या आधीचे संबंधित लेखन
- अन्नदाता सुखी भव भाग १ - PL 480
- अन्नदाता सुखी भव भाग २ - डॉ नॉर्मन बोरलॉग, डॉ स्वामिनाथन आणि इतर चेले
मी जर म्हटलं "मला काल पडलेल्या स्वप्नांत एक कोणी महापुरुष "मेरे प्यारे भाईयो और बहेनो" असे म्हणत म्हणत त्याच्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक भारतीयाच्या खिशात रु. ५०० सारतो आहे" तर ऐकणारे जे काय बोलतील त्यांत "भांग, धत्तुरा/धोत्रा, ठाण्याहून पळालेला दिसतो आहे, मते मिळवायला कै पण करतात" असे (वेचक) शब्द पेरलेले असतील! पण …… मेरे प्यारे भाईयो और बहेनो, हे दिवास्वप्न नाही, हे खरोखरच होणे शक्य आहे. कसे ते आता पहा.
भारतातले अन्नधान्याचे उत्पादन वाढत वाढत जसे वार्षिक २० कोटी टनापलीकडे पोचले आहे. तसेच या पिकवलेल्या धान्यातले वाया जाणारे धान्य ही वाढत वाढत अंदाजे वार्षिक १.५ कोटी ते २ कोटी टन या पातळीवर पोचले आहे. या वाया जाणाऱ्या धान्याची किंमत सुमारे रुपये ५०,००० ते ६०,००० कोटी होईल. म्हणजे करा हिशोब - हे वाया जाणारे धान्य जर वाचवता आले तर त्यातून सगळ्या भारतातल्या लोकांना सरासरी प्रत्येकी रु. ५०० नाहीका देता येणार ?
अर्थात हे सगळे केव्हां शक्य असेल? जर हे वाया जाणारे धान्य वाचवता आले तरच! आणि हाच तर मोठा जरतारी मामला आहे! सरकारी खात्यांत या वाया जाणाऱ्या अन्नधान्याची कोणीच फारशी काळजी करत नसल्याने "हा प्रश्न केंद्राने सोडवण्याचा आहे का राज्य सरकारने" किंवा "काही तरी नक्की केले पाहिजे,पण काय बरे/कुणी बरे केले पाहिजे" हा लोकशाहीतला सगळ्यांचाच आवडता खेळ खेळण्यात वाढत्या धान्य उत्पादनातले वाढते धान्य दर वर्षी फुकट जातच आहे.
माझ्या लहानपणापासून वेळोवेळी ऐकलेला आणि (सगळ्यांनाच) आचरणात आणतांना पाहिलेला एक वाक्प्रचार होता "waste not, want not" किंवा जर एखादी गोष्ट जर वाया जाणे टाळले तर त्यातूनच तुमची गरज भागू शकेल आणि अर्थातच कमी खर्चात! आता सायबाची भाषा आणि म्हणून सायबाचे ज्ञान मिळवण्याकरता इंग्रजी शिकणे हा प्रकारच नसल्यामुळॆ अशा लहानसहान गोष्टी (विशेषतः ज्या लक्षात ठेऊन योग्य तऱ्हेने वापरण्याकरता परीक्षेत फारच फार एखादा गुण मिळेल) कोण लक्षांत घेतो आणि ठेवतो? शिवाय आता आपण सगळेच जण फक्त मिंग्लिश बोलण्याचा अट्टाहास धरतो आणि मराठी तर फक्त दूरचित्रवाणीवाले दाखवतील तेव्हढीच आणि तशीच वापरायची असते.
सायबाच्या (म्हणजे सगळ्याच पाश्चिमात्य देशांच्या) जेव्हां हे लक्षात आले की पोत्यात धान्य भरणे, धान्य भरलेली पोती वाहून नेणे आणि नंतर पोत्यातील धान्य बाहेर काढून इच्छित ठिकाणी साठवणे या सगळ्याच प्रकारात बरेच मनुष्यबळ वापरावे लागते आणि त्यामुळे अशा तऱ्हेची वाहतूक आणि साठवणूक खर्चिक तर ठरतेच पण अशा अनेक पायऱ्यावरून धान्य हलवताना सांडासांड, पोती फाटणे/भिजणे आणि म्हणून धान्य खराब होणे असा अतिरिक्त ऱ्हास आणि खर्च ही सोसावा लागतो. त्या खेरीज मागची पन्नास एक वर्षे सोडल्यास (म्हणजे अनैसर्गिक धागे आणि त्यांचे कापड मिळू लागण्याआधी) पोती वापरणे याचा पाश्चिमात्यांच्या दृष्टीने अर्थ एकच होता: आशिया खंडातून ताग/गोणपाट/पोती मिळवणे आणि त्यांचा सांभाळ करणे. ही तागाची पोती कुठल्याही कारणाने भिजली की आतील धान्याचे रक्षण करण्यास कुचकामी ठरत. त्यामुळे नदीतून किंवा समुद्रातून धान्याची वाहतूक करतांना तसेच पावसाळ्यात आणि बर्फात पोत्यांची खास काळजी घ्यावी लागे. त्यामुळे विकसित देशांतून साधारण १०० - १२५ वर्षांपूर्वीपासून silo वापरांत येऊन "धान्य भरलेली पोती" हा प्रकार हळू हळू अदृश्य होत गेला. फक्त किरकोळ विक्रीकरता असणारे धान्य वेगवेगळ्या आकाराच्या पुड्यातून (package) मिळू लागले आणि इतरत्र सामान्यतः घाऊक प्रमाणात वापरले जाणारे धान्य वेगवेगळ्या तऱ्हेच्या silo मध्ये (लोखंडी, बांधलेले, स्थिर, चाकांवरचे, छोटे, मोठे अशा अनेक प्रकारचे कोठार) वाहून नेले वा साठवले जाऊ लागले.
