अन्नदाता सुखी भव भाग २ - डॉ नॉर्मन बोरलॉग, डॉ स्वामिनाथन आणि इतर चेले

शेखरमोघे's picture
शेखरमोघे in जनातलं, मनातलं
7 Sep 2015 - 9:44 pm

अन्नदाता सुखी भव भाग १ - PL 480

(मागील भागाच्या सुरवातीला थोडीशी छपाईची गल्लत झाल्याने "अन्न दाता सुखी भव" या नंतर दिसणारा विसर्ग असा दिला गेला की "भव" हा शब्द "…सुखी भव : भाग १" असा दिसण्याऐवजी "…. सुखी भवः भाग १" असा दिसत होता. त्यांत आता योग्य ती सुधारणा केली आहे. सध्याच्या काळांत संस्कृत भाषेचा असा अजाणता देखील केलेला चुकीचा वापर अक्षम्य ठरेल. तरीही क्षमस्व!)

काळाच्या गरजेनुसार लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती हे उत्सव सुरू केले. हे उत्सव लोकांना एकत्र जमवून जनजागृती करण्याकरता केंद्र बिंदू ठरावेत हे अपेक्षा होती. आता जर असे काही पुन्हा करण्याची जरूर भासली तर कुणाची स्मृती जागवावी?

भगवान श्रीकृष्ण आपल्या आश्वासनानुसार ("यदायदाहि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत………………संभवामि युगे युगे") जर खरेच कधी अवतीर्ण झाले/व्हायचे असतील तर कुठल्या रूपात अवतीर्ण होतील/झाले असतील?

भारतरत्न म्हणवून घेण्यास (प्रत्यक्ष पुरस्कार मिळणे ही एक अतिशय गुंतागुंतीची क्रिया असली तरी) पात्र अशा काही लोकांची नांवे?

मला जर कुणी हे प्रश्न विचारले ("तुला रे कोण विचारेल" असे बोलणाऱ्याना दुर्लक्षित करून) तर त्या सगळ्यांचे माझे एकाच उत्तर असेल : नॉर्मन देव (मला असे कां वाटते हे पुढे येतच आहे). डॉ नॉर्मन बोरलॉग या मर्त्य माणसाला (जन्म : १९१४ अमेरिकेतील आयोवा राज्यात; मृत्यु: २००९) आणि त्याच्या डॉ स्वामिनाथन इ. इ . तितक्याच प्रभावी चेल्यांना मी इथे त्यांच्या कामगिरीमुळे एकत्रित नांव देतो आहे " नॉर्मन देव". भारतापुरते बोलायचे तर डॉ नॉर्मन बोरलॉगचे मुख्य चेले होते डॉ स्वामिनाथन आणि त्यांचे कामही आपल्या गुरु इतकेच प्रभावी होते. म्हणजे असे म्हणा ना की हे सारे वेगवेगळ्या काळांत कालानुरूप घेतलेले एकाच देवतेचे भुकासुराला मारण्याकरता घेतलेले अवतार !

नॉर्मन देवांची महती काय, त्यांचा वसा वसा कोणी घेतला आणि व्रत सफल झाल्याची प्रचीती कशी मिळाली?

नॉर्मन देव एकदम अरसिक - भूक, त्यातून निर्माण होणारा करूण रस, वाऱ्यावर डोलणारी गव्हाची कणसे अशा कविकल्पनांशीच त्यांचे वाकडे होते; त्यांचे म्हणणे असे की अर्धपोटी, भुकेल्या रहाण्यातून कारुण्य वगैरे काही निर्माण न होता अशक्त आणि म्हणून रोगी प्रजा तयार झाल्याने अर्धपोटी लोकांच्या देशांना प्रगतीच्या मार्गावर चालणे कठीण होऊन बसते. त्यांना वाटे : जगात भूक अस्तित्वातच का असावी?

