एका अनोळखी प्रदेशात - २

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
27 Sep 2015 - 12:18 am

अंधार पसरत चाललाय. निटसं दिसतही नाहीये. आणि मी फाट्यावर ऊभा ठाकलोय. एकटाच. हातातल्या बँगेत भुर्जीपावचं पार्सल घेऊन.
एव्हाना त्या टपरीवल्याला काहीतरी बिनसल्याची चाहुल लागली. दुरुनचं त्यानं विचारलं " नवीन दिसताय गावात, कुणाकडं आलाय?".
आता आली का पंचाईत, थोडा गडबडलोच.
"ते मोहीते नाहीत का, त्या नदीजवळच्या मंदिरापाशी राहतात, त्यांच्याकडेचं" मनाला येईल ते फेकलं.
"म्हादबाकडं का?, त्याचं घर तर वरतीकडं ऱ्हायलं, देवळापाशी होळकर राहत्यात" नसती कटकटं.
"हा तिकडचं, पाहुणा म्हणुन आलोय, पाय मोकळं करायला ईकडं फाट्यावर आलतो" ही थाप बहुतेक पचली किंवा त्याला कळुन चुकलं असावं की मला त्याच्याशी जास्त काही बोलण्यात स्वारस्व नाही. कारण म्हातारं नुसतं "बरं" म्हणुन आपल्या कामाला लागलं. त्याचे पैसै चुकते करुन शाळेकडे निघालो.
रस्त्यावर शुकशुकाट होता. मघाशी बघितलेली शाळेची ईमारत अंधारात गुडुप झाली होती. पायवाटेवरचे दगडधोंडे नीट बघत कसाबसा तिथपर्यंत पोहोचलो.

शाळेची ईमारत सरकारी. दगडी बांधकाम. तिन वर्ग. बाहेर मोकळा व्हरांडा. समोरचं माळरान हेच मैदान. तिथुनच मी आलो होतो.
आजुबाजूला जाऊन थोडा कानोसा घेतला. सगळीकडं सामसुम होती. दगडी भिंत आणि भव्य खांब यांच्या मधोमध बॅगेवर डोकं ठेऊन थोडावेळ पडलो.
पिवळसर दिव्याचा प्रकाश ईथेही येऊन पोहोचला होता. निलगिरीच्या झाडाआडं लपलेलं घर अजुनही अंधुकच दिसत होतं. एक वयस्कर बाई ओट्यावर भांडी घासत होती. बहुदा यांची जेवणं झाली असावीत. एक तरुण स्त्री घासलेली भांडी घरात नेऊन ठेवत होती. एकदोनदा तिने सरळ माझ्याकडे पाहीले. या काळोखात मी तिला दिसणे तसे अवघडचं होते. तरीही मी जरा भिंतीच्या आडोश्याला सरकलो. घाबरतचं एखादा कटाक्ष घराकडे टाकायचो. वयस्कर बाईचं भांडी घासुन आता झालं असावं कारण ती तरुण स्त्री एकटीच बाहेर घुटमळत होती.
हीच असावी ती रुपगर्विता जिच्याशी माझे काम होते. जरा ईकडे तिकडे करुन तीही आत गेली. बराच वेळ बाहेर आली नाही. आता मी ही कंटाळलो. नसतं धाडस अंगलट येणार होतं. तसाच पडुन राहीलो. डोळ्यावर झापड येऊ लागली. जबर झोप लागली.

किती वेळ गेला कुणास ठाऊक. कोणीतरी मला हलकेच हलवुन उठवत असल्याची जाणीव झाली.
" ल...य उशी...र ला...वला... याय...ला" खुप दुरुन कोणीतरी मोठ्यांदा बोलल्यासारखा आवाज. डोळे सताड उघडले तरी परीस्थितीचं भानचं लवकर आलचं नाही. एक तरणीताठी स्त्री समोर दिसत होती. अरे ही तिच की रुपगर्विता.
"लय ऊशीर लावला हो यायला, मला वाटलं दुपारीच याल" आता आवाज जवळुन आला खडबडुन जागा झालो. ऊठुन बसत तिला म्हणालो "हो जरा ऊशीरच झालाय, पण तुम्हाला मी ओळखलं नाही". अंधारात तिचा चेहराही पुसटसा.
"अहो मीच अंजू, मलाच भेटायला आलायला ना तुम्ही, एक काम करा पाय न वाजवता घरामध्ये या, दरवाजा उघडाच ठेवते" तिचा आवाजही नाजुक, धाप लागल्यासारखा, आतले शब्द बाहेर यायला बघताहेत पण त्यांना ती रोखू पाहतेयं असं काहीसं.
"ठिक आहे" माझे उत्तरही तिने ऐकले नसावे. तशीच लगबगीने घराकडं गेली.

