तेरा घर -मेरा घर .. भाग दुसरा.

हेमंत बर्वे's picture
हेमंत बर्वे in जनातलं, मनातलं
7 Nov 2008 - 12:39 pm

पहील्या लेखासाठी टिचकी मारा
http://www.misalpav.com/node/4004

सजावटकार म्हणून काम सुरु केले तेव्हा अंदाज असा होता की गृहस्थाश्रमाला आवश्यक तेव्हढे पैसे तर मिळतील आणि थोडी बचत पण होईल.दोनेक वर्षानंतर लक्षात आलं की आपली बचत तर सोडा पण गृहस्थाश्रम चालवताना थोडे कष्टच होत आहेत.मनात आलं की आपलं गणित चुकलं गड्या.
आणि एक दिवस दुपारी जेवून साईटवर जाताना माझा एक हेल्पर मारवाड्याच्या दुकानात उभा असल्याचा भास झाला. स्कुटरवर असल्यामुळे थांबलो नाही.पण रोज दुपारी असे भास व्हायला लागले तेव्हा कळलं की तेरे गठरीमे लागा चोर मुसाफीर जाग जरा तू जाग जरा. दुसर्‍या दिवशीपासून साईट व्हिजीटच्या वेळा बदलल्या.ऍलन नॉट सारखी टाईट फिल्डींग(आता तुम्ही गिलख्रीस्ट सारखी म्हणा हवं तर.)लावली.नफ्यातली गळती बंद झाली .चार -पाच टक्के बचत व्हायला सुरुवात झाली. माझ्या कामाची कोटेशन स्लिम -ट्रीम झाली.ग्राहकांचा ओघ वाढला.सांगायचं कारण असं की मी सुद्धा चुकत माकत शिकत गेलो.
-------------------------------------------------------------------------------------------
मागच्या वेळेस मी म्हटलं होतं की कारागीर लुच्चे असतात असं नाही तर कस्टमर सुद्धा काही वेळा कहर करतात.फायनल प्लॅन देताना मी नेहेमी आग्रह करतो की घरातल्या सगळ्या ऍक्टीव सभासदांनी त्या मिटींगला हजर असावं.काही वेळा ही अतीशयोक्ती आहे असं वाटतं ग्राहकाला पण काम सुरळीत चालण्यासाठी हे फार गरजेचं असतं.एखादा हिडन अजेंडा अशा वेळी वर येतो.
अग्रवाल नावाच्या एका व्यापार्‍याकडे माझ्या कामाला सुरुवात झाली. सजावटकारासोबत अग्रवालचे बाबा सगळं काही को-ऑर्डीनेट करणार होते.बाबा वयाच्या मानानं ऍक्टीव्ह होते.
फर्नीचरचं काम सुरु झालं .प्लायवुड कापायला सुरुवात झाली. काही प्लायवुड ठोकून झालं.बिडींग पट्टी पावणा इंचाची आणली.
रोज सकाळी बाबा एका हातात फुटपट्टी घेउन बसायचे.बिडींग पट्टी पावणाची म्हणजे एखाद सुत इकडे तिकडे असते.रंधा मारण्यासाठी थोडं मार्जीन असतं.बाबा काही ऐकायला तयार नाहीत.एकूण एक पट्टी पावणाची आहे की नाही ते तपासायचे. हनुमानाला सीतामाईनी दिलेल्या माळेचे एकेक मोती फोडून बघावे तसे ते प्रत्येक पट्टी तपासायचे .
कारागीर खूश. अर्धा दिवस आराम.संध्याकाळी पट्ट्या परत देण्यात मारवाड्याच्या दुकानात वेळ जायचा.
एकीकडे किचनचं काम सुरु केलं होतं. सिमेंटच्या प्रत्येक गोणीचं वजन दुकानात उभं राहून करून घ्यायचे.त्यांना दुकानात न्यायचं आणि घरी आणून सोडायचं.आता माझीच गाडी आहे म्हटल्यावर ते चार कामं उरकून घ्यायचे.
अशा परीस्थीतीत काम मंदावलं.माझ्या लक्षात आलं मुद्दाम खोडा घालण्याचा हा बेत आहे.
मी महीना पूर्ण होऊ दिला. अग्रवाल चिंताग्रस्त. ठरलेल्या कामापैकी फक्त पंधरा टक्के काम झालं .
मी पुढचा चेक मागीतला. अग्रवाल म्हणाले" काम तर काही होत नाहीय्ये आता चेक कशाचा."
मी म्हटलं बेबी(बाबा) सिटींगचा .महीनाभर बाबांना सांभाळण्याचा.
माणूस हुशार .लगेच दोन दिवसानी बाबा नेटीव प्लेसला रवाना झाले. काम सुरळीत सुरु झालं .पूर्ण झालं.
शेवटचं पेमेंटसुद्धा कटकट न करता .(हा एक मोठ्ठा कठीण भाग असतो पण त्याबद्दल नंतर कधीतरी)बोलता बोलता थोडा चेहेरा पाडून म्हणाले की बाबांना त्यांच्या ताऊजीच्या सुताराला काम द्यायचं होतं. सांगायचा मुद्दा हा की असा हिडन अजेंडा काहीवेळा फार त्रासाचा होतो.
--------------------------------------------------------------------------------------------
पण सगळेच कस्टमर काही असे नसतात. समजूतदार माणसं पण भेटतात.प्रधानांच्या घरी काम चालू होतं.हॉल अणि किचनच्या मध्ये इच केलेली ग्लास टाकून पार्टीशन करायचं होतं.डिजाईन फायनल करायला आम्ही काचेच्या कारखान्यात गेलो होतो. जवळजवळ फायनलला पोहचलोच होतो ,एव्हढ्यात मिसेस प्रधानांचं लक्ष रंगीत काचेच्या पार्टीशन कडे गेलं आणि त्यांना ते आवडलंही.
आता साध्या इच केलेल्या काचेऐवजी कलर इच केलेली काच वापरायचीम्हणजे पाच ते सहा हजाराचा फरक पडत होता. त्यांनी मला विचारलं , बर्वेसाहेब ,तुम्हाला काय वाटतं?
मी फक्त किमतीतला फरक त्यांच्या लक्षात आणून दिला. दुसर्‍या क्षणी त्यांनी वाढीव खर्चाला मान्यता दिली आणि एक पोटेंशीअल समस्या संपुष्टात आली.
अशा मनमोकळ्या वातावरणात सजावटकार आणखी जोमानं आणि जबाबदारीनं काम करतो.
प्रोफेशनल सजावटकार अशा अनेक बारीक सारीक समस्या जागच्याजागीच सोडवतो.कामाला होणारा खोळंबा कमी होतो.
--------------------------------------------------------------------------------------------