भुकेवरचा उपाय अनेक लोकांप्रमाणे शोधत असतांना डॉ नॉर्मन बोरलॉगना मेक्सिकोत साक्षात्कार हा झाला की खांद्यापर्यंत वाढलेल्या रोपावर वाऱ्यावर डोलणारी गव्हाची कणसे, कितीही काव्यात्मक दिसत असली तरी अशी कणसे दाण्यांनी भरली की आपल्याच वजनानी खाली लोंबू लागत, रोपे/कणसे मोडत आणि त्यामुळे तसेच रोपच उंच वाढल्याने आणि म्हणून स्वतःचे वजन न तोलू शकल्याने बरेच धान्य अक्षरशः धुळीत वाया जाई. कणीस जितके भरलेले आणि/किंवा रोप जितके उंच तितके तयार पीक वाया जाण्याची भीति जास्त. या समस्येवर उपाय काय ? तर रोपें कमी उंचीची पण तगडी असावीत, अशी की जी पूर्ण वाढतील, पण उंचीने नव्हे तर कसाने आणि रोपे तशीच कणसे अशी कसदार की जास्त भरलेली/वजनदार कणसे रोपांना तोलता यावीत. यामुळे पूर्ण भरलेले कणीस तोडता येऊन पूर्ण पीक वापरण्यास मिळेल (आधी कणसे/धाटे तुटून गेल्याने किंवा जमिनीजवळ लोळल्याने पीक तयार झाले तरी अंशतःच हातांत येई). हे लक्ष्य समोर ठेऊन डॉ नॉर्मन बोरलॉगनी आपल्या चेल्यांबरोबर अविरत काम करून, अनेक जातीच्या गव्हांच्या रोपांवर प्रयोग करत खुरट्या आणि तगड्या तसेच जास्त पट्कन भरणाऱ्या रोपांची/कणसांची जात "संकरित" पद्धतीनी कांही वर्षांत तयार केली. ही प्रक्रिया वर्षातून एकदा उगवणाऱ्या एकाच प्रदेशातील गव्हाच्या पिकावर करण्याऐवजी वेगवेगळ्या हवामानाच्या प्रदेशांत वर्षाच्या वेगवेगळ्या वेळी उगवणाऱ्या गव्हांवर केल्याने आणखीनच जलद होऊ शकली आणि वेगवेगळ्या जातींतील चांगले गुण - अनिष्ट हवामानाला आणि वेगवेगळ्या रोगजंतुना तोंड देण्याची शक्ती, लोम्ब्यांची संख्या वाढणे, लोंबी जास्त मोठी होणे, प्रत्येक लोंबीत जास्त तुरे येणे, प्रत्येक तुऱ्यावर जास्त दाणे येणे, प्रत्येक दाणा जास्त टपोरा होणे इत्यादी वेचक गुणधर्म - एकाच बियाण्यात आणता आले. या बियाणांपासून चांगले भरघोस गव्हाचे पीक मिळण्याकरता मात्र जास्त मात्रेत खत द्यावे लागे.

अशी तगडी आणि निवडक गुणधर्माची बियाणे नंतर जेव्हां सगळ्या मेक्सिकोत वापरात आणली गेली तेव्हां तेथील गव्हाचे उत्पादन अनेक पटीनी वाढले. १९५० च्या दशकाच्या शेवटी मेक्सिको गव्हाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. डॉ नॉर्मन बोरलॉगनी त्यांचा वसा नंतर जगातील इतर धान्याचे दुर्भिक्ष असणाऱ्या देशांना देऊ केला.

त्यावेळी घडलेल्या घटना खरोखरच भारताच्या दृष्टीने लाखमोलाच्या ठरत गेल्या. डॉ स्वामिनाथन या शेतीतज्ञ अधिकाऱ्याने डॉ नॉर्मन बोरलॉग यांच्या मेक्सिकोमधल्या यशाची कल्पना आपल्या वरिष्ठाना दिल्यावर पटपट चक्रे हलली, डॉ नॉर्मन बोरलॉग यांच्याबरोबर संपर्क होऊन सर्व सिद्धतेसह (मुख्य म्हणजे या नव्या बियाण्यांना लागणाऱ्या खतांची व्यवस्था होऊन) प्रायोगिक तत्त्वांवर २०० टन बियाणे आयात केली गेली. या कृषीयज्ञाच्या सुरवातीला भारताबरोबरच पाकिस्तानलाही बियाणे मिळणार होती आणि त्याच वेळी भारत पाकिस्तान सरहद्दीवर १९६५ च्या युद्धाची नांदी सुरु झाली होती. अशाच अनिश्चित वातावरणात एकीकडे मेक्सिकोतून भारत आणि पाकिस्तानकरता पाठवली जाणारी बियाणे जाऊ देण्यास मेक्सिकोच्या बंदर अधिकाऱ्यानी बंदी घातल्याने तो सगळाच काफिला अमेरिकन बंदरांकडे वळवावा लागला आणि त्यांत बहुमूल्य वेळ वाया गेला; दुसरीकडे पाकिस्तानचा चेक न वटल्यामुळे आणि त्यानंतर पाकिस्तान आणि भारतातील बंदरांवर एकमेकांची गोळाबारी सुरू झाल्याने सगळाच माल समुद्रातून येतांना (एकाच जहाजातून येत असल्यामुळे) सुरक्षित आणि वेळेत पोचण्याबद्दल अनिश्चितता निर्माण झाली.