मला "silo" या शब्दाकरता मराठी प्रतिशब्द देखील सहज न सापडल्याने जेव्हां मी थोडी शोधाशोध केली तेव्हां हे समजले की पूर्ण भारत देशात येवढ्या देखील silo नाहीत की जितक्या एखाद्या पाश्चिमात्य देशातल्या धान्य पिकवणाऱ्या भागातल्या खेड्यातही दिसतॆल. आपल्या परंपरा जपणाऱ्या देशात धान्य साठवण आणि वाहतूक अजूनही ९५ % पेक्षा जास्ती प्रमाणांत पोती वापरूनच होते. कदाचित silo करता मराठी प्रतिशब्द नसण्याचे कारण silo चा भारतांत वापरच नसणे हेच असेल!
Silo मध्ये उभ्या नळकांड्यांच्या आकाराच्या पूर्णतः बंद जागेत धान्य साठवले जाते. ही बंदिस्त जागा लोखंडी नळकांडे किंवा सिमेंट/विटा अथवा RCC वापरून केलेली इमारत असते. जरूरी प्रमाणे अशी अनेक वेगवेगळ्या आकाराची/तऱ्हेची नळकांडी एकाच ठिकाणी एकत्र उभी करून धान्य पिकवणाऱ्या प्रदेशांत किंवा वाहतूक केंद्रांत/बंदरांत किंवा विक्रीच्या ठिकाणी धान्याची साठवण केली जाते. silo मध्यॆ धान्य आत टाकण्याकरता किंवा बाहेर काढण्याकरता conveyor/elevator यांचा वापर केला जातो. conveyor/elevator वेगवेगळ्या आकारात, प्रकारात, एका ठिकाणी स्थिर किंवा ओढून नेऊन वेगवेगळ्या जागी वापरण्यासारखे असू शकतात. धान्य आत शिरताना किंवा बाहेर पडताना पूर्णपणे बंदिस्त मार्गाने जात असल्याने आणि अशा बंदिस्त मार्गाखेरीज धान्यसाठ्याच्या जागेत शिरकाव नसल्याने उंदीर/घुशीना किंवा आर्द्रता/बुरशी याना साठवणाच्या जागेत सहज प्रवेशमिळत नाही आणि धान्याची खराबी होणे टळते/कमी होते. अशा एकत्रित Silo मध्ये शेकडो किंवा हजारो टन धान्य सुरक्षित साठवून ठेवता येते. अर्थात इतर कुठल्याही उद्योगां प्रमाणे इथे देखील दुर्लक्ष, गलथान व्यवस्थापन किंवा चोरी लबाडी यांतून होणारी "गळती" असतेच.
कालौघांत थोडेसे मागे - ५०-६० वर्षांपुर्वी - की जे मी पहिले आहे - किंवा त्याही पूर्वी धान्य कसे साठवले जाई याबद्दल.
काही हजार वर्षांपुर्वी जेव्हां सागरी सफरी महिनोमहिने चालत तेव्हां खलाशांच्या खाण्याकरता जहाजावर साठवण्याचे धान्य किंवा पीठ भाजलेल्या मातीच्या मडक्यांत/रांजणात त्यांची तोंडे माती लिंपून बंद करून साठवले जाई. अर्थातच अशा प्रत्येक मडक्यात/रांजणात कांही किलोपेक्षा जास्त धान्य मावत नसे (कारण फार मोठी मडकी/ रांजणे उचलणे आणि हलवणे कठीण होत असे) आणि एखाद्या महिनोमहिने चालणाऱ्या सफरीकरता अशी बरीच मडकी/रांजणे बरोबर न्यावी लागत.
अशा साठवणाकरता धान्य व्यवस्थित निवडून, उन्हांत वाळवून भरल्याने बराच काळ खराब न होता राहण्याची अपेक्षा असे. हीच पद्धत साधारणतः घरगुती साठवणाकरता वापरली जात असे. त्या बद्दल पुढे येईलच, पण इथे थोडा रुचिपालट म्हणून - अशाच एका सफरीत आत (गोडे) पाणी शिरलेल्या काही भाजलेल्या मातीच्या मडक्यांतले/रांजणातले धान्य किंवा पीठ अनिवार्य म्हणून खाल्ले असताना कुणाच्या तरी लक्षांत आले की चव आम्बूसलेली असली तरी ते धान्य "खराब" झालेले नाही आणि जगात प्रथम "बीअर"चा शोध लागला.
