अन्नदाता सुखी भव भाग ४ - वृक्ष वल्ली आम्हा सोयरीं

शेखरमोघे's picture
शेखरमोघे in जनातलं, मनातलं
30 Sep 2015 - 7:56 pm

या आधीचे संबंधित लेखन
भाग १: http://www.misalpav.com/node/32554
भाग २: http://www.misalpav.com/node/32709
भाग ३: http://misalpav.com/node/32801

आपण पाहिलं की नॉर्मन देव वगैरेनी शेतातल्या पिकांनांच जास्त तगडं बनवलं आणि त्यामुळे शेतकऱ्याला साधारणतः तेव्हढ्याच जमिनीत, तेव्हढ्याच पाण्यांत आणि तेव्हढ्याच प्रयत्नांत (पण जास्तीचे खत वापरायला लागून) अनेक पटीने जास्त धान्य मिळू लागले. वाढत्या लोकसंख्येला लागणाऱ्या वाढत्या अन्नधान्याची सोय अशी जी होऊ शकली, त्यावर नक्कीच हा प्रश्न उद्भवतो- आधीच्या पिढ्यांनी काय केलं - जशी जशी जगाची लोकसंख्या वाढत गेली तसे अन्नधान्याचे उत्पादन वाढवत कसे ठेवले?

माझ्या अंदाजाप्रमाणे या सगळ्या "आधीच्या" कर्तबगार पिढ्यांनी ज. तु. म. यांची दीक्षा घेऊन त्यांचा गुरुमंत्र "वृक्ष वल्ली आम्हा सोयरीं" यशस्वीपणे वापरला. मला माहीत आहे - तुमच्यापुढे लगेच अनेक प्रश्न उभे ठाकले असतील जसे, हे "ज. तु. म. कोण बुवा आणि आधीच्या म्हणजे कधीच्या पिढ्याना आणि असे कसे ते सगळ्यांना दीक्षा देऊ शकले?" कदाचित असेही वाटेल "वृक्ष वल्ली आम्हा सोयरीं" हा कोणत्या तरी (माहितीच्या मराठी ?) कवीचा संदेश (कदाचित अभंग असेल), कसा काय जगभर पोचला? काय तरी लतादिदींच गान ऐकलवत खर, पण त्यात "ढिंग चाक, ढिंग चाक" काय पन नसतांना जगभरच्या यव्ह्ढ्या सगल्या लोकानला ह्यो संदेस कसा काय भावला?

ज. तु. म. हे कोण बुवा ? असे विचारणाऱ्याना बहुतेक माहित नसावे की "जगद्गुरु तुकाराम महाराज" यांना इतर कुठल्याही जास्त जवळीक दाखवण्याचा प्रयत्न असल्याचा संशय वाटण्यासारख्या नांवाने - जसे तुकोबा - संबोधण्याचे अधिकार - काही चित्रवाहिन्याना सोडून - कोणासही नाहीत. एखाद्या विद्वानाने अनेक वेळा गाथेचा अभ्यास केल्याची सबब सांगून ज. तु. म. ना तुकोबाराय किंवा संत तुकाराम वगैरे संबोधले तर लगेच अशा विद्वानांना "मंबाजी" ठरवून टाकले जाते. मग "ज. तु. म." कसे बरे योग्य, असे म्हणणाऱ्या कीसकाढू लोकांनी (म्हणजे शब्द्च्छल करणाऱ्यानी असे मला म्हणायचे आहे), पुण्यातल्या "छ. संभाजी पूल", किंवा मुंबईतल्या "CST", "LBS मार्ग" किंवा "S V Road " किंवा कुठल्याही गावातल्या "M G Road" अशा "सर्कारी" पाट्या पहाव्यात.