सुदैवाने ही अनिश्चितता अल्पावधीत दूर झाली, आणि त्यानंतर योग्य वेळी घेतलेल्या कांही निर्णयांमुळे या नव्या बियाणांतून भारतात गव्हाचे संकरित पीक चांगले येत गेले आणि १९६६ साली जेव्हां १८००० टन "संकरित बियाणे" मागवण्याचा निर्णय भारताने घेतला तेव्हां ती त्या काळातील बियाणांकरता जगभरातली सगळ्यांत मोठी "order" होती, आणि मग वर्षांगणिक अशा संकरित बियाण्यांच्या आयातीत वाढही होत गेली.

भारतांत डॉ नॉर्मन बोरलॉग यांच्याकडून सुरवातीला बियाणे आयात केली जाण्यात जसा डॉ स्वामिनाथन यांचा "हात" होता तसाच त्यांच्यामुळेच ती बियाणे भारतांत रुजू शकली आणि ही संकरीकरण पद्धत इतर पिकांकरता वापरांत आणली गेली असे म्हणायला हरकत नाही. डॉ स्वामिनाथन यांनी बियाणे आयात केली गेल्यानंतर त्यांचा वापर कसा करावा हे शेतकऱ्याना समजावे आणि म्हणून या नव्या पद्धतीचा उपयोग सुकर व्हावा, वाढावा या उद्देशाने २००० "आदर्श शेते" तयार केली. गव्हावर केलेले प्रयोग तान्दळावर कसे करता येतील आणि त्यामुळे तान्दळाचे उत्पादनही कसे वाढेल याचा पाठपुरावा केला आणि एकूणच भारतीय शेतीचा नूरच बदलून टाकला. भारतांत ही नवी शेती पद्धत "रुजल्यावर" इतर देशांतही त्यांनी तिचा प्रसार केला. वर लिहिलेल्या उत्पादन वाढीचे श्रेय अर्थातच डॉ स्वामिनाथन यांनाही द्यावे लागेल.

डॉ नॉर्मन बोरलॉग आणि त्यांचे चेले यांनी आपला अनुभव आणि ही नवीन बियाणे मुक्त हस्ताने जगभरात प्रसारित केली आणि या पध्दतींचा वापर वेगवेगळया अन्नधान्यांच्या शेतीतही सुरू केला. भारतातील गव्हाचे उत्पादन १९६५ साली १२३ लाख टन होते ते १९७४ साली २०१ लाख टन तर २००० साली ७६४ लाख टन असे वाढू शकले. जागतिक पातळीवर १९५० साली १७० कोटी एकर जमिनीतून ६९.२ कोटी टन धान्याचे होणारे उत्पादन १९९२ साली १९० कोटी टनांपर्यंत वाढले पण त्याकरता फक्त १७३ कोटी एकर जमीन वापरावी लागली.

अशा तऱ्हेने नॉर्मन देवाचे व्रत घेतलेल्या (म्हणजेच पारंपारिक बियाणांऐवजी संकरित बियाणे वापरू लागलेल्या) आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतल्या अनेक गरीब देशांना लोकसंख्येच्या वाढीपेक्षा अन्नधान्याचे उत्पादन जास्त जलद वाढल्याने धान्य टंचाई, उपासमार, अपमृत्यु आणि रोगराई या दुष्टचक्रावर मात करता आली.