५०-६० वर्षांपुर्वी - की जे मी पाहिले आहे - ज्यांच्या घरची शेती असे त्यांच्याकडे जास्त प्रमाणांत घरी धान्य साठवण्याकरता सोय असे. शक्यतो दगडी जमिनीवर (उंदीर किंवा घुशीना कुरतडता येऊ नये म्हणून) बांबूच्या तट्ट्या वापरून उभ्या केलेल्या उंच नळकांड्यांच्या आकाराच्या "खोल्यांत" धान्य ठेवलेले अनेक घरी पाहिले आहे. या तट्ट्या शेणाने किंवा मातीने लिंपून उन्हांत वाळवलेल्या असत. तसेच लाकडी फळ्यांवर रचलेली पोतीही पाहिल्याचे आठवते. "पेव", "बळद" असे "साठवणाचे धान्य ठेवण्याच्या जागे" करताचे शब्द ऐकलेले असले तरी अशी माहिती फक्त ऐकीवच असल्याने त्याबद्दल जास्त लिहिणे कठीण. एखाद्या गोष्टीचे "पेव फुटणे", म्हणजे ती अमर्याद तयार होणे अशा वाक्प्रचारावरून "पेवातले धान्य" पेव फोडून काढले जात असावे असे वाटते. बांबूच्या तट्ट्या वापरून उभ्या केलेल्या उंच नळकांड्यांच्या आकाराच्या "खोल्यांना" नक्की काय म्हणत - "कणग्या" (एकवचन "कणगी") का "बोऱ्या" (एकवचन "बोरी") - हे नीटसे आठवत नाही.
भारतातल्या एकुण धान्य उत्पादनातले ६०-७० % धान्य शेतकरी प्रथम वेळोवेळी साठवतात किंवा विकण्याकरता त्याची वाहतूक करतात. प्रत्येक शेतकरी आपल्या शेतापुरतेच व्यवहार करत असल्याने या "किरकोळ"/शेतकरी वर्गाकडील या भागात जर साठवण्या/वाहून नेण्याकरता पोती वापरणे अनिवार्य असे मानले तर घाऊक साठवण/वाहतूक कशी होते हे पहावे लागेल.
.
अन्नधान्याची घाऊक साठवण/वाहतूक करणे हे काम आपल्या "सर्कारी" धोरणांत काही काळ फक्त "Food Corporation of India" ची जबाबदारी मानली जाई. सरकारी आदेशांनुसार निर्धारित दरांत खरेदी केलेले धान्य साठवणे, वाहून नेणे, किंवा वाजवी दरांत वितरण करण्याकरता (किंवा निर्यातीकरता) उपलब्ध करण्याकरता "Food Corporation of India" पूर्ण भारतभरात वेगवेगळ्या आकाराची कोठारे स्वतः च्या मालकीची किंवा भाड्याने घेऊन त्यांत धान्याचा साठा करत असे. नंतर याच कामाकरता हळू हळू राज्यस्तरीय "खाद्य उद्योग" (किंवा तत्सम) मंडळे देखील सामील केली गेलॆ. हे सगळे "उद्योग" मिळून सध्या सुमारे ५ कोटी टन धान्य कोठारांत साठवून ठेऊ शकतात. त्याखेरील "Covered Area Plinth" ("CAP") पध्दतीने आणखी २ कोटी टन धान्य साठवले जाते. या सगळ्या प्रकारांत सुमारे ९५% धान्याची साठवणूक/वाहतूक पोती वापरूनच होते. CAP पध्दतीत विटा/माती/सिमेंट च्या ठराविक प्रकारे बांधलेल्या चौथऱ्यावर धान्याच्या पोत्यांची थप्पी रचून त्यावर संरक्षक आवरण (ताडपत्री/ठराविक जाडीचे प्लास्टिक) अंथरले जाते. हे आवरण उडून/फाटून जाऊ नये म्हणून काही ठराविक प्रकारे काळजी घेतली जाते. पण ही सर्व साठवण तशी उघड्यावरच असते. साधारण असाच प्रकार इंग्रजांच्या काळापासून चालत आला असल्याने "सर्कारमान्य" समजला जातो. अशा कोठारात/धान्य साठयांत कीड, बुरशी लागू नये किंवा उंदीर/घुशी/पक्षी यांचा उपसर्ग होऊ नये यासाठी वेळोवेळी काळजी घेणे हे सर्कारी खाक्याने होत असल्यांने नेहमीच यथायोग्य होत असण्याची खात्री नसते.
धान्याची खराबी जशी पुरेशी काळजी न घेतल्याने होते तसेच इतर अनेक गोष्टीही धान्यखराबीला कारणीभूत होऊ शकतात. जिथे मानवी हातांत काम असते तेव्हां अनेक human factors मुळे नुकसान होते, जसे पावसाची शक्यता असताना धान्याचे साठे व्यवस्थित न झाकणे, कोठारातील गळत्या, ओल यांचा वेळेवर बंदोबस्त न करणे इथपासून ते ऐन सुगीच्या वेळी कामगारांनी संप करून धान्य वाहतुकीचा खेळखंडोबा करणे अशा अनेक कारणांनी "सर्कारी" धान्य खराब होऊन कुणाच्यातरी पोट भरण्याच्या कामी न लागता कचरा म्हणून फेकून दिले जाते, काही वेळा मंत्री/अधिकारी यांनी राजकीय दृष्टिकोनांतून सुगीनंतर धान्य बाजारांत येऊ लागल्यावर हमी योजना, वितरण व्यवस्था, गरीबांना कमी किमतीतला पुरवठा अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाचा भाग म्हणून साठवणाची पुरेशी क्षमता आहे किंवा नाही याची पुरेशी खात्री करून न घेता धान्य खरेदीचा रेटा लावला तर अशा घिसाडघाईने विकत घेतलेले, मिळवलेले आणि साठवलेले धान्य अवेळी पाऊस, उघड्यावर साठवणूक (सरकार दरबारी फक्त "तात्पुरती" असलेली पण स्थायी स्वरूपाच्या व्यवस्थेअभावी नेहेमीचीच झालेली ), नित्कृष्ट दर्जाची पोती/ताडपत्र्या यांचा वापर अशा अनेक कारणांमुळे मोठ्या प्रमाणांत खराब होऊन वाया जाते. असाच सर्कारी कारभार Railways चाही असल्याने धान्य वाहतुकीतदेखील ढिलाई, निष्काळजीपणा, बेजबाबदारपणा इ इ चा प्रादुर्भाव होण्यानेही धान्य वाया जाते.