"वृक्ष वल्ली आम्हा सोयरीं" असे शब्दरूप ज्या भावनाना ज. तु. म. नी दिले त्या अतिशय विस्तृत होत्या - या अभंगात त्यांनी म्हटले आहे की "मी जर माझ्या मनालाच विचारले की सुख कुठे लाभेल तर उत्तर मिळेल - आसमन्तात; वृक्ष, वल्ली, पशु, पक्षी आकाश आणि वारा या सगळ्यांशी एकरूप झाल्याने आणि म्हणून मनातले विकार झटकून टाकता आल्याने".

"वृक्ष वल्ली आम्हा सोयरीं" ही शिकवण "ज. तु. म." नी या शिकवणीला शब्दरूप देण्याच्या बऱ्याच आधीच - म्हणजे साधारण ज.तु. म. यांच्याही आधी सुमारे १०,००० ते १२,००० वर्षे - वापरांत होती. कदाचित ही शिकवण रोजच्या गरजेतून मिळाली होती. आदिमानवाला सतावणारे "विकार" म्हणजे "पोट कसे भरावे" हे सदैव असलेली चिन्ता. या अतिशय मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधताना, हळू हळू त्याच्या हे लक्षांत येत होते की शिकार करून पोट भरण्यातली अनिश्चितता अन्नधान्य पिकवल्यानॆ दूर होऊ शकते आणि अन्नधान्य देणारी झाडे उगवता, वाढवता येऊ शकतात. आदिमानवाला कधीतरी, अनेक वर्षे निरीक्षण केल्यावर शोध लागला की नुसतेच कुठे तरी उगवणाऱ्या गवताचे बी जमा करून, भाजून किंवा कुटून एकदाच खाण्यापेक्षा अशा गवताची काळजी घेऊन, ते बी जमा करून, जमिनीत रोवून, त्यातून उगवणाऱ्या रोपातून अनेक पटीने जास्त बी जर मिळवले तर आपली अनेक दिवसांची सोय होऊ शकते. असा विचार करणाऱ्या "वृक्ष वल्ली आम्हा सोयरीं" पंथात अर्थातच "काळी आई" वर प्रेम, घरच्या जनावरांची काळजी (की त्याकरता आधी गाय, म्हैस, घोडा, शेळ्या, उंट अशा सगळ्याच प्राण्यांना माणसाळवणे) इ. इ. अशीही तत्वे आचरणात येत होती.

मी "वृक्ष वल्ली आम्हा सोयरीं पंथ" असे या विचारपध्दतीला का म्हणतो आहे, हे पुढे येईलच. पण हा "पंथ" जरी सगळ्या जगभर वेगवेगळ्या ठिकाणी ज. तु. म. यांच्या १०,००० ते १२,००० वर्षे आधीपासूनच अस्तित्वात आला होता तरी ही विचारपध्दती अध्यात्मिक वगैरे काही नव्हती. जेव्हां आपण शेजारच्या वहिनीना किंवा आजीना - आपल्या सोयऱ्या म्हणून - विचारतो की "आरती व्हायची आहे ना अजून, येऊ का आरतीला", तेव्हां आपल्याला त्यांच्या अध्यात्मिक स्वास्थ्याची जशी काळजी असते तसेच "नैवेद्याला/प्रसादाला काय बर असेल आणि त्यातलं आपल्या हातावर काही मिळणार का", हा अंतस्थ हेतू असतोच की ! अगदी तसाच आदिमानवाने कदाचित हा विचार केला असेल, की मी या माझ्या भोवतालच्या वृक्ष वल्लींची वास्तपुस्त केली, त्यांची काळजी घेतली, त्यांना जोपासले म्हणजे त्या मला जास्त पावतील, प्रसन्न होतील आणी माझी पोटाची काळजी मिटवतील.