या अन्नधान्याच्या उत्पादनाच्या वाढीचा वेग लक्षांत घेत १९६८ साली "हरित क्रांती" हा शब्दप्रयोग वापरात ये ऊ लागला. भारतांत आणि इतर जगभरात अन्न धान्यांच्या उत्पादनात डॉ नॉर्मन बोरलॉग यांनी जी क्रांती घडवून आणली ती लक्षात घेऊन १९७० साली डॉ नॉर्मन बोरलॉग यांना नोबेल पारितोषक देण्यात आले. त्यावेळच्या त्यांच्या एकूण भुकेविरुद्धच्या लढ्याचा भाग म्हणून जगभरातून १६०० पेक्षा जास्त शास्त्रज्ञ त्यांच्या हाताखाली अनुभव घेऊन त्यांच्या कार्याचा पुढे प्रसार करण्यास तयार झाले होते, त्यानंतर हा आकडा आणखीनच वाढला असेल आणि म्हणूनच पूर्ण जगभरात लागवडीखालील जमिनीत फारशी वाढ न होता अन्नधान्याचे उत्पादन वाढू शकले. "ज्योत से ज्योत जगाते चलो" याचे आणखी काय वेगळे उदाहरण द्यावे?

अशा जगद्व्यापी उपद्व्यापानंतर सुद्धा २००५ साली डॉ नॉर्मन बोरलॉग यांना काळजी ही होती की जगाच्या वाढत्या लोक संख्येला पुरेल येव्हढे धान्य उत्पादन होण्यासाठी २०५० सालापर्यंत अन्न धान्याचे उत्पादन जे दुप्पट व्हावे लागेल ते कसे साध्य होणार ?

डॉ नॉर्मन बोरलॉग यांनी १९८६ साली "World Food Prize" हे पारितोषक दर वर्षी अन्नधान्याच्या संबंधातील अनेक बाबतीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्याना देण्याची घोषणा केली आणि त्यानन्तरच्या पहिल्याच वर्षी १९८७ साली हे पारितोषिक डॉ स्वामिनाथन यांना देण्यात आले.

मी आधी म्हटल्याप्रमाणे "ग्लानिर्भवति भारत" अशा परिस्थितीत अवतीर्ण होण्याचे आश्वासन भगवंतांनी दिले होते. धर्माच्या ग्लानीचा परिणाम पुढील जन्मात होत असेल, पण भुकेच्या ग्लानीचे परिणाम मात्र या जन्मातच भोगावे लागतात, येव्हढेच नव्हें तर पुढच्याही पिढ्या दुर्बल, रोगी आणि भाकड निघाल्याने देशाचे भवितव्यच धोक्यात येऊ शकते. लोकांचे बंगालच्या दुष्काळाच्या वेळेसारखे बळी जाऊ लागले असताना त्यांची काहीतरी पोटाची सोय लावून देणे यापेक्षा आणखी काय काळाची गरज असेल? अशा दुकाळातून काही काळ जरी भारताला "P L 480" ने तारले तरी भारताच्या राजकीय दृष्टीकोनातून जन्मलेल्या अनिश्चिततेमुळे बुडत्याचा आधार असणारी ही काडी निसटूनही गेली असतॆ. अशा मोक्याच्या वेळी डॉ नॉर्मन बोरलॉग आणि डॉ स्वामिनाथन अशा लोकांच्या प्रयत्नाने निदान काही काळ तरी भारतातल्या भुकासुराचाच बळी घेतला. कुठल्याश्या जाहिरातीत हल्लीच "हंगर की बजा दो" असा (फ़ुक्कटचा) उपदेश असे तो या लोकांनी केलेल्या भगीरथ प्रयत्नांमुळे अनेक दशकापूर्वीच प्रत्यक्षात येऊ शकला.