आणखी एक बाजू - वीज निर्मिती, कोळसा उत्पादन/वाहतूक यात थोडी गळती ही होतेच मग ती थोडी आणखीनच झाली तर कुणाच्या लक्षांत येणार अशी ज्यांची (योग्य पाठींब्यामुळे) धारणा असते, ते वाहत्या गंगेत हात मारून हातांत काय मिळेल याचा अंदाज घेत रहातात. त्याचप्रमाणे सगळेच "खराब" म्हणून ठरवलेले धान्य प्रत्यक्ष खराब असेलच असे खात्रीपूर्वक सांगता येणार नाही.
अशा सगळ्या जाळ्यात सापडलेली भारतीय अन्नधान्य व्यवस्था बदलण्याची चिन्हे आता दिसत आहेत. धान्याची साठवण आणि वाहतूक यांची जबाबदारी फक्त "Food Corporation of India" ची न राहता या जबाबदारीत आता हळू हळू इतरांनाही - विशेषतः खाजगी उद्योगांना - सामील करून घेतले जात आहे. त्यामुळे जास्त जबाबदारीने आणि काळजीपूर्वक काम झाल्याने (कारण या खाजगी उद्योगांचे उद्दिष्ट नासधूस शक्य तेव्हढी कमी करून त्यातून उत्पन्न/नफा वाढवणे हे असेल) धान्य वाया जाणे कमी व्हावे ही अपेक्षा ठेवता येईल.
नवीन साठवणुकीकरता फक्त silo च नव्हे तर इतर कांही नवीन साधने वापरली जाण्याची शक्यता आहे. उदा. सध्या अर्जेण्टिनामध्ये वापरात असलेला silo bag हा प्रकार भारतात वापरण्याकरता प्रायोजित अवस्थेत आहे. silo bag ही एक प्लास्टिकची एका बाजूनी बंद आणि दुसऱ्या बाजूने यांत्रिक पद्धतीने धान्य भरण्याची सोय असलेली अजस्र नळी -सुमारे २०० फूट लांबी आणि १० फूट व्यास, प्रत्येक नळीत सुमारे २०० टन धान्य मावू शकेल अशी - असते. पायमोजा गुंडाळी करून जमिनीवर ठेवला आणि त्यात पाय घातला तर तो पायमोजा जसा उलगडत जातो तशी ही गुंडाळून जमिनीवर अंथरलेली silo bag उघड्या बाजूकडून त्यात यांत्रिक पध्दतीने जसे धान्य भरले जाते तशी उलगडत जाते. अशा नळ्या एकाशेजारी एक अशा रिकाम्या जमिनीवर पसरून, त्यांत धान्य भरून, एकेका ठिकाणी हजारो टन धान्य साठवता येते. धान्य काढताना या उलट प्रक्रिया होते. या नळीला पडलेले एखादे भोक फाटलेल्या रबरी धावेसारखे "चिकटपट्टी " मारून दुरुस्त होऊ शकते. या साठवणाच्या पध्दतीकरता बरीच जमीन लागत असली तरी (कारण या नळ्या जमिनीवरच "झोपवाव्या" लागतात) एरवी कुठल्याच उपयोगात न आणलेल्या पडीक जमिनीचा असा सुरक्षित पध्दतीने धान्य साठवण्याकरता उपयोग करणे हे इष्टच ठरावे. पुन्हा असे धान्याचे गुदाम गोगलगायीच्या पाठीवरच्या घराप्रमाणे इकडे तिकडे जरूरीनुसार हलवणे ही शक्य असेल.
आणखीही काही अगदीच मूलभूत सुधारणा होत आहेत - जसे पोती उचलण्या/हलवण्या करता लोखंडी आकडे न वापरणे (पोती फाटून धान्य गळू नये म्हणून), योग्य माहितीशास्त्राच्या आधारे प्रत्येक पोत्याचा मागोवा ठेवणे (म्हणजे त्यातील धान्य योग्य मुदतीत वापरले किंवा किमान तपासले जाऊ शकेल), धान्य वाळवण्याच्या पद्धतीतील सुधारणा आणि या सगळ्यामुळे देखील एरवी वाया जात असलेले धान्य वाचवता येईल,
श्रावण महिन्यांत वाचल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या व्रतांच्या कहाण्यात एक नेहमी येणारे वाक्य असते : उतू नये, मातू नये, घेतला वसा टाकू नये. पुढे अशीही ताकीद दिलेली असते ; असे केल्यास घेतलेले आणि सफल झालेले व्रत सुद्धा असफल होऊ शकते.असेच काहीसे नॉर्मन देवाचा घेतलेला वसा सफल झाल्यानंतर होऊ लागलेले आहे कां? इतके धान्य वर्षानुवर्षे फुकट जाऊ देणे हे एकेकाळचे वसा घेणारे आता उतले आणि मातले आहेत याचेच प्रमाण नाही कां ?