खरतर एवढ्या अपरात्री एखादी अनोळखी स्त्री आपल्याला घरात बोलावतेय हे जरा विचित्रचं वाटलं. पण तितकचं मोहक ही.
जराही पाय न वाजवता मी घरात शिरलो.
तिनं दार लावुन घेतलं. माझ्याकडं बघत अगदी लाजल्यासारखं हसली. "बापू आणि माय वर झोपलेत, गच्चीवर, तेव्हा जरा हळु बोला"
मी एका खुर्चीवर बसलो. ट्युबलाईटच्या ऊजेडात तिचा चेहरा नीटसा पारखला. खरच ती रुपगर्विता होती. अगदी गावरान सौदर्य. माझ्याकडे अवखळ बघत तीही पलंगावर बसलेली. एकतर या गावातलं वातावरण उगाचचं रहस्यमय वाटत होतं, त्यातुन काळोख्या रात्रीची ही चोरटी भेट, समोर एक लावण्यवती, आणि मीही असा, रोमांचकारी प्रवासाच्या शोधात स्वत:ला झोकुन दिलेला. अशा नाजुक क्षणी तोल जाण्याची दाट शक्यता.

"एवढ्या लांबुन आलात, काही आणलयं का माझ्यासाठी?"
"हो आणलयं ना" बॅगेतलं भुर्जीपावचं पार्सल तिच्याकडं सोपवलं.
मोठ्या ऊत्सुकतेने तिने ते उघडलं. पण भुर्जीपाव बघुन तिचा चेहरा पडला.
" हे काय? येडेच आहात तुम्ही, काहीही आणता."
मीही जरा ओशाळलोच. अशा रुपगर्वितेला आपण भेट म्हणुन भुर्जीपाव देतोय? छ्या! गपगुमान ते पुन्हा बॅगेत टाकले.
"तुम्हाला एक गंमत सांगते, ईथं एक मंदिर आहे, जायचं का?" एवढ्या मध्यरात्री ही मला मंदिरात घेऊन चाललीय. आता यात काय गंमत आहे. ही तर विचित्रपणाची हद्द झाली. पण मीही या प्रवासात स्वत:ला झोकुन द्यायचे ठरवले होते. विशेष म्हणजे जोपर्यंत ही रुपगर्विता सोबत आहे तोपर्यंत हा प्रवास भलताच रोमांचकारी असणार होता.

क्रमश:

(एका अनोळखी प्रदेशात - १
www.misalpav.com/node/32948 )

संस्कृतीकथाजीवनमानप्रकटनलेखप्रतिभा

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

27 Sep 2015 - 12:49 am | उगा काहितरीच

उत्सुकता वाढते आहे. यापूर्वी कुठं प्रकाशित झालं होतं का ? लिंक व्यनिने दिली तरी चालेल !

जव्हेरगंज's picture

27 Sep 2015 - 9:42 am | जव्हेरगंज

यापूर्वी कुठं प्रकाशित झालं होतं का ?>>>>>>
नाही. कालच टंकलय. आभारी आहे.

बाबा योगिराज's picture

27 Sep 2015 - 1:58 am | बाबा योगिराज

मस्त लिहिता. विंटरेष्ट येऊ रायलाय.
पुलेशु.
पुभाप्र.

मांत्रिक's picture

27 Sep 2015 - 6:43 am | मांत्रिक

वा! उत्सुकता वाढतेय!कथेतलं एकाकीपण, भयगूढता चांगली उभी केलेय.

सामान्य वाचक's picture

27 Sep 2015 - 9:43 am | सामान्य वाचक

काहीतरी गूढ़ आहे हे कळले

diggi12's picture

11 Sep 2024 - 12:47 am | diggi12

पुढचा भाग?