कांही कांही मुद्दे आकड्यांच्या स्वरूपांत जास्त पट्कन लक्षात येतात. दर वर्षी एक "Global Hunger Index" (जागतिक भूक निर्देशांक) प्रसिद्ध होतो. हा आकडा ठरवताना फक्त एखाद्या देशात किती धान्य पिकवले जाते याचाच हिशोब केला न जाता इतर अनेक बाबींचा - जसे प्रत्येक नागरिकाला एकुण किती उष्मांकाचे (calories) खाणे मिळते - हिशोब होतो. हा अंक मोठा असणे ही त्या देशाला आपल्या प्रजाजनांचे पोट भरणे कठिण जात असल्याची निशाणी. २०१४ साली चीनकरता (जगातील सगळ्यात मोठ्या लोक संख्येचा देश असूनही ) हा निर्देशांक ५. ४ होता तर भारताकरता १७. ८ होता. मॉरीटानिया (११.९), माली (१३) असे सहारा वाळवंटाच्या छायेतले देश सुद्धा आपल्यापेक्षा जास्त सहजतेने त्यांच्या प्रजेचे पोट भरू शकतात असे हे आकडे सांगतात. या निर्देशांकानुसार भुकेची तीव्रता (severity) चीन मध्ये LOW गणली जाईल तर भारतात SERIOUS गणली जाईल. आणखी एक - दोन दशकात भारताची लोकसंख्या चीनपेक्षा जास्त होण्याची शक्यता आणि सध्याच जगातील सुमारे एक चतुर्थांश अर्धपोटी लोक भारतातील आहेत या गोष्टी लक्षात घेता आपल्यापुढे वेळोवेळी उभा ठाकणारा भुकासुर भविष्यकाळांत जगातल्या सर्वांत अक्राळ विक्राळ स्वरूपात असेल असे म्हणायला हरकत नाही. कोण येईल आपल्या मदतीला या भुकासुरावर पुन्हा विजय मिळवायला?

विज्ञानाची जलद प्रगती होतांना त्याबद्दलचे अज्ञान आणि म्हणून भयदेखील वाढते. जेव्हां नैसर्गिक पिकांत वैज्ञानिक प्रयोगांद्वारे काही वेचक गुणधर्म बदलले गेल्याने पिकाचे उत्पादन वाढले तेव्हां हा विचार सुरु झाला की जैविक गुणसूत्रे (DNA) देखील वेचकरीत्या बदलून पिकाचे उत्पादन वाढवणे, पीक जास्त रोग प्रतिकारक बनवणे हे शक्य आहे का ? आणखीनच टोकाचा विचार म्हणजे धान्याच्या दाण्यांतच असे औषधी गुणधर्म तयार करणे शक्य आहे कां की पोषणाबरोबरच तेच धान्य कण औषधी म्हणून देखील काम करतील ?

जैविक गुणसूत्रे (DNA) वेचकरीत्या बदलून बनवलेल्या बियाणांना GMO (genetically modified organisms) अशी संज्ञा आहे. त्यामुळे पिकाचे उत्पादन वाढवणे, पीक जास्त रोग प्रतिकारक बनवणे हे सगळे जरी शक्य असले तरी त्यामुळे सृष्टीचे जीव वैविध्य (bio-diversity) समूळ बदलत असल्याने असे करणे हे धोक्याचे ठरू शकते.

सोनेरी तांदूळ ("golden rice") हे या प्रकारचे एक बरेच गुंतागुंतीचे उदाहरण आहे. जगातली अनेक कुपोषित बालके आहारांत "अ" जीवनसत्व कमी असल्याने दृष्टी गमावतात. या तान्दळातच मक्याचे काही जनुक (genes) आणि इतर कांही जंतूंचे जनुक सारता आल्याने या तांदुळात "बीटा कॅरोटीन"ची पैदास करण्याची शक्ती तयार होते आणि त्याचा रंगही सोनेरी बनतो. "बीटा कॅरोटीन" आहारात असल्यास मानवी शरीराला त्यापासून "अ" जीवनसत्व तयार करता येत असल्याने (साध्या तांदळा ऐवजी "सोनेरी तांदूळ खाणाऱ्या बालकांची दृष्टी जाण्याची शक्यता एकदमच कमी असते. अशाच काही औषधी गुण असलेल्या प्रायोगिक धान्यात/शेतमालात रक्तात कमी साखर निर्माण करणारा गहू (जो मधुमेहाच्या रोग्यांना उपयोगी ठरेल), रोग जंतुना मारण्याचे गुण असलेली द्राक्षे इ इ यांचा समावेश आहे. पण या अशा उपयोगी परंतु "अनैसर्गिक" पदार्थाना सर्व जगांत अतिशय जोरदार विरोध होतो आहे.

