देवलसीकर्मकांडिपणा : माझे विचार

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in जनातलं, मनातलं
10 Jun 2015 - 2:30 pm

अत्रुप्त यांच्या ह्या धाग्यावरील प्रतिसादांतून सुचलेलं पण बराच काळ मनात साचलेलं...

देवलसीकर्मकांडिपणा >> म्हणजे जगातील कुठल्याही प्रकारच्या अज्ञाताला शरण जाण्याची निसर्गदत्त मूलभूत प्रवृत्ति. धर्मात ती देवाप्रधान कर्मकांडात्मक असते,आणि अधर्मात निधर्मात कुठल्याही गोष्टी अथवा गृहितकांवरचि संपूर्ण शरणागत अंधनिष्ठा असते. दोन्हीकडे कर्मकांडां सारखं काहीतरी करून समाधान/फ़ायदा/फलप्राप्ति मिळवण्याचि प्रवृत्ति असते. तिलाच मी या शब्दसंहतित कोंडलं आहे.

थोडक्यात काय अहंकाराने म्हणा की अजून कुठल्या कारणाने नाकारली जाणारी पण मनात पक्की ठसलेली देवावरची श्रद्धा.

समाजात राहून समाजापेक्षा वेगळंही दिसायचं, श्रेष्ठही दिसायचं आणि त्यांच्यातलंच एक आहोत हे ही दाखवायला धडपडायचं. सर्वच कर्मकांडांमागे हीच अगम्य भावना असते माणसाची. त्यातूनच वेगवेगळे पूजाविधी, देव जन्म घेतात. 'मी इतरांपेक्षा जास्त श्रद्धावान आणि भक्त आहे' ही भावना ही एकाच देवाच्या देवळात जमलेल्या भक्तांच्या वेगवेगळ्या आविर्भाव, हालचाली, घोषणा यांतून जाणवते. सृष्टीवर आपले नियंत्रण चालत नाही म्हणजे नियंत्रण ठेवणारा कुणीतरी असलाच पाहिजे, त्याला आपण खुश ठेवलं पाहिजे ह्या विचित्र अहंकारातून 'देव' संकल्पनेचा जन्म झाला. सृष्टीवर नियंत्रण करणारा कुणीतरी आहे आणि त्याची भक्ती-खुशामत केल्यावर त्याच्यावरही आपण नियंत्रण करू शकू अशी महान कल्पना मानवी मेंदूने प्रसवली. मग आपल्या नियंत्रणात असलेल्यांनी जसे आपल्यापुढे झुकावे ही सुप्त इच्छा असते तद्वतच त्या अज्ञात देवापुढे आपण झुकलो नाही तर बरे दिसणार नाही असे वाटायला लागले. त्यातून नुसते झुकून काय फायदा, ते तर सगळेच करतात. आपल्या मनातले भाव अजून स्पष्टपणे दिसावेत (इतरांना) म्हणून फूल, पान अर्पण करणे. तेही सगळे करायला लागल्यावर अजून पुढचं, अजून श्रेष्ठ करत करत अशा पद्धती आपल्या आपणच शोधून काढून त्याला शास्त्र असे नाव दिले. मग अमूक एक गट असाच करतो, त्या गटाशी जुळवून घ्यायला, सामाजिक सुरक्षा मिळवायला त्याच्या पूजाविधी आपण तशाच्या तशा करायच्या. यातून चालीरिती-परंपरा आल्या. नवससायास सूरू झाले. संप्रदाय निर्माण झाले. लोक खर्‍या श्रद्धेने पालन करू लागले. आपलाच धर्म/संप्रदाय/भक्तीमार्ग/पुजाविधी श्रेष्ठ म्हणून इतरांची शारिरीक/मानसिक/बौद्धिक कत्तल करू लागले.

याच्याविरूद्ध आचरण करणारेही आपले संप्रदाय बनवून बसलेच. अघोरी-तामसी-वाममार्गी. पण मूळ इच्छा कुणालाच कधीच दाबून टाकता आली नाही.

पण हे सगळेच मूळ इप्सित साध्य करायला फोल पडते म्हणून अपयशाला वेगवेगळी कारणे दिली गेली. नेहमीच. अशा अपयशाला कंटाळून 'देव नाहीच म्हणणारे' वेगळे पडले. पण 'देव नाही' म्हणजे 'आपण नियंत्रण करू शकू अशी शक्ती आपल्या आवाक्याबाहेर आहे' याबद्दलची निराशा मोठी होती. मूळ स्वभाव आणि इच्छा 'सृष्टीचे नियंत्रण आपल्या मनासारखे झाले पाहिजे' हीच. ते होत नाही म्हणजे कुठेतरी आपल्यावर कुणाची तरी सत्ता आहे याची सूक्ष्म जाणीव व त्यातून येणारी दहशत राहतेच.