कारागीर, ग्राहक आणि सजावटकार हा त्रिकोण नेहेमी सम भुज असावा असं मला वाटतं.या त्रिकोणाची कुठलीच बाजू दुसर्‍यापेक्षा मोठी नसावी.हुशारग्राहक आणि सजावटकार यांच्यात समन्वय चांगला असला की कारागीर हा बिंदू नाहीसा होतो आणि एका सरळ रेषेत संवाद चालू राहतो.
ही कल्पना थोडीशी युटोपीअन आहे.पण अपेक्षीत आहे.
सगळेच सजावटकार मान्यता प्राप्त विद्यापीठाचे वास्तुशास्त्र पदवीधर नसतात. बरेचजण अनुभव/ व्यवहार ज्ञान आणि सौंदर्याची जाण या भांडवलावर यशस्वी होतात.
आता , सजावटकार नेमला की कामाला सुरुवात होते पण हा विषय वाढवण्यापूर्वी एक चेकलिस्ट द्यावीशी वाटते.हा मसुदा दोन्ही बाजूंची काळजी घेतो.
१ शंका मनात न ठेवता स्पष्ट बोलणं फार महत्वाचं आहे. मनात राहीलेली शंका बोरातल्या अळीसारखी असते. कामाच्या शेवटच्या टप्प्यात तिचा तक्षक होतो
२ घरात सजावटकार आणि इतर मंडळी दोनेक महीने तरी तुमच्या सोबत असतात. प्रत्येकाच्या वावराची वर्तुळं मात्र कटाक्षानं वेगळी ठेवावी.
३ नातेवाईकातील किंवा ओळखीच्या सजावटकाराकडून काम करून घेताना प्रोफेशनल तोल सांभाळून काम करून घ्यावं.हा समंजसपणा दोन्ही बाजूनी असला की कामाचा व्यावसायीक डौल कायम राहतो.
४ बर्‍याच वेळा सजावटकार आधी केलेल्या कामाची चुणूक दाखवण्यासाठी साईट व्हिजीट ऍरेंज करतात.तेव्हा महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या त्या अशा,
अ) ते काम खरोखर(पूर्णपणे )त्यानीच केलं आहे याची शहानिशा करावी.
ब)जमल्यास त्यांची आणि कारागीरांची वागणूक कामाच्या शेवटापर्यंत एकसारखी चांगली होती किंवा नाही याचा अंदाज घ्यावा.
क)काम पसंतीला आलं तर त्या कामाची टीम आणि आता येणारी टीम तीच आहे ना हे स्पष्टपणे विचारावं. जर एक नसेल तर नवीन टीम तेव्ह्ढीच कामात तरबेज आहे ना याची कबुली सजावटकाराकडून घ्यावी.
ड)सगळेच सजावटकार बिझी असतात पण आपल्या कामाला तो पूरेसा वेळ देईल किंवा नाही याची खात्री करून घेतलेली बरी.