एकूणच भविष्य काळात वाढत्या जागतिक लोकसंख्येला पुरेसे अन्नधान्य मिळवण्यासाठीची "बिकट वाट" सोपी होण्याचे मार्ग सध्या तरी फारसे दिसत नाहीत. जमेची बाजू ही की जसे माहिती तंत्रज्ञानाने बरीच क्षेत्रे ताब्यात घेत त्यांत क्रांती घडवून आणली आहे, तसेच शेतीमध्ये सुद्धा होत आहे.

जाता जाता - डॉ पांडुरंग सदाशिव खानखोजे (जन्म १८८३, मृत्यू १९६७) या जाज्वल्य देशभक्त शास्त्रज्ञाने अमेरिकेत शेतकीशास्त्राचे शिक्षण घेता घेता १९०८ सालापासून इंग्रजांविरुद्ध चळवळ सुरू केली, अमेरिकेत स्थापन झालेल्या "गदर पार्टी" च्या संस्थापकांत ते होते. काही मित्रांबरोबर त्यांनी जर्मन सहकार्याने इराण व अफगाणिस्तान/बलुचिस्तान इथून भारतातील इंग्रज राज्य अस्थिर करण्याचे प्रयत्न केले. १९२०च्या दशकात, अमेरिकेतून शिक्षण पूर्ण करून त्यांनी मेक्सिको राष्ट्रीय विद्यापीठात संकरीत पिकांवर संशोधन आणि अध्यापन सुरू केले. त्यांचा विषय "मका" हा मेक्सिकोकरता महत्वाचा होता कारण मेक्सिकोतील रोजचे जेवण बरेचसे मक्यावर आधारित असते. त्यांनी तयार केलेली संकरीत बियाणे मेक्सिकोत वापरून त्यात सुधारणा करण्यात बऱ्यांच अडचणी आल्या. १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यावर त्यांनी भारतांत परत येण्याकरता केलेला अर्ज प्रथम नाकारला गेला कारण कुणा बाबूने पाहिले की या गृहस्थांच्या नावासमोर (इंग्रज सरकारने तयार केलेल्या) सरकारी कागदपत्रांत "महाभयंकर माणूस" असे शेरे होते! भारतांत परतल्यावर डॉ खानखोजे त्यांच्या मृत्यूपर्यंत पुणे/नागपुरात रहात. डॉ खानखोजे भारतात परत येताना सन्मानाने आणवले असते आणि त्यांचे मेक्सिकोत मक्यावर चाललेले संकरिकरणाचे प्रयोग भारतात इतर धान्यावर पूर्ण सरकारी पाठिंब्यासकट चालू राहू शकले असते तर?

आणखी जाता जाता - सध्या अनेक शेतीतज्ञ (म्हणजे त्यांना नोकरी देणाऱ्या कंपन्या) संकरित कापूस, वांगी वगैरे "पर्चुटण" गोष्टीत किंवा पोचट बियाणे बनवण्याच्या (अतिशय नफेबाज) उद्योगात गुंतलेले दिसतात. इतर मान्यवर कुठून पाणी पळवावे आणि कसा आपल्या मतदार संघातील "इनोवा", "चार बांगडी" इ. इ. वाहनांची संख्या वाढवत (आपल्याच) लोकांचा दुवा मिळवावा यात मग्न आहेत. उद्या पुन्हा भुकासूर जेव्हां जागा होईल आणि वाढत्या बिन-नोकरी/धंद्याच्या लोकसमुदायाला भडकावेल याची कुणी कशासाठी करावी काळजी?