या सोयऱ्या मंडळीना नक्की कसे जपावे, वाढवावे आणि त्यांची काळजी घ्यावी याची नक्की माहिती नसतांना "वृक्ष वल्ली"ना "सोयरीं" मानणे हे कठीणच होते. ही माहिती चुकतमाकतच मिळवावी लागली आणि तसे करतांना माणसाचे वृक्ष वल्लींबरोबरचे लागेबांधे वाढू लागले. या पोट भरण्यास उपयोगी वनस्पतींची काळजी घेणे, त्या जास्त जोमाने आणि खात्रीपूर्वक वाढण्याकरता काय करायला हवे याचा - अगदी बी निवडणे, जमिनीची चांगली मशागत करणे, पेरणे, राखणे आणि अगदी धान्य आपल्या हातात येईपर्यंत जे काय करायला हवे या आणि अशा अनेक बाबींचा - अभ्यास होऊ लागला. अर्थात हे ज्ञानार्जन अगदीच संथ गतीने आणि धडपडत, चुकत माकत होत असल्याने आणि या ज्ञानार्जनाकरता लागणारी साधनं उदा. "रोपाची उंची/वाढ मोजण्याकरता बऱ्यापैकी अचूक मोजपट्टी" किंवा "धान्याचे वजन मोजण्याकरता बऱ्यापैकी अचूक तराजू" अस्तित्वातच नसल्याने "काय केल्याने वृक्ष वल्ली आपल्याला किती प्रसन्न होतील" हे सगळे अंदाजानेच चालत असे. एका पिढीने, एखाद्या वस्तीतले किंवा एका मोसमात मिळवलेले ज्ञान दुसऱ्या पिढीला, दुसऱ्या वस्तीत किंवा दुसऱ्या मोसमांत वापरण्याकरता स्मृती हा एकच दुवा - भाषेची, लिहिण्याची किंवा सहजप्राय दुसऱ्या वस्तीतल्या लोकांशी व्यवहार करण्याची काहीतरी व्यवस्था जमेपर्यंत - उपलब्ध होता. त्यामुळे अनेकांना इतरत्र सहज उपलब्ध असलेली माहिती स्वतः पुन्हा शोधत खटटोपाने मिळवावी लागली.

या सगळ्या शिक्षणात जमिनीचा पोत, हवामान आणि इतर गोष्टींशी जुळवून घेणारी धान्याची जात शोधणे आणि वाढवणे; हवामानाचाच भाग असलेल्या सूर्यप्रकाश, पाणी वगैरेंचे व्यवस्थापन; बैल, घोडा, उंट अशा सगळ्या माणसाळवलेल्या प्राण्यांना यथायोग्य उपयोगात आणणे (म्हणजेच वनचरांनाही सोयरे बनवणे) ; बैलांना/ घोड्यांना ओढता येतील, उपलब्ध सामुग्रीतून बनवता येतील आणि वापरताना टिकतील अशी शेतीची आयुधे बनवणे अशा एक ना हजार गोष्टी समाविष्ट होत्या. या प्रत्येक बाबतीत शून्यापासून सुरूवात करावी लागली आणि एखादा धडा चुकीचा समजला किंवा गिरवला तर उपासमारीच्या शिक्षेतून जे वाचले त्यांनाच पुढच्या इयत्तेत जाता आले. एखादा व्रात्य मुलगा जसा इतरांनी पाटीवर करून आणलेला अभ्यास पुसून टाकून सगळयांना संकटात टाकतो तसे वावटळी, पूर, टोळधाड अशी येणारी विघ्ने केलेले प्रयोग उधळूनही टाकत. ज्या वस्त्या सहज पोट भरण्याचे पटकन जमवू शकत होत्या त्यांना त्यांच्या सुस्थितीतून फायदा करून घेता येत होता (कला विकसित करून किंवा जास्त चैनीत राहून किंवा स्वतःची सेना उभारून इतरांवर वर्चस्व मिळवून). ज्यांना स्वतःचे पोट भरणे सहजी जमत नव्हते त्यांना उपासमार टाळण्याकरता इतर "विद्या" (जशी लढाईची, म्हणजेच ज्यांना पोट भरण्याचे तंत्र जमले आहे त्यांच्याकडून बळजबरीने त्यांची सुबत्ता हिसकावून घेण्याची) मिळवावी, विकसित करावी लागत होती. म्हणजेच स्वतःचे पोट भरण्याच्या उद्देशाने सुरु झालेला प्रवास वेगवेगळ्या समाजांना वेगवेगळ्या दिशेने नेत होता.