या चक्रातून नास्तिक आस्तिक कुणालाही बाहेर पडणे शक्य नाही. कारण नास्तिक देव नाही म्हणतो तेव्हा ती शक्ती माझ्या नियंत्रणात येऊ शकत नाही याचीच कबूली देत असतो. हे कसे? कुणाही नास्तिकाला किंवा प्रयत्नवाद्याला विचारा. एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होऊ शकत नाही याचा उद्वेग आस्तिकापेक्षा नास्तिकाला जास्त असतो. कारण तेच "सृष्टीचे नियंत्रण मला हवे, मला इतरांपेक्षा श्रेष्ठ व्हायचे आहे."

पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतात ते उगीच नाही. ब्रहमांडाचा सगळ्यात लहान भाग असलेला अणु. त्याच्या रचनेत असलेले इलेक्ट्रॉन्स बाहेर पडायची सतत अविरत धडपड करत असतात. त्याच वेळेस गाभ्याला चिकटून पण राहायचे असते त्यांना. नाही तर ही व्यवस्थाच कोलमडून पडेल, अस्तित्व नष्ट होईल. आपली अशी ओळख राहणार नाही. माणसांचही तेच चाललेलं असते, समाजात राहायचे पण आणि फटकून पण राहायचे. असे दाखवायचे की मला कुणाचीच गरज नाही पण समाज सोडायची कुणाचीच तयारी नाही. अगदी मी मी म्हणणारे सन्यासीसुद्धा.

जे या सगळ्यातून बाहेर पडत जातात त्यांना ब्रह्म गवसते. तेव्हा कळते उगाच आपण सृष्टीतून स्वत:ला वेगळे काढत होतो. आपण तर सृष्टीचाच एक अविभाज्य भाग आहोत. समुद्रातल्या पाण्याच्या थेंबासारखे. किनार्‍यावरच्या वाळूच्या कणासारखे, झाडावरच्या पानासारखे. वार्‍याच्या झुळूकीसारखे. मग आपले खरे स्वरूप उमजते. नाना विद्या, कला, शक्ती, सिद्धी आपल्याच ठायी असल्याचा साक्षात्कार होतो. पण त्याचा काहीच उपयोग नसतो. अस्तित्व अद्वैत झालेले असते. मिळणे न मिळणे यापलिकडे मन गेलेले असतं. श्रेष्ठ-कनिष्ठ या संकल्पना गळून पडतात. नियंत्रणात आपण असतोच, नियंत्रकही आपणच असतो. कार्यकारणभाव उमजतो. अमर्याद शक्तीचा साक्षात्कार होतो. आणि तेव्हाच त्याचा काहीच उपयोग नाही हेही समजते. इलेक्ट्रॉन-प्रोटॉन-न्युट्रॉन सगळे एक होतात. त्यांचे एकूण अस्तित्व लक्षात येते. जीवन कळते. खरे ध्येय साध्य होते. मग सागराच्या लाटेवर स्वच्छंदपणे स्वार झालेले आपण एक थेंब असतो. तिथे उद्याची आशा नसते. कालची किल्मिषं नसतात. सजग, निरंतर, अनादी, अनंत वर्तमान हेच चिरंतन सत्य असतं.

हे सर्व लिहिण्याचे कारण: ज्योतिषात जर कर्मफलसिद्धांत मानतात तर पुजा-कर्म-ग्रहशांती हे थोतांड आहे असेच समजले पाहिजे. कर्मफलसिद्धांत आणि शांतीपूजा परस्परविरोधी संकल्पना आहेत. भरती येते ती चंद्रामुळे. चंद्राची कितीही शांती केली तरी भरती- ओहोटी टळणार नाही. कुंडली-ज्योतिष-मांडलेले ग्रह आत्म्याच्या प्रवासातले मैलाचे दगड आहेत. त्यांना शेंदूर फासल्याने प्रवास संपत नाही. वळणं येणार, चढ-उतार येणार ते आपण केलेल्या कर्माने. त्या वळणाचे, चढ-उताराचे ते दिशादर्शक-धोकादर्शक फलक आहेत. खड्डा चुकणार नाहीच. त्यातून किती वेगाने जायचे ह्याची कल्पना फलक बघून येऊ शकते. ते फलक योग्य वेळी दिसणेही पूर्वकर्मांवर आधारित आहे. कारण फलकाचा अर्थ सांगण्याचा बहाणा करणारे वाईच च्यापान्याला धा रुपं घेऊन तुम्हाला वाटेला लावतात. त्यामुळे चांगला मार्गदर्शक शोधणेही तुमच्या-आमच्या हातात नसतं. सृष्टीच्या कार्यकारणभावात असते तेव्हा नकळत मार्गदर्शक अवतरतो, कुठल्याही वेशात. काही ध्यानी-मनी नसतांना पण अगदी योग्य वेळी. सांगण्याचा मुद्दा एवढाच की दहा ठिकाणी पत्रिका घेऊन धावणे योग्य नाही. नशिबात असेल तर बिनमांगे योग्य सल्ला मिळून जातो. नसेल तर जंगजंग पछाडून शष्प फरक पडत नाही. कित्येकदा योग्य सल्ला मिळूनही खड्डे चुकत नाहीतच. अनेकांना अनुभव असेल.