या सगळ्या सुधारलेल्या तांत्रिक पद्धती उपयोगांत आणतांना इतर क्षेत्रांसारखे घाऊक "घोटाळे" मात्र होऊ न देण्याची खबरदारी घेतली गेली पाहिजे म्हणजे आधी म्हटल्याप्रमाणे सर्व "प्यारे भाई आणि बहेन" यांना भेट देणे किंवा किमानपक्षी वाजवी खर्चांत भरपेट ठेवणे शक्य होईल.
जाता जाता - लंगर, अन्नछत्र, भंडारा इ.इ. नांवांनी फक्त आपापल्या गरीब धर्मबांधवांच्या पोटाची काळजी सध्या ही घेतली जाते. "जर हे वाया जाणारे धान्य वाचवता आले तर" देशातल्या अर्थव्यवस्थेवर जास्तीचा बोजा न येता सुमारे १/३ गरीब लोकांना ते कुठल्याहे धर्माचे असले तरी आरामात वर्षभर भरपेट जेवण देता येईल किंवा कुपोषित मुलांना (भारतांत सर्व जगातली कुपोषित मुलांपैकी १/४ कुपोषित मुले आहेत) जास्त चांगला आहार देऊन पुढील पिढी जास्त बळकट करता येईल.
आणखी जाता जाता - पुण्यातल्या एका नावाजलेल्या उपहारगृहातल्या थाळीची किंमत असते रु. २५०/- पण जर ताटात काही टाकले नसेल तर रु. ३०/- ची सूट मिळते. मला काही हे पहाता आलेले नाही की कुठल्या तऱ्हेचे लोक जास्त आहेत - मी पैसे देऊन विकत घेतलेल्या अन्नातले थोडे टाकले तर काय झाले, मला परवडते माझ्या खिशातले (फक्त) रु. ३०/- (च) फुकट गेले असे म्हणणारे (ज्यांना वाया जाणाऱ्या अन्नाची किंमत नाही) की ताटात अन्न वाया न घालवल्याने ताटाकरता फक्त रु. २२०/- मोजणारे (मग ते रु. ३०/- वाचवण्याकरता की अन्न वाया जाऊ नये या करता याचाही शोध घेणे आले)!
जिज्ञासूनी जास्त माहितीकरता पहावे
http://www.fao.org/wairdocs/x5002e/x5002e02.htm
http://www.ipsnews.net/2013/06/indias-food-security-rots-in-storage/
jpht.info/index.php/jpht/article/download/17550/9159
http://www.academia.edu/8989434/STATUS_PAPER_Grain_storage_in_India
http://www.mapsofindia.com/my-india/society/lost-in-transit-where-has-al...
http://www.ers.usda.gov/amber-waves/2014-januaryfebruary/india-continues...
http://www.reuters.com/article/2014/07/23/us-usa-grains-storage-idUSKBN0...
http://www.davidmckee.org/2013/06/15/grain-storage-trends-in-india/
http://thediplomat.com/2012/04/indias-food-security-problem/
http://www.mssrf.org/sites/default/files/report%20on%20the%20state%20of%...
http://www.thehindu.com/news/cities/Visakhapatnam/india-still-far-from-f...
http://www.quora.com/What-are-the-steps-taken-by-Food-Corporation-of-Ind...
http://jpht.info/index.php/jpht/article/view/17550
(क्रमशः)
प्रतिक्रिया
15 Sep 2015 - 8:32 am | एस
वा! ही 'सिलो' ची माहिती नवीनच आहे माझ्यासाठी. फार उपयुक्त आणि माहितीपूर्ण लेखमाला.
15 Sep 2015 - 8:35 am | बहुगुणी
वाचनीय लेखमालेचा हाही भाग माहितीपूर्ण.
15 Sep 2015 - 10:19 am | जेपी
बळद' हा शब्द तळघरात धान्य साठवण्याच्या जागेसाठी वापरत.
हि भिंतीमध्ये दगडाने बांधलेली गोलाकार जमिनीला संमातर असायची.
यात साधारण 1 ते 5 क्विंटल धान्य साठवायचे.
कालघौत बंद पडली.
15 Sep 2015 - 11:05 am | अभ्या..
सुरेख माहितीपूर्ण लेख.
सीलो अन सीलोबॅग्ज बद्दल थोडेसे एकले होते. चांगली माहीतीय ही. गाड्या पार्कींगला ऑटोमेटीक मल्टीस्टोरे पार्कींग्ज बनतात इथे. धान्य साठवणुकीला अशीच काहीतरी उपाययोजना का होत नाही. किंबहुना अगदी मुंग्याच्या वारुळाचा आदर्श ठेवला तरी एखादी फर्मास आयडीय निघू शकते. पेव वगैरे तसेच लिंपले जायचे म्हणा. सुरक्षित धान्य कोठारे हा खरोखरीच कुठल्याही राष्ट्राचा महत्वाचा मुद्दा आहे.