टप्प्या टप्प्याने मानवाच्या असे लक्षांत आले की नुस्तेच टोकदार काठीने जमीन उकरून तिच्यावर विखरून फेकलेल्या बियांपेक्षा जास्त जोरदार पीक बैलाने ओढलेल्या नांगराने जमिनीत खोलवर आणि एका रेषेत काढलेल्या घळीत प्रथम बिया अंमळ खोलवर रुजवून आणि नंतर त्यांवर पुन्हा थोडी माती पसरून सुरवात केल्याने मिळते. शेतात नुसत्याच टाकलेल्या बिया पक्षांनीच खाऊन टाकण्याचा किंवा रुजणारे अंकुर सुकून जाण्याचा धोका अशा सुधारणा केल्याने कमी होतो. अशा बिया "टाकलेल्या" घळीत पाणी देखील सोडता आले तर रुजणारे अंकुर आणखीच जोम घेतात. नांगरणी आणि पेरणी यांत सुधारणा होत होत शेवटी बैलांनी ओढलेला लाकडी नांगर आणि तिफ़ण (किंवा तत्सम आयुधे) वापरून केलेली पेरणी आणि वेगवेगळी मशागतीची हत्यारे तयार करणे तसेच जवळचे/लांबचे पाणी जरुरीप्रमाणे शेतातल्या घळीतून फिरवता येणं या विविध क्षेत्रातल्या प्रगतीला सुमारे ५,००० ते ८,००० वर्षे लागली. जो आढावा मी चार ओळीत संपवतो आहे त्यातल्या प्रत्येक शब्दात आणि प्रक्रियेत अनेक पिढ्यांचे कष्ट, अनुभव आणि कदाचित नशीब गुंतलेले आहे कारण अशा प्रत्येक शब्दामागे आणि प्रक्रियेकरता अनेक तऱ्हेने वेगवेगळे पर्याय अनेक वेळा आजमावल्याखेरीज त्यातील कुठला पर्याय चांगला हे ठरवताच आले नसते. अशा प्रत्येक प्रयोगाचा परिणाम कळायला एकातरी मोसमाची किमान मर्यादा असे. प्रयोग न जमल्यास उपासमारीचे भय सतत असल्यामुळे नवनवीन कल्पनांना प्रत्यक्षात आणण्यासही लगाम बसत असेल.

