चित्रपटात नायक किंवा नायिका किंवा दोघे असतात. चित्रपट आपल्याला त्यांची गोष्ट सांगतो किंवा एखादी गोष्ट त्यांच्या नजरेतून दाखवतो. ’कोर्ट’ मध्ये ’सिस्टीम’ हेच सिनेमाचं मुख्य पात्र आहे. लोकशाहीर, वकिल, न्यायाधीश आणि त्यांच्या आजूबाजूचे सगळेच या सिस्टीमच्या आधारे वावरणारी दुय्यम व्यक्तीरेखा आहेत. हा सिनेमा कोणा एकाची गोष्ट सांगत नाही तर ह्या सगळ्यांचे टेकू असलेली तरिही सगळ्यांच्या जगण्यातला महत्वाचा भाग असलेली सिस्टीम आहे तशी दाखवतो. इथे सिस्टीमच नायक आहे आणि खलनायकही. चित्रपटात जज्ज आहे, कोर्ट आहे तरिही जजमेंटल नसलेला असा हा चित्रपट.
नेहमीच्या सिनेमातलं कोर्ट हे नाट्यमय संवाद, वकिली युक्तीवाद, लोकांची उलटीपालटी होणारी आयुष्य यांनी परिपूर्ण असतं. इथेही वकिली युक्तीवाद आहेत पण त्यात फक्त त्यांची हुशारी नाही तर ज्या सिस्टीमचा ते भाग आहेत त्यातून आलेली भूमिका आहे आणि तेही कोणताही आव ना आणता सहज आलेलं आहे. माणूस एखाद्या परिस्थितीत सापडतो त्यातून पुढे एखाद्या मुक्कामी पोहोचतो. हा प्रवास म्हणजे त्याला केवळ अनुकूल किंवा प्रतिकूल असणार्या घटनांची साखळीच केवळ नसते तर त्या अनेक छोट्या-मोठ्या घटना, परिस्थिती, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी माणसं, त्यांच्या आजूबाजूचं वातावरण यांचं एक कोलाज असतं. या गोष्टी परस्परांशी मेळ खात असोत नसोत या कोलाज मध्ये त्या आपापले रंगाकार घेउन एकत्र येतात. आरोपी नारायण कांबळे असो का जज्ज सदावर्ते असोत. त्यांच्या त्यांच्या पोझिशननुसार, जडण घडणी नुसार त्याचं वागण्याची ठराविक चौकट आहे. सिनेमातल्या प्रत्येकाने स्वत:ची आणि दुसर्याची चौकटही स्वीकारलीय. दुसर्याच्या भुमिकेबद्द्ल अनावश्यक त्रागा नाही की द्येचा पाझर नाही. हे आहे, हे असं आहे हे दाखवत कॅमेरा फिरतो. ठरवून केलेलं भाष्य कश्यावरच नाही. नेहमीच्या आयुष्यात असंच असतं. एकच पूर्ण चूक, दुसरा एखादा पूर्ण बरोबर असं नसतच ना कधी! "वीस वर्षं तुरुंगात डांबा आणि संपवा मॅटर" असं सहकार्यांमध्ये म्हणणारी वकील ही मानवाधिकारावरील परिसंवादात निवेदन करणार्या आणि वक्त्याच्या संस्थेच्या नावाच्या चुकीबद्द्ल बेफिकीर असणार्या निवेदिके इतकीच या मॅटरबद्द्ल अलिप्त आहे. कारण यात आपल्या वाटेची भूमिका पार पाडायची हीच मनोधारणा आहे आणि आपणही हेच करत असतो.
डिस्कव्हरी वाहीनीवर जंगलातलं जीवन बघताना आपल्या घश्याशी आवंढा येतो का? सिंह शिकारीवर झडप घालतो. कधी शिकार निसटते, कधी त्याला भारी पडते हे सगळं जंगलाचा, निसर्गाचा नियम म्हणून आपण बघतो. माणसंही तशीच असतात कोणी कोणाचा हेतुत: शत्रु नसतो का मित्र नसतो. प्राणी जसे निसर्गनियमाचा भाग असतात तशी ईथली माणसं सिस्टीमचा भाग आहेत. आणि आपल्या वाटेला आलेलं काम ती करताहेत. त्यात खोलात जाउन न्याय-अन्याय, सुष्ट-दुष्ट याचा न्याय निवाडा नाही केवळ पुढे आलेल्या पुराव्याने , कायद्याने आलेला न्याय आहे. तो अन्याय वाटला तरी त्याने कोणी कोलमडत नाही की फुशारत नाही कारण हे नियम, ही सिस्टीम हे त्यांच्या जगण्याचा भाग आहेत. सुरुवातीला सरकारी पुराव्यानुसार ज्या न्यायमूर्तींनी लोकशाहीर नारायण कांबळेला जामिनही नाकारला; तेच न्यायमूर्ती, ज्याला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप कांबळेवर आहे त्याला संरक्षक आयुधं मिळाली नव्ह्ती, सरकारी वकिलांचे पुरावे अर्धवट आहेत, त्यांचे साक्षीदार ठेवणीतले साक्षीदार आहेत हे पुढे आल्यावर जामिन मंजूर करतात. पुन्हा वेगळ्या कलमांखाली पुन्हा कांबळेला अटक झाल्यावर ही सिस्टीम नारायण कांबळेला जामिन न मिळाल्याने कोर्टाच्या सुटीच्या काळात बंदीतच ठेवते. हे ज्या जज्जने सुनावलंय तो जज्जही सिस्टीमचा भाग आहे. त्याच्याही स्वत:च्या मर्यादा आहेत. स्वत:ला डुलकी लागलेली असताना चार पोरांनी येउन भॉक्क करून घाबरवावं आणि दचकल्यामुळॆ जो हाती लागेल त्यालाच आपण थोबडावं यात जो न्याय आहे तेवढाच आणि तसाच न्याय खर्या कोर्ट सिस्टीम मध्ये आहे हेच हा सिनेमा दाखवतो.
