंगडेटोपडे सुरेख चढवून सादर केलेत. तुमच्या मुद्रीतशोधनानंतर किती फरक पडतो हे अनुभवले आहे.
या लेखनमालेत खरेतर मी शेवटचा राखीव भीडू ठरेन असे वाटले होते. पॅड बांधून बसावे अन कोल्ड्रिक्स पिऊन घरी जावे हा प्लान होता. आदूबाळाने हातात ब्याट देऊन मैदानात पाठविलेच शेवटी. त्याच्या आग्रहाला बळी पडलो अन हा लेख लिहिला. मिपाकरांचे प्रेम आहेच. संपादकमंडळ आणि मालकांना विशेष धन्यवाद.
(पुढच्या मॅचला कायतरी वेगळा प्लान करायला पायजे ;) )
28 Sep 2015 - 6:32 pm | प्यारे१
सुंदर लेखमालेचं तितकंच तोलामोलाचं अवलोकन.
जियो.
28 Sep 2015 - 6:43 pm | डॉ सुहास म्हात्रे
अप्रतिम लेखमालेचे तितकेच सुंदर सिंहावलोकन !
या लेखमालेतील लेख म्हणजे श्रीगणेशाच्या गळ्यात घातलेल्या साहित्यरुपी हारातले दहा हिरे होते !!
28 Sep 2015 - 6:55 pm | मित्रहो
छान समारोप केलाय
लेखमाला तर सुंदर होतीच
28 Sep 2015 - 7:00 pm | प्रचेतस
एका सरस लेखमालेचा तितकाच सरस समारोप.
28 Sep 2015 - 9:42 pm | मदनबाण
श्री गणेश लेख मालेतील सर्व लेख आवडले आणि या सर्व लेखांचे सिंहावलोकन देखील सर्वार्थाने चिंतनीय आहे. :)
या सर्व लेखांतुन लेखकांचे अनुभव विश्व, जिद्द, चिकाटी,प्रामाणिकपणा,कला इं आणि अनेक गुणांशी नव्याने परिचय झाला. या सर्व लेखक मंडळींकडुन आपल्यास बरेच काही शिकणे आहे, याची जाणीव मला प्रकर्षाने झाली....
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- डगा डगा वई वई वई..... :- KALI TOPI LAL RUMAL (1959)
29 Sep 2015 - 12:40 am | Jack_Bauer
ही लेखमाला म्हणजे खरच एक अप्रतिम अनुभवांची माळ आहे. सर्व लेखकांना आणी मिपा टीमला मनापासून धन्यवाद !
एक प्रश्न : जर आणखी कोणाला स्वताच्या करियर विषयी लिहायचे असेल तर ते शक्य आहे का? कारण लेखमाला ही १० लेखांचीच होती आणी अतिशय सुंदर असे १० लेख आधीच आल्याकडे आहेत.
29 Sep 2015 - 12:24 pm | डॉ सुहास म्हात्रे
मिपाच्या पानावर उजवीकडील रकान्यात असलेल्या "आवागमन" शीर्षकाखाली असलेला "लेखन करा" हा पर्याय वापरून मिपाचा कोणताही सभासद आपल्या व्यवसायाबद्दलचे आणि इतरही प्रकारचे लेखन स्वतःहून प्रसिद्ध करू शकतो.
असे लेखन पानाच्या खालच्या बाजूला असलेल्या "मिसळपावचे आधिकारीक धोरण" या दुव्यात असलेल्या सूचना लक्षात घेऊन करावे व लेखाचा उपयोग आर्थिक फायद्यासाठी अथवा व्यावसायिक जाहिरातीसाठी करू नये, इतकीच माफक अपेक्षा असते.
29 Sep 2015 - 12:13 pm | सुधांशुनूलकर
अबब! समारोप लेखालाही दणदणीत प्रतिसाद.. यापेक्षा आणखी काय हवं? सर्व प्रतिसादकांना _/\_, भरभरून धन्यवाद.
विशेष लेखमाला, दिवाळी अंक यासारखे उपक्रम म्हणजे एक सांघिक कार्य (टीमवर्क) असतं. संघाच्या यशामध्ये सर्वांचा सहभाग असतो. पडद्यामागच्याही सर्व टीममेंबर्सचं कौतुक करावंसं वाटलं, म्हणून हा समाऱोप लेख लिहावासा वाटला.
@ नाव आडनाव, Jack_Bauer : आपल्या करियरविषयी इतरही अनेक मिपाकरांचे असे अनुभव नक्कीच असतील. ज्यांना ते लिहावेसे वाटत असतील, त्यांनी जरूर लिहावे. नव्यांना त्यातून प्रेरणा, मार्गदर्शन नक्कीच मिळेल. मिपा हे मुक्त व्यासपीठ आहेच आणि सं.मं., सा.सं.मं. आहेतच काही मदत लागली तर.