पण आपला उद्देश प्रवास करणे कुठे आहे? आपला उद्देश लवकरात लवकर प्रवास संपवणे आहे. कर्म हे गाडीतले इंधन आहे. ते प्रवास करूनच संपवायचे आहे. पण प्रत्येक पेट्रोलपंपवर इंधन भरत राहिलो तर कसं व्हायचं? प्रवास संपवायचा असेल तर निष्कर्म व्हा. बॅलन्स कमी करत जा. कर्मकांडांची गरज मनातल्या सुप्त भावनांना खाद्य देण्यापुरती आहे. त्याचा आयुष्यातली सुखं-दुखं कमी-जास्त होण्याशी काही संबंध नाही. खरंतर त्यातून कर्माचा बोजा अजून वाढतो. पण कर्मकांड अतिशय सोपे, भयानक कठीण ते 'निष्कर्म होणे'. मग जे सोपे तेच आचरल्या जाते. गाडी फुल्ल टँक होत जाते.

पण पुढे प्रवासाचा कंटाळा यायला लागतो. येइलच ना? कुठेच पोचायचं नाही पण गाडीत एसी आहे, मस्त गाणी चालू आहेत म्हणून किती प्रवास करणार? सुख-दुखाचा कंटाळा येऊ लागतो. चूक उमजू लागते. मन प्रवास संपवायचा निर्धार करतं. आत्मा योग्य मार्गावर लागतो. पण त्याला तीव्र निर्धार लागतो. तो ह्या कंटाळ्यातूनच निर्माण होतो. जितका जास्त प्रवास तितका जास्त कंटाळा, तितका जास्त या प्रवासातून सुटण्याचा निर्धार.

जेव्हा प्रवास संपतो तेव्हा लक्षात येतं. अरे आपण तर इथे एकाच जागी उभे होतो केव्हापासून. हे सगळे भ्रम होत होते तर. काहीसे या व्हिडीयोत दाखवलेल्या लोकांसारखे आपण प्रत्यक्ष आयुष्य जगत आहोत. भ्रमाने सत्य विसरायला होतं. इथे या विडीयोत हे फारच तात्पुरतं आहे. प्रत्यक्ष आपला आत्मा करोडो जन्मांमधून परत परत असंच भासमान आयुष्य जगत आलाय.

शेवटी एक कुठेतरी आंजावर वाचलेली कर्मसिद्धांतावरची कथा सांगतो:
महाभारत युद्धानंतर शंभर पुत्रांच्या निधनाने व्याकूळ झालेला धॄतराष्ट्र कृष्णाला म्हणतो, 'हे द्वारकाधीशा, तुला तर चल, अचल, भूत, भविष्य या सगळ्यांचे ज्ञान आहे. आपला एक मुलगा बापाच्या हयातीत मरण पावला तर त्या बापाचे दु:ख हिमालयाच्या वजनापेक्षा जास्त असते. इथे तर माझे शंभरच्या शंभर पुत्र एका झटक्यात गेले रे? माझ्या दु:खाची तुला काही जरी कल्पना असेल तर मला सांग. मला सांग मी असे कोणते पाप केले की ज्यामुळे मला इतका भयंकर प्रसंग भोगावा लागतोय."

श्रीकृष्ण म्हणाला, "तुम्हाला ठावूक नसेलच पण या जन्माआधीपासूनच्या पन्नासाव्या जन्मात तुम्ही पारधी होता. व्यवसायानिमित्त पशु-पक्ष्यांची शिकार करणे तुमचा धर्म होता. पण एका मोहाच्या क्षणी तुम्ही एका पक्षाची शंभर पिल्ले मारली. तेव्हा तो त्यांचा बाप तिथेच वर फांदीवर बसून ते सगळं पाहत होता. एक पक्षी असल्याने तुमच्यासारख्या विशालदेही मनुष्यासमोर तो कुठलाच प्रतिकार करू शकत नव्हता. सर्व दु:ख मनात ठेवून त्याने आपल्या डोळ्यासमोर आपले शंभर पुत्र मरतांना पाहिले. त्याची हाय तुम्हाला लागली. ते दु:ख तुमच्या अकाउंटला लागले. ते आज फेडल्या गेले."