सिनेमा का बघावा? तर सहज अभिनय, जे आहे ते तसंच बघण्यातला अनुभव घेण्यासाठी. कॅमेर्याला पल्लेदार भाषेची गरज कशी नसते त्याचा अनुभव घेण्यासाठी. छोट्या छोट्या तुकड्यातून न्याय-अन्यायाच्या मधे असलेली धारदार रेषा (धारदारपणाची जखम न करुन घेता) अनुभवण्यासाठी. क्रांती, वर्गलढा हे सगळं सिस्टीमने सामावून घेतल्याने, या जागृतीपेक्षा 'बघतोय रिक्षावाला’ सारख्या गाण्यावर नाच करण्या- बघण्यातली सुलभता मोठया स्तरावर कशी स्वीकारली गेलीय हे बघण्यासाठी. अनावश्यक गाणी, नाच, सहृदयता, निष्ठुरता यांचा समावेश नसलेली, निखळ-आहे तशी दाखवलेली- गोष्ट बघण्यासाठी. समंजस स्वीकार ही बदलाची सुरवात असते असं मानलं तर एका तरुण चमूनं न्यायव्यवस्थेवर केलेला हा सिनेमा बदलाची ही सुरुवात आहे अशी आशा पल्लवीत होण्यासाठी.
प्रतिक्रिया
27 Apr 2015 - 4:50 pm | पैसा
खूप सुरेख लिहिलंय. मध्यंतरी काहीदिवस प्रयोग केलेले सिनेमा बघायचे म्हणजे घाबरायची वेळ आली होती. हे परीक्षण वाचून हा सिनेमा बघावा असं वाटतंय.
27 Apr 2015 - 5:22 pm | एस
नेमकं विश्लेषण!
27 Apr 2015 - 5:29 pm | संदीप डांगे
अगदी असंच म्हणतो...
27 Apr 2015 - 6:47 pm | अंतरा आनंद
पैसा,स्वॅप्स,संदीप डांगे धन्यवाद.
28 Apr 2015 - 8:47 am | प्रचेतस
चित्रपट परिचय आवडला.
28 Apr 2015 - 11:00 am | सत्याचे प्रयोग
सिनेमा तर आवडलाच पण शेवटही लय भारी आहे
28 Apr 2015 - 2:48 pm | अंतरा आनंद
हो. मलाही आवडला शेवट. नाहीतर बरेचदा पूर्ण सिनेमावर बोळा फिरवण्याची ताकद शेवट बाळगून असतो.
24 Sep 2015 - 3:56 pm | अनुप ढेरे
भारताची ऑफिशिअल एंट्री म्हणून कोर्टची निवड झाली काल.
25 Sep 2015 - 12:52 pm | एस
'कोर्ट' च्या चमूचे अभिनंदन!
25 Sep 2015 - 12:04 pm | बोका-ए-आझम
चित्रपट पाहिलाय पण हे वाचायचं राहिलं होतं. पुढील अशाच नेमक्या परीक्षणाच्या प्रतीक्षेत.
25 Sep 2015 - 1:38 pm | पद्मावति
खूप छान परीक्षण केलंय. आवडलं.
25 Sep 2015 - 2:44 pm | सुनील
आता एकदा पाहयलाच हवा हा चित्रपट!
25 Sep 2015 - 7:08 pm | द-बाहुबली
हेच कारण आहे की मल ऑस्करवर भरवसा नाही... विदेशी चित्रपट विभागात अक्षरशः कशालाही एंट्री मिळुन जाते :(
लगेच कोर्ट वाइट आहे असे माझे म्हणने आहे हा गोड गैर समज करुन घेउ नये ही विनंती. विशेषतः सुडबाळ... तुमची आधिच क्षमा मागतो पण मी एखादा मराठी चित्रपट वाइट म्हटल्यावर आपण दोन तिन वेळा माझ्यावर जे आसुड ओढले त्यातील पांचटपणा बघुन मी आजही व्यथीत आहे.
27 Sep 2015 - 12:08 am | तर्राट जोकर
तुमचा नक्की आक्षेप कशावर...?
भारताने आपली प्रवेशिका पाठवली आहे ओस्करमधे. जगातल्या अनेक सोहळ्यात कोर्ट चमकून आला आहे. ओस्कर अजून एक, त्यात काय मोठं?
27 Sep 2015 - 12:49 am | प्यारे१
ऑस्कर वर भरोसा असण्यानसण्याचा संबंध समजला नाही. भारता'तर्फे' ऑस्कर'साठी' पाठवली गेलेली एन्ट्री या मध्ये ऑस्कर कमिटीनं आत्ता करण्यासारखं काही वाटत नाही. नंतर सुद्धा एकतर निवड होईल किंवा नाही होणार एवढंच. आक्षेप असलाच तर भारतातले जे लोक तशी एन्ट्री पाठवतात त्यांच्या विषयी असायला हवा ना???
27 Sep 2015 - 4:59 am | अत्रुप्त आत्मा
बरोब्बर लिहीलय अगदी .
पाहीलेला हाय ह्यो शिनुमा.
10 Oct 2015 - 12:38 pm | मधुरा देशपांडे
हे परीक्षण वाचले तेव्हा च हा सिनेमा बघायचे ठरवले होते. काल पाहिला आणि मनापासुन आवडला. अगदी नेमक्या शब्दात लेखात जे आले आहे त्याच कारणांसाठी आवडला.