धन्यवाद सुरेख लेखाबद्दल
15 Sep 2015 - 11:16 am | pradnya deshpande
हिंगोली या जिल्ह्यात माझ्या आत्याची गढी होती. या गढी मध्ये किमान १० ते १५ क्विंटल धान्य साठवता येईल असे बळद भिंतीत तयार करण्यात आले होते. दिवाळीच्या सुट्टीत रब्बी चे धान्य आले की या बळदांची सफाई होत असे. काम करणारा गडी आधी त्यात दिवा सोडून बघे. बळदात ओक्सिजन आहे कि नाही हे लक्षात आल्यावर तो त्यात उतरत असे.
15 Sep 2015 - 8:44 pm | बहुगुणी
काम करणारा गडी आधी त्यात दिवा सोडून बघे. बळदात ओक्सिजन आहे कि नाही हे लक्षात आल्यावर तो त्यात उतरत असे.
इंटरेस्टिंग माहिती, धन्यवाद!15 Sep 2015 - 9:36 pm | असंका
आणि नसेल तर?
15 Sep 2015 - 10:06 pm | शेखरमोघे
जर पुरेसा प्राणवायू नसेल तर उतरणे धोक्याचे असले तरी एखाद्या बन्द तळघरासारख्या जागी हवा खेळवून पुन्हा प्राणवायू कसा आणवणार? त्याकरता तरी काही खिडक्या, दारे ठेवली असावीत आणि ती उघडून पुन्हा पुरेशी हवा बळदात आणली जात असावी.
15 Sep 2015 - 2:35 pm | मदनबाण
महत्वपूर्ण माहिती...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dekhoon Tujhe To Pyaar Aaye... ;) :- Apne
15 Sep 2015 - 3:23 pm | सस्नेह
छान माहितीपूर्ण धागा.
15 Sep 2015 - 6:49 pm | रेवती
माहिती आवडली.
15 Sep 2015 - 7:13 pm | मी-सौरभ
आवडेश
15 Sep 2015 - 8:26 pm | डॉ सुहास म्हात्रे
महत्वपूर्ण माहितीची सुंदर मालिका.
धान्य साठविण्यासाठी बांबूच्या तट्ट्या वापरून उभ्या केलेल्या उंच नळकांड्यांना कणगा / कणगी (एकवचन) म्हणतात.
अन्नधान्य साठवण्यासाठी योग्य व्यवस्था न करता ते उघड्या आकाशाखाली साठवले जाते आणि त्याची नासधूस थांबविण्यासाठी काही ठोस उपाययोजना न करण्यामागे उत्तम व्यवस्थापन केलेले गैरव्यवस्थापन (वेल मॅनेज्ड मिसमॅनेजमेंट) आहे असे ऐकून आहे. कारण अन्नधान्य कुजले / उंदरांनी खाल्ले असे सर्टीफिकेट दिले की तेवढ्या धान्याचा हिशेब दाखवावा लागत नाही ! :(
15 Sep 2015 - 10:28 pm | शेखरमोघे
काही काळापूर्वी एकदम बर्याच मान्यवराना वाटू लागले होते की जशी मळी पासून दारू बनवली जाते तशीच (जास्तीच्या) धान्यातून दारू बनवावी. वरकरणी त्यावेळी धान्य साठे ओसन्डून वहात होते आणि अतिरिक्त धान्याचे काय करावे हा मोठाच प्रश्न झाला होता. जर अशी दारू बनवण्याची लाट थाम्बली नसती तर सडून वाया जाणारे धान्य "देवाजीच्या कृपेने" वाढत जाऊन मान्यवरान्ची सोय झाली असती.
15 Sep 2015 - 9:24 pm | Sanjay Uwach
आपला लेख फारच आवडला, आता धान्य साठवण्या साठी
कोरीयन रूफींग म्हणजे गोडाऊन
कितीही मोठे असले तरी स्टीलचे स्ट्रक्चर लागत नाही व अल्प काळात मजबूत वाॅटर प्रुफ रूफींग तयार होते,धान्य साठविण्या साठी मुख्य समस्या आपल्या कडे आहे ती स्पाॅनट्यानीअस हीटींग म्हणजे पावसाळ्यात ढग आले की स्टॅक मधील मध्य भागात उष्णता वाढते व धान्य करपते किंवा कधी कधी पेटही घेते, सॅलोला पर्यायी शब्द आहे बीन .जुट बारदान व 50 किलो वरील पोत्यांना सरकारने बंदी घातली आहे. भविष्यात एअर हाॅगरस,म्हणजे काॅम्परेस हवेने धान्य ओढून घेणे हे टेक्निक वाहतुकी साठी वापरले जाईल . या विकासाची सर्व जबाबदारी नॅशनल डेरी डेव्हलपमेट NDDB यांच्यावर टाकण्यात आली आहे.
15 Sep 2015 - 11:31 pm | शेखरमोघे
सॅलोला पर्यायी शब्द आहे बीन
हा पर्यायी शब्द देखील इन्ग्रजीतलाच (BIN) आहे.
स्पाॅनट्यानीअस हीटींग म्हणजे पावसाळ्यात ढग आले की स्टॅक मधील मध्य भागात उष्णता वाढते व धान्य करपते किंवा कधी कधी पेटही घेते.