आतापर्यंत लिखाण रंजक व्हावं असा मी प्रयत्न केला .यानंतरच्या भागात थोडीशी तांत्रीक क्लिष्टता येण्याची शक्यता आहे.उदा; प्लायवूड, मायका,व्हीनीअर , व्हीनीअर पॉलीश, आणि इतर हार्डवेअर यांची माहीती , त्याचं अर्थशास्त्र (खरं आणि खोटं) वगैरे वाचताना कदाचीत कंटाळा येईल पण कंटाळू नका . तुमचे पैसे वाचवण्याची ताकद कदाचीत या माहीतीतच दडली असेल.

अवांतरः बचत केलेल्या पैशाची व्याप्ती खूप मोठी आहे.
एखादं हॉलीडे पॅकेज,एखादा दागीना, एखाद्या नामवंताचं पेंटींग. येस . नक्कीच.

संस्कृतीसमाजजीवनमानविचारआस्वाद

प्रतिक्रिया

वासुनाना आले's picture

7 Nov 2008 - 12:51 pm | वासुनाना आले

झकास लिहिता राव लिहित जा मन्जे मिपा कराना चांगल्या बातम्या आनी खाचा खोचे समजतील
छंद - पलंगतोड पान खाण्यात जी मजा आहे ती कशातच नाही

सहज's picture

7 Nov 2008 - 5:00 pm | सहज

पुढचा भाग लवकर येउ द्या.

महेश हतोळकर's picture

7 Nov 2008 - 5:19 pm | महेश हतोळकर

असेच म्हणतो.

कपिल काळे's picture

7 Nov 2008 - 7:22 pm | कपिल काळे

सुंदर लेख.शैलीसुद्धा .

लवकर लिहा पुढचा भाग

http://kalekapil.blogspot.com/

मिसळ's picture

7 Nov 2008 - 8:17 pm | मिसळ

माहिती. तुमची लिहिण्याची शैली देखिल मस्त. पु.ले.प्र.
- मिसळ

प्राजु's picture

7 Nov 2008 - 8:32 pm | प्राजु

तुमच्या लेखनाने बरेच पैलू समोर आले.
लवकर येऊदे पुढचा भाग.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

रेवती's picture

7 Nov 2008 - 9:03 pm | रेवती

धन्यवाद!

रेवती

मन्जिरि's picture

7 Nov 2008 - 11:28 pm | मन्जिरि

भरपुर माहिति मिळालि नविन घरात उपयोगि पडेल