धृतराष्ट्र संभ्रमात पडले, "ते सर्व ठीक आहे. पण मग तेवढ्यासाठी एवढे पन्नास जन्म का वाट बघावी लागली? कर्मफल लगेच का मिळालं नाही?"

श्रीकृष्णाने मंदस्मित करत उत्तर दिले, "महाराजाधिराज, शंभर पुत्र व्हावे, योग्य वेळ येइस्तोवर त्यांचा योग्य सांभाळ व्हावा इतके पुण्य कमवायला तुम्हाला हे पन्नास जन्म लागले. एका झटक्यात ते इतक्या सहज तुमच्या डोळ्यासमोर मरावे यासाठी हे राज्य तुम्हाला मिळाले. इतके सगळे पुण्य कमवायला पन्नास जन्म फार कमी आहेत पण तुमच्या कर्माच्या तीव्रतेने ते साध्य केले."

असो.

सगळ्यांच्या गाडीतलं इंधन लवकर संपो आणि प्रवासाचा सगळ्यांना मनस्वी कंटाळा येवो अशी मनीषा व्यक्त करतो आणि थांबतो. (लेख फार विस्कळीत वाटत आहे पण गोड मानून घ्या.)

विज्ञानज्योतिषफलज्योतिषप्रकटनविचारप्रतिसाद

प्रतिक्रिया

माणसांचही तेच चाललेलं असते, समाजात राहायचे पण आणि फटकून पण राहायचे. असे दाखवायचे की मला कुणाचीच गरज नाही पण समाज सोडायची कुणाचीच तयारी नाही. अगदी मी मी म्हणणारे सन्यासीसुद्धा."---

चांगलं लिहिलंय.लेख नाही वाटला विस्कळीत अथवा शतकी प्रतिक्रियांच्या आशेने खरडलेला.

संदीप डांगे's picture

10 Jun 2015 - 3:31 pm | संदीप डांगे

धन्यवाद!

शतकी प्रतिसादांची अजिबात ओढ नाही. तिथेच प्रतिसाद टाकणार होतो. पण लांबला म्हणून स्वतंत्र धागा काढला. काथ्याकूटाची अपेक्षा नाही. अध्यात्म कुठल्याही प्रकारच्या काथ्याकूटातून सिद्ध होत नाही अशी माझी भाबडी समजूत आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

10 Jun 2015 - 3:12 pm | प्रकाश घाटपांडे

>> सृष्टीवर आपले नियंत्रण चालत नाही म्हणजे नियंत्रण ठेवणारा कुणीतरी असलाच पाहिजे, त्याला आपण खुश ठेवलं पाहिजे ह्या विचित्र अहंकारातून 'देव' संकल्पनेचा जन्म झाला.<<
यात अहंकार कसला आलाय. हे तर साधे गणित आहे की ज्या शक्ति ( इथे परमेश्वर) आपल्याला मदत करु शकतात त्यांना खुश ठेवले पाहिजे. स्त्रोत्र हा शब्द स्तु म्हणजे स्तुती करणे या क्रियापदा पासून आलेला आहे. देवाची स्तोत्र म्हणेज इष्ट देवतेची स्तुती किंवा गुणगान! परमेश्वराने सर्व शक्तिमान असलच पाहिजे नाही तर मला त्या परमेश्वराचा उपयोग काय? जो सर्वशक्तिमान आहे तोच माझे संरक्षण करु शकतो.नुसत्या निर्गुण निराकार परमेश्वराचा मला काय उपयोग? मला त्याच्याशी संवाद करता आला पाहिजे म्हणुन मी त्याला सर्व मानवी भावभावना चिकटवल्या.

संदीप डांगे's picture

10 Jun 2015 - 3:25 pm | संदीप डांगे

'अहंकार' या शब्दाचा अर्थ थेट 'माज, गर्व' असा घेऊ नये.

अहंकार म्हणजे द्वैत असल्याची भावना, वेगळेपणाची भावना, आपल्या मर्जीनुसार झालं पाहिजे ही भावना, मालकी हक्काची भावना. अहंकार या शब्दाच्या कितीही छटा काढल्या तरी 'स्वतःला पाहिजे तसं व्हावं' ही कुठल्याही छटेत, प्रसंगात कायम राहतेच. जाणता-अजाणता. त्यात चूक बरोबर आहे असं नाहीये. जे आहे ते आहे. समजलं तर सुटका लवकर होते इतकंच.

