पाठवण

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
20 Sep 2015 - 11:28 am

"आला कारं टँम्पू? सुभ्या गेलाय ना फाट्यावर?" जोरकस झुरका घेऊन हातातल्या शिगरेटची राख चुटकीसरशी झाडत रामभाऊने सदाला विचारले.
"चार वाजत आलेत भाऊ, आजुन पत्त्या न्हाय" सदा उगाच दाखवायची म्हणुन काळजी करत बोलला.
"मायला, नवरी काय कडुसं पडल्यावर पाठवायची का? पावण्यानबी लय ऊशीर लावला" रामभाऊ घरात शिरत शिरत मनाशीच बोलला.
घरात नव्या नवरीचा साजशृंगार चालला होता.
बहीणी, मावश्या, आत्या, माम्या सगळी नवरीच्या खोलीत शिदोरीच सामान बांधण्यात व्यस्त होत्या.
रामभाऊकडं कुणाचचं लक्ष नव्हतं.
"झाली का तयारी? आवरा बिगीबिगी, टँम्पू यिलचं येवढ्यातं" रामभाऊ कुणा एकाला न सांगता सगळ्यांनाच आदेश दिला.
"सगळं झालयं भाऊ, तेवढं नारळ, चार उदबत्त्या आणं खडीसाखर घीवुन याकी गावातनं" सरीताकाकूनं शिदोरीच गाठोडं बांधत बांधत रामभाऊला विनवणी केली.
" सुभ्याला सांगितलयं, आणल येता येता फाट्यावरनं, तुम्ही सगळं आवरुन बसा" उगाच ऊशीर नको म्हणुन भाऊंनी पुन्हा एकवार सगळ्यांना सुनावलं.
ह्या रामभाऊला पण ऊगाच नसत्या चौकश्या. म्हाताऱ्याला अशा मंगलप्रसंगी मधेमधे करायची जुनी खोड.
घराबाहेर नातेवाईक टोळ्याटोळ्याने गप्पा करत बसलेले. भाऊबंदकी पण अशा वेळी हातचं न राखता हातभार लावणारी.
नवेकोरो शर्ट नी पँट घालुन चिल्लीपिल्ली पण मंडपात हुंदडत होती.
रामभाऊनं जमेल तसं प्रत्येकाच्या जवळ जावुन विचारपुस केली. "वस्तीत येऊन पण रामभाऊ बोलला नाही" अशी पाठीमागे कुणाला तक्रार करायला त्याने जागा ठेवली नाही.

दुपारपासून उगाच घुटमळत गप्पा करत नातेवाईकही आता कंटाळले होते. कधी एकदा टँम्पो येतोय, आण कधी नव्या पाहुण्याच्या घरी जातोय याची वाट पहात ते डांबरीकडं डोळे लावुन बसले होते.

मध्येच एखादा भावकीतला शेजारी घरगुती कामं करायचा. पाटी आणि बादली घेऊन गुरांच्या धारा काढायला बसायचा.
"किती दितीय रं दुध आता, दर हाय का डिरीला?" एखादा ऊत्साही पाहुणा त्याची विचारपुस करायचा.
"आटत चाललीय, दर बराच म्हणायचा" धारा काढत काढत तोही ऊत्तरं द्यायचा.
एखादा अवखळ पाहुणा लहानग्यांची खोडी काढायचा.
" मोठी झालीय की ही, हीच पण ऊरकु लवकर" म्हणत त्यांना चिडवायचा.

अशा खेळीमेळीच्या वातावरणात टँम्पोने उगाच हुरहुर लावलेली.
एव्हाना अंधारायला आलं, दुरुनच टँम्पोचा आवाज आला. सगळेच लगबगीने ऊठले.
"येवु द्या म्हागं"' "जाव द्या फुढं" म्हणतं टँम्पो लावायला जागा करुन दिली.
"लय ऊशीर लागला?, मनलं फाट्यावरनं रस्ता घावतुय का न्हाय, सुभ्या हुताच म्हणा" नवरीला न्यायला आलेल्या कुरवल्याची रामभाऊनं विचारपुसं झाली.
"निघायलाय ऊशीर झाला, सुभासराव दिसले फाट्यावर, निघू आता आल्या पावली लगीलगी" नवा कुरवला अदबीने उतरला.
रामभाऊनं त्याला मानपान दिलं. रामा, आण्णा, बाळू, तुका नव्या पाहुण्याला घेऊन सतरंजीवर बसले. ओळखी पाळखी करुन दिल्या.
लग्नाच्या तयारीबद्दल विचारले. शेतीवाडी, पाऊसपाणी, गुरढोरं, याकडं गप्पा नेऊन पाहुणा नक्की किती पाण्यात आहे याचा अंदाज घेतला.

टँम्पोत शिदोरी, रुखवत, आदी सामान भरायला सुरूवात झाली.
चिल्ल्यापिल्ल्यांनी आपापल्या जागा बळकावल्या.
नव्या नवरीला घेऊन पाठीराख्या टँम्पोत चढल्या. बायाबापड्यांनी टँम्पो गच्च भरला.
देवाच नाव घेत रामभाऊनं टँम्पोम्होरं नारळ फोडला.
पुढच्या शिटावर कुरवल्यासंग तुका आणि बाळु बसले.
रामा, आण्णानं चार लोकांना घेऊन टँम्पो मागुन ढकलला. धुर काढत टँम्पो चालू झाला. सरळ आल्या मार्गी निघुन गेला.
खाली राहीलेले ईतरजण फटफट्या घेऊन टँम्पोच्या मागे मागे गेले.

रामभाऊनं भोवताली नजर फिरवली. घरादारावरं लक्ष असावं म्हणुन तो एकटाच मागे थांबला होता. गेली कितीतरी वेळ सुरु असलेली ऊत्साही किलकिल अचानक बंद होती.
अंगाखांद्यावर खेळवलेली नात आता परक्या घरी जाणार या विचाराने त्याला भरुन आले.
सकाळपासुन त्याच्या डोळ्यात दडलेले टिपुस शेवटी बाहेर आलेच.
पडवीत तो कितीतरी वेळ सुन्न बसुन राहीला.

संस्कृतीकथाभाषासमाजसद्भावनालेखप्रतिभा

प्रतिक्रिया

एस's picture

20 Sep 2015 - 12:08 pm | एस

छान लिहिलंय!

एक एकटा एकटाच's picture

20 Sep 2015 - 12:36 pm | एक एकटा एकटाच

सुरेख

तुमच्या लिखानाचं वैशिष्ट म्हणजे तुम्ही प्रसंगातल्या भावनेला पुरेपुर न्याय देता.

लिहीत रहा

बाबा योगिराज's picture

20 Sep 2015 - 2:22 pm | बाबा योगिराज

लै झ्याकं लिवता बॉ तुमी.आमाला आवल्ड...

बाबा योगिराज's picture

20 Sep 2015 - 2:22 pm | बाबा योगिराज

लै झ्याकं लिवता बॉ तुमी.आमाला आवल्ड...