@ पेठकरकाका :
: अतिशय सुंदर वाक्य. प्रचंड सहमत.
@ बोका-ए-आझम : तुमच्या सूचनेचं स्वागत. मुद्रितशोधनातली माझी कारकिर्द जेमतेम तीनचार वर्षांची. त्यातही काही गमतीजमती झाल्या, त्या लिहायचा प्रयत्न करीन.
@ पैसाताई, पिशी अबोली, लाल टोपी : मुद्रितशोधन हे ‘माझ्या जिवाची आवडी’ असलेलं क्षेत्र. त्यामुळे या कामाचा कधीच बोजा वाटत नाही. वाचकाला छान भाषा वाचायला मिळावी या उद्देशाने मुद्रितशोधन करायचं असतं, हे तत्त्व पाळायचा प्रयत्न करतो. त्यातून आनंदच मिळतो.
@ अभ्या.. : गड्या, तू राखीव भिडू नाहीस. तू लेखक-डिझायनर-बॅनरमॅन-सा.सं. असा भरवशाचा ‘अष्टपैलू’ ऑल राउंडर आहेस. पुढच्या मॅचला तुला ओपनिंगला पाठवायचा प्लॅन आहे. तेव्हा, बांधलेली पॅड्स उतरवू नकोस.
जाता जाता : मला सुधांशू’दादा’ म्हटल्यामुळे माझ्या वयाच्या आकड्यांची अदलाबदल होऊन मी तरुण तुर्क झाल्यासारखं वाटायला लागलंय.
सर्व प्रतिसादकांचे आणि वाचकांचे पुन्हा एकदा मन:पूर्वक आभार.
29 Sep 2015 - 12:15 pm | तर्राट जोकर
आयुष्यात कोणीही विचारले यापुढे की तुम्ही मिसळपाववर का जाता तर त्यास ही लेखमालिका अतिशय योग्य उत्तर आहे. असेच आणि यापेक्षाही अधिक चांगले लेख मिपावर मुसळधार पावसाप्रमाणे कोसळत राहोत ही गणरायाचरणी प्रार्थना.
29 Sep 2015 - 12:44 pm | अजया
सुरेख लेखमालिकेचे त्याच तोडीचे सिंहावलोकन करुन समारोप.धन्यवाद आणि कौतुक सर्व संबंधितांचे.
29 Sep 2015 - 2:00 pm | पद्मावति
अतिशय सुरेख सिंहावलोकन.
लेखमाला अप्रतिम होती. ती यशस्वी करण्यासाठी झटणार्या सर्वच लोकांचे खूप खूप आभार.
29 Sep 2015 - 2:07 pm | दमामि
+1111
30 Sep 2015 - 1:24 am | gogglya
तितकेच किंवा जरा जास्तच चांगले सिंहावलोकन... आता सासं मंडळाला एक विनंती की नवरात्रा निमित्त अजून एक दर्जेदार लेखमाला [किंवा लेख माळ - जशी दीपमाळ असते तशी] चालू व्हावी...
30 Sep 2015 - 7:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सिंहावलोकन आवडले. खुपच सुंदर.
लेख मालिका अतिशय दर्जेदार झाली.
-दिलीप बिरुटे
30 Sep 2015 - 11:24 am | कापूसकोन्ड्या
मिसळपाव !!
खरंच अप्रतिम उपक्रम.प्रोफेशिनॅलिझम म्हणजे काहीतरी जड,बोजड, रुक्ष, रटाळ,सपक हा संदर्भ दूर केला या लेखमालेने. सर्व लेखक प्र्तिसादक, प्रतिसादक आणि वाचक यांचे अभिनंदन!
आणि सिंहावलोकन तर अप्रतीम! जे लोक ओरिजिनल लेख वाचू शकले नाहीत त्याना आणि ज्यांचे वाचून झाले असेल त्यांना परत एकदा वाचायला उद्युक्त करणारे.
माझे स्वतःचे काहिही कॉन्ट्रीब्युशन नसताना आपण उगीचच ग्रेट आहोत असे वाटणे हा आणखी एक फायदा
30 Sep 2015 - 3:22 pm | मृत्युन्जय
नूलकर काकांनी लेखमालेचा अतिशय सुंदर समारोप केला आहे. त्यांच्या मुद्रितशोधनानंतर लेखात खरोखर खूप फरक पडतो हे जाणवते आहे. आता मी लेख लिहिताना किती चूका केल्या आहेत हे समजुन येते आहे आणि त्या चूका खड्यासारख्या टोचत आहेत. त्यामुळे नूलकर काकांना अनेक धन्यवाद. संमंला आणि आदूबाळला देखील पुनःश्च एकवार धन्यवाद.