'नास्तिक', 'ब्रह्म' इत्यादी संकल्पनांबाबत तुम्ही मांडलेले विचार चुकीचे आहेत. असो.

hitesh's picture

11 Jun 2015 - 12:32 pm | hitesh

हे लबाडानी भोळ्या लोकाना फसवायला तयार केलेले मायाजाल आहे.

ब्रम्ह ब्रम्ह म्हणतात, ब्रम्ह वेदाला नाही दिसलं,
कुणी दावावं ब्रम्ह, तुम्हाला तुम्ही आम्ही असलं
सगुण ब्रम्ह निर्गुण ब्रम्ह,ब्रम्ह चोदा म्हणती ,
सहाचार अठरा पुराण्,त्याचा शोध करती,
जपी तपी संन्यासी योगी जटा वाढवती,
धढ (दृढ) आसन घालुनी आत्मा ब्रम्हांडी नेती,
ब्रम्ह ब्रम्ह म्हनविता ब्रम्ह जानंल त्यास दिसल.
सर्व ठिकाणी भरुन ब्रम्ह जग भरुन उरल.

पैसा's picture

12 Jun 2015 - 11:46 am | पैसा

मला कर्मकांडच काय शब्दात सुद्धा अडकायला आवडत नाही. पण वेळोवेळी अशा काही महाभागांशी गाठ पडते की चार बुकं वाचून आपल्याला अंतिम सत्य गवसलंय अशा समजुतीत ते असतात आणि मग आमच्यासारख्या अडाण्यांकडे तुच्छतेने बघणे आणि साप समजून भुई धोपटणे एवढ्या दोनच गोष्टी करत रहातात. अशा पढतमूर्खांशी कसे वागावे?

गंभीरपणे विचारत आहे. कारण त्यांच्यासमोर शहाणपणाचे कोणतेही शब्द बोलणे किंवा त्यांना आरसा दाखवणे हे सगळे फोल असते.

संदीप डांगे's picture

12 Jun 2015 - 12:27 pm | संदीप डांगे

अशा पढतमूर्खांशी कसे वागावे?

'तुम्ही महान' असे म्हणून सोडून द्यावे. अहंकारी लोकांना झोपवण्याची आणि थोपवण्याची एक चांगली युक्ती म्हणजे स्तुती.

विपश्यना कोर्सला जाऊन आल्यापासून अध्यात्म हा चर्चेचा विषय नाही असं माझं अलिकडे ठाम मत झालंय. विचार मांडावे पण काथ्याकूट करू नये. एकाचा अनुभव दुसर्‍याला प्रमाण म्हणून कधीच वापरू शकत नाही. प्रत्येक जण वेगवेगळ्या पायरीवर असतो. ज्याला सत्य गवसलंय तो कुणालाच समजवत फिरत नाही. अशा विषयांवर कुणी चुकत असेल तरीही सांगत नाही. कारण त्याला प्रवास ही संकल्पना समजली असते. खरे मार्गदर्शन फक्त गुरू-शिष्यामध्ये होऊ शकते. कारण गुरू शिष्याला अहंकाराने नव्हे तर पोटतिडकीने सांगत असतो. शिष्य प्रश्न विचारून भंडावून सोडण्याच्या नव्हे तर ज्ञानाच्या प्रचंड भूकेने कळवळून गुरूला विचारत असतो. बाकीच्या सगळ्या वृथा अहंकाराच्या गप्पा असतात. कुणीही त्यात पडून खरंच मनस्ताप करून घेऊ नये.

शरिरप्रकृतीनुसार प्रत्येकाला थंडी वाजण्याची तीव्रता वेगवेगळी जाणवु शकते. तसेच अध्यात्म.

अगदी लहान मूल ज्याला नुकतेच उठून चालायची उर्मी आलेली असते, त्याला तुच्छतेने 'अरे तुला चालताच येत नाही दोन दोन पाय असून' असे हिणवणारे खरेतर कधी चाललेलेच नसतात. ते खरे अडाणी.

समांतरः मागे याविषयावरचे हेवनवासी गुरूजींचे महान विचार वाचून मला फार हसायला आले होते. पण ते तुच्छतेने नव्हे. :-)

मी म्हटलं ते तुमच्या लेखाच्या विषयापासून जरा लांब आहे हे मला माहीत आहे. पण ट्रोलिंग नव्हतं. आता जरा वेगळ्या प्रकाराने लिहिते.