जिज्ञासूनी अधिक माहिती करता पहावे:
http://www.nobelprize.org/nobel_prizes/peace/laureates/1970/borlaug-bio....
http://www.nobelprize.org/nobel_prizes/peace/laureates/1970/borlaug-fact...
http://www.nobelprize.org/nobel_prizes/peace/laureates/1970/borlaug-acce...
http://www.worldfoodprize.org/en/dr_norman_e_borlaug/how_norm_inspired_me/

http://www.ifpri.org/publication/2014-global-hunger-index-severity

http://www.forbes.com/sites/henrymiller/2012/01/18/norman-borlaug-the-ge...
http://www.forbes.com/sites/henrymiller/2012/01/18/norman-borlaug-the-ge...
https://en.wikipedia.org/wiki/Norman_Borlaug

https://en.wikipedia.org/wiki/M._S._Swaminathan

https://en.wikipedia.org/wiki/Pandurang_Sadashiv_Khankhoje

http://archive.indianexpress.com/news/mexican-corn---an-indian-comrade/1...

http://www.nytimes.com/2013/08/25/sunday-review/golden-rice-lifesaver.html

(क्रमशः)

अन्नदाता सुखी भव भाग ३ - Waste not, want not !

धोरणविज्ञानविचार

प्रतिक्रिया

अनुप ढेरे's picture

7 Sep 2015 - 10:15 pm | अनुप ढेरे

आवडला. जीएमओ बद्दल अजून वाचायला आवडेल. त्याचे नक्की तोटे काय आहेत याबद्दल.

एस's picture

7 Sep 2015 - 10:25 pm | एस

फार माहितीपूर्ण आणि येणार्‍या काळातील भुकेच्या आव्हानातले गांभीर्य दाखवून देणारा लेख.

नाखु's picture

8 Sep 2015 - 9:02 am | नाखु

संवेदनशील तरीही काहीसा दुर्लक्षीत विषय.

मुभाप्र

दमामि's picture

10 Sep 2015 - 6:55 am | दमामि

+1111

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Sep 2015 - 11:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

माहितीपूर्ण लेख. या महत्वाच्या विषयाबद्दल अजून विस्ताराने लिहाच.

राही's picture

7 Sep 2015 - 11:37 pm | राही

सुंदर चालली आहे लेखमाला. नॉर्मन बोर्लॉग यांचे कर्तृत्व जालवाचकांसमोर आणून एक मोठे काम केले आहे. नवीन पिढीला ह्यातले काही माहीत नसते.
अन्नटंचाईच्या भीषण वास्तवाला कसे तोंड देता येईल हे वाचण्यास उत्सुक.

बहुगुणी's picture

8 Sep 2015 - 8:39 am | बहुगुणी

सुंदर चालली आहे लेखमाला
असंच म्हणतो.

खेडूत's picture

8 Sep 2015 - 8:50 am | खेडूत

+१
पु.भा.प्र...

चाणक्य's picture

10 Sep 2015 - 6:34 am | चाणक्य

वाचतोय

अनन्त अवधुत's picture

13 Sep 2015 - 5:41 am | अनन्त अवधुत

काहीसा दुर्लक्षित विषय. भारतात हरितक्रांती झाली. हरितक्रांती मुळे पंजाबात गव्हाचे उत्पादन खूप वाढले इतपतच माहिती होती त्यामुळे वाचतोय अधिक येऊ द्या.

जेपी's picture

8 Sep 2015 - 8:54 am | जेपी

लेख आवडला.

इतक्या महान व्यक्तीविषयी आज पहिल्यांदा कळलं...(पण कळलं, हेही काही कमी नाही.)
_/\_
धन्यवाद.

बबन ताम्बे's picture

8 Sep 2015 - 11:36 am | बबन ताम्बे

अजून वाचायला आवडेल.

पु. भा. प्र.

अवांतरः

सध्या अनेक शेतीतज्ञ (म्हणजे त्यांना नोकरी देणाऱ्या कंपन्या) संकरित कापूस, वांगी वगैरे "पर्चुटण" गोष्टीत किंवा पोचट बियाणे बनवण्याच्या (अतिशय नफेबाज) उद्योगात गुंतलेले दिसतात. इतर मान्यवर कुठून पाणी पळवावे आणि कसा आपल्या मतदार संघातील "इनोवा", "चार बांगडी" इ. इ. वाहनांची संख्या वाढवत (आपल्याच) लोकांचा दुवा मिळवावा यात मग्न आहेत. उद्या पुन्हा भुकासूर जेव्हां जागा होईल आणि वाढत्या बिन-नोकरी/धंद्याच्या लोकसमुदायाला भडकावेल याची कुणी कशासाठी करावी काळजी?