अशा पार्श्वभूमीवर जगभरात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतींचा प्रयोग करून अन्नधान्य उत्पादन वाढवत रहाण्याच्या दृष्टीने स्थानिक परिस्थितीत काय करणे इष्ट ठरेल याचे वेगवेगळे पर्याय शोधले जात होते. मी या आधी "एकाच पंथाचे शेतकरी" असे म्हटले आहे कारण अशा वेगवेगळ्या मार्गावरून जातानासुद्धा कुठल्या तरी अदृश्य प्रभावाखाली असल्याप्रमाणे जगातील वेगवेगळ्या भागातील लोक, ज्यांचा एकमेकांशी फारसा संबंध असण्याची सुतराम शक्यता नसतानासुद्धा वृक्ष वल्ली आणि वनचरे यांना मदतीला घेऊन साधारणतः ७,००० ते ८,००० वर्षांपूर्वी त्यांच्या भागापुरते धान्य पिकवू लागले होते आणि त्यामुळे एका जागी स्थिर होऊ लागले होते. जसे टैग्रिस आणि युफ्राटिस नद्यांच्या खोऱ्यात तसेच नाईल नदीच्या खोऱ्यात उपलब्ध असलेल्या पाण्याचा फायदा घेत गहू, बार्ली, डाळी ही पिके घेतली जात तर चीनमध्ये मुख्यतः तांदूळ पिकवला जाई. दक्षिण अमेरिकेत मका, वेगवेगळ्या डाळी, कंद आणि भोपळे, टोमाटो अशांसारख्या वेलावर/झुडूपांवर वाढणाऱ्या फळभाज्या असा विविध तऱ्हेचा अन्नसाठा तयार होऊ लागला आणि तंबाकू किंवा कोको अशा थोड्या आगळ्या "पिकांचा" सुद्धा व्यवस्थित सांभाळ होऊ लागला . सिंधू नदीच्या आजुबाजूला तर खाद्यान्नाखेरीज कापूस, त्यापासून बनवलेली वस्त्रे तसेच ऊस आणि त्यापासून बनवलेले गूळ, साखर असे पदार्थ देखील बनवले जावू लागले. या सगळ्याच ठिकाणी जमिनीच्या चढ-उताराप्रमाणे पाण्याचे सिंचन, साठा आणि वाटप करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती शोधल्या गेल्या. जसे नद्या आणि समुद्रकिनारे ओळखीचे झाले तसे व्यापार देखील वाढून एका ठिकाणच्या जास्तीच्या वस्तू दुसऱ्या ठिकाणी विकल्या जाऊ लागल्या.

असे हे "पोटमार्गी, एक पंथी" लोक जसे जसे वृक्ष वल्लीना आणि वनचरांना आपलेसे करवून पोटाची चिंता मिटवण्यात यशस्वी होऊ लागले तसे त्यांच्या कक्षा रुंदावत कुठे अध्यात्मिक तर कुठे पूर्णतः भौतिक विचार वाढत गेले. ७,००० ते ८,००० वर्षांपूर्वीच्या भारतीय, चिनी आणि युरोपातल्या घडामोडी पाहिल्या तर भरलेल्या पोटांवर चालणाऱ्या तत्वज्ञान, काव्य-शास्त्र-विनोद आणि शस्त्रास्त्र विद्या/युद्धे या सर्व दिशेनी "प्रगती" होत असल्याचे दिसते. जसे जसे जगाच्या या वेगवेगळ्या भागातले आपापसातले दळण वळण वाढत गेले तसे विचारांची आणि कल्पनांची देवाण घेवाण ही वाढली. जगात होणाऱ्या इतर अनेक घडामोडी देखील अशाच शेतीतील बदलांना आणि म्हणून धान्योत्पादन वाढवण्यास कारणीभूत ठरल्या.

लोकसंख्येच्या रेट्यामुळे असेल पण चीन या सर्व "कशासाठी पोटासाठी" चाललेल्या शर्यतीत वेगवेगळ्या सुधारणांच्या शोधांत अग्रेसर होता. चीनमध्ये प्रथम वापरात आणलेल्या महत्वाच्या आयुधांत/पद्धतीत पाणचक्कीचा/रहाट गाडग्याचा वापर करून पाणी उंचावर चढवणे आणि शेतात खेळवणे; नांगराच्या फाळात सुधारणा करत करत जमिनीतली ढेकळे जास्त खोलातून बाहेर काढून, शेतांत नांगराच्या सरी जमीन जास्त मोकळी होईल अशा पाडणे (जेणेकरून जमिनीतले क्षार आणि खनिजे सगळीकडे जास्त चांगली मिसळली जातील) आणि बियाणे सगळीकडे एकसारखी पेरली जाण्याकरता बांबू किंवा तत्सम पोकळ नळीने बी जमिनीत खुपसण्याकरता बैलाने ओढले जाणारे यंत्र (आद्य तिफण) अशा गोष्टींचा समावेश होता.