मला लेखात ब्रह्म, कर्म, कर्मफल, असे अनेक शब्द दिसले. त्यांचा तुम्हाला अभिप्रेत असलेला अर्थ माझ्यापर्यंत पोचला असेलच असे नाही. हे शब्द आणि संकल्पना प्रत्येकाचे शिक्षण आणि संस्कार याप्रमाणे त्याला समजतात. आता समजा की मला कर्मकांडच नव्हे तर शब्दांनाही बायपास करायचे आहे!

शब्द म्हणजे भूलभुलैया. काहीजण निव्वळ शब्दांनी आपल्याभोवती मायाजाल उभे करू शकतात. मी अध्यात्मात खूप पुढे पोचलेला आहे, (म्हणजे काय नेमके?) माझं ऐका म्हणतात. अशा वेळी काही साधे लोक या मोहक शब्दात फसतात. कर्मकांड सोडून देतात खरे पण मग शब्दात अडकतात! त्यातून बाहेर येणे जास्तच कठीण.

संदीप डांगे's picture

12 Jun 2015 - 1:38 pm | संदीप डांगे

पैसाताई, तुमचं म्हणणं समजलं होतं, ते ट्रोलींग नाही हे माहितीये. तुमचा प्रश्न प्रामाणिक आणि शंका रास्त आहे. एवढ्यासाठी हा प्रतिसाद.

अध्यात्मात शब्दांचे जंजाळ आहेत खरे. याबद्दल चांगली चर्चा होऊ शकते, सविस्तर लिहितो नंतर...

सतीश कुडतरकर's picture

12 Jun 2015 - 3:39 pm | सतीश कुडतरकर

__/\___

पण आपला उद्देश प्रवास करणे कुठे आहे? आपला उद्देश लवकरात लवकर प्रवास संपवणे आहे. कर्म हे गाडीतले इंधन आहे. ते प्रवास करूनच संपवायचे आहे. पण प्रत्येक पेट्रोलपंपवर इंधन भरत राहिलो तर कसं व्हायचं? प्रवास संपवायचा असेल तर निष्कर्म व्हा. बॅलन्स कमी करत जा. कर्मकांडांची गरज मनातल्या सुप्त भावनांना खाद्य देण्यापुरती आहे. त्याचा आयुष्यातली सुखं-दुखं कमी-जास्त होण्याशी काही संबंध नाही. खरंतर त्यातून कर्माचा बोजा अजून वाढतो. पण कर्मकांड अतिशय सोपे, भयानक कठीण ते 'निष्कर्म होणे'. मग जे सोपे तेच आचरल्या जाते. गाडी फुल्ल टँक होत जाते.

ह्यातून नेमके काय सांगायचे आहे?

द-बाहुबली's picture

12 Jun 2015 - 2:36 pm | द-बाहुबली

लेखातला व्हिडीओ आवडला. ओक्युलस रिफ्ट व्हिआर माझे ही फार आवडते आहे.

कारण नास्तिक देव नाही म्हणतो तेव्हा ती शक्ती माझ्या नियंत्रणात येऊ शकत नाही याचीच कबूली देत असतो. हे कसे? कुणाही नास्तिकाला किंवा प्रयत्नवाद्याला विचारा. एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होऊ शकत नाही याचा उद्वेग आस्तिकापेक्षा नास्तिकाला जास्त असतो. कारण तेच "सृष्टीचे नियंत्रण मला हवे, मला इतरांपेक्षा श्रेष्ठ व्हायचे आहे."

हे जरा विस्कटून सांगा. नास्तिक जेव्हा देव नाही म्हणतो तेव्हा तो देवाला नियंत्रणात आणायचा प्रयत्न का बरे करेल ?

एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होऊ शकत नाही याचा उद्वेग आस्तिकापेक्षा नास्तिकाला जास्त असतो.

हे कसे काय ? एखादी गोष्ट मनाप्रमाणे होत नसेल तर उद्वेग तर असेल पण त्याचे कारण "सृष्टीचे नियंत्रण मला हवे, मला इतरांपेक्षा श्रेष्ठ व्हायचे आहे" हे कसे काय?
एखादी गोष्ट मनाप्रमाणे होत नसेल तर नास्तिक माणूस त्यामागील वैज्ञानिक कारण शोधायचा प्रयत्न करेल. "स्रुष्टीचे नियंत्रण मला हवे... अस विचार करणार नाही.

नास्तिक जेव्हा देव नाही म्हणतो तेव्हा तो देवाला नियंत्रणात आणायचा प्रयत्न का बरे करेल ?