प्रचंड सहमत...

डॉ खानखोजे भारतात परत येताना सन्मानाने आणवले असते आणि त्यांचे मेक्सिकोत मक्यावर चाललेले संकरिकरणाचे प्रयोग भारतात इतर धान्यावर पूर्ण सरकारी पाठिंब्यासकट चालू राहू शकले असते तर?

^^

tar भुकेची समस्या थोडी तरी कमी झाली असती .

पण . असो .
मस्त लेखमाला . बरीच नवीन माहिती मिळाली .

pradnya deshpande's picture

9 Sep 2015 - 2:23 pm | pradnya deshpande

डॉ नॉर्मन बोरलॉग यांच्या विषयी खरेच फार माही नव्हते. आपल्या लेखातून कूप माहिती मिळाली.

अन्या दातार's picture

9 Sep 2015 - 2:58 pm | अन्या दातार

एका महत्वाच्या विषयावर लेखमाला चालू केली आहे आपण.

२-३ आठवड्यामागे मी एका सेंद्रीय कृषीउत्पादन प्रदर्शनास गेलो होतो. तिथे सहज चौकशी करता असे कळले की सेंद्रीय शेतीची उत्पादकता कमी आहे (म्हणून त्याच्या किमती जास्त असतात. जवळपास दुप्पट). मी त्या माणसाला विचारले की बाबा रे असं असेल तर सगळ्या शेतकर्‍यानी सेंद्रीय शेती करायची म्हणली तर "परत या परत या नॉर्मन बोरलॉग परत या" करावे नाही का लागणार? गप्प बसला बिचारा.

राही's picture

9 Sep 2015 - 4:00 pm | राही

मीही असेच ऐकले आणि वाचले आहे.
उगीच नाही शेतकरी रासायनिक खतांमागे धावले.
आणि त्या काळात काहीही करून उत्पादनवाढीची तातडीची गरज होती. सरकारने सब्सिड्या दिल्या, शेतकर्‍यांनी शेताला खते दिली. त्या पूर्वी सेंद्रीय शेती तर शेतकरी पिढ्यानुपिढ्या करीतच होते की.
अलीकडे अमृतजल नावाने गोमूत्र, गूळ आणि आणखी कशाचे तरी मिश्रण असते. त्याचाही long term report चांगला नाहीय(असे ऐकले आहे.) चूभूद्याघ्या.

पैसा's picture

15 Sep 2015 - 11:43 pm | पैसा

काजूच्या झाडांना एक वर्ष सेंद्रिय खते घातली होती. उत्पन्नात फार फरक पडला नाही. रासायनिक खते दिल्यावर गेल्या वर्षी चांगले पीक आले.

पैसा's picture

15 Sep 2015 - 11:45 pm | पैसा

खूपच माहितीपूर्ण. मात्र प्रत्यक्ष परिणाम करू शकतील असे निर्णय घेणारे नेते बहुतेकवेळा तात्कालिक फायद्यासाठी भविष्याचा विचार करत नाहीत असेच बरेचदा दिसते. एखादा काम करणारा माणूस योग्य जागी असेलही तर नोकरशाही त्याला फार काही करू देत नाही.

श्रीरंग_जोशी's picture

16 Sep 2015 - 1:34 am | श्रीरंग_जोशी

अत्यंत माहितीपूर्ण व अभ्यासपूर्ण लेख.

डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांच्यावरचे वीणा गवाणकर यांचे नाही चिरा नाही पणती हे पुस्तक वाचनीय आहे.

बोका-ए-आझम's picture

16 Sep 2015 - 9:20 am | बोका-ए-आझम

राजकारण हे नेहमीच पुढच्या निवडणुकीवर डोळा ठेवून चालतं. त्यामुळे कोणत्याही राजकारणी माणसाचा लांब पल्ल्याचा विचार करण्यावर विश्वास नसतो.

मदनबाण's picture

16 Sep 2015 - 1:21 pm | मदनबाण

वाचतोय... PL 480 वाचुन, मला माझा एक जुना प्रतिसाद आठवला !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- || BLAZE OF GLORY ||