असाच प्रकार कोळशाच्या ढिगाबाबत किन्वा रचलेल्या लाकूडफाट्याबद्दलही होऊ शकतो. त्या करता ढिगाला अधून मधून वर खाली करत रहाणे किन्वा ढिगात अधेमधे खुपसलेले Temperature sensors वापरून उष्णता अवाजवी वाढत नाही ना याचा मागोवा ठेवणे जरूर असते.
15 Sep 2015 - 11:33 pm | शेखरमोघे
कोरियन रूफिन्ग बद्दल काही माहिती मिळेल का?
15 Sep 2015 - 10:00 pm | शेखरमोघे
या गढी मध्ये किमान १० ते १५ क्विंटल धान्य साठवता येईल असे बळद भिंतीत तयार करण्यात आले होते. म्हणजे जाड भिन्ती असलेली पण खिडक्या नसलेली खोली का ? १० ते १५ क्विन्टल म्हणजे साधारण २०-३० पोती, म्हणजे हा काही फार मोठा आकार नसावा. चु. भू. द्या. घ्या.
गडी बळदात उतरण्यावरून . . . मी श्रीनाथजीच्या देवस्थानात तूप, साखर, वेगवेगळी धान्ये यान्च्या विहिरी बघितल्याचे आठवते. अशा विहीरीत भक्तगण देवाला अर्पण करण्याच्या वस्तू ओतत असावा आणि अशा त्या विहिरीत सतत पडत असलेल्या वस्तून्चा प्रसाद बनवण्याकरता सारखा उपसा होत असल्याने तळातल्या वस्तू बिन वापरता राहिल्याने खराब होऊन गेल्या असे होत नसावे. तिथल्या प्रचन्ड गर्दीत असे काही विचारायला, शोधायला जमलेच नाही. पण अशा विहिरी वेळो वेळी कशा साफ होत असतील? त्यावेळी जसे "देव झोपल्याने आता भेटणार नाहीत" असे होते तसेच "साठवणाच्या विहिरी साफ केल्या जात असल्याने भाविकाना देवाला अर्पण करावयाच्या धान्य, इ. इ. वस्तू सध्या स्वीकारल्या जाणार नाहीत" असे जर देवस्थानाने ठरवले तर काय गहजब होईल!
16 Sep 2015 - 1:49 am | स्वाती२
लेखमाला आवडली.
पर्डू युनिवर्सिटीचा Purdue Improved Crop Storage (PICS) प्रोजेक्ट सध्या तिसर्या फेजमधे आहे. सुरवातीला वेस्ट आणि सेंट्रल आफ्रिकेतील शेतकर्यांचे काउपीजचे उत्पादन कीड लागून खराब होवू नये म्हणून या बॅग्ज तयार केल्या गेल्या. नंतर पिकांसाठी देखील हे तंत्र कसे उपयोगी होइल यावर संशोधन केले गेले. तसेच या बॅग्ज तयार करायच्या उद्योगातूनही रोजगार निर्मीती होवू शकते. https://ag.purdue.edu/ipia/pics/Pages/home.aspx
16 Sep 2015 - 11:31 am | नाखु
काही संबधीत माहीती लिंकाळावी वाटली
अनावश्यक वाटल्यास सा सं ने सफाई-झाडू मारला तरी चालेल
वस्तू नसाडी म्हणजेच पाणी नासाडी
काटकसरी नाखु
16 Sep 2015 - 12:02 pm | प्रभाकर पेठकर
सिलो बद्दल माहिती नव्याने कळली. इथे मस्कतमध्ये सरकारी धान्य कोठारात अशा प्रकारचे 'सिलो' गेली अनेक वर्षे पाहात आहे. त्यांना 'सिलो' म्हणतात आणि त्याची उपयुक्तता काय असते ते आज कळाले. हे कोठार बंदरापासून ५ -७ किलोमिटर अंतरावर आहे. धान्य थेट बंदरातून भूमिगत पाईप लाईन्स मधून शोषून घेउन त्या 'सिलो'त आणले जाते असे ऐकले होते. खरे-खोटे माहित नाही.
16 Sep 2015 - 3:18 pm | Sanjay Uwach
कोरियन टेक्निक आज काल फार कॉमन झाले आहे.आपल्या गोडाउनचे काम बीम पर्यंत आल्यावर १५ ते २० कंपनिचे लोक एक बेंडिंग मशीन व मागणी प्रमाणे पत्र्याचे बंडल घेऊन येतात .पत्रा साधारण १० गेज (३ एम एम ) व रुंदी मागणी प्रमाणे असते .पत्रा पावडर कोटेड किंव्हा अल्युमिलियमचा देखील असतो.पत्रा बेंड करून क्रेनच्या साह्याने बीम वर ठेऊन फ़ास्टनरच्या साह्याने बसवला जातो .५० मीटर रुंद व १०० मीटर लांब गोडाउन रुफ़िंगचे काम तीन दिवसात करतात. तसेच स्पो. हिटिंग साठी दर खेपेस मटेरीअल हालविणे सोपे नाही . हालवताना ते इतके गरम असते कि कामगाराच्या पाटीला पोके आलेले मी पहिले आहेत . स्टॅकच्या तळात लाकडी क्रेट घालतात . हे स्टॅक जर टाकाऊ प्लास्टीक पासून केले व त्या खाली हायड्रोलिच जॅक बसवायचे .थर्मो सेन्सरचा सिग्नल जॅकला दिल्यास ते स्टॅकला आपोआप वर खाली होतील (अर्थात योग्य कंट्रोल मधुन) अशी माझी धारणा आहे य़ा साठी मात्र सरकारची इछा शक्ती मात्र फारच कमी आहे . टाकाउ प्लास्टीक पासुन सद्द्या रेल्वे रुळा खालिल भट्टे देखिल बनविले जातात.
18 Sep 2015 - 10:53 pm | पैसा
उत्तम लेख. खूपच छान मालिका झाली. प्रतिसादही खूप माहितीपूर्ण आहेत.
18 Sep 2015 - 11:24 pm | पिंगू
सायलो बद्दल प्रथमच नविन माहिती वाचली. माझ्या माहिती प्रमाणे एचडीपीई प्लास्टिक किंवा एफआरपी प्लास्टिक वापरुन स्वस्तात सायलो बनवता येतील किंवा फुग्याप्रमाणे लेयर्ड प्लास्टिक शीटपासून सुद्धा साठवणुकीसाठी बॅग्स बनवता येतील.
21 Sep 2015 - 9:32 pm | शेखरमोघे
"The Witness" (ज्यात Harrison Ford यानी काम केले आहे) या चित्रपटात, थोड्याशा वेगळ्याच सन्दर्भात silo पहाता येईल. सन्कुचित दृष्टी हा silo vision ला वापरला जाणारा मराठी शब्द बरेच काही silo बद्दल सान्गतो. https://www.youtube.com/watch?v=20J7-uqwsck वर देखील बरीच माहिती पहाता येईल.
19 Sep 2015 - 5:04 am | श्रीनिवास टिळक
१९४६ ते १९४९ आम्ही तीन भावंडं पळस्प्याला (पनवेल पासून ४ किमी; मुंबई गोवा महामार्ग फाट्यापासून २ किमी) वडिलोपार्जित घरात आजी आणि काकांबरोबर रहात असू. तेथे एका खोलीत आपण लिहिता तसे बांबूच्या तट्ट्या वापरून उभे केलेले एक उंच नळकांडे (त्याला कणगा म्हणत) होते त्यात भात (तूस न काढलेले तांदूळ) साठवून ठेवलेले असे.
19 Sep 2015 - 8:17 pm | मारवा
शेखर जी
आपली लेखमाला फार माहीतीपुर्ण आहे. फार आवडली.
एखादा गंभीर विषय घेऊन इतके परीश्रम घेऊन लिहीणे हे खरच कौतुकास्पद आहे.
तुमचे लेख संदर्भसंपन्न आहेत. तुम्ही दिलेल्या काही लिंका वाचल्या त्याही छान आहेत.
तुमच्या कडुन आम्हाला वेळोवेळी अशीच मेजवानी मीळत राहो ही अपेक्षा.
तुमचा लेखनातला उपरोधिक स्वर पण आवडला. त्याने लेखनाला धार आली.
धन्यवाद शेखरजी
20 Sep 2015 - 2:25 pm | मारवा
शेखर जी
हा लेख व चर्चा जर तुम्ही अगोदर वाचलेली नसल्यास जरुर वाचुन बघा असे सुचवीतो.
तुमच्या विषयाशी संबंधित असल्याने तुम्हाला आवडेल वाचायला असे वाटते.
इथे वरील विषयावर च अतिशय सखोल व संदर्भसंपन्न चर्चा झालेली आहे.
http://www.aisiakshare.com/node/1869
20 Sep 2015 - 11:02 pm | शेखरमोघे
वाचनस्थळ सुचवल्याबद्दल आभार.
23 Sep 2015 - 11:37 am | नया है वह
.
23 Sep 2015 - 12:40 pm | स्वाती दिनेश
माहितीपूर्ण लेखमाला! वाचते आहे, आवडत आहे.
स्वाती
26 Sep 2015 - 5:07 pm | नमकिन
साठवणीकरिता २ भिंतीत जागा (अंबार) व जमिनीखाली १० घनफुट (पेव) जागा माझ्या सोलापूरी खेडेगावात आजोळी असलेल्या वाड्यात ऊतरुन पाहिलेले आहे.
कणग्यात देखील धान्य साठवत (आम्ही बालगोपाल त्यात लपाछुपी खेळायचो);
नुकतेच १ इटलीच्या कंपनी सोबत आमच्या कंपनीचा भागीदारी करार झाला, ही कंपनी (penta.piovan.com) सायलो व पदार्थ वाहुन (material conveying) नेणे यात निष्णात आहे. ५ मीटर व्यास x २५/४० मीटर ऊंची सायलो बनवतात (अॅल्युमिनिअम, लोखंड, S.S).
अन्न प्रक्रिया उद्योग वाढवले तरी फरक पडेल.
28 Sep 2015 - 10:10 pm | हेमंत लाटकर
कणग्या ठेवलेल्या खोलीला आम्ही कणगीचे घर म्हणत असू.
29 Sep 2015 - 1:53 pm | pradnya deshpande
पुढच्या भागाची वाट पहात आहे. लवकर लिहा
8 Oct 2015 - 1:14 pm | रंगासेठ
माहिती आवडली, पुढील लेखाच्या प्रतिक्षेत.