मुद्दा अहंकाराचा आहे. अहंकाराचा मला अभिप्रेत अर्थ वरच्या एका प्रतिसादात दिलाय. जिथे अहंकार आहे तिथे स्वामित्वाची भावना येते. स्वामित्वाच्या भावनेतून मनाजोगती गोष्ट घडत नसेल तर उद्वेग होतो. 'देव नाही आहे' असं नुसतं जाहिर करून नास्तिक (देवाचे अस्तित्व न मानणारा) मनाचे समाधान होत नाही. आस्तिक व्यक्ती ज्याप्रमाणे काही गोष्टी देवावर सोडून देतो - म्हणजे जिथे स्वतःचा अंमल चालत नाही त्या प्रसंगात - त्याचप्रमाणे नास्तिक सोडू शकतो का? मनासारखी गोष्ट न होण्याला तो काहीतरी कारण शोधेल (वैज्ञानिक, कल्पित) पण कारण शोधण्याची वृत्ती सोडत नाही. ही कारण शोधण्याची, त्याच्यावर मात करण्याची वृत्ती अहंकाराचं प्रमाण आहे.

नास्तिक माणूस त्यामागील वैज्ञानिक कारण शोधायचा प्रयत्न करेल

विज्ञान आणि अध्यात्म ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सद्यस्थितीत अध्यात्म हा शब्द उच्चारला की सामान्यपणे देव, धर्म, पूजा, गूढ तत्त्वज्ञान, भजन, किर्तन, नामजप, देवाच्या विषयावर होणारे चिंतन वैगेरे आठवतं. अध्यात्म शब्दाला हे सगळे अर्थ चिकटले आहेत. पण अध्यात्म वास्तविकतः आत्म्याच्या शुद्ध स्वरूपाचा शोध आहे. निसर्गात आपले नक्की ठिकाण आहे याचा शोध आहे. निसर्ग, सृष्टी म्हणजे काय आहे याचा शोध आहे. हा शोध स्वतःच्या शरिरापासून सुरू होतो. हे विज्ञानच आहे. पण ते शेअर करु शकत नाही. वाटू शकत नाही. मार्गदर्शन होऊ शकतं. अनुभूती देऊ शकत नाही. त्यामुळे ते विज्ञान होत नाही.

विज्ञान या शब्दाला प्रयोगशाळा, रॉकेट्स, गॅजेट्स, पुस्तकं, गंभीर चर्चा, संशोधन, नियम, सिद्धांत वैगेरे अर्थ चिकटले आहेत. वैज्ञानिक असा शब्द उच्चारला की लगेच अ‍ॅप्रन घातलेला कुणीतरी प्रयोगशाळेत काहीतरी अगम्य करत आहे असं चित्र डोळ्यापुढे उभं राहतं. त्या चित्रापलिकडे जाऊन विचार केला तर असंच कळेल की तोही शोध घेतोय, निसर्गाचा, सृष्टीच्या असण्याचा. आपल्या या ब्रह्मांडाशी असलेल्या संबंधाचा. फक्त हा शोध बाहेरून सुरू होतो. नियम सिद्ध केल्या जातात. जेणेकरून निष्कर्ष इतरांसोबत वाटता आले पाहिजे. ज्ञान उघड झाले पाहिजे, सर्वांना समजलं पाहिजे, अनुभवता आले पाहिजे अशा भाषेत, पद्धतीने मांडलं पाहिजे. हे विज्ञान अध्यात्मच आहे. शोध घेईपर्यंत ते अध्यात्मच असतं, इतरांना सांगतांना ते विज्ञान होतं.

विज्ञान आणि अध्यात्म दोहोंचे मार्ग आणि उद्देश एकच आहेत. एक बाहेरून अभ्यास आहे, दुसरा आतून.

आता वैज्ञानिक विचारसरणीचा माणूस नुसतं कारण शोधून थांबला आहे काय? नाही. त्याच्या समस्यांवर विज्ञानाच्या मदतीने त्याने उपाय शोधलेच ना? म्हणजे प्राप्त परिस्थितीत मनासारखे बदल करण्यासाठीच विज्ञानाची कास धरली? बरोबर? हे केव्हा घडले? जेव्हा कळले की देव नाही, आपल्या मनासारखं घडवून देईल अशी शक्ती आपण मानत होतो. पण तसा काही अनुभव आला नाही म्हणून आपण नास्तिक झालो ना?

नास्तिक असणे हाही अध्यात्माचाच भाग आहे. अध्यात्म म्हण्जे टाळ कुटणे नव्हे, नामजप नव्हे. अज्ञाताचा शोध घेणे आहे. तसेच विज्ञान म्हणजे शोध घेणे आहे, प्रयोगशाळा म्हणजे विज्ञान नाही. विज्ञानाच्या बाबतीतही मनुष्यजात अजून तीन महिन्याच्या बालकाच्या अवस्थेत आहे असं मला वाटतं. आपलं विज्ञान 'ट्यांहा केलं की दुध मिळतं' इतक्याच पायरीपर्यंत आलं आहे. तसं नसतं तर मनुष्यजात आज करत असलेले उपद्व्याप करत नसती.

माझ्या प्रवासात ह्या काही स्वानुभवावर उमजलेल्या गोष्टी आहेत. योग्यअयोग्य सांगू शकत नाही.

मनासारखी गोष्ट न होण्याला तो काहीतरी कारण शोधेल (वैज्ञानिक, कल्पित) पण कारण शोधण्याची वृत्ती सोडत नाही. ही कारण शोधण्याची, त्याच्यावर मात करण्याची वृत्ती अहंकाराचं प्रमाण आहे.

एखादं गणित सुटत नाही. एखादं मशीन काम करेनासं झालंय, तर त्याचं कारण शोधण्यामधे अहंकार कुठे आला ?
नास्तिक माणूस एकतर कारण शोधण्याचा प्रयत्न करेल कींवा माझ्या कुवतीच्या बाहेरचे आहे आणखी कोणाची तरी मदत घेतो असे ठरवेल.
अध्यात्म काय आहे माहीत नाही. माहीत करुन घेण्याचा प्रयत्न कधी केला नाही, करणार नाही. (क्रुपया हा अहंकार समजु नका.) :)

देव, अध्यात्म, कर्मकांड, व्रतवैकल्ये यात एकूणच गती कमी असलेला - खटपट्या

संदीप डांगे's picture

13 Jun 2015 - 12:26 am | संदीप डांगे

त्याचं कारण शोधण्यामधे अहंकार कुठे आला ?

अहंकार म्हणजे गर्विष्ठपणा, इगो असा प्रस्थापित अर्थ घेऊ नये असं माझं मत आहे. सहज ओळखू येणारे गर्विष्ठपणा, इगो हे विशाल वटवृक्षासारखे मानले तर मी जो म्हणतोय तो अहंकार म्हणजे एक छोटंसं बीज. असो. अधिक शब्दबंबाळ मांडणी करून अर्थाचा अनर्थ करत नाही. वेळ मिळाला तर सविस्तर लिहिन. रोजच्या जीवनातली उदाहरणे देऊन हा विचार मांडावा लागेल.

नास्तिक असो वा आस्तिक, प्रत्येक जण समस्येवर उपाय शोधत असतो व करत असतो. त्यात नास्तिक-आस्तिक असा भेद नसावा. देवाला हळद-कुंकू वाहणारेही खरचटलं-कापलं की हळद लावतात, देवाचा धावा नाही करत. प्रत्येकाची आपआपली पायरी, मर्यादा आहे. कुणीच जास्त शहाणा किंवा जास्त मूर्ख नाही.

'देव, अध्यात्म, कर्मकांड, व्रतवैकल्ये' या यादीत 'अध्यात्म' हे 'ऑडमॅन आउट' आहे. अध्यात्म हे सर्वव्यापी आहे. तुम्ही एखादं काम देहभान, तहानभूक विसरून जेव्हा करत असता तेव्हा खरोखर अध्यात्म जगत असता. तो क्षण पूर्णपणे वर्तमानात असतो. तेव्हा जीवाला होणारी अनुभूती म्हणजेच समाधी. ही समाधी कोणत्याही कामात जेव्हा साधल्या जाते तेव्हा अध्यात्माची ओळख पटते. मग ते एखादं मशीन दुरुस्त करणे असो, एखादी डिश बनवणे असो, एखादं चित्र रंगवणे किंवा गाणं गाणे. समाधीतून अद्वैत होता येतं. असा अनुभव प्रत्येकाने आयुष्यात कधी ना कधी किंवा बरेचदा घेतलेला असतो. एक-दोन क्षण ते तीन-चार तास. एकदा याची गोडी लागली की हा समाधीकाल अनंत कसा करता येईल याकडे मन लागतं. आतापुरतं येवढंच, बाकीचं नंतर... :-)

असो. मला सगळ्या संकल्पना अशा एकदोन प्रतिसादात मांडता येणार नाहीत. मांडल्या तरी प्रत्येकाला पटतीलच असेही नाही. मी लिहल्या म्हणून पटल्याच पाहिजेत किंवा मी पटवूनच दाखवतो असं काही मला वाटत नाही. कारण याआधी हजारो-करोडो लोकांनी हेच काथ्याकूट केलंय. पण प्रश्न जसे येत आहेत तसं काय आणि कसं लिहायचं हे स्पष्ट होत आहे. मला पण माझ्या संकल्पना स्पष्ट होतील. प्रश्नांबद्दल धन्यवाद!