भाग ७: जग(व)ण्यापुरते (च) अन्न (अपूर्ण)
या आधीचे संबंधित लेखन
भाग १: http://www.misalpav.com/node/32554
भाग २: http://www.misalpav.com/node/32709
भाग ३: http://misalpav.com/node/32801
भाग ४: http://misalpav.com/node/33012
भाग ५: http://www.misalpav.com/node/33371
भाग ६: http://www.misalpav.com/node/33829 आणि
http://www.misalpav.com/node/41702
ही लेखमालिका काही काळ "गायब" होती. या आधीच्या भागातील प्रतिसादांनी भंडावल्यामुळे थोडा स्वाध्यायात्मक, थोडा अंतर्मुख विचार केल्यावर थोडे फार कळू लागले - तुकोबा "निंदकाचे घर असावे शेजारी" असे कां म्हणत असावेत.
भाग ६ च्या शेवटी माझे काही विचार (बऱ्याच कालावधीनंतर, काही दिवसांपूर्वीच ) पुन्हा मांडल्यावर फारसा उद्रेक न झाल्यामुळे पुढील लिखाणाबद्दल विचार सुरु केला आणि हा भाग - थोडा वेगळ्या धाटणीने- लिहिण्याचे ठरवले.
सध्याच्या ध्वनीचित्र मालिका तयार करणारे काही वेळा बऱ्याच भागात अनेक असंबद्ध घटना घडवतात, त्याबद्दल प्रेक्षकांचा ("दर्शक" लिहवत नाही हो) कल जोखतात आणि मग असा काही एक झोका सगळ्या घटनांना देतात की त्यात या असंबद्ध वाटणाऱ्या घटना एकत्र तर येतातच पण त्यामुळे बसणाऱ्या झटक्यामुळे "पुढे काय बरे होणार" ही उत्सुकता टिकून राहाते. एक उपयोगी तंत्र!
मी या भागांत अनेक वरकरणी एकमेकांशी काही देखील संबंध नसलेले तुकडे (नाटकातल्या वेगवेगळ्या प्रवेशांसारखे) सादर करणार आहे आणि मग . . . .
मग काय, ते सगळे असंबद्ध वाटणारे तुकडे अर्थातच जोडणार आहे, आणि म्हणून शीर्षकच "................ (अपूर्ण)" असे आहे.
आता हा एक-एक तुकडा .....
@@@@@@
अंक ..... प्रवेश. . . .
(स्वा. सावरकरांच्या कवितेतील काही भाग)
ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा प्राण तळमळला
@@@@@@
अंक ..... प्रवेश. . . .
बाळंभट: अहो S हरभट, अहो S हरभट, लक्ष कुठे आहे तुमचं? आलात का बारशाचे जेवण आटोपून? काय काय होते जेवायला? घुगऱ्या कशा होत्या?
हरभट : कसले काय घेऊन बसलाय बाळंभट? वहिनीसाहेबांना आता स्वैपाकाचे काहीच जमत नसतांना देखील त्यांनी बारशाचा स्वयंपाक स्वतः करण्याचा हट्ट धरला. आमचे कुटुंब होते त्यांच्या मदतीला म्हणून काहीतरी निभावले. वहिनीसाहेबांनी घुगऱ्या स्वतः बनवल्या म्हणजे कच्या पक्क्या कशातरी उकडल्या आणि अगदी झोकदार चांदीच्या वाटीत वाढल्या खऱ्या पण त्यात अगदी तिखट मीठ तरी टाकायचे ते देखील त्या विसरल्या - इतर कांही घालायचे तर सोडूनच द्या - कुणालाच धाडस नाही झालं त्यांना काही सांगायचं - अन्नावाचून जीव जात असला तरी अशा घुगऱ्या घश्याखाली उतरल्या नसत्या. इतर स्वयंपाकाचेही तेच. आचवतांना कुटुंबाने हळूच चांगलं गडवाभर दूध जर पुढें केलें नसतें तर हा हरभट आज खपलाच असता!!
@@@@@@
(स्थळ: स्वयंपाकघर, आजी आणि नात या दोघी एकमेकींशी बोलत आहेत )
नात: आजी, आजी, आज कसली भाजी करणार आहेस ?
आजी: भेंडीची.
नात: शी, अगदी गिळगिळीत
आजी: बघा कशी नावं ठेवतीय भेंडीला! म्हणे गिळगिळीत! तुझे बाबा तर म्हणतात- भेंडी अगदी आरोग्यकारक भाजी आहे.
नात: बाबा म्हणजे ना, अगदी . . . मग निदान पीठ लावून किंवा ताकातली तरी कर ना ग आजी, नाहीतर कशी खायची अशी गिळगिळीत भाजी?
@@@@@@
अंक ..... प्रवेश. . . .
(स्थळ, काळ आणि वेळ : एका अनेक तारांकित आणि प्रयोगशील क्षुधाशांतिगृहाबाहेर लावलेला माहितीपर फलक कोणीतरी वाचत आहे)
आजचा खास पदार्थ : गम्बो (लुईझियानामधील लोकप्रिय खाद्यपदार्थ )
@@@@@@
अंक ..... प्रवेश. . . .
(वीर वामनराव जोशी यांच्या रणदुन्दुभी नाटकातील एका पदाचा एक भाग)
परवशता पाश दैवें ज्यांच्या गळा लागला. . .
@@@@@@
अंक ..... प्रवेश. . . .
(स्थळ: बंदिशाळा, कोठडीचा लोखंडी दरवाजा आवाज करत उघडतो, कांही रक्षक लगबगीने आत येतात आणि कोठडीच्या बाहेरून त्यांना जोरदार आवाजात आज्ञा होते)
धरा त्या कैद्याचे हात पाय, कोंबा तोंडात नरसाळे आणि ओता लापशी त्याच्या घशात ! जर राजेसाहेबांना कळले की अन्नत्याग करून याने आपला स्वतःचा जीव धोक्यात घातला आहे तर तो वर जाण्याआधी आपली डोकी मारली गेलेली असतील.
@@@@@@
. . . . (भाग ७ चा पुढील मजकूर थोड्याच दिवसात ) . . . .