अशा सर्व प्रयोगशील सुधारणांकरता सर्व तऱ्हेच्या वैज्ञानिक प्रगतीची जरूर होती. उदाहरणार्थ सुमारे १००० ते १५०० वर्षांपूर्वी चीनमध्यॆ विविध तऱ्हेचे लोखंड बनवले जाऊ लागल्याने सुधारत असलेला नांगराचा फाळ हळू हळू लाकडाऐवजी ओतीव लोखंड वापरून बनवला जाऊ लागला. त्यामुळे जमीन जास्त खोलवर नांगरता येऊ लागल्याने जास्त वेगवेगळ्या प्रकारची जमीन लागवडीखाली येऊन धान्योत्पादन वाढले.

अशीच वैज्ञानिक प्रगती समुद्रप्रवासातही होत गेल्याने युरोपिअन लोकांची चीनमध्ये व्यापारी वर्दळ सुमारे ६०० वर्षांपूर्वी सुरू झाली. असा लोखंडी नांगराचा फाळ जेव्हां साधारण ५०० वर्षांपूर्वी चीनशी व्यापारी संबंध वाढल्याने डच लोकांच्या नजरेस आला तेव्हां त्यांनी तो युरोपात नेला आणि त्यात फेरबदल करत जेव्हां सुमारे ३५० वर्षांपूर्वी त्यांनी इंग्लंडमध्ये तेथील जमिनीला योग्य असे लोखंडी फाळाचे नांगर बनवून विकायला सुरवात केली तेंव्हां इंग्लंडमधील धान्य उत्पादन झपाट्याने वाढले. अशाच तऱ्हेने जास्त जास्त सुकर होत असलेल्या सागरी प्रवासामुळे अनेक बदल घडले: आफ्रिकेतील गुलाम युरोप आणि अमेरिकेत शेतीकरता आणवले गेले; दक्षिण अमेरिकेतील मका, बटाटा, मिरची असे वेगवेगळे पदार्थ जगाच्या इतर भागांत लागवडीकरता उपलब्ध झाले; दक्षिण अमेरिकेतील नैसर्गिक क्षार खते म्हणून इतर जगात मिळू लागले.

वैज्ञानिक प्रगतीचा एक मोठा भाग असतो - निरीक्षण आणि प्रयोग आणि त्यांतून उगम पावणाऱ्या सुधारणा. जॉन डीअर (John Deere) या अमेरिकन लोहाराने पाहिले की खडबडीत सुईपेक्षा चांगली गुळगुळीत केलेली सुई जास्त पट्कन चामड्यात किंवा कापडात शिरून, भोक पाडून, शिवण्याचा दोरा घुसवू शकते तेव्हां १८३७ साली त्याने नुसतेच लोखंड न वापरता जास्त गुळगुळीत केलेली वेगवेगळी पाती वापरत प्रयोग करून नांगराकरता कमी शक्ती वापरून जमिनीत जास्त खोल घुसू शकणारा लोखंडी फाळ तयार केला. त्यामुळे बैल/घोडा या सारख्या जनावरांकडून नांगरण्याचे जास्त काम करून घेता येऊ लागले. या डोकेबाज लोहाराने अमेरिकेत स्थापन केलेली कंपनी आता प्रतिवर्षी अमेरिकन डॉलर ३००० कोटीची शेतीची अवजारे जगभर विकते.

कालानुरूप जरूर असणाऱ्या नवीन कुठल्याही बदलाला सुरवातीला जोरदार विरोध होतो - जसे गणपती-विसर्जन पाणी वाचवण्याच्या आणि जलप्रदूषण टाळण्याच्या उद्देशाने हौदात करण्याच्या मोहिमेला कर्मठ लोक कुठलातरी कालबाह्य दाखला देत विरोध करतात. जगभरच्या लोखंडी फाळ असलेल्या नांगराने होणाऱ्या धान्योत्पादनातील वाढीचा विचार करून सुमारे १०० वर्षापूर्वी कै. लक्ष्मणराव किर्लोस्करांनी भारतात प्रथम लोखंडी फाळाचा नांगर तयार केला. तोपर्यंत लाकडी नांगर वापरणारे शेतकरी हा नांगर वापरण्यास तयारच होत नव्हते कारण असा एक समज झालेला होता की लोखंडी नांगर जमिनीत विष पेरून
जमिनीला कायमची बरबाद करतो. हा समज दूर करून आपला पहिला लोखंडी फाळाचा नांगर विकायला कै. लक्ष्मणराव किर्लोस्करांना दोन वर्षे लागली. त्यानंतर त्यांनी तसेच कोल्हापूर, राजकोट, कोईमतूर अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या कारखानदारांनी मागील ६०-७० वर्षांत बनवलेली आणि सुधारवलेली oil engines आणि pumps नदी/ओढा/विहिरीतले पाणी उपसण्याकरता वापरून पावसाळ्यानंतर सुद्धा पिकांना पाणि देणे शक्य होऊ लागले. अशा रितीने नॉर्मन देव अवतरण्यापूर्वीपासून भारतातील शेतकरी आपल्या पिकात वाढ करण्याचा प्रयत्न करतच होते पण नॉर्मन देवांच्या कृपेने त्या प्रयत्नांना जोरदार यश मिळाले.

"वृक्ष वल्ली आम्हा सोयरीं वनचरे" ही शिकवण "ज. तु. म." नी अध्यात्मिक दृष्टीकोनातून दिलेली असली तरी नुसतीच वृक्ष वल्ली किंवा वनचरेच नव्हेत तर पंचमहाभूताना आपल्या पोट भरण्याच्या मोहिमेत सामील करून घेत मानवजातीने आपल्या पोटाची सोय करून घेतली खरी पण पुढे काय ?

जगाची सध्याची लोकसंख्या पुढल्या १५-२० वर्षांत २५ टक्क्यांनी वाढेल. पाण्याचे साठे कमी होत आहेत, पावसाची अनिश्चितता वाढते आहे आणि अन्नधान्याचे उत्पादन वाढण्याकरता झालेला रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर आता पर्यावरणावर परिणाम करू लागलेला आहे. जगाला अशाही परिस्थितीत पोट कसे भरावे" याची नवी शिकवण देणारे आहेत का कोणी नवे "ज. तु. म. " ?

आहे, आशेचा किरण आहे : जगभरात "Intelligent Farming" तसेच "no tilling" असे वेग वेगळ्या विचारांचे नवे पंथ तयार होत आहेत.

जिज्ञासूनी जास्त माहिती करता पहावे
https://en.wikipedia.org/wiki/History_of_agriculture
https://en.wikipedia.org/wiki/British_Agricultural_Revolution
https://www.theintelligenceofthings.com/article/connected-farm-big-data-...
http://www.newworldencyclopedia.org/entry/History_of_agriculture
https://en.wikipedia.org/wiki/Plough
http://www.treehugger.com/sustainable-agriculture/are-mainstream-farmers...
https://en.wikipedia.org/wiki/Laxmanrao_Kirloskar
https://en.wikipedia.org/wiki/Agriculture_in_China

(क्रमशः)

धोरणमांडणीविचार

प्रतिक्रिया

एस's picture

30 Sep 2015 - 8:08 pm | एस

गेल्या तीन लेखांच्या तुलनेत हा लेख आवाका आणि संदर्भाच्या दृष्टीने एकदमच 'प्रागैतिहासिक' झाला आहे. तरीही थोडक्यात माहिती आवडली. शेवटी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यात नक्कीच रस आहे.

थोडे पूरक : शेती ह्या संकल्पनेचा शोध स्त्रियांनी लावला.

बाकी सविस्तर प्रतिसाद नंतर सवडीनुसार देतो.

मारवा's picture

30 Sep 2015 - 10:54 pm | मारवा

थोडे पूरक : शेती ह्या संकल्पनेचा शोध स्त्रियांनी लावला.
अगदि बरोबर स्टोरी ऑफ सीव्हीलायझेशन या विल ड्युरांट च्या ग्रंथात याचे उत्तम विवेचन येते. योडेसे इथे देण्याचा मोह आवरत नाहीये.
Most economic advances, in early society, were made by the woman
rather than the man. While for centuries he clung to his ancient
ways of hunting and herding, she developed agriculture near the
camp, and those busy arts of the home which were to become the most
important industries of later days. From the "wool-bearing tree," as
the Greeks called the cotton plant, the primitive woman rolled
thread and made cotton cloth. `010341 It was she, apparently, who
developed sewing, weaving, basketry, pottery, woodworking, and
building; and in many cases it was she who carried on primitive
trade. `010342 It was she who developed the home, slowly adding man
to the list of her domesticated animals, and training him in those
social dispositions and amenities which are the psychological basis
and cement of civilization.
But as agriculture became more complex and brought larger rewards,
the stronger sex took more and more of it into its own
hands. `010343 The growth of cattle-breeding gave the man a new
source of wealth, stability and power; even agriculture, which must
have seemed so prosaic to the mighty Nimrods of antiquity, was at last
accepted by the wandering male, and the economic leadership which
tillage had for a time given to women was wrested from them by the
men. The application to agriculture of those very animals that woman
had first domesticated led to her replacement by the male in the
control of the fields; the advance from the hoe to the plough put a
premium upon physical strength, and enabled the man to assert his
supremacy. The growth of transmissible property in cattle and in the
products of the soil led to the sexual subordination of woman, for the
male now demanded from her that fidelity which he thought would enable
him to pass on his accumulations to children presumably his own.

शेखरमोघे's picture

1 Oct 2015 - 9:06 am | शेखरमोघे

  • It was she who developed the home, slowly adding man
  • to the list of her domesticated animals, and training him in those
  • social dispositions and amenities which are the psychological basis
  • and cement of civilization.
  • हीच प्रथा अजूनही चालू आहे असे दिसते !

    विस्तृत माहितीबद्दल आभारी.

मारवा's picture

30 Sep 2015 - 10:40 pm | मारवा

शेखर जी
परीश्रम पुर्वक लिहीलेला संदर्भ संपन्न लेख
आवडला.
ही लेखमाला च फार आवडली.

बोका-ए-आझम's picture

30 Sep 2015 - 11:06 pm | बोका-ए-आझम

आणि संवर्धन स्त्रियांनीच केलेले आहे. नदीला लोकमाता मानण्याचंही तेच कारण असावं.

द-बाहुबली's picture

30 Sep 2015 - 11:11 pm | द-बाहुबली

येस. म्हणुनच एक नद सोडला तर भारतात बाकीच्या सगळ्या नद्या होत.

शेखरमोघे's picture

1 Oct 2015 - 9:07 am | शेखरमोघे

माहितीबद्दल आभारी

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Sep 2015 - 11:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

माहितीपूर्ण लेखमाला ! पुभाप्र.

पैसा's picture

30 Sep 2015 - 11:35 pm | पैसा

अगदी मनोरंजक पद्धतीने लिहिताय!

नाखु's picture

1 Oct 2015 - 8:46 am | नाखु

अन्यथा हा विषय जरासा नीरस आणि कंटाळवाणा वाटू शकला असता. (सरकारी माहीती पत्रका प्रमाणे आणि तेही मूळ हिंदीतले मराठीत दिव्य-अनुवादीत असेल तर)

रेवती's picture

30 Sep 2015 - 11:43 pm | रेवती

लेखन आवडले.

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Oct 2015 - 12:45 pm | ज्ञानोबाचे पैजार

हा भागही आवडला,
तुमच्या मुळे आम्हाला एका जवळच्या पण तरी सुध्दा अनोळखी विषयाची माहिती मिळत आहे.

पैजारबुवा,

नया है वह's picture

2 Oct 2015 - 11:14 am | नया है वह

